महानुभाव पंथीय ‘साती ग्रंथ’ हे श्रीकृष्ण, चक्रधर, गोविंदप्रभू यांच्याशी संबंधित आहे. श्रीकृष्ण ही महानुभवीयांची इष्टदेवता आहे. या भक्तिपंथाने ‘पंच कृष्ण’ संकल्पना मांडून त्यांना वंदन केलेले आहे. हे साती ग्रंथ त्या गुरुवंदनेचाच एक अक्षरठेवा आहे. या सात ग्रंथांनी मराठी शारदेची सेवा करीत मराठी साहित्य दरबारातील दालने विविध साहित्य प्रकारांनी संपन्न व समृद्ध करण्याचे ऐतिहासिक कार्य केलेले आहे. जिज्ञासूंनी मराठीचा अभिमान बाळगून मराठीच्या उषःकालातील या अक्षर लेण्याचे साद्यंत दर्शन घ्यावे.
महानुभाव भक्ती साहित्याचे मराठी भाषेला विविधतेने संपन्न करण्याचे ऐतिहासिक योगदान आहे. महानुभव पंडितांनी संस्कृतवर प्रेम व प्रभुत्व असूनही सर्वज्ञ चक्रधरांच्या आज्ञेने मराठीत ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथसंपदेत ‘साती ग्रंथ’ म्हणून ओळखल्या जाणार्या सात साहित्यकृतींनी मराठी भाषेला आख्यानकाव्य आणि स्थलवर्णनक्षेत्र माहात्म्य हे नवे आकृतीबंध दिले. हे सात ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानामृताचे इच्छाभोजन’ आहे.
मराठी भाषेच्या प्रारंभिक काळातील वाटचालीत तत्कालीन भक्तिमार्गी पंथ व संप्रदायातील महानुभवांचे-संतकवींचे योगदान अपूर्व आहे. त्यामध्ये नाथ, महानुभाव, वारकरी हे भक्ती संप्रदाय प्रमुख आहेत. या संप्रदायातील संतकवींनी-लेखकांनी मराठी भाषेला संस्कृतपेक्षा प्राधान्य देऊन संस्कृत धर्मग्रंथातील ज्ञानठेवा मराठीमध्ये आणला. महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ चक्रधरस्वामी यांनी तर मराठी भाषेला ‘धर्मभाषेचे’ स्थान दिले आणि महाराष्ट्राला ‘धर्मभूमी’ मानले. ‘मराठी’ व ‘महाराष्ट्रा’चा चक्रधर व अनुयायांनी धरलेला स्वाभिमान आजही आदर्श व अनुकरणीय ठरावा असा आहे. मराठी भाषेच्या उषःकालातील आदिग्रंथ, ‘लीळाचरित्रा’ची भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कामगिरी आपण प्रस्तुत सदरात (लेखांक दुसरा) पाहिलीच आहे. मराठी भाषेला विविध साहित्य प्रकारच्या गद्य व पद्यांनी समृद्ध-संपन्न करणार्या, महानुभवांच्या ‘साती ग्रंथ’ यांचे योगदानही मराठी भाषाभिमान्याला गर्व वाटावे असे आहे. महानुभव पंथामध्ये एकापेक्षा एक विद्वान पंडित होते. त्यांचे संस्कृतवर विलक्षण प्रभुत्व होते; पण त्यांना पंथाची धर्मभाषा म्हणून मराठी सर्वाधिक प्राणप्रिय होती. सर्वज्ञ चक्रधरांच्या आज्ञेनुसार त्या सर्व पंडितांनी मराठीत ग्रंथ लेखन केले. हे ग्रंथ ‘साती ग्रंथ’ (सप्तक) नावाने महानुभव पंथीयांमध्ये व मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत. हे ग्रंथ म्हणजे महानुभवीयांचे ‘प्रज्ञावैभव’ आहे. मराठीतील अक्षरलेणी आहेत. ‘परमार्गी ज्ञानाची पन्हे।’ आहेत.
अभिजात मराठीची ‘अक्षरलेणी’ सदरातील या लेखात आपण या ‘साती ग्रंथा’ची लेखाच्या मर्यादित जागेत ओळख करून घेणार आहोत. हे सात ग्रंथ मराठी साहित्य विश्वातील जणू सप्तर्षीच आहेत. मराठीमध्ये आख्यानकाव्याचा आणि स्थळमहात्म्य हे साहित्य प्रकार या ग्रंथांनी आणले. हे त्यांचे योगदान आहे.
