Shri Swami Samarth annachhatra Mandal Akkalkot

1988मध्ये तीन किलो तांदळाच्या महानैवेद्याने सुरू झालेला हा सेवाप्रवास आज हजारो भाविकांच्या अन्नदानापासून समाजातील विविध घटकांच्या मदतीपर्यंत विस्तारला आहे. या प्रवासामागे श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी, भक्तांचा विश्वास, देणगीदारांचे योगदान आणि निःस्वार्थ सेवेकरी व कार्यकर्त्यांची अथक मेहनत आहे.
अन्नपूर्णे सदा पूर्णे, शंकर प्राणवल्लभे।
ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं, भिक्षां देहि च पार्वती॥
(अन्नपूर्णा स्तोत्रम्)
अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन वास्तव्याने प्रसिद्ध झालेले तीर्थक्षेत्र. देशाच्या कानाकोपर्यातून असंख्य स्वामीभक्त येथे दर्शनासाठी येतात. या भाविकांना दर्शनासोबतच अन्नदानातून स्वामींच्या कृपाप्रसादाची अनुभूती मिळावी, या भावनेतून ’श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट’ या धर्मादाय न्यासाची स्थापना झाली. 1988मध्ये लावलेले हे छोटेसे रोपटे आज विशाल सेवावृक्षात रूपांतरित झाले आहे.
अक्कलकोट संस्थानच्या भोसले घराण्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा विशेष स्नेह लाभला होता. श्रीमंत मालोजीराजे दुसरे हे स्वामींचे निस्सीम भक्त होते. ही भक्तीची परंपरा पुढेही जपली गेली. त्याच परंपरेचे वारसदार सन्माननीय जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांच्या पुढाकारातून, प.पू. मोहन पूजारी आणि सहकार्यांच्या सहकार्याने गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर 1988मध्ये अन्नछत्र मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
प्रारंभी कै.अंबुबाई सरदेशमुख यांनी वटवृक्ष मंदिराच्या उत्तर महाद्वारालगत स्वतःच्या जागेत अन्नछत्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. सुरुवातीला केवळ तीन किलो तांदळाचा महानैवेद्य स्वामींना अर्पण करून भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. 1994मध्ये जागा खरेदी करून मोठे पत्राशेड उभारण्यात आले आणि अन्नछत्राचा विस्तार झाला. भक्तांच्या देणग्या आणि सेवाभावी कार्यकर्त्यांच्या योगदानातून आजचे प्रशस्त अन्नछत्र उभे राहिले आहे.
Shri Swami Samarth annachhatra Mandal Akkalkot
हजारो भक्तांना महाप्रसाद
आज अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस 15 ते 20हजारांहून अधिक स्वामीभक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. एवढ्या मोठ्या संख्येने येणार्या भाविकांसाठी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, नियोजन आणि वितरण व्यवस्था यांची विशेष काळजी घेतली जाते. उत्तम प्रतीचे धान्य व भाजीपाला वापरण्याबरोबरच आवश्यक गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी केली जाते. वॉटर सॉफ्टनर आणि आर.ओ.प्रणालीद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते.
दररोज पोळी, भात, आमटी, विविध भाज्या, शिरा किंवा खीर, सांजा, पापड असा महाप्रसाद असतो. एकादशीला साबुदाणा खिचडी, भगर, दही, आमटी, खजूर व केळी यांसारखे उपवासाचे पदार्थ दिले जातात. सकाळी 11.30वाजता स्वामींना महानैवेद्य, महाआरती व संकल्प झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण सुरू होते.
अन्न व औषध प्रशासनाची प्रमाणपत्रे, खडज मूल्यांकन प्रमाणपत्र आणि भारत सरकारचे ‘भोग’ प्रमाणपत्र न्यासाला प्राप्त झाले आहे. सुमारे 300 सेवेकरी या सेवाकार्यात कार्यरत आहेत.
भक्तांसाठी निवास आणि सुविधा
दूरवरून येणार्या भाविकांच्या सोयीसाठी यात्री निवास, यात्री भुवन, अतिथी निवास, गणेश मंदिर यात्री थांबा आणि यात्रीनिवारा अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 2003पासून सेवेत असलेल्या यात्री निवासामध्ये 66 खोल्या आणि 14 मोठे हॉल असून सुमारे 2,000 भक्तांच्या निवासाची क्षमता आहे. लिफ्ट आणि अग्निशमन यंत्रणाही उपलब्ध आहे.
