आमच्या राष्ट्रप्रेमाची व्याख्या आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. आमच्यासाठी राष्ट्रप्रेम म्हणजे ’फक्त व्यासपीठावरून दिलेली भाषणं, मिरवणुका’ किंवा ’राष्ट्र प्रथम’चे आक्रमक नारे एवढंच मर्यादित नाही; किंवा रस्त्यावर सर्वत्र खूप जास्त झेंडे, तिरंगी लाईट्स लावणं नाही. मध्यमवर्गीय, उत्तम शिक्षण घेणार्या तरुणाईसाठी सुशासन, पारदर्शकता आणि मेरिट टिकून राहणं, हीच खरी ’देशभक्ती’ आहे..
दिवाळी अंकाच्या परिसंवादाचं पत्र हातात आलं आणि एका क्षणासाठी थबकायला झालं. नीट (NEET) पेपरफुटीचा विषय असो, आंदोलनकर्त्या तरुण मुलांनी वापरलेली ती slang आणि जहाल भाषा असो किंवा सोशल मीडियावर रोज पाहायला मिळणारा आमच्या पिढीचा संताप असो... हे सर्व एकाअर्थी आम्हा तरुणांना अस्वस्थ करणारे आहेच; पण त्याच वेळी पुढच्या पिढीच्या मनात आमच्याबद्दल निर्माण झालेली शंकाही त्यामुळे अधिकच स्पष्ट झाली आहे. मी स्वतः आजची ’Gen-Z’ मुलगी आहे. इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे माझं मराठी खूप साहित्यिक, अलंकारिक किंवा परिपक्व नसेल; पण आजच्या मध्यमवर्गीय, चांगलं शिक्षण घेणार्या मुलामुलींच्या मनात नक्की काय चाललंय, हे अगदी साध्या आणि रोजच्या बोलण्याच्या भाषेत मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
पत्रामध्ये एक खूप महत्त्वाचा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला आहे-आपली युवा पिढी तुम्हाला नेमकी कशी वाटते? ती बिघडलेली आहे की खूप बदललेली आहे? यावर एका वाक्यात उत्तर देणं कठीण आहे. मला प्रामाणिकपणे वाटतंय की, आम्ही बिघडलेलो नक्कीच नाहीत; पण आम्ही आधीच्या कोणत्याही पिढीपेक्षा खूप जास्त बदललो आहोत. बहुतके त्यामुळेच सगळ्या पिढ्यांना पुढची पिढी बिघडलेलीच वाटते; पण जे बदल घडत आहेत ते खूप कमी वेळात होत आहेत. त्यामुळे दोन पिढ्यांमध्ये आणि त्यांच्या अनुभवांमध्ये किंवा वागण्यामध्ये खूप अंतर पडलं आहे.
आजच्या घडीला मागच्या पिढीपेक्षा आमच्याकडे एकाच वेळी ’अति-माहिती’ उपलब्ध आहे. त्यामुळे कदाचित आम्ही थोडे कन्फ्युज आहोत. घरून एक ठरावीक संस्कार किंवा अपेक्षा आणि इतर कोणत्याही पिढीने आजपर्यंत न अनुभवलेला बाहेरचा प्रभाव. कारण आता पूर्ण जग, त्यातील त्यांच्या चांगलं वाईटाच्या संकल्पनेसह मोबाईलद्वारे आमच्या मुठीत आलं आहे. आमच्यावर आधीसारखा फक्त कुटुंब, शिक्षक किंवा पुस्तकांचा प्रभाव राहिलेला नाही. आम्ही एकाच वेळी पुण्या-मुंबईत बसून रील्स, युट्यूब, रेडिट आणि ग्लोबल पॉप कल्चरशी जोडलेले असतो. त्यामुळे आमची विचार करण्याची पद्धत आणि व्यक्त होण्याचा वेग हा पूर्णपणे बदलला आहे.
