@शरद जाधव
संस्कृत भाषा आणि वेद हा केवळ अभ्यासाचा किंवा कर्मकांडविधींचा विषय नाही, तर तो जगण्याचा भाग आहे, हे नाशिकचे वेदमूर्ती मुकुंद खोचे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. आदिवासी पाड्यांपासून गोदावरीच्या काठापर्यंत ’संस्कृत भारती’च्या माध्यमातून खोचे यांनी संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसाराचे काम केले. राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या पहिल्या ‘संस्कृतश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मुकुंदजींच्या संस्कृतसेवेचा आणि लोकजीवनाशी जोडलेल्या कार्याचा हा थोडक्यात परिचय...
संस्कृत, वेद आणि भारतीय ज्ञानपरंपरेच्या क्षेत्रात निष्ठेने, सातत्याने आणि निरपेक्ष भावनेने कार्य करणार्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि संस्कृतविषयक कार्याला व्यापक सामाजिक अधिष्ठान प्राप्त व्हावे, या भावनेतून राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचा प्रथम ‘संस्कृतश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरलेले वेदमूर्ती मुकुंद खोचे यांचा गौरव हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून संस्कृत, वेदविद्या, पौरोहित्य आणि भारतीय ज्ञानपरंपरेशी आयुष्यभर जोडलेल्या एका साधनेचा गौरव आहे.
मुकुंद खोचे यांचा संस्कृत आणि वेदविद्येचा प्रवास लहानपणापासून सुरू झाला. नाशिक शहरातील उत्तम पुरोहित म्हणून ज्यांचा लौकिक होता, अशा त्यांच्या वडलांकडूनच त्यांना वेद, कर्मकांड आणि पौरोहित्याचे प्राथमिक संस्कार व शिक्षण मिळाले. घरातील वातावरणच वेदाध्ययनाला पोषक असल्याने संस्कृत आणि वेद हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले. पुढे त्यांनी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली आपले अध्ययन पूर्ण केले आणि वेदविद्येत प्रावीण्य संपादन केले.
वेदांचा अभ्यास केवळ पाठांतरापुरता मर्यादित न ठेवता त्यामागील अर्थ, परंपरा आणि जीवनाशी असलेले नाते समजून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळेच आज ते वेदविद्या आणि पौरोहित्याच्या क्षेत्रात अत्यंत विश्वासाने कार्यरत आहेत. वेद, संस्कृत आणि पौरोहित्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आणि हातखंडा आहे.
मात्र मुकुंद खोचे यांचे वैशिष्ट्य केवळ त्यांच्या विद्वत्तेत नाही; तर ही विद्वत्ता समाजासाठी उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या वृत्तीत आहे. अनेकांना संस्कृत म्हणजे कठीण भाषा, वेद म्हणजे केवळ विद्वानांचा विषय आणि कर्मकांड म्हणजे केवळ काही धार्मिक विधी, असे वाटू शकते. मुकुंदजी मात्र या ज्ञानपरंपरेला सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडण्याचे काम करतात. कोणाला संस्कृत शिकायचे असेल, वेद समजून घ्यायचे असतील किंवा एखाद्या धार्मिक विधीमागील अर्थ जाणून घ्यायचा असेल, तर ते अत्यंत तत्परतेने आणि आपुलकीने मार्गदर्शन करतात.
त्यांच्या स्वभावातील आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्वत्ता असूनही त्यांच्यातील साधेपणा. एवढा मोठा अभ्यास, वेदांचे ज्ञान, संस्कृतवरील प्रभुत्व आणि विविध क्षेत्रांतील योगदान असूनही त्यांचे वागणे अत्यंत साधे, सहज आणि जमिनीवरचे आहे. कोणत्याही व्यक्तीशी आपुलकीने संवाद साधणे आणि समोरच्याला आपलेसे करणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष गुण आहे.
ज्ञानाची दिशा समाजाकडे
मुकुंद खोचे यांच्या कार्याचा विस्तार केवळ शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही. आदिवासी भागात आणि पाड्यांवर सुरू असलेल्या विविध सेवा उपक्रमांमध्येही ते सहभागी होतात. पाड्यांवर जाऊन मंदिर उभारणीच्या कार्यात सहभाग घेणे, तेथील लोकांना पूजा-अर्चा कशी करावी, कोणते विधी कशा पद्धतीने करावेत, याची माहिती देणे आणि हे सर्व मराठी भाषेत अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगणे, हे त्यांच्या कार्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. इथे त्यांच्या संस्कृत आणि वेदज्ञानाला खर्या अर्थाने सामाजिक अधिष्ठान मिळते. कारण ज्ञान तेव्हाच अर्थपूर्ण ठरते, जेव्हा ते समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते.
गोदावरीशी जुळलेले नाते
नाशिकची ओळख म्हणजे गोदावरी. गोदावरी ही केवळ नदी नाही; ती नाशिकच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. या गोदावरीशी संबंधित कार्यातही मुकुंद खोचे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.
नाशिकमध्ये सुरू झालेल्या गोदावरी आरतीच्या कार्यात तसेच रामतीर्थ गोदावरी समितीचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. गोदावरीचे संवर्धन, तिचे पावित्र्य आणि उज्ज्वल भविष्य तसेच गोदावरी आरतीचा व्यापक प्रसार या उद्देशाने समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
संस्कृत, वेद आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणारा एक विद्वान जेव्हा नदी संवर्धनाच्या कार्याशी जोडला जातो, तेव्हा परंपरा आणि वर्तमान यांचा सुंदर संगम घडतो. मुकुंदजींच्या कार्यात हा संगम प्रकर्षाने जाणवतो.
