ध्येय, साधना आणि समर्पणाचा अखंड यज्ञ!

विवेक मराठी    19-Nov-2026
Total Views |
@ मुकुंद खोचे
9422246903
 
 
rss
वासुदेवराव उपाख्य आबा शिंगणे म्हणजे संघनिष्ठा, ज्ञानसाधना, सांस्कृतिक चेतना आणि समर्पित कार्यकर्तृत्वाचा विलक्षण जीवनप्रवास. त्यांच्या कार्याला वाहिलेली ही शब्दांजली.
व्यक्तींचे जीवन त्यांच्या पदांमुळे, अधिकारांमुळे अथवा लौकिक प्रसिद्धीमुळे मोठे ठरत नाही; तर त्यांनी स्वीकारलेल्या ध्येयासाठी केलेल्या निःस्वार्थ समर्पणामुळे ते समाजाच्या स्मृतिपटलावर अढळ स्थान प्राप्त करतात. त्यांच्या आयुष्याचा विचार करताना केवळ त्यांनी केलेल्या कामांची यादी समोर येत नाही, तर त्या कार्यामागील विचार, जीवनदृष्टी, मूल्यनिष्ठा आणि पुढील पिढ्यांसाठी त्यांनी निर्माण केलेला आदर्श अधिक प्रकर्षाने जाणवतो. वासुदेवराव उपाख्य आबा शिंगणे यांचे जीवन अशाच दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारपरंपरेत, पूजनीय सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या वैचारिक संस्कारांत घडलेले अनेक कार्यकर्ते ही समाजजीवनाची अमूल्य संपत्ती आहेत. आबा हे त्या परंपरेतील एक निष्ठावान, अभ्यासू आणि समर्पित कार्यकर्ते होते. त्यांचे जीवन एका ध्येयवेड्या कार्यकर्त्याचे होते; पण त्याचबरोबर ते ज्ञानाची उपासना करणार्‍या शिक्षकाचे, इतिहासाचे भान जपणार्‍या अभ्यासकाचे, संस्कृतीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असणार्‍या कार्यकर्त्याचे आणि आत्मिक साधनेत रममाण असणार्‍या व्यक्तीचेही होते. त्यांच्या जीवनाचे सार सांगणार्‍या या ओळी जणू त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे सूत्रच ठरतात...
 
“सेवा है यज्ञकुण्ड, समिधा सम हम जले ।
ध्येय महासागर में पथिकरूप हम मिले ॥”
 
या ओळी केवळ प्रेरणादायी काव्यपंक्ती नव्हत्या; त्या त्यांच्या जगण्याचा आशय होत्या. स्वतःचे सुख, सोय, अपेक्षा आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा यांपेक्षा स्वीकारलेल्या ध्येयाला प्राधान्य देणे, हेच त्यांनी आयुष्यभर आचरणातून दाखवून दिले.
 
 
प्रतिकूल परिस्थितीतून ध्येयसमर्पणाकडे
 
 
आबांचे बालपण आणि प्रारंभीचे जीवन आर्थिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. परिस्थितीने अनेक मर्यादा घातल्या होत्या; परंतु त्या मर्यादांनी त्यांच्या विचारांची उंची किंवा कार्याची दिशा कधीही खुंटली नाही. स्वतःच्या अडचणींचा बाऊ न करता, उपलब्ध साधनांमध्ये राहून ध्येयासाठी जगण्याची वृत्ती त्यांनी विकसित केली.ज्येष्ठ संघप्रचारक स्वर्गीय नानाराव ढोबळे यांच्या प्रयत्नांतून आबांना पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या जीवनातील हा महत्त्वपूर्ण वळणबिंदू ठरला. व्यक्तिगत जीवनाच्या चौकटीपलीकडे जाऊन समाजजीवनाच्या व्यापक क्षेत्रात स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. पुणे ग्रामीण परिसरात सलग दहा वर्षे पूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यांनी काम केले.
 
