संवाद हरवलेलं नातं

विवेक मराठी    03-Nov-2026
Total Views |
Relationship and Communication
 
डॉ. वर्षा महेश ठाकूर
 

Relationship and Communication 
 
नातं केवळ एकत्र राहिल्याने टिकत नाही; ते एकमेकांना समजून घेतल्याने जिवंत राहतं.
कधी कधी नात्यातली सर्वांत मोठी दरी ही दोन माणसांच्या मध्ये नसते, तर एका व्यक्तीच्या मनात साचलेल्या आणि कधीच ऐकून न घेतलेल्या शब्दांमध्ये असते आणि म्हणूनच, आपल्या जवळच्या माणसाने शांत रहायला सुरुवात केली, तर एकदा तरी थांबून विचारावं... “तू गप्प आहेस, कारण तुला काही सांगायचं नाहीये...की, आता तुला काही सांगावंसंच वाटत नाही?”
 
ज ती माझ्यासमोर बसली होती. नेहमीप्रमाणेच शांत. चेहर्‍यावर मंद हसू. बोलण्यात औपचारिकपणा. मात्र तब्येतीच्या तक्रारी सांगून झाल्यावरही ती उठण्याचं नाव घेत नव्हती. जणू काहीतरी सांगायचं होतं तिला... पण शब्द ओठांपर्यंत येत नव्हते.
मी सहज विचारलं,
 
”काय झालं? आज काहीतरी मनात आहे असं वाटतंय. सांगायचंय का काही?”
 
 
तिने माझ्याकडे पाहिलं. क्षणभर हसली आणि म्हणाली,
 
“डॉक्टर, तुम्हाला एक गोष्ट सांगू? पण तुम्ही मला चुकीचं तर समजणार नाही ना?”
 
“अगं, मनातलं सांगण्यासाठीच तर आपण बोलतोय. सांग ना!”
 
तिने एक दीर्घ श्वास घेतला.
 
“डॉक्टर, मी हल्ली खूप शांत झालेय. पूर्वी अशी नव्हते हो मी! किती बोलायचे! प्रत्येक गोष्ट सांगावीशी वाटायची. एखादी छोटीशी गोष्ट घडली तरी घरी आल्यावर त्यांना सांगायची घाई असायची. त्यांच्याशी बोलल्याशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटायचाच नाही. पण आता... आता दिवसभरात काय घडलं, काय वाटलं, कशाचा आनंद झाला, कशाचं दुःख झालं... काहीच सांगावंसं वाटत नाही.”
 
मी विचारलं,“असं काय झालं? तुमच्यात काही भांडण झालंय का?”
 
“नाही हो डॉक्टर! भांडणही नाही आणि अबोलाही नाही. सगळं पूर्वीसारखंच आहे. घरात सगळं व्यवस्थित चाललंय. ते त्यांचं काम करतात, मी माझं करते. चहा वेळेवर, जेवण वेळेवर, घरात येणार्‍या-जाणार्‍यांचं सगळं व्यवस्थित. बाहेरून पाहिलं तर आमच्या संसारात काहीच बिनसलंय असं कुणाला वाटणार नाही.
 
पण आमच्यातलं बोलणंच हरवलंय हो!”
 
ती बोलता बोलता थांबली.
 
मी तिच्याकडे पाहत राहिले. तिला पुढे बोलायचं होतं.
 
ती सांगू लागली
 
“माझे यजमान खूप हुशार आहेत, एका मल्टिनॅशनल कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट पदावरून रिटायर झाले. अभ्यासू, कर्तव्यदक्ष, नावाजलेले. त्यांनी आयुष्यात खूप मोठं काम केलंय. लोक त्यांचा आदर करतात. त्यांचं कौतुक करतात. मलाही त्यांचा अभिमान आहे. पण कधी कधी वाटतं, सगळ्या जगाला त्यांनी ऐकून घेणं महत्त्वाचं वाटतं... फक्त मला माझं म्हणणं मांडायला जागा नाही.”
मी हळूच विचारलं,“म्हणजे ते तुमचं ऐकून घेत नाहीत?”
 
