कष्ट, जिद्द आणि समर्पणाचा वस्तुपाठ म्हणजे विष्णू बोबडे यांचा जीवनप्रवास. शिक्षणासाठी ग्रामीण भागातल्या आयुष्याशी संघर्ष करीत विद्यार्थी चळवळ, पत्रकारिता आणि बँकिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. सहकार क्षेत्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर चालणार्या सहकार भारतीच्या माध्यमातून त्यांनी देशभर संघटन उभारले. नुकताच त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर 2026 रोजी डोेंबिवलीत पार पडला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी रा.स्व.संघ अखिल भारतीय कार्यकारी सदस्य भय्याजी जोशी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ साहित्यिक गिरीश प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला वेध.
काही माणसांचे जीवन हे केवळ त्यांच्या वैयक्तिक यशापुरते मर्यादित नसते, तर त्यांच्या जीवनप्रवासातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, शिक्षणाची जिद्द मनात बाळगून, कष्ट आणि ध्येयवादाच्या जोरावर स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविणारी माणसे समाजासाठी आदर्श ठरतात. विष्णू बोबडे यांचा जीवनप्रवास असाच संघर्ष, जिद्द, कर्तृत्व आणि समर्पणाचा प्रेरणादायी प्रवास आहे.
शिक्षणाची नांदी
सातारा जिल्ह्यातील तरडफ या छोट्याशा गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात विष्णू बोबडे यांचा जन्म झाला. दोन भाऊ आणि दोन बहिणी असे कुटुंब. शेती हा वडलांचा प्रमुख व्यवसाय. आई शांताबाई आणि वडील कोडिंबा बोबडे हे दोघेही अशिक्षित; मात्र कष्ट, प्रामाणिकपणा आणि कौटुंबिक संस्कारांची श्रीमंती त्यांच्या घरात होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले.
त्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाला आजच्याइतके महत्त्व नव्हते. मुलांनी शाळेत जाण्यापेक्षा शेतीची कामे करणे, जनावरे सांभाळणे आणि वेळप्रसंगी मजुरी करणे यालाच अधिक महत्त्व दिले जात असे; पण विष्णू बोबडे यांच्या आयुष्यात नियतीने एक महत्त्वाची व्यक्ती पाठवली. ते म्हणजे त्यांच्या आईचे वडील, त्यांचे आजोबा, यशवंत लवंगरे. आजोबांनी नातवाच्या शिक्षणाबाबत ठाम भूमिका घेतली. आजोबांच्या आग्रहामुळे लहानग्या विष्णूच्या आयुष्यात शिक्षणाची गोडी निर्माण झाली. या प्रवासात देशपांडे मास्तरांसारखे शिक्षक लाभले. चौथीत असताना वक्तृत्व स्पर्धेत मिळालेले चार आण्यांचे बक्षीस हा त्यांच्या वक्तृत्व प्रवासाचा प्रारंभ होता. पुढे याच वक्तृत्त्वकलेने त्यांना विद्यार्थी चळवळीत आणि सार्वजनिक जीवनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली.
स्वकर्तृत्वाने उभे राहण्याची जिद्द
सातवीपर्यंतचे शिक्षण अनेक अडचणींतून पूर्ण केले. आजोळी बुध येथे राहून आठवी आणि त्यानंतर सातार्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाहू बोर्डिंगमध्ये राहून दुष्काळ आणि मर्यादित साधनांत अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
पुढील शिक्षणासाठी वडलांनी नकार दिला, तरी शिकण्याची इच्छा प्रबळ होती. पुण्याच्या एस.पी. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला; मात्र तेथे शिक्षण सुरू ठेवणे शक्य झाले नाही. त्यानंतर मुंबईच्या कीर्ती कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला.
मुंबईतील धारावी येथे भावाकडे राहण्याची व्यवस्था होती; पण त्यांच्या छोट्या जागेमुळे अभ्यासाची स्वतंत्र सोय करावी लागली. एका नातेवाइकांच्या मदतीने माळ्यावर झोपण्याची व्यवस्था झाली. वीज नसलेल्या त्या ठिकाणी रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले.
