त्यांनी वर्चस्व गाजवलं...सुवर्णपदक राखलं...अपेक्षापूर्ती केली...

विवेक मराठी    02-Oct-2026
Total Views |
जपानच्या भूमीत तिरंगा उंच फडकावत भारतीय महिला क्रिकेट संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं. पदकतालिकेतील स्थानात भारताची प्रतीक्षा संपवत मिळालेला हा विजय केवळ एका सामन्यापुरता मर्यादित नसून, जागतिक पटलावर भारतीय महिला क्रिकेटच्या वाढत्या प्रभावाची आणि सातत्याची साक्ष देणारा ठरला आहे. देशाचा अभिमान उंचावणार्‍या या ऐतिहासिक सुवर्णकामगिरीकडे आता जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे.
 
cricket live
 
उगवत्या सूर्याचा देश असलेल्या जपानमध्ये यंदा आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळलं गेलं तेव्हा तिथलं वातावरण वेगळंच होतं. याआधी 2023मध्ये (2022च्या आशियाई क्रीडा स्पर्धा प्रत्यक्षात 2023मध्ये झाल्या) चीनच्या होआंगझाओत पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश झाला. पण, खंडप्राय चीन देशात क्रिकेटचं फारसं अप्रूप नव्हतं. तेव्हाही भारताच्या दोन्ही संघांनी सुवर्ण जिंकलं; पण, चीनमध्ये क्रिकेटच्या प्रसाराच्या दृष्टीने त्याची फारशी चर्चा झाली नाही.
 
 
पण, यावेळी जपानमध्ये क्रिकेटचा खर्‍या अर्थाने सूर्योदय होत होता. तिथल्या प्रशासनालाही त्याची उत्सुकता होती. म्हणून तर सानो शहरात भारतीय पुरुष विरुद्ध जपान असा एक प्रदर्शनीय टी-20 सामना खास आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी छोटेखानी स्टेडिअमला विशेष गॅलरी उभारण्यात आली होती. आणि विश्वविजेत्या भारतीय संघाचं तिथे जल्लोषात स्वागत झालं होतं. पावसामुळे प्रत्यक्षात प्रत्येकी पाच षटकांचाच सामना झाला. पण, जपानमधल्या लोकांनी तो उत्साहाने पाहिला.
 
 
अशा क्रिकेटच्या स्वागतासाठी उत्सुक असलेल्या जपानमध्ये आशियाई स्पर्धा होत असल्याने तिथे विजेतेपद राखण्यात खरी गंमत होती. आणि ती संधी महिलांनी सगळ्यात आधी साधली. वेळही कशी होती बघा...
 
 
स्पर्धा सुरू होऊन आठवडा होत आला तरी भारताच्या पदकतालिकेत सुवर्ण नव्हतं. नेमबाजी सुरू व्हायची होती आणि भारोत्तोलनात पदकं थोडक्यात हुकली होती; पण, अशा वेळी महिलांचं भक्कम पाऊल मात्र पोडिअमच्या दिशेनं पडलं.
 
 
जपानमधील नागोया शहरात मंगळवारी संध्याकाळ उतरत असताना, कोरोगी स्पोर्टस् पार्कच्या हिरवळीवर तिरंगा उंच फडकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवत भारताच्या खात्यात या स्पर्धेतील पहिलं सुवर्णपदक जमा केलं. स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि रिचा घोष यांची तुफानी फलंदाजी आणि फिरकीपटूंच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा दणदणीत विजय मिळवला. एकतर विजय मोठा होता आणि भारत त्यावेळी पदकतालिकेत बाराव्या स्थानावर रेंगाळत होता, आणि नेमकं याच वेळी क्रिकेटनं देशाला तो हवा असलेला सुवर्ण दिलासा दिला.
 
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणार्‍या भारतीय संघानं सलामीच्या जोडीच्या जोरावर अशी काही सुरुवात करून दिली की, श्रीलंकेच्या गोलंदाजांना मैदानात उभं राहणंही कठीण झालं. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत तीन बाद 216 धावांचा डोंगर उभारला - आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
 
 
पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांतच भारतीय सलामीवीरांनी 67 धावा फटकावल्या आणि संघाचं अर्धशतक अवघ्या 27 चेंडूंत फलकावर झळकवलं. इतक्या मोठ्या आव्हानासमोर श्रीलंकेचा संघ पूर्णपणे कोलमडला. 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 15.4 षटकांत 69 धावांत सर्वबाद झाला आणि भारतानं हा सामना तब्बल 147 धावांच्या विक्रमी फरकानं जिंकला. श्रीलंकेच्या कर्णधार चामरी अटापट्टूची 29 धावांची खेळी सोडली, तर संपूर्ण संघाला दुहेरी आकडा गाठणंही जमलं नाही. हा विजय इतका एकतर्फी होता की श्रीलंकेला उभं राहण्याची संधीच मिळाली नाही -हेच या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या वर्चस्वाचं खरं प्रतिबिंब होतं.
 
 
या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला तो सलामीच्या जोडीनं. डावखुरी सलामीवीर स्मृती मंधाना हिनं अवघ्या 45 चेंडूंत 79 धावांची वादळी खेळी साकारली. तिनं सात षटकार आणि पाच चौकार लगावत चेंडू मैदानाच्या कानाकोपर्‍यात धाडले. मुंबईत जन्मलेली आणि सांगलीत घडलेली ही 30 वर्षीय फलंदाज आंतरराष्ट्रीय महिला टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. याच सामन्यात तिनं एक ऐतिहासिक टप्पाही गाठला -आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण करणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
 
 
दुसरीकडे, उपांत्य फेरीत नाबाद शतक झळकावणार्‍या शफालीनं अंतिम सामन्यातही आपली आक्रमक शैली कायम राखत 29 चेंडूंत 48 धावांची खेळी केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या दहा षटकांत 99 धावांची भागीदारी रचली आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांचं मानसिक खच्चीकरण केलं. डावाच्या अखेरच्या टप्प्यात यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषनं मैदानात उतरून चौफेर फटकेबाजी केली.
 
