@ रवि वाळेकर
संस्कृती एखाद्या पेटीत भरून दुसर्या देशात नेऊन ठेवलेली वस्तू नसते; ती जिथे पोहोचते तिथल्या मातीचा रंग स्वीकारते आणि नव्या रूपाने जन्म घेते. म्हणून प्रम्बणनला केवळ ‘भारताबाहेरचे हिंदू मंदिर’ म्हणून पाहणे अपुरे ठरेल; ते भारत आणि जावा यांच्या दीर्घ सांस्कृतिक संवादातून निर्माण झालेले स्वतंत्र दगडी विश्व आहे. प्रम्बणनची निर्मिती जावानीज राजांनी केली, त्याची कला जावानीज आहे आणि ते इंडोनेशियाच्या भूमीवर आहे; पण त्याच्या धार्मिक कल्पना, देवता आणि रामायणाच्या कथा भारताशी असलेल्या हजार वर्षांच्या सांस्कृतिक नात्याची साक्ष देतात.
डोनेशियातील प्रम्बणन मंदिर मी पहिल्यांदा बघितले तेव्हा या मंदिराविषयी मला अतिशय जुजबी माहिती होती. एका मुस्लिम देशात टिकलेले (आणि टिकवलेले) शंकराचे मंदिर, एवढीच माहिती माझ्या गाठीशी होती. प्रम्बणन मंदिर असलेल्या ‘जावा’ बेटावर / राज्यात येण्यापूर्वी इंडोनेशियातीलच संपूर्ण हिंदू असलेल्या बाली बेटावर तब्बल बारा दिवस घालवले होते. विष्णू, शिव, गणपती, अगदी सरस्वतीचीही मंदिरे इथे आहेत. दिवसभर त्यांना भेट देणारे हजारो स्थानिक भाविक! पूजा, आरत्या, यात्रा, पालख्या, सगळे काही भारतातल्यासारखेच! चौकाचौकात महाभारत-रामायणातील व्यक्तिरेखांचे भव्य पुतळे दिसत होते. घटोत्कचापासून नकुल-सहदेवांपर्यंत आपण दुर्लक्ष केलेल्या असंख्य व्यक्तिरेखा बालीच्या सार्वजनिक जीवनाचा भाग झालेल्या दिसतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सुमारे 45 लाख लोकसंख्या असलेल्या बाली बेटावर हिंदूंची संख्या जवळपास 80 टक्के आहे!
असे बाली राज्य सोडून मी जावा राज्यात आलो होतो. बालीच्या तुलनेत हे राज्य भलतेच मोठे! जवळपास सोळा कोटी लोकसंख्या असलेल्या जावा राज्यात हिंदूंची संख्या दीड टक्केसुद्धा नाही. त्यामुळे जावाकडे निघताना पुरातन भारतीय संस्कृतीच्या काही खुणा सापडतील, अशी अजिबात अपेक्षा नव्हती. योग्यकर्ता या राजधानीच्या शहराजवळ असलेल्या प्रम्बणन मंदिराबद्दलच्या माझ्या अपेक्षा तर अगदीच माफक होत्या. नवव्या शतकात उभारलेल्या हिंदू मंदिराचे उरलेसुरले भग्नावशेष दिसतील असे वाटत होते. कुठल्यातरी ओसाड माळरानावर किंवा निर्मनुष्य जंगलात दगडांच्या ढिगार्यांमध्ये हे भग्न मंदिर असेल, अशीच मानसिकता होती; पण प्रम्बणनच्या आवाराबाहेर पोहोचलो आणि तिकीटघरांसमोर उसळलेली गर्दी पाहून थक्क झालो! मुळात, हे मंदिर ‘बघण्या’साठी तिकीट लावलेले बघूनच आश्चर्य वाटले होते! आपल्या धर्माचे नसलेले हे मंदिर निव्वळ ‘बघण्या’साठी लोकं हजारोंच्या संख्येने तिकीट विकत घेत आहेत, हा तर मोठाच धक्का होता!
शेकडो स्थानिक पर्यटक तिकीट खिडक्यांबाहेर रांगा लावून उभे होते आणि विशेष म्हणजे सगळेच मुस्लिम होते. स्त्रियांसाठी स्वतंत्र तिकीट खिडक्या होत्या; हिजाब किंवा बुरख्यातील स्त्रियांचीही लक्षणीय गर्दी दिसत होती. हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मंदिरात जाण्यासाठी आजच्या मुस्लिमबहुल समाजातील लोक मोठ्या संख्येने येतच होते. तिकीट दरही कमी नव्हता. स्थानिकांनाही तिकिट काढावे लागत होते, तरीही गर्दी कमी होण्याचे नाव नव्हते. आपल्याकडे आहे तसाच प्रकार - परदेशी पर्यटकांसाठी तिकीट दर अव्वाच्या सव्वा!
तिकीट काढून आत शिरलो आणि अक्षरशः डोळे विस्फारले!
स्वच्छ निळसर रंगाच्या पार्श्वभूमीवर काळसर रंगाची तीन भव्य आखीवरेखीव मंदिरे, त्यांचे आभाळात घुसलेले उत्तुंग कळस, त्या मंदिरांच्या इतस्ततः ठरावीक अंतरावर असलेले काळ्या दगडांचे ढिगारे आणि या सगळ्यातून फिरणारे असंख्य पर्यटक!
