काशीनाथ पवार
अस्पृश्य हिंदूंनी परंपरेतून आलेली रूढी मोडून चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केलेला पाहून कट्टर सनातनी स्पृश्यांची तळापायाची आग मस्तकाला गेली. महाडमधले वातावरण अत्यंत तप्त आणि स्फोटक बनले. त्यातच महाडमधल्या श्री विरेश्वर मंदिरातला पुजारी बाळकृष्ण गुरव याने गावातून दवंडी पिटवली- “ऐका, हो ऐकाऽऽ...महारांनी चवदार तळे बाटवले, आता ते विरेश्वर मंदिरात प्रवेश करून गाव-देव बाटविणार आहेत. तुम्ही तुमच्या गावच्या विहिरी सांभाळा आणि देवांना वाचवा.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने क्रांतिप्रवण झालेल्या मनांवर अनंतरावांच्या त्या चार वाक्यांनी ठिणगीचे काम केले. जमलेल्या जनसमुदायाने या ठिणगीला पाहतापाहता वणव्यात रूपांतरित केले. अनंतरावांच्या त्या वाक्याकडे चवदार तळ्याच्या धर्मसंगरातले कृतियुक्त सामाजिक बंडखोरीचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणून पाहता येईल; पण त्याबरोबरच ही क्रांती घडून यावी, असे वाटत असताना देखील चवदार तळ्याच्या सत्याग्रहात समाजभिरुतेपोटी समाजाच्या दबावाला बळी पडून प्रत्यक्ष योगदान देण्याची हिंमत स्वत:मध्ये आणता आली नाही, अशीही अनेक उदाहरणे पुढे आली आहेत.
सामाजिक समतेच्या अनुषंगाने विचार करता, सामाजिक मानसिकतेच्या या दोन्हीही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ज्याचे स्पष्ट दर्शन महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने झालेले दिसून येते. या दोन्हीही घटनांचे सामाजिक वर्तनाच्या अंगाने आणि नैतिक मूल्यांच्या आधारावर मूल्यांकन व्हायला हवे, असे मला वाटते. या दोन्ही घटनांमध्ये एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे या दोन्ही प्रकारच्या मंडळींना सामाजिक भेदाभेद संपावा, जुन्या अन्यायकारक रूढी, प्रथा, परंपरा नाहीशा होऊन एका नव्या पुरोगामी समाजाची नव्याने रचना व्हावी, सामाजिक मूल्यांची नव्याने स्थापना व्हावी, समाजात सुधारणा व्हावी असे वाटत होते. त्यापैकी काही मंडळी समाजाच्या विरोधात जाऊन त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी तयार होती. त्यासाठी सामाजिक बंडखोरी करण्याची त्यांची तयारी होती. हिंमत होती; तर काही मंडळी, ’समाज काय म्हणेल, माझे काय होईल, समाजाने मला नाकारले तर...?’ अशा विचारांनी, समाजापासून वेगळे पडण्याच्या भीतीतून, समाजाच्या दबावाखाली येऊन, इच्छा असतानाही केवळ समाजभिरुतेपोटी सामाजिक क्रांतीसाठी होत असलेल्या या धर्मसंगरात कृतियुक्त सहभाग देण्यास कचरत होते; पण म्हणून ते प्रतिगामी ठरत नाहीत.
कट्टर सनातनी मंडळींना घाबरणारा समाज त्याकाळी बहुमताने अस्तित्वात होता. त्यांच्या मनाविरुद्ध तथाकथित धर्माबाह्य कृत्य करण्याचे धाडस होऊच शकत नव्हते आणि असे काही भलतेच करण्यास अस्पृश्यच काय पण स्पृश्यातही तशी हिंमत नव्हती हे अनंतरावांनीच लिहिलेल्या एका आठवणीतून स्पष्ट झालेले आहे. अनंतरावच म्हणतात,”कालच्या सभेत बेंबीच्या देठापासून ओरडून भाषणे करणार्या वाचावीरांची तोंडे चिमणीसारखी होऊन गेली.”
