संवाद आणि संपर्क संघकामाचा आत्मा

विवेक मराठी    03-Nov-2026   
Total Views |
rss 
अलीकडेच विजयादशमीला संघ शताब्दी वर्षाची सांगता झाली. या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल जी यांच्याशी साधलेला संवाद. संघाच्या शतकोत्तर वाटचालीतले महत्त्वाचे बिंदू जाणून घेण्याचा प्रयत्न...

rssविजयादशमीला संघशताब्दी वर्षाची सांगता झाली. डॉ. हेडगेवारांनी केलेल्या संघरूपी बीजाने आज कोणते स्वरूप धारण केले आहे?
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या चिंतनातून प्रकट झालेली सामाजिक संघटना आहे. डॉ. हेडगेवार हे क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यसैनिक होते. हिंदू समाजाचे दैन्य आणि मानसिकता याचा त्यांनी मूलगामी अभ्यास केला होता. हिंदू समाजाची मानसिकता समजावून सांगताना ते एक गोष्ट सांगत, एका मैदानात एक सभा चालू होती. खूप लोक त्या सभेत उपस्थित होते. अचानक कोठूनतरी एक साप त्या सभेत शिरला आणि धावपळ सुरू झाली. अनेक व्यक्ती चेंगरल्या गेल्या. हे कशामुळे झाले? डॉ. सांगतात, सभेत उपस्थित असणार्‍या अनेक व्यक्तींना असे वाटत होते की, या संकटाचा मी एकटा सामना कसा करणार? असंख्य माणसांच्या समूहातसुद्धा मी एकटा असल्याचा भाव हा हिंदू समाजाचा स्वभाव होता. हा स्वभाव, ही मानसिकता बदलण्यासाठी ‘मी’ पासून ‘आम्ही’ पर्यंत जाणारा संघ डॉ. हेडगेवारांनी सुरू केला. प्राचीन काळापासून आपली ओळख हिंदू आहे आणि त्यातच एकता सामावली आहे याचा विसर आपल्या समाजाला पडलेला होता. त्यामुळे परचक्र आणि अवतनीचा विळखा हिंदू समाजाला पडला होता. डॉक्टरजींनी संघाची सुरूवात करताना हिंदू समाजाचे संघटन हा मुख्य विषय निश्चित केला. त्यामुळे हिंदू समाजाच्या संघटनेसाठी आड येणार्‍या सर्वच गोष्टी म्हणजे जातिभेद, अस्पृश्यता, प्रांतभेद, भाषाभेद या सर्व गोष्टी नाकारून आपण सर्व हिंदू समान आहोत हा भाव कृतीतून जागवला. वर्धा येथील संघ शिबिरात महात्मा गांधी जेव्हा भेट द्यायला आले तेव्हा त्यांनी शिबिरार्थी स्वयंसेवकांना त्यांच्या जाती विचारल्या होेत्या. तेव्हा उपस्थित सर्व स्वयंसेवकांनी,‘आम्ही हिंदू आहोत’, असे उत्तर दिले होते. समाजासाठी काम करणे, देशाच्या भविष्याचा विचार करणे, समाजात चांगल्या विचारांचे व गुणांचे बिजारोपण करणे, अनुशासित समाज निर्माण करणे हे संघाचे काम आहे. त्याचे स्वरूप अखिल भारतीय असून देशासाठी दीर्घकाळ समाज जागरण करण्याची संघाची परंपरा आहे. नि:स्वार्थ, व्यक्तीनिरपेक्ष, स्वावलंबी, अनुशासित अशा स्वरूपाचे काम डॉक्टरजींच्या विचारातून सुरू झाले. आज या गोष्टीला शंभर वर्षर्ं होऊन गेली आहेत. या शंभर वर्षाच्या प्रवासाचे वर्णन सम्यकदृष्टी आणि व्यक्ती निर्माणातून राष्ट्रभक्ती अशा शब्दात करता येईल.
 

rss


मागील शंभर वर्षाच्या वाटचालीत संघ व्यवहारातील परिवर्तनाचे महत्त्वाचे टप्पे कोणते?
 