त्या भव्य आवाराच्या आत काय बघावे असे झाले होते! ती मुख्य तीन मंदिरे - त्यातले मध्यभागी असलेले मंदिर सर्वात उंच. त्या प्रत्येक मंदिरांच्या समोर कमी उंचीची पण टुमदार मंदिरे. चहुबाजूंनी घरंगळलेली छोटी छोटी मंदिरे, उजवीकडे दूरवर दिसणारे अजून एक भव्य दगडी मंदिर. ते ‘चंडी सेवू’ नावाचे बौद्ध मंदिर होते, हे नंतर गाईडकडून समजले. इथे मंदिरांसाठी ‘चंडी’ हा शब्द योजतात. दूरवरचे ते ‘चंडी सेवू’ आणि प्रम्बणन मंदिर समूहाच्या बरोबर मध्ये तारांचे कुंपण घातलेले एक विस्तीर्ण हिरवेगार मैदान होते, त्यात काही हरणे वा काळवीट स्तब्ध उभे होते. मुख्य मंदिराकडे जाणारा एक सुरेख दगडी बांधणीचा रस्ता, ‘चंडी सेवू’कडे जात असलेली खेळण्यातील वाटावी, अशी छोटी ट्रेन व ट्राम! आवारात फिरणार्या हजारो पर्यटकांपैकी अर्धी तरी गणवेशातील शाळकरी मुले - मुली होती. त्यांचा आरडाओरडा, गोंधळ, त्यांच्या शिक्षकांच्या असहाय्य शिट्ट्या यांचा संयुक्त कोलाहल त्या स्तब्ध उभ्या असलेल्या मंदिरांमध्ये आणि एकूणच गंभीर वातावरणात जिवंतपणा आणत होता!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हा सगळा मंदिर समूह पाहताना काही क्षण आपण इंडोनेशियात आहोत, हेच विसरायला झाले! हे दृश्य इतके अनपेक्षित होते की बराच वेळ मी फक्त उभा राहून तो सगळा स्वच्छ परिसर आणि ते रमणीय दृश्य बघतच राहिलो. तिकीटघराकडून प्रत्यक्ष मंदिराकडे जाताना लक्षात आले की मोठ्या मंदिराभोवती व्यवस्थित रचून ठेवले आहेत असे वाटणारे दगडांचे ढिगारे, प्रत्यक्षात एकेकाळच्या लहान मंदिरांचे भग्नावशेष होते! कुठे फक्त चौकोनी पायथा उरला होता, कुठे घोटीव दगडांचा ढिगारा, तर कुठे एखादा शिल्पांकित दगड एकटाच पडला होता. जवळपास शंभर एकरांमध्ये पसरलेल्या या मंदिरसमूहाची मूळ भव्यता त्या भग्नावशेषांमधूनही जाणवत होती आणि मला दक्षिणेकडचे मंदिर समूह आठवले. काही क्षण तर भुवनेश्वरमधल्या ‘लिंगराज’ मंदिर प्रांगणात आहोत, असेही वाटून गेले. तिथेही एकाच परिसरात मोजदाद करता येत नाहीत अशी अनेक मंदिरे! दगड, स्थापत्यशैली आणि परिसर वेगळे; पण वास्तूमागची धार्मिक कल्पना आणि कलात्मक आत्मविश्वास कुठेतरी ओळखीचा वाटत होता. मनात प्रश्न उभा राहिला - ही ओळख एवढ्या दूर इंडोनेशियात, जावामध्ये आली तरी कशी?
त्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर आपल्याला हजार वर्षांहून अधिक मागे जावे लागते. त्या काळात समुद्र हा भारत आणि आग्नेय आशियामधील अडथळा नव्हता, उलट व्यापार, विचार, श्रद्धा, धर्म, भाषा आणि संस्कृती वाहून नेणारा महामार्ग होता. बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर ओलांडून आजच्या इंडोनेशियाचा भाग असलेल्या तेव्हाच्या जावा, सुमात्रा, बाली आणि इतर बेटांवर भारतीय व्यापारी, नाविक, पुरोहित, विद्वान आणि कारागीर ये-जा करीत होते. जहाजांमध्ये विक्रीसाठी नेलेल्या वस्तूंबरोबर भारतीय कथा, देवतांच्या कल्पना, संस्कृत भाषा आणि स्थापत्याच्या संकल्पना जात होत्या. भारतीय संस्कृती या भूमीत तलवारीच्या जोरावर नव्हे, तर समुद्रमार्गे झालेल्या संपर्कातून आणि स्थानिक समाजाच्या स्वीकारातून पोहोचली. तेव्हाच्या जावा आणि इतर बेटांवर (इंडोनेशिया देश 17,000 बेटांचा मिळून बनलाय!) भारतीय संकल्पना स्थानिक परंपरांमध्ये मिसळल्या आणि त्यातून स्वतंत्र सांस्कृतिक अभिव्यक्ती जन्माला आली. हेच कारण आहे की आजही इंडोनेशियातील जावा, बाली, सुमात्राच्या लोकजीवनात नृत्य, संगीत, कठपुतली आणि लोककला तसेच लोककथांमध्ये रामायण - महाभारत जिवंत आहे!
याच सांस्कृतिक पार्श्वभूमीवर नवव्या शतकात प्रम्बणनचा जन्म झाला. इ.स. 856 च्या सुमारास संजय या हिंदू वंशातील राजा रकाई पिकातन याने या महत्त्वाकांक्षी मंदिरसमूहाच्या उभारणीला सुरुवात केली आणि पुढील मातरम साम्राज्यातील राजांनी तो पुढे नेला. याच परिसरात असलेल्या बौद्ध ‘चंडी सेवू’च्या मंदिरसमूहापासून ‘बोरोबुदूर’ या जगातील सर्वात मोठ्या बौद्ध मंदिरापर्यंतचा हा प्रदेश त्या काळात हिंदू आणि बौद्ध परंपरांच्या विलक्षण सहअस्तित्वाचा साक्षीदार होता. ‘प्रम्बणन’ हे केवळ एक हिंदू मंदिर नव्हते; ते त्या काळच्या जावानीज राजसत्तेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य सामर्थ्य दगडात व्यक्त करणारे एक सशक्त प्रतीक होते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आवाराच्या मध्यभागी त्रिमूर्तीची तीन मुख्य मंदिरे - शिव, विष्णू आणि ब्रह्मा - आणि त्यांच्या समोर अनुक्रमे नंदी, गरुड आणि हंस यांची स्वतंत्र मंदिरे. त्याभोवती इतर देवालये आणि त्यापलीकडे चार केंद्रित चौकोनी रांगांमध्ये उभारलेली 224 छोटी मंदिरे. आतल्या रांगेत 44, त्यापुढे 52, नंतर 60 आणि सर्वांत बाहेर 68 मंदिरे!
