अविनाशी ‘अश्वमेध’ चळवळ

विवेक मराठी    21-Oct-2026
Total Views |
विजय सांबरे
 
krushivivek 
शहरीकरण आणि वाढत्या पायाभूत सुविधांमुळे निसर्ग आणि मानवातील सहजीवन ढासळत चाललं आहे. मुरबाड-शहापूरसारख्या सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भागात वन्यजीवांचं बेघर होणं आणि शेतीचं नुकसान यानं गंभीर रूप धारण केलं आहे. या पार्श्वभूमीवर, निसर्ग संवर्धन, जैवविविधता रक्षण आणि स्थानिक समुदायांचे प्रश्न सोडवण्यासाठी ’अश्वमेध प्रतिष्ठान’तर्फे सुरू असलेली धडपड आशादायी चित्र उभी करते.
 
 
कोणे एके काळी वन्यजीव व मानव यांच्यात असणारे सहचर्य, सहवास आज घडीला नष्ट होतो आहे. मानव व वन्यजीव यांच्यातील सेंद्रिय नातं जपलं जावं व नव्यानं दोन्ही घटकांचं सहजीवन कसं फुलवता येईल. या आशेनं (हवं भाबडी आशा म्हणा...!) महाराष्ट्रातील विविध विभागांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्षाचं नक्की मूळ काय आहे, सहजीवनाच संघर्षात रूपांतर का व कसे झाले, याला सरकारी वननीती कारणीभूत आहे की समाज व्यवस्था; अशी प्रश्नमाला मनी घेऊन भटकतो आहे. मान्यवर विद्वान मंडळीपासून ते शेतकरी, भटके पशुपालक व अगदी या विषयात मनापासून काम करणारे निसर्गप्रेमी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत आहे. या समस्येची उकल करत, उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.
 
 
गेल्या उन्हाळ्यात भीमाशंकर, कळसुबाई, हरिश्चंद्रगड ते तळ कोकणातील मुरबाड, शहापूर परिसरात प्रवास झाला. उद्देश हाच की, मानव व वन्यजीव संबंधाचे स्वरूप जाणून घेणे. हरहुन्नरी अभ्यासक कार्यकर्ता मित्र अविनाश हरड याचा अनेक दिवसांचा सांगावा होता, एकदा भेटीला व भटकायला या..!
 
 
आवडत्या सह्याद्रीतील माळशेज घाटातून कोकणात उतरलो. प्राचीन व्यापारी मार्गाची ओळख सांगणारे वैश्यभूमी वैशाखरे लागले. तेथून जवळच एका वाडीत काळू खोर्‍यातील आदिवासी बांधव जमले होते. डॉ. इंदवी तुळपुळे गेली चार दशकं जनजातींसाठी (आदिवासी) लढत आहेत, संघटन बांधणी करत आहेत.
 
 
जनजाती बांधवांच्या सहविचार सभेत सहभागी झालो. काळू खोर्‍यातील महत्त्वाची जैवविविधता नोंदवणं, प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा शोध घेणं, स्थानिय वन्यजीवांची नोंद घेणं, याविषयी सविस्तर चर्चा व निर्णय झाले.
 
 
साहजिकच वन्यजीव व स्थानिक समुदाय यांच्या नात्याविषयी बोलायला मिळालं. गेल्या दहा ते बारा वर्षांत उपद्रवी प्राण्यांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. पूर्वीपासून आम्ही सांबर, भेकर, चितळ, वानर, रानडुक्कर या प्राण्यांसोबत राहिलो. ढाण्या वाघ, बिबट्या, गवे अधूनमधून दिसायचे. कधीतरी पाळीव जनावरांवर हल्ला व्हायचा.
 