rss 
 
प्रचारकाचे जीवन हे केवळ एका संघटनेच्या विस्ताराचे काम नसते. ते समाजातील विविध स्तरांशी संवाद साधण्याचे, माणसे जोडण्याचे, त्यांच्यातील सुप्त क्षमतांना जागृत करण्याचे आणि सामूहिक ध्येयासाठी त्यांना प्रेरित करण्याचे कार्य असते. या कार्यात व्यक्तिगत सोयींपेक्षा समाजहिताला, प्रसिद्धीपेक्षा परिणामाला आणि अधिकारापेक्षा जबाबदारीला महत्त्व असते. आबांनी या जीवनपद्धतीचा स्वीकार केवळ कार्याच्या स्वरूपात केला नाही, तर ती आपल्या स्वभावाचा अविभाज्य भाग बनवली.
 
शिक्षणक्षेत्र - ज्ञानाला समाजाभिमुख करण्याची दृष्टी
 
पूर्ण वेळ प्रचारक म्हणून दहा वर्षे कार्य केल्यानंतर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळात शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. शिक्षक म्हणून त्यांची भूमिका केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरती मर्यादित नव्हती. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्यात जिज्ञासा, आत्मविश्वास, शिस्त, राष्ट्रीय जाणीव आणि सांस्कृतिक अभिमान निर्माण व्हावा, अशी त्यांची धारणा होती. भारतीय ज्ञानपरंपरेतील गणिताचा वारसा हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय होता. भारतीय गणित परंपरेला जागतिक ज्ञानविश्वात महत्त्वाचे स्थान असूनही आपल्या समाजात तिच्याविषयी पुरेशी जाणीव आणि अभिमान निर्माण झालेला नाही, याची त्यांना खंत होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी समविचारी शिक्षकांना एकत्र आणले आणि ‘गणित अध्ययन केंद्रा’ची स्थापना केली. या उपक्रमामागे केवळ गणित विषयाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा हेतू नव्हता. भारतीय गणितीय विचारांची परंपरा, तिचे योगदान आणि तिच्यामागील बौद्धिक सामर्थ्य नव्या पिढीसमोर आणणे, हा त्यामागील व्यापक उद्देश होता. आपल्या परंपरेचा अभिमान हा केवळ भावनेतून नव्हे, तर तिच्या ज्ञानात्मक योगदानाच्या अभ्यासातून निर्माण झाला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती.
 
 
इतिहास आणि राष्ट्रचेतनेचा जागर
 
आबांच्या कार्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे इतिहास आणि राष्ट्रीय जीवनातील प्रेरणादायी घटनांचे समाजाशी नाते जोडण्याची त्यांची तळमळ. इतिहास हा केवळ भूतकाळातील घटनांचा संग्रह नसतो; तो समाजाच्या सामूहिक स्मृतीचा, आत्मभानाचा आणि भविष्यदृष्टीचा आधार असतो, याची त्यांना जाणीव होती.
 
 
हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या जीवनचरित्राच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. या कार्यासाठी त्यांनी अनेक शाळांना भेटी दिल्या. शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्याशी संवाद साधला. अनंत कान्हेरे यांच्या जीवनातील देशभक्ती, धैर्य, त्याग आणि स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा त्यामागील हेतू तळमळीत परिवर्तित झाला होता.
 
 
इतिहासातील क्रांतिकारकांचे स्मरण हे केवळ त्यांच्या बलिदानाचे गौरवीकरण करण्यापुरते मर्यादित राहू नये. त्यांच्या जीवनातून राष्ट्रनिष्ठा, कर्तव्यभावना, स्वातंत्र्याची मूल्ये आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचे संस्कार नव्या पिढीवर व्हावेत, अशी त्यांची भूमिका होती. संत ज्ञानेेश्वर महाराजांच्या ज्ञानेेश्वरी लेखनाच्या 725 वर्षांच्या निमित्ताने त्यांनी शाळाशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पसायदानाचे वितरण केले. या उपक्रमातून त्यांनी संतवाङ्मयातील विश्वकल्याणाची भावना बालमनांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी हा केवळ आध्यात्मिक ग्रंथ नाही; तो जीवनाचे तत्त्वज्ञान, मानवी मनाचे सूक्ष्म आकलन आणि समस्त विश्वाच्या कल्याणाची व्यापक प्रार्थना व्यक्त करणारा महान सांस्कृतिक वारसा आहे.
 