कारण अनंतरावांनी मांडलेली ती सूचना अनपेक्षित आणि अचानक पुढ्यात येऊन पडली होती. त्यामुळे,‘बापरे! काय भयंकर प्रसंग हा! कुठून दुर्बुद्धी झाली आणि या सभेत आलो’, अशी काही मंडळींची अवस्था झाल्याचे अनंतरावच सांगतात. ते पुढे म्हणतात, ”मी पंतांना म्हंटले...पंत चला अस्पृश्यांबरोबर चवदार तळ्यात पाणी पिऊया. हिंदू धर्मावरचा डाग पुसून टाकण्याची अनायसे आलेली संधी हातची जाऊ देता कामा नये.” पण घाबर्याघाबर्या आवाजात पंत म्हणतात,”पण इथले लोकमत तयार नाही. लोकमताच्या विरुद्ध कसे जावे? असे म्हणून ते थिएटरच्या मागच्या दाराने निघून जातात.” तर नागरिकत्वाच्या हक्कावर काल मत मांडणार्या शेटजींना जेव्हा अनंतराव म्हणतात,”चला शेटजी अस्पृश्यांना नागरिकत्वाचे हक्क देण्याला आपण तयार आहोत, हे आज आपल्या कृतीने जगाला पटवून देऊया’; तेव्हा शेटजी रागारागाने ओरडतात,”मी काही तुमच्यासारखा उतावळा नाही, मला या गावात राहावयाचे आहे. लोक काय म्हणतात ह्याचा मला विचार केला पाहिजे.”
अनंतरावांनी लिहिलेल्या या हकिकतीवरून तत्कालीन समाजभिरुतेचे एक वेगळे सामाजिक रूप आपल्या समोर येते. तर रा.जोशी आणि रा.धारीया यांची नंतर समाजाकडून गांजवणूक झाल्याच्या बातम्याही तत्कालीन वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या. रा.जोशी यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्नही झाला होता; पण त्यांनी तळ्याच्या शुद्धीकरणासाठी संमती दिली म्हणता तो प्रसंग टळला. शिवाय परिषदेला हजर राहिल्याबद्दल जोशी आणि धारीया यांच्याकडून दंडादाखल सव्वा रुपया वसूलही करण्यात आला होता. यावरून हे लक्षात येईल की, चवदार तळ्याच्या परिसरात जो धर्म जी वृत्ती वर्षानुवर्षे जोपासली गेली होती, त्या विरुद्ध जाण्याची सार्वत्रिक मानसिकता अजून तयार व्हायची होती. म्हणूनच या पार्श्वभूमीवर चवदार तळ्यावर जाऊन पाणी पिण्याची आकस्मिक सूचना व्यासपीठावर हजारो लोकांसमोर मांडणारे अनंतराव चित्रे जसे बंडखोर ठरतात, तसे एका रात्रीत पाणवठे खुले करण्याचे बोर्ड झळकवणारे सुरबानाना टिपणीसही बंडखोर ठरतात.
पण यातून असेही लक्षात येईल की, शेटजी किंवा पंतांसारखी, समाजातली दरी संपायला पाहिजे, समाज एक व्हायला पाहिजे असे वाटणारी; पण समाजभिरुतेपोटी पुढे न येणारी अनेक मंडळीही महाडात होती. ती पुढे येत नव्हती; पण म्हणून त्यांचा मूक पाठिंबा आपल्याला नजरेआड करता येणार नाही. सुधारकाग्रणी आगरकरांनी म्हटल्याप्रमाणे समाजात दोन प्रकारचे सुधारक असतात; एक कर्ते सुधारक आणि दुसरे बोलके सुधारक. समाज सुधारण्यासाठी अशा दोन्हीही प्रकारच्या सुधारकांची समाजाला गरज असते, समाजातून मिळणारा असा मूक पाठिंबादेखील कोणतीही सामाजिक क्रांती घडून येण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरू शकतो, असे मला वाटते. या क्रांतिपर्वाचे प्रत्यक्ष साक्षीदार, बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी कॉ.आर.बी.मोरे यांनी लिहिलेला त्यांचा एक अनुभव अत्यंत बोलका आहे. तो लक्षात घेणे येथे महत्त्वाचे वाटते. कॉ. मोरे लिहितात-आम्ही बाबासाहेबांबरोबर डाक बंगल्यावर गेलो. सरकार अगर स्पृश्य जनता यापैकी कोणीच मोर्चाच्या आड आले नाही. अस्पृश्य जनतेने हक्क प्रस्थापनेचे हे कृतीचे पाऊल उचलून आपल्या मायभूमीत आपल्याला हजारो वर्षांच्या दीर्घ कालखंडात ज्या वर्णव्यवस्थेच्या व जातीप्रणित धर्माने व त्यांच्या प्रणेत्यांनी, त्याचप्रमाणे वेळोवेळी आलेल्या प्रतिगामी राजवटींनी गुलामासारखे वागवले व सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यासारख्या नागरिकत्वाच्या मूलभूत हक्कालाही पारखे केले, त्यांना आव्हान दिले व आपल्या वर्गाच्या बंधमुक्ततेचे व स्वातंत्र्याच्या भावी संग्रामाचे एक नवे पर्व सुरू केले.’ कॉ. मोरेंच्या या विधानाचा विचार करता मोरेंच्या मताप्रमाणे त्यांची लढाई महाडमधल्या तत्कालीन सर्वसामान्य स्पृश्य जनतेशी नव्हतीच; तर ती तत्कालीन कट्टरतावादी धर्म प्रवर्तक, धमर्र्घातकी मंडळी तसेच वेळोवेळी आलेल्या प्रतिगामी राजवटींनी तयार केलेल्या अमानवी प्रथा परंपरांशी होती. या ठिकाणीही परिषदेने मिळवलेले हे यश अशाच कट्टरतावादी धर्ममार्तंडांना आणि कर्मठ वावदुकांना पाहावले नाही.
