गृहस्थी कार्यकर्ते संघकार्याचा खरा आधार- सुहासराव हिरेमठ

विवेक मराठी    19-Oct-2026
Total Views |

Tapasvi Granth
सोलापूर ः ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे केवळ प्रचारकांमुळे वाढलेले नसून, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळत राष्ट्रकार्याला प्राधान्य देणार्‍या गृहस्थी कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे, योगदानामुळे विस्तारले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही संघकार्याची निष्ठा न सोडणार्‍या या कार्यकर्त्यांचे जीवन प्रेरणादायी असून, त्या घरातील महिला शक्तीचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. कार्यकारिणी सदस्य, सुहासराव हिरेमठ यांनी केले.
’विवेक’ प्रकाशित 101 गृहस्थी कार्यकर्त्यांची लघुचरित्रे मांडणारा ‘तपस्वी’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात शुक्रवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शहर संघचालक सीए डॉ. सुनील इंगळे, ’विवेक’ पुस्तक प्रकाशनच्या व्यवस्थापक शीतल खोत आणि सोलापूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत धोंडे उपस्थित होते.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना सुहासराव पुढे म्हणाले, ”सुरुवातीच्या काळात संघाला उपेक्षा, विरोध आणि अपप्रचाराला सामोरे जावे लागले, तरीही कार्यकर्त्यांनी सातत्याने काम सुरू ठेवले. प्रचारक एकाच ठिकाणी दीर्घकाळ राहात नाही; पण गृहस्थी कार्यकर्ते आपल्या गावात आणि परिसरात सातत्याने काम करीत असतात. त्यामुळे त्यांना तिथल्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जावे लागते. तरीही देश आणि समाज प्रथम त्यानंतर कुटुंब, व्यवसाय आणि स्वत:चे जीवन असा प्राधान्य क्रम ठेवून या सर्व गृहस्थी कार्यकर्त्याने आपले कार्य केले आहे. संपूर्ण देशभर प्रचारकांची संख्या काही हजारांत असेल, पण गृहस्थी कार्यकर्त्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. त्यामुळेच या ग्रंथासाठी 101 दिवंगत गृहस्थी कार्यकर्त्यांची निवड करणे ही अतिशय कठीण बाब होती, पण ’विवेक प्रकाशन’ने हे कठीण कामही उत्तमरीत्या पार पाडले आहे.
 
 
”गृहस्थी कार्यकर्त्यांच्या कार्यामागे त्यांच्या पत्नीचे योगदान मोठे असते. घर, मुलं आणि कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळण्याबरोबरच संघकार्यामुळे घरी येणार्‍या कार्यकर्त्यांची व्यवस्थादेखील त्या आपुलकीच्या नात्याने पार पाडतात. त्यामुळे या महिलांच्या योगदानाची स्वतंत्र नोंद घेणारा ग्रंथही विवेकने प्रकाशित करावा,” असा प्रस्तावही त्यांनी मांडला.
 
 
अनेक गृहस्थी कार्यकर्त्यांच्या त्यागाची, कष्टाची उदाहरणे त्यांनी यावेळी मांडली. तसेच नानाराव ढोबळे यांच्या ‘समाजतळातील मोती’ या पुस्तकाचा उल्लेख करून त्यांनी अशा कार्यकर्त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
 
”आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतानाच आपल्या समाजाचाही कसा विचार केला पाहिजे, समाज सेवा कशी करायला पाहिजे, याबद्दल यथोचित मार्गदर्शन या तपस्वी ग्रंथातून आपल्याला मिळेल. आज आपण आपल्या हक्कांबद्दल जागृत असतो; पण कर्तव्यांबद्दल दुलर्क्षित असतो. मात्र हे गृहस्थी कार्यकर्ते आपल्या कर्तव्याप्रती जागृत होते. देश, राष्ट्र प्रथम कुटुंब नंतर हाच त्यांचा बाणा होता. त्यामुळे अशाप्रकारचे ग्रंथ आपण वाचले पाहिजे, त्यातून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल,”असे प्रतिपादन सुनीलजी इंगळे यांनी केले.
 
 
चंद्रकांत धोंडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील ’विवेक’ची आधीची स्थिती आणि आताची स्थिती याची माहिती सांगितली. शीतल खोत यांनी ’विवेक पुस्तक प्रकाशन’ आणि ग्रंथाच्या संकल्पनेची माहिती दिली, तर डॉ. चंद्रकांत चिलजवार यांनी आभारप्रदर्शन केले. रूपाली लोंढे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

Tapasvi Granth 
 
“राष्ट्रवाद हाच संघाच्या विचारसरणीचा
आत्मा आहे”
- विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार
चंद्रपूर : ”समाजात राष्ट्रवादी विचारांचा सातत्याने प्रसार होणे आवश्यक आहे. राष्ट्रवाद हाच संघाच्या विचारसरणीचा आत्मा आहे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये समाज आणि राष्ट्राप्रती सहानुभूती, जबाबदारी आणि समर्पणाची भावना जागृत होत नाही, तोपर्यंत बाह्य आव्हानांचा सामना करणे कठीण जाईल. त्यामुळे, संघाची विचारधारा अखंडपणे प्रवाहित राहिली पाहिजे आणि ती समाजाच्या मूल्यांमध्ये खोलवर रुजली पाहिजे,”असे विचार विदर्भ प्रांताचे संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी व्यक्त केले.
गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी श्यामा प्रसाद मुखर्जी ग्रंथालयाच्या सभागृहात विवेक प्रकाशित 101 गृहस्थी कार्यकर्त्यांची लघुचरित्रं मांडणारा ‘तपस्वी’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय ऐंचवार यांच्यासह ’तपस्वी’ ग्रंथाचे संपादक रवींद्र गोळे आणि श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालयाचे सचिव अनिल बोरगमवार हे मान्यवर उपस्थित होते.
 
”व्यक्तीची कर्तबगारी कधीच नष्ट होत नाही, ” असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. ऐंचवार यांनी केले. पुढे ते असेही म्हणाले की, ’त्याउलट, ते आपल्या विचारांतून आणि कृतीतून पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. अशा व्यक्तिमत्त्वांच्या योगदानाची नवीन पिढीला ओळख करून देणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने ’तपस्वी’ हा ग्रंथ प्रेरणादायी ठरेल.’ श्याम हेडावू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ’सा. विवेक’चे जिल्हा प्रतिनिधी संजय दाणेकर यांनी प्रास्ताविक केले, तर ’सा. विवेक’चे वरोरा तालुका प्रतिनिधी शैलेश भृगुवार यांनी आभार मानले.