 
पसायदानातील ‘भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे’ ही भावना मानवी समाजापुरती मर्यादित नसून समस्त जीवसृष्टीच्या परस्पर मैत्रीची आणि कल्याणाची आकांक्षा व्यक्त करते. ही उदात्त दृष्टी विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न त्यांच्या सांस्कृतिक जाणिवेची साक्ष देतो.
 
 
याचप्रमाणे ‘वंदे मातरम्’ गीताच्या 125 वर्षांच्या निमित्ताने शाळा...महाविद्यालयांत व्याख्यानांचे आयोजन करून व वंदे मातरम् या गीताचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे स्थान आणि भारतीय राष्ट्रचेतनेच्या निर्मितीतील त्याचे योगदान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. संबंधित साहित्याचे वितरण करून या विषयाचा अभ्यास अधिक व्यापक व्हावा, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
 
 
या सर्व उपक्रमांकडे स्वतंत्र कार्यक्रम म्हणून पाहण्यापेक्षा त्यामागील एकात्म सूत्र लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाशी जोडणे, संतपरंपरेतील उदात्त मूल्यांची ओळख करून देणे आणि राष्ट्रजीवनातील प्रेरणास्रोतांविषयी अभिमान व आस्था निर्माण करणे, हा या कार्यांचा समान धागा होता. ही काही निवडक उदाहरणे आहेत; त्यांच्या व्यापक कार्यविश्वातील ही केवळ वानगीदाखल उदाहरणे म्हणता येतील.
 
 
वनवासी कल्याण आणि प्रत्यक्ष सेवेची कठोर साधना
 
आबांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय म्हणजे वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य. या कार्याच्या प्रारंभीचा काळ अत्यंत कठीण होता. आज ज्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते, वाहने आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत, त्या काळात अनेक दुर्गम भागांत पोहोचणे हेच मोठे आव्हान होते. रस्ते नव्हते, वाहतुकीची साधने नव्हती आणि अनेक ठिकाणी नद्या ओलांडूनच पुढे जावे लागत असे. काही वेळा कपडे डोक्यावर बांधून नदी पार करावी लागे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही कार्यकर्त्यांनी आपले काम सुरू ठेवले. आबांनी या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि सेवेचा अर्थ केवळ सद्भावना व्यक्त करण्यात नसून, गरज असेल तेथे स्वतः कष्ट सहन करून समाजाच्या जवळ जाण्यात आहे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. वनवासी समाजाशी नाते जोडताना त्यांच्याविषयी केवळ सहानुभूती बाळगणे पुरेसे नसते; त्यांच्या जीवनाचा, संस्कृतीचा, परंपरांचा आणि परिस्थितीचा आदर राखून आत्मीयतेचे नाते निर्माण करावे लागते. अशा कार्यासाठी संयम, सातत्य आणि प्रत्यक्ष संपर्काची आवश्यकता असते. आबांच्या कार्यातून या मूल्यांचे दर्शन घडते.
 
इतिहास संकलन-दिलेल्या शब्दाशी अखेरपर्यंत निष्ठा
 
 
आबांच्या कार्यकर्तृत्वातील सर्वाधिक उल्लेखनीय आणि दीर्घकालीन अध्याय म्हणजे इतिहास संकलन समितीचे काम. ते काम तत्कालीन सहसरकार्यवाह आदरणीय कै.मोरोपंत पिंगळे या संघ अध्वर्यूंच्या शब्दावर त्यांनी हे कार्य स्वीकारले. एकदा स्वीकारलेले दायित्व कितीही दीर्घकाळाचे असले, कितीही अडचणी आल्या, तरी ते पूर्ण निष्ठेने निभावायचे, ही त्यांची वृत्ती जीवनभर पाळली.
 
