विस्तीर्ण समुद्रकिनारा, एका बाजूला उभा असलेला उत्तुंग सह्याद्री पर्वत, मध्ये पसरलेले कातळाचे सडे, दाट सदाहरित जंगले, खाड्या, खारफुटीची वने आणि भातशेती यामुळे कोकणचा भूभाग निसर्गसंपदेने समृद्ध आहे. या निसर्गसंपदेत रत्नागिरी जिल्ह्याचे स्थानही अनन्यसाधारण आहे. मागील काही वर्षांपासून स्थानिक पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि वनविभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षिविश्वाचे नवनवीन पैलू जगासमोर येत आहेत. याच पक्षिवैभवात नुकतीच आणखी एका अत्यंत दुर्मीळ आणि देखण्या पक्ष्याची भर पडली आहे. राजापूर तालुक्यातील पक्षी निरीक्षक डॉ. श्रीकृष्ण मगदूम यांना रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच ‘राखी डोक्याचा बुलबुल’ (Grey-headed Bulbul) या पक्ष्याचे दर्शन घडले आहे. या ऐतिहासिक नोंदीमुळे जिल्ह्यातील पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आजवर सुमारे 366 ते 367 पक्षी प्रजातींची अधिकृत नोंद झाली आहे. यात आता ’राखी डोक्याच्या बुलबुल’ची भर पडल्याने जिल्ह्याच्या जैवविविधतेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जागतिक स्तरावरील पक्षी नोंदींचा डिजिटल मंच ’ई-बर्ड’वर रत्नागिरी जिल्ह्यातील नोंदी सातत्याने वाढत आहेत. ही वाढ पक्ष्यांची संख्या दर्शवतानाच जिल्ह्यातील विविध नैसर्गिक अधिवासांचे महत्त्व अधोरेखित करते आहे. पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) भाग हा जगातील आठ प्रमुख जैवविविधता हॉटस्पॉट्सपैकी एक मानला जातो. या भागात अनेक स्थानिक (Endemic) प्रजाती आढळतात, ज्या जगात इतरत्र कोठेही नैसर्गिकारीत्या आढळत नाहीत. ’राखी डोक्याचा बुलबुल’ हा देखील असाच एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पश्चिम घाटापुरता मर्यादित असलेला स्थानिक पक्षी आहे. हा पक्षी जगात केवळ भारताच्या पश्चिम घाटात आढळतो. आजवर त्याची नोंद प्रामुख्याने केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागात होती. अर्थात देवगड तालुक्याच्या उत्तर भागात आणि वैभववाडी तालुक्यात त्याच्या नोंदी अत्यल्प आहेत. असे असले तरी रत्नागिरी जिल्ह्यात या पक्ष्याची नोंद झालेली नव्हती. राजापूर तालुक्यात पक्षी निरीक्षक डॉ.श्रीकृष्ण मगदूम यांनी या पक्ष्याचे छायाचित्रण आणि नोंद केल्यामुळे या पक्ष्याचा ज्ञात भौगोलिक विस्तार उत्तरेकडे सरकला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राखी डोक्याचा बुलबुल हा आकाराने लहान असून त्याची लांबी साधारणपणे 17 ते 19 सेंटीमीटर (सुमारे 143 ते 152 मिमी) इतकी असते. त्याची रंगसंगती अतिशय आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. या पक्ष्याचे डोके, मानेचा मागील भाग आणि गळा फिकट ते मध्यम राखाडी रंगाचा असतो. डोक्यावरील या राखाडी रंगामुळेच त्याला ’राखी डोक्याचा बुलबुल’ हे नाव पडले आहे. त्याच्या कपाळावर चमकदार पिवळसर-हिरवी छटा दिसते. त्याचे डोळे फिकट निळसर-पांढर्या रंगाचे असतात. डोळ्यांभोवती असलेल्या हिरवट ऑलिव्ह रंगामुळे आणि पांढुरक्या बुबुळांमुळे हा पक्षी नेहमीच काहीसा ’आश्चर्यचकित’ झाल्यासारखा दिसतो. शरीराचा मुख्य भाग, पाठ आणि पंख हिरवट ऑलिव्ह रंगाचे असतात, जे पोटाकडे जाताना अधिक फिकट पिवळसर होत जातात. त्याच्या शेपटीची मधली पिसे राखाडी रंगाची असतात, तर बाहेरील पिसे काळी असून त्यांच्या टोकावर राखाडी किनार असते. चोच करड्या-हिरव्या रंगाची, तर पाय फिकट गुलाबी-पिवळसर रंगाचे असतात. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात; मात्र पिल्लांचे डोके गडद ऑलिव्ह रंगाचे असते आणि कपाळावरील पिवळा रंग फिकट असतो. हा पक्षी अत्यंत लाजाळू वृत्तीचा असून जंगलातील दाट झाडाझुडपांमध्ये, वेताच्या बनात आणि बांबूच्या बेटांमध्ये वावरणे पसंत करतो. सदाहरित आणि निम-सदाहरित जंगलांतील पाणथळ जागा, ओढे किंवा नद्यांच्या काठावरील दाट झुडपे हा त्याचा आवडता अधिवास आहे.
इतर बुलबुल प्रजातींप्रमाणे हा पक्षी मोठ्या थव्याने फिरत नाही, तर एकटा किंवा जोडीने राहणे पसंत करतो. त्याचा अतिशय मधुर आणि सुरेल आवाज त्याच्या अस्तित्वाची चाहूल देतो. त्याचा कॉल मंजुळ शिट्टीसारखा, स्वच्छ आणि काहीशा चढ-उतार असलेल्या सुरांमध्ये ऐकू येतो. त्याच्या या गोड आवाजामुळे जंगलातील नैसर्गिक शांततेत आणि दाट झाडीतही त्याची उपस्थिती सहज जाणवत असल्याचे डॉ.मगदूम यांनी सांगितले. या पक्ष्याच्या आहारात प्रामुख्याने विविध प्रकारची जंगली फळे आणि लहान कीटकांचा समावेश होतो. जंगलातील बियांचा प्रसार करण्यात हा पक्षी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. राखी डोक्याच्या बुलबुलचा प्रजनन काळ साधारणपणे मार्च ते जुलै या कालावधीत असतो. दाट झुडपांमध्ये जमिनीपासून थोड्या उंचीवर हा पक्षी गवत, मुळे आणि कोळ्यांच्या जाळ्यांचा वापर करून वाटीच्या आकाराचे घरटे बांधतो. हा स्थलांतरित पक्षी नसून पश्चिम घाटात वर्षभर आढळणारा स्थानिक निवासी पक्षी आहे. आययूसीएन (IUCN) आणि ’स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स’च्या ताज्या अहवालानुसार, या पक्ष्याचा जागतिक स्तरावरील संवर्धन दर्जा ’लीस्ट कन्सर्न’ (Least Concern) असा नोंदवण्यात आला आहे. तसेच, भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972च्या सुधारित अनुसूची दोनमध्ये (Schedule II) या पक्ष्याला कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. असे असले तरी, हा पक्षी केवळ पश्चिम घाटातील विशिष्ट सदाहरित जंगलांवर अवलंबून असल्यामुळे जंगलतोड, खाणकाम आणि अधिवासाचे तुकडीकरण हे त्याच्या अस्तित्वापुढील मोठे धोके आहेत. त्यामुळे राजापूर आणि परिसरातील सदाहरित जंगले आणि देवरायांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे भौगोलिक स्थान असे आहे की, येथे एकाच वेळी सागरी पक्षी, पाणथळ जागेतील स्थलांतरित पक्षी, गवताळ सड्यावरील पक्षी आणि सह्याद्रीच्या जंगलातील पक्षी पाहायला मिळतात. मागील दहाएक वर्षांत जिल्ह्यात अनेक दुर्मीळ आणि यापूर्वी कधीही न दिसलेल्या पक्ष्यांच्या नोंदी झाल्या आहेत. मे 2025मध्ये रत्नागिरीतील पक्षी अभ्यासक अॅड.प्रसाद गोखले आणि निखिता शिंदे यांच्या चमूला जिल्ह्यातील कातळाच्या सड्यावरील तलावाजवळ अतिसंकटग्रस्त ’तणमोर’ या पक्ष्याचे प्रथमच दर्शन घडले होते. तणमोर हा माळढोक (Bustard) कुळातील भारतातील सर्वात लहान पक्षी आहे. जगभरात या पक्ष्याची संख्या झपाट्याने कमी होत असून तो प्रामुख्याने गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील गवताळ प्रदेशात आढळतो. कोकणातील कातळाच्या सड्यावर त्याचे आढळून येणे, हे सड्यांच्या परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरले होते. युरोपियन पांढरा करकोचा हा हिवाळी स्थलांतरादरम्यान हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येणारा हा परदेशी पाहुणा.
महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ मानल्या गेलेल्या या पक्ष्याचे 2025मध्ये देवरूख आणि चिपळूण परिसरात दर्शन झाले होते. जुलै 2023मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक गावातील खाडीकिनारी स्थानिक पक्षी निरीक्षक मनोज केळकर यांना सकाळी जाणार्या ’रेड-बिल्ड ट्रॉपिकबर्ड’ हा दुर्मीळ आणि थकलेला समुद्री पक्षी आढळून आला होता. दापोली वनपरीक्षेत्र कार्यालयाने या पक्ष्याची तपासणी करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले होते. नोव्हेंबर 2026मध्ये रत्नागिरी शहरात चंपक मैदानावर या युरोपियन पांढर्या करकोच्याने मुक्काम ठोकला होता. जून 2026मध्ये दापोली तालुक्यातील मुर्डीच्या किनार्यावर दापोली वनविभाग आणि ’वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर’ या संस्थेतर्फे दुर्मीळ मास्क्ड बुबी पक्ष्याचा बचाव करण्यात आला होता. हा पक्षी शेतकरी वैभव झगडे यांच्या शेतात आढळून आला होता. निसर्ग चक्रीवादळानंतर जानेवारी 2021मध्ये रत्नागिरी शहरात हौशी पक्षी निरीक्षक आशिष शिवलकर, डॉ.प्रणव परांजपे आणि सहकार्यांना दुर्मीळ ’इजिप्शियन गिधाड’ आढळून आले होते. तेव्हापासून या पक्षाचे येथे दरवर्षी दर्शन होत आहे. सप्टेंबर 2022मध्ये रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावामध्ये स्थानिक पक्षी निरीक्षक ओंकार मोघे यांनी ’निळ्या दाढीवाला राघू’ या देखण्या आणि दुर्मीळ पक्ष्याची पहिली नोंद केली होती. सामान्य राघूपेक्षा आकाराने मोठा आणि गळ्याखाली निळ्या रंगाची लांब पिसे असलेला हा पक्षी घनदाट जंगलात राहतो. यापूर्वी त्याची नोंद राजापूर आणि चिपळूणच्या घाटमाथ्यावर झाली होती.