अन्नछत्र परिसरात सुमारे आठ एकरांचे वाहनतळ, वाहनतळ शेड आणि 290 के.व्ही. क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, वृद्ध व दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक बग्गी आणि व्हिलचेअर तसेच रुग्णवाहिका व अग्निशमन सेवेची सुविधाही उपलब्ध आहे.
Shri Swami Samarth annachhatra Mandal Akkalkot
श्रद्धा, संस्कृती आणि कलावंतांचा संगम
अन्नछत्राचा परिसर हा केवळ अन्नदानाचे केंद्र राहिलेला नाही, तर श्रद्धा, संस्कृती आणि कलाविष्कार यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. 1992मध्ये ‘शमी विघ्नेश गणेश’ मंदिराची स्थापना झाली. ’शिवचरित्र’, ’धातुशिल्प प्रदर्शन’, ‘गडकिल्ले सृष्टी’, ’श्री स्वामी समर्थ जीवनचरित्र भित्तिशिल्प’, ’स्वामी समर्थ वाटिका आणि बालोद्यान’ ही येथील आकर्षणे आहेत.
श्री स्वामी समर्थांच्या भक्तांच्या या मांदियाळीत कला आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर कलावंतांनीही आपली श्रद्धा जपली आहे. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे”, हा स्वामींचा आश्वासक संदेश मनात ठेवून सकारात्मकतेने जीवनाकडे पाहण्याची प्रेरणा अनेक भक्तांना मिळते. या भक्तपरंपरेत जुन्या आणि नव्या पिढीचा सुंदर संगम दिसतो.
भारतरत्न स्व. लता मंगेशकर, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, आनंद शिंदे, सचिन पिळगांवकर, मकरंद अनासपुरे, महेश मांजरेकर, मोहन जोशी, प्रवीण तरडे, भरत जाधव, आदेश बांदेकर, भाऊ कदम, डॉ.निलेश साबळे, श्रेया बुगडे, हार्दिक जोशी, वैशाली सामंत, सावनी रविंद्र, ऋषिकेश रानडे यांच्यासह अनेक कलावंत श्री स्वामी समर्थांप्रती श्रद्धा व्यक्त करणारे आहेत. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले हे कलावंत स्वामीभक्तीच्या या भावविश्वाशीही जोडले गेलेले आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीशी या श्रद्धेचा आणखी एक दुवा जोडला जातो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी महामंडळाच्या निवडणुकीत ‘समर्थ पॅनल’ या नावाने पॅनल उभे केले आणि सलग दोन निवडणुकांमध्ये त्या पॅनलला विजय मिळाला. श्रद्धा आणि कलाक्षेत्र यांचा हा संबंध अक्कलकोटच्या सांस्कृतिक वातावरणाला आणखी एक वेगळी ओळख देतो.
संस्थापक अध्यक्षांच्या पुढाकाराने सागवानी लाकूड व कलाकुसरीने साकारलेला स्वामींचा रथ दरवर्षी पुण्यतिथीच्या काळात नगरप्रदक्षिणेसाठी निघतो.
भोसले घराण्याशी असलेले जुने ऋणानुबंध जपत भारतरत्न लता मंगेशकर यांनी वापरलेली दोन वाहने अन्नछत्राला भेट दिली असून ती परिसरात जतन करून ठेवण्यात आली आहेत.
2021मध्ये जुन्या दत्त मंदिराची काळ्या पाषाणात पुनर्बांधणी करून जयपूरहून आणलेली दत्तमूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. तसेच समर्थ वाटिकेजवळ श्री तुळजाभवानी मातेचे काळ्या पाषाणातील मंदिर उभारण्यात आले असून 2024पासून ते भाविकांसाठी खुले आहे.
Shri Swami Samarth annachhatra Mandal Akkalkot
दरवर्षी गुरुपौर्णिमा आणि वर्धापन दिनानिमित्त दहा दिवसांचा धार्मिक व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो. प्रवचन, कीर्तन, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून स्वामीभक्तीचा जागर केला जातो.