पंडितकवींची प्रज्ञावैभवी सप्तपदी
महानुभाव पंथाचे भक्तिसाहित्य, प्रज्ञावैभव त्यांनी गुप्त सांकेतिक लिप्यांचा स्वीकार केल्यामुळे अनेक शतके अपरिचित अज्ञात होते. एकोणिसाव्या शतकात तो अमृतठेवा प्रथमच प्रकाशात आला व महानुभवीय पंडितांच्या विविधांगी साहित्यकृतीने सारेच थक्क झाले. ‘लीळाचरित्र’, ‘महदंबेचे धवळे’, ‘पुजावसर’ या व अशा अन्य काही ग्रंथांखेरीज महानुभाव साहित्यामध्ये पुढील सात ग्रंथांचा एकत्रित उल्लेख ‘साती ग्रंथ’ अशा नावाने प्रसिद्ध आहे. ते ‘साती ग्रंथ’ पुढीलप्रमाणे -
1) शिशुपालवध (शके 1195) कवी भास्कर बोरीकर
2) एकादशस्कंध (शके 1196) कवी भास्कर बोरीकर
3) वच्छहरण (शके 1200) दामोदर पंडित
4) रुक्मिणी स्वयंवर (शके 1210) पं.नरेंद्र
5) ज्ञानप्रबोध (शके 1253) विश्वनाथ बाळापूरकर
6) सह्याद्रीवर्णन (शके 1254) खळो व्यास
7) ऋद्धिपूरवर्णन (शके 1285) नारो व्यास (पं.नारायण बहाळे)
या सात ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पद्य ग्रंथ असून ओवी या छंदामध्ये लिहिले आहेत. त्यामध्ये त्या काळातील मराठी भाषेचे रूप, त्याकाळचे शब्द आणि ओवी लेखनातील कौशल्य याचे दर्शन घडते. या सात ग्रंथांबद्दल मराठी विश्वकोशात आपण सविस्तर वाचावे. हे सारे ग्रंथ इ.स.1273 ते 1363 या शंभर सव्वाशे वर्षांत लिहिले गेले.
हे सात ग्रंथ प्राचीन मराठीतील विविध साहित्य प्रकारचे दर्शन घडवणारी विलोभनीय अक्षरलेणी आहेत. या सात ग्रंथांनी मराठीला नवे रचना, नवे आकृतीबंध दिलेले आहेत. या सात पैकी ‘शिशुपाल वध’, ‘रुक्मिणीस्वयंवर’ आणि ‘वच्छाहरण’ हे तीन ग्रंथ म्हणजे आख्यानकाव्ये आहेत. ‘उद्धवगीता’ व ‘ज्ञानप्रबोध’ हे तत्त्वज्ञानात्मक भाष्यग्रंथ आहेत आणि ‘सह्याद्रिवर्णन’, ‘ऋद्धिपूरवर्णन’ ही दोन क्षेत्रवर्णने स्थल माहात्म्ये, चरित्रे आहेत. थोडक्यात या सात ग्रंथांनी मराठी भाषेत ‘आख्यानकाव्य’ आणि ‘स्थलमाहात्म्य’ क्षेत्रवर्णन (पर्यटन) हे साहित्यप्रकार प्रदान केले आहेत. म्हणून या ग्रंथ सप्तर्षींचे मराठी वाङ्मय इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. या ग्रंथ सप्तपदीने मराठी भाषेला संपन्नता व वैविध्य प्रदान केलेले आहे.
अशा या मराठी प्रज्ञावैभव असलेल्या अनोख्या, वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथांची अगदी थोडक्यात माहिती करून घेऊया.
पंडित नरेंद्रचे ‘रुक्मिणी स्वयंवर’
रुक्मिणी हरण तथा रुक्मिणी स्वयंवर हे श्रीमद्भागवतातील पौराणिक कथानक पंडित कवी नरेंद्र याने ओवीबद्ध केले आणि मराठीत आख्यानकाव्य प्रकारची सुरुवात केली. त्यानंतर मराठी कवींना ‘रुक्मिणी स्वयंवर’ कथेची मोहिनी पडली. संत एकनाथांसह अनेकांनी यावर काव्यग्रंथ लिहिलेले आहेत. पं.नरेंद्रची भाषा अत्यंत मधुर, लाघवी व संस्कृत प्रचुर आहे. प्रेम, भक्ती, उत्कंठा, विरह-मिलन अशा विविधरंगी प्रसंगाची वेधक उधळण करीत नरेंद्रांनी ‘रुक्मिणी स्वयंवर’ आख्यानकाव्य अजरामर करून टाकले आहे. यामध्ये भक्ती, वीर या रसाएवढेच नरेंद्रने शृंगार रसाला स्थान दिलेले आहे. एका अर्थाने हे मराठी भाषेतील पहिले शृंगार काव्य आहे. ही एक सुंदर ओवी पहा -
डावा हात उसिसा घातला।
उजवा हृदयावर ठेविला।
जैसा जीवसी देवो धरिला।
निसटैल म्हणौनि॥
रुक्मिणीने उजवा हात हृदयावर का ठेवला तर कृष्ण हृदयातून निसटून जाऊ नये. या आख्यानकाव्याच्या विविध प्रती मिळतात. काहीत 878 तर काहीत 2936 ओव्या आहेत. हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो.