 
या समितीचे कार्य त्यांनी सलग 32 वर्षे केले. इतिहास संकलन म्हणजे केवळ जुन्या घटनांची नोंद करणे नव्हे. समाजाच्या विस्मृतीत गेलेल्या ऐतिहासिक घटनांचा शोध घेणे, त्यांचे दस्तऐवजीकरण करणे, स्थानिक परंपरा आणि मौखिक इतिहासाचे महत्त्व जाणणे, उपलब्ध साधनांची चिकित्सा करणे आणि पुढील पिढ्यांसाठी ऐतिहासिक संदर्भ जतन करणे, ही एक गंभीर बौद्धिक जबाबदारी आहे. इतिहासाचे लेखन हे समाजाच्या आत्मभानाशी निगडित असते. इतिहासाकडे पूर्वग्रह न ठेवता, उपलब्ध साधनांच्या आधारे आणि सत्यशोधनाच्या भूमिकेतून पाहणे आवश्यक असते. अशा कामासाठी केवळ उत्साह पुरेसा नसतो; सातत्य, अभ्यासू वृत्ती, चिकाटी आणि संयम यांची आवश्यकता असते. आबांनी तीन दशकांहून अधिक काळ या कार्याला दिलेला वेळ त्यांच्या कार्यकाळात प्रसिद्ध झालेल्या ऐतिहासिक पुस्तकांच्या रुपाने कार्यनिष्ठेची साक्ष देतो. विशेष म्हणजे, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातही त्यांनी हा वसा सोडला नाही. स्वतःची प्रकृती साथ देत नसतानाही समितीच्या कामाविषयीची त्यांची आस्था कमी झाली नाही. समितीचे विद्यमान अध्यक्ष आजारी असल्याचे समजल्यावर, स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता, निधनाच्या अवघ्या आठ दिवस आधी ते त्यांची भेट घेण्यासाठी गेले. स्वतःच्या आयुष्याचा अंतिम टप्पा जवळ आला असतानाही दुसर्‍या कार्यकर्त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जाणे, हा त्यांच्या स्वभावाचा अत्यंत बोलका परिचय आहे.
संस्कृत आणि भारतीय ज्ञानपरंपरेशी आत्मीय नाते
 
संस्कृत ही भारतीय ज्ञानपरंपरेची एक महत्त्वाची वाहिनी आहे. धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान, व्याकरण, गणित आणि विविध शास्त्रांच्या विशाल परंपरेचे संवर्धन संस्कृत भाषेच्या माध्यमातून झाले आहे. या भाषेचे आणि तिच्या ज्ञानसंपदेचे महत्त्व आबांना मनापासून जाणवत होते. भारत संस्कृत परिषदेमार्फत त्यांनी संस्कृतविषयक कार्याला अप्रत्यक्षरीत्या खूप सहकार्य केले. किंबहुना माझ्यासारखे संस्कृतविषयीचे कार्यकर्ते ही आबांचीच किमया आहे.
 
 
कार्यकर्ते घडविण्याची कला-स्वतःपेक्षा कार्याला प्राधान्य
 
आबांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे कार्यकर्ते ओळखण्याची, त्यांच्या क्षमता जाणून घेण्याची आणि त्यांना योग्य संधी देण्याची हातोटी. अनेक जण स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी काम करतात; परंतु काही व्यक्ती इतरांच्या कर्तृत्वाला वाव देण्यातच आपल्या कार्याचे यश मानतात. आबा या दुसर्‍या प्रकारातील होते. त्यांना स्वतः प्रकाशझोतात राहण्याची विशेष अपेक्षा नव्हती. एखादे काम यशस्वी व्हायचे असेल, तर योग्य व्यक्तीला पुढे आणणे, त्याला जबाबदारी देणे, त्याच्या पाठिशी उभे राहणे आणि आवश्यक तेथे मार्गदर्शन करणे, हे ते अधिक महत्त्वाचे मानत. अनेकदा स्वतः मागे राहून इतरांना पुढे करून त्यांनी काम उभे केले. समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींना संघविचाराशी जोडणे, त्यांच्यातील सकारात्मकता ओळखणे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाभिमुख कामाची व्याप्ती वाढविणे, हे त्यांचे प्रभावी संघटनकौशल्य होते. कार्याचा विस्तार हा केवळ संघटनेतील सदस्यसंख्येवर अवलंबून नसतो; तर समाजातील विविध व्यक्तींच्या सद्भावना, क्षमता आणि सहभाग यांना एकत्र आणण्यावर अवलंबून असतो, हे त्यांना उमगले होते.
 
