खरं तर, ‘जुनी विरुद्ध नवी पिढी’ हा संघर्ष सनातन आहे. यात ‘जुने जाऊ द्या
मरणालागुनि’ ही वृत्ती आपण बाणवली आणि ‘बदल’ हा निसर्गाचा नियम आहे, हे लक्षात घेतलं तर हा ‘बिघाड नाही, बदल’ आपल्या सहज लक्षात येईल. सोबत निर्माण झालेला संघर्ष कमी होईल, पण ‘बदल’ लक्षात घेताना त्याला वेडंवाकडं वळण तर लागलेलं नाही ना याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं, असं वाटतं.
सध्याच्या मॉडर्न, अत्याधुनिक युगात युवा पिढीसंदर्भातल्या चर्चेला ‘अतिशय’ महत्त्व आलेलं आहे. ते आल्यामुळेच नव्या पिढीच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन ‘गट’ अहमहमिकेने आपल्या आपापसात भांडण करताना दिसतात. ती अस्तित्वाची शाब्दिक भांडणं ऐकताना, वाचताना अनेक प्रश्नही मनात उपस्थित होतात आणि आपसूकच त्या प्रश्नांची उत्तरंही शोधली जातात.
त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ‘युवा पिढी कशी आहे?’
या प्रश्नाचा शोध घेत असताना जाणवलं की, ही युवा पिढी म्हणजे ‘जेन झी’(खरं तर, पिढीला अशी नावं का द्यायची आहेत? पण काळाच्या पटलावर त्याची गरज असू शकते, असं गृहीत धरून आपण ते स्वीकारू.) संवेदनशील, तर्कशुद्ध, स्वत:ला महत्त्व देणारी, आपल्याला हवं ते करणारी, करताना विचार करणारी किंवा न करणारी, स्वत:ला इतरांपेक्षा वेगळं, क्रिएटीव्ह समजणारी, स्वत:च स्वत:बद्दल ठरवणारी, हुशार, चाणाक्ष आणि प्रत्येक गोष्टीची सत्यासत्यता तपासण्यापेक्षा अंत:प्रवाहाला, अंतर्गत शांततेला महत्त्व देणारी आहे.
त्यांच्या या वर्तनामुळे, ‘स्व’ला अधिक महत्त्व देण्याच्या वृत्तीमुळे आधीच्या पिढीतल्यांना एक प्रश्न पडतो की,‘ही पिढी ‘बिघडलेली आहे की बदललेली?’
खरं तर प्रत्येक आधीच्या पिढीला ‘नवीन पिढी’ बिघडलेली, असंस्कारक्षम, असंवेदनशील वाटत असते; पण वास्तव त्याच्यापेक्षा वेगळं असतं. वास्तवात, नवीन पिढी, युवा पिढी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणाचा परिपाक असते. कौटुंबिक धारणा, स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन, शिक्षणाने दिलेलं विचारस्वातंत्र्य, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आणि इतर कशाची नसली तरी याची त्यांना असलेली जाणीव, त्यातून आपल्या आत डोकावून बघण्याची क्षमता, सळसळतं तरुण रक्त आणि बंडाची निशाणं उभारण्याची जिद्द प्रत्येक पिढीत असते; पण त्याचं स्वरूप, संदर्भ वेगळे असतात. उदाहरण द्यायचं झालं, तर आधीच्या पिढीने केलेल्या आंदोलनांकडे पाहता येईल. काळ बदलला. प्रश्न बदलले. त्यामुळे आंदोलनाचं स्वरूप, परिमाण आणि परिणामही बदलले.
जुन्या पिढीत असणार्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक धारणा या जशाच्या तशा नव्या पिढीत असतील, अशी अपेक्षा बाळगली की पिढी बिघडलेली वाटते; पण आपल्या धारणांमधल्या मूलभूत, तर्कशुद्ध बाबी नवी पिढी पुढे नेते आहे. पुढे नेताना फक्त पद्धत बदलली आहे, असं म्हटलं तर पिढी बदललेली वाटेल.
