भारताचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आजचा तरुण सक्षम

मंथन

विवेक मराठी    03-Nov-2026
Total Views |
@ प्रा. डॉ. विनय भोळे
 
 Parisanwad 
आजच्या युवा पिढीचं पुढे काय होणार, देशाचं काय होणार याची काळजी करण्याचं काही कारण नाही. काही अपवाद सोडले तर कायमच बहुतांश युवा आणि तरुण किमान आपलं हित कशात आहे याचा विचार नक्कीच करतात. भारताचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आजचा युवा आणि तरुण सक्षमपणे उभा आहे. भारत विश्वनेतृत्व करण्यास सज्ज होईल यात काही शंका नाही. त्यासाठी कोणा नॉस्ट्राडेमसची आवश्यकता नाही. आजचे युवा काही काळात कर्ते नागरिक असतील. त्यांच्या हाती देश सुखरूप असेल.
बदल कायमच अपरिहार्य असतो. प्रत्येक पिढीला अगोदरची आणि नंतरची पिढी परकी वाटते. आजचा तरुण उद्या वृद्ध असणार आहे आणि आजचा वृद्ध केव्हातरी तरुण होता. फरक इतकाच आहे, बदलत्या काळानुसार सामाजिक, आर्थिक, राजकीय समीकरणं, परिस्थिती बदलत जाते आणि त्या सगळ्या बदलांना स्वीकारून पुढे जाणं; किमान विरोध न करता स्थितप्रज्ञ राहणं तितकंसं सोपं नसतं. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत अभ्यासक्रम कमी करणं, नववीपर्यंत कोणालाही नापास करायचं नाही असा नियम, एमसीक्यू प्रश्न विचारले जाणं, शाळा कॉलेजच्या हातात असलेले अंतर्गत परीक्षांचे मार्क्स, इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती यांमुळे कमी अभ्यासातदेखील भरपूर मार्क्स मिळतात. ’आजची पिढी हुशार आहे हो’ वगैरे वाक्यं सहजपणं कुठंही ऐकायला मिळतात. त्याच वेळी हल्ली तरुणांना शिस्त, रीतभात राहिली नाही असेही शेरे ऐकू येतात. प्रतिक्रिया संमिश्र असतात.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर युवांना, तरुणांना, कॉलेजमधील मुलामुलींना आपल्या विचारांशी जोडून घेण्याची राजकीय पक्षांत स्पर्धा, चढाओढ पाहायला मिळाली. साधारण तीन दशकांपूर्वी कॉलेजविश्व ढवळून काढणार्‍या निवडणुकांची आठवण हे सगळं पाहून आली. प्रस्तुत लेखनाचा विषय ’आंदोलन आणि त्याची पार्श्वभूमी योग्य की अयोग्य’ हा नसून ’विद्यार्थी बदलतोय का, की बदलला आहे’ आणि ’हा बदल सकारात्मक आहे की नकारात्मक’, असा आहे.
 
 
1991मध्ये भारतात उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण या सगळ्या बदलांची बीजं पेरली गेली. आपसूकच परदेशी गुंतवणूक, वाढत गेलेल्या नोकरी व्यवसायातील संधी, लोकांची खर्च करण्याची मानसिकता यांचा परिणाम होऊन अर्थव्यवस्था अजून सक्षम बनली. लोक खर्च करायला शिकले. ‘एकाचा खर्च दुसर्‍याचं उत्पन्न असतं’ हे तत्त्व अमलात आलं. आयटी क्षेत्रातील संधी नवतरुणांना पर्वणी वाटू लागल्या. तो काळ होता, साधारण नव्वदच्या दशकातला.
 
चोवीस तास सुरू झालेल्या आणि अनेक वाहिन्या असलेल्या टीव्हीचा आणि त्यामागून आलेला मोबाईलचा प्रभाव यांपासून लोकांना आलिप्त ठेवणं अशक्य होतं. परिणामी परदेशांतील उद्योगातील ऑनलाईन कामं वाढत जाऊन कॉल सेंटर्स, रात्रीच्या नोकरीच्या संधी, सुरुवातीला मुलींना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि मग त्याच्याशी जुळवून घेत स्वीकारलेली समाजरचना त्यातून वाढत गेलेली व्यसनाधीनता, अनैतिक संबंधातील वाढ, पैशांसाठी काहीही करायची तयारी हे मुद्दे समाजासमोर येऊ लागले.
 