 
त्यांच्या कार्यपद्धतीत दोष शोधण्यापेक्षा उपाय शोधण्याला, व्यक्तिगत श्रेयापेक्षा सामूहिक यशाला आणि मतभेदांपेक्षा कार्याच्या उद्दिष्टाला अधिक महत्त्व होते. एखाद्या कामामुळे स्वतःला त्रास झाला, अडचणी आल्या किंवा अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, तरी त्याबद्दल इतरांना दोष देत बसणे त्यांना मान्य नव्हते. काम पूर्ण होणे आणि सर्वांचा सहभाग टिकून राहणे, यालाच ते महत्त्व देत.
यामागे एक मूलभूत जीवनमूल्य होते; व्यक्तीपेक्षा कार्य मोठे. ही केवळ बोलण्याची उक्ती नव्हती; ती त्यांच्या व्यवहारातील भूमिका होती. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली, त्यांना घडविले आणि कार्याच्या केंद्रस्थानी आणले. म्हणूनच त्यांच्या योगदानाचे मूल्यमापन करताना त्यांनी स्वतः केलेल्या कामांबरोबरच त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने उभे राहिलेले कार्यकर्तेही लक्षात घ्यावे लागतात.
 
श्रीगुरुजी रुग्णालयासाठी आर्थिक सहकार्य
 
समाजोपयोगी संस्थांच्या कार्याला केवळ वैचारिक पाठिंबा देऊन चालत नाही; त्यासाठी प्रत्यक्ष आर्थिक आणि मानवी सहकार्याचीही आवश्यकता असते. श्रीगुरुजी रुग्णालयाच्या कार्यासाठी आबांनी सूर्यनमस्काराच्या पुस्तकांच्या 10-10 रुपये विक्रीतून आर्थिक सहकार्य उभे करण्याचा प्रयत्न केला. उपलब्ध साधनांचा उपयोग करून परिवारातील संस्थेच्या कार्याला हातभार लावण्याची त्यांची ही वृत्ती त्यांच्या व्यवहारकुशलतेचे उदाहरण आहे. त्यांच्या दृष्टीने सेवा ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती. शिक्षण, संस्कृती, इतिहास, आरोग्य, वनवासी कल्याण किंवा संघटन जिथे समाजहिताचे काम आहे, तिथे आपल्या परीने योगदान देणे, हाच त्यांच्या जीवनाचा स्वभाव होता.
 
 
कुटुंबाची जबाबदारी
व्यक्तिगत जीवनातील साधेपणा
 
सार्वजनिक जीवनात पूर्णपणे समर्पित असणार्‍या व्यक्तींच्या बाबतीत कधी कधी कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. मात्र आबांच्या जीवनात सार्वजनिक कार्य आणि कौटुंबिक जबाबदारी यांच्यात कृत्रिम भेद नव्हता. कुटुंबातील प्रत्येकाचे काम त्यांनी आपलेच दायित्व मानले. आपल्या परीने प्रत्येकाला आधार देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जीवनातील साधेपणा हा केवळ बाह्य राहणीमानापुरता नव्हता; तो त्यांच्या विचारांत आणि दैनंदिन व्यवहारातही होता.
 
आयुष्याच्या अखेरच्या काळापर्यंत स्वतःचे कपडे स्वतः हाताने धुणे आणि दैनंदिन कामे शक्यतो स्वतःच करणे, ही त्यांची सवय होती. शरीर साथ देत असेपर्यंत स्वावलंबन जपण्याची त्यांची वृत्ती अखेरपर्यंत कायम राहिली.
 
 
स्वावलंबन म्हणजे केवळ दुसर्‍यावर अवलंबून न राहणे नव्हे; तर आपल्या क्षमतेनुसार स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडणे, श्रमाची प्रतिष्ठा मान्य करणे आणि जीवनातील साधेपणा जपणे होय. आबांच्या या सवयी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील शिस्त आणि आत्मसन्मानाचे दर्शन घडवतात.
 