खरं तर, ‘जुनी विरुद्ध नवी पिढी’ हा संघर्ष सनातन आहे. यात ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनि’ ही वृत्ती आपण बाणवली आणि ‘बदल’ हा निसर्गाचा नियम आहे, हे लक्षात घेतलं तर हा ‘बिघाड नाही, बदल’ आपल्या सहज लक्षात येईल. सोबत निर्माण झालेला संघर्ष कमी होईल, पण ‘बदल’ लक्षात घेताना त्याला वेडंवाकडं वळण तर लागलेलं नाही ना याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं, असं वाटतं.
बदल लक्षात घेतला की, आपसूकच युवा पिढीच्या आशा आकांक्षांवर आणि विचारांवर कोणाचा प्रभाव आहे, हा प्रश्नही उपस्थित होतो. या प्रश्नाचा विचार करताना जाणवलं की, जग ‘सुपरफास्ट’ वेगाने पुढे जात आहे. जगाच्या सीमारेषाही पुसट होत आहेत. पुढच्या काळात त्या अधिकच पुसट होत जाणार आहेत. जसं परदेशातील लोकांनी आपल्याकडे येऊन संशोधन केलं. आपल्याच अनेक गोष्टी आपल्याला दाखवून दिल्या की, आनंद होतो, अभिमान वाटतो. तसंच आपल्याकडचे तरुण तिकडे ‘स्व’शोध आणि त्यांचा संस्कृतीवेध घ्यायला गेल्यावर त्यांनाही आनंद, अभिमान वाटत असणार, हे खरं. त्यामुळे त्यांच्यावर इतर कुणाचा प्रभाव असण्यापेक्षा त्यांच्यावर त्यांच्या स्वत:चा प्रभाव अधिक आहे, हे जाणवतं. त्या प्रभावातून ही पिढी लौकिकार्थाने चांगल्या आणि वाईट गोष्टीही करत असते.
कोणताही एक जीव चांगल्या-वाईटाचं संचित घेऊन
जन्माला येतो. त्या संचितात, स्वत:च्या चांगल्या-वाईट गोष्टी तो अॅड करतो. स्वत:च्या ‘प्रभावा’चं एक पॅकेज तो तयार करतो आणि आपल्यासमोर तो खुबीने, तितक्याच स्पष्टवक्तेपणाने मांडतो. त्यांच्या आशा-आकांक्षा प्रॅक्टिकल आहेत. ते पुराण-उपनिषदांकडे तर्काचं भिंग लावून पाहतात. त्यातूनही जो तर्क त्यांना पटतो, त्याचा स्वीकार ते करतात आणि जो पटत नाही तो स्पष्ट धुडकावून लावतात. त्यांना, परंपरा, रितीरिवाज हवेही आहेत; पण त्यांचा कर्मकांडांना विरोध आहे. त्या विरोधाचा बाणही अतिशय टोकदार आहे. त्यातून त्यांनी उभी केलेली आपली प्रतिमा स्वच्छ, नितळ आणि पारदर्शी आहे.
नुकताच हनुमान अंशसारखा आधुनिक संताला महत्त्व देणारा आणि आपल्याकडच्या सज्जनशक्तीला पुढे आणणारा सोज्ज्वळ सिनेमा आला. लो बजेट असणार्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली. या सिनेमाच्या निर्मात्यांपैकी एक निर्माती ही ‘जेेन झी’ पिढीची प्रतिनिधी आहे. तिने कमावलेली सर्व पुंजी या सिनेमासाठी दिली. कारण तिला ‘नीब करौली बाबां’नी प्रभावित केलं. तिनं ते सहज स्वीकारलं, प्रत्यक्षात आणलं आणि आता ते तीमनात कोणताही किंतु न ठेवता सांगते आहे.
गेल्या पिढीतल्या पालकांचं ‘पालक’ म्हणून झालेलं ग्रुमिंग वेगळं आहे. त्यामुळे पालकांच्या या ग्रुमिंगचा, नर्चरिंगचा एक स्वाभाविक परिणामही या पिढीच्या विचारांवर नक्की आहे.