1998पासून पालखी परिक्रमेने स्वामीभक्ती घराघरात
स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 1998पासून ‘श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा’ अखंडपणे सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, गोवा आणि कर्नाटकातील स्वामीभक्तांना या माध्यमातून स्वामींच्या पादुकांचे दर्शन आणि भक्तीचा अनुभव मिळतो. गुरुपौर्णिमा आणि वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आपत्तीच्या काळात सेवाभाव
अन्नदानाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणे हे न्यासाचे महत्त्वाचे कार्य आहे.
1993च्या किल्लारी भूकंपाच्या वेळी सलग एक महिना ट्रकभर अन्न पाठवून मदत करण्यात आली.
2019मध्ये कोल्हापूर-सांगली आणि 2021मध्ये चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य देण्यात आले.
2014मधील पाणीटंचाईच्या काळात गळोरगी येथील स्वमालकीच्या विहिरीतून पाइपलाईनद्वारे पाणी आणून सलग बारा महिने दररोज सुमारे 12 लाख 50 हजार लीटर पाणी अक्कलकोट नगरपरिषदेला देण्यात आले.
अन्नछत्र व वटवृक्ष देवस्थानासाठीही कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अक्कलकोट शहराच्या विकासासाठी न्यासाने सार्वजनिक उपयोगाकरिता स्वतःच्या मालकीची जमीन उपलब्ध करून दिली आहे. वृक्षारोपण, पाणीपुरवठा, चौकांचे सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधांच्या निर्मितीतही न्यासाचा सहभाग राहिला आहे.
कोरोना काळातील सेवा
कोविड-19च्या काळात अन्नछत्र मंडळाने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले. अक्कलकोट शहरातील सुमारे 1,000 गरजू नागरिकांना तीन महिने भोजन देण्यात आले. 52 दिवसांत सुमारे 51,500 लोकांना अन्नवाटप झाले. अन्नधान्याच्या किटचेही मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले.
यात्रीनिवासात शासनाचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. रुग्णांना चहा, नाश्ता आणि दोन वेळचे भोजन देण्यात आले. 50 बेड, गाद्या, उशा व बेडशीट्स उपलब्ध करून देण्यात आले. ससून रुग्णालय, पुणे येथे व्हेंटिलेटर देण्यात आला. शहर व ग्रामीण भागात सॅनिटायझर फवारणीही करण्यात आली.
महिला शक्तीला बळ
स्त्रीशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था म्हणून हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा. अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थापक सचिवा मा.अर्पिताराजे अमोलराजे भोसले ह्यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीम कार्यरत आहे.
Shri Swami Samarth annachhatra Mandal Akkalkot
आरोग्य शिबिरे, रक्तदान, वृक्षारोपण, नवरात्रोत्सवातील कुंकुमार्चन, गणेशोत्सवातील गणेश अथर्वशीर्ष पठण अशा विविध उपक्रमांमधून महिलांचा सहभाग वाढवण्याचे काम केले जाते.
समाजोपयोगी उपक्रम
न्यासाच्या वतीने रक्तदान, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, महिला आरोग्य, स्वच्छता, जलसाक्षरता आणि विविध जनजागृती उपक्रम राबविले जातात. 2014पासून विविध प्रसंगी झालेल्या रक्तदान शिबिरांमधून 25हजारांहून अधिक रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करण्यात आले आहे.
दत्तजयंती 2021पासून ‘समर्थ महाप्रसाद सेवा’ सुरू असून अक्कलकोटमधील सुमारे 260 गरीब, गरजू व निराधार व्यक्तींना दररोज दोन वेळचे भोजन घरपोच दिले जाते.
सोलापूर येथील बी.सी. गर्ल्स हॉस्टेलमधील सुमारे 150 मुलींसाठी अन्नधान्य व खाद्यतेलाचा पुरवठा केला जातो. तालुक्यातील 86 कुस्तीगीरांना पौष्टिक खुराक देऊन क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले जाते. शैक्षणिक संस्थांना संगणक, शैक्षणिक साहित्य तसेच इमारत दुरुस्तीसाठीही मदत करण्यात आली आहे.
