@ डॉ. श्रीकांत कार्लेकर
4 सप्टेंबर 2026 रोजी, संयुक्त संस्थानांच्या आमसभेने ‘नकाशा दुरुस्त करा’ (करेक्ट द मॅप) असा ऐतिहासिक ठराव मंजूर केला. सोळाव्या शतकातील मर्केटर प्रक्षेपणातील गंभीर भौगोलिक विकृती किंवा विपर्यास दूर करण्यासाठी हा ठराव मांडण्यात आला. भारत आणि आफ्रिकन युनियन सदस्य राष्ट्रांसह अनेक राष्ट्रांनी या निर्णयाकडे भौगोलिक समानता, प्रतिनिधित्व आणि युरो-केंद्रित नकाशा शास्त्रापासून दूर जाण्याच्या दिशेने उचललेले एक खूप उशिराचे पण महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले आहे.
जगाच्या सध्या वापरात असलेल्या पारंपरिक नकाशामुळे आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आशिया ही भूखंडे प्रत्यक्षात आहेत त्यापेक्षा खूपच लहान दिसतात आणि त्यामुळे जगातील देशांबद्दलचा एक असंतुलित जागतिक दृष्टीकोन तयार होतो.
मर्केटर प्रक्षेपणामुळे विषुववृत्ताजवळील प्रदेशांचे महत्त्वही कमी होते. त्यामुळेही अशा दुरुस्तीची आवश्यकता होतीच. हा ठराव कोणताही विशिष्ट जागतिक नकाशा स्वीकारीत नाही किंवा प्रमाणित करीत नाही; तसेच तो आंतरराष्ट्रीय सीमा, वादग्रस्त प्रदेश किंवा स्थान नावे यांसह राजकीय नकाशाशास्त्राशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य करीत नाही. संयुक्त राष्ट्रांचा हा ठराव पूर्णपणे दृश्य प्रमाणांवर केंद्रित आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सीमा, सार्वभौमत्व किंवा विवादित प्रदेशांची कायदेशीर स्थिती बदलत नाही.
सोळाव्या शतकापासून प्रचलित असलेल्या मर्केटर या प्रक्षेपण प्रकारावर टीका झाली आहे, कारण त्यात आफ्रिका खंड प्रत्यक्षात चौदा पट मोठा असूनही, तो ग्रीनलँडच्या आकाराएवढाच दाखवला आहे. या जुन्या नकाशांच्या प्रमाणांमुळे विषुववृत्तीय देशांच्या विकासाच्या गरजा आणि व्याप्तीबद्दल जगाची धारणा नकारात्मक होते असेही अनेकांचे मत होते.
जागतिक नकाशानिर्मितीचा विकास ही खरे म्हणजे स्थानिक पौराणिक कथांपासून ते सध्याच्या सखोल सांख्यिकी विज्ञानापर्यंत झालेल्या मानवी दृष्टीकोनाच्या स्थित्यंतराची कहाणी आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, जागतिक नकाशांनी आपल्या दृष्टीकोनात लक्षणीय विपर्यास निर्माण केला होता. सुरुवातीचे नकाशे स्थानिक ज्ञान, आदिम साधने आणि राजकीय किंवा आध्यात्मिक पूर्वग्रहांमुळे मर्यादित झाले होते.
प्राचीन ग्रीक नकाशाकार नाक्झिमँडर हो हे नकाशानिर्मितीचे जनक मानले जातात. दुसर्या शतकातील टॉलेमीच्या ’जिओग्राफिया’सारख्या नकाशांनी अक्षांश आणि रेखांशांची ओळख करून दिली. हे नकाशे खलाशी आणि शोधकर्त्यांच्या एकत्र जोडलेल्या रोजनिशींच्या आधारे, मातीच्या पाट्या, चर्मपत्र यावर अत्यंत काळजीपूर्वक हाताने रेखाटले जात असत.
सोळाव्या ते अठराव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधी, जागतिक नकाशे करण्यासाठी अचूक सर्वेक्षण हे त्रिकोणीकरणाद्वारे (ट्रँग्युलेशन) विकसित झाले, ज्यात भौमितिक जाळ्यांचा वापर करून आणि दूरच्या उंच ठिकाणांमधील अचूक कोन मोजून गणितानुसार अंतराची गणना केली जात असे.
आधुनिक नकाशे आता प्रवाशांच्या हाताने लिहिलेल्या अहवालांवर आणि वर्णनांवर अवलंबून राहत नाहीत. ते उपग्रह दूरसंवेदन, जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली, गुगल मॅप्ससारखे प्लॅटफॉर्म, याचा उपयोग करून केले जातात.)