भास्करभट्टाचे ‘शिशुपालवध’
ही सुद्धा श्रीकृष्णजीवन लीलेमधील एक पौराणिक कथा आहे. भास्कर भट्ट बोरीकर यांनी हे आख्यानकाव्य 1087 ओव्यांतून कथन केलेले आहे. यामध्ये वीर रसाप्रमाणेच शृंगार रसाला कवीने स्थान दिलेले आहे. कृष्णाचे सौंदर्य, धैर्य, संयम, राजवैभव, युद्धप्रसंग आणि विविध व्यक्तिचित्रणे यांनी ही काव्यरचना संपन्न आहे. या एकाच आख्यानकाव्याने भास्करभट्टचे नाव प्रतिभासंपन्न कवीमंडळात प्रसिद्ध आहे; परंतु हा ग्रंथ पाहून महानुभव आचार्य म्हणाले - ”ग्रंथु निका जाला, पण प्रवृत्ताजोगा झाला, निवृत्तीजागा नव्हे जी भटो। परमार्थामध्ये निवृत्ती, वैराग्य हे महत्त्वाचे.” आचार्यांचा हा अभिप्राय ऐकून पुढे निवृत्तीवर भर देणारे आणखी दोन ग्रंथ भास्करभट्ट याने लिहिले. त्यापैकी एक ‘उद्धवगीता’ आहे.
एकादशस्कंध तथा उद्धव गीता
हा ग्रंथ श्रीमद्भागवताच्या एकादशस्कंधावरील भाष्य आहे. यामध्ये सुमारे 827 ओव्या आहेत. श्रीकृष्णाने उद्धवास केलेला उपदेशावर या ग्रंथाचा मुख्य भर असल्याने या ग्रंथास ‘उद्धव गीता’ नावाने ओळखले जाते.
या आईकता उद्धवगीता ः
प्रबोधु उपजे श्रोतियाच्या चित्ताः
परब्रह्मेसी होय सायुज्यता ः
म्हणे कवी भास्कर ः
या कवी भास्करभट्टच्या ओवीवरून एकूण ग्रंथाचे तत्त्वचिंतनपर रूप स्पष्ट होते. ‘आपण ज्ञानामृताचे इच्छाभोजन घालण्यासाठी हा ग्रंथ लिहिलेला आहे’ असे म्हणतो. यामध्ये जीव जगत परमेश्वर यांचा महानुभवी दृष्टीनुसार ‘द्वैती’ विचार केलेला आहे. हा ग्रंथ संस्कृत श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधावरील मराठीतील पहिली टीका-भाष्य आहे. पुढे पैठणच्या संत एकनाथांनी एकादश स्कंधावर मराठी भाष्य ग्रंथ लिहिला, तो ‘नाथ भागवत’ म्हणून वारकर्यांमध्ये लोकप्रिय आहे.
वच्छाहरण तथा वत्सहरण
पंडित दामोदर याने हे आख्यानकाव्य लिहिले आहे. हे काव्यसुद्धा श्रीमद्भागवतातील कृष्णलीलेवर आधारित आहे. हे दामोदर पंडित थोर गायनाचार्य होते. ते भगवद्भक्ती लीन होते. भागवतामध्ये दशम स्कंधात अध्याय 12/13 आणि 14मध्ये वत्सहरण ही कृष्णलीला आहे. वत्स म्हणजे गाईचे वासरू. त्याच्या हरणाची ही रंजक व बोधप्रद कथा आहे. दामोदर पंडिताच्या या काव्य ग्रंथाचा प्रकार ‘प्रबंधकाव्य’ असा आहे. या काव्यात शृंगाराचा लवलेश नाही. येथे काव्यानंदा पेक्षा ब्रह्मानंदाला कवी प्राधान्य देतो.