या काळात बेताची परिस्थिती असतानाही मोठा भाऊ आणि वहिनींनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या ऋणाची जाणीव विष्णू बोबडे यांच्या जीवनप्रवासात कायम राहिली आहे.
सामाजिक जीवनाचा प्रारंभ
मुंबईतील कीर्ती कॉलेजमधील शिक्षणाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. वक्तृत्वाची आवड, सामाजिक विषयांवरील चिंतन आणि सामाजिक कार्याची जाण यांमुळे ते विद्यार्थी चळवळीकडे वळले.
1969मध्ये रवींद्र पवार, प्रदीप राणे आणि चंदू चव्हाण यांच्या संपर्कातून त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश झाला. पुढील दहा वर्षे ते या चळवळीत सक्रिय राहिले.
या काळात बाळासाहेब आपटे आणि यशवंतराव केळकर यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा विष्णूजींच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडला. चर्चा आणि संघटनात्मक कामांतून त्यांची वैचारिक बैठक अधिक पक्की झाली.
1971मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम वर्ष प्रशिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी परिषद आणि संघाच्या कार्यातून त्यांना सामाजिक बांधिलकीचा व्यापक परिचय झाला आणि पुढील आयुष्याला दिशा मिळाली.
पत्रकारितेचा अनुभव आणि आणीबाणीतील संघर्ष
1970-71मध्ये त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला. ’समाचार भारती’ या वृत्तसंस्थेत सुरुवातीला उपसंपादक आणि पुढे वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिले.
या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, मधु दंडवते आणि भूपेश गुप्ता अशा महत्त्वाच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला. विधान परिषद तसेच दिल्लीतील लोकसभा व राज्यसभेच्या वार्तांकनामुळे त्यांना पत्रकारितेचा व्यापक अनुभव मिळाला.
पुढे आणीबाणीच्या काळात पत्रकार म्हणून सत्याग्रह केल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. नोकरीही गमवावी लागली. तरीही त्यांनी संघ विचारांशी आणि तत्त्वांशी तडजोड केली नाही.
करिअर आणि कौटुंबिक जीवन
1976मध्ये त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी स्वीकारली. बँकिंग क्षेत्रातील जबाबदार्या सांभाळताना त्यांनी सामाजिक आणि संघटनात्मक कामही सुरू ठेवले.
1981 ते 1987 या काळात नोकरीनिमित्त उत्तर प्रदेशात लखनौ आणि ग्रामीण भागात राहावे लागले. तिथली बँकिंग व्यवस्था, स्थानिक जीवन आणि विविध माणसांशी आलेला संपर्क यांमुळे त्यांचा अनुभव अधिक समृद्ध झाला.
या सर्व प्रवासात त्यांच्या धर्मपत्नी उषावहिनी यांची साथ मोलाची ठरली. वहिनींनी पोलीस विभागात नोकरी करीत कुटुंब आणि मुलांचे संगोपन या सर्व जबाबदार्या सांभाळताना विष्णूजींच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याला भक्कम पाठबळ दिले. कुटुंबाच्या सहकार्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सहकार भारतीतील प्रदीर्घ आणि समर्पित योगदान
विष्णू बोबडे यांच्या सार्वजनिक जीवनातील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सहकार भारतीतील त्यांचे कार्य.
नोकरीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात गेल्यामुळे काही काळ त्यांचा सक्रिय सहभाग मर्यादित राहिला; मात्र महाराष्ट्रात परतल्यानंतर अनंतराव कुलकर्णी यांच्या संपर्कातून ते पुन्हा सहकार भारतीच्या कामाशी जोडले गेले.