जागतिक नकाशा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा बहुतेक किंवा संपूर्ण भाग दर्शवणारा नकाशा. जागतिक नकाशांना, त्यांच्या प्रमाणामुळे, प्रक्षेपणाच्या समस्येशी सामना करावा लागतो. द्विमितीय नकाशे अपरिहार्यपणे पृथ्वीच्या त्रिमितीय पृष्ठभागाचे प्रदर्शन विकृत करतात. जरी हे कोणत्याही नकाशासाठी खरे असले तरी, जागतिक नकाशामध्ये या विकृती पराकोटीला पोहोचतात.
जागतिक नकाशा तयार करण्यासाठी पृथ्वी, तिचे महासागर आणि तिचे खंड यांचे जागतिक ज्ञान आवश्यक असते. प्रागैतिहासिक काळापासून मध्ययुगापर्यंत, एक अचूक जागतिक नकाशा तयार करणे अशक्य होते, कारण पृथ्वीच्या अर्ध्याहून कमी किनारपट्टी आणि तिच्या खंडांच्या अंतर्गत भागांचा केवळ एक छोटासा अंशच कोणत्याही संस्कृतीला ज्ञात होता. युरोपीय प्रबोधनकाळात सुरू झालेल्या शोधमोहिमांमुळे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे ज्ञान वेगाने जमा झाले, ज्यामुळे 1700च्या दशकाच्या मध्यापर्यंत जगातील बहुतेक किनारपट्टीचे, किमान अंदाजे, नकाशे तयार झाले होते आणि विसाव्या शतकापर्यंत खंडांच्या अंतर्गत भागांचे नकाशे तयार झाले होते.
जगाचे नकाशे सामान्यतः राजकीय किंवा भौतिक वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करतात. राजकीय नकाशे प्रादेशिक सीमा आणि मानवी वस्तीवर भर देतात. सर्व जागतिक नकाशे अनेक नकाशा प्रक्षेपणांपैकी एकावर आधारित असतात, म्हणजेच पृथ्वीगोलाला एका सपाट पृष्ठभागावर दर्शवण्याच्या पद्धतींवर. सर्व प्रक्षेपणे भौगोलिक वैशिष्ट्ये, अंतर आणि दिशा यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे विकृत करतात. विकसित झालेली विविध नकाशा प्रक्षेपणे अचूकता आणि जागतिक नकाशे बनवण्यामध्ये अंतर्भूत असलेली अपरिहार्य विकृती यांच्यात संतुलन साधण्याचे वेगवेगळे मार्ग प्रदान करतात.
सुरुवातीच्या जागतिक नकाशांमध्ये लोहयुगापासून ते शोधयुगापर्यंत आणि आधुनिक काळाच्या सुरुवातीच्या काळात आधुनिक भूगोलाच्या उदयापर्यंतच्या जगाच्या चित्रणांचा समावेश होतो. जुने नकाशे भूतकाळात ज्ञात असलेल्या ठिकाणांविषयी माहिती देतात, तसेच त्या नकाशाचा तात्त्विक आणि सांस्कृतिक आधारही स्पष्ट करतात, जो अनेकदा आधुनिक नकाशाशास्त्रापेक्षा खूप वेगळा होता. नकाशे हे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे शास्त्रज्ञ आपल्या कल्पना प्रसारित करतात आणि त्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवतात.
ज्या तंत्रामुळे पृथ्वीचा गोल पृष्ठभाग द्विमित सपाट प्रदेशावर रूपांतरित केला जातो त्यास प्रक्षेपण (प्रोजेक्शन )असे म्हटले जाते. पृथ्वीवरील खंडे व महासागर यांचा आकार जसा आहे तसा कागदावर प्रक्षेपित करण्याचा यात प्रयत्न केलेला असतो. अर्थातच, प्रत्येक प्रक्षेपणानुसार काही गुणधर्मांत त्रुटी या राहतातच. काही प्रक्षेपणात दोन ठिकाणांतील अंतर बरोबर राहत; पण त्याच्या बदल्यात दिशादर्शनात अवास्तवता येते. काही प्रक्षेपणात आकारांचे निर्देशन बरोबर होते; पण त्याचवेळी क्षेत्रफळात चूक होते; असे असले तरी आज पृथ्वीच्या घनगोलाकृतीचे द्विमित कागदावर रूपांतरण करण्याचा प्रक्षेपण हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. भविष्यात कदाचित त्रिमित प्रतिमानी (Three-Dimensional Modelling) व आभासी यथार्थता (Virtual Reality) या क्षेत्रात अधिक संशोधन होऊन याला उत्तर मिळेलही! नकाशा प्रक्षेपणाचे खमध्य (Zenithal), शंक्वाकृती (Conical) व दंडगोलीय (Cylindrical) असे प्रमुख तीन प्रकार असून मर्केटर हा दंडगोलीय प्रक्षेपणाचा प्रकार आहे.