क्रीडा क्षेत्रात नवी सुरुवात
अक्कलकोटमधील मुला-मुलींना क्रिकेटचे प्रशिक्षण मिळावे यासाठी ‘अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी’ उभारण्यात आली आहे. 29 जुलै 2026 रोजी तिचे उद्घाटन झाले. कुस्तीगीरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट/गादी व मातीवरील कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारणीचे कामही सुरू आहे.
सेवाकार्याचा पुढील टप्पा
ध्यान व योग :- भाविकांसाठी ध्यानधारणागृह आणि योग मंदिर उभारण्याचे नियोजन.
सांस्कृतिक भवन :- सांस्कृतिक भवन-मंगल कार्यालय उभारण्याची योजना.
नवीन महाप्रसादगृह :- सेवेला मिळणार आधुनिक विस्तार
भक्तांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या लक्षात घेऊन अन्नछत्र मंडळाच्या वतीने भव्य पाच मजली महाप्रसादगृह उभारण्यात येत आहे. मंदिराच्या वास्तुशैलीची झलक असलेल्या या इमारतीचे बांधकाम क्षेत्र 1 लाख 19 हजार 398 चौरस फूट असून ती पूर्णपणे वातानुकूलित असेल. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज भव्य पाच मजली महाप्रसादगृह उभारणीचे काम सुरू.
टेरेसवर 51 फूट उंच श्री स्वामी समर्थांची मूर्ती उभारण्यात येणार आहे. महाप्रसादगृहात एकावेळी 2,500 भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था, तर सुमारे पाच हजार भाविकांसाठी प्रशस्त प्रतीक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे.
Shri Swami Samarth annachhatra Mandal Akkalkot
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 72 कोटी रुपये आहे. बांधकामाला नोव्हेंबर 2024पासून सुरुवात झाली आहे. 21 जुलै 2024 रोजी तत्कालीन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. तसेच 19 जुलै 2026 रोजी ख्यातनाम गायिका उषाताई मंगेशकर यांच्या शुभहस्ते प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. जगभरातील स्वामीभक्तांना विविध उपक्रमांची माहिती मिळावी आणि देणगी देणे सुलभ व्हावे यासाठी संकेतस्थळ, ऑनलाईन देणगी, टठ कोड आणि ऋउठअ खात्याची सुविधा उपलब्ध आहे.
संस्थापक अध्यक्षांची भूमिका : ‘सेवा हीच स्वामीभक्ती’
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री.जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय श्री.अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाचा विस्तार होत आहे. सचिव शामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, मुख्य पालखी परिक्रमा संयोजक व विश्वस्त संतोष भोसले, विश्वस्त सौ.अलकाताई जनमेजयराजे भोसले, विश्वस्त सौ.अर्पिताराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त सौ.अनुयाताई संदीप फुगे यांच्यासह सर्व विश्वस्त, क्रियाशील सभासद, सेवेकरी, कार्यकर्ते आणि अक्कलकोटकरांच्या सहभागातून हे कार्य पुढे जात आहे.
2018पासून कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय श्री.अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी अन्नछत्राच्या कार्याला व्यापक विस्तार देण्यासाठी विशेष योगदान दिले असून, अन्नछत्राची सेवा देश-विदेशातील स्वामीभक्तांपर्यंत पोहोचवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
Shri Swami Samarth annachhatra Mandal Akkalkot
1988मध्ये तीन किलो तांदळाच्या महानैवेद्याने सुरू झालेला हा सेवाप्रवास आज हजारो भाविकांच्या अन्नदानापासून समाजातील विविध घटकांच्या मदतीपर्यंत विस्तारला आहे. या प्रवासामागे श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी, भक्तांचा विश्वास, देणगीदारांचे योगदान आणि निःस्वार्थ सेवेकरी व कार्यकर्त्यांची अथक मेहनत आहे.
भक्तांची सेवा म्हणजे स्वामींची सेवा या भावनेतून उभा राहिलेला हा सेवावृक्ष भविष्यातही अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचत राहो, हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना.
- शामराव शिवराम मोरे
सचिव, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट
संपर्क कार्यालय : 02181-221180
Shri Swami Samarth annachhatra Mandal Akkalkot