Dr. Sharan Kumar Limbale Elected President of 100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
सतेज दणाणे
9404761427
मराठी साहित्यातील प्रस्थापित चौकटी मोडून वंचितांच्या वेदनेला वैश्विक परिमाण देणारे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत म्हणजे डॉ. शरणकुमार लिंबाळे. पुण्यात 27 ते 30 जानेवारी 2027 दरम्यान होणार्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्या विद्रोही आणि परिवर्तनवादी साहित्यप्रवासाचा हा विशेष आढावा.
मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात दीर्घकाळ एका विशिष्ट मध्यमवर्गीय जीवनाचे आणि पांढरपेशा जाणिवांचे प्रतिबिंब उमटत होते. रंजनवादी आणि कलावादी दृष्टीकोनातून साहित्याचे मूल्यमापन केले जात होते; मात्र, साठोत्तरी काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणेने मराठी साहित्यात एक क्रांतिकारी वैचारिक विद्रोह उभा राहिला. या साहित्यिक विद्रोहाला वैचारिक धार देणार्या आणि प्रस्थापित साहित्यिक चौकटींना मुळापासून हादरा देणार्या दया पवार, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, लक्ष्मण माने, बेबी कांबळे, शांताबाई कांबळे, प्र.ई.सोनकांबळे, लक्ष्मण गायकवाड, माधव कोंडविलकर, पार्थ पोळके, नामदेव ढसाळ, कुमुद पावडे, केशव मेश्राम आणि उर्मिला पवार अशा महत्त्वाच्या साहित्यिकांमध्ये डॉ.शरणकुमार लिंबाळे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या लेखणीने मराठी साहित्याची पारंपरिक चौकट मोडून सामान्य, उपेक्षित आणि वंचित माणसाच्या जगण्याला साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. त्यामुळे त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा गौरव हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून विद्रोही, परिवर्तनवादी आणि वास्तववादी साहित्यपरंपरेचा गौरव आहे.
डॉ.लिंबाळे यांचे वेगळेपण समजून घेताना त्यांची तुलना इतर दलित साहित्यिकांपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ अशा स्वरूपात करणे योग्य ठरणार नाही. कारण दलित साहित्य समृद्ध करण्यात अनेक साहित्यिकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे; मात्र, लिंबाळे यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दलित जीवनानुभवाला साहित्यिक अभिव्यक्ती देण्याबरोबरच त्याचे वैचारिक विश्लेषण केले आणि दलित साहित्याच्या स्वतंत्र सौंदर्यशास्त्राची सैद्धांतिक मांडणी केली. त्यांनी दलितांच्या वेदनेला शब्द दिले, त्या वेदनेचे सामाजिक संदर्भ स्पष्ट केले आणि त्या अनुभवांना स्वतंत्र साहित्यिक विचारांची बैठक प्राप्त करून दिली. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ दलित साहित्यिक म्हणून नव्हे, तर दलित साहित्याचे सिद्धांतकार, स्वतंत्र साहित्यचिंतक, भारतीय स्तरावरील व्यापक मानवी मूल्यांचे भाष्यकार म्हणून पाहणे आवश्यक आहे.
डॉ.शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म 1 जून 1956 रोजी सोलापूर जिल्ह्यातील हन्नूर या गावात झाला. त्यांचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत, दारिद्र्य आणि सामाजिक अवहेलनेच्या वातावरणात गेले. जातीव्यवस्थेचे चटके, अस्पृश्यतेचा जाच आणि समाजाने लादलेला अनौरसपणाचा कलंक सहन करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या बालपणीच्या या दाहक जीवनानुभवांनी पुढील साहित्यनिर्मितीचा पाया घातला. त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. ‘दलित साहित्य आणि सौंदर्यशास्त्र’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली. अहमदपूर येथे दूरध्वनी केंद्रात टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केल्यानंतर 1986 ते 1992 या काळात सोलापूर आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्य केले. पुढे नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्राध्यापक आणि प्रकाशन विभागाचे संचालक म्हणून त्यांनी शैक्षणिक व साहित्यिक योगदान दिले.
