प्रदीप पराडकर
9819051104
आपली संस्कृती वसुधैव कुटुंबकम् आणि मानवजात एक आहे ही विचारसरणी शिकवते. पूर्वांचल भारत आणि उर्वरित भारत यांच्यातील असलेली दरी संपविणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग प्रशस्त करणे. या मार्गिकेवर गेले काही वर्षे जनकल्याण समिती काम करीत आहे. पूर्वाचल छात्रालय शिबिर त्यातीलच एक उपक्रम. या माध्यमातून रा. स्व. संघ सेवाकार्यातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती गेले तीस वर्ष महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पूर्वांचलमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात घेऊन येऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्याचबरोबर राष्ट्रीय विचारांशी जोडलेले जावे या पार्श्वभूमीवर विद्यार्थी निवासी वसतिगृह असा उपक्रम सुरू केला. त्यामागे एक विशिष्ट भूमिका नजरेसमोर ठेवून तत्कालीन संघाचे प्रांत प्रचारक कै. मुकुंदराव पणशीकर यांनी या विषयात विशेष पुढाकार घेऊन ही योजना राबवली व दरवर्षी विविध प्रांतामधून येणारे हे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात, पुढील काळामध्ये आपापल्या प्रांतात जाऊन तिथल्या समाजजीवनामध्ये राष्ट्रीय विचार घेऊन सक्रिय होतात ही त्यातली मोठी उपलब्धी आहे. त्याचबरोबर पुढील शिक्षण घेऊन, आपल्या आयुष्याची रचनाही करतात. आतापर्यंत असे शेकडो विद्यार्थी या वसतिगृहातून शिकून पुढे आपापल्या ठिकाणी स्थिर झालेले आपण पाहतो. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क त्यांना प्रत्यक्ष वसतिगृहात येऊन निवास करून इथल्या वातावरणाचा परिचय करून देणे या उपक्रमामुळे विश्वासार्हता निर्माण झाली आहे.
काही दशकापूर्वी पूर्वांचलचा सर्व प्रदेश देशापासून तुटून जाईल की काय अशी परिस्थिती होती, भौगोलिकदृष्ट्या चिंचोळ्या पट्टीचा हा भाग, भारताच्या मुख्य भूमीशी जोडणाचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला. राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग प्रस्थापित करण्यात जनकल्याण समितीच्या पूर्वांचल विकास आयामाचा महत्त्वाचा वाटा आहे. गेल्या काही वर्षात तेथील परिस्थितीत सुधारणा, राजकीय परिवर्तन, भौगोलिक विकास त्यात आश्वासक बदल नक्कीच झाला आहे. त्यामुळे एक प्रकारे ही राज्ये राष्ट्रीय एकात्मतेशी खूप चांगल्या पद्धतीने जोडली गेली आहेत. त्याचे परिणामही आज जाणवत आहेत.
पूर्वांचल हा आठ राज्ये असलेला - आसाम, त्रिपुरा, मेघालय, नागलैंड, अरुणाचल, मणिपुरव, मिझोराम व सिक्कीम राज्यांच्या मिळून बनलेला आहे. निसर्ग सौंदर्य व खनिज संपत्तीने समृद्ध असलेला भाग व भौगोलिक दुर्गमतेमुळे राष्ट्रीय प्रवाहापासून बाजूला राहिला. भाषा, वेशभूषा, आहार, विहार, पूजापद्धती, शारीरिक रचना यामध्ये वैविध्य असलेला पूर्वांचल पण याविषयी देशाच्या उर्वरित भागात मोठ्या प्रमाणात गैरसमज होता व तो आजही काही प्रमाणात आहे. याचा फायदा धर्मांतरासाठी ख्रिश्चन मिशनरी घेत होते व त्याचबरोबर पूर्वांचलच्या सीमा चीन, बांगलादेश, म्यानमार व भूतान या देशाला लागून असल्याने राष्ट्रविरोधी शक्तींचे खतपाणी घालण्याचे व देशापासून तोडण्याचे काम चालूच होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पूर्वांचल भागामध्ये वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माध्यमातून काम चालू ठेवले होते. हे सर्व काम मैदानी प्रदेशात असल्यामुळे पूर्वांचलच्या डोंगराळ भागात आहे. साधारणतः 145 जनजाती आहेत. संघाचे तत्कालीन प्रांत प्रचारक असलेले कै.मुकुंदराव पणशीकर यांनी योजना करून संघरचनेप्रमाणे सक्षम प्रांतांनी पूर्वांचलातील काही राज्ये दत्तक घ्यावी असे ठरवले व त्या योजनेनुसार महाराष्ट्रातून या राज्यांमध्ये प्रचारक काम करू लागले. तिथली भाषा शिकत शाळांमधून शिक्षक म्हणून काम केले,
परिस्थितीचा अंदाज घेऊन व एकूण आपल्या क्षमता लक्षात घेऊन मुलांना शिक्षणासाठी महाराष्ट्रात आणण्याची योजना तयार झाली व त्यानुसार 1995मध्ये पुण्यात सदनिका घेऊन काही मुलांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. पुढील काळात त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे वसतिगृहांची रचना उभी राहिली. आजमितिस महाराष्ट्रात आठ वसतिगृह चालतात व सध्या एकूण संख्येपैकी 60 मुले व 62 मुली निवास करतात. छात्रावासात मुलामुलींचा दिवस सकाळी स्नानापासून सुरू होतो, दररोज सूर्यनमस्कार व्यायाम व सायंम शाखा, स्वावलंबनाचे संस्कार त्यांना तेथील कामांमध्ये सहभागी करून शिकवले जातात, जवळपासची महत्त्वाची ठिकाणे पाहायला घेऊन जाणे, छात्रावासात रक्षाबंधन, गणेशोत्सव, दसरा, कोजागिरी तसेच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक, दिन साजरे केले जातात. महाराष्ट्राच्या संस्कृतीची व राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार केले जातात..गेल्या 30 वर्षात शेकडो मुले व मुली या वसतिगृहात राहिली, राष्ट्रीयतेशी जोडली व आपाल्या राज्यात स्थिर, सक्रिय राहिली व आजही आहेत.
