‘विश्वसंचार हिंदुत्वाचा’ याग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन

विवेक मराठी    02-Oct-2026
Total Views |
“सर्वांना सोबत घेऊन उन्नत होणे हाच हिंदुत्वाचा मंत्र”
- उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन


vivek

नवी दिल्ली : ”एखादी संस्कृती तेव्हाच विकसित होते, जेव्हा मूलभूत संस्कार, चिरंतन मूल्ये आणि लोकजीवनातून तिचा अंगीकार होतो. हिंदुत्व ही अशीच सर्वसमावेशक संस्कृती आहे. हिंदुत्व कुणाच्याही विरोधात नाही; सर्वांना सोबत घेऊन चालणे आणि सर्वांच्या उन्नतीचा विचार करणे हाच हिंदुत्वाचा मंत्र आहे,” असे प्रतिपादन भारताचे माननीय उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
 
साप्ताहिक विवेक प्रकाशित ‘विश्वसंचार हिंदुत्वाचा’ या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळा गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी दिल्लीच्या उपराष्ट्रपती भवनात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. उपराष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमास राज्यसभा खासदार विनोद तावडे, शिवशंकर लातूरे, रामसुंदर झा, ग्रंथाचे संपादक रवींद्र गोळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
 
मा. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात भारतीय संस्कृती, हिंदुत्व, संस्कार आणि मूल्यव्यवस्थेच्या वैश्विक प्रभावाचा उल्लेख केला. ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सुरू केलेला संघविचार आज जगभर पोहोचत आहे. भारतीय संस्कृती, योग आणि संस्कार यांचा जगभर स्वीकार होत आहे,” असे त्यांनी नमूद केले. ’युवकांनी हिंदुत्वाचा अभ्यास करावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
 
आपल्या भाषणात उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ व ’साप्ताहिक विवेक’चा आढावा घेतला. ते म्हणाले, ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘विश्वसंचार हिंदुत्वाचा’ या ग्रंथाची संकल्पना आकाराला आली आहे. ’सांस्कृतिक हिंदुत्व’ हे भारतीय समाजजीवनाच्या संस्कार, संस्कृती, जीवनमूल्ये, कुटुंबव्यवस्था, मानवी संबंध आणि ‘जगत् कल्याण’ या व्यापक दृष्टीकोनाशी जोडलेले आहे. भारताच्या या सांस्कृतिक विचारप्रवाहाचा जगभर झालेला प्रसार, त्याचे विविध पैलू आणि त्यातून निर्माण झालेले सामाजिक-सांस्कृतिक परिणाम यांचा मागोवा या ग्रंथातून घेण्यात आला आहे.”
 
”श्रीगणेश आणि श्रीराम यांची जगभरातील उपासना, योग आणि सूर्यनमस्काराचा झालेला वैश्विक स्वीकार, वेदान्त व भारतीय अध्यात्माचा जगाला परिचय करून देणारे स्वामी विवेकानंद व स्वामी रामतीर्थ यांचे कार्य तसेच विविध देशांमध्ये भारतीय संस्कृती आणि संस्कार जपणार्‍या हिंदू समाजाच्या कार्याचा ग्रंथात आढावा घेण्यात आला आहे,” असा ग्रंथाविषयीचा उल्लेख मा.उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला.
 
 
78 वर्षांची वैचारिक आणि सामाजिक वाटचाल
 
’सा.विवेक’च्या 78 वर्षांच्या वैचारिक आणि सामाजिक वाटचालीचा आढावाही माननीय उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात घेतला. “सप्टेंबर 1948मध्ये राष्ट्रीय विचारांची भूमिका मांडण्यासाठी सुरू झालेल्या नियतकालिकांच्या प्रवाहात ’साप्ताहिक विवेक’ने सुरुवातीपासून राष्ट्रीय विचार आणि भारतीय सनातन संस्कृतीची पाठराखण करत आपली वाटचाल केली आहे. सामाजिक आणि राजकीय विषयांवर मूलगामी चिंतन करण्याबरोबरच सामाजिक परिवर्तनासाठी कृतीचा आराखडा मांडण्याचे कार्य सा. विवेकने सातत्याने केले आहे.“
 