“ऐकतात ना! पण ऐकणं आणि मनापासून ऐकून घेणं यात फरक असतो ना, डॉक्टर? मी काही सांगायला सुरुवात केली की लगेच म्हणतात, ‘तुला काही कळत नाही या विषयात. तू बावळट आहेस.’ कधी मी एखादं मत मांडलं तर म्हणतात, ‘तू उगाच विचार करतेस.’ सुरुवातीला वाईट वाटायचं. मी समजावून सांगायचे. कधी म्हणायचे,‘अहो, माझं एकदा ऐकून तर घ्या!’ पण त्यांना वाटायचं, मी उगाच वाद घालतेय.”
 
“हळूहळू माझ्या लक्षात आलं, त्यांना माझ्याशी चर्चा करायची नसते. त्यांना त्यांचं मत सांगायचं असतं. आणि मी ते ऐकायचं असतं.”
 
हे सांगताना तिच्या चेहर्‍यावर एक हलकंसं हसू उमटलं. ती बोलतच होती...
 
“किती विचित्र आहे ना, डॉक्टर? मी आयुष्यभर त्यांची सोबत केली. त्यांच्या प्रत्येक कामात रस घेतला. त्यांच्या यशात आनंद मानला. त्यांना काही त्रास झाला की काळजी केली. त्यांच्या आवडीनिवडी जपल्या. पण माझ्या मनात काय चाललंय, हे जाणून घेण्याची त्यांना कधी गरजच वाटली नाही.”
 
तिला थोडं थांबवत मी विचारलं,“मग तुम्ही त्यांना हे कधी स्पष्टपणे सांगितलं नाही?”
 
ती लगेच म्हणाली,“सांगितलं होतं ना! सुरुवातीला सांगितलं होतं. पण प्रत्येक वेळी स्वतःचं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत राहायचा तरी किती? शेवटी एक दिवस मनात म्हटलं, जिथे आपलं म्हणणंच ऐकून घेतलं जात नाही, तिथे पुन्हा पुन्हा तेच सांगून काय उपयोग?”
 
मी तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते.
 
ती पुढे म्हणाली,“आम्हाला एकच मुलगी. तिचं शिक्षण, तिचं संगोपन, तिचं लग्न... सगळं झालं. आता ती तिच्या संसारात रमली आहे. फोन करते, चौकशी करते, प्रेमाने बोलते. मला काही हवंय का, असंही विचारते. पण मी नेहमी सांगते, ‘नाही गं, मला काय हवंय? सगळं आहे माझ्याकडे...आणि खरंच आहे हो डॉक्टर, सगळं आहे....घर आहे, संसार आहे, आर्थिक अडचण नाही. आयुष्यभर कष्ट करून उभं केलेलं सगळं आहे. फक्त मनातलं बोलण्यासाठी हक्काचं माणूस नाही, याची उणीव तिला कशाला सांगू? तिच्या मनात बाबांबद्दल वाईट भावना निर्माण होतील. तिलाही तिचा संसार आहे. कशाला तिच्या मनावर ओझं टाकायचं? म्हणून गप्प राहते.”
 
मी विचारलं,“पण तुमचे यजमान निवृत्तीनंतरही कामात व्यस्त असतात का?”
 
“हो तर! आणि त्याचं मला वाईटही वाटत नाही. उलट मला आनंदच होतो. त्यांना कामाची आवड आहे. लोकांना त्यांची गरज आहे. ते बैठका घेतात, कार्यक्रमांना जातात, सामाजिक काम करतात. बाहेरच्या लोकांसाठी त्यांच्याकडे किती वेळ असतो! किती संयमाने ते सगळ्यांचं ऐकून घेतात! कुणी काही विचारलं की समजावून सांगतात. मग माझ्याशी बोलताना तो संयम कुठे जातो?”
मी त्यांच्या आयुष्यातली इतकी जवळची व्यक्ती आहे, की मला वेगळं समजावून सांगायची गरजच नाही, असं त्यांना वाटत असेल कदाचित. पण जवळच्या माणसालाच तर जास्त समजून घ्यायचं असतं ना?”
 
तिचा आवाज किंचित भरून आला.
 
मी तिला पाणी दिलं. तिने एक घोट घेतला आणि पुन्हा बोलू लागली.
 
