वैदिक हिंदू ग्रंथपरंपरा - स्वरूप सार आणि संवाद

विवेक मराठी    16-Nov-2026
Total Views |
@अलका मुतालिक
 

vivek 
पुस्तकाचे नाव : वैदिक हिंदू ग्रंथपरंपरा-स्वरूप,
सार आणि संवाद
लेखक : माधव ज. जोशी
प्रकाशक : ग्रंथाली
मुखपृष्ठ : सतीश भावसार
पृष्ठसंख्या : 182 किंमत : 300 रु.
माधव जोशी यांची जी साहित्यिक अपत्ये आहेत, त्यांना समाजपुरुषाने उदंड प्रतिसाद दिला आहे. ’कॉर्पोरेट दिंडी’पासून सुरू झालेला प्रवास ’संविधाना’प्रत घडला. ओघवत्या वाणीतून त्यांना वाचकांची नाडीच मिळाली. यातूनच शारदा प्रसादाने या ‘वैदिक हिंदू ग्रंथपरंपरा-स्वरूप सार आणि संवाद’ या सनातन संस्कृतीचा-वेदविचारांचा आढावा घेण्याचा संकल्प घडला. ‘सत्य संकल्पाचा दाता नारायणु’ सिद्धांतानुसार सनातन वैदिक जीवनपद्धती याविषयी जिज्ञासा निर्माण झाली. यांतून स्वाध्याय घडला. यातून ’जे जे आपणांस ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करून सोडावे। बहुतजना’ या सहज प्रवृत्तीनुसार या स्वाध्यायाचे शब्दसाकार रूप म्हणजे हे छोटेखानी पुस्तक होय.
 
यातील विचार ग्रंथसादृश्य आहेत. या निकषानुसार याला छोटा ग्रंथच म्हणता येईल. वैदिक संस्कृतीचे विहंग दर्शन घडवणारा हा आरसा आहे. यात वेद, वेदांतील त्रिकांडात्मक चिंतन, श्रुती उर्फ उपनिषदे, कालानुरूप स्मृती, वेदांगे, षट्शास्त्रे, आगम, दर्शनशास्त्रे यांच्या मोहक प्रतिमा आहेत. त्यांचा थोडक्यात ऊहापोह आहे. वेदांतील सिद्धांत चित्ताकर्षण करतात; पण तेच सिद्धांत जीवनात उतरवण्यासाठी कथा-दृष्टांतांच्या माध्यमातून रंजक बोधपुराणांत आहेत. यात सर्वच पुराणांचा ओझरता परिचय आहे. श्रीमत् भागवत हे महापुराण आहे.
सर्ववेदान्तसारंयद्ब्रह्मात्मैकत्वलक्षणम्।
वस्त्वद्वितीयंतन्निष्ठं कैवल्यं प्रयोजनम्॥
मोक्ष/कैवल्य या प्रयोजनामुळे सगुणाच्या माध्यमातून तत्त्वचिंतन यामुळे भागवत हे ’वेदांच्या पंक्तीतलेच मानले जाते. याची महती अपार आहे. याचेही किंचितसे दर्शन यात आहे. चार वेद, चार आश्रम-चार वर्ण, चारमार्ग (ईशप्राप्ती-ब्रह्मानुभव) या सोळा भक्कम अधिष्ठानांवर वैदिक सनातन संस्कृती उभी आहे. याचे जणू चलतचित्र पुस्तकात पाहायला मिळते.
युद्धाच्या प्रसंगात उपदेशलेली भगवद्गीता,जी मुळात स्मृती आहे. तरीही यातील तत्त्वज्ञानामुळे ती उपनिषदांच्या पंक्तीत बसली आहे. या गीतेचेही थोडक्यात समर्पक दर्शन पुस्तकात आहे. महर्षी व्यासांचे’ महाभारत’ या बृहद् ग्रंथाचे लघुरूप यात आहे. महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणाचा आढावा-सद्विचार, सदाचार, पराक्रम, कुटुंबवत्सल अशा विविध अंगाने यात आहे. दर्शनशास्त्रे, जी तर्कबुद्धी विकसित करून बुद्धी तीक्ष्ण करतात अशा या सूक्ष्म बुद्धीनेच वेदांतील ‘ब्रह्म’ तत्त्वाला गवसणी घालून ‘सोऽहं’चीअनुभूती घेता येते. या षट्दर्शनांचा विचार तक्तारूपात मांडला आहे. यामुळे विषयाचे आकलन सुलभ झाले आहे.
ऋग्वेदातील प्रमुख सूक्तांचा परिचय पुस्तकात आहे. सोळा संस्कारांचा आढावा ओघवत्या-सुलभ भाषेत मांडला आहे. थोडक्यात काय तर ’सरिता जल अर्घ्य’ या न्यायाने वैदिक सनातन संस्कृतीचे हे ओंजळरूपी पवित्र तीर्थ वाचनीय, चिंतनीय आहे. मूळातील देववाणी माधवजींनी प्राकृतात आणल्याने ती आकलनीय झाली आहे. यातील भाषा सुगम, सुलभ, पारदर्शक आहे. ही कालानुरूप आणि निःसंदिग्ध असल्याने यातील क्लिष्टता नाहीशी झाली आहे.
 
 
वाचकांनी, विशेषतः युवकांनी यातील विचार समजून घेऊन चिंतनाने याचा व्यास-विस्तार करून जीवनाची कृतार्थता पदरी पाडावी. या विचारधनाचे प्रयोजन नरदेह सार्थक हे आहे. यासाठी वाचकांनी याचे मनःपूर्वक वाचन करावे. वाचनानंतर मनन,चिंतन, आचरण करावे म्हणजे लेखकाप्रमाणे वाचकांवरही वेदोनारायणाची कृपा होईल.