संघाचा शंभर वर्षाचा प्रवास जेव्हा आपण पाहतो, तेव्हा खूप मोठा पल्ला संघाने गाठला आहे असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आज संघ स्वयंसेवकांनी चालवलेल्या 35 अखिल भारतीय संघटना कार्यरत असून हजारो छोटीमोठी सेवा कार्य देशभर चालू आहेत. लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील नागरिक संघाशी जोडलेले आहेत. अंदाजे 18 करोड परिवारांशी संघ थेट जोडलेला आहे. असे असले तरी संघ ही राजकीय संघटना नाही तर सामाजिक क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संघटना आहे. आतापर्यंत संघावर 1948, 1975, 1992 अशी तीन वेळा बंदी आली या तीनही बंदीकाळात संघ कसोटीला उतरला. शेवटी सरकारनेच संघावरची बंदी उठवली कारण संघाची भूमिका आणि कृती ही सत्याधारित होती. संघ म्हणजे विश्वास, संघ म्हणजे शुद्ध, सात्विक आचरण हा भाव स्वयंसेवकांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे.
 
जेव्हा भारतीय सैन्यदलाला मदतीची गरज लागली तेव्हा संघ स्वयंसेवकांनी सेवा दिली. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणीबाणीविरूद्ध जेव्हा आंदोलन करण्याची वेळ आली तेव्हा हजारो संघ स्वयंसेवक सत्याग्रही म्हणून मैदानात आले. मिसाखाली अटक झालेल्या कार्यकत्यांमध्ये 80टक्के संघ स्वयंसेवक होते. आणीबाणीनंतरच्या काळात मीनाक्षीपूरम् येथे झालेल्या धर्मांतरानंतर धर्म आणि संस्कृतीसाठी पुढाकार घेऊन व्यापक जनजागृती केली होती. त्यानंतर सुरू झालेल्या रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून संघाने संपूर्ण देश ढवळून काढला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदुत्वाविषयी स्पष्ट भूमिका, सिद्धांत आहेत आणि त्या सिद्धांतानुसार जगणारे स्वयंसेवक आहेत हा विश्वास संघाने प्राप्त केला आहे. शंभर वर्षांच्या कार्यकाळात अनेक संकटे, समस्या, आपत्ती याचा सामना संघाने केला. कठीण परिस्थितीतही संघाने हिंदू समाजाचे संघटन करण्याचे काम सोडले नाही.



rss
 

rss


आज संघ समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचला आहे, आपण त्याचे दृश्य स्वरूप कसे अनुभवता?

संघाचा शताब्दीचा प्रवास लक्षात घेता असे म्हणता येईल की, संघ उपेक्षा, अपमान, स्वागत आणि स्वीकार अशा चार टप्प्यातून पुढे गेला आहे. डॉक्टरजींनी संघ सुरू केला तेव्हा त्यांच्या कामाची उपेक्षा करण्याचा प्रयत्न झाला. संघबंदीच्या काळात संघ संपवण्याचा प्रयत्न झाला. संघ कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. आणीबाणीच्या काळात संघाच्या शक्तीचे दर्शन झाले तर, रामजन्मभूमी आंदोलनानंतर संघविचारांचा सार्वत्रिक स्वीकार होताना दिसत आहे. संघ प्रारंभापासूनच सर्व समाजघटकांशी संपर्क व संवाद करत असतो. संघाचा विरोध करणार्‍या संस्था, संघटना, व्यक्ती यांच्याशीही संघाने सातत्याने संपर्क आणि संवाद केलेला आहे. पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, बौद्ध अशा विविध उपासना पंथांच्या अनुयायांशी संघाचा संपर्क आहे व त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असतो. 1994 नंतर संघामध्ये संपर्क व प्रचार विभाग सुरू झाले. या विभागाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मतेचा भाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो.
आपल्या उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी आपली संस्कृती एकच आहे, आपले पूर्वज एक आहेत ही भूमिका आता स्वीकारली जात आहे आणि ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार समाजव्यवहारात रुजताना दिसत आहे.
 