ही सर्व रचना पाहताना त्या काळच्या वास्तुशास्त्रज्ञांनी एखाद्या विशाल भूमितीय संकल्पनेला दगडात उतरवले असावे, असे वाटते. 800 मीटर दूरच्या ‘चंडी सेवू ‘ मंदिराशेजारीही जवळपास 240 छोटी मंदिरे आहेत! या सर्वांव्यतिरिक्त याच परिसरात चंडी लूंबुंग आणि चंडी बुब्राह् अशी आणखी दोन मंदिरे आहेत. त्यातील लूंबुंग मंदिराभोवतीही 16 लहान मंदिरे आहेत. आज बहुतांश सगळीच लहान मंदिरे भग्नावस्थेत आहेत आणि कोणत्या मंदिरात कोणत्या देवतेची मूर्ती होती, याचा कुठलाच ठावठिकाणा लागत नाही. परंतु या भग्नतेतही रचनेची शिस्त जाणवते. एकाच परिसरात, जवळपास पाचशेच्या वर शेकडो मंदिरे का उभारली गेली, त्यामागची नेमकी धार्मिक किंवा राजकीय कल्पना काय होती, याबद्दल आजही प्रश्न अनुत्तरित आहेत. असा प्रकार इजिप्तमध्ये ‘कार्नाक’ या आणि कंबोडियातील ‘बेयॉन’ या मंदिरांमध्ये आढळतो, पण तिथे ती विशिष्ट जागा ‘पवित्र भूमी’ असा समज असल्याने कित्येक पिढ्यांनी वेगवेगळ्या कालखंडात एकाच परिसरात/ आवारात शेकड्यांनी मंदिरे बांधली. ‘प्रम्बणन’च्या बाबतीत तसे नाही. इथे जवळपास एकाच कालखंडात - एकाच परिसरात - ही सर्व मंदिरे बांधली गेलीत. विशेष म्हणजे ‘मेलापी’ हा जिवंत ज्वालामुखी अगदी जवळ असताना आणि हा सगळा परिसर पुरातन काळापासून ‘भूकंपप्रवण’ क्षेत्र असल्याचे सिद्ध झालेले असताना!
तरीही इथे - याच जागेवर - खेटून खेटून पाचशेच्या वर मंदिरे बांधण्याचा अट्टाहास का?
असे का? त्याचे उत्तर नाही!
‘ही सगळी मंदिरे भुतांनी बांधली आहेत!’ माझ्या वयस्कर गाईडने माझी तंद्री भंग केली.
मी चमकून त्याच्याकडे बघितले. सत्तरीतले ते गृहस्थ अतिशय गंभीरपणे मला सांगत होते! तिकीट काढून मी बाहेर पडलो, तेव्हापासून हा गृहस्थ माझ्या मागेच लागला होता! त्याच्या वयाचा विचार करून आणि मुख्यतः त्याने सांगितलेल्या नगण्य शुल्कामुळे मी यांना ‘गाईड’ म्हणून ठरवले होते. या मंदिरांविषयी असलेले माझे (तेव्हाचे) अज्ञान, हा सुद्धा एक मुद्दा होताच! पण त्याच्या या बाष्कळ बोलण्यामुळे याला बरोबर घेऊन फिरण्यात आपण चूकच करतोय, असे वाटू लागले; पण आता पर्याय नव्हता!
मी मुख्य मंदिराकडे चालू लागलो. जाताना छोट्या मंदिरांचे ढासळलेले दगड दिसत होते. या परिसरात चौकोनी, आयताकृती असे असंख्य दगड पडलेले असतील! प्रत्येक दोन छोट्या मंदिरांमधील अंतर सुमारे पंधरा ते वीस फूट. भूकंपामुळे ढासळले, तेव्हा कित्येक दगड पलीकडील मंदिरांच्या आवारात जाऊन पडले असतील! पुन्हा रचायचे म्हटले तरी कोणता दगड कुठल्या जागेवर लावायचा, तो कोणत्या मंदिराचा, हे कसे ओळखायचे?
अगोदर शिवमंदिर, नंतर विष्णू आणि शेवटी ब्रह्मा असा क्रम मी ठरवला. रितीप्रमाणे महादेवाआधी नंदीचे दर्शन घ्यायला गेलो. 15 चौरस फुटांच्या गाभार्यात नंदीमहाराज सुखेनैव विसावले होते. अंगावर काही बालगोपाळ खेळत होते. पाठीवर आजवर करोडो लोकांनी हात फिरवला असेल, त्यामुळे पाठ काळीभोर आणि गुळगुळीत झाली होती! नंदीचे दर्शन घेऊन मी त्याच्या मंदिरातून खाली उतरलो. समोर मुख्य शिवमंदिर होते. या परिसराचा अनभिषिक्त सम्राट, ‘जावा’ राज्य सरकारच्या अधिकृत राजपत्रकानुसार ‘जावा राज्याची शान’! सरकारी आकडेवारीनुसार जावा बेटावरील सर्वात जास्त प्रवासी येत असलेले ‘पुरातन सांस्कृतिक केंद्र’!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मंदिराच्या उंचीचा दुरून एवढा अंदाज आला नव्हता, पण जिथे उभा होतो तेथून या मंदिराची भव्यता अंगावर येत होती!