धनंजय कीर यांनी म्हटल्याप्रमाणे, ’साधारणत: राजकीय मोर्चे हे रोमहर्षक आणि चित्त थरारून सोडणारे असतात. राजकीय स्वातंत्र्यासाठी झगडणार्या वीरांच्या मार्गावर लोक तोरणे उभारून सुमने उधळतात त्यांना प्रकट अप्रकटपणे सहानुभूती दर्शवतात; परंतु सामाजिक क्रांती ही आपल्याच समाजात घडून आणावयाची असल्याकारणाने अशी क्रांती अधिक धारिष्ट्याची आणि अवघड असते. अशी क्रांती घडवू पाहणार्यांच्या नशिबी निंदा, द्वेष आणि शिव्याशाप येतात. त्यांच्या अंगावर मरणप्राय संकटे कोसळतात.’
चवदार तळ्याचा सत्याग्रह हा अशाच एका क्रांतीचा भाग होता. चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी प्राशन केल्यानंतर तेथे जमलेल्या त्यांच्या हजारो अनुयायांनी आणि नेत्यांनी त्यांचे अनुकरण केले. आपल्या नागरिकत्वाचा हक्क बजावत एका अजरामर क्रांतीला जन्म देऊन, मोर्चा परत परिषदेच्या जागेवर परतला आणि शांततेने विसर्जन पावला. दुपारचे दोन वाजून गेले होते. मंडपात भोजनाची व्यवस्था केलेली असल्यामुळे भोजने चालू झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही निवडक मंडळींसह डाक बंगल्यावर पोहोचले होते. आपल्या स्वदेशाला आणि जगालाही समतेचा संदेश देणारा भारताच्या शेकडो वर्षांच्या इतिहासातला हा एक सोन्याचा दिवस होता. या दिवसांनंतरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाच्या आणि कीर्तीच्या लाटाही एकामागून एक अशा सर्वदूर पसरत गेल्या. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातलाही तो महत्त्वाचा आणि परमभाग्याचाच दिवस होता. अत्यंत समाधानाने आणि भारावलेल्या मन:स्थितीत परिषदेला आलेला जो तो आपापल्या घरी परतण्याच्या तयारीला लागलेला होता.
इकडे अस्पृश्य हिंदूंनी परंपरेतून आलेली रूढी मोडून चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केलेला पाहून कट्टर सनातनी स्पृश्यांची तळापायाची आग मस्तकाला गेली. महाडमधले वातावरण अत्यंत तप्त आणि स्फोटक बनले. त्यातच महाडमधल्या श्री विरेश्वर मंदिरातला पुजारी बाळकृष्ण गुरव याने गावातून दवंडी पिटवली- ”ऐका, हो ऐकाऽऽ...महारांनी चवदार तळे बाटवले, आता ते विरेश्वर मंदिरात प्रवेश करून गाव-देव बाटविणार आहेत. तुम्ही तुमच्या गावच्या विहिरी सांभाळा आणि देवांना वाचवा.”
