शक्तिसाधना नवदशकपूर्ती संमेलन

विवेक मराठी    20-Nov-2026
Total Views |
rss
राष्ट्र सेविका समितिच्या नवदशकपूर्तीचे औचित्य साधून नवीन पनवेल येथील सीकेटी शाळेत कोकण प्रांताचे दोन दिवसीय शक्तिसाधना संमेलन कार्तिक शुद्ध पंचमी व षष्ठी-14 व 15 नोव्हेंबर 2026ला, दहा जिल्ह्यांतील एकूण 939 सेविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
शनिवारी सुरू झालेल्या या संमेलनाला संघटनेच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलकाताई इनामदार, अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी, संवर्धिनी न्यासाच्या माधुरीताई मराठे, अ.भा.महिला समन्वय सहसंयोजिका भाग्यश्रीताई साठ्ये, अ.भा. सहप्रचार प्रमुख रूपादीदी रावल, कोकण प्रांत कार्यवाहिका पद्मश्रीताई फाटक, कोकण प्रांत सहकार्यवाहिका व संमेलन कार्यवाहिका उमाताई दांडेकर तसेच प्रांत कार्यकारिणी सदस्य यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले.
 
 
अलकाताईंनी आपल्या उद्बोधनात समितिच्या नऊ दशकांचा आढावा घेताना, समिति स्थापनेपासून कोकण प्रांतात संघटनेच्या कार्यवृद्धीचा आलेख मांडला. महिलांची, महिलांसाठी राष्ट्रकार्याने प्रेरित ही संघटना सदैव समाजकार्यासाठी तत्पर असते, याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. कोकण प्रांतात अनेक जणींनी स्वयंस्फूर्तीने शाखा सुरू केल्या. त्या माध्यमातूनच उद्योगमंदिर, शिशुविहार, बालवाटिका असे विविधांगी उपक्रम सुरू झाले. भारताबाहेर 23 देशांत ’हिंदू सेविका समिति’ या नावाने कार्यरत राहताना सेविका आपल्या उद्देशावरून लक्ष हटू देत नाहीत. आणीबाणीच्या काळात समितिकार्य अधोरेखित करताना त्यांनी, सेविकांनी सत्याग्रहात नोंदवलेला सक्रिय सहभाग, विचारपत्रांची केलेली ने-आण तसेच अनेकींनी भोगलेला तुरुंगवास या विषयीची अनेक उदाहरणे दिली. तरुण सेविकांना जागृत केले. 90 वर्षांचे सिंहावलोकन करताना शंभरीची वाटचाल अविरत सुरू राहण्यासाठी त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
 

rss 
त्याच सत्रात ’स्मृतिसुगंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पुढील सत्रात ’नारी तू नारायणी’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये माजी लष्करी अधिकारी मोहिनी गर्गे, परिवर्तन संस्थेच्या संस्थापिका वर्षा परचुरे आणि प्राध्यापिका अभिधा धुमटकर यांनी महिला सबलीकरण या विषयावर आपले विचार मांडले. रुपादीदी रावल यांनी परिसंवादाचा समारोप करताना तिन्ही वक्त्यांचे सार आणि समितिची या विषयावरील भूमिका मांडली.
 
 
सायंकाळी प्रात्यक्षिक शाखेत योग, नियुद्ध, मनोरे, दंड, यष्टी, खेळ, योगचाप, घोष अशी 10 जिल्ह्यांची शारीरिक सुदृढता दर्शवणारी प्रत्यक्षिके उत्साहात पार पडली. यावेळी भाग्यश्रीताईंनी नऊ दशकांच्या साधनेत असणारे नियमित शाखेचे अमूल्य योगदान विशद केले. ह्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय साहाय्यक सरोज देसाई यांची विशेष उपस्थिती होती.
पहिल्या दिवसाची सांगता समितिची शौर्यगाथा या रात्र कार्यक्रमाने झाली. ह्यात देश-विदेशात समितिच्या सेविकांनी केलेल्या असामान्य कार्याचे, सेवेचे नाट्यरूपात सादरीकरण करण्यात आले. त्या निमित्ताने गेल्या 90 वर्षांत विविध राज्यात झालेल्या समितिकार्याचा अनुभव सेविकांना घेता आला.
 

rss 
दिनांक 15 नोव्हेंबरला क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस वंदन करत एकाच स्थानावर साकारलेल्या एकोणीस शाखांच्या शाखासंगमाने दिवसाची सुरुवात झाली. ज्यात तिरंगा प्रारूपात सादर केलेले बर्ची योग प्रात्यक्षिक विशेष होते.
 
 
त्यानंतर प्रांत तरुणी विभागातर्फे युवती ससंदचे आयोजन केले होते. 10 विविध महाविद्यालयांतील जवळपास 150हून अधिक तरुणींनी यात सहभाग घेतला. त्यांनी सद्य सामाजिक स्थितीवर आपले मत व्यक्त केले. त्याचवेळी गृहिणी व इतर सेविकांसाठी संघटन कौशल्य या विषयांवर आधारित एकूण 16 कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या.
 
 
नव्वदावे वर्ष घोषाला समर्पित असल्याने यावेळी सघोष संचलनाला वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली होती. अंबामाता उद्यान, दुर्गामाता मैदान व सुकापूर या तीन ठिकाणांहून प्रत्येकी 300 जणींच्या संख्येत ’त्रिधारा संचलने’ निघाली. ज्यात प्रत्येकी दोन अशा सहा घोषगणांचा समावेश होता. तीनही संचलने आदई चौकात एकत्र आली. अशा पद्धतीने राष्ट्रकार्याला समर्पित, संघटित मातृशक्तीने त्रिधारा संचलन अतिशय शिस्तबद्धतेने पार पाडले. एकूण 939 सेविकांनी यात सहभाग घेतला होता.
 

rss 
समारोपाच्या प्रसंगी अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी यांचे उद्बोधन ऐकण्याची संधी सेविकांसह उपस्थित अन्य श्रोतृवृंदास मिळाली. नऊ दशकांतील प्रवास उलगडतानाची दोन दिवसांत झालेली विचारांची देवाण-घेवाण, सांघिकतेच्या बळावर उत्साहपूर्ण तरीही शिस्तबद्धतेने पार पडलेल्या या नऊ दशकांच्या उत्सवानिमित्त त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर पुढील दशकाच्या वाटचालीसाठी अनंत आशीर्वाद दिले.
 
संमेलन स्थानी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगर पालिकेचे महापौर नितीनजी पाटील तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे मान्यवर गण संमेलनाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
 
वंदे मातरम्च्या गायनाने शक्तिसाधना संमेलन संपन्न झाले.
 
- प्रतिनिधी