मर्केटर प्रक्षेपण त्याच्या दंडगोलीय गुणधर्मामुळे ध्रुवांजवळील भूभाग ताणते आणि विषुववृत्ताजवळील प्रदेश आकुंचित करते, ज्यामुळे उत्तर अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत आफ्रिका आणि इतर प्रदेश लहान दिसतात. म्हणूनच हा ठराव, आफ्रिकेसारखे विषुववृत्तीय प्रदेश आकुंचित करणार्या 1569च्या मर्केटर प्रक्षेपणाऐवजी, ’इक्वल अर्थ’ म्हणजेच समान-क्षेत्रफळ दर्शवणार्या नकाशा प्रक्षेपणाला प्राधान्य देतो.
यावेळी 164 देशांनी ठरावाच्या बाजूने तर अमेरिकेने विरोधात मतदान केले आणि एस्टोनिया, जॉर्जिया, लिथुआनिया, मोल्दोव्हा, सर्बिया आणि युक्रेन या सहा देशांनी मतदानात भाग घेतला नाही.
आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण आशिया यांचे अशा नकाशामुळे होणारे प्रतिकात्मक अवमूल्यन रोखण्यासाठी आफ्रिकन युनियन सदस्य राष्ट्रांच्या वतीने आफ्रिकेतील टोगो या देशाद्वारे नकाशा बदलाचा हा प्रस्ताव सादर करण्यात आला. भारताने भूभागांच्या अधिक अचूक चित्रणाला पाठिंबा देत ठरावाच्या बाजूने मतदान केले. टोगोचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रॉबर्ट डुसे म्हणाले की, एक निष्पक्ष नकाशा, जगाचा भूगोल बदलत नाही, तर तो जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनच बदलतो.
मर्केटर प्रक्षेपण विषुववृत्तापासून दूरचे प्रदेश ताणून भूभागाच्या आकारात मोठ्या प्रमाणात अवास्तवता निर्माण करते, ज्यामुळे उत्तरेकडील राष्ट्रे प्रचंड मोठी दिसतात आणि विषुववृत्तीय प्रदेश लहान दिसतात. याउलट, समान-क्षेत्रफळ दर्शवणारे (इक्वल अर्थ) नकाशा प्रक्षेपण भूभागाचे अचूक सापेक्ष आकार कायम ठेवते. अमेरिकेने या ठरावाला नकाशाशास्त्रीय अचूकतेमुळे नव्हे, तर नकाशा बनवण्याच्या मुद्द्याला वैचारिक आणि राजकीय चौकटीत बसवण्यास आक्षेप घेतल्यामुळे विरोध केला.
टोगोच्या नेतृत्वाखालील प्रस्तावित केलेल्या ठरावाच्या मसुद्यात, मर्केटर नकाशाचे वर्चस्व हे वसाहतवादाचा वारसा आहे असे स्पष्टपणे मांडण्यात आले होते, आणि बौद्धिक न्याय म्हणून त्यात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती. अमेरिकेच्या प्रतिनिधीने असा युक्तिवाद केला की या भाषेमुळे एका सरळ शैक्षणिक बदलाचे रूपांतर एका मूलगामी वैचारिक प्रकल्पात झाले. अमेरिकेने असा युक्तिवाद केला की संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने आपला वेळ आणि संसाधने शाळेतील वर्गांच्या भिंतीवरील नकाशांवर वादविवाद करण्याऐवजी तातडीच्या आंतरराष्ट्रीय संकटे, सुरक्षा धोके आणि मानवतावादी समस्यांवर केंद्रित केला पाहिजे. जरी देशांच्या सीमा बदलल्या जाणार नाहीत असे ठरावात म्हटले असले तरी, काही राष्ट्रांना नकाशाशास्त्रात संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाच्या परिणामांबद्दल चिंता वाटत होती. उदाहरणार्थ, ग्लोबल साउथला पाठिंबा देताना, युक्रेनने नमूद केले की, काही इक्वल अर्थ नकाशे रशियाच्या ताब्यातील युक्रेनियन प्रदेश चुकीच्या पद्धतीने दर्शवतात, यावरून नकाशा निवड किती सहजपणे अत्यंत राजकीय बनते हे दिसून येते.