पण अलीकडे सगळं विचित्र होत आहे. वन विभाग यात सकारात्मक भूमिका घेत नाही. वन्यजीव कायद्यामुळे जंगली प्राण्यांना अतिरिक्त संरक्षण मिळालं; पण शेती अडचणीत आली आहे. भात, नागली, भेंडी, वाल व इतर भाजीपाला पिकं यांची नुकसान भरपाई कशी मिळवावी, याचा मार्ग मिळत नाही. अशी नानविध समस्यांची नकार घंटा ऐकत दिवसभर संवाद सुरू होता.
 
krushivivek 
 
सायंकाळी सिधाची उमरोळी गावातील सिधोबाचे बन (देवराई) पाहायला गेलो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेतल्या एका फाट्यावर हे पवित्र जंगल टिकून आहे. वृक्ष-बिंब-जल यांचं पूर्वापार नातं येथं अनुभवायला मिळालं. ”पूर्वी येथे वर्षातून एकदा रानगवा यायचा. त्याच्या शेणानं छोटंखानी मंदिर सारवलं जाई,” असं वयस्क मंडळी आजही सांगतात. ही परंपरा घाटमाथ्यावर आंबोली (जुन्नर) येथील ढाकोबा देवराईमध्येपण होती.
 
 
 
मुंबई महानगराच्या अति जवळ असल्याने मुरबाड-शहापूर टापू खूप काही भोगत आहे. अविनाश व इंदवीताई यांच्या बोलण्यातून वारंवार ते जाणवत होतं. शहरांची अमर्याद निर्मिती, त्यांसाठी पायाभूत सुविधा, परिणामी नैसर्गिक स्त्रोतांचं नष्टचर्य...अशा मानवानंच गती दिलेल्या चक्राला कोण थांबवणार...?
 
 
अविनाशच्या गावी मासले-बेलपाडा येथे तीन-चार दिवसांतील वास्तव्यात खूप गोष्टी पाहायला आणि शिकायलाही मिळाल्या. मासले-बेलपाडा येथील घराच्या परिसरात प्राचीन वस्तूंचं संग्रहालय आहे. मुक्या वन्यजीवांसाठी आश्रय केंद्रपण. स्वत: अविनाशला पर्यावरण, वन्यजीव व प्राचीन वस्तूंचा संग्रह या विषयांत रस आहे. त्याने व त्याच्या समविचारी मित्र-मैत्रिणींनी ‘अश्वमेध प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना केली. अविनाशची साथीदार प्रणिता ही पुरातत्त्वशास्त्राची अभ्यासक आहे. एकूणच ही तरुण मित्र मंडळी पर्यावरण, वन्यजीव रक्षण ते वस्तू संग्रहालय असे ‘अव्यापारेषु उद्योग’करतात.
 
 
सद्यस्थितीत अविनाश हरड आणि त्याचे समविचारी तरुण मित्र-मैत्रिणी मुरबाड तालुक्यातील धात्रानं व जल विद्युत प्रकल्पांची चिकित्सा करत आहे. स्थानिक लोकांसोबत या प्रकल्पाची अंमलबजावणी व भविष्यात होणारे संभाव्य परिणाम या विषयी गावोगावी संवाद साधत आहे. याकामी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती इंदवी तुळपुळे यांचे मार्गदर्शन या युवक चमूला होत आहे. तसंच स्थानिक जनजाती कार्यकर्ते व अविनाश हरड व टीम ’अश्वमेध प्रतिष्ठान’च्या माध्यमातून कायदेशीर, पारदर्शक व सर्वांना सुसह्य अशी जनसुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्नरत आहेत. त्याच सोबतINTACH (Indian National Trust for Art and Cultural Heritage ठाणे चाप्टरच्या माध्यमातून ’वारसा जपवणूक’ या विषयावर विविध समाज घटकांना संवेदनशील बनवत आहे आणि कृतीशीलही.
 
 
संपर्क
अश्वमेध प्रतिष्ठान, अश्वमेध भवन, मासले-बेलपाडा, ता. मुरबाड, जिल्हा ठाणे - 421401
संपर्क क्रमांक: +91-8108208934
ईमेल: ashwamedh.org@gmail.com
 
 
दोन दिवस मुरबाड तालुक्यातील गावं भटकून झाल्यावर शहापूर तालुक्यात जायला निघालो. सकाळी सकाळीच अविनाशला नीलगायीला अपघात झाल्याची बातमी एका खबर्‍या-मित्राकडून मिळाली. त्यानं वनविभाग व मुलुंड येथील वन्यजीव रेस्कू टीमला कळवलं.
 
