तरुणाईची स्वप्नं ग्लोबल तरी ‘अस्सल भारतीय’

विवेक मराठी    03-Nov-2026
Total Views |
@ डॉ. आशुतोष जावडेकर
 
 Parisanwad
तरुणाईच्या स्वप्नांचं सौंदर्य टिपताना आपली नजर कमकुवत झाली आहे का, हा विचार या निमित्तानं वरच्या सगळ्या पिढ्यांनी करायला हवा. तरुणाईची स्वप्नं बघण्याची ताकद तर निरंतर आहे! आणि ती स्वप्नं एकाच वेळेला ग्लोबल आणि तरी अस्सल भारतीय आहेत! माझा त्या स्वप्नांवर आणि ती बघणार्‍या भारतीय युवाशक्तीवर संपूर्ण विश्वास आहे.
कुठल्याही काळात बुजुर्ग मंडळींना तरुण मुलं ही उद्धट, आज्ञापालन न करणारी आणि बंडखोर वाटत असतात! जुन्या आणि नव्यामधला संघर्ष हा काही आजचा नाही. जगभरातील आणि भारतातीलही मागच्या काही शतकांमधील साहित्य वाचताना हे लगेच जाणवतं. म्हणूनच कालिदासाच्या ’मालविकाग्निमित्रम्’ या नाटकाच्या अगदी सुरुवातीला सूत्रधार येतो आणि ”पुराणमित्येव न साधु सर्वं,” हे ठणकवून सांगतो. आत्ताच्या भारतीय तरुणाईकडे बघताना-विशेषतः त्यांची फटकळ आणि अनेकदा अश्लीलसदृश वाटणारी भाषा ऐकता-चाळिशीच्या पुढच्या मंडळींना आश्चर्य वाटतं, राग येतो आणि धक्काही बसतो. आपण हे ध्यानात घ्यायला हवं की, केवळ पिढीमधील अंतर इथे उतरलं आहे असं नाही; तर बदलता काळदेखील त्याचं अंतर आणि ताण घेऊन मध्ये उभा आहे.
 
...आणि बाकी काहीही असलं तरी तरुण शक्ती हीच कुठल्याही देशाला अंतिमतः पुढे नेत असते. बुजुर्ग मंडळी दिशा देऊ शकतात; पण रथ हाकायला तरुणाईच लागते. ...आणि म्हणून ती शक्ती भल्यासाठी खर्च होईल, हे बघणं अगत्याचं असतं. ’युवा स्यात साधुशील: स्यात’ ही अपेक्षा समोर ठेवून जेव्हा ज्येष्ठ मंडळी इंस्टाग्रामवर जातात तेव्हा त्यांना दिसतात ते उघडेनागडे फोटो, अतर्क्य इमोजी, स्वतःच्या प्रेमात पडलेली तरुणाई. ...आणि मग तो दुरावा अजूनच घट्ट होतो.
 
 
मग अनेकदा ही पिढी केवळ स्वतःपुरते बघणारी आणि स्वतःमध्ये अडकलेली अशी आहे, असा निष्कर्ष काढून बुजुर्ग मोकळे होतात. ...आणि हे मात्र खरं आहे, असं मला वाटत नाही. आजची तरुण पिढी हा समाजाचा आणि देशाचाही विचार करते; पण तसा विचार करताना ती स्वतःला बाजूला मुळीच ठेवत नाही. आधीच्या पिढ्यांमध्ये जे नकळत एक गृहीतक होतं की, देशासाठी काही करताना आपण स्वतः त्याग करणं अपेक्षित आहे. ते आत्ताच्या तरुणाईला पटणारे नाही. उलट ’आपलं भलं करत आपण जसं मोठं होऊ तसं आपण आपल्या सोबतच्या दहा जणांचा विकास करत जाऊ,’ यावर विश्वास ठेवणारी ही नवीन युवा पिढी आहे. ही पिढी बेजबाबदार नाही; पण त्यांची जबाबदारीची व्याख्या वेगळी आहे.
 