“आणखी एक गोष्ट सांगू, डॉक्टर? चारचौघांत ते माझी गंमत करतात. माझ्या एखाद्या वाक्यावर विनोद करतात. सगळे हसतात. मीसुद्धा हसते. काय करणार? त्या वेळी चेहरा पाडून बसले तर वातावरण बिघडेल. लोक म्हणतील, एवढ्या छोट्या गोष्टीचं काय मनाला लावून घ्यायचं? पण त्या हसण्याने माझं मन किती दुखावतं, हे कोणाला दिसत नाही. घरी आल्यावर कधी कधी त्यांना सांगावंसं वाटतं, ‘अहो, सगळ्यांसमोर असं बोलू नका. मला वाईट वाटतं.’ पण मग मनात विचार येतो, ते पुन्हा म्हणतील,‘तुला साधा विनोदही समजत नाही. उगाच मनाला लावून घेतेस.’ मग मीच स्वतःला समजावते. जाऊ दे. एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला बोलायचं? अशा किती गोष्टी सोडून दिल्या मी! सुरुवातीला प्रत्येक वेळी थोडं वाईट वाटायचं. मग मनाला समजवायचे. नंतर मात्र वाईट वाटलं तरी सांगणंच बंद केलं.”
 
मी विचारलं,“आणि तुम्हाला जाणवलं नाही का, की तुम्ही हळूहळू स्वतःला त्यांच्यापासून दूर नेत आहात?”
 
ती माझ्याकडे पाहत म्हणाली,“आता जाणवतंय, डॉक्टर. पूर्वी ते कुठे जाताहेत, कधी येणार आहेत, दिवसभरात काय झालं, याची मला उत्सुकता असायची. उशीर झाला तर विचारायचे, ‘इतका उशीर का झाला?’ आता नाही विचारत. फोनवर कुणाशी बोलत असतील, तर विचारत नाही. काय ठरवलंय, कुठे जायचंय, हेही विचारत नाही. पूर्वी त्यांच्यासोबत एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की छान तयारी करायचे. साडी कोणती नेसायची, केस कसे करायचे, याचाही आनंद असायचा. आता कार्यक्रमाला जायचं म्हटलं तरी मनात उत्साह नसतो. कधी कधी निमित्त सांगून घरीच राहते. कारण तिथे गेल्यावर तेच सगळं पुन्हा घडणार, हे मनाला माहीत असतं.
 
ते त्यांच्या गप्पांत रमतील. लोक त्यांचं कौतुक करतील. मी त्यांच्या शेजारी बसेन. कुणी विचारलं तर हसेन. आणि एखाद्या क्षणी पुन्हा माझी गंमत होईल.
 
मग घरी परतताना खिडकीबाहेर पाहत बसेन.
 
आणि ते दिवसभरातल्या भेटीगाठींबद्दल सांगत राहतील.”
 
बोलताबोलता ती क्षणभर थांबली.
 
एकदा असंच झालं. घरी परतताना त्यांनी मला विचारलं,‘काय झालं गं? गप्प का इतकी?’ तुम्हाला सांगते डॉक्टर, मला त्या क्षणी खूप वाटलं, सगळं सांगून टाकावं. म्हणावं, ‘तुम्ही माझ्या शेजारी बसला आहात, पण माझ्या मनापासून किती दूर गेला आहात, याची जाणीव आहे का तुम्हाला?’
 
पण तोंडातून फक्त ‘काही नाही’, एवढंच निघालं.
 
कारण मला भीती वाटली होती. ते माझं बोलणं समजून घेतील यापेक्षा, माझ्या भावनांनाच चुकीचं ठरवतील, याची भीती.
मी हळूच विचारलं,“तुम्हाला असं वाटतं का, की आता त्यांना तुमची गरज उरलेली नाही?”
 
काही क्षण ती गप्प राहिली.
 
“नाही डॉक्टर, तसंही नाही. त्यांना माझी गरज आहे. घरातलं सगळं मी सांभाळते. त्यांची काळजी घेते. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवते. काही अडलं तर माझ्याकडेच येतात. पण त्यांना मी करत असलेल्या कामांमुळे माझी गरज आहे, की माझ्या सहवासाची? हा प्रश्न कधी कधी मनात येतो.
 
घर सांभाळणारी, त्यांच्या दिमतीला सदैव हजर असणार्‍या मी पलीकडे जी मी उरते ना, ती त्यांना दिसते का?”
“मला एखादी गोष्ट आवडते, एखादी गोष्ट खटकते, कधी काही नवीन शिकावंसं वाटतं, कधी कुठेतरी फिरायला जावंसं वाटतं, कधी नुसतं मन मोकळं करावंसं वाटतं...अशी मी, त्यांच्यासाठी अजूनही आहे का?”
 