1984मध्ये प्रकाशित झालेल्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात मोठी खळबळ उडवून दिली. मराठीतील पारंपरिक आत्मचरित्रांमध्ये अनेकदा व्यक्तीच्या जीवनातील यश, कर्तृत्व आणि प्रतिष्ठेला महत्त्व दिले जात होते; मात्र, लिंबाळे यांनी आत्मकथनाची ही सुरक्षित चौकट मोडून स्वतःचे जगणे कोणताही आडपडदा न ठेवता मांडले. स्वतःच्या आयुष्यातील दुःख, अपमान, गरिबी, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक अवहेलना यांचे त्यांनी निर्भीड चित्रण केले.
‘अक्करमाशी’ हे केवळ एका व्यक्तीचे आत्मचरित्र नाही, तर जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या सामाजिक विषमतेचे आणि मानवी अस्तित्वाच्या संघर्षाचे प्रभावी दस्तऐवजीकरण आहे. स्वतःच्या जन्माभोवती निर्माण झालेली सामाजिक गुंतागुंत, आईची असाहाय्यता, गरिबीचे विदारक वास्तव, जातीय ओळखीचा प्रश्न आणि समाजाकडून होणारा बहिष्कार या अनुभवांना त्यांनी शब्द दिले. त्यांच्या व्यक्तिगत दुःखाला व्यापक सामाजिक आशय प्राप्त झाला. त्यामुळे एका व्यक्तीची जीवनकथा संपूर्ण उपेक्षित समूहाच्या वेदनेचे प्रतिनिधित्व करू लागली. या आत्मकथनाचे महत्त्व केवळ मराठीपुरते मर्यादित राहिले नाही. ‘ढहश र्जीींलरीींश’ या इंग्रजी नावासह हिंदी, तमिळ, मल्याळम्, कन्नड, पंजाबी आणि इतर भाषांमध्येही त्याचे अनुवाद झाले. मानवी प्रतिष्ठा, सामाजिक बहिष्कार, जातीय विषमता आणि अस्मितेचा संघर्ष हे प्रश्न प्रादेशिक मर्यादा ओलांडून वैश्विक स्वरूप धारण करतात, याची जाणीव या आत्मकथनातून होते.
लिंबाळे यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमता असला तरी त्यांचा आशय केवळ जातीय शोषणापुरता मर्यादित नाही. अस्पृश्यता, मानवी प्रतिष्ठा, जात आणि वर्ग यांचे परस्परसंबंध, स्त्रीजीवनातील शोषण, सांस्कृतिक वर्चस्व, सामाजिक सत्ता, माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न, अस्मिता, लोकशाही, संविधान आणि सामाजिक न्याय अशा अनेक विषयांचा त्यांनी आपल्या लेखनातून वेध घेतला आहे. अन्यायग्रस्त माणसाचे दुःख मांडतानाच त्या दुःखाला कारणीभूत असलेल्या सामाजिक व्यवस्थेची चिकित्सा करणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांचे साहित्य केवळ वेदनेचे चित्रण न करता सामाजिक परिवर्तनाची आवश्यकता अधोरेखित करते.
डॉ.शरणकुमार यांच्या लेखनाची मांडणी अनुभवप्रधान असली तरी ती केवळ भावनिक स्वरूपाची नाही. त्यांच्या लेखनात अनुभव, विचार, विद्रोह, सामाजिक चिकित्सा आणि तात्त्विक चिंतन यांचा समन्वय आढळतो. त्यांचे लेखन अन्यायाचे वर्णन करून थांबत नाहीत, तर अन्याय निर्माण करणार्या सामाजिक व्यवस्थेच्या मुळाशी जातात. त्यांच्या भाषेचा पाया ग्रामीण जीवन, लोकसंस्कृती आणि दलित समाजाच्या जगण्यात आहे. बोलीभाषेतील सहजता, अनुभवांची प्रामाणिकता आणि अभिव्यक्तीतील निर्भीडपणा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. कृत्रिम अलंकारिकतेपेक्षा जगण्यातील वास्तवाला त्यांच्या भाषेत अधिक महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे लेखन वाचकाला भावनिक अनुभव देण्याबरोबरच सामाजिक वास्तवाचा चिकित्सक विचार करण्यास प्रवृत्त करते.