 
'Lok Niti CSDS youth and political survey-2024' मधले निष्कर्ष हे आपल्याला बरंच काही सांगतात. 18 ते 22 या वयोगटातील पहिल्यांदा ज्यांनी मतदान केलं, त्यांचा हा सर्व्हे होता. त्यातील 92% युवकांनी सांगितलं की, देशात काय घडामोडी चालू आहेत त्याचा आम्ही ट्रॅक ठेवतो आणि आम्हाला त्या महत्त्वाच्या वाटतात. 78% जणांनी सांगितलं की, भारतातील राजकारणात त्यांना रस आहे. तर 50% जणांनी सांगितलं की, त्यांनी मतदान केलं; कारण त्यांना ती नागरिक म्हणून सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी वाटते. मला वाटतं, हे आकडे पुरेसे बोलके आहेत. मोठ्या जबाबदार संस्थेनं घेतलेला हा सर्व्हे आहे. त्यात सगळ्या भारताचं प्रतिनिधित्व येईल, अशा पद्धतीचं डेटा सॅम्पल आहे. तरुण मुलांना देश नक्कीच महत्त्वाचा वाटतो. तरुण मुलांना संकटात असलेल्यांविषयी, दिव्यांगांविषयी, गरिबांविषयी, पिचलेल्या समाज घटकांविषयी अनुकंपा आहे, असं मला तरी पदोपदी जाणवतं; परंतु सगळ्यात आधी आपण आपलं भलं करायचा आहे, हे त्यांच्या मनात पक्कं आहे. बरं हा धडा त्यांना कोणी शिकवला? त्यांच्या वरच्या पिढीनं शिकवला! पालकांनीच घराघरात दिलेला हा धडा आहे! जेव्हा आपली चार बोट जेन झीकडे असतात तेव्हा एक बोट आपल्याकडे वळून असतं; हे चाळिशी ते साठी या वयोगटांमधल्या कोणीही विसरू नये!
 
 
मला व्यक्तिशः भारतातील तरुणाई आवडते. लेखक आणि गायक म्हणून माझा देशभरातील तरुणाईची प्रत्यक्ष किंवा समाजमाध्यमांमधून सतत संबंध येतो. ती पिढी ’ब्रुटली होनेस्ट’ म्हणावी अशी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पिढीला तशीच थेट बोलणारी, प्रामाणिक माणसे आवडतात. एखादा माणूस समजा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने नेहमी लिहीत असेल आणि एखाद्या युवकाला ते लेखन आवडत असेल; पण सत्ताधारी पक्षाचं काहीतरी खरोखर चुकलं असतानाही लेखक केवळ बाजू सावरत असेल तर ही पिढी त्याला अनफॉलो करून पुढे जाईल. ती गोड बोलत नाही आणि ती थेट बोलते, याचा मला तरी व्यक्तिशः नेहमी आनंदच वाटतो. माझ्या पिढीपर्यंत समोरच्यांचं मन समजून बोलावं ही एक दृश्य किंवा अदृश्य अपेक्षा असे. त्यामुळे आपलाही मूड समजून दुसर्‍यांना बोलावं अशी नकळत आपली अपेक्षा बनते; पण या अपेक्षांच्या वर्तुळांमध्ये न अडकता थेट मुद्द्यावर येणारी ही तरुणाई खरं तर भारतासाठी दूरवरचा विचार केला तर चांगलीच आहे.
 
 
आता मी आधीच म्हटलं तसं ही मोठी शक्ती आहे आणि ती अर्थातच अननुभवी आहे. तिचा गैरफायदा घेणारे घटक देशात आणि परदेशात आहेत. त्या शक्तीला गुंगवून ठेवून व्यसनाधीन करणारे दारू ते पोर्न असे अनेक व्यवसाय आहेत. खरंतर भारतात असलेली मोठी युवाशक्ती ही व्यसनांमध्ये अडकून राहावी, यासाठी आंतरराष्ट्रीय शक्ती आणि समूह कार्यरत आहेत असेही एकेकदा वाटतं. चीन आज किती पुढे गेलेला आहे देश हे आपण सगळे बघतो; पण त्याच चीनमधली युवाशक्ती ब्रिटिशांनी अफूच्या व्यसनानं निदान 50 ते 60 वर्षं मागच्या शतकात गुंगवून ठेवली, हा तसा ताजाच इतिहास आहे.
 
