पेटंट कधी नाकारलं जातं?

विवेक मराठी    02-Oct-2026   
Total Views |
 
vivek
नवी कल्पना सुचली किंवा नवा शोध लागला की लगेच पेटंटच्या हक्कांची भाषा सुरू होते. मात्र, भारतीय कायद्याच्या चौकटीत प्रत्येक शोध हक्क मिळवण्यास पात्र ठरतोच असं नाही. संशोधनाच्या जगात पेटंट काय देतं, यापेक्षा कोणत्या शोधांच्या पेटंटसाठी थेट नकार मिळतो, हे समजून घेणं अधिक रंजक ठरतं. भारतीय पेटंट कायद्यातील याच अनोख्या नियमांची आणि त्यामागील कायद्याच्या चौकटीची ही रंजक माहिती!
 
 
संविधानिक भाषेत ’पेटंट’ हा मुळातच नकारात्मक अधिकार आहे. It is a negative right.. सामान्य भाषेत त्याच्यात कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही. तुम्हाला पेटंट मिळतं म्हणजे काय होतं? तुमचा शोध इतर कुणीही वापरू शकणार नाही अशी कायदेशीर तरतूद 20 वर्षांकरता होते. ज्या देशांत तुम्हाला पेटंट मिळालेलं आहे, त्या देशात इतर कुणी ते वापरलं तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता. अर्थात ज्या देशांमध्ये तुम्ही पेटंटचा अर्ज केलेला नाही, पेटंट प्रदान झालेलं नाही, तिथं मात्र तुम्ही कारवाई करू शकत नाही.
 
 
पेटंट मिळण्यासाठी असलेल्या अटींपेक्षा ते कधी द्यायचं नाही हे सांगणार्‍या अटी जास्त रंजक आहेत. त्यातही भारतीय पेटंट कायद्यातलं कलम तीन हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. ह्या कलमातल्या तरतुदी आपण आज पाहूया.
कलम 3(a) : एखादी कल्पना किंवा शोध जो सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता किंवा मानवी, प्राणी, वनस्पतींचे जीवन व आरोग्य ह्यासाठी घातक आहे अशा शोधाला पेटंट प्रदान करता येत नाही.
 
 
कोणताही शोध हा मानवजातीच्या, जीवसृष्टीच्या भल्यासाठी असणं अध्याहृत आहे. समाजविघातक शोध, जीवाला धोका निर्माण करण्यासाठी निर्माण केली जाणारी शस्त्रं, एखादं घरफोडीसाठी, कुलूप तोडण्यासाठी वापरलं जाणारं हत्यार अशा गोष्टींवर डायरेक्ट पेटंट्स घेता येत नाहीत.
 
 
कलम 3(b) : कलम 3ल अंतर्गत, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेला गंभीर धोका निर्माण करणारा शोध एकस्व अधिकाराला पात्र नसतो.
 
 
कलम 3(c) : केवळ एखाद्या नैसर्गिक वस्तूचा शोध किंवा सजीवांचा शोध ह्यावर पेटंट घेता येत नाही. आता ’शोधणं’ हे महत्त्वाचं नाही का, तर आहे. पण एखादी गोष्टी, प्रजात, तत्त्व शोधून काढणं आणि निर्माण करणं ह्या दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे पेटंट हे ज्यांची उपयोगिता आहे, ज्या नवीन आहेत; मात्र साहजिक, नैसर्गिक नाहीत अशाच गोष्टींसाठी प्रदान केले जाते. प्राण्याची एखादी प्रजात शोधून काढणं हे इतर अनेक दृष्टींनी महत्त्वाचं आहे, न्यूटननं शोधलेला गुरुत्वाकर्षणाचा नियम किंवा गतीचे नियम महत्त्वाचे नाहीत असं कोण म्हणेल? पण एखादी प्रजात किंवा एखादा नियम शोधून काढण्याआधीही ती निसर्गात होतीच. सफरचंद वर्षानुवर्षं झाडावरून खाली पडत होती. गुरुत्वाकर्षणाचा नियम मात्र न्यूटनच्या निरीक्षणांतून आणि प्रज्ञेतून अस्तित्वात आला. आता गुरुत्वाकर्षण किंवा तत्सम कोणतीही मूलभूत गोष्ट जर पेटंट करू दिली तर ते निसर्गचक्राच्या आड येणं होईल आणि व्यावहारिकदृष्ट्या मूर्खपणाचंही असेल. अशा नियमांना, शोधांना शोधनिबंधात (रिसर्च पेपर्स) मानाचं स्थान मिळतं. त्यांच्या वाट्याचं कौतुक आणि आदर त्यांना तिथे मिळतो. त्यामुळे अशा मूलभूत क्षेत्रातल्या संशोधनालाही प्रोत्साहन मिळत राहतं मात्र पेटंट मिळू शकत नाही. ते केवळ अ‍ॅप्लिकेटिव्ह अर्थात उपयुक्त अथवा उपयोजनीय शोधांसाठीच प्रदान करण्यात येतं.म्हणजे निव्वळ वाफेतून ऊर्जा निर्माण करण्यावर पेटंट घेता येणार नाही मात्र त्याचंच जर इंजिन बनवलं तर त्यावर (ते पहिल्यांदा निर्माण होतंं तेव्हा) पेटंट घेता येतं.
 