हा निरोप वार्याच्या वेगाने गावोगावी पोहचला. रूढीवादी कट्टर स्पृश्य मंडळींची माथी भडकली. काठ्या, लाठ्या, सोटे घेऊन शेकडो मंडळी, आपला देव बाटणार या कल्पनेतून आपल्या देवाच्या विरेश्वराच्या रक्षणाला सिद्ध झाली. संत चोखामेळा आणि संत रोहिदासांना प्रत्यक्ष दर्शन देणारा, कबिराचे शेले विणणारा, जनाबाईसाठी दळण दळणारा आणि संत दामाजीसाठी महार होणारा देव म्हणे आता बाटणार होता. धर्मघातकी हिंदूूंच्या या कटकारस्थानाचा थोडासुद्धा मागमूस परिषदेला आलेल्या अस्पृश्य हिंदू मंडळींच्या गावी नव्हता. त्यामुळे ते अगदी मोकळेपणाने शहरातल्या बाजारात दोन-दोन, चार-चारच्या गटाने जाऊन बाजारहाट करत फिरत होते. काही घरी परतले होते. काही परतण्याच्या तयारीत होते; तर काहीजण मंडपात जेवण करत होते. त्याचवेळी ही धर्मघातकी स्पृश्य मंडळी त्या मंडपात शिरली, ’हर हर महादेव’ची गर्जना करत निर्दयीपणे अनेक निरपराध माणसांना, स्त्रियांना आणि लहान मुलांनादेखील घायाळ करत सुटले. मंडपात जेवायला बसलेल्या माणसांच्या ताटात माती कालवली. पाण्याची भांडी लोटून दिली. इतर भांड्यांची मोडतोड केली. प्रसंगावधान साधून तेथील काही अस्पृश्यांनी मंडपाच्या काठ्या उपसून हातात घेतल्या, तेव्हा कोठे घाबरून मारामारी करणार्या टोळक्याने तेथून काढता पाय घेतला. आपला मोर्चा मोप्रेकरांच्या हॉटेलकडे वळवला.
परिषदेचे संयोजक आणि काही कार्यकर्ते तेथे असल्याचा सुगावा या टोळक्याला लागला होता. ओरडत ओरडत, शिव्या शाप देत हे टोळके हॉटेलवर पोहोचले; पण ते पोहोचण्याधीच हॉटेलवर हे टोळके येत असल्याची बातमी पोहोचली होती. त्यामुळे या टोळक्याचा सामना करण्यासाठी हॉटेलवर उपस्थित कार्यकर्ते आधीच तयारीत होते. दुसर्या टोळक्याने बाजारात बाजारहाटासाठी गेलेल्यांना मारझोड केली. परिषद संपल्यावर दोन-तीन तासाने हा हल्ला झाला होता. बाबासाहेबांना या हल्ल्याची बातमी एका तुकडीने तातडीने जाऊन सांगितली. सुरबानाना टिपणीसांनाही हल्याची बातमी समजली. त्यांनी लगेच कॉ.मोरे आणि दत्ता चित्रे यांना डी.एस.पी.ला तार करण्यास पाठवले. त्याचवेळी या टोळक्याने आपला मोर्चा गोविंद निवासाच्या बाजूने चवदार तळे बाटवण्यास कारणीभूत असलेल्या अनंतराव चित्रे आणि सुरबा टिपणीस यांच्याकडे वळवला. त्यांची चौकशी सुरू केली. चित्र्यांना पहारीने मारण्याची भाषा वापरली. यावर प्रतिक्रिया देताना चित्रे म्हणाले, ”पहार कशाला? एखादी काठीही माझा जीव घ्यायला पुरेशी आहे.”
