आपली जबाबदारी वाढली आहे...

विवेक मराठी    18-Nov-2026
Total Views |
@ श्रेया कुलकर्णी
ramayana 
आपला इतिहास, त्यातल्या संस्कारक्षम कथा मुलांपर्यंत फक्त मनोरंजनाच्या मार्गाने पोचल्या तर त्याचा मुलांवर नेमका काय परिणाम होईल, त्यातून ते काय शिकतील असे काही प्रश्न नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बिगबजेट ‘रामायण’ या चित्रपटाच्या निमित्ताने समोर उभे आहेत. सिनेमा बनवणारे मूठभर लोक जसा सांगतील तसा आपला इतिहास आणि सत्य आहे का? यावर पुढे होऊन आणि एकत्रितपणे बोलण्याची हीच वेळ आहे.
रामायण आणि महाभारत हे ग्रंथ म्हणजे केवळ महाकाव्ये नसून मनुष्यघडण करणारे महान ग्रंथ आहेत अशी हिंदूंची श्रद्धा आहे, खात्री आहे. म्हणूनच घराघरांतून रामकथा आणि कृष्णकथा सांगण्याची या देशाची शेकडो वर्षांची परंपरा होती. ‘होती’ हे भूतकाळातले क्रियापद अशासाठी योजले, कारण आधुनिक तंत्रज्ञानाने गारूड केलेल्या आजच्या जगात मूलभूत संस्कारांसाठीही या तंत्रज्ञानावर आधारित माध्यमांचाच आधार घेतला जातो आहे.
 
 
या चित्रपटाचा मुख्य हेतू हा रामायणाचा प्रचार किंवा संस्कार करणे हा नसून आर्थिक लाभ मिळवणे हा आहे. तो तसा असायलाही हरकत नाही; पण त्यासाठी रामायणातील मूळ कथेच्या आणि पात्रांच्या बांधणीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, जे अतिशय आक्षेपार्ह आहेत.
 

ramayana 
 
एक सश्रद्ध हिंदू ज्या हेतूने मुलांना रामायण सांगतो तो मूळ हेतू बाजूला ठेवून, मुलांच्या मनात आपल्या धार्मिक ग्रंथातील शिकवणीबद्दल गोंधळ निर्माण होण्याची शक्यता हा सिनेमा निर्माण करतो. यातले बरेच प्रसंग हे अधर्माची बाजू तितकीशी अधर्माची नव्हती असं दाखवतात आणि धर्माच्या बाजूविषयी शंका निर्माण करतात. आपण यावरही आक्षेप नोंदवणार नसू तर,’सिनेमॅटिक लिबर्टी’ या नावाखाली आपलाच इतिहास, आपल्याच धर्मग्रंथातील मूळ कथा तोडूनमोडून आपल्यासमोर ठेवण्याच्या शक्यता आणखी वाढणार आहेत.
 
 
या चित्रपटाच्या आधीच रावणाचे उदात्तीकरण करून देशांतर्गत काही समूहांनी त्याची मंदिरं उभारायला सुरुवात केलेली आहेच. या चित्रपटाद्वारे तसाच संदेश जागतिक पातळीवर नेण्यात आला आहे. आणि हे करताना या सिनेमाने टॅगलाईन मात्र वापरली आहे,'Our Truth. Our History'.
 
 
मुळात लोभी आणि अधर्मी वृत्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेला रावण, हा या सिनेमात मात्र अन्यायाचा बदला घेण्यासाठी कुकर्म करणारा बलाढ्य योद्धा म्हणून उभा केलेला आहे. पुञ्जिकस्थला नावाच्या अप्सरेवर अत्याचार केल्यानंतर तिची अवस्था एका चुरगळलेल्या कमळासारखी झाली होती असा खुद्द रावणाने केलेला स्पष्ट उल्लेख वाल्मिकी रामायणात असताना त्याला या सिनेमात स्त्रीदाक्षिण्य दाखवणारा आणि प्रजेचे हित पाहणारा असा समाजवादी आणि स्त्रीवादी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे.
 
 
रावणाच्या आईची या चित्रपटातील जी गोष्ट लोकांना फार भावली तीच मुळात खोटी आहे. आपला सावत्र भाऊ कुबेर याच्याकडून लढून नाही तर रावणाला लंका ’सहज’ आणि ’फुकट’ मिळाली. रावणाला या चित्रपटात, आपल्या आईच्या इच्छेसाठी कठोर तप करून सामर्थ्य प्राप्त करणारा, फक्त बहिणीवर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी रामाला लंकेला यायला भाग पाडणारा असे दाखवण्यात आले आहे.
 
शूर्पणखा (या नावाचा उच्चारसुद्धा चित्रपटात चुकलेला आहे) सीतेचा अपमान करून तिला मारायला धावली असताना, श्रीरामांच्याच आज्ञेवरून लक्ष्मण तिचे नाक आणि कान कापतो. सीता याचा विरोध किंवा निंदा करण्याचा प्रश्नच येत नाही. पण चित्रपटात मात्र एका स्त्रीवर त्याने केलेल्या अन्यायासाठी सीता लक्ष्मणाला ओरडते आणि रामसुद्धा ते ऐकून घेतो.
 
 
सीतेला युद्धशास्त्रात निपुण दाखवण्यासाठी तिने न केलेली लढाईसुद्धा चित्रपटात दाखवली गेली आहे; परंतु रावणाबरोबर जाताना सुटकेचा कुठलाही प्रयत्न करताना किंवा विलापसुद्धा करताना सीता दाखवलेली नाही. खरं तर सीतेने तेव्हा इतका आक्रोश केला होता की त्या आवाजाने झोपलेल्या जटायूला जाग आली होती असे मूळ कथेत आहे.
 
 
हा चित्रपट पाहून पारंपरिक पद्धतीने आपले धार्मिक ग्रंथ शिकणे मुळातून वाचणे, समजून घेणे किती महत्त्वाचे आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले रामायण स्वतः वाचून आपल्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न घराघरांतून झाला पाहिजे. मुलांना आपले मूळ धर्मग्रंथ आणि त्यावर अधिकारी व्यक्तींनी केलेले अभ्यासपूर्ण, तर्कसंगत भाष्य वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
 
एक सश्रद्ध हिंदू आणि जबाबदार पालक म्हणून आपली जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे.