चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्तम आहे. भव्य दृश्ये आहेत, उत्तम VFX आहे, सुंदर वेशभूषा आणि स्थापत्य आहे; पण हे दृश्यवैभव म्हणजे रामायण नव्हे. रामायणाचे अंतरंग म्हणजे - रामाचे सद्गुण, सीतेचे चरित्र, राम आणि सीतेचे अलौकिक प्रेम, रावणाचे क्रौर्य, तसेच कथेतील प्रेम, त्याग, धर्मसंकट, बंधुप्रेम, करुणा, शौर्य इत्यादी. या सर्व गोष्टी चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याने तो चित्रपट नीरस झाला आहे.
शेवटी रामायण चित्रपट पाहिला! त्यावर भरपूर चर्चा ऐकली होती -चित्रपटाने भारतीय महाकाव्य देशविदेशात नेले इथपासून ते रावणाचे उदात्तीकरण केले आहे इथपर्यंत. त्यामुळे मग प्रत्यक्ष पाहणे आले.
नमित मल्होत्राचा ‘रामायण’ ही निश्चितच एक भव्य कलाकृती आहे! डोळ्यांचे पारणे फेडणारी! मात्र भव्यता आणि उत्तम चित्रपट यांत फरक असतो. तो या चित्रपटाने प्रकर्षाने लक्षात आणून दिला.
काय आवडले?
चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अप्रतिम आहे. तऋद, दृश्य परिणाम, वेशभूषा, अलंकार, सेट, स्थापत्य ... सगळेच उत्कृष्ट आहे. अनेक फ्रेम्स अक्षरशः सुंदर आहेत. पुष्पक विमान, जटायू आणि रावणाचे युद्ध हा प्रसंग तर अप्रतिम जमला आहे. जटायूला कथानिवेदक म्हणून वापरण्याची कल्पनाही छान आहे.
रामजन्म, रामाचे शिक्षण आणि विश्वामित्रांचे आगमन हे प्रसंग आवडले. मंथरा-कैकयी यांचे नाते चांगल्या प्रकारे उलगडले आहे. रावणाने त्रैलोक्यात कसा धुमाकूळ घातला आहे आणि त्याला रोखले नाही तर सृष्टीचा विनाश अटळ आहे, हेपण दाखवले आहे.
रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत डोळ्याला खुपत नाही, हे नमूद केले पाहिजे. अरुण गोविल यांचा दशरथ आणि अजिंक्य देव यांनी साकारलेला विश्वामित्रही छान आहे. बरेचसे कलाकार आपापल्या भूमिकेत चांगले आहेत.
करपी नळााशी यांचे पार्श्वसंगीतही उत्तम आहे.
मग कमी काय पडले?
चित्रपटाच्या संगीताला भारतीय बाज नाही. भारतीय संगीताचा आत्मा असलेले राग, लोकसंगीत, तबला, मृदंग, बासरी किंवा डमरू यांचा वापर जाणवत नाही. रामकथेच्या प्रसंगांना अनुरूप असे सकाळच्या वेळी भैरव रागाचे स्वर किंवा संध्यासमयी यमनचे आलाप, अथवा वेदघोष, घंटानाद, शंखनाद वापरलेले नाहीत.
ए.आर.रहमान यांची गाणी निराशाजनक आहेत. गाण्यांचे शब्द हृदयाला भिडत नाहीत. गुणगुणावेसे वाटेल असे एकही गाणे नाही.
संवादांबद्दल तर न बोललेलेच बरे! जिथे संवादांतून तत्त्वज्ञान आणि जीवनदृष्टी व्यक्त व्हायला हवी, तिथे ’टूट गया तो टूट गया!’ सारखे संवाद ऐकावे लागतात.
साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत सुमार आहे. तिला सोडवण्यासाठी जटायू प्राणांतिक संघर्ष करत असतानादेखील तिच्या चेहर्यावरची माशीही हलत नाही! असो.
काही प्रसंग तर अगदीच सपक गेले आहेत. राम-सीतेची विवाहपूर्व भेट आणि त्यावेळचे निरर्थक संवाद! वनवासाला निघतानाचा प्रसंग किंवा भरतभेटीचा प्रसंग अपेक्षित भावनिक उंची गाठत नाहीत.
सीताहरणाचा प्रसंग तर अत्यंत मिळमिळीत केला आहे. सीता कुटीतून पुष्पक विमानापर्यंत कशी पोहोचते, हेच कळत नाही. हा प्रसंग रामायणाचा गाभा आहे. ह्या अपहरणामुळेच रामायण घडते. पण ह्या प्रसंगाचे गांभीर्य, रावणाचे क्रौर्य आणि सीतेचा विलाप चित्रित केला नाहीये.
अनेक नाट्यमय प्रसंग चित्रपटात घेतलेलेच नाहीत. राम-निषादराज भेट, श्रवणबाळाची कथा असे प्रसंग असते तर कथेला अधिक भावनिक खोली मिळाली असती.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पात्रांच्या मनातील भावभावना, त्यांचे दुःख, कारुण्य आणि त्यांचा शोक कुठेच चित्रित झालेले नाहीत. एकही प्रसंग मनाला चटका लावत नाही. हा चित्रपट एकदा देखील डोळ्यांत पाणी आणत नाही. असे रामायण पहिल्यांदाच पाहिले!
वाल्मिकी ऋषींनी रामायण का लिहिले?
वाल्मिकी ऋषींनी-मी आता रामाचे चरित्र लिहितो म्हणून रामायण लिहिले नाही. त्यांनी नारद मुनींना प्रश्न केला-सोळा गुणांनी संपन्न असलेला या जगात सध्या कोणी आहे का? त्यावर नारद मुनी सांगतात, ”पौर्णिमेचा चंद्र जसा 16 कलांनी युक्त आहे, तसा दाशरथी राजा रामचंद्र 16 गुणांनी युक्त आहे! ते गुण कोणते आहेत ते ऐक -
राम गुणवान आहे. वीर्यवान आहे. धर्मज्ञ आणि कृतज्ञ आहे. सत्य वचन बोलणारा सत्यवाक्य: आहे. घेतलेले व्रत पूर्ण करणारा असा तो दृढव्रत आहे. मग ते व्रत 14 वर्षांच्या वनवासाचे असो किंवा सीतेला शोधून, रावणाशी लढून तिला परत आणायचे असो. तो त्याच्या व्रतापासून ढळत नाही.
राम चारित्र्यवान आहे. सर्व प्राणिमात्रांचे हित इच्छिणारा सर्वभूतेषु हितः असा आहे. तो विद्वान आहे, समर्थ आहे. अर्थात हातात घेतलेले कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यास तो समर्थ आहे. म्हणजेच प्रत्येक कामात यश मिळवणारा आहे.
राम प्रियदर्शनी आहे. प्रियदर्शनी म्हणजे सुंदर हा तर अर्थ आहेच; पण एखादी सुंदर व्यक्ती जर दुर्मुखलेली असेल किंवा तिच्या कपाळावर आठ्या असतील तर तिचे दर्शन प्रिय वाटत नाही. आनंददायी होत नाही. ज्याच्या दर्शनाने आपले मन प्रसन्न होते, जो सुमुख आहे, सुहास्यवदन आहे तो प्रियदर्शन. ज्याच्या दर्शनाने आपण आपले दु:ख विसरतो तो राम असा प्रियदर्शनी आहे.
राम आत्मवान आहे. त्याने क्रोधाला जिंकले असल्याने तो जितक्रोध: आहे. तो तेजस्वी अर्थात द्युतिमान आहे. ज्याच्या मनात किंचितही असूया नाही असा तो अनसूयक: आहे. वालीला मारल्यावर त्याला किष्किंधेवर राज्य करावे वाटत नाही किंवा सोन्याची लंका जिंकल्यावर ती लुटावी असे त्याला वाटत नाही. असूयारहित असलेला राम लक्ष्मणाला म्हणतो -
अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥
लंका जरी सोन्याची असली तरी ती मला रोचत नाही!
भारतीय इतिहासात किती सोन्याच्या नगरी सुलतानांनी जिंकल्यावर लुटल्या, फोडल्या आणि जाळल्या याची गणना नाही. हे लक्षात घेतले की अनसूयक असणे हा दैवी गुण असल्याची जाणीव होते.
नारद मुनी पुढे सांगतात, ”युद्धात रामाचा रोष असा आहे की देवांना सुद्धा त्याचे भय वाटावे (बिभ्यतिदेवा:).
प्रजेच्या हिताची कामे करण्यात राम सदैव मग्न आहे (प्रजानां च हिते रतः). राम यशस्वी आहे, ज्ञानसंपन्न आहे. त्याच्या सर्व कर्मात शुचिता आहे. राम सतत दक्ष आहे. राम जणू काही दुसरा प्रजापतीच आहे! सर्व जीवांचा रक्षणकर्ता आहे.
धर्माचे रक्षण करणारा राम वेद व वेदांगांचा जाणता आहे. धनुर्वेदात निष्णात असलेला राम स्वजनांचे रक्षण करतो -
रक्षिता स्वस्य धर्मस्य स्वजनस्य च रक्षिता।
वेदवेदाङ्गतत्त्वज्ञो धनुर्वेदे च निष्ठितः॥
नारदमुनी रामाचे अप्रतिम वर्णन खालील दोन श्लोकांत करतात-
समुद्र इव गाम्भीर्ये धैर्येण हिमवानिव॥ 1-1-17
विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत्प्रियदर्शनः।
कालाग्निसदृशः क्रोधे क्षमया पृथिवीसमः॥ 1-1-18
घनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इवापरः।
राम समुद्रासारखा गंभीर आहे. ज्या प्रमाणे समुद्रात खोलवर बुडी मारली असता अनेक मोती मिळतात, तसे रामाच्या धीर गंभीर अथांग चरित्रात जे भक्तिभावाने खोल बुडी मारतात, त्यांना विवेकमोती मिळतात. कितीही वेळा बुडी मारली तरी प्रत्येक वेळी आणखी आणखी मोती मिळत राहतात.
धैर्यात राम हिमालयासारखा आहे. कोणतेही संकट कोसळले, तरी राम खचून जात नाही. वीर्यात राम विष्णूसारखा आहे. जसे सगळे देव संकट आले की विष्णूकडे धाव घेतात, तसे कोणत्याही संकटातून वीर्यवान राम आपल्याला खात्रीने सोडवेल म्हणून भक्त रामाकडे धाव घेतात.
रामाचे दर्शन चंद्रासारखे प्रिय आहे. क्रोधात तो कालाग्नी समान आहे. तर क्षमा करण्यात तर तो पृथ्वीसारखा आहे. वनवासात धाडणार्या कैकयीला राम क्षमा करतो.
ज्याप्रमाणे पावसाचे ढग स्वत: नष्ट होतील; परंतु आपल्यात असलेलेले सर्व पाणी देतात, आपले सर्वस्व देतात; तसा दान देण्यात राम सर्वस्वाचा त्याग करणार्या मेघासारखा आहे.
राम साक्षात मूर्तिमंत धर्म आहे!
राम बोलण्यात प्रवीण आहे. तो बुद्धिमान् मधुराभाषी पूर्वभाषी प्रियंवदः आहे. अर्थात राम सत्य तर बोलतोच पण तो बुद्धिमान असल्याने -काय बोलायचे, काय नाही हे त्याला कळते. तो मधुरभाषी आहे, त्याचे सत्य बोलणेसुद्धा मधुर आहे, गोड आहे. समोरच्याला न दुखवता तो सत्य बोलतो. राम पूर्वभाषी आहे, म्हणजे तो आधी बोलतो. स्वत:हून विषय काढून, चौकशी करतो. समोरची व्यक्ती माझ्याशी बोलली तरच मी बोलेन, असा ताठा त्याच्या अंगी नाही.स्वत:हून संभाषण सुरु करणारा तो पूर्वभाषी आहे.
राम नेहेमीच शांत असतो (प्रशांतात्मा). तो नित्य मृदू बोलतो, कधीही कठोर वचन बोलत नाही. कुणी त्याच्यावर शंभर अपकार जरी केले तरी तो ते स्मरणात सुद्धा ठेवत नाही (न स्मरत्यपकाराणां). रामाला वेळ काढून वृद्ध, म्हणजे जे वयाने, बुद्धीने आणि कर्तृत्वाने वृद्ध आहेत, महान आहेत अशा लोकांशी चर्चा करतो. त्यांच्याकडून शिकण्याची संधी तो सोडत नाही.
राम स्वभावाने रुजू आहे, त्याचे वागणे सरळ आहे. तो कनवाळू आहे. दीनांच्या विषयी त्याला अनुकंपा आहे (दीनानुकम्पी). बुद्धिमान, विद्वान लोकांच्या विषयी त्याला आदर आहे.
एक राजा म्हणून, राम स्वत:च्या भावना प्रकट होऊ देत नाही. तो स्थितप्रज्ञ आहे. त्याचे विचार तो गुप्त ठेवतो. तो सर्वांना मदत करतो, पण कधी करायची आणि कधी करायची नाही हे तो नीट जाणतो. कुणाला शिक्षा करायची, कुणाचे रक्षण करायचे आणि कुणावर अनुग्रह करायचा ह्याची त्याला उत्तम समज आहे.
राम दुराग्रही नाही. दुर्वचनी नाही. तो महान वीर असून सुद्धा त्याला गर्वाची बाधा नाही. तो निरालस आहे आणि तो स्वदोष ओळखतो. त्याच्याकडून चूक घडली तर ती सुधारतो. असा राम प्रजेला अतिशय प्रिय आहे.
वाल्मिकी सांगतात, ”रामाची भार्या सीता त्याला अनुरूप होती. अनुकूल होती. त्याची अनुव्रता होती.”
रावण जेव्हा सीतेला पळवून नेण्यासाठी आला, तेव्हा तो त्या अबलेला म्हणाला, ”कशासाठी तू ह्या पर्णकुटीत दरिद्री रामासोबत राहतेस? माझ्याशी विवाह कर! सोन्याच्या लंकेची राणी हो! माझ्या सर्व राण्यांमध्ये मी तुला प्रमुख राणी करेन! स्वर्गाला लाजवेल असे माझे ऐश्वर्य आहे. त्या ऐश्वर्याची तू स्वामिनी हो!”
त्यावेळी मानिनी सीता रावणाला म्हणाली -
महा गिरिम् इव अकंप्यम् महेन्द्र सदृशम् पतिम्।
महा उदधिम् इव अक्षोभ्यम् अहम् रामम् अनुव्रता॥
3-47-33
माझा राम पर्वतासारखा अचल आहे, त्याच्यावर कितीही आणि कोणतेही संकट कोसळले तरी तो स्थिर राहतो. माझा पती इंद्रासारखा धीरोदात्त आहे. समुद्राप्रमाणे गंभीर असलेल्या, समुद्राप्रमाणे मर्यादेचे उल्लंघन न करणार्या रामाची मी अनुव्रता आहे!
सर्व लक्षण संपन्नम् न्यग्रोध परि मण्डलम्।
सत्य संधम् महाभागम् रामम् अनुव्रता॥
3-47-34
ज्या प्रमाणे वडाचे झाड (न्यग्रोध) सर्व उत्तम लक्षणांनी युक्त असते, त्याप्रमाणे माझा राम सर्व गुणांनी संपन्न आहे. शरण येणार्याला आश्रय देणारा राम-सर्व प्राण्यांना आश्रय देणार्या वटवृक्षासारखा आहे. एखाद्या तपस्व्याप्रमाणे अचल उभ्या असलेल्या वटवृक्षासारखा माझा राम आहे. मनाला शांती देणारा राम शीतल सावली देणार्या वटवृक्षासारखा आहे. प्रचंड विस्तार असलेल्या वटवृक्षासारखी माझ्या रामाची सत्ता सर्वत्र पसरली आहे. अशा सत्यनिष्ठ व महान रामाची मी अनुव्रता आहे.
वाल्मीकी जे रामायण लिहितात, ”ते या अशा व्यक्तीचे चरित्र लोकांना कळावे यासाठी. हे सगळे गुण शिकण्यासाठी समोर एक आदर्श असावा म्हणून ते रामायण लिहिलतात. ते आधी अशा गुणी मानवाचा शोध घेतात आणि मग तसा मानव सापडल्यावर त्याचे चित्र लिहितात.
अर्थात रामायणाचे उद्दिष्ट काय आहे, हे सद्गुण लोकांपर्यंत पोचवणे. शहाणे करून सोडावे सकल जन!
वाल्मिकी रामायण आणि इतर रामायणातील फरक
अनेक कवींना, संतांना रामायणाने मोहित केले आणि त्यांनी रामकथा पुन्हा नव्याने लिहिली. कोणी तिचे भाषांतर केले. कोणी त्या कथेत बदल केले. जसे -
* सेतु बांधण्यासाठी खार मदत करते.
* राम अक्षर लिहून टाकलेली दगडे पाण्यात तरंगतात.
* हनुमनाने त्याला दिलेल्या मोत्याच्या माळेतील प्रत्येक मोती फोडून आत राम नाही हे पाहून ती माला फेकून दिली. आणि मग छाती फाडून आपल्या हृदयातील राम दाखवला.