टोळक्याने मोठा जमाव करून सुरबानानांच्या गोविंद निवासावर शेवटी धडक मारलीच. त्यांच्या हातात दगड, लाठ्या-काठ्या आणि तोंडात शिव्या होत्या. सुरबानाना घरातच होते. सुमारे पाचशे मंडळी घरावर चाल करून आलेली पाहून त्यांच्या घरच्यांच्या मनात घबराट निर्माण झाली. हल्लेकरी म्हणत होते, ”आम्हाला अनंतरावांना आणि सुरबनानांना ठार करायचे आहे.” त्यांना माहीत होते की, गोविंद टिपणीसांनी दिलेला क्रांतीचा वारसाच नाना पुढे नेत आहेत. त्यामुळे सगळ्या अनर्थाचे मूळ गोविंद निवासच आहे. येथूनच क्रांतीला सुरुवात होते. त्यामुळे हे पेटवल्याशिवाय आपल्याकडे काही मार्ग नाही. घराचे दरवाजे बंद असल्यामुळे कुणाला घरात शिरता येत नव्हते म्हणून दरवाजा फोडण्याच्या दृष्टीने टोळक्यांनी लाठ्या काठ्या आणि दगड मारायला सुरुवात केली. आता काहीतरी विपरीत घडणार याची खात्री झाल्यावर मात्र नानांनी बंदुकीत गोळ्या भरल्या आणि गॅलरीत उभे राहून त्यांनी जमावावर बंदूक रोखली आणि ओरडले, ”माझी बंदूक भरलेली आहे. ज्याला जीव नकोसा असेल त्याने पुढे यावे. त्यापूर्वी आपल्या बायकोचे कुंकुही पुसून यावे. खबरदार एक पाऊल पुढे टाकाल, तर या सुरबाशी गाठ आहे. तुमच्या या हल्ल्याला हा सुरबा घाबरणार तर नाहीच; पण तो तुमचे मुडदे पाडण्यासही कमी करणार नाही,” असे म्हणत त्यांनी हवेत पहिला बार टाकला. जमाव थोडासा पांगला. नानांनी लगोलाग दुसरा बार काढला आणि सनातनी जमावाने जिवाच्या भीतीने तिथून काढता पाय घेतला.
इकडे सायंकाळी चार वाजता बाबासाहेबांची मामलेदार आणि पोलीस अधिकारी यांच्याबरोबर डाक बंगल्यावर भेट झाली. ”तुम्ही इतरांना आवरा. मी माझ्या लोकांना आवरतो,” असे आत्मविश्वासाने बाबासाहेबांनी त्यांना सांगितले. बाबासाहेब दोन-तीन अनुयायांसह मंडपात गेले. तिथली वस्तुस्थिती पाहिली. घायाळ होऊन बेशुद्ध पडलेले, प्राणांतिक वेदनेने विव्हळत असलेले आपले दलित बांधव पाहून त्यांना प्रचंड वेदना झाल्या. रक्त सळसळले. रागाचा पारा वर चढला; पण त्यांनी कसातरी आपल्या मनावर ताबा ठेवला. आपला विवेक ढळू दिला नाही. आपल्या अनुयायांना त्यांनी शांतता राखण्याच्या आणि अनत्याचारी राहण्याच्या सूचना दिल्या.
घायाळ होऊन पडलेल्या आपल्या सुमारे वीस समाजबांधवांना बाबासाहेबांनी स्वत: दवाखान्यात नेले. तेथेही त्यांना काही स्पृश्य डॉक्टरांचे टोमणे ऐकावे लागले. प्रचंड वेदना मनात घेऊनच बाबासाहेब डाक बंगल्यावर परतले. तेथे चिडलेले आणि संतापाने अधीर झालेले सुमारे शंभर अस्पृश्य बांधव त्यांची वाट पाहत होते. त्या अनुयायांच्या डोळ्यांतून जणू आगीचे बंबच बाहेर पडत होते. बाबासाहेबांनी नुसता इशारा दिला असता तरी त्यांनी सगळ्या स्पृश्य माथेफिरू टोळक्यांना पाणी पाजले असते; पण बाबासाहेबांनी सर्वांना शांत राहत घरी परतण्याचा सल्ला दिला. आपल्या परमपूज्य नेत्याचा आदेश शिरसावंद्य मानत सर्वजण आपापल्या गावी परतले.
त्याच दिवशी बाबासाहेबांना डाक बंगला खाली करून द्यायचा होता, म्हणून ते तेथून सुरबानानांकडे मुक्कामाला गेले. तेथे दोन दिवस राहून दंगलीची सगळी माहिती घेतली. प्रतिकूल परिस्थिती असतांनाही भाई चित्रे, नाना टिपणीस आणि भाईशेट वडके यांच्या मदतीने शक्य तितके पुरावे गोळा केले आणि 23 मार्च 1927 रोजी बाबासाहेब मुंबईला परतले. पोलिसांनी हल्लेखोरांपैकी आठ मुख्य गुंडांना पकडले. त्यापैकी ज्यांनी पराकाष्ठेचा पशुपणा दाखवला होता अशा सात जणांना 6 जून 1927 रोजी प्रत्येकी चार महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक मार्गाने लढा देण्यावर असलेल्या विश्वासाचाच हा विजय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक ज्ञानाच्या प्रवासाची खरी सुरुवातही येथूनच झाली, ज्याचा परिपाक भारताच्या संविधान निर्मितीत झाला.