rss


मागील काही वर्ष पूजनीय सरसंघचालक आग्रहाने पंच परिवर्तनाविषयी मार्गदर्शन करत आहेत. त्याचे स्वरूप काय आहे? ते नित्य संघकाम म्हणून कसे करता येते?
 
हिंदू समाजाचा स्वभाव बनवण्याचे काम म्हणजे पंच परिवर्तन होय. आपल्या समाजाला अस्पृश्यतेची व्याधी अनेक कारणांमुळे जडलेली आहे. पू. बाळासाहेब म्हणत,‘अस्पृश्यता पाप नसेल तर जगात कोणतेच पाप नाही.’ या सामाजिक व्याधीतून मुक्त होण्यासाठी आणि सामाजिक संघटन अधिक घट्ट करण्यासाठी काही वर्षांपूर्वी पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी तीन गोष्टींवर स्वयंसेेवकांनी भर द्यावा असा आग्रह केला होता. त्या तीन गोष्टी होत्या- एक मंदिर, एक पाणवठा, एक स्मशान. या तीनही ठिकाणी हिंदू समाजाअंतर्गत जे भेदभाव होतात ते समाप्त करण्यासाठी संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आणि त्याला प्रतिसादही मिळू लागला. पुढील काळात सरसंघचालकांनी हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी व सामाजिक समस्यांतून मुक्ती मिळवण्यासाठी पाच परिवर्तन सूत्रे सांगितली. ही पाचही सूत्रे डोळ्यासमोर ठेवून कोणताही भारतीय नागरिक स्वत:बरोबरच आपले कुटुंब आणि समाज यासाठी काम करु शकतो. या पंचपरिवर्तन सूत्रामध्ये पहिले सूत्र आहे-सामजिक समरसता. या समरसता गतिविधीच्या माध्यमातून मानवी व्यवहारात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक ते प्रबोधन आणि कृतिरूप आदर्श संघाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवले जातात.छोट्याछोट्या विषयातून समाजाचे मन घडवले जाते. आपण सर्व एका विशाल समाजाचे अभिन्न अंग आहोत. आपण परपस्परांचे मित्र आहोत. आपण परमपवित्र भारतमातेचे पुत्र असल्याने एकमेकांचे बंधू आहोत. आपल्या इतिहासातील सर्व महापुरूष हे सर्व समाजाचे असून सर्व समाजाने त्यांचा गौरव केला पाहिजे. महापुरूषांना त्यांच्या जन्मजातीपुरते मर्यादित करू नये. परस्परांशी बंधुभाव हाच धर्म या सूत्राच्या आधारे व्यवहार करावा, अशी समरसता गतिविधीच्या माध्यमातून समाजासमोर कृती आणि दिशा मांडली जाते. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर समरसतापूर्ण व्यवहार होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर समरसतेचे प्रतिबिंब उमटू लागले आहे.


rss 
पंचपरिवर्तनातील दुसरी गतिवधी कुटुंब प्रबोधन ही आहे. भारतीय कुटुंब व्यवस्था ही जागतिक पातळीवर सदैव अभ्यासाचा विषय राहिली आहे. आजही जगातील विविध अभ्यासक या कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी भारतात येत असतात. संघाच्या माध्यमातून समाजात कुटुंब प्रबोधन या विषयात स्वयंसेवक काम करतात. तेव्हा ते सहा बिंदूवर भर देत असतात. ते सहा बिंदू पुढीलप्रमाणे आहेत-भजन, भोजन, भ्रमण, भाषा, भुषा, भवन. या सहा बिंदूंना केंद्रस्थानी ठेवून कुटुंबाचा व्यवहार व्हावा अशी अपेक्षा असून अनेक कुटुंबात या सर्व गोष्टींचा अंगीकार होताना दिसत आहे. एकाच कुटुंबात राहणारे अनेक सदस्य त्यांच्या वैयक्तिक व्यस्ततेमुळे किंवा जीवनशैलीमुळे एकत्रितपणे कौटुंबिक सहजीवन अनुभवत नव्हते. कुटुंब प्रबोधनाच्या या सहा बिंदूूंमुळे त्यात बदल होताना दिसत आहे.
 