’सा.विवेक’च्या गौरवशाली सामाजिक परंपरेविषयी बोलताना मा. उपराष्ट्रपती म्हणाले, “महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या प्रश्नांवर वैचारिक भूमिका मांडण्याबरोबरच शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि स्थिरीकरणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना प्रोत्साहित करून रचनात्मक कार्य उभे करणार्‍या प्रकल्पांना, संस्थांना विवेकने पाठबळ दिले आहे.“
 

vivek 
 
’सा.विवेक’च्या ग्रंथनिर्मितीविषयीचा आढावा घेताना मा. उपराष्ट्रपती म्हणाले, ”केवळ साप्ताहिक अंक प्रकाशित करण्यापुरते मर्यादित न राहता संदर्भपूर्ण आणि दिशादर्शक ग्रंथनिर्मितीची परंपराही ’विवेक’ने विकसित केली आहे. ’वन जन गाथा’, ’हिंदुत्व’, ’राष्ट्रोत्थान’, ’समिधा’ यांसह भारतीय संस्कृती, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमर्श आणि सामाजिक प्रकल्पांशी संबंधित अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.”
 
विनोद तावडे यांनी अधोरेखित केली
ग्रंथनिर्मितीची भूमिका
 
या प्रसंगी राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ’साप्ताहिक विवेक’च्या ग्रंथनिर्मितीच्या परंपरेचा आणि त्यातून निर्माण होणार्‍या सामाजिक-वैचारिक परिणामांचा उल्लेख करत त्यांनी ‘विश्वसंचार हिंदुत्वाचा’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले. ते म्हणाले की, ”हा कालखंड हिंदुत्वाला पूरक असून सांस्कृतिक हिंदुत्वाचा सर्वत्र स्वीकार होत आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पंच परिवर्तन गतिविधी समाज जोडून सशक्तकरण्याचे काम करत आहे. हा ग्रंथ त्या कामास बळ देईल.“
 
‘विश्वसंचार हिंदुत्वाचा’ या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमामध्ये ग्रंथ निर्मितीत योगदान देणारे ’सा. विवेक’चे हितचिंतक व प्रतिनिधी यांचा मा. उपराष्ट्रपती महोदय यांचा शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
 
सत्कारमूर्तींमध्ये ’सुयोग टेलिमॅटिक्स लि. मुंबई’चे मॅनेजिंग डायरेक्टर शिवशंकर लातूरे, ’एम.डी. झा कन्स्ट्रक्शन प्रा.लि. मुंबई’ चेअरमन रामसुंदर झा, ’जाधवर ग्रुप, पुणे’चे शार्दुल जाधवर, ’डी.के. फ्लॅग फाऊंडेशन, मुंबई’चे उपाध्यक्ष राकेश बक्षी, ’एस.एस. हायस्कूल, नवी मुंबई’चे चेअरमन कमलेश पटेल, ’चाईल्ड हेल्प फाऊंडेशन’चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पाठक, ’श्री.रामसिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट, अलिबाग’चे अध्यक्ष श्रीराम बापट, अ‍ॅड. दीपक देशमुख, परभणी आणि ’सा.विवेक’चे पुणे प्रतिनिधी रमेश देवी यांचा समावेश होता.
 
ग्रंथाचे संपादक रवींद्र गोळे यांनी प्रास्ताविकातून ग्रंथनिर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिता वर्मा यांनी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रभावीपणे केले.
 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ’साप्ताहिक विवेक’चे नवी दिल्ली संपर्क प्रमुख कृष्णात कदम, आदिनाथ पाटील, अजय कोतवडेकर, राकेश सोनार, प्रदीप निकम, राजेश पोतदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
- कृष्णात कदम