माझ्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींकडे बघितलं तर कळतं की ते कमालीचे प्रॅक्टीकल आणि स्वतःच्या भविष्याबद्दल थोडे इनसिक्युअर आहेत; पण अशी परिस्थिती सर्वत्र नाही. आमच्या पिढीतील अनेक असेही आहेत जे कमालीचे हुशार आहेत, त्यामुळे त्यांना काय हवं आहे, काय करायचं आहे, याविषयी खूप आधीपासून माहीत आहे. याला कारण त्यांना मिळालेलं र्शुिेीीीश आणि माहिती; पण ते हवं असलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी खूप जास्त स्पर्धा, खूप जास्त तणाव, आई-वडलांच्या अपेक्षा आहेत.
आमच्या कष्ट करण्याच्या तयारीची तुलना मागच्या पिढीशी करता येणार नाही. मागच्या पिढीचे कष्ट वेगळे होते. आज आमच्याकडे प्रवासासाठी वाहने, शिक्षणासाठी उत्तम कॉलेजेस-क्लासेसची सोय असली, तरी त्यामुळे आमचे कष्ट कमी झालेले नाहीत. कारण, आज जग जवळ आल्यामुळे आमची तुलना फक्त कुटुंबापुरती किंवा जवळच्या नातेवाइकांपर्यंत सीमित राहिलेली नाही. कदाचित आम्ही एखाद्या युरोपमधल्या राजघराण्यातील मुलीच्या आयुष्याशीही तुलना करू आणि आम्हाला वाटेल की हे मला हवं आहे, मी शिक्षणाने मिळवू शकते आणि त्यासाठी कष्ट करायला हवेत. आणि मग ही तुलना आम्हाला अपार स्वप्न दाखवते, त्यासाठी कष्ट करावे लागतील हेही स्वाभाविकच आहे. त्यातून अनेकांच्या आईवडलांच्या अपेक्षाही जोडलेल्या असतात. हे सगळं जर खूप तीव्र होत गेलं आणि आपल्या क्षमता, स्वप्नं यांच्यातली दरी खूप जास्त झाली तर मग काहीजण आत्महत्येसारखे पर्याय निवडतात.
ह्याचमुळे आमच्या वैयक्तिक आशाआकांक्षा खूप आहेत. अमेरिका किंवा पाश्चात्य देश प्रगत होऊ शकतात त्याप्रमाणे आपणही व्हायला, हवं असं आम्हाला वाटतं. या बदललेल्या विचारसरणीमुळे बर्याचदा मोठ्या पिढीला प्रश्न पडतो की, या मुलांच्या डोक्यात ’राष्ट्र’ किंवा ’देश’ असा काही विषय उरला आहे का? याचं उत्तर ’हो’ असं आहे; पण आमच्या राष्ट्रप्रेमाची व्याख्या आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. आमच्यासाठी राष्ट्रप्रेम म्हणजे ’फक्त व्यासपीठावरून दिलेली भाषणं, मिरवणुका’ किंवा ’राष्ट्र प्रथम’चे आक्रमक नारे एवढंच मर्यादित नाही. किंवा रस्त्यावर सर्वत्र खूप जास्त झेंडे, तिरंगी लाईट्स लावणं नाही. मध्यमवर्गीय, उत्तम शिक्षण घेणार्या तरुणाईसाठी सुशासन, पारदर्शकता आणि मेरिट टिकून राहणं, हीच खरी ’देशभक्ती’ आहे.
जेव्हा आम्ही वर्षांनुवर्षे मेहनत करतो आणि ऐन वेळी पेपर फुटतात, तेव्हा देशातल्या सिस्टीमबद्दल राग येतो. जेव्हा टॅक्स भरूनही सुविधा मिळत नाहीत किंवा करिअरच्या संधी कमी पडतात, तेव्हा आम्हा आजच्या मुलांचा विश्वास उडतो. आजची मुलगी जेव्हा कोडिंग करते, स्टार्टअप सुरू करते किंवा ग्लोबल लेव्हलला जाऊन नाव कमावते, तेव्हा ती तिच्या पद्धतीनं देशाचं नाव उज्ज्वल करत असते. त्यामुळे आमच्यात राष्ट्रप्रेम नाही असं नाही; पण जेव्हा कधी निराशा पदरी पडते, किंवा 99%/पर्सेंटाईल मिळूनही अपेक्षित संस्थेत पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही, त्याचा खूप त्रास होतो. हा त्रास देशाबद्दलचा अनादर नसून सिस्टीमविरुद्धच्या फ्रस्ट्रेशनचा उद्रेक आहे.