लाच देणं-घेणं, त्याबद्दल सरळ विचारणा करणं, रीतिरिवाज आणि सामाजिक बंधनं गुंडाळून ठेवणं अशी रीत लोकांनी नाईलाजानंका होईना स्वीकारली. शाळा कॉलेज प्रवेशासाठी दिलं घेतलं जाणारं डोनेशन नकळत व्यावहारिक देवाणघेवाणीचा भाग ठरलं. विभक्त कुटुंब पद्धती ‘वाद नकोत’ या नावाखाली सगळ्यांनीच स्वीकारली. अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांची संख्या वेगात वाढली. तरुणांना आजीआजोबा हे घरातले सदस्य असतात हेच मुळात माहिती नसल्याची परिस्थिती आली, मूळ गाव आणि गावाशी जोडलेली नाळ क्षीण होत गेली. परदेशात स्थायिक होणार्‍यांची संख्या कमालीची वाढली. हॉटेलिंगच्या पलीकडे घरात बसूनच बाहेरचं खाणं मागवण्याची सोय ’स्विगी’, ’झोमॅटो’ यांनी केली. कोविडपासून ऑनलाईन व्यवहारांत वाढ झाली. ट्रेन प्रवासात वर्तमानपत्रं वाचणं कालबाह्य झालं. धावत्या ट्रेनमध्ये पुस्तक वाचणारा एखादा दिसला तर सहप्रवासी कुतूहलाने पाहायला लागले. तीन अपत्यांवरून ’हम दो, हमारे दो’ आणि त्यानंतर समाजरचना केवळ ‘एकच पुरे’ यापुढे जाऊन ’अपत्य नकोच’ ’नको विनाकारण जबाबदारी’ इथपर्यंत येऊन पोहोचली.
 
 
मोठ्यांचा मान लोकशाहीच्या नावाखाली दुर्लक्षित ठरला. आयुष्यभराची कमाई फ्लॅटमध्ये गुंतवण्याची आणि वर्षानुवर्षे बँक लोनचे हप्ते भरण्याची लोकांना सवय झाली. वाढदिवसाचे, बाळाच्या जन्माचे तर कधी कोणा वृध्दाच्या मृत्यूचे मेसेजेस आणि त्याला थंडपणे दिली जाऊ लागलेली उत्तरे बदलत्या समाजरचनेची छाप दाखवू लागले. पूर्वी लग्नाची, नवीन जागा, व्यावसायिक उपक्रमांच्या उद्घाटनांची निमंत्रणपत्रिका घेऊन घरोघरी जाऊन विचारपूस करून प्रेमाने दिली जायची, पुढे पोस्ट किंवा कुरियरद्वारे आणि नंतर नंतर ’व्हॉट्स अ‍ॅप’वर देण्याची सोयीची पद्धत सर्वमान्य झाली.
 
 
इतके सारे बदल ज्यांनी कळत्या वयात अनुभवले त्यांना निदान हा फरक तरी जाणवतोय. ज्यांचा जन्मच सन 2000नंतर झाला आहे, ज्यांना लहानपणीच गेम खेळायला मैदानाऐवजी मोबाईल मिळाला त्यांनी जे आजूबाजूला पाहिलं, अनुभवलं तशीच त्यांच्या वागण्याची रीत असणार आहे. साधारण 1980च्या आसपास जन्मलेले आणि आज पन्नाशीत असलेले किंवा आज साठी-सत्तरी पार केलेल्या लोकांना आत्ताची पिढी त्यांच्या दोषांसकट स्वीकारणं जड जातंय.
 