 
गोलंदाजीत धुरा सांभाळली ती दीप्ती शर्मानं. तिनं सर्वाधिक तीन बळी घेत श्रीलंकेचा डाव खिळखिळा केला. दीप्ती शर्मा ही केवळ आशियाई क्रीडा स्पर्धेतच नव्हे, तर अलीकडच्या प्रत्येक मोठ्या स्पर्धेत भारताच्या यशाची शिल्पकार ठरली आहे-फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत योगदान देणारी अष्टपैलू खेळाडू म्हणून तिची ओळख आता जागतिक स्तरावर पक्की झाली आहे. तिच्यासोबत शफाली वर्मा, श्रेयंका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
 
 
ही कामगिरी इतक्या सविस्तरपणे विशद करण्याचं कारण हेच की, या मुलींनी कमालीच्या सातत्याने अलीकडे हे यश मिळवलं आहे.
 
 
सुवर्णपदक जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंधानानं आपली नजर आधीच पुढच्या मोठ्या आव्हानाकडे वळवली होती - 2028मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेकडे. तिथे क्रिकेटचं तब्बल 128 वर्षांनंतर पुनरागमन होणार आहे आणि याबद्दल तिनं विशेष आनंद व्यक्त केला. मात्र त्याचबरोबर तिनं वास्तवाचंही भान ठेवलं. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत जागतिक क्रिकेटमध्ये अधिक तगडी स्पर्धा येणार असल्याचं आणि विश्वचषक किंवा ऑलिम्पिक जिंकणं हे मोठं आव्हान असल्याचं तिनं सांगितलं.
 
 
थोडक्यात, महिलांच्या या कामगिरीत फक्त आत्मविश्वासच नाही तर परिपक्व दृष्टीकोनही दिसून येत आहे. म्हणजे विजयाचा आनंद साजरा करायचा; पण त्यात हरवून न जाता पुढच्या लक्ष्याकडे वाटचाल सुरू ठेवायची.
 
 
आशियाई स्तरावर क्रिकेटमध्ये फारसं आव्हान दिसत नाही. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे देश आयसीसी मान्यताप्राप्त आहेत. पण, असं असलं तरी मोठ्या स्पर्धांमध्ये आणि क्रिकेटच्या फारशा सुविधा नसलेल्या देशात खेळण्यामध्ये वेगळं आव्हान असतं आणि खेळांमध्ये विजय ही कधीच औपचारिकता नसते. ती कमाई असते. ...आणि इथे भारतीय महिलांचं सातत्य, वर्चस्व आणि विजिगीषू वृत्तीचं हे त्यांना मिळालेलं बक्षीस होतं.
 
 
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश 2023 पासून करण्यात आला आणि तेव्हापासून भारतीय महिला संघानं या स्पर्धेत आपलं निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. विक्रमी आठव्यांदा टी-20 आशिया चषक उंचावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ यंदा सलग दुसर्‍या आशियाई सुवर्णाच्या निर्धारानं जपानमध्ये दाखल झाला होता. हे सातत्य केवळ योगायोग नाही.
 
 
खरं तर, गेल्या एका वर्षात भारतीय महिला क्रिकेट संघानं जो प्रवास केला आहे, तो या खेळाच्या इतिहासातील एक सुवर्णाध्याय ठरावा असाच आहे. काही महिन्यांपूर्वीच, नोव्हेंबर 2025मध्ये, नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आपला पहिलावहिला आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक उंचावला होता. 2005 आणि 2017मध्ये अंतिम फेरीत पोहोचूनही अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय संघानं यावेळी मात्र इतिहास घडवला, आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंडनंतर महिला विश्वचषक जिंकणारा चौथा देश ठरण्याचा मान मिळवला. या विजेतेपदातही दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांचीच अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली होती - दीप्तीनं तर अंतिम सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली होती. या पार्श्वभूमीवर आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे सुवर्णपदक बघितलं, तर लक्षात येतं की हा एका संघाचा तात्पुरता भरारीचा क्षण नसून, ही एक दीर्घकालीन, नियोजनबद्ध वाटचाल आहे.
 
 
आशिया चषकातील वर्चस्व असो, विश्वचषकातील ऐतिहासिक विजेतेपद असो किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सलग दुसरं सुवर्णपदक असो - प्रत्येक मोठ्या स्पर्धेत भारतीय महिला संघ अपेक्षांवर खरा उतरताना दिसतो आहे. हरमनप्रीत कौरचं शांत आणि ठाम नेतृत्व, मंधाना-शफालीसारख्या फलंदाजांची सातत्यपूर्ण आक्रमकता आणि दीप्ती शर्मासारख्या अष्टपैलू खेळाडूंची निर्णायक कामगिरी, या सगळ्यांच्या एकत्रित बळावर भारतीय महिला क्रिकेट आज जगातील सर्वोत्तम संघांच्या पंक्तीत जाऊन बसलं आहे.
 
 
या विजयामुळे भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळालं, देशाचं पदकतालिकेतील स्थान उंचावलं. वैयक्तिक विक्रम झाले, एका संघाचं वर्चस्व जगाला दिसलं. आणि एका देशाचा अभिमानही दिसला. हे सर्व या एका सामन्यात एकवटलेलं होतं.
म्हणूनच जी सुरुवात केली तिथेच परत येते. महिलांनी वर्चस्व गाजवलं, सुवर्णपदक राखलं, अपेक्षापूर्ती केली!