‘स्व’चा झालेला विकास आणि या ‘स्व’ विकासाला
मिळालेलं तर्काचं अधिष्ठान या गोष्टी फारच बोलक्या आहेत. त्यातून विचारांमध्ये आलेली स्पष्टता तर अधिकच काटेकोर आहे. या काटेकोर विचारांकडे ‘समाज’ आणि त्यातही मागची पिढी डोळ्यांच्या कोपर्यातून पाहते, थेट भिडत नाही. त्यातून निर्माण होणार्या विसंवादातून पिढीतलं अंतर वाढत जातं आणि ‘विचारांमध्ये आपलेपणा राहिला नाही’, असं विधान केलं जातं. त्याने अंतर अधिक वाढतं. आधीची पिढी आपलेच चष्मे त्यांच्या डोळ्यांवर हट्टाने लावायला जाते. त्यातून त्यांना अंधुक दिसायला लागतं. ते गोंधळतात. सगळं चित्र स्पष्ट दिसावं म्हणून धडपडतात. त्यांच्या धडपडीच्या काळात आपण अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने त्यांच्याकडे डोळे वटारून पाहत असतो, पण त्यांची एकूणच जडणघडण ही ‘मी’ केंद्री आहे. आपल्या शिक्षणानेही ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना आपल्यात रुजवली नाही; तसंच आपल्या आजूबाजूला तसं वातावरण नसल्याने आपल्या हक्कांसाठी जागृत झालेल्या प्रत्येकाला आधी स्वत:कडे पाहायचं आहे, आपण शिकवलं. या स्वत:कडे पाहण्यात फक्त ‘हक्क-अधिकार’ येतात. त्यातल्या ‘कर्तव्य-जबाबदारी’ शब्दांना आपण फाटा दिला. संघ परिवार वा समविचारी संघटनांमधून ‘राष्ट्र प्रथम’चे संस्कार पूर्वापार होत असले तरी, सर्वसामान्य वा या संघटनांपासून दूर असलेल्या घरांत ‘राष्ट्र प्रथम’चा जागर फार उशिरा व्हायला लागला. ‘जेन-झी’च्या बहुतेक पालकांवर ‘मी’ प्रथम चे संस्कार झाले आहेत. तेव्हा हा ‘मी’ ते ‘राष्ट्र’पर्यंतचा पॅराडाइम शिफ्ट करायला आणि त्यांच्या डीएनएमध्ये तो यायला थोडा अवधी लागेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. नव्या-जुन्या पिढीच्या सीमारेषेवर असणार्या कॅप्टन स्मित मच्छारसारख्या व्यक्तींच्या कृती पाहत ‘जेन झी’ या सगळ्या संकल्पनेकडे नेमकेपणाने पाहू शकेल, अशी आशाही वाटते आहे.
त्यांच्या मनात ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना असते. आपण त्यांचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे आणि उलगडूनही दाखवलं पाहिजे. आजकालच्या युवा पिढीत स्वतःच्या सर्व क्षमता
आजमावून पाहण्याची एक सूज्ञ आकांक्षा असते. ती असल्याने ते लहानपणापासूनच स्वतःला केंद्रस्थान देऊन एकएक गोष्ट करून पाहतात. त्यातून अनेक गोष्टींचा पडताळा घेतात. तो घेतला की, त्यांच्या वाटा आणि विचार खुले होतात. त्यांना आपल्याला अमुक एक गोष्ट जमत नाही, हे स्पष्ट होतं आणि अमुक एक गोष्ट जमते आहे, आवडते आहे, हे अधिक स्पष्ट होतं. त्यांच्या दृष्टीने ‘सेटल’ होणं म्हणजे स्वतःला आजमावून पाहणं असतं. ते पाहताना त्याबद्दलची साशंकता त्यांच्या मनात नसते.