 
आंतरराष्ट्रीय संबंधांचा विषय निघालाच आहे, तर अजून माझं एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं : आजची युवा पिढी ही आधीच्या अनेक तरुण पिढ्यांपेक्षा भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्याविषयी अधिक जागरूक आहे. दुसरीकडे बरेच देश हळूहळू आपला व्हिसा किंवा स्थलांतराचे कायदे हे कडक करत चालल्याने आपल्याला अंतिमतः भारतातच राहायला लागेल, हेदेखील अनेक तरुण मुलांना माहिती आहे. आधीच्या पिढ्यांमध्ये जसा ’ब्रेन ड्रेन’ झाला तसंच चित्र आता सर्रास दिसत नाही, हेदेखील फार महत्त्वाचं आहे.
 
 
...आणि यामागे मुळात बदललेले तंत्रज्ञान आहे. मोबाईल या इलेक्ट्रॉनिक वस्तूने आणि आता ए.आय. तंत्रज्ञानानं सगळं जग बदलत असताना तरुण पिढीवर त्याचा सगळ्यात अधिक परिणाम होणार आहे, हे किती स्वच्छ आहे. जर आजी-आजोबांचेदेखील ग्रुप्स दिवसभर व्हॉट्सअ‍ॅपवर पडीक असतात तर तरुण मुलंही हातात मोबाईल का धरून आहेत, हा प्रश्न विचारणंदेखील मला हास्यास्पद वाटतं!
 
 
खरं तर या तरुणाई पुढे खूप अधिक ताण आहेत. वाढलेली स्पर्धा आहे. बाहेरून दाखवताना आत्मविश्वास पण आतून मात्र साशंकता आणि अँन्झायटी असे असलेले अनेक जण मला आढळतात. त्यांची अभिव्यक्ती ही बेडर, कधी थिल्लर असेल पण म्हणून ती कधी सर्जक नसतेच हे म्हणणं चुकीचं ठरेल. अतिशय बुद्धिमान विनोद मांडणारे मीम्स, वेगवेगळ्या सुंदर नटलेल्या कॅफेमध्ये आजही तासन्तास रंगणार्‍या मित्रांच्या गप्पा, खेडेगावात आपली बुलेट चालवताना हेल्मेटला कॅमेरा लावून रील बनवून जगभर आपली ओळख दाखवणारा एखादा ग्रामीण युवक, बिनधास्त सोलो प्रवास करणारे तरुण जीव हेही सगळं तितकंच खरं चित्र आहे आणि ते आश्वासकही आहे.
 
 
मला सगळ्यात शेवटी एलेनॉर रुझवेल्ट हिचं एक विधान आठवत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नी असलेली एलेनॉर ही अगदी आत्ताच्या जेन झी युवा पिढीला साजेशी अशी स्वतंत्र होती. तिने एकदा म्हटलं होतं, ''The future belongs to those who believe in the beauty of the dreams.''
 
तरुणाईच्या स्वप्नांचं सौंदर्य टिपताना आपली नजर कमकुवत झाली आहे का हा विचार या निमित्ताने वरच्या सगळ्या पिढ्यांनी करायला हवा. तरुणाईची स्वप्नं बघण्याची ताकद तर निरंतर आहे! आणि ती स्वप्नं एकाच वेळेला ग्लोबल आणि तरी अस्सल भारतीय आहेत! माझा त्या स्वप्नांवर आणि ती बघणार्‍या भारतीय युवाशक्तीवर संपूर्ण विश्वास आहे.
 
(लेखक कवी, गायक, संगीतकार
आणि दंतचिकित्सक आहेत.)
ashuwriter23@gmail.com