 
खरं तर जगात कायमच चांगले आणि वाईट लोक, विचार, प्रवृत्ती होत्याच. सत्य आणि असत्य यांतील संघर्ष पौराणिक कथांत कायमच वाचायला मिळतो. प्रत्येक पिढीत प्रामाणिक, अप्रामाणिक, गुणवान, दुर्गुणी लोक होतेच आणि असतीलही. आजही करियरच्या वाटा शोधत अथक परिश्रम घेऊन स्पर्धा परीक्षांना बसणारे, कॉर्पोरेट कल्चरमध्ये स्पर्धा, राजकारण स्वीकारत सांभाळत मार्ग काढत पुढे जाणारे तरुण आहेतच. विचार उजवे असतात तसे डावेही असतातच. सोशल मीडियामुळे प्रत्येकाला राजकीय मत व्यक्त करण्याची गरज वाटू लागली आहे.
 
 
वाढलेले ऑफिस अवर्स, नोकरीची नसलेली शाश्वती, कितीही शिकलं तरीही त्याला मान्यता मिळेल का? त्याचा फायदा होईल का? असा मनात असलेला प्रश्न, ओनरशिप जागांचे गगनाला भिडलेले भाव, वाढती महागाई, प्रत्येक घटनेला विनाकारण दिला जात असलेला जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा विखारी रंग युवा पिढीला समजत नाही असं अजिबात नाही. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत ’शाळा कॉलेजेसमधील वार्षिक स्नेहसंमेलनं रद्द करून वाचलेले पैसे शेतकरी बांधवांना द्यावेत,’ असं सांगणारी पिढी ही तीच बेदरकार वाटणारी आजची युवा पिढी आहे. अगदी इस्रोपासून नासापर्यंत भारतीय तरुण चमकताना दिसतात. सणासुदीच्या काळात पारंपरिक, धार्मिक उत्सवात झोकून देऊन आनंद मिळवणारी युवा पिढीच आहे.
 
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यावर ’कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रॅम’अंतर्गत समाजासाठी काम करणारी, कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होऊन खेड्यात जाऊन अवघड शारीरिक कामं करणारी, रक्तदान शिबिरांत मनापासून भाग घेणारी, वृक्षारोपण कर्तव्य समजून करणारी, भविष्याचा विचार करून आर्थिक नियोजन करणारी, तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणारी, ’रिझल्ट ओरिएंटेड’ असणारी युवा पिढी कितीही राजकीय स्वार्थासाठी आकर्षित केलं तरीही न भुलणारी, भुलथापांवर विश्वास न ठेवणारी पिढी आहे.
 
 
आजच्या युवा पिढीचं पुढे काय होणार, देशाचं काय होणार याची काळजी करण्याचं काही कारण नाही. भारतावर अनेक आक्रमणं झाली. काही धर्मप्रचार तर बहुतांश लुटीसाठी केली गेलेली होती. एक हजार वर्षे अशा असंख्य आक्रमणांना यशस्वी तोंड देत भारतीय जनता देव, देश आणि धर्म टिकवून ठेऊ शकली. कोणीही भारतीयांचं मन बदलवू शकला नाही. राजकीय अजेंडा समोर ठेऊन युवा पिढीला आकर्षित करू पाहणार्‍या कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना, यंत्रणेला आजवर अपेक्षित यश मिळालेलं नाही. पुढेही मिळणार नाही. काही अपवाद सोडले तर कायमच बहुतांश युवा आणि तरुण किमान आपलं हित कशात आहे याचा विचार नक्कीच करतात. भारताचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आजचा युवा आणि तरुण सक्षमपणे उभा आहे. भारत विश्वनेतृत्व करण्यास सज्ज होईल यात काही शंका नाही. त्यासाठी कोणा नॉस्ट्राडेमसची आवश्यकता नाही. आजचे युवा काही काळात कर्ते नागरिक असतील. त्यांच्या हाती देश सुखरूप असेल. त्यांना आज मात्र योग्य दिशा देण्याची, वाम मार्गापासून दूर ठेवण्याची जबाबदारी मात्र सगळ्या जेष्ठांची आहे.
 
(लेखक ’एम.एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त)’ या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि
मुंबई विद्यापीठाचे पीएच. डी. गाईड आहेत.)