डॉ.शरणकुमार लिंबाळे यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वातील सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दलित साहित्याच्या स्वतंत्र सौंदर्यशास्त्राची केलेली सैद्धांतिक मांडणी. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ हा त्यांचा ग्रंथ मराठी साहित्यविचारातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या ग्रंथातून त्यांनी पारंपरिक साहित्यसमीक्षेच्या निकषांवर मूलभूत प्रश्न उपस्थित केले. परंपरागत साहित्यसमीक्षा प्रामुख्याने कलात्मकता, सौंदर्य, भाषिक कौशल्य आणि रचनात्मक वैशिष्ट्यांच्या आधारे साहित्याचे मूल्यमापन करत होती; मात्र, दलित साहित्याचा जन्म सामाजिक विषमता, जातीय शोषण, अपमान, संघर्ष आणि परिवर्तनाच्या आकांक्षेतून झाला असल्याने त्याचे मूल्यमापन करताना केवळ पारंपरिक निकष पुरेसे ठरत नाहीत. जीवनानुभव, सामाजिक वास्तव, विद्रोह, समतेची जाणीव आणि मानवी मूल्ये यांचाही विचार आवश्यक आहे, असे लिंबाळे प्रतिपादन करतात.
त्यांच्या मते साहित्याचे सौंदर्य केवळ शब्दांच्या सजावटीत किंवा कल्पनारम्यतेत नसते, तर ते माणसाच्या जगण्यात, त्याच्या संघर्षात आणि मुक्तीच्या आकांक्षेतही असते. वंचितांच्या दुःखाचे आणि विद्रोहाचे मूल्यमापन करण्यासाठी साहित्यसमीक्षेचे निकष अधिक व्यापक झाले पाहिजेत. या भूमिकेमुळे दलित साहित्याला स्वतंत्र समीक्षात्मक आणि वैचारिक अधिष्ठान मिळाले. मराठी साहित्यविचाराच्या क्षेत्रात त्यांनी केलेले हे योगदान त्यांना केवळ लेखक न ठेवता महत्त्वाचे साहित्यसिद्धांतकार म्हणूनही अधोरेखित करते.
लिंबाळे यांनी आत्मकथनाबरोबरच कादंबरी, कथा, कविता आणि समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे. ‘सनातन’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘झुंड’, ‘उपल्या’, ’ओ’, ’भिन्नलिंगी’, ‘रामराज्य’ आणि ’दलित फाईल’ यांसारख्या कादंबर्यांमधून त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेतील गुंतागुंतीचे वास्तव मांडले आहे. ‘सनातन’ या कादंबरीतून त्यांनी भारतीय इतिहासातील दुर्लक्षित आणि उपेक्षित समाजघटकांच्या जीवनाचा, संघर्षाचा आणि योगदानाचा वेध घेतला आहे. प्रस्थापित इतिहासाच्या नोंदींमध्ये ज्यांच्या अनुभवांना आणि अस्तित्वाला पुरेसे स्थान मिळाले नाही, अशा समूहांच्या इतिहासाकडे त्यांनी साहित्यिक दृष्टीकोनातून पाहिले आहे. ‘हिंदू’ या कादंबरीतून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वास्तवातील अंतर्विरोधांवर भाष्य केले आहे. ‘दलित ब्राह्मण’, ‘देवता आदमी, ‘बारामाशी’ आणि ’दंगल’ यांसारख्या कथासंग्रहांतून आणि ’श्वेतपत्रिका’, ’उद्रेक’, ’दलित प्रेम कविता’, ’तुमची जात काय?’ या कवितासंग्रहातून मानवी नातेसंबंध, सामाजिक विसंगती आणि जीवनातील संघर्षांचे विविध पैलू उलगडले आहेत.
त्यांच्या साहित्यकृतींमध्ये भारतीय समाजरचनेचे चिकित्सक विश्लेषण आढळते. इतिहास, संस्कृती, धर्म, सत्ता आणि सामाजिक विषमता यांचा परस्परसंबंध तपासण्याची त्यांची दृष्टी त्यांच्या लेखनाला व्यापकता प्रदान करते. जातीय भेदभाव, सामाजिक बहिष्कार, आर्थिक विषमता, सांस्कृतिक वर्चस्व, मानवी प्रतिष्ठा आणि न्यायाची आकांक्षा हे प्रश्न जगातील विविध समाजव्यवस्थांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपांत आढळतात. त्यामुळे त्यांच्या साहित्याला भारतीय सामाजिक वास्तवाचा संदर्भ असला तरी त्यातील आशय जागतिक पातळीवर समजून घेता येतो. एका विशिष्ट सामाजिक अनुभवातून सार्वत्रिक मानवी मूल्यांची मांडणी करण्याची क्षमता हे त्यांच्या साहित्याचे महत्त्वाचे वेगळेपण आहे.