त्रिमितीय (3D) पृथ्वीगोलाला द्विमितीय (2D) नकाशावर विकृतीशिवाय सपाट करणे गणितानुसार अशक्य आहे. मर्केटर आणि इक्वल अर्थ प्रक्षेपण या दोन्ही प्रक्षेपणात पूर्णपणे भिन्न भौमितिक गुणधर्मांना प्राधान्य दिले गेले आहे. मर्केटर प्रक्षेपण 1569मध्ये बेल्जियममधील फ्लेमिश भूगोलज्ञ मर्कॅटर यांनी नौकानयन(नॅव्हिगेशन) सुकर करण्याच्या उद्देशाने सुचविले होते. हे प्रक्षेपण नौकानयन मार्गांसाठी आवश्यक असलेल्या र्हम्ब (rhumb) रेषांना सरळ रेषा म्हणून दर्शवण्याच्या गुणधर्मामुळे वापरले जात असे. र्हम्ब लाईन (ज्याला ’लोक्सोड्रोम’ असेही म्हणतात) हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक काल्पनिक मार्ग आहे जो प्रत्येक रेखांश रेषेला एकाच कोनात छेदतो. हा मार्ग एकाच, निश्चित होकायंत्राच्या दिशेचे अनुसरण करतो. प्रवास करताना तुम्हाला तुमची दिशा बदलण्याची आवश्यकता नसते. हे प्रक्षेपण वापरून केलेल्या जगाच्या नकाशात ध्रुवांच्या जवळ जाताना भूभाग क्रमशः ताणले जातात. ग्रीनलँड आफ्रिकेच्या आकाराचे दिसते. रशिया आणि उत्तर अमेरिका प्रचंड मोठे दिसतात.
समान-क्षेत्रफळ दर्शवणारे इक्वल अर्थ प्रक्षेपण हे 2018मध्ये बोजान शावरिच, बर्नहार्ड जेनी आणि टॉम पॅटरसन यांनी शोधलेले एक समान-क्षेत्रफळाचे छद्म-दंडगोलाकार (सुडो सिलेंड्रिक) जागतिक नकाशा प्रक्षेपण आहे. दृश्य समानता हा या प्रक्षेपणाचा प्राथमिक उद्देश आहे. ते सर्व खंडांच्या खर्या सापेक्ष क्षेत्राचे अचूक निर्देशन करते. या प्रक्षेपणात देशांचे आकार किंचित संकुचित होतात परंतु संपूर्ण पृथ्वीवर पृष्ठभागाचे क्षेत्रफळ प्रमाणात राहते. त्यामुळे प्रत्यक्षात आफ्रिका खंड ग्रीनलँडपेक्षा चौदा पट आणि रशियापेक्षा 80% मोठे असल्याचे दिसून येते.
आदर्श मर्केटर नकाशावर, उत्तर गोलार्ध अतिशयोक्तीपूर्ण दिसतो. उदाहरणार्थ, रशिया आणि कॅनडा प्रचंड मोठे दिसतात; परंतु जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या खर्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळापर्यंत लहान करता, तेव्हा ते लक्षणीयरीत्या लहान दिसतात, तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेसारखे विषुववृत्ताजवळील खंड प्रत्यक्षात प्रचंड मोठे दिसतात.
संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने जगाच्या प्रस्तावित नव्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांचे चित्रण भारताच्या अधिकृत नकाशानुसारच केले गेले पाहिजे, असे भारताने स्पष्ट केले आहे. कोणतेही चुकीचे किंवा भ्रामक चित्रण स्वीकारार्ह नसल्याचेही भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले, की या ठरावाचा अर्थ कोणत्याही विशिष्ट नकाशाला, नकाशा-प्रक्षेपणाला किंवा राष्ट्रीय सीमांच्या चित्रणाला समर्थन देणे असा होत नाही. भारताने या ठरावाच्या बाजूने मतदान केले आणि समान-क्षेत्रीय नकाशा प्रतिनिधित्वाच्या मूलभूत तत्त्वावर भर देऊन मतदानावरील स्पष्टीकरणही दिले आहे. ’जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांसह भारताचा सार्वभौम भूभाग भारताच्या अधिकृत नकाशानुसारच दाखवला गेला पाहिजे,’ असे जैस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.