तिच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं.
 
किंवा कदाचित, ते तिचं तिलाच शोधायचं होतं.
 
ती पुन्हा बोलू लागली.
 
“डॉक्टर, मी त्यांची पत्नी आहे, हे खरं. पण त्याआधी मी एक स्वतंत्र व्यक्ती आहेे. स्वतःचे विचार, आवडीनिवडी, स्वप्नं असणारी...”
“लग्नानंतर संसारात रमले. मुलीच्या संगोपनात रमले. घर, नातीगोती, पाहुणेरावळं, सणवार, समारंभ... सगळं सांभाळलं. आनंदाने करत गेले. कारण मला माझ्या माणसांसाठी करायला आवडायचं.”
 
“हे सगळं करताना मला वाटायचं की आम्ही दोघं एकमेकांचे सोबती आहोत. एकमेकांशी बोलू, विचारांची देवाणघेवाण करू, मतभेद झाले तरी मोकळेपणी चर्चा करू. संसारात माझी भूमिका कामकर्‍याची आहे, माझ्या विचारांना मात्र तितकीशी जागा नाही.”
 
मी विचारलं,“तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत?”
 
तिने लगेच उत्तर दिलं नाही.
 
काही क्षण ती स्वतःच्याच विचारांत हरवून राहिली. मग म्हणाली, “काही फार मोठं नकोय, डॉक्टर. मला त्यांचं काम बंद करायचं नाहीये. फक्त कधीतरी त्यांनी माझ्याजवळ बसावं. माझं म्हणणं लक्ष देऊन ऐकावं. त्यांना पटलंच पाहिजे, असा माझा आग्रह नाही. पण काही गोष्टीत त्यांच्यापेक्षा वेगळं असलेलं माझं मत त्यांनी ऐकून तरी घ्यावं. मी बोलताना काही चुकले तर, समजावून सांगावं. पण चारचौघांत माझी गंमत करून मला लहान, केविलवाणं करू नये.”
 
“आणि कधी मी काही बोलत नसेन, तर ‘काय झालं?’ असं फक्त विचारून थांबू नये. खरंच काय झालंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. मला सगळ्या जगाकडून कौतुक नकोय, डॉक्टर. माझ्या माणसाने मला समजून घ्यावं, एवढीच अपेक्षा आहे...म्हणजे होती..अगदी आताआतापर्यंत”
 
तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
 
“पण आता मी त्यांच्याकडून अपेक्षाच ठेवत नाही. आधी काही बोलले की वाद व्हायचा. आता मी बोलतच नाही, त्यामुळे वादही होत नाहीत. घरात शांतता असते. तरी सगळं सुरळीत चालू असतं.पण डॉक्टर, ही शांतता म्हणजे सुख आहे का?”
त्या प्रश्नाने मीही काही क्षण अंतर्मुख झाले.
 
“खरंच, दोन माणसांमध्ये भांडण नसणं म्हणजे त्यांच्यात सगळं ठीक असणं असतं का? कधी कधी वाद थांबतात, कारण एका व्यक्तीने प्रश्न विचारणंच सोडून दिलेलं असतं.”
 
तिच्या बाबतीत नेमकं हेच घडलं होतं.
 
मी तिला विचारलं,“तुम्ही त्यांच्याशी पुन्हा एकदा मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न कराल का?”
ती किंचित हसली.
 
“डॉक्टर, प्रयत्न करायला हरकत नाही. पण आता कुठून सुरुवात करायची, हेच कळत नाही. एकदा सकाळी मी त्यांना चहा देत होते. ते पेपर वाचत बसले होते. मनात आलं, आज सांगावं सगळं. म्हणावं, ‘मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.’
मग विचार आला, ते म्हणतील, ‘काय झालं आता?’
 