भारतीय मंदिरांच्या तुलनेत या आवारातील मंदिराचे कळस थोडे निमुळते वाटतात. शिवमंदिराच्या शिखराची उंची पायथ्यापासून 47 मीटर आहे! थोडक्यात 16 मजली इमारतीएवढे उंच. आजकाल एवढ्या उंच इमारतीचे आपल्याला काही विशेष वाटत नाही, पण हे बांधकाम जवळपास 1200 वर्षांपूर्वी लोखंड, सिमेंट वा काँक्रीट न वापरता केले आहे, हे लक्षात घेतल्यावर या स्थापत्यामागचे प्रगल्भ ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’ कळते!
‘प्रम्बणन’चीच नाही, या संपूर्ण ‘प्रम्बणन’ मंदिर समूहाची एकत्रित रचना अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे. मध्यभागी त्रिमूर्तीची तीन प्रमुख मंदिरे, त्यांच्या समोर त्यांच्या वाहनांची मंदिरे, आणि भोवताली इतर देवालये. ही केवळ वास्तुरचना नाही; ही विश्वरचनेची दगडी मांडणी आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील सृष्टी, पालन आणि संहार या तीन शक्ती येथे अक्षरशः दगडांत उतरल्या आहेत.
महादेवाच्या गर्भगृहात प्रवेश करताच वातावरण एकदम बदलून गेले. बाहेरचा प्रकाश, गोंगाट, पर्यटकांचा आरडाओरडा (काही अंशी कुजबूज) मागे राहिली आणि समोर उभी राहिली चार हात असलेली भगवान शंकराची उंच विशाल मूर्ती. त्या मूर्तीच्या चेहर्यावर एकाच वेळी प्रसन्नता आणि गंभीरता होती. विश्वाचा संहार करणारा देव इतका शांत दिसू शकतो, हे भारतीय तत्त्वज्ञानाचे खास वैशिष्ट्य! आपल्या परंपरेत संहार म्हणजे शेवट नसतो; ती असते नव्या सृजनाची सुरुवात!
शिवाच्या गाभार्यात विशेष गर्दी नव्हती. हे मंदिर शिवाचे मंदिर म्हणून ओळखले जात असले तरी इथे फक्त शंकराचाच एकमेव गाभारा नाही. या मंदिरात - याच मजल्यावर - चार दिशांना चार गाभारे आहेत! शंकराचा गाभारा (अर्थातच) पूर्वेला आहे. इथून बाहेर पडल्यानंतर डावीकडे, दक्षिणेला असलेल्या गाभार्यात अगस्त्य ऋषींची मूर्ती आहे. हे कोण आहेत, याची इथल्या 99.99 टक्के स्थानिक पर्यटकांना कल्पनाच नव्हती, त्यामुळे शंकराच्या गाभार्यात तुरळक तरी गर्दी होती, इथे तर लोक दरवाज्यातून फक्त डोकावूनच पुढे जात होते!
थोडे जाडजूड दाखवलेल्या एका दाढीधारी अनोळखी ऋषींचे दर्शन टाळण्याकडेच सगळ्या पर्यटकांचा कल होता!
पश्चिमेकडे असलेल्या गाभार्यात मात्र गर्दी होती. जास्त शाळकरी मुलामुलींची. गाभार्यात गणपतीची प्रसन्न मूर्ती होती! सोंड पाईप लावल्यासारखी एकाच व्यासाची - जरा जाड होती, पण ते तितकेच. आपल्याला लहानपणापासून गणपतीविषयी माहिती असल्याने, हत्तीचे तोंड असलेल्या मानवी आकृतीचे विशेष वाटत नाही, पण त्या मूर्तीकडे डोळे विस्फारून पाहणार्या इथल्या मुलांच्या डोळ्यातील आश्चर्य लपत नव्हते!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उत्तरेला असलेल्या चौथ्या गाभार्यात मात्र प्रचंड गर्दी उसळलेली! इथेही बालचमूच जास्त, पण मुलींची गर्दी जरा जास्तच होती. आत महिषासुरमर्दिनीची मूर्ती होती! मूर्तीखाली एका फलकावर ‘ऊणठॠअ’, असे स्पष्ट लिहिलेले होते. होतेच ते दुर्गेचे रूप! अष्टभुजा असलेली दुर्गा महिषासुरावर उभी आहे, अशी ती सुरेख कोरीव काम असलेली अतिशय सुबक मूर्ती आहे. मुली भाबड्या नजरेने त्या मूर्तीकडे बघत, एकमेकींशी कानात काहीतरी बोलत आणि तोंडाने चूक चूक असा आवाज काढत! मला इथली भाषा समजत नव्हती, पण भावना समजत होत्या. बव्हंशी ते बोलणे, ‘काय गं बाई, बिचारी!’ अशा थाटाचे होते. प्रत्यक्ष शिवाची शक्ती असलेल्या दुर्गेमध्ये यांना इतका रस का आणि एवढी पराक्रमी महिषासुरमर्दिनी त्यांना गरीब बिचारी का वाटत होती, हे समजत नव्हते.
शंकर, गणेश, अगस्त्य आणि दुर्गेची मूर्ती पाहताना आणखी एक गोष्ट जाणवली. भारतातून येथे आलेल्या कल्पना स्थानिक संस्कृतीने केवळ स्वीकारल्या नाहीत, त्यांना आपलेसे केले.
