Bhulabai Festival
@सागर येवले
90041 84333
महाराष्ट्रातील खानदेश आणि विदर्भात साजरी केली जाणारी समृद्ध आणि जिव्हाळ्याची लोकपरंपरा म्हणजे ‘भुलाबाई उत्सव’. हा उत्सव ‘भोंडला’, ‘हादगा’ या नावानेही परिचित आहे. जळगावमधील ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’च्या ‘ललित कला संवर्धिनी’त गेल्या अनेक वर्षांपासून भुलाबाई महोत्सव भरवला जातोय. हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही; तर विस्मृतीत जाणार्या लोकपरंपरेला पुन्हा समाजाच्या मध्यवर्ती प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.
चांदण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या...
टिपर्यांचा ताल, मुलींचे फेर, एकसुरात म्हटली जाणारी ही अशी भुलाबाईची गाणी आणि अंगणभर पसरलेला उत्साह... महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात कधीकाळी हे चित्र अगदी सहज दिसायचे. भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत अनेक घरांच्या अंगणात भुलाबाईचा उत्सव रंगायचा. मुली-महिला एकत्र यायच्या, गाणी म्हणायच्या, पारंपरिक खेळ खेळायच्या आणि नकळत आपल्या पुढच्या पिढीला एक समृद्ध लोकपरंपरा सोपवायच्या.
काळ बदलला. घरांची अंगणे लहान झाली, जीवनाची गती वाढली, मनोरंजनाची साधने बदलली आणि मोबाईलच्या पडद्याने मोकळ्या वेळेची जागा घेतली. त्यासोबतच अशा अनेक लोकपरंपरा लोप पावत चालल्या. कधी काळी सहज जगल्या जाणार्या या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत आहेत.
याच पार्श्वभूमीवर जळगावच्या ’केशवस्मृती प्रतिष्ठान’च्या ’ललित कला संवर्धिनी’ने गेल्या अनेक वर्षांपासून भुलाबाई महोत्सवाच्या माध्यमातून एक वेगळा प्रयत्न उभा केला आहे. हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही; तर विस्मृतीत जाणार्या लोकपरंपरेला पुन्हा समाजाच्या मध्यवर्ती प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.
सन 1997-98च्या सुमारास केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि तत्कालीन जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष डॉ. अविनाश ‘दादा’ आचार्य यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून भुलाबाई महोत्सवाची संकल्पना पुढे आली. जळगाव जनता बँकेच्या प्रांगणात अवघ्या पाच संघांच्या सहभागातून सुरू झालेला हा उपक्रम आज मोठ्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारला आहे.
Bhulabai Festival
एकेकाळी घराच्या अंगणात सहज उमटणारा टिपर्यांचा आवाज आज मोठ्या व्यासपीठावर ऐकू येतो, ही या प्रवासाची खरी कहाणी आहे.
भुलाबाईची गाणी ही या परंपरेची खरी ओळख. त्यात भक्ती आहे, विनोद आहे, नातेसंबंध आहेत, निसर्ग आहे, कौटुंबिक जीवन आहे आणि तत्कालीन लोकजीवनाचे अनेक पदर आहेत.
उदाहरणार्थ-
यादवराया राणी रुसून बैसली कैसी...
या एका ओळीतूनच कौटुंबिक नातेसंबंध, सासर-माहेर आणि स्त्रीमनाचा एक वेगळा पैलू समोर येतो.
तर दुसर्या गीतात-
सा बाई सू... बेलाच्या झाडाखाली, महादेवा तू...
असे म्हणत लोकश्रद्धा, निसर्ग आणि भक्तिभाव यांचे सुंदर मिश्रण दिसते.
कुठेतरी माहेरी जाण्याची ओढ व्यक्त होते-
कारल्याची बी पेर गं सुनबाई, मग जा अपुल्या माहेरा...
तर एखाद्या गीतातून साध्या ग्रामीण जीवनातील विनोद डोकावतो-
आमचे मामा व्यापारी, तोंडात चिक्कण सुपारी...
हीच या लोकगीतांची ताकद आहे. ती लिहिलेल्या ग्रंथातून निर्माण झालेली नाहीत; ती लोकांच्या जगण्यातून आली आहेत. म्हणूनच त्यामध्ये त्या काळातील समाजजीवनाचा सहज, ओघवता आणि कृत्रिमतेपासून मुक्त आविष्कार दिसतो.
भुलाबाईच्या सादरीकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड केलेल्या संगीताचा वापर न करता टिपर्यांच्या तालावर गाणी म्हणण्याची परंपरा. उपलब्ध असल्यास पेटी किंवा तबल्याची साथ असते; मात्र गाण्याचा मूळ आत्मा हा समूहगायन आणि टिपर्यांच्या तालातच आहे. त्यामुळे सादरीकरणात कृत्रिमता येत नाही आणि लोकपरंपरेचे मूळ स्वरूप जपले जाते.
Bhulabai Festival
आज सोशल मीडियाच्या युगातही महिला आणि मुली भुलाबाईसाठी एकत्र येतात, पारंपरिक गाणी शिकतात, त्यांचा सराव करतात आणि सार्वजनिक व्यासपीठावर सादर करतात. हे दृश्य केवळ आनंद देणारे नाही, तर एक महत्त्वाचा सांस्कृतिक संदेश देणारे आहे, परंपरा संपलेली नाही; तिला नव्या पिढीने पुन्हा हातात घेतले आहे.
भुलाबाई महोत्सवाची सुरुवात जरी पाच संघांपासून झाली असली, तरी आज त्याचा विस्तार तालुका आणि जिल्हास्तरापर्यंत झाला आहे. यावर्षी जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय आयोजन करण्यात आले असून, हजारो महिला व मुली त्यात सहभागी होत आहेत. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचीही या उपक्रमाला साथ मिळत आहे.
यामागे केवळ स्पर्धा किंवा पारितोषिकांचा हेतू नाही. लोकपावलेली कला, संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या संपूर्ण प्रयत्नाचा केंद्रबिंदू आहे.
भारतीय ज्ञानपरंपरेचा विचार आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणव्यवस्थेत महत्त्वाने मांडला जात आहे. मात्र, आपल्या समाजातील लोकज्ञान, लोककला आणि लोकपरंपरा त्यापूर्वीपासूनच भारतीय ज्ञानपरंपरेचा अविभाज्य भाग आहेत. भुलाबाईसारख्या उत्सवातून ही परंपरा पुस्तकात नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्यातून पुढे जाते.
म्हणूनच भुलाबाई महोत्सवाकडे केवळ एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दृष्टीकोनातून न पाहता, लोप पावत चाललेल्या लोकपरंपरेला संजीवनी देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.
कधीकाळी अंगणात सहज घडणारी भुलाबाई आज मोठ्या व्यासपीठावर आली आहे. तिच्या हातातील टिपर्या बदललेल्या नाहीत, गाण्यांची लय बदललेली नाही आणि परंपरेची ओढही कमी झालेली नाही. बदलले आहे ते फक्त तिचे व्यासपीठ.
अंगणातून सुरू झालेला हा प्रवास आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडून पुढे जात आहे. आणि टिपर्यांच्या त्या तालात एकच संदेश पुन्हा पुन्हा ऐकू येतो-परंपरा जिवंत ठेवायची असेल, तर ती पुढच्या पिढीने जगली पाहिजे.
- लेखक केशवस्मृती प्रतिष्ठान,
जळगावचे प्रशासकीय अधिकारी आहेत.