वर्षभरातील चालणार्या या विविध आठ वसतिगृहाचे अनेक उपक्रम चालू असतात, कार्यकर्त्यांचे प्रवास होतात, या सगळ्यांचे नियोजन केलेले असते. तिथले प्रमुख कार्यकर्ते त्यांची सर्व प्रकारची काळजी घेणे, त्यांच्या पालकांशी संपर्क ठेवणे हे अत्यंत काटेकोरपणे करत असतात. प्रकल्पाचा एक संच हा वर्षभर नेटकेपणांनी ही व्यवस्था करत असतो.
दिवाळीनंतरचे चार दिवस हे पूर्वांचल वसतिगृह शिबिर सगळ्यांना आकर्षित करत असते. यंदाचे हे चार दिवसीय ‘पूर्वांचल वसतिगृह दिवाळी शिबिर 2026’ 13 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत जे. एस. रुंगठा हायस्कूल, नाशिक येथे संपन्न झाले. वर्षातून एकदा विद्यार्थीच्या पालकांनाही शिबिरात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते.
’पूर्वांचल वसतिगृह दिवाळी शिबिर 2026’चे उद्घाटन 13 नोव्हेंबर महापौर डॉ. हिमगौरी आडके यांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रीय प्रगतीसाठी सर्वसमावेशकता, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. आपले विचार मांडताना आडके यांनी देशाला पुढे न्यायचे असेल, तर आपसांत कोणतीही दरी न ठेवता सर्वांना हातात हात घालून पुढे जावे लागेल. आपली संस्कृती ’वसुधैव कुटुंबकम्’ ही विचारसरणी शिकवते. याच तत्त्वाने विविधतेतून एकता जपत आपल्याला ’विकसित भारत 2047’चे स्वप्न साकार करायचे आहे असे प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याचा ऐतिहासिक आणि वैचारिक संदर्भ दिला. त्या म्हणाल्या की, नाशिक ही कुंभाची पावन भूमी आहे. कुंभमेळा म्हणजे केवळ धार्मिक पर्व नसून, तो विचारांच्या मंथनाचा आणि समाजाला एकत्र आणण्याचा उत्सव आहे. आज जागतिक स्तरावर अस्थिरता असताना संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. येथील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, वकील किंवा अन्य क्षेत्रांत मोठी स्वप्ने पाहावीत, ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भारतीय बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. अजित मराठे यांनी पूर्वांचल आणि उर्वरित भारत यांच्यातील भावनिक बंध अधिक दृढ होण्यावर भर दिला. ते म्हणाले की, पूर्वांचलमधील विद्यार्थ्यांचे राहणीमान, पेहराव किंवा खानपान जरी वेगळे असले, उर्वरित भारत यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ करण्याची आवश्यकता व्यक्त केली. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात तरी ते आपल्याच भारतमातेचे सुपुत्र आहेत. या विद्यार्थ्यांना येथे आई आणि मावशीची माया मिळावी, त्यांना परकेपणा वाटू नये, या प्रेमाच्या आणि आपलेपणाच्या भावनेतून रा. स्व. संघ जनकल्याण समितीने या वसतिगृहांची सुरुवात केली. आज या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होत आहे, हे या उपक्रमाचे मोठे यश आहे.