 
ज्ञानसाधना, नामस्मरण आणि योगाभ्यास
 
आबांचे सार्वजनिक जीवन जितके कार्यमग्न होते, तितकेच त्यांचे व्यक्तिगत जीवन साधनाप्रधान होते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांचे ते नियमित वाचन करीत. ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेचा अभ्यास त्यांच्या जीवनाचा भाग होता. रामनामाचा अखंड जप आणि योगाभ्यास यांतून त्यांनी आपल्या मनाची आणि शरीराची शिस्त जपली. त्यांच्या साधनेत कर्म आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वय होता. आध्यात्मिकता म्हणजे जगापासून दूर जाणे नव्हे, तर जीवनातील कर्तव्ये अधिक सजगतेने आणि समत्वबुद्धीने पार पाडण्याची अंतःप्रेरणा, असा तिचा अर्थ त्यांच्या जगण्यातून व्यक्त होत असे. ज्ञानेेश्वरीचा अभ्यास, भगवद्गीतेतील कर्मयोगाची शिकवण, गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांतील नामस्मरणाचा संदेश आणि प्रत्यक्ष जीवनातील सेवाकार्य या सर्वांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला संस्कार लक्षात घेतला, तर त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक बैठक अधिक स्पष्ट होते. त्यांच्यासाठी साधना आणि सेवा या परस्परविरोधी नव्हत्या; उलट एकमेकींना बळ देणार्‍या जीवनप्रवृत्ती होत्या.
 
अखेरच्या क्षणापर्यंत कार्याची ओढ
 
आबांच्या जीवनाचा अखेरचा काळ त्यांच्या कार्यनिष्ठेचे सर्वांत हृदयस्पर्शी दर्शन घडविणारा ठरला. आबांच्या धर्मपत्नी वृंदा काकू यांचे देहावसान झाल्याने त्यांच्या सांत्वनासाठी इतिहास संकलन समितीच्या कार्यकर्त्या डॉ. अंजली वेखंडे भेटायला गेल्या होत्या. त्या वेळीही आबांच्या मनात स्वतःच्या प्रकृतीपेक्षा समितीचे आणि पुढील कामाचे विचार अधिक होते. त्यांनी डॉ. अंजली वेखंडे यांना विचारले...“कुंभमेळ्याबद्दलचे पुस्तक कधी प्रकाशित करणार आहात? ते लवकर करा म्हणजे मला त्याबद्दल दोन शब्द लिहिता येतील.” या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण जीवनाचा आशय सामावलेला आहे. स्वतःचे आयुष्य संध्याकाळीकडे झुकलेले असतानाही त्यांना पुढील कामाची चिंता होती. स्वतःसाठी सहानुभूती किंवा सांत्वनाची अपेक्षा करण्याऐवजी दुसर्‍या कार्यकर्त्याला पुढील कामासाठी प्रेरणा देणे, ही त्यांच्या स्वभावाची सहज अभिव्यक्ती होती. त्यांच्या या प्रश्नात केवळ एका पुस्तकाच्या प्रकाशनाची उत्सुकता नव्हती; तर काम थांबू नये, पुढील पिढीने ते पुढे न्यावे आणि आपणही शक्य असेल तर त्यात आपले योगदान द्यावे, ही अखेरपर्यंत टिकून राहिलेली कार्यप्रेरणा होती.
 