त्यामुळे त्यांच्या विचारांना ठाम आणि निश्चित दिशा मिळते. त्यांची ‘राष्ट्र प्रथम’ची भाषाही आपण समजून घेतली पाहिजे. स्वतःचा वैयक्तिक विकास, वागण्या-बोलण्यात येणारी एकंदर प्रगल्भता, त्यातून होणारा समाजाचा विकास आणि त्या विकासाने होणारा देशाचा विकास हा त्यांचा ‘राष्ट्रप्रथम’चा विचार आहे. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ वगैरे सारखी जुनी झालेली विचारधारा ते मानत नाहीत. ‘उच्च राहणी आणि सडेतोड विचारसरणी’ हाच त्यांचा खाक्या आहे. माझा वैयक्तिक विकास झाला. स्टार्टअपने वेग घेतला, तर राष्ट्राच्या जीडीपीमध्ये मी हातभार लावलेला आहे, असा थेट अर्थ ते घेतात आणि आपल्या मनातल्या ‘राष्ट्र प्रथम’ला ते अशा पद्धतीने व्यक्त करतात. ‘राष्ट्र प्रथम’ची ही त्यांची परिभाषा समजून घेणंही अगत्याचं आहे, असं वाटतं.
‘संघर्ष’ केला तरच ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना अस्तित्वात आहे, हा समज त्यांनी मोडीत काढली आहे. आम्ही सुखात, आनंदात स्वतःला आजमावण्यात आणि आनंदाने करून दाखवण्यातही ‘राष्ट्र प्रथम’ची भावना असू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
त्यामुळेच त्यांची राष्ट्रप्रेमाची अभिव्यक्ती थेट नसते. मुळात मागच्या पिढीची राष्ट्रप्रेमाची भावना लक्षात ठेवून या पिढीच्या राष्ट्रप्रेमाची चाचपणी करू नये. ते स्वत:च राष्ट्रप्रेमाने, राष्ट्रसंस्कृतीने भारलेले आहेत. आपण इन्स्टाग्रामवर फेरफटका मारला आणि अनेक तरुणांची ‘संगीत’ विषयाची निवड पाहिली तर त्यात ‘संस्कृती’ संवर्धनाचा एक महत्त्वाचा प्रयत्न दिसतो. कुणी पर्यावरणावर निरतिशय प्रेम करून आपल्यातले निसर्गप्रेम दाखवतं, कुणी भाषेबद्दल आपलं प्रेम व्यक्त करतं, कुणी मुलांमध्ये काम करून आपल्या राष्ट्रप्रेमाची साक्ष देतं. स्वत:च्या अंगी असणार्या क्षमता ओळखून, स्वत:च्या आवडी जपत त्या त्या क्षेत्रामध्ये स्वत:चं कर्तृत्व गाजवत राहणं, हेच त्यांचं राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आहे. आशियाई, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये भारताचं नाव अधिक वेळा दिसायला लागलं आहे आणि त्यांच्या अशा उदाहरणातून ही पिढी व्यक्त होऊ पाहते आहे.
शिक्षण व्यवस्था ही अतिशय तकलादू झाली आहे. त्याच वेळी विभक्त कुटुंबांना मिळणारं स्वातंत्र्य आणि त्याच वेळी डिजिटल माध्यमांचा असलेला सुळसुळाट, असा एकत्रित परिणाम या पिढीच्या समोर आहे. पैशांची सुबत्ता आणि स्वत:समोर ध्येय नसणं, ही अतिशय कॉमन बाबही त्यांच्या संदर्भात दिसते आहे.
शिक्षण व्यवस्थेकडूनही त्यांच्यावर संस्कार होण्याच्या वयात ‘त्यांच्या मनासारखं’ अशी भूमिका घेतली गेल्याने अनेक बाबतीत मुलं मागे पडत गेली. घरात कमी झालेला संवाद ही त्यातलीच एक बाब. या सगळ्याकडे समग्रपणे पाहताना नवीन पिढी वादग्रस्त ठरते; पण यात त्यांचा व्यक्तिश: किती दोष आहे, याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या एकूणच वर्तनाची चिकित्सा करण्यापेक्षा त्यांची मतं समजून घेणं, महत्त्वाचं आहे. नवीन पिढीची मतं जुन्या पिढीला पुरोगामी वाटत असतात आणि ती वाटत असल्यानेच संघर्ष उत्पन्न होतो. तो जसा कौटुंबिक पातळीवर उत्पन्न होतो; तसाच तो सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरही उत्पन्न होतो. या संघर्षातून हाती काहीच लागत नाही, फक्त अंतर वाढत जातं.