आंदोलनादरम्यान किंवा सोशल मीडियावर तरुणांनी वापरलेल्या आक्षेपार्ह, अश्लाघ्य स्लँग्स भाषेबद्दल ह्या वेळेस खूप आरडाओरडा झाला. मोठी माणसं विचारतात की, ’ही मुलं एवढी बेमुर्वतखोर कशी झाली?’ यामागे दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे, आजच्या इंटरनेट कल्चरमध्ये ’अति-सभ्य’ किंवा ’फॉर्मल’ राहण्यापेक्षा उघडंवाघडं, जसं आहे तसं व्यक्त होणं हे ’कूल’ किंवा ’रिअल’ मानलं जातं. पण त्याव्यतिरिक्त पिअर प्रेशरही खूप असतं. रील्समधून जर एखादा हे करत असेल आणि ते अनेकांना कूल वाटत असेल तर तसे सगळे करायला लागतात. मुलींना मुलांसारखे अपशब्द वापरणं म्हणजे स्वातंत्र्य, समानता आणि पुन्हा कूलच आहे असं वाटतं. या सगळ्याच्या मुळाशी गेलं तर लक्षात येतं की, आपल्या घराघरांतून होणार्या संगोपनात आणि आजच्या वास्तवात खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. आज अनेकांचे आई-वडील मुलांना उत्तम शाळा, कोचिंग क्लासेस, गॅजेट्स आणि सर्व भौतिक सुखसोयी देतात. पण, मुलांच्या मनात असलेली भीती, स्पर्धा आणि मेंटल प्रेशर समजून घ्यायला त्यांच्याकडे वेळ किंवा ती दृष्टी नसते. अजूनही घरात, ‘चांगला अभ्यास कर, गुणी बाळ बन’ एवढंच शिकवलं जातं. पण बाहेरच्या जगात जेव्हा मुलं पाऊल ठेवतात, तेव्हा त्यांना दिसतं की फक्त ’चांगलं’ राहून चालत नाही, तिथे गळेकापू स्पर्धा आहे. त्यामुळे सगळेच थोडे स्वार्थी बनत आहेत. आणि व्यक्तीशः माझ्या घरी आम्ही ज्या गप्पा मारतो किंवा चांगलं वाईट ह्याबद्दल बोलत असतो त्यावर मी वागताना खूप विचार करते आणि मला ते खूप उपयोगी पडतं; पण अनेक घरांमध्ये आई वडलांनाच एक तर आपल्या मुलांचं काय चालूयं हेच माहीत नसतं किंवा ते थोडे थोडे चुकत असतील जसं की, एखाद्याला बुली करणं किंवा कॉपी करणं किंवा घरी खोटं बोलून काही गोष्टी करणं तर आईवडलांनाच ते चुकीचं वाटत नाही. ते डोळेझाक करतात. अनेकदा त्यांना मजा वाटते. अनेकदा तेच शाळा-कॉलेज वर किंवा शासन वगैरेवर चिडलेले असतात आणि तेही मुलांना म्हणतात की, काही हरकत नाही किंवा इतकं तर मुलं करणारच...वगैरे. मला हे खूप गंभीर वाटतं. मी कधीही स्वार्थीपणा केला की, मला आई-बाबा ’एम्पथी’ वाटायला हवी, असं म्हणतात. समाजातील अनेक वंचित लोकांची उदाहरणं देतात.
आणखी एक म्हणजे मागच्या पिढीकडे जो संयम होता, कुटुंब, नातेवाईक आणि समाजाचा जो एक भक्कम आधार होता; त्याची आज आमच्या पिढीत प्रचंड कमतरता आहे. आज प्रत्येकाचे फ्लॅट्स बंद असतात. शेजारी कोण राहतं हे ठावूक नसतं. समाज नावाची वीण उसवली आहे. आपापसांत खूप कृत्रिम नातेसंबंध, असूया, भावकी, अहंकार, गॉसिप... यांमुळे छान आल्हाददायी वातावरण राहिलेलं नाही. आमचे आई-बाबा जेव्हा त्यांच्या लहानपणीच्या गमतीजमती सांगतात, ते एकमेकांसोबत कसे दिवस दिवस घालवायचे वगैरे वगैरे एकतो, तेव्हा त्यांच्याकडं इतका वेळ कसा होता, याचं आश्चर्य वाटतं.