पंचपरिवर्तनातील तिसरी गतिविधी पर्यावरण ही आहे. पर्यावरणाचे अनेक प्रश्न आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची उत्तरे शोधण्याचे काम सुरू आहे. तरीही पर्यावरण रक्षणासंदर्भात प्रत्येक व्यक्ती निश्चितपणे ठोस काम करू शकतो. पर्यावरण गतिविधीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. व्यक्तीगत पातळीवर काम करण्यासाठी ‘पानी, पेड, प्लॅस्टिक’ या तीन बिंदूंना समोर ठेवून प्रबोधन केले जाते. पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर, झाडांचे रक्षण व वृक्षारोपण, व प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर यासंदर्भात समाजात पयार्र्वरणाविषयक जागरूकता निर्माण करून मानवी व्यवहारात बदल घडवता येतो. पर्यावरणाच्या जागतिक समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालूच असले तरी प्रत्येक व्यक्तीवर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे याचे भान निर्माण करण्याचे काम पर्यावरण गतिविधीच्या माध्यमातून केले जाते.
 
पंचपरिवर्तनातील पुढील बिंदू आहे नागरिक शिष्टाचार. भारतीय नागरिक म्हणून या देशाप्रती आपले काही दायित्व आहे आणि त्याचे पालन आपल्या दैनंदिन जीवनात झाले पाहिजे असा आग्रह या विषयाच्या माध्यमातून केला जात आहे. आपण भारतमातेचे संतान आहोत त्यामुळे या देशावर आपण प्रेम केले पाहिजे. देशाच्या एकसंघतेला व स्वातंत्र्याला बाधा येणार नाही असा व्यवहार करणारे भारतीय नागरिक जे संविधानाचा, राष्ट्रध्वजाचा, विविधतेचा सन्मान करतात असे नागरिक जास्तीत जास्त प्रमाणात दिसून यावेत व त्याचा परिणाम म्हणून शिस्त पाळणारे राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्न करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावेत यासाठी आवश्यक ते प्रबोधन नागरी शिष्टाचार या विषयाच्या माध्यमातून केले जाते. हा विषय समाजजीवनाचा अभिन्न अंग व्हावा यासाठी आवश्यक असणारे प्रबोधन केले जाते.
rss 
पंचपरिवर्तनाचा पुढील बिंदू आहे स्व-जागरण. या बिंदूची व्याप्ती व्यक्ती ते समष्टी अशी आहे. ‘मी कोण?’पासून सुरू होणारा प्रवास माझा वारसा काय, माझा आदर्श काय, माझी संस्कृती काय इथपर्यंत जातो. विस्मृतीत गेलेला आपला इतिहास, आपला वारसा, आपली संस्कृती, आपला गौरव यांचा शोध घेऊन आपल्या जीवनव्यवहारात त्याची पुन:प्रतिष्ठा करणे हा स्वजागरणाचा मुख्य हेतू आहे.
 
 
पंचपरिवर्तनातील सर्व विषय हे सर्व भारतीय नागरिकांना आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात सहजपणे अंगीकारता येण्यासारखे आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. भारतीय समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची ताकद या पंचसूत्रांमध्ये आहे.
 

rss


पंच परिवर्तनाचे बिंदू समान असले तरी आपल्या समाजात विविधता असल्याने अभिव्यक्ती ही विविधांगी होत असते. या विविधतेबाबत आपण काय सांगाल?