ज्ञानप्रबोध : भक्ती-ज्ञानाची पत्रिका
हा ग्रंथ पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांनी लिहिला आहे. हे खरे तर गीता टीका-भाष्यच आहे; पण संपूर्ण भगवद्गीतेऐवजी गीतेतील तेराव्या अध्यायातील काही निवडक श्लोकांवरील हे महानुभवी भाष्य आहे. हा पूर्णतः तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ आहे. या ग्रंथाचे वर्णन ‘भक्तीची पत्रिका’, ‘ज्ञानप्रबोधाचा आरसा’ हे सार्थ आहे. सुमारे 1200 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. तो मुख्यतः मोक्षमार्गी विचार आहे. ‘ज्ञान हा मोक्ष मंदिराचा पाया। वैराग्य त्यावरील प्रासाद। भक्ती हा कळस।’ हा या ग्रंथाचा एकूण निष्कर्ष आहे.
सैह्याद्रिवर्णन : स्थलवर्णन
हा ग्रंथ पं.खळो व्यास यांनी लिहिला असून मराठी साहित्यातील पहिले स्थळ-क्षेत्र माहात्म्य आहे. हा ग्रंथ सुमारे 517 ओव्यांचा आहे. सैह्याद्रि वर्णनात मुख्यतः आजचा माहुरगड म्हणजेच मातापूर परिसराचे वर्णन आहे. तसेच त्यामध्ये भगवान दत्तगुरूंचे चरित्र सुमारे 181 ओव्यांतून गायलेले आहे आणि महानुभव पंथ संस्थापक सर्वज्ञ चक्रधर यांच्या अवतारकार्याचे गुणवर्णन आहे.
जीवाची जननी दत्तमाताः तीएचा हेतू क्रीडा करिता।
निक्षेपला जेथ तत्त्वताः ते मातापूर बोलिजे।
या एका ओवीवरून ग्रंथाची कल्पना येते. हा ग्रंथ व्यास खळोबा यांनी इ.स. 1333मध्ये लिहिला आहे. चक्रधर व दत्तगुरू यांचा तो कृपांकित आहे. ‘तुमचेनि प्रसादे पवित्र। बोलैन श्रीदत्ताची चरित्रे।’ हे त्याचे वचन मराठीचे त्या काळातील शब्ददर्शन आहे.
श्रीऋद्धिपूर वर्णन क्षेत्र महिमा
हा ग्रंथसुद्धा स्थलपुराण-क्षेत्रमाहात्म्य प्रकारातील आहे. नारायण बाहाळिये तथा पंडित नारायण व्यास हे या ग्रंथाचे कर्ते आहेत. हा ग्रंथ 641 ओव्यांचा आहे. ‘ऋद्धिपूर’ हे महानुभव पंथीय श्रद्धावंतांची काशी आहे. ही श्री गोविंदप्रभू यांच्या अवतार कार्याची कर्मस्थली आहे. या ग्रंथात ऋद्धिपूरचे स्थल वर्णन आणि गोविंदप्रभूंचे दिव्य चरित्र यांचा अपूर्व संगम आहे.
की प्रासादु मेरू ः वरि कळसु पूर्णचंद्रु ः
तै सादरी देवेंदु ः क्रिडा करी ः
व्यास नारायण पंडित हे नामवंत ज्योतिषी होते. त्यांनी गोविंदप्रभूंकडून दीक्षा घेऊन आपले जीवन भक्तिपंथाला समर्पित केले. त्याचा हा ग्रंथ गुरू गोविंदप्रभूंची सेवा म्हणून नारायण व्यास याने हा ग्रंथ लिहिलेला आहे.
महानुभाव पंथीय हे ‘साती ग्रंथ’ श्रीकृष्ण, चक्रधर, गोविंदप्रभू यांच्याशी संबंधित आहे. श्रीकृष्ण ही महानुभवीयांची इष्टदेवता आहे. या भक्तिपंथाने ‘पंच कृष्ण’ संकल्पना मांडून त्यांना वंदन केलेले आहे. हे साती ग्रंथ त्या गुरुवंदनेचाच एक अक्षरठेवा आहेत.
या सात ग्रंथांनी मराठी शारदेची सेवा करीत मराठी साहित्य दरबारातील दालने विविध साहित्य प्रकारांनी संपन्न व समृद्ध करण्याचे ऐतिहासिक कार्य केलेले आहे. जिज्ञासूंनी मराठीचा अभिमान बाळगून मराठीच्या उषःकालातील या अक्षरलेण्यांचे साद्यंत दर्शन घ्यावे. मराठीतील त्या काळातील भाषा समजून घ्यावी.
(लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व उपासक तसेच ’साईलीला’ आणि ’एकता’ या मासिकाचे माजी संपादक आहेत.)