सहकार भारतीच्या सुरुवातीच्या काळात, 1978-79मध्ये अनंतराव कुलकर्णी यांच्यासोबत ’सहकार सुगंध’ या हस्तलिखिताच्या संपादनात त्यांनी सहभाग घेतला. पुढे दहा वर्षे त्यांनी ठाणे जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी सांभाळी. 1998मध्ये ते प्रदेश महामंत्री झाले. डोंबिवली व जळगाव येथील प्रदेश अधिवेशनांच्या नियोजनात तसेच महाराष्ट्रातील संघटन विस्तारात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
या काळात बापूसाहेब मोकाशी, कै.मधुकरराव चक्रदेव, मधुकरराव भागवत आणि सूर्यकांत केळकर यांसारख्या सहकार क्षेत्रातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले. तात्या इनामदार यांच्यासारख्या अनुभवी संघटनमंत्र्यांसोबत काम करताना त्यांना संघटनात्मक कार्याची शिस्त, संवाद आणि सहकारविषयक विचारांची व्यापकता अनुभवता आली. पुढे राष्ट्रीय स्तरावर बंगाल व आसामची जबाबदारी, राष्ट्रीय महामंत्री आणि दहा वर्षे सहसंघटक म्हणून त्यांनी देशभर प्रवास करून सहकार भारतीचे संघटन मजबूत केले. कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा, सातत्यपूर्ण संपर्क आणि विचारांवरील निष्ठा या जोरावर त्यांनी हे काम उभे केले.
’मानाचा सहकारी कार्यकर्ता’विशेष सन्मान
सहकार भारतीतील कार्य प्रवासात विष्णू बोबडे यांना स्वर्गीय तात्या इनामदार यांचा सहवास लाभला. तात्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. विचारांची स्पष्टता, साधेपणा आणि आपुलकी यांमुळे विष्णूजींवर तात्यांचा विशेष प्रभाव पडला.
तात्या चार्टर्ड अकाऊंटंट आणि प्राध्यापक होते. तरीही त्यांच्या वागण्यात अहंकार नव्हता, असे विष्णूजी सांगतात. तात्यांविषयी त्यांच्या मनात खूप आदर आणि जिव्हाळा होता. स्वर्गीय तात्या इनामदार यांच्या नावाने दिला जाणारा ’मानाचा सहकारी कार्यकर्ता’ हा पहिला पुरस्कार विष्णूजींना प्राप्त झाला. त्यांच्या नावाने मिळालेला हा सन्मान विष्णूजींसाठी खूप खास होता.
माणसं जोडण्याचा स्वभाव
सदैव हसतमुख आणि मिश्किल स्वभाव हे विष्णूजी बोबडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्ट्य आहे. या हसतमुख स्वभावामुळे त्यांनी कार्यकर्त्यांसोबतच अनेक मित्र आणि हितचिंतक जोडले. मोठी माणसे पदांमुळे लक्षात राहतात; पण विष्णूजींच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या मनात घर केले आहे.
मुलांच्या यशातून कुटुंबाच्या संस्कारांचे प्रतिबिंब
विष्णूजी आणि उषावहिनी यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. त्यांनी मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार दिले.
मोठी मुलगी डॉ.माधुरी शेकोकार या भूलतज्ज्ञ (अपशीींहशीळेश्रेसळीीं असून मुंबईत काम करतात. दुसरी मुलगी माधवी वाघुसकर इंजिनिअर असून टीसीएसमध्ये आहे. मुलगा अभिजीत इंजिनिअर असून दुबईत नोकरी करतो. तिन्ही मुलांनी आपापल्या क्षेत्रात प्रगती केली.
सहस्रचंद्रदर्शन : अनुभव, कर्तृत्व आणि समाधानाचा उत्सव
सहस्रचंद्रदर्शन हा केवळ वयाचा एक महत्त्वाचा टप्पा नाही, तर आयुष्यभराच्या अनुभवांचा आणि समाधानाचा उत्सव आहे. रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करणारा विद्यार्थी ते राष्ट्रीय स्तरावर सहकार भारतीच्या संघटनात्मक जबाबदार्या सांभाळणारा कार्यकर्ता, असा विष्णू बोबडे यांचा प्रवास आहे. या प्रवासात अनेकांनी त्यांना साथ दिली आणि त्यांनीही मिळालेल्या संधींचे सोने केले.
त्यांच्या जीवनातून तीन गोष्टी विशेषत्वाने शिकण्यासारख्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीतीही शिकण्याची जिद्द सोडू नये. मिळालेल्या संधीचा उपयोग समाजासाठी करावा. आणि मोठ्या कामामागे कुटुंबाचा त्याग असतो, याची जाणीव कायम ठेवावी. विष्णू बोबडे यांच्या कार्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सहकार्याला मनःपूर्वक अभिवादन. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना...
लेखक ’सहकार भारती’ या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटनप्रमुख आहेत.