यंदाच्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला उजेडात आलेले नीट पेपरफुटीचे प्रकरण...त्यानंतर घडलेल्या प्रकाराची जबाबदारी घेऊन सरकारने घेतलेली पुनर्परीक्षा...त्याचे वेळेत लागलेले निकाल....दरम्यान, पेपरफुटीचा धक्का सहन न झाल्याने बावीस विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या...आणि त्यानंतर, तरुणांमधील बेरोजगारीच्या प्रश्नावर लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या ’कॉक्रोच जनता पार्टी’ने पेपरफुटीच्या प्रश्नाकडे वळवलेले आपले आंदोलन... अतिशय संथ गतीने सुरू झालेल्या आंदोलनाला गती आली आणि तरुणाईचा त्यातला सहभाग वाढत गेला तो, या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे.... हळूहळू आंदोलनाला अराजकाचे स्वरूप येऊन त्याचे लोण देशभर पसरले. आणि मूळ प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी विशेष प्रयत्न न होता, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याने या वादळ तात्पुरते शमले.
अगदी चारच महिन्यांपूर्वीचा हा सगळा अस्वस्थ करणारा घटनाक्रम प्रत्येक संवेदनशील नागरिकाच्या मनात दीर्घकाळ राहणार आहे. त्यावेळेस थांबलेले आंदोलन आता वेगवेगळ्या रूपात आणि दरवेळी वेगळे विषय घेऊन चालूच आहे, हे आपण पाहतोच आहोत. आता ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीशी वा युवकांच्या बेरोजगारीशी संबंधित राहिलेले नाही. आंदोलनकर्त्यांचा मूळ उद्देश आणि चेहरा आता समोर येतो आहे.
आंदोलन जरी भरकटले असले तरी या निमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे...इंटरनेटच्या वेढ्यात आणि समाजमाध्यमांच्या प्रभावात वावरणार्या, फक्त आभासी माध्यमांवरूनच व्यक्त होणार्या तरुण पिढीचा या आंदोलनांमधला लक्षणीय सहभाग. आभासी माध्यमांशी अति सलगी असणार्या या पिढीचे....म्हणजे त्यातल्या काहींचे एक वेगळेच रूप यातून समोर आले. जे कोणत्याही संवेदनशील, सुजाण नागरिकाला अस्वस्थ करणारे, विचारात पाडणारे होते.
सर्वात जास्त अस्वस्थ करून गेली ती त्यांची भाषा. वयाने-कर्तृत्वाने-अधिकाराने मोठ्या असलेल्या व्यक्तींविषयी बोलताना या तरुण आंदोलकांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह-अश्लाघ्य होती. त्यातून दिसलेली त्यांची बेफिकीर वृत्ती तसेच समाजातील तथाकथित विचारवंतांनी, सेलिब्रिटीजनी त्यांच्या अशा वागण्या-बोलण्याचे केलेले निर्लज्ज समर्थन...दोन्ही गोष्टी समाज म्हणून काळजी वाढवणार्या.
देशातल्या सगळ्या तरुणाईची भाषा सरसकट अशी आक्षेपार्ह नाही ही वस्तुस्थिती असली तरी; या पिढीची जडणघडण, तिची विचार करण्याची पद्धत, तिची भाषिक अभिव्यक्ती आणि तिच्याठायी असलेली ऊर्जा या सगळ्यावर थोडे थांबून विचार करण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच दिवाळी अंकाच्या परिसंवादासाठी हा विषय जाणीवपूर्वक निवडला आहे.
It takes a village to raise a child..अशी आजवर समजूत होती; पण आज तशी परिस्थिती राहिली आहे का? समाजाची वीण, दोन पिढ्यांमधला विरळ झालेला संवाद पुन्हा सुरू होण्यासाठी काय करायला हवे? मुख्य म्हणजे आजच्या प्रौढांनी उद्याचा भारत ज्यांच्या हातात असणार आहे, त्या तरुणाईशी मैत्रीपूर्ण, समजुतीचा संवाद कसा करायला हवा? असे खूप प्रश्न मनात आहेत...
या परिसंवादातून कदाचित काही दिशा सापडतील, अशी आशा आहे...हे अंतर दूर करण्यासाठी सर्वजण दोन पावले पुढे येऊया...
पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी
या मनामनातून बांधूया एक वाट जाणारी