चारही गाभारे वरच्या मजल्यावर आहेत. खाली उतरल्यावर पहिल्या मजल्यावर मंदिराला वळसा घातलेली भित्तीशिल्पांची रांग होती. एकापुढे एक अशी रामायणाची कथा सांगणारी शिल्पे दिसतात - राम, सीता, लक्ष्मण, दशरथ, सुग्रीव, हनुमान आणि लंकेशी संबंधित प्रसंग. अयोध्येपासून वनवासापर्यंत, सीतेच्या अपहरणापासून हनुमानाच्या पराक्रमापर्यंत आणि पुढे लंकेच्या युद्धापर्यंत कथा दगडांवर पुढे सरकते.
आपल्याला रामायण परिचित असल्यामुळे प्रत्येक शिल्प ओळखीचे वाटते; पण बारकाईने पाहिले की या परिचयामध्ये ‘जावानीज’पणाची सुंदर स्थानिक छटा दिसते. चेहर्यांची ठेवण, वेशभूषा, दागिने, देहबोली आणि शिल्पांची मांडणी स्थानिक कलाशैलीतून आलेली आहे. कथा भारताची आहे, पण तिचे ‘दिसणे’ जावाचे आहे. संस्कृती एखाद्या पेटीत भरून दुसर्या देशात नेऊन ठेवलेली वस्तू नसते; ती जिथे पोहोचते तिथल्या मातीचा रंग स्वीकारते आणि नव्या रूपाने जन्म घेते. म्हणून प्रम्बणनला केवळ ‘भारताबाहेरचे हिंदू मंदिर’ म्हणून पाहणे अपुरे ठरेल; ते भारत आणि जावा यांच्या दीर्घ सांस्कृतिक संवादातून निर्माण झालेले स्वतंत्र दगडी विश्व आहे.
या रामायणाची गंमत अशी की इंडोनेशियात, ’प्रम्बणन’मध्ये तर दररोज सायंकाळी दगडांवर कोरलेली कथा रंगमंचावर उतरते. ते याला ‘रामलीला’ म्हणत नाहीत, पण लहेजा तोच! ते म्हणतात ‘रामायणा बॅले, प्रम्बणन’! जवळपास 200 कलाकार यात काम करतात. त्यातले 99 टक्के स्थानिक मुस्लिम!
मागे हजार वर्षांची पुरातन शिखरे आणि समोर जावानीज कलाकारांच्या देहबोलीतून साकार होणारी रामकथा! हा अनुभव पाहताना जाणवते की कथा जिवंत ठेवण्यासाठी तिचे मूळ रूप जपणे नव्हे, तर तिच्याशी नाते जपणे आवश्यक असते. स्थानिक संगीत आणि जावानीज देहबोलीतून व्यक्त होणारी ही भारतीय कथा रामायणातील कर्तव्य, निष्ठा, त्याग, मैत्री आणि धर्माची मूल्ये जिवंत ठेवते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रामायणातील एक एक प्रसंग बघत मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण होते! पायर्या उतरून खाली आलो, मला आता विष्णुमंदिराकडे जायचे होते. फक्त 33 मीटर उंच असलेले विष्णू आणि ब्रह्मदेवाची मंदिरे शिवमंदिराच्या तुलनेत लहान वाटतात.
आम्ही तिकडे वळणार, तेवढ्यात हिजाब बांधलेल्या आणि शाळेच्या गणवेशात असलेल्या दहा-बारा वर्षांच्या काही मुलींनी माझ्या गाईडला हटकले.
‘आपाकहं इनी चंडी रोरो जाँग्रँग?’
त्याने हो सांगताच, चिवचिवाट करत त्या हिजाबधारी मुली शिवमंदिराच्या पायर्या चढू लागल्या. मी त्या चिमण्यांचा फोटो काढला. मला आश्चर्य वाटले. मी विचारताच त्या गाईडने सांगितले की त्या मुली ‘रोरो जाँग्रँग’चे मंदिर हेच का असे विचारात होत्या. त्याने हो सांगताच त्या उत्साहाने मंदिराकडे धावल्या!
‘रोरो जाँग्रँग?’ मी आश्चर्यचकित झालो, पण मंदिराला ‘चंडी’ म्हणणार्या इथल्या भाषेत विश्वाला भस्म करणार्या कोपिष्ट शंकराला ‘रोरो’ म्हणून ओळखणे सुद्धा शक्य होते!
‘आपण वरती बघितली ना ती मूर्ती? उत्तर दिशेच्या गाभार्यात?’ त्याने मला प्रतिप्रश्न केला. त्याच्या मते जी मूर्ती आपण हिंदू दुर्गा म्हणून ओळखतो, ती मूर्ती इंडोनेशियातील एकेकाळच्या राजकन्या ‘रोरो जाँग्रँग’ची होती!
एका जावानीज लोककथेनुसार शिवमंदिरातील दुर्गेची मूर्ती म्हणजे दगडात रूपांतर झालेली इथली राजकन्या रोरो जाँग्रँगच आहे, असे मानले जाते. दुर्गादेवीची मूर्ती येथे राजकन्या ‘रोरो जाँग्रँग’ म्हणून लोककथांचा भाग बनली आहे!
दुर्गेच्या प्रतिमेशी जोडलेली रोरो जाँग्रँगची कथा जावामधील घराघरात मुलांना आजही सांगितली जाते. पिढ्यान्पिढ्या सांगितली गेलेली ही लोककथा एखाद्या वास्तूभोवती लोकस्मृती कशी तयार होते, हे दाखवते. एखादी संस्कृती दुसर्या भूमीत रुजली आहे की नाही हे मंदिरांपेक्षाही अशा लोककथांवरून जास्त ठसते.