संपूर्ण भारताचा विचार करता विविधता ही आपल्या समाजाचा स्थायीभाव आहे. एकच सण देशभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. अभिव्यक्ती वेगवेगळी असली तरी त्यामागचा भाव एकच असतो. पंचपरिवर्तनाच्या बाबतीतही असेच म्हणता येऊ शकते. दोन-तीन वर्षापूर्वी प्रयागराज येथे कुंभमेळा संपन्न झाला. पर्यावरण गतिविधीच्या माध्यमातून ’एक थाली, एक झोली’ हे अभियान राबवले गेले. या अभियानामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर कमी झाला. त्यामुळे कुंभमेळ्यानंतर निर्माण होणार्‍या अनेक समस्या आटोक्यात आल्या. तामिळनाडूमध्ये अनेक मंदिरांच्या माध्यमातून अर्चक प्रशिक्षण योजना राबवली जाते. या योजनेतून सर्व जातीच्या भाविकांना पौरोहित्य करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रयोगामुळे अस्पृश्यता आणि जातिभेद या कुप्रथा समाप्त होत असून आपण सर्वजण एक आहोत, समान आहोत हा समरसतेचा भाव उत्पन होत आहे. अशी असंख्य छोटीमोठी उदाहरणे देशभर पाहायला मिळत असून पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाजात बदल घडून येताना दिसत आहे.
 
 
पंचपरिवर्तन गतिविधी असे म्हटले जाते, त्यामागची भावना काय?
गतिविधी या शब्दातच त्याचा अर्थ सामावला आहे. गतीने करण्याचे काम म्हणजे गतिविधी. मागील काही वर्षापासून देशभर संघ कार्यकर्ते या गतिविधीसाठी कार्य करत आहेत. गेल्या वर्षभरात पू. सरसंघचालकांनी देशाच्या चार प्रमुख महानगरात याच विषयावर समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांसोबत संवाद साधला होता. त्यांच्या संवादाचा आशय होता-हे सर्व काम केवळ संघच करेल असे नाही तर सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन गतीने आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे हे काम आहे. गतिविधीचे काम हे दीर्घकाळ करण्याचे नसून निश्चित कालखंड व निश्चित धेय डोळ्यासमोर ठेवून करण्याचे काम आहे. देशाच्या सर्व कानाकोपर्‍यात पंचपरिवर्तनाचे बिंदू केंद्रस्थानी ठेऊन काम सुरू झाले आहे.

 

rss

आज पंचपरिवर्तनाचे बिंदू घेऊन देशभर विविध संस्था, संघटना स्वतंत्रपणे काम करताना दिसत आहेत. या संस्था, संघटनांशी समन्वय-संपर्क करण्याची काही योजना आहे का?

आपल्या समाजाचे सुदैव असे आहे की, समाजात जेव्हा जेव्हा समस्या, आपत्ती उत्पन्न होतात तेव्हा तेव्हा समाजातूनच त्याचे निराकारण करण्यासाठी कोणी ना कोणीतरी पुढाकार घेत असतो. त्यामध्ये अनेक व्यक्तींबरोबरच संस्था व संघटना यांचा समावेश असतो. असे काम करणार्‍या प्रत्येकाचे कार्यक्षेत्र हे मर्यादित असले तरी ते खूप महत्त्वाचे असते. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यासोबत संघाने कायमच समन्वयाची भूमिका घेतली आहे. छोट्याछोट्या स्वरूपात काम करणार्‍या संस्था, संघटना यांच्याशी संपर्क करणे, संवाद करणे, त्यांच्या कामाची प्रशंसा करणे, आवश्यक ते पाठबळ उपलब्ध करून देणे इ. गोष्टी सातत्याने होत असतात. विविध विषयावर काम करणार्‍या संस्था, संघटनांचे विषयानुरूप एकत्रिकरण, प्रशिक्षण, समन्वय इत्यादीसाठी आवश्यक असणारी रचना हळूहळू आकाराला येत आहे. हे काम सर्वांना जोडण्याचे आहे. त्यामुळे शांतपणे ते चालूच राहील.
 
