पिढ्यान्पिढ्यांचा संस्कारपट - एक संघमय गृहस्थधर्म

विवेक मराठी    19-Oct-2026
Total Views |
rss
आणीबाणीच्या काळात कॉलेजच्या आवारात दबक्या आवाजात ऐकलेल्या गप्पांमधून संघकार्याची पहिली ओळख झाली. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात रुजलेली आत्मीयतेची ही छोटीशी ठिणगी पुढे मुलांच्या शिस्तीत, नातवंडांच्या संस्कारांत आणि संपूर्ण घराच्या जीवनशैलीत कशी रूपांतरित झाली...याचा तीन पिढ्यांचा हा एक भावूक आणि समृद्ध प्रवास!
माझे माहेर एक मध्यमवर्गीय सामान्य कुटुंब होते. बाहेरच्या जगात काय चाललेय याच्याशी काहीही देणे-घेणे नव्हते. माझे महाविद्यालयीन शिक्षणाचे शेवटचे वर्ष होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली. एका रात्रीत संघ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. राजकारण ढवळून निघाले. शाखा भरवण्यावर बंधने घातली. या सर्वांची चर्चा कॉलेजच्या आवारात दबक्या आवाजात चर्चा ऐकू यायची. त्यातून संघ, स्वयंसेवक, त्यांचे कार्य यासर्वांची माहिती मिळत गेली. स्वयंसेवकांविषयी आदर, आत्मीयता वाढली.
 
 
दरम्यान मध्यावधी निवडणुका झाल्या. जनतेने घराणेशाहीला डावलल्याने जनता आघाडी सरकार स्थापन झाले. माझ्याही आयुष्यात स्थित्यंतर घडून मी औरंगाबादमध्ये सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथे राहू लागलो. मुले तिथे शालेय शिक्षण घेत होती. शाळेमध्ये स्काऊट-गाईडमध्ये रमू लागली. त्यामुळे स्वकमाईसारखे विषय कळू लागले.
 
 
आमच्या शेजारी विनायकराव कोठेकर राहायला आले. ते स्वयंसेवक आहेत. ते रोज सकाळी शाखेला जात. त्याचे बोलणे, त्यांची शिस्त, त्यांचा टापटीपपणा मुलांना आवडला. आपल्याकडेपण कोणीतरी असे असावे त्यांना वाटू लागले. ते सर्व त्यांना व्यक्त करता यायचे नाही. ”बाबा तुम्ही एकदा तरी पोलीस व्हा,”असे म्हणायचे.
 
 
कालांतराने मुलगा आर्किटेक्ट होऊन लातूरला स्थायिक झाला. त्याचा स्वयंसेवकांशी परिचय वाढला. तो संघाच्या प्रत्येक उत्सवात उस्फुर्तपणे सहभागी होतो. वर्गाला जातो. संघविचारधारेशी निगडीत ’जनकल्याण समिति’ अंतर्गत बहुविकलांग मुलांची शाळा चालवली जाते. तिथे कार्यवाह म्हणून काम पाहातो. त्याच्यामुळे घरी स्वयंसेवक, प्रचारक या मंडळींची घरी ऊठबस वाढली. मनमोहनजी वैद्य, राकेशजी जैन, सुरेशजी सोनी यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची पायधूळ आमच्या घराला लागली.
 
...आणि घर पावन झाले.
 
माझ्या मुलाला त्याच्या सहचारिणीची साथ चांगली मिळाली. तीपण समितिच्या कार्यक्रमात रमते. वर्गाला जात असते. तिच्याकडे ’युवतीमंच’ची जबाबदारी आहे. समितिच्या कार्यक्रमात वंशी, आनक चांगल्या प्रकारे वाजवते. बीड येथे झालेल्या घोषवर्गात आनक वाजवले. तिच्या स्वयंसेविका मैत्रीणी कल्याणी पाठक, कल्याणी संत घरी आल्या होत्या. माझी नात समिति कार्यक्रमाला जात असते. कार्यक्रमात गीत म्हणते. निरनिराळ्या खेळांत रमते. माझा नातू वर्गाला जातो. तोही आनक चांगला वाजवतो. वर्गाला गेल्यामुळे त्याला स्वावलंबनाचा धडा मिळाला. जेवण वाढून घेणे, दुसर्‍याला वाढणे, स्वत:ची छोटी छोटी कामे स्वत:च करू लागला. एकंदरीत घरात एक प्रकारची शिस्त निर्माण झाली. या सर्वांत मी घरातली जबाबदारी सांभाळून त्यांना त्यांचा वेळ मिळेल याची काळजी घेते. अशा प्रकारे माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. खर्‍या अर्थाने माझे घर संघाचे झाले...
समाप्त.