या लोककथेची नायिका राजकन्या रोरो जाँग्रँग ही बाका राज्याचा धार्मिक राजा प्रभू बाका यांची सुंदर कन्या होती. शेजारच्या राज्याचा तरूण, दांडगा आणि देखणा राजपुत्र प्रभू बाकाच्या राज्यावर आक्रमण करून राजाचा फक्त पराभवच नाही, तर वध करतो. पराक्रमी आणि अलौकिक शक्ती असलेला बोंडोवसा राजमहालात शिरतो आणि रोरोच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिच्याशी विवाहाची इच्छा व्यक्त करतो. वडिलांचा वध करणार्या पुरुषाशी विवाह करणे, राजकन्येला मान्य नसते; पण सरळ नकार दिल्यास परिस्थिती कठीण होईल, हे तिच्या लक्षात येते.
चतुर रोरो जाँग्रँग बोंडोवोसोला लग्नासाठी होकार देण्यासाठी एक अट घालते - त्याने एका रात्रीत एक हजार मंदिरे उभारली तर ती लग्नाला होकार देईल! एका रात्रीत हजार मंदिरे बांधणे अशक्य आहे, असे तिला वाटत असते.
अट पुरी करणे जरी अशक्य वाटत असले तरी, राजपुत्र बांडुंग बोंडोवोसो ती अट स्वीकारतो!
बोंडोवोसो आपल्या अलौकिक शक्तींनी चक्क भुतांना मदतीला बोलावतो! त्यांना तहान-भूक लागत नाही, थकवा नाही; भीती फक्त प्रकाशाची. रात्रीच्या अंधारात एक हजार मंदिरे उभारण्याचे काम वेगाने सुरू होते. मध्यरात्र उलटल्यावर शेकड्यांनी मंदिरे पूर्ण झालेली असल्याचे कळल्याने राजकन्या चिंताक्रांत होते.
बोंडोवोसोने खरोखरच 1000 मंदिरे रात्रीतून उभारली, तर तिला त्याच्याशी लग्न करणे भाग पडले असते! ती एक युक्ती करते. आपल्या दासींना ती पूर्व दिशेला दूरवर गवताच्या पेंढ्यांना आग लावायला आणि तांदूळ कांडण्याचा आवाज सुरू करायला सांगते. पहाट झाल्याचा भास निर्माण होतो! कोंबडे आरवतात, सकाळच्या हालचाली सुरू झाल्यासारखे वाटते आणि सकाळ होत आहे असे समजून मंदिर बांधायचे काम आहे तसेच सोडून भुते घाबरून पळ काढतात! 1000 मंदिरे बांधण्याचे काम अपूर्ण राहते!
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बांडुंग बोंडोवोसो संतापतो, राजकन्या रोरो जाँग्रँगला शाप देतो आणि तिला शिळेत रूपांतरित करतो. तीच शिवमंदिरातील दुर्गेची मूर्ती, अशी लोकमान्यता आहे! नुसती मान्यता नाही, इथल्या लहान मुलींच्या भावविश्वात ठाम विश्वास आहे!
हे लोककथा ऐकून प्रथम मला हसू आले, पण ती दुर्गेची मूर्ती बघून वाईट वाटत असलेल्या मुलींचे
दुःखी चेहरे आठवले आणि वाटले की उलट आपण हा निरागसपणा जपला पाहिजे! इथल्या सरकारने सुद्धा या निरागसतेचा सन्मान केला आहे, आणि चक्क रोरो जाँग्रँग आणि राजपुत्र बोंडोवसाचे टपाल तिकीट काढले आहे!
जावा बेटावर ज्वालामुखी हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे आणि मेरापी ज्वालामुखी मंदिरापासून फक्त काही दशक किलोमीटरवर आहे. दहाव्या शतकाच्या सुमारास राजसत्ता मध्य जावातून पूर्व जावाकडे सरकली आणि काही काळातच ज्वालामुखीच्या उद्रेकांनी सभोवतालचा परिसर राखेने झाकला. ‘प्रम्बणन’ मंदिरसमूह त्या विधानातून वाचणे शक्यच नव्हते, हळूहळू ही सगळी मंदिरे राखेच्या ढिगार्यांखाली आणि जंगलात गडप झाली. या नंतर झालेल्या अनेक भूकंपांनी या मंदिरांना पुन्हा पुन्हा तडाखे दिले आणि सोळाव्या शतकातील मोठ्या भूकंपानंतर या परिसरातील सगळीच मंदिरे कोसळली.
एव्हाना इंडोनेशियातील हिंदू, बौद्ध राजसत्ता लयाला गेल्या होत्या. सतराव्या शतकातील ‘पर’धर्मीयांना इथल्या पुरातन धर्माच्या देवस्थानांविषयी अजिबात आस्था नव्हती. कशी असणार? आणि का असावी? जवळपासच्या लोकांनी इथले ‘घडवलेले’ कोरीव काम केलेले दगड उचलून न्यायला सुरूवात केली! काहींनी घरे बांधण्यासाठी वापरली, काहींनी विहिरींच्या भिंतींसाठी! इथल्या तत्कालीन सुलतानाने तर इथले दगड चक्क ‘योग्यकर्ता’ शहराच्या तटबंदीसाठी वापरले! इथल्या ‘अनोळखी’ देवतांच्या मूर्तींची तस्करी झाली. उचलता येऊ शकत होती, अशी प्रत्येक मूर्ती उचलली गेली! यात हंस, गरूड यांच्याही मूर्ती होत्या ज्या आजवर सापडलेल्या नाहीत.