 
vivek
 
 
कलम 3(d) : ज्ञात पदार्थाचं केवळ नवीन रूप शोधणं ज्यामुळे त्याची कार्यक्षमता (Efficacy) वाढत नाही, किंवा जुन्या पदार्थाचा नवीन वापर...अशा शोधांसाठी पेटंट दिलं जातं नाही.
 
 
 
वानगीदाखल सांगायचं झाल्यास, झाडापासून सरपण करून जेव्हा त्याचा इंधन म्हणून वापर केला गेला तेव्हा झाडाचं खोड आणि सरपण यात काहीच गुणात्मक फरक नव्हता; परंतु झाडाच्या लाकडाचा वापर करून जर वाहनाची चाकं बनली असतील तर तो शोध त्याकाळी नक्कीच पेटंट मिळण्यायोग्य असणार. कारण झाडाची गुणवत्ता आणि त्याचा तासाच्या तसा उपयोग विरुद्ध झाडाच्याच अवयवांचा वापर करून केलेला नवा आविष्कार आणि त्याचा उपयोग यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
 
 
आजच्या युगात औषधनिर्माण आणि रासायनिक संशोधनांना लागू पडणारं कलम 3d हे आंतरराष्ट्रीय राजकारणातला कळीचा मुद्दा आहे. त्याबाबत आपण एक वेगळ्या लेखात माहिती पाहू. भारताचा पेटंट कायदा जगात ह्या कलमामुळे ओळखला जातो. त्यामुळे त्याची यथोचित दखल आपण पुढल्या लेखात घेऊ.
 
 
कलम 3(e) : वेगवेगळ्या पदार्थांचे मिश्रण करून बनवलेले उत्पादन ज्याचे केवळ घटक एकत्र केल्याचा प्रभाव आहे, अशा घटकांना पेटंट प्रदान करता येत नाही. दोन अधिक दोन म्हणजे चार हे सांगण्यात काय मोठं कर्तृत्व आहे? ते कोणीही सांगेल. दोन अधिक दोन बावीस, गेला बाजार निदान पाच करून दाखवण्यात कर्तृत्व आहे. अर्थात हे झालं शाब्दिक उदाहरण. नाही तर ही लेखिका आकड्यांची गफलत करून पेटंट मिळवायला सांगते, असं म्हणाल. जर दोन औषधं एकत्र, एका गोळीतून घेऊन मिळणारा परिणाम तीच औषधं वेगवेगळी घेतल्यानं निर्माण होणार्‍या एकत्र परिणामापेक्षा जास्त असेल तर त्याला सिनर्जी म्हटलं जातं. अशा वेळी दोन गोळ्यांपेक्षा एक गोळीत, कधी कधी तर कमी मात्रेतही परिणाम मिळतो. अशा वेळी पेटंट जरूर प्रदान केलं जातं; पण म्हणून फक्त दोन औषधं एका गोळीत मिसळून त्यांचा परिणाम दोन गोळ्या घेतल्याप्रमाणेच होणार असेल, तर मात्र त्या मिश्रणाला पेटंट प्रदान केलं जात नाही.
 
 
कलम 3(f): ज्ञात उपकरणांची किंवा यंत्रांची साधी जुळवाजुळव पेटंटसाठी ग्राह्य धण्यात येत नाही.
 
 
जो नियम वर रसायनांना लागू पडतो तोच ह्या कलमात उपकरणांना, त्यांच्या स्पेअर पार्ट्सना लागू पडतो. जर त्या जुळवाजुळवीमुळे इंधनात बचत होत असेल, पैसे कमी लागणार असतील, किंवा यंत्रणेचा टिकाऊपणा वाढणार असेल तर मात्र पेटंट प्रदान करण्यात येतं.
 
 
कलम 3(g) : हे आताच्या भारतीय पेटंट कायद्यातून काढून टाकलेलं आहे. आपण पुढच्या 3ह ह्या कलमाकडे वळूया.
 
 
कलम 3(h) : शेती किंवा फलोत्पादनाच्या पद्धतीला (Method of agriculture or horticulture) एकस्व अधिकार प्रदान
 
करता येत नाही. बियाणं किंवा सिंचनाची पद्धत अशा गोष्टींवर पेटंट्स दिली तर त्याचा भारतासारख्या कृषिप्रधान देशावर दूरगामी परिणाम होईल. अर्थात ह्या क्षेत्रात संशोधन करण्याची इच्छा टिकून राहावी, त्यातून आर्थिक फायदा मिळत राहावा म्हणून प्लांट ब्रीडर्स राईट नावाच्या दुसर्‍या बौद्धिक संपदा प्रकाराची तरतूद आहे.
 