 
त्यांच्या आयुष्याचा अंतिम प्रवासही हळूहळू शांत होत गेला. प्रकृतीची शक्ती कमी होत गेली आणि शरीराच्या मर्यादा असताना देखील योग बलाच्या सामर्थ्याने मृत्यूला अलिंगन देत शांतपणे देह ठेवला. त्यांच्या आयुष्यभराच्या सहचारिणीचे निधन त्यांच्या निधनाच्या आदल्या रात्री झाले. त्याच दिवशी त्यांच्या पत्नीचे अंत्यसंस्कार पार पडले आणि सायंकाळी आबांनीही या जगाचा निरोप घेतला. आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने वाटचाल केलेल्या दोन जीवांचा हा विरह आणि त्यानंतर लगेचच आबांचे जाणे, हा त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि परिचितांसाठी अत्यंत वेदनादायी प्रसंग ठरला. आबांच्या निधनाने केवळ एक ज्येष्ठ कार्यकर्ता हरपला नाही; तर अनेक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांना जोडणारा, त्यांच्या पाठीशी उभा राहणारा आणि कार्याच्या सातत्याची चिंता करणारा एक आधारवड हरपला. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली पोकळी ही त्यांच्या कार्याच्या व्याप्तीची आणि माणसांशी जोडलेल्या आत्मीय नात्यांची जाणीव करून देते.
 
 
व्यक्ती मागे राहते
विचार आणि कार्य पुढे चालत राहते
 
आबांच्या जीवनाचा समग्र विचार केला, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू एकाच व्यापक जीवनदृष्टीने जोडलेले दिसतात.
संघनिष्ठा, शिक्षणक्षेत्रातील योगदान, भारतीय गणितपरंपरेविषयीची आस्था, इतिहासाचे जतन, संतसाहित्याचा प्रसार, संस्कृतविषयक कार्य, वनवासी समाजाशी आत्मीय संबंध, कार्यकर्त्यांची निर्मिती, कौटुंबिक जबाबदारी आणि आध्यात्मिक साधना हे वेगवेगळे विषय नव्हते. एका ध्येयवादी जीवनाचे ते परस्परपूरक आविष्कार होते.
 
त्यांनी आपले आयुष्य कोणत्याही एका क्षेत्राच्या चौकटीत मर्यादित ठेवले नाही. जिथे समाजाचे हित आहे, जिथे संस्कृतीचे संवर्धन आवश्यक आहे, जिथे इतिहासाचे भान जागृत करायचे आहे, जिथे कार्यकर्ते घडवायचे आहेत आणि जिथे एखादे दायित्व स्वीकारले आहे, तिथे शक्य तेवढे योगदान देत राहणे, ही त्यांची जीवनपद्धती होती.
 
 
त्यांच्या आयुष्याचे सारगर्भित वर्णन म्हणजे...मोठे कार्य उभे करण्यासाठी नेहमी मोठी पदे, मोठी साधने किंवा प्रसिद्धीची आवश्यकता नसते. आवश्यक असते ती ध्येयावरील निष्ठा, दिलेल्या शब्दाची जाणीव, सातत्याने परिश्रम करण्याची तयारी आणि इतरांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची उदारता. या गुणांच्या आधारे सामान्य माणूसही असामान्य कार्य उभे करू शकतो.
आबांनी स्वतःच्या आयुष्याचे यज्ञकुंड केले आणि त्यात आपल्या कष्टांची, वेळेची, बुद्धीची आणि शक्तीची समिधा अर्पण केली. त्यांच्या कार्याचा खरा गौरव केवळ स्मरणसभेत किंवा श्रद्धांजलीच्या शब्दांत नाही; तर त्यांनी जपलेली मूल्ये पुढे नेण्यात आहे. त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांनी अधिक सक्षमपणे काम करणे, त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांना सातत्य देणे आणि त्यांनी जपलेल्या ध्येयनिष्ठेचा आपल्या जीवनात स्वीकार करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
 
व्यक्तीचा देह काळाच्या पडद्याआड जातो; परंतु तिच्या विचारांचा स्पर्श, कार्याची प्रेरणा आणि तिने घडविलेली माणसे समाजजीवनात पुढेही कार्यरत राहतात. आबांचे जीवन याच सत्याची प्रचिती देणारे आहे. ध्येयासाठी जगलेले आयुष्य कधी संपत नाही; ते पुढील पिढ्यांच्या कर्तृत्वातून सतत प्रवाहित होत राहते.
 
वासुदेवराव उपाख्य आबा शिंगणे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! त्यांच्या समर्पित जीवनाला आणि कार्याला कृतज्ञतेचा प्रणिपात!