 
मुरबाड शहापूर रस्त्यावर हा अपघात झालेला होता. पहाटे एका कारनं रस्ता ओलांडणार्‍या मादी नील गाईला जोराची धडक दिल्यानं ती रस्त्याच्या कडेला खोल भागात फेकली गेली. आम्ही जाईपर्यंत ती जिवंत होती. शहापूर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजार झाले. गावातील एक पशुवैद्यक आला, उपचार केला पण अपघात होऊन काही तास उलटले होते. प्रथमोपचार उशिरानं मिळाला. प्रयत्न करूनही गावकरी, वनविभाग व वन्यजीव प्रेमींना अपयश आलं. ”असं अनेकदा घडतं,”वनाधिकारी व अविनाशाचे साथीदार सांगत होते. ”रस्ते सुधारल्यामुळे वाहनं बेबंद सुटतात. वळणावर गतिरोधक नाही. असले तरी चालक दुर्लक्ष करतात. वन विभागाकडे पशुवैद्यक वा फिरता दवाखाना नाही. मुलुंडवरून फिरता दवाखाना व रेस्कू टीम बोलवावी लागते. ती वेळेवर पोहोचली नाही तर अपघातग्रस्त वन्यजीवाला वाचवता येत नाही. तीच गोष्ट जंगलाला लागणार्‍या वणव्यांची. एकूणच या परिसरातील जंगल असेल वा वन्यजीव यांचं रक्षण मोठं आव्हानात्मक बनलं आहे. त्या मागील कारणांसुद्धा अतिशय गुंतागुंतीची आहेत,”वनाधिकारी आणि अविनाशाच्या साथीदारांकडून महत्त्वाची माहिती समजली.
 
 
पूर्वेला सह्याद्री व पश्चिमेला सिंधुसागराची खाडी यांच्यात हे दोन तालुके उल्हास खोर्‍यात वसलेले आहेत. ठाकर व कातकरी हे जनजाती, राव, कुणबी, देशमुख, मराठा, प्रभू, ब्राह्मण अशी इथली समाज व्यवस्था. मुख्य व्यवसाय शेती, जोडीला वनोपज संकलन करण किंवा बाहेर कामाला जाणे; पण गेल्या दोन-तीन दशकांत येथील जनजीवन झपाट्याने बदलत आहे. मुंबई व उपनगरांचे प्रेशर या परिसरातील प्रत्येक घटकांवर पडत आहे. जमीन, पाणी व मानवी संसाधनं असं सर्व काही. विविध पायाभूत सुविधा (रस्ते, धरणे, औद्योगीकरण व शहरे) निर्माण होत असताना जंगल व शेती उद्ध्वस्त होत आहे. वन्यजीव बेघर होत आहेत. ग्रामीण भागात व जंगलात राहणारा मेटाकुटीला आला आहे. आपलं गाव, घर, शेती टिकणार की जाणार? एक तर ती समृद्धीसारख्या अवाढव्य रस्ते प्रकल्पांत जाईल, नाही तर काळू धरणात जाईल. अशा भयप्रद स्थितीत जगताना पोट पाण्यासाठी बागायत करावे तर ते नीलगाई, डुक्कर टिकू देत नाही. अशा या अरण्यरुदनात अविनाश हरड व त्याचे साथीदार संवेदनशीलपणे स्थानिक निसर्ग व मानव यांच्या पुनरुत्थानाचं स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी मनापासून झटत आहेत. उल्हास खोर्‍यात जनजागृती व प्रत्यक्ष कृती-कार्यक्रम राबवत आहेत. विविध समाज घटकांना एकत्र करत आहेत. जैवसांस्कृतिक वारसा टिकावा, पर्यावरणाचं जतन संवर्धन व्हावं, यासाठीच ाहा आधुनिक ‘अश्वमेधयज्ञ’ सतत पेटता राहो.
 
 
(’लेखक मानव व निसर्ग’ यांतील नाते या विषयातील विद्यार्थी आहे)