‘प्रम्बणन’ मंदिर समूह हळूहळू विस्मृतीत जाऊ लागला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला (थोड्याशा अनिच्छेने) डच राजवटीत ‘प्रम्बणन’ परिसराचे पुनरुज्जीवन सुरू झाले; 1945 ला इंडोनेशियाला डचांपासून स्वातंत्र्य मिळाले, आणि नव्या ‘स्वदेशी’ सरकारने आपल्या पुरातन संस्कृतीच्या पुनरूत्थानाच्या या कामाला वेग दिला. मुख्य शिवमंदिराच्या पुनर्बांधणीचे काम 1950च्या दशकाच्या सुरुवातीला - 1952च्या सुमारास - पूर्ण झाले. एका मुस्लिमबहुल राष्ट्राने आपल्या प्राचीन हिंदू वारशाच्या पुनरुज्जीवनाला दिलेले हे महत्त्व मला विशेष अर्थपूर्ण वाटले.
1991मध्ये युनेस्कोने प्रम्बणनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. जवळच चंडी सेवूची बौद्ध मंदिरे आणि दुसर्या भागातील बोरोबुदूरसारखे विशाल बौद्ध मंदिर या प्रदेशातील धार्मिक-सांस्कृतिक विविधतेची साक्ष देतात. 2006साली एका मोठ्या भूकंपाने मंदिराला पुन्हा धक्का दिला आणि त्यानंतर संवर्धनाचे काम पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू करावे लागले.
या हजार वर्षांच्या कथेला आत्ता आत्ता 2026मध्ये अजून एक नवे अर्थपूर्ण वळण मिळाले. जुलै 2026मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी प्रम्बणनला संयुक्त भेट देऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या सहभागातून सुरू होणार्या संवर्धन आणि पुनर्स्थापना प्रकल्पाचा प्रारंभ केला. हजार वर्षांपूर्वी भारतीय विचार समुद्र ओलांडून जावात पोहोचला होता; आज आधुनिक भारत त्याच वारशाच्या जतनासाठी पुन्हा त्या भूमीत उभा ठाकला आहे!
इतिहास एक सुंदर वर्तुळ पूर्ण करत आहे!
प्रम्बणनची निर्मिती जावानीज राजांनी केली, त्याची कला जावानीज आहे आणि ते इंडोनेशियाच्या भूमीवर आहे; पण त्याच्या धार्मिक कल्पना, देवता आणि रामायणाच्या कथा भारताशी असलेल्या हजार वर्षांच्या सांस्कृतिक नात्याची साक्ष देतात.
संध्याकाळी मंदिरातून बाहेर पडताना मी पुन्हा मागे वळून पाहिले. दिवसभराचा गोंगाट कमी झाला होता. काळसर दगडांवर मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी रंग चढवला होता आणि शिवमंदिराचे शिखर अधिकच भव्य दिसत होते. शाळेच्या बॅगा घेतलेली मुले परतीच्या गडबडीत होती; काही कुटुंबे हिरवळीवर बसली होती आणि दूरवरचे भग्न मंदिरांचे दगड पुन्हा एखाद्या प्राचीन कोड्यासारखे दिसत होते. त्या क्षणी दिवसाचे अनुभव एकत्र आले. तिकीटघराजवळची हिजाबधारी स्त्रियांची गर्दी, शाळकरी मुलांचे कुतूहल, गाईडची ‘भुतांनी बांधलेली मंदिरे’ ही सुरुवात, रोरो जाँग्रँगची लोककथा, नंदीची शांत मुद्रा, शिवाची विशाल मूर्ती, गणपतीसमोरचे आश्चर्य, दुर्गेकडे पाहणार्या मुली, दगडांवरचे रामायण, ज्वालामुखीची राख, भूकंपांचे तडाखे आणि आजच्या संवर्धनासाठी पुढे आलेला भारत; हे सगळे एकाच वेळी डोळ्यांसमोर उभे राहिले!
प्रम्बणनची खरी कथा मंदिराच्या उंचीची, शिल्पांच्या संख्येची किंवा कोणत्या राजाने ते बांधले याची नाही; खरी कथा आहे ती संस्कृतीच्या प्रवासाची. संस्कृती नकाशावर आखलेल्या सीमांना मानत नाही. ती माणसांबरोबर प्रवास करते, नवीन भूमीत पोहोचते, तिथल्या मातीचा रंग स्वीकारते आणि नव्या रूपाने जन्म घेते. भारतातून जावाकडे गेलेले विचार तिथे जावानीज झाले, रामायण जावानी देहबोलीत उतरले आणि भारतीय देवता स्थानिक लोककथांमध्ये मिसळल्या. हा संस्कृतीचा पराभव नाही, विजयही नाही..
हा संवाद आहे!
प्रम्बणनच्या उंच शिखरांकडे पाहताना वाटले की हजार वर्षांपूर्वी या जावानीज भूमीवर भारतीयांनी विचारांचा, कथांचा, कलेचा आणि श्रद्धेचा एक दिवा पेटवला असावा. काळाने अंधार केला, ज्वालामुखीने राख टाकली, भूकंपांनी मंदिरे पाडली, जंगलाने दगड झाकले, राजसत्ता आणि धार्मिक-सामाजिक परिस्थिती बदलली; तरी ती ज्योत विझली नाही. आज ती शिवाच्या शिखरात, रामायणाच्या दगडी कथेत, रोरो जाँग्रँगच्या लोकस्मृतीत, त्या हिजाबधारी मुलींच्या कुतूहलात आणि भारत-इंडोनेशिया यांच्या आधुनिक संवर्धन सहकार्यामध्ये दिसते.
बाहेर पडताना मला माझ्या गाईडचे एक वाक्य आठवले. दुपारी माझे लक्ष त्याच्या बोलण्याकडे नसल्याचे पाहून तो म्हणाला होता, ‘सर, तुम्ही माझे नाही, मंदिराचे बोलणे ऐकत आहात.’