* लक्ष्मणाने काढलेली लक्ष्मण रेषा
* अहिल्या शिळा होऊन पडते. रामाच्या पदस्पर्शाने पुन्हा स्त्रीरूप प्राप्त करते.
* सीता स्वयंवरात रावण येतो आणि शिवधनुष्य त्याच्या अंगावर पडते.
* शबरी रामाला उष्टी बोरे देते, इत्यादी.
यातील एकही प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही. पण तरी हे सर्व प्रसंग किती प्रसिद्ध आहेत! आणि लोकप्रिय सुद्धा! ह्या प्रसंगांनी कुठेही वाल्मिकीच्या उद्दिष्टाला कमीपणा येत नाही. वा रामाला कमीपणा येत नाही. उलट त्याचे गुण ह्यातून अधिकच खुलवून दाखवले गेले आहेत.
इतरांनी बदल केले, तर मग चित्रपटाने बदल केले तर काय बिघडले? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. इथे एकच प्रश्न विचारावा- चित्रपटातील बदलांनी मानवाचे सद्गुण ठळक केले आहेत का? त्या बदलांनी रामाला अधिक उत्तम दाखवले आहे का? की चित्रपटातील बदलांनी रावणच चांगला वाटत आहे?
तसेच रामायणात बदल कोणी करावेत? एखादा मोठा ताकदीचा गायक, एखादा राग सादर करताना त्यात वर्ज्य स्वर पण लावून कमाल उडवतो; पण हे काम ऐर्यागैर्याचे नाही.
चित्रपटाने कथेत बदल केले आहेत, पण त्यातून रामाचे सद्गुण समोर येत नाहीत. उलट, रावणाच्या क्रूरतेला अन्यायाची झालर लावून त्याचे समर्थन करायचा प्रयत्न केल्यासारखे वाटते. त्याचे सामर्थ्य दाखवण्यासाठी त्याला पीडित ठरवण्याची आवश्यकता नव्हती.
लक्ष्मणाचे पात्र कॉमिक रिलीफसाठी का वापरले आहे, हेदेखील समजत नाही.
ताटकावध प्रसंगी कोणी राक्षस विश्वामित्रांचे रूप घेऊन येतो, लक्ष्मण आई-वडलांवर तलवार उगारतो, सीता शूर्पणखेचे नाक का कापले असा सवाल करते .... असले बदल खटकतात.
बदल कुणाला खटकतात?
ज्यांनी रामानंद सागर यांचे रामायण पहिले असेल त्यांना किंवा ज्यांनी वाल्मिकी रामायण ऐकले असेल त्यांना. खरी फसवणूक कुणाची आहे? जे मूळ कथा जाणत नाहीत त्यांची. त्यांना असे वाटू शकते की, रावण चांगला होता, लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापायला नको होते, तिचे नाक कापले म्हणूनच रावणाने सीतेला पळवून नेले...
आपल्या पाल्यांना मूळ रामायणाची ओळख करून देणे आई-वडील, काका-काकू, आत्या-मावशी, आजी-आजोबा...अशी सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी खालील पुस्तके उपयुक्त आहेत -
* अमर चित्र कथाचे रामायण
* माधवराव चितळे यांची ‘रामयाणावरील प्रवचने’
* श्री घैसास यांचे वाल्मीकी रामायणचे मराठी भाषांतर
* इंग्लिशमध्ये बिबेक देबरॉय यांचे क्रिटीकल एडिशनचे भाषांतर
* तसेच जपानी चित्रपट -The Legend of Prince Rama ठरार हा चित्रपट जरूर पाहावा आणि मुलांना दाखवावा असा आहे.
थोडक्यात...
चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्तम आहे. भव्य दृश्ये आहेत, उत्तम तऋद आहे, सुंदर वेशभूषा आणि स्थापत्य आहे; पण हे दृश्यवैभव म्हणजे रामायण नव्हे.
रामायणाचे अंतरंग म्हणजे - रामाचे सद्गुण, सीतेचे चरित्र, राम आणि सीतेचे अलौकिक प्रेम, रावणाचे क्रौर्य, तसेच कथेतील प्रेम, त्याग, धर्मसंकट, बंधुप्रेम, करुणा, शौर्य इत्यादि. या सर्व गोष्टी चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याने तो चित्रपट नीरस झाला आहे.