जिल्ह्यातील देवराया आणि जुन्या वृक्षांच्या राया या धनेश पक्ष्यांचे हक्काचे घर बनल्या आहेत. डिसेंबर 2021मध्ये गुहागर तालुक्यातील आबलोली आणि तरळ परिसरात ’मलबार पाइड हॉर्नबिल’च्या जोडप्याचे छायाचित्रण झाले होते. महाधनेश (Great Indian Hornbill) या राज्यपक्षी दर्जाच्या किंवा वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी रत्नागिरी वनविभागाने 2026मध्ये पहिल्यावहिल्या ’रत्नागिरी बर्ड कॉन्फरन्स’मध्ये महाधनेश पक्ष्याला जिल्ह्याचा प्रमुख मानचिन्ह पक्षी (Flagship Species) म्हणून घोषित केले. जिल्ह्यातील दाभोळ, जयगड आणि पूर्णगड खाडी परिसरात हिवाळी स्थलांतरादरम्यान अनेक दुमीर्र्ळ पाणपक्ष्यांच्या नोंदी गेल्या दहा वर्षांत झाल्या आहेत. संगमेश्वर, मार्लेश्वर आणि आंबा घाट परिसरातील घनदाट जंगलात या निसर्गनिर्मित छद्मावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या पक्ष्यांचे अस्तित्व अभ्यासकांनी सिद्ध केले आहे. रत्नागिरी आणि गणपतीपुळे किनार्यापासून खोल समुद्रात केलेल्या पक्षी निरीक्षण मोहिमांमध्ये विल्सन्स स्टॉर्म पेट्रेल (Wilson's Storm Petrel), फ्लेश-फुटेड शिअरवॉटर (Flesh-footed Shearwater) आणि पॉमेरिन स्कृआ (Pomarine Skua) यांसारख्या दुर्मीळ सागरी पक्ष्यांची नोंद गेल्या दशकात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारे, खाड्या, खारफुटीची जंगले, कातळाचे सडे, बागायती (आंबा-काजूच्या बागा) आणि सह्याद्रीची सदाहरित जंगले असे पाच ते सहा प्रकारचे अधिवास एकत्र पाहायला मिळतात. जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये आजही ’देवराया’ जपल्या गेल्या आहेत. देवाच्या नावाने राखलेल्या या जंगलांमध्ये वृक्षतोड होत नसल्याने जुने वटवृक्ष, उंबर, नाना, किंजळ आणि वेताची बने टिकून आहेत. ’राखी डोक्याचा बुलबुल’ किंवा ’धनेश’ यांसारख्या पक्ष्यांसाठी या देवराया जीवनदायी ठरत आहेत. कोकणातील सडे हे केवळ उजाड दगड नसून ती एक स्वतंत्र आणि समृद्ध परिसंस्था आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या सड्यांवर फुलणारी रानफुले, कीटक आणि साचणारे पाणी यामुळे ’तणमोर’ आणि ’धाविक’ यांसारख्या गवताळ प्रदेशातील पक्ष्यांना येथे आश्रय मिळतो. जिल्ह्यातील अनेक स्थानिक पक्षीनिरीक्षकांच्या जिद्दीमुळे आणि आधुनिक कॅमेर्यांच्या मदतीने होणार्या दस्तावेजीकरणामुळे या दुर्मीळ नोंदी जगासमोर येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षीयादी 366हून अधिक प्रजातींपर्यंत पोहोचण्याच्या टप्प्यावर निसर्ग संवर्धनाची जबाबदारीही वाढली आहे. कातळाचे सडे हे ’पडीक जमीन’ समजून त्यावर मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण, वृक्षारोपण किंवा बांधकामे केली जात आहेत. यामुळे तणमोर, टिटवी आणि धाविक यांसारख्या सड्यावरील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी होणारी अनिर्बंध वृक्षतोड आणि वणवे यामुळे विविध प्रजातींच्या निवार्यावर गदा येते आहे. समुद्रकिनार्यांवरील वाढता मानवी हस्तक्षेप आणि प्लास्टिक कचरा सागरी पक्ष्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. ’राखी डोक्याचा बुलबुल’ या पक्ष्याची नोंद ही रत्नागिरी जिल्ह्याच्या निसर्गाने दिलेली एक सकारात्मक साद आहे. निसर्ग अजूनही आपले वैभव टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. आपण ते जपण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. स्थानिक नागरिक, शासन, वनविभाग आणि पक्षी अभ्यासक यांनी एकत्र येऊन रत्नागिरीतील जंगले, देवराया, सडे आणि समुद्रकिनारे यांचे रक्षण केले, तर भविष्यातही ही भूमी देश-विदेशातील दुर्मीळ पक्ष्यांचे हक्काचे आश्रयस्थान बनून दुर्मीळ दर्शन घडवील.