नवीन पिढी असंघटित आहे, असा एक अपसमजही आपल्याला ऐकायला मिळतो. कदाचित काळाच्या ओघात, काळाचे परिमाण लक्षात घेतले तर आजचा समाज उद्या संघटित दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
स्खलनाची व्याख्याही काळानुरूप बदलणारी आहे. ज्या काळात बायकांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. तेव्हा विभावरी शिरुरकरांनी लिहिलेलं साहित्य हे तत्कालीन स्खलनाचं उदाहरण आहे. महर्षी कर्वेंनी केलेले विधवा पुनर्विवाहाचे प्रयत्न, र.धो. कर्वेंनी केलेलं संतती नियमनाचं कार्य हे काळाच्या पटलावर अधोरेखित केलेले ‘स्खलन’ आहे; पण त्या कामाचं मोल आपण आज जाणून आहोत. असंच ‘काळा’च्या पटलावर हे सगळं कसं मापलं जाईल, हे येणारा काळच ठरवणार आहे.
आजकाल ‘आदर्शां’ची व्याख्याही बदलली आहे. सगळ्यांना सगळ्यात ‘मतं’ आहेत. ती असल्याने ती प्रत्येक बाबतीत आहेत. समाज, अर्थ, राजकारण अशा प्रत्येक बाबतीत प्रत्येक व्यक्ती बोलायला लागते; तेव्हा बजबजपुरी माजते. ती माजली, की फक्त गोंधळ निर्माण होतो आणि तो निर्माण झाला की मुद्दे बाजूला पडतात. या व्यक्त होण्यामागे ‘अभ्यासा’चा अभाव असतो, तसंच एकांगी अशी पूर्वग्रहदृष्टीही असते. ‘अभ्यासोनी प्रकटावे...’ हे मूल्यच सध्या मागे पडलेलं असल्याने आपल्याला जेवढं समजतं, तेवढ्याच बाबतीत व्यक्त व्हावं, हे भानही राहत नाही. ते न राहिल्याने ‘मला जे वाटतं ते...’ एवढंच अराजकी मूल्य घेऊन नवीन पिढी उभी राहते आणि आक्रमक, अराजकी वागणारी पिढी पुढे येते. तसंच याच पिढीतील विधायक काम करणारी युवा मंडळी मागे पडून सात्विकता, सकारात्मकता मागे पडते. अशी उदाहरणे आपल्या आजूबाजूला तर कायम दिसतात, यावर आपण काय आणि कोणतं काम करणार आहोत? हादेखील एक प्रश्न आहे.
समाजाची, त्याच्या वागण्याची, त्यातून निर्माण होणार्या वादाची, संवेदनशीलतेची-असंवेदनशीलतेची स्क्रिप्ट आपल्याला लिहिता येणार नाही. ती प्लॅन करून वसवलेली शहरं नाहीत. त्यामुळे उत्स्फूर्ततेतून समाज घडत जातो. क्रांती उभ्या राहतात, आंदोलनं सक्रिय होतात. त्या त्या काळात समाजाच्या ज्या धारणा अधिक आक्रमकपणे सक्रीय असतात, त्या धारणांचा विचार प्रबळ होतो आणि तो काळाच्या पडद्यावर उमटतो. खरं तर नवीन पिढी आली की जुन्या पिढीबरोबरचा तिचा संघर्ष अटळ असतो. त्यामुळे हा पिढीचा सनातन संघर्ष कायम राहणारच आहे, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.
‘बदल’ शाश्वत असतात, असं जेव्हा आपण मानतो, तेव्हाच काळानुरूप व्यक्ती बदलणार, समाज बदलणार आणि त्याच वेळी राष्ट्र बदलणार, राष्ट्राकडे बघण्याची दृष्टी बदलणार... अशी बदलाची ही प्रक्रिया लक्षात घेऊन केलेली ही सुरुवात आहे, त्यामुळे सबंध पिढीला ‘जज’ न करता त्यांच्या कृती-उक्ती बघणे, समजून घेणे आणि सद्यकालीन सज्जनशक्तीने त्यात ‘अॅड ऑन’ करत राहणे, हा महत्त्वाचा भाग आहे.