या चार दिवसीय शिबिरात महाराष्ट्रातील विविध आठ वसतिगृहांमधील एकूण 113 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये पुणे, चिंचवड, डोंबिवली, चिपळूण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सांगली येथील वसतिगृहांचा समावेश होता. याशिवाय काही विद्यार्थ्यांचे पालक, वसतिगृहांचे प्रमुख, काळजीवाहक, वसतिगृह समितीचे सदस्य आणि जनकल्याण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेला ’मातृहस्ते भोजन’हा उपक्रम विशेष भावस्पर्शी ठरला. नाशिक शहरातील सुमारे 80 स्थानिक कुटुंबांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या घरातून भोजन तयार करून आणले होते. प्रत्येक कुटुंबासोबत एक किंवा दोन विद्यार्थ्यांना जोडण्यात आले आणि सर्वांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना घरापासून दूर असूनही स्थानिक कुटुंबांचे प्रेम, माया आणि आपुलकी अनुभवता आली. तसेच स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक संवाद व स्नेहबंध निर्माण होण्यास मदत झाली.
विविध उपक्रम, स्पर्धा, समूहगीत, पारंपरिक नृत्य, संगीत, वाद्ये आणि विविध प्रबोधन, सांस्कृतिक शोभायात्रा यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
शिबिरातील प्रमुख आकर्षणांपैकी एक असलेली भव्य सांस्कृतिक शोभायात्रा जे. एस. रुंगठा हायस्कूल येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. ईशान्य भारतातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी आपापल्या पारंपरिक वेशभूषेत, सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणारे सादरीकरण केले. प्रामुख्याने पुढील समुदायांचे खासी, प्नार, कोच, राभा, हाजोंग इत्यादी समुदाय. प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या शोभायात्रेत विद्यार्थी आणि संघाचे व जनकल्याण समितीचे प्रमुख तसेच शहरातील अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. विविध समुदायांच्या पारंपरिक वेशभूषेमुळे आणि या शोभायात्रेमुळे ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आणि परंपरा अभिमानाने सादर करण्याची संधी मिळाली. तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना ईशान्य भारतातील विविध समुदायांच्या संस्कृतीविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. खर्या अर्थाने ही शोभायात्रा ’विविधतेतून एकता’ या भारतीय मूल्याचे दर्शन घडविणारी ठरली. सांस्कृतिक सादरीकरणांमुळे नाशिककरांना ईशान्य भारताच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडले.
योगेश चकोर यांनी ’भारताची संरक्षण सज्जता - पूर्वांचलच्या दृष्टीकोनातून’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रियांका भट यांचे ’स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यान झाले. याला जोडूनच शिबिराच्या अंतिम दिवशी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूर येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. या भेटीतून ’स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांच्या पराक्रमी जीवनकार्याची, स्वातंत्रलढ्याची प्रेरणादायक माहिती मिळाली.
शिबिर कार्यवाह प्रशांत महामुनी यांनी ’पूर्वांचलमध्ये करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. या विषयाने विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी आणि भविष्यातील वाटचालीविषयी दिशा मिळाली.
एकूणच, या शिबिराने विद्यार्थ्यांना केवळ एकत्र येण्याची संधी दिली नाही, तर त्यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर संवाद, मैत्री, आत्मविश्वास आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
चित्रकला, हस्तकला, कॅलिग्राफी, बुद्धिबळ आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचे तसेच समूहगीत, समूहनृत्य, कला व हस्तकला अशा विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सोमनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला. भारताची खरी ताकद ही त्याच्या सांस्कृतिक विविधतेत असून, परस्परांचा आदर आणि एकात्मतेच्या भावनेतूनच राष्ट्र अधिक मजबूत होते, हा महत्त्वपूर्ण संदेश या शिबिरातून अधोरेखित झाला.
संपूर्ण ’वंदे मातरम्’च्या गायनाने शिबिराचा समारोप करण्यात आला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक शहरातील कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम विशेष कौतुकास्पद आहेत. चार दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे नियोजन, समन्वय आणि व्यवस्थापन करण्यासाठी संपूर्ण चमूने मोठ्या समर्पणाने व जबाबदारीने काम केले.
तसेच वसतिगृहांचे प्रमुख, काळजीवाहक, वसतिगृह समितीचे सदस्य, जनकल्याण समितीचे पदाधिकारी, स्थानिक कुटुंबे आणि सर्व स्वयंसेवकांचे योगदानही मोलाचे ठरले. या सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी आणि संस्मरणीय झाले.
ईशान्य भारतातील विद्यार्थी आणि महाराष्ट्रातील समाज यांच्यातील भावनिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हे शिबिर निश्चितच यशस्वी ठरले.
तीन दशकापूर्वी पूर्वांचल भारतापासून तुटून जाईल की काय अशी भयानक स्थिती होती. त्यात आज खूप सकारात्मक बदल झाले आहेत. या सर्वांना भारताच्या एकात्मतेशी जोडणे हे प्रमुख काम त्यातून साध्य होत आहे. भौगोलिक चिंचोळ्या पट्टीने भारताच्या मुख्य भूमिकेशी जोडलेला हा भाग राष्ट्रीय एकात्मता व प्रशासन सेतू जोडून ठेवण्याचे काम संघ व जनकल्याण समितीच्या पूर्वांचल विभागाने केल्याचे एक समाधानही जाणवते.
- लेखक रा.स्व.संघ जनकल्याण समिति, महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष आहेत.