 
कलम 3(i) : मानवांमधील किंवा प्राण्यांमधील आजारांवर उपचार करण्याच्या वैद्यकीय, सर्जिकल किंवा इतर पद्धती. एखादी शस्त्रक्रिया करण्याची पद्धत जर पेटंट करू दिली तर लोकांचे जीव वाचण्यात मोठी बाधा येईल. अशा पद्धतींचा प्रसार आणि प्रचार संकुचित राहील, जगभरातल्या आजारी व्यक्तींवर तो मोठा अन्याय होईल म्हणून भारतासारख्या विकसनशील देशात उपचार पद्धतींवर (औषधांवर नव्हे) पेटंट्स देता येत नाहीत.
 
 
कलम 3(j) : वनस्पती, प्राणी, आणि त्यांचे सजीव भाग किंवा जैविकप्रक्रिया (प्रकाशसंश्लेषण, पचन, रक्तपुरवठा) ह्या गोष्टी अर्थातच पेटंटेबल नाहीत. ह्याला अपवाद सूक्ष्मजीवांचा कारण त्यांचा शोध लावणं हे मुळातच कठीण आहे.
 
 
कलम 3(k) : संगणक प्रोग्राम (Computer programmeS) किंवा अल्गोरिदम हे स्वतंत्रपणे पेटंटयोग्य नाहीत. स्वतंत्रपणे म्हणजे नुसता अल्गोरिदम पेटंटेबल नाही मात्र हेच प्रोग्रॅम्स जेव्हा एखाद्या हार्डवेअर यंत्रांशी निगडित असतात, तिचा भाग असतात तेव्हा त्या पूर्ण यंत्रणेला मात्र पेटंट प्रदान करता येतं. हे कलमही कितीतरी वेळा वादाच्या भोवर्‍यात सापडलेलं आहे. वाचकांना रस असेल तर ह्या लेखमालेत आपण ह्या कलमाचाही स्वतंत्रपणे मागोवा घेऊ शकतो.
 
 
कलम 3(l) : वाङ्मय, नाटक, चित्रपट किंवा सांगीतिक कलाकृती हे कॉपीराईट अंतर्गत येणारे प्रकार अर्थातच पेटंट्सच्या कक्षेच्या बाहेर येतात. ह्या कलाकृतींच्या हक्कांचा ऊहापोह आपण मागच्या काही लेखांत केला आहे.
 
 
कलम 3 (m) : मानसिक कृती करण्याची, व्यवसाय करण्याची किंवा खेळ खेळण्याची पद्धत अथवा नियम हे एकस्व अधिकारासाठी पात्र नाहीत. एखादा व्हिडिओ गेम खेळायची पद्धत, गोष्टी विकण्यासाठीच्या वेगवेगळ्या युक्त्या (प्रदर्शन, सूट देणे, भिशी, लकी ड्रॉ) किंवा अबॅकससारखी आकडेमोड करायची पद्धत ह्यांना एकस्व अधिकार देता येत नाही. कारण त्या शेवटी कल्पना आहेत, त्यातून कोणतंही उत्पादन (प्रॉडक्ट) जन्माला आलेलं नाही. अर्थात आकडेमोडीच्या पद्धतीवर पेटंट घेता आलं नाही तरी त्यासाठी एखदं यंत्र तयार केलं आणि त्या यंत्राने एकस्व अधिकाराचे मागच्या लेखात सांगितलेले तिन्ही निकष पूर्ण केले तर त्या यंत्राला निश्चितच पेटंट मिळू शकतं.
 
 
कलम 3(n) : माहिती सादरकरण्याचे मार्ग एकस्व अधिकाराच्या संरक्षणात अंतर्भूत नाहीत. एखादी कल्पना किंवा डाटा कशा तर्‍हेने मांडला जावा, यात संशोधनाचा भाग नसल्याने ते पेटंटसाठी ग्राह्य धरण्यात येत नाही.
 
कलम 3 (O ) : इंटिग्रेटेड सर्किट्सची टोपोग्राफी (Topography of integrated circuits)हा एक स्वतंत्र बौद्धिक संपदा प्रकार असल्याने त्याचाही अंतर्भाव पेटंट्समध्ये करण्यात आलेला नाही.
या लेखातील माहिती आपण कायद्याच्या परिभाषेत पाहिली. पुढच्या लेखात कोर्टात गाजलेल्या काही केसेसचा आपण मागोवा घेऊ.
 
 
 
लेखिका नोंदणीकृत पेटंट एजंट आणि औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.

डॉ. अपूर्वा फडके

डॉ. अपूर्वा फडके  या नोंदणीकृत पेटंट एजंट, पीएचडी, एलएलबी आणि औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.