आज तितकासा वेळ कोणाला नाही. माझ्या पिढीतील सर्व मुलांच्या आई, माझ्या आत्या, मावश्या, काकू या सर्वजणी नोकरी करतात. त्यामुळे अनेक मुलं घरात आणि समाजात एकाकी पडली आहेत आणि मग ती आपल्या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटच्या आणि गॅजेट्सच्या आभासी जगात शोधत आहेत.
शेवटी, उद्याचा भारत जर आमच्या हातात सोपवायचा असेल, तर या दोन पिढ्यांमधली भिंत पाडून संवादाची एक मजबूत वाट बांधावी लागेल. मोठ्या पिढीनं तरुणाईला लगेच ’बिघडलेली’ ठरवून मोकळं होण्यापेक्षा, त्यांच्या आक्रमकतेमागची भीती आणि अस्वस्थता समजून घेतली पाहिजे. घराघरांतून उपदेश देण्याऐवजी मुलांशी मित्रासारखा मोकळा आणि समान पातळीवरचा संवाद सुरू व्हायला हवा. मुळात एकमेकांना थोडा वेळ द्यायला हवा. ...आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई-वडील, शिक्षकांनी मुलांच्या चुकीला ’चूक’ लहानपणापासून म्हणायला हवं. आपल्या मुलांना सगळं मिळवून देण्याच्या नादात चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देता कामा नये.
आईशी बोलत असताना तिनं एक खूप छान मुद्दा सांगितला आणि मीही त्यावर मग खूप विचार केला. आमच्या वयातील मुलं स्वतःचा शोध घेत असतात. ते त्यांची ओळख शोधण्याच्या प्रयत्नात असतात. मला वाटतं की, ही ओळख खूप वेगवेगळ्या बाजूंनी असते. म्हणजे ’मी कोण आहे’, ’माझा समाज कोण आहे’ आणि मग पुढे जाऊन कदाचित ’माझे राष्ट्र कोण आहे’. ही ओळख शोधण्यामध्ये आम्ही कधीकधी आईबाबांच्या विरोधात जातो. कारण आम्हाला ती ओळख झिडकारायची असते. कारण आम्हाला आमची स्वतःची अशी ओळख हवी असते. त्या वेळेस आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्याची ओढ वाटते. अशा वेळेस कालानुरूप केलेल्या परंपरा, आमचा महान इतिहास, तत्त्वज्ञान, संस्कृती हे माहीत असेल तर खूप अधांतरी वाटत नाही. माझ्या घरी या सगळ्या विषयांवर खुली चर्चा होते.
ग्लोबल प्लॅटफॉर्म्सवर जेव्हा योग्य वगैरे गोष्टींना मान मिळतो किंवा आम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाचतो, बघतो तेव्हा आपण एका मोठ्या गोष्टीचा भाग आहोत असे वाटते. ती ओळख आम्हाला अभिमान शिकवते आणि ती हवीही असते. ह्यामध्ये छान संतुलन असेल तर आमच्याकडूनही आम्ही ‘बिघडत’ नाही.
त्याच वेळेस असं वाटतं की, सिस्टीममध्ये पारदर्शकता आणून प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या तरुणांच्या भविष्याला संरक्षण दिलं पाहिजे. आजच्या Gen-Zकडे अफाट ऊर्जा, नवीन विचार आणि तंत्रज्ञानाची ताकद आहे. त्यांना फक्त गरज आहे ती एका विश्वासाच्या हाताची, जो त्यांना जज न करता समजून घेईल. तरच ही पिढी दिशाभूल न होता देशाच्या उभारणीत आपलं योगदान देऊ शकेल!
लेखिका इंटिग्रेटेड बी.टेक या अभ्यासक्रमाची
तिसर्या वर्षाची विद्यार्थीनी आहे.