किंवा मी बोलायला लागल्यावर म्हणतील, ‘तू उगाच मनाला लावून घेतेस.’आणि पुन्हा तेच! मग मी फक्त विचारलं, ‘चहा अजून हवा का?’
ते ‘नको’ म्हणाले
मी स्वयंपाकघरात गेले.”
“डॉक्टर, त्या दिवशी मला जाणवलं, माझं मन आता त्यांच्याशी वाद घालण्याइतकंसुद्धा त्यांच्याजवळ राहिलेलं नाही. हे जाणीव फार दुःखद होती.”
ती थोडी थांबून म्हणाली,
“कधी कधी आरशात स्वतःकडे पाहते. वाटतं, ही तीच स्त्री आहे का, जी एकेकाळी किती हसरी होती? किती बोलायची? किती उत्साहाने प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायची? ती कुठे गेली? मग जाणवतं, ती अजूनही माझ्यात आहे. पण तिला व्यक्त होण्यासाठी जागाच मिळेनाशी झाली आहे. माझं वय झालंय, हे खरं. शरीर थकतं. पूर्वीसारखी ऊर्जा नसते. पण वय झाल्यावर मनाला असलेली संवादाची गरज संपते का?
उलट, आयुष्याच्या या टप्प्यावर माणसाला बोलायला, आठवणी सांगायला, जुन्या गोष्टी आठवायला, नुसतं कुणीतरी जवळ बसावं असं वाटत नाही का?“
मी तिचा हात हलकेच हातात घेतला.
“तुम्ही आज हे सगळं बोलत आहात, हेही महत्त्वाचं आहे. इतकी वर्षं मनात साठलेलं दुःख तुम्ही कुणाजवळ तरी मोकळं करताय.”
ती म्हणाली,
“हो डॉक्टर. म्हणूनच कदाचित आज इतकं बोलतेय. तुम्ही मला मध्येच थांबवलं नाही. मी काय म्हणतेय ते ऐकून घेतलंत. लगेच माझं चुकतंय की त्यांचं चुकतंय, असा निर्णय दिला नाहीत.
कधी कधी माणसाला सल्ल्यापेक्षा ऐकून घेणारं माणूस जास्त हवं असतं, नाही का?”
मी तिच्याकडे पाहून हसले.“अगदी खरंय...”
ती पुन्हा म्हणाली,
“पण डॉक्टर, मला त्यांच्याबद्दल राग नाही. खरंच सांगते. त्यांनी आमचा संसार चांगला उभा केला. मुलीला चांगलं शिक्षण दिलं. माझी काळजीही घेतली. त्यांच्यात खूप चांगले गुण आहेत म्हणूनच तर मी इतकी वर्षं त्यांच्या सोबत आनंदाने राहिले.
माझी तक्रार त्यांच्या कर्तृत्वाबद्दल नाही. त्यांच्या स्वभावातल्या प्रत्येक गोष्टीबद्दलही नाही. फक्त आमच्यातला संवाद हरवला, याचं दुःख आहे. मला त्यांचं आयुष्य बदलायचं नाही. फक्त त्यांच्या आयुष्यात माझ्यासाठीही थोडी जागा असावी, असं वाटतं. माझ्या मताचा आदर करावा. माझ्या भावनांना महत्त्व द्यावं. आणि हो... कधीतरी माझ्याशी असं बोलावं, जसं ते त्यांच्या आवडीच्या लोकांशी बोलतात. बस एवढंच!”
ती उठण्याच्या तयारीने खुर्चीवर सरळ बसली. चेहर्‍यावर पुन्हा तेच मंद हसू आलं.
मी विचारलं,“आता बरं वाटतंय?”
ती म्हणाली,
“हो डॉक्टर. मन थोडं हलकं झालं.
घरी गेल्यावर पुन्हा सगळं नेहमीसारखंच असेल. मी माझ्या कामात नि ते त्यांच्या कामात व्यस्त असतील. कदाचित आमच्यात पुन्हा असंच मोजकं बोलणं होईल.
पण आज एक गोष्ट लक्षात आली. माझ्या मनात जे आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे. मला वाईट वाटतं, याचा अर्थ मी कमकुवत नाही. मला ऐकून घ्यावं असं वाटतं, याचा अर्थ मी भांडखोर नाही. मीही एक व्यक्ती आहे. मलाही भावना आहेत. आणि मी माझ्या भावना सतत गिळून टाकणं, हे ही बरोबर नाही. मलाही आदराने वागवलं जाण्याची गरज आहे.”
ती दारापर्यंत गेली आणि पुन्हा वळून म्हणाली,