संस्कृत भारतीच्या माध्यमातून संस्कृतप्रसार
संस्कृतच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य करणार्या संस्कृत भारतीच्या माध्यमातूनही मुकुंद खोचे यांनी अनेक वर्षे योगदान दिले आहे. संस्कृत ही केवळ अभ्यासक्रमातील किंवा ग्रंथांमध्ये बंदिस्त असलेली भाषा न राहता ती सामान्य माणसाच्या बोलण्यात यावी, दैनंदिन व्यवहारात यावी आणि संस्कृतबद्दलची भीती दूर व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
स्वतः लहानपणापासून संस्कृतचा अभ्यास केलेला असल्याने संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. ते उत्तम संस्कृत बोलतात; परंतु त्यांची खरी ताकद आहे ती, संस्कृत इतरांना समजावून सांगण्यात. विद्वत्ता स्वतःपुरती ठेवण्याऐवजी ती पुढच्या पिढीला देणे, हा त्यांच्या कार्याचा गाभा आहे.
‘संस्कृतं कथं जीवयेम?’पासून ‘संस्कृतेन वयं कथं जीवेम?’कडे
‘संस्कृतश्री’ पुरस्कार स्वीकारताना मुकुंद खोचे यांनी मांडलेला विचार त्यांच्या संपूर्ण कार्याचे सार सांगणारा आहे. ‘संस्कृतं कथं जीवयेम?’-संस्कृत कशी जिवंत ठेवायची? या प्रश्नापासून पुढे जात,‘संस्कृतेन वयं कथं जीवेम?’-संस्कृतच्या माध्यमातून आपण कसे जगू? हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
ही केवळ शब्दांची अदलाबदल नाही; ही संस्कृतकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी भूमिका आहे.
संस्कृत जतन करण्यासाठी तिचे ग्रंथ जपणे आवश्यक आहे; परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे संस्कृतमधील ज्ञान, मूल्ये, विचार आणि भारतीय ज्ञानपरंपरा वर्तमान जीवनाशी जोडणे.
मुकुंदजींच्या स्वतःच्या कार्यातही हेच दिसते. वेदाध्ययन आहे, पौरोहित्य आहे, संस्कृतप्रसार आहे, आदिवासी भागातील सेवा आहे, मंदिर आणि धार्मिक संस्कारांचे मार्गदर्शन आहे, गोदावरी आरती आणि गोदावरी संवर्धनाचे कार्य आहे-म्हणजे संस्कृत आणि भारतीय परंपरेचा जीवनाशी असलेला संबंध ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत आहेत.
पुरस्कारापेक्षा मोठी त्यांची विनम्रता
राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचा प्रथम ‘संस्कृतश्री’ पुरस्कार मिळणे ही निश्चितच अत्यंत अभिमानाची बाब आहे. यापूर्वीही त्यांना ‘वेदमूर्ती’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे; परंतु पुरस्कार स्वीकारताना त्यांनी दाखवलेली विनम्रता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी मोठेपणा देते. हा पुरस्कार त्यांनी स्वतःपुरता न मानता संस्कृत भाषेच्या व्यापक कार्याला आणि संस्कृतच्या प्रसारासाठी आयुष्यभर कार्य करणारे चामू कृष्ण शास्त्री यांना समर्पित केला. यातूनच मुकुंदजींच्या मनातील कृतज्ञता, गुरूंविषयीचा आदर आणि स्वतःच्या कार्याकडे पाहण्याची विनम्र दृष्टी दिसून येते.
खरे तर मोठेपणाची व्याख्या पुरस्कारांनी होत नाही; पुरस्कार मिळाल्यानंतर माणूस स्वतःकडे कसा पाहतो, यावर त्याचे मोठेपण ठरते. मुकुंद खोचे यांनी हा पुरस्कार स्वीकारताना हीच नम्रता जपली.
हा सन्मान मुकुंदजींचाच नव्हे, तर एका संस्कारपरंपरेचा आहे. मुकुंद खोचे यांच्या या सन्मानामागे त्यांच्या वडलांचे संस्कार आहेत, गुरुजनांचे मार्गदर्शन आहे, वेदविद्येची अखंड साधना आहे आणि समाजासाठी काहीतरी देण्याची वृत्ती आहे.
एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे ज्ञानाचा वारसा जातो आणि त्या वारशाला वर्तमानकाळाशी जोडणारा साधक त्या परंपरेला नवे जीवन देतो. मुकुंदजी हे असेच एक साधक आहेत. त्यांच्यात वेदपारंगत विद्वान आहे, संस्कृतचा अभ्यासक आहे, पौरोहित्याचा जाणकार आहे, संस्कृतप्रसारक आहे, समाजसेवक आहे, गोदावरीप्रेमी आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक अत्यंत साधा आणि मनमिळावू माणूस आहे.
म्हणूनच ‘संस्कृतश्री’ पुरस्कार हा त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव तर आहेच; पण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मिळालेली एक मोठी सामाजिक मान्यतादेखील आहे.