 
 

rss


पंचपरिवर्तन हा समाजाचा स्वभाव व्हावा अशी संघाची अपेक्षा आहे. ती वास्तवात येण्यासाठी कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे?
कोणताही सामाजिक बदल हा तात्काळ होत नसतो. बदलाची समाजाला सवय लावण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो. उदाहरण द्यायचे तर पंढरपूरच्या आषाढी वारीचे देता येऊ शकते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी वारीकाळात होणार्‍या अस्वच्छतेमुळे वारीवर बंदी का घालू नये? असा प्रश न्यायालयाने उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आणि देहू आळंदी ते पंढरपूर असा निर्मळ वारीचा प्रयोग सुरू झाला. पहिली एक-दोन वर्षं वारकर्‍यांना शौचालय दाखवण्यासाठी, शौचालयाचा वापर करा अशी विनंती करण्यासाठी संघस्वयंसेवक निर्मळ वारीचे वारकरी म्हणून काम करत होते. आता दहा वर्षानंतर वारकर्‍यांना निर्मळ वारीची सवय झाली आहे. आता स्वयंसेवकांना दिशादर्शन करावे लागत नाही. वारकरी स्वत:च स्वच्छतेचे पालन करतात.
देशभर श्रावण महिन्यात कावड यात्रा निघतात. या यात्रांच्या दरम्यान अस्वच्छता निर्माण होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी भाविक घेत असतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. समाजाचा स्वभाव तयार करणे, सामाजिक जागृती करणे, समाजाचा सकारात्मक भाव प्रकट करण्यासाठी प्रयत्न करणे हे गतिविधींचे काम आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सोशल मिडीया, डिजिटल मीडिया यांच्या माध्यमातून प्रबोधन करणारे असंख्य युवक आज समाजात उभे आहेत. तरुण पिढीला अपील होणारे हे सर्व बिंदू असल्यामुळे त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो आहे व तरुण त्यांच्या पद्धतीने अभिव्यक्त होताना दिसत आहे.
 
  
 


rss


संघाच्या शताब्दी वर्षात संघाच्या संख्यात्मक, गुणात्मक आणि संघटनात्मक स्थितीबद्दल काय सांगता येईल?