“डॉक्टर, एक गोष्ट मात्र खरी आहे. माणसं एकमेकांपासून दूर जातात, ती नेहमी घर सोडून किंवा नातं तोडूनच नाही. कधी कधी ती एकाच घरात राहतात. एकाच टेबलावर जेवतात. एकाच गाडीतून प्रवास करतात. एकाच कार्यक्रमाला जातात. पण एकमेकांच्या मनात काय चाललंय, हे जाणून घेणंच थांबवतात, त्यांच्यात अंतर निर्माण व्हायला लागतं. आणि एक दिवस असाही येतो, की एक व्यक्ती बोलणं सोडून देते. दुसरी व्यक्ती मात्र समजत राहते की सगळं ठीक आहे. कदाचित आमच्यातही हेच झालंय.”
ती निघून गेली.
मी बराच वेळ तिच्या बोलण्याचा विचार करत बसले.
तिच्या संसारात मोठं संकट नव्हतं. कुठली आर्थिक अडचण नव्हती. कुठलं उघड भांडण नव्हतं. कुणी घर सोडून गेलं नव्हतं. होतं ते फक्त हळूहळू कमी होत गेलेलं बोलणं.
एकेकाळी जिथे विचारांची देवाणघेवाण होती, तिथे आता एकतर्फी संवाद उरला होता. जिथे मनमोकळेपणा होता, तिथे आता शब्द जपून वापरले जात होते. जिथे अपेक्षा होत्या, तिथे आता त्या टाळण्याची सवय झाली होती.
आणि सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे, हे सगळं घडत असताना संसार मात्र सुरळीत चालू होता.
कारण ती तिच्या जबाबदार्‍या पार पाडत होती. तिच्या चेहर्‍यावर हसू होतं. ती लोकांमध्ये मिसळत होती. सामाजिक कामात सहभागी होत होती. मुलीशी प्रेमाने बोलत होती.
तिच्या आयुष्यातलं सगळं संपलं नव्हतं.
फक्त तिच्या मनातलं सांगण्यासाठी असलेली एक महत्त्वाची जागा रिकामी झाली होती.
आपण अनेकदा नात्यांमध्ये प्रेम म्हणजे काळजी घेणं, जबाबदार्‍या पार पाडणं, एकमेकांसाठी सोयी निर्माण करणं, असं मानतो. या सगळ्या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत.
पण प्रेमात ऐकून घेणंही असतं. समोरच्या व्यक्तीचं मत आपल्यापेक्षा वेगळं असलं, तरी त्याला व्यक्त होऊ देणं असतं.
विनोदाच्या नावाखाली तिचा अपमान होणार नाही, याची काळजी घेणं असतं.
आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आपल्या जवळच्या माणसाने आपल्याशी बोलणं कमी केलं, तर त्याच्या शांततेला स्वभाव, वय किंवा थकवा म्हणून दुर्लक्ष न करता, त्या शांततेमागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करणं असतं.
कारण प्रत्येक शांत माणूस समाधानी असतोच असं नाही.
काही माणसं रागावलेली असतात. काही दुखावलेली असतात. काही निराश झालेली असतात. आणि काही माणसं इतकी वर्षं
स्वतःला समजावत राहतात, की एक दिवस त्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची इच्छाच उरत नाही.
अशा वेळी नातं कदाचित तुटलेलं नसतं. ते टिकलेलं असतं. पण त्यातला जिवंतपणा कमी झालेला असतो. कारण नातं केवळ एकत्र राहिल्याने टिकत नाही; ते एकमेकांना समजून घेतल्याने जिवंत राहतं.
कधी कधी नात्यातली सर्वांत मोठी दरी ही दोन माणसांच्या मध्ये नसते, तर एका व्यक्तीच्या मनात साचलेल्या आणि कधीच ऐकून न घेतलेल्या शब्दांमध्ये असते.
आणि म्हणूनच, आपल्या जवळच्या माणसाने शांत रहायला सुरुवात केली, तर एकदा तरी थांबून विचारावं... “तू गप्प आहेस, कारण तुला काही सांगायचं नाहीये...की, आता तुला काही सांगावंसंच वाटत नाही?”
कदाचित हा एक प्रश्न एखाद्या नात्याला पुन्हा बोलतं करेल.
कदाचित नाहीही. पण निदान, त्या शांततेमागचं दुःख समजून घेण्याची सुरुवात तरी होईल.