डॉ.श्रीहरी हसबनीस
9022651287/7588034068
कोकणात हळवा भात कापला की, शेत रिकामे ठेवण्याची गरज भासत नाही. जमिनीत शिल्लक असलेल्या ओलाव्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात मेथी, मुळा, कोथिंबीर, पालक, शेपू यांसारख्या भाजीपाल्याची लागवड करता येते. योग्य नियोजन, उंच वाफे आणि आच्छादनातून भातानंतर उत्पन्नाची नवी वाट खुली होते.
कोकणात हळवा भात साधारणपणे ऑक्टोबरमध्ये काढला जातो. भात काढणीनंतर जमिनीत शिल्लक राहिलेल्या ओलाव्याचा योग्य उपयोग करून कमी पाण्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेता येते. भात काढणीपूर्वीच पुढील पिकाचे नियोजन केल्यास अतिरिक्त पाण्याची गरज अत्यल्प राहते.
योग्य भाजीपिकांची निवड
भात काढणीनंतर 30 ते 50 दिवसांत उत्पादन देणार्या पुढील पिकांना प्राधान्य द्यावे :
* मुळा
* मेथी
* कोथिंबीर
* पालक
* शेपू
* मोहरीची भाजी
कमी पाणी, कमी कालावधी आणि कमी जोखीम यासाठी मेथी, मुळा, कोथिंबीर, पालक आणि शेपू ही पिके विशेष उपयुक्त आहेत.
भात काढणीपूर्वीची तयारी
भात काढणीच्या सात ते दहा दिवस आधी पुढील पिकाचे नियोजन करावे. भात काढल्यानंतर शेत कोरडे होण्याची वाट पाहू नये.
* भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा जपावा.
* जमीन अतिशय ओली असल्यास त्वरित मशागत करू नये.
* योग्य वाफसा आल्यानंतर हलकी कुळवणी करून माती भुसभुशीत करावी.
* पाणी साचू नये म्हणून उंच किंवा रुंद वाफे तयार करावेत.
* भाताचे काड जाळू नये; त्याचा आच्छादन म्हणून उपयोग करावा.
* चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत जमिनीत मिसळावे.
लागवडीचा योग्य क्रम
भात कापणीहलकी मशागतउंच वाफेपेरणीसेंद्रिय आच्छादन
पेरणीनंतर जमिनीवर भाताचे बारीक काड, वाळलेले गवत किंवा कुजलेली पाने यांचा दोन ते तीन सेंमी जाडीचा पातळ थर द्यावा. यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकतो. बाष्पीभवन कमी होते आणि सिंचनाची गरज घटते.
मात्र बियाण्यांवर जाड आच्छादन देऊ नये. उगवण झाल्यानंतर आच्छादन योग्य अंतराने पसरवावे.
एकाच पिकावर अवलंबून न राहता तीन ते चार पिकांचे मिश्र नियोजन केल्यास वेगवेगळ्या कालावधीत उत्पादन मिळते आणि बाजारात सातत्याने भाजीपाला उपलब्ध करून देता येतो.
वाफ्यांची रचना
भारी कोकणी जमिनीत पुढीलप्रमाणे वाफे करावेत
* वाफ्याची रुंदी - 1 ते 1.2 मीटर
* वाफ्याची उंची - 15 ते 20 सेंमी
* वाफ्यांमधील चर - 30 ते 40 सेंमी
या अशा रचनेमुळे जमिनीतून पाण्याचा निचरा चांगला होतो आणि मुळांजवळ पाणी साचत नाही.
पहिल्या सात दिवसांचे नियोजन
दिवस 0-भात काढणी : भात काढल्यानंतर जमिनीतील ओलावा तपासवा.
दिवस 1 ते 3-ओलावा तपासणी : हातात माती दाबल्यावर तिचा गोळा तयार होत असेल आणि मातीमध्ये पुरेसा ओलावा जाणवत असेल, तर पेरणीची तयारी करावी.
दिवस 2 ते 5-वाफे तयार करणे : हलकी मशागत करून वाफे तयार करावेत. जमीन खूप ओली असल्यास यंत्राने मशागत करून मातीचा चिखल करू नये. त्यामुळे पुढे कडक थर तयार होण्याची शक्यता असते.
दिवस 3 ते 7-पेरणी : मुळा, मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू आणि मोहरीची भाजी यांची पेरणी करावी.
सेंद्रिय खत व्यवस्थापन
प्रतिगुंठा साधारणपणे पुढील प्रमाणात खत द्यावे :
* चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट-50 ते 75 किलो.
* गांडूळखत उपलब्ध असल्यास-15 ते 20 किलो.
पेरणीपूर्वी हे खत मातीत व्यवस्थित मिसळावे. विशेषतः पालेभाज्यांसाठी ताजे शेण वापरू नये.
पाणी व्यवस्थापन
या पद्धतीकडे सिंचनमुक्त शेती म्हणून नव्हे, तर किमान सिंचनावर आधारित शेती म्हणून पाहणे अधिक योग्य आहे.
जमिनीत पुरेसा शिल्लक ओलावा असल्यास सुरुवातीला पाणी देण्याची गरज भासणार नाही. मात्र पुढील परिस्थितीत संरक्षक पाणी द्यावे.
* बियाण्यांची उगवण मंदावल्यास.
* दुपारी पिकांची पाने निस्तेज किंवा लोंबलेली दिसल्यास.
* मातीचा वरचा थर पूर्णपणे कोरडा झाल्यास.
* उगवणीनंतर पिकावर पाण्याचा ताण जाणवल्यास.
क्षेत्र लहान असल्यास झारीने हलके पाणी द्यावे. शक्य असल्यास तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. संपूर्ण शेत भिजवण्याऐवजी मुळांच्या परिसरापुरतेच आवश्यक पाणी द्यावे.
कोकणासाठी महत्त्वाची सूचना
हा प्रयोग सर्व हळव्या भाताच्या शेतात समान प्रमाणात यशस्वी होईलच असे नाही. शेताची निवड करताना पुढील बाबी तपासाव्यात :
* भात काढणीच्या वेळी जमिनीत उपलब्ध असलेला ओलावा.
* जमिनीचा पोत - चिकणमाती, गाळाची किंवा वालुकामय.
* पाण्याचा निचरा.
* ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील स्थानिक पाऊस.
* आवश्यकतेनुसार एक-दोन संरक्षक पाण्याची उपलब्धता.
अंतिम शिफारस
हळवा भात काढणीनंतर कमी पाण्यात, कमी कालावधीत आणि कमी जोखमीने भाजीपाला घ्यायचा असल्यास - मेथी+मुळा +कोथिंबीर+पालक+शेपू ही पिके योग्य नियोजन, उंच वाफे, सेंद्रिय खत आणि आच्छादन यांच्या साहाय्याने घेतल्यास भातानंतर शेताचा उत्पादक वापर करता येतो.
लेखक ’श्री. विठलराव जोशी विद्यापीठ डेरवण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी’ येथे ’स्कूल ऑफ अॅग्रोप्रिन्योरशिप’चे प्रमुख आहेत.