 
संघाचे काम हे रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव किंवा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी नाही. संघकाम हे निरंतर चालणारे काम आहे. त्याच्यात बदल होत नाही. हिंदू समाजाला संघटित करणे हे संघाचे मुख्य काम आहे. काळाच्या ओघात संघाचे बाह्य रूप बदलताना दिसून आले. जसे की, संघाची प्रार्थना, प्रतिज्ञा यामध्ये आवश्यकतेनुसार बदल झाले. संघाचा गणवेश बदलला पण हे बदल करताना मूळ गाभ्याचा विषय कायम राहिला. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अनेक उपक्रम आणि अभियाने राबवली जात आहेत. संघ विस्तारासाठी शताब्दी विस्तारक ही संकल्पना घेऊन अनेक स्वयंसेवक काम करत आहेत. संघाचा विस्तार म्हणजे संघ शाखांमध्ये वाढ. एक लाखाहून अधिक शाखा सुरू व्हाव्यात असा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सात दिवस शाखा विस्तार अभियान केले जात आहे. त्याचप्रमाणे हिंदू संमेलने, युवा संमेलने, सद्भाव सभा, मातृशक्ती जागरण इ. माध्यमातून संघ विस्तार चालू आहे. संघाची शक्ती जशीजशी वाढत आहे तसेतसे संघ विचार स्वीकारणारे आणि त्या विचाराला विरोध करणारे समूह समोर येत आहेत. वसुधैव कुटुंबकम् ही संघाची, हिंदुत्वाची व्याख्या आहे. त्यामुळे स्वीकार करणारे आणि विरोध करणारे दोन्ही आपलेच आहेत ही भावना कायम ठेवून संघ वाटचाल करीत आहे. यामुळेच संघाची मागील शंभर वर्षात गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ झालेली आहे. असे असले तरी संघ स्वत:चे वेगळेपण कायम ठेवून आहे. हे वेगळेपण कार्यपद्धतीचे आहे. संघासारखी दुसरी कोणतीही संघटना नाही. त्यामुळे संघाशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. डॉ. हेडगेवारांनी आपल्या जीवनातून संघ स्वयंसेवकांसमोर आदर्श उभा केला आहे. त्या आदर्शाकडे पाहून असंख्य लोक वन लाईफ वन मिशन या ध्येयाने जगत असतात. संघ कार्यकर्त्याचे दोन प्रकार करता येतात. प्रचारक आणि गृहस्थी कार्यकर्ते. दोघेही सामाजिक तपस्याच करत असतात आणि त्यातून ते हिंदू समाजाच्या संघटनाचे काम करत असतात. आज मानवी जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणार्‍या छत्तीस राष्ट्रव्यापी संघटना संघ स्वयंसेवक चालवतात. त्यामध्ये विद्यार्थी, कामगार, शेतकरी, महिला, वनवासी, उद्योग इ. क्षेत्रांचा समावेश आहे. एकट्या वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून 700 छात्रावास चालवले जातात. एक लाखापेक्षा जास्त एकल विद्यालये चालवली जातात. विद्या भारतीच्या माध्यमातून देशभर 15 हजारापेक्षा जास्त सरस्वती विद्यालये चालवली जातात. जागृती, संस्कार आणि संस्कृती या तीन गोष्टी केंद्रस्थानी ठेवून हे काम चालते. संघ स्वयंसेवकांच्या माध्यमातून काही ठिकाणी कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गही चालवले जातात.
 
 
rss
 
एकूणच शंभर वर्षार्ंचा प्रवास डोळ्यासमोर आणला तर संघ संघटनात्मक, गुणात्मक पातळीवर सदैव विकसित होेत राहिला आहे आणि पुढेही होत राहिल.संघ स्वयंसेवक म्हणून संघाच्या शतकोत्तर वाटचालीबद्दल काय सांगाल?
संघकामाचा आत्मा संवाद आणि संपर्क आहे. या संपर्काचे परिणाम दिसून येत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात संघाशी जोडून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. संघाचे ऊर्जाकेंद्र असणारी संघ शाखा यापुढेही चालू राहीलच पण, समाजात व्यापक परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न चालूच राहतील. योग्य दिशा आणि अचूक परिणाम हे संघकामाचे भविष्यातील परिमाण असेल. संपूर्ण जगाला सुख, शांती हवी आहे आणि ही सुख, शांती प्रदान करण्याची शक्ती केवळ भारत आणि सनातन हिंदू संस्कृतीकडेच आहे. त्यामुळे जग भारताकडे खूप मोठ्या आशेने पाहत आहे. योग, आयुर्वेद, संस्कार, संस्कृती याचे जग हळूहळू अनुसरण करू लागले आहे. सांस्कृतिक आधारावर जगाला जोडण्याची क्षमता भारताकडे आहे. हा विश्वास निर्माण झाला आहे तो प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढील काळात संघ विविध पातळ्यांवर काम करतच राहील. व्यक्तीनिरपेक्ष, स्वावलंबी, नि:स्वार्थ या तत्त्वत्रयीचा अंगीकार करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भविष्यात विश्व मानवता धर्म जागवताना दिसेल.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 पुस्तक विभाग  संपादक 

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001