खरे होते ते!
काही वास्तूंबद्दल माहिती ऐकावी लागते; काही वास्तू मात्र स्वतःच बोलू लागतात. प्रम्बणन दिवसभर माझ्याशी दगडांच्या, शिल्पांच्या, रामायणाच्या, लोककथेच्या आणि शेवटी संस्कृतीच्या भाषेत बोलत होते.
प्रम्बणन मागे राहिले होते; पण त्याच्या दगडांतून ऐकू येणारी भारतीय संस्कृतीची कथा माझ्याबरोबर परतत होती. समुद्र ओलांडून गेलेल्या त्या अज्ञात प्रवाशांनी फक्त मंदिरे बांधली नव्हती; त्यांनी एक सांस्कृतिक संवाद सुरू केला होता. राजे गेले, राजवटी गेल्या, धर्म गेला, भूकंपांनी दगड हलवले, ज्वालामुखींनी राख पसरवली, जंगलांनी मंदिर झाकून टाकले; पण कथा राहिली. एखाद्या संस्कृतीचे खरे आयुष्य तिच्या वास्तू किती जुन्या आहेत यावर ठरत नाही, तर पुढची पिढी त्या कथांकडे किती कुतूहलाने पाहते आणि किती जपून ठेवते यावर ठरते.
प्रम्बणनकडे शेवटची नजर टाकताना अंधार वाढत होता, पण दाट निळसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे शिखर अधिक स्पष्ट दिसत होते. मंदिरासमोर लावलेल्या विजेरी दिव्यांनी तो जास्तच उठावदार दिसत होता. ‘प्रम्बणन’ हा केवळ इंडोनेशियातील प्राचीन हिंदू मंदिरसमूह नाही; तो भारत आणि आग्नेय आशियामधील हजार वर्षांच्या सांस्कृतिक संवादाचे दगडात कोरलेले साक्षीपत्र आहे आणि भारतीय कथांनी समुद्र ओलांडून घेतलेल्या नव्या जन्माची जिवंत आठवण आहे.
त्या दिवशी प्रम्बणन माझ्या मागे राहिले; पण त्याच्या उंच शिखरांवरून, रामायणाच्या शिल्पांमधून आणि त्या असंख्य काळ्या दगडांमधून येणारी एक गोष्ट माझ्या मनात कायमची कोरली गेली - समुद्र कितीही विशाल असला, तरी संस्कृतीचे सेतू त्याहून अधिक विशाल असतात!
परतताना मी तिथल्या काही ढासळलेल्या लहान मंदिरांजवळ थांबलो. अनाथ दगडांचे ढीग रचलेले होते. त्या 240 पेक्षा जास्त असलेल्या छोट्या मंदिरांची अवस्था बघून थोडा विषण्ण झालो. किती मेहनत घेऊन ही मंदिरे बनवली असतील, पण भूकंपांमुळे आज सगळी उद्ध्वस्त झाली आहेत. कोणत्या देवाची होती, मूळ रचना कशी होती, किती उंच होती याविषयी काहीच समजत नाही!
मला त्या दगडांना हात लावावा वाटला. जणू त्यांना आश्वस्त करायचे होते की आम्ही भारतीयांनी आता लक्ष घातले आहे तर पुढच्या काही दशकांत तुम्हाला तुमच्या हजारो वर्षांपूर्वीच्या स्थानावर पुन्हा एकदा स्थापित करू. एक छोटा दगड उचलला. दुसरा बघितला. हाताने न उचलता येऊ शकणारे काही दगड वाकून पाहिले आणि हलवून हलवून सहाही बाजू तपासल्या. चार-पाच दगड हलवून मी घामाघूम झालो. दुसर्या ढिगार्यात आठ-दहा दगड तपासले..
बुचकळ्यात पडलो!
एकाही दगडावर एकही खाच नव्हती! सगळे दगड सहाही बाजूंनी सपाट!
दगडी मंदिरे बांधताना दगडांमध्ये खाचा कोरून ते वरच्या, खालच्या आणि बाजूच्या दगडांमध्ये अडकवल्याशिवाय भिंतींना मजबुती येत नाही. आपण मराठी ‘हेमाडपंती’ म्हणून ज्या तंत्रज्ञानाचा अभिमान बाळगतो, त्याच्या हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतात आणि दक्षिण-पूर्व आशियात याच पद्धतीने मंदिरे बांधली जात. कंबोडियातील अगदी सहाव्या शतकातील मंदिरातही मी अशाच खाचा पाहिल्या होत्या. इथल्या शंकराच्या, ब्रह्मदेवाच्या आणि विष्णूच्या मंदिरांच्या दगडांनाही खाचा आहेत. पण....
...पण मी पाहिलेल्या एकाही लहान मंदिराच्या दगडावर अशा खाचा नव्हत्या! खाचा नसलेल्या, एकमेकांवर फक्त एकावर एक ठेवून ‘रचलेल्या’ दगडांची भिंत पडायला भूकंपाची गरजच काय? छोट्याशा धक्क्यानेही त्या पडू शकतात. मग या परिसरातील पाचशेहून अधिक लहान मंदिरे अशा खाचा, अशी रचना करून का बांधली नाहीत?
काय घाई होती?
अचानक एक विचार मनात चमकून गेला.
घाई होती? असणारच!
एका रात्रीत - इथेच, याच जागेवर - एका रात्रीत हजार मंदिरे उभारायची होती. मग... मग.....
राजपुत्र बोंडोवसोच्या भुतांनी तर नाही ना हे काम घाईगर्दीत आवरले?