डॉ.शरणकुमार लिंबाळे यांनी साहित्याच्या आत्मकथा, कादंबरी, कथा, कविता, समीक्षा आणि वैचारिकता या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. ‘सनातन’ या कादंबरीसाठी 2020मध्ये त्यांना ’के.के. बिर्ला फाउंडेशन’चा प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ प्रदान करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार आणि प्रा.रा.ग.जाधव साहित्यसाधना पुरस्कार यांसारख्या सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. 2011मध्ये बाराव्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे येथे आयोजित होणार्या शंभराव्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाबाहेर राहिलेल्या, विद्रोही आणि परिवर्तनवादी साहित्यपरंपरेतून पुढे आलेल्या साहित्यिकाची या प्रतिष्ठित पदावर झालेली निवड ही मराठी साहित्यविश्वातील ऐतिहासिक घटना आहे. ही निवड केवळ एका साहित्यिकाच्या कर्तृत्वाची पावती नसून मराठी साहित्याच्या बदलत्या जाणिवांचा, व्यापक होत चाललेल्या अभिव्यक्तीविश्वाचा आणि वंचितांच्या साहित्यिक अस्मितेला मिळालेल्या प्रतिष्ठेचा गौरव आहे. दीर्घकाळ साहित्याच्या मुख्य प्रवाहात पुरेसे स्थान न मिळालेल्या वंचितांच्या अनुभवांना आज साहित्यविश्वाच्या सर्वोच्च व्यासपीठावर मान्यता मिळत आहे. साहित्याची चौकट बदलण्याचे काम ज्यांनी आपल्या लेखणीने केले, त्यांचाच गौरव आज त्या साहित्यविश्वाच्या सर्वोच्च व्यासपीठावर होत आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
डॉ.शरणकुमार लिंबाळे यांचे वेगळेपण त्यांच्या लेखनातील विषय वैविध्यापुरते मर्यादित नाही. त्यांनी साहित्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली, साहित्याच्या मूल्यमापनाचे निकष व्यापक केले आणि वंचितांच्या अनुभवांना वैचारिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या साहित्यामध्ये वैयक्तिक वेदनेचे सामाजिक वास्तवात रूपांतर होते आणि सामाजिक वास्तवातून व्यापक मानवी मूल्यांचा विचार पुढे येतो. त्यांचे साहित्य म्हणजे केवळ मनोरंजनासाठी केलेली अक्षरांची जुळवाजुळव नाही, तर अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला वैचारिक एल्गार आहे. त्यांनी साहित्याला बंदिस्त अभिरुचीच्या चौकटीतून बाहेर काढून सामान्य माणसाच्या जगण्याशी जोडले आणि उपेक्षितांच्या वेदना, संघर्ष, स्वाभिमान व मुक्तीच्या आकांक्षांना साहित्याच्या केंद्रस्थानी आणले हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच डॉ.शरणकुमार लिंबाळे यांच्याकडे केवळ दलित साहित्यिक म्हणून पाहणे त्यांच्या साहित्यिक योगदानाची मर्यादा ठरेल. ते दलित साहित्याचे सिद्धांतकार, स्वतंत्र साहित्यचिंतक, भारतीय साहित्यविश्वातील महत्त्वाचे लेखक आणि व्यापक मानवी मूल्यांचे भाष्यकार आहेत. त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा गौरव म्हणजे एका व्यक्तीच्या यशाचा उत्सव नसून साहित्याच्या बदलत्या जाणिवांचा, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या विचारांचा गौरव आहे.
अशा या चौकटीबाहेरील साहित्यिकाचा सन्मान हा खर्या अर्थाने वंचितांच्या जगण्याचा, विद्रोही साहित्यपरंपरेचा आणि परिवर्तनवादी विचारांचा सन्मान आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात डॉ.शरणकुमार लिंबाळे यांची शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही एका नव्या साहित्यिक जाणिवेचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून निश्चितच स्मरणात राहील.