@समता गोखले - दांडेकर
इस्रायल म्हटलं की विशेषतः गेल्या तीन वर्षांपासून आपल्या मनात सर्वप्रथम युद्धाचंच चित्र उभं राहतं. गाझामधील हमास या दहशतवादी संघटनेच्या इस्रायलवरील 7 ऑक्टोबर 2023च्या अमानुष हल्ल्यापासून इस्रायलचा हमास, लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुती आणि इराणच्या इस्लामिक राजवटीशी विविध स्तरांवर संघर्ष सुरू आहे. त्यामुळे जगभरात इस्रायलची प्रतिमा ही सतत युद्धात अडकलेला देश अशी आहे. परंतु युद्धाच्या बातम्या आणि प्रत्यक्ष त्या देशात राहणार्या नागरिकांचं दैनंदिन आयुष्य यामध्ये बराच फरक असतो. गेली काही वर्षं इस्रायलमध्ये राहताना या समाजाला जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्या अनुभवातून युद्धछायेतल्या इस्रायलमधल्या जनजीवनाकडे पाहण्याचा हा एक प्रयत्न.
इस्रायलमध्ये एक विनोद प्रचलित आहे. शत्रूने इस्राएलच्या ज्या भागांत क्षेपणास्त्र डागलं असेल त्या भागांत धोक्याची सूचना देणारा सायरन वाजतो आणि मग त्या भागांतले नागरिक दहा मिनिटांसाठी शेल्टरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतात. शेल्टरमध्ये एकत्र जमल्यावर घाबरून जाण्याऐवजी इस्रायली लोकं अनेकदा एकमेकांना हा पहिला प्रश्न विचारतात की, आत्ताचं हे क्षेपणास्त्र नक्की कुठून आलं आहे? अर्थात, हा विनोद असला तरी त्यातून इस्रायली समाजाची मानसिकता स्पष्ट होते. काही मिनिटांनी धोका टळल्याची सूचना मिळाली की लोक पुन्हा आपल्या कामावर परततात. दुकानं उघडतात, कार्यालयं सुरू होतात, विद्यापीठांमध्ये वर्ग भरतात आणि दैनंदिन जीवन पूर्ववत सुरू होतं. इस्राएल हा एकमेव देश असेल की जिथे कुठच्याही दिशेने क्षेपणास्त्र येऊ शकतं आणि इस्राएल हा असाही बहुतेक एकमेव देश असेल की अशा काहीशा विचित्र वातावरणात सुद्धा इथे नेहमीप्रमाणे जनजीवनच नव्हे तर त्याबरोबरच तंत्रज्ञान, संशोधन, आर्थिक प्रगतीसुद्धा जोमानं सुरू असते. त्यामुळे इस्रायलकडे केवळ रणांगण म्हणून न पाहता इथली सामाजिक रचना, समाजाचा स्वभाव आणि उर्मी, समाजात असलेली एकात्मता आणि मतभेद, चिंता या सर्व छटांच्या रूपात पाहणं अधिक महत्त्वाचं वाटतं.
इस्रायलच्या जनजीवनाचा विचार करताना सर्वप्रथम लक्षात येते ती इथल्या समाजाची मानसिक जिद्द. हजारो वर्षांच्या अस्तित्वाच्या संघर्षातून गेलेला यहुदी समाज, त्यानंतर होलोकॉस्टसारखी भीषण शोकांतिका, 1948मध्ये इस्रायल या राष्ट्रनिर्मितीनंतर झालेली सलग युद्धं, प्रतिकूल भौगोलिक-नैसर्गिक परिस्थिती आणि आजवर टिकून असलेलं सुरक्षेचं आव्हान या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या सामूहिक मानसिकतेवर झालेला दिसतो. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य न गमावणं, संकटाचा स्वीकार करून त्याला सामोरं जाणं आणि आयुष्य पुढे चालू ठेवणं हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग झालेला आहे. म्हणूनच इस्रायली नागरिकांच्या वागण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता प्रकर्षाने जाणवते.
प्रत्येक देशातील नागरिकांना त्यांच्या देशात वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. भारतात प्रचंड लोकसंख्या, गर्दीने भरलेली सार्वजनिक वाहतूक किंवा पायाभूत सुविधांवरील ताण हे वास्तव आहे. युरोपमधील अनेक देश घटती लोकसंख्या आणि वृद्धत्वाकडे झुकणार्या समाजामुळे निर्माण होणार्या अडचणींचा सामना करत आहेत. अमेरिकेसमोर अमली पदार्थांचं व्यसन, शाळांमधील आणि सार्वजनिक ठिकाणांवरील गोळीबार यांसारखी गंभीर आव्हानं आहेत. त्याचप्रमाणे इस्रायलमधील नागरिकांनी शेजारील दहशतवादी संघटना आणि सततची सुरक्षा ही आपल्या देशाच्या वास्तवाचा भाग आहे, हे स्वीकारलेलं दिसतं. त्यामुळे युद्धाचं अस्तित्व नाकारण्याऐवजी त्याच्याशी जुळवून घेत, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आणि आयुष्याचा आनंद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात.
या मानसिकतेमागे केवळ युद्धाचा अनुभव नाही, तर इथल्या विशेष समाजरचनेचाही मोठा वाटा आहे हे समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं. वयाच्या अठराव्या वर्षापासून बहुतांश इस्रायली तरुण-तरुणींना दोन ते तीन वर्षांचं अनिवार्य लष्करी प्रशिक्षण घ्यावं लागतं. मात्र राष्ट्रीय जाणीव केवळ या प्रशिक्षणातून निर्माण होत नाही; ती लहानपणापासूनच सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर जोपासली जाते. माझ्या संपर्कात आलेल्या शास्त्रज्ञांपासून व्यापार्यांपर्यंत, आचारी, दुकानदार, अभियंते किंवा संशोधक अशा विविध क्षेत्रांतील इस्रायली यहुदी व्यक्तींना त्यांच्या धर्माचा, इतिहासाचा, संघर्षाचा आणि इस्रायलच्या स्थापनेपासून झालेल्या युद्धांचा चांगला, मूलभूत परिचय असतो. इस्रायली शाळांमध्ये इतिहास शिकवण्याबरोबरच इस्रायली विद्यार्थ्यांना तो अनुभवातूनही समजावून सांगितला जातो. जेरुसलेममधील होलोकॉस्ट संग्रहालयाला मुलांना घेऊन जाणारे पालक, पोलंडमधील नाझी छळछावण्यांना शैक्षणिक सहली आयोजित करणार्या संस्था, दुसर्या महायुद्धात यहुदी समाजावर झालेल्या अत्याचारांची माहिती देणारे विविध उपक्रम यांमधून पुढच्या पिढीला इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. युद्धकाळात शालेय मुलांनी स्वतः केक, बिस्किटं किंवा शुभेच्छापत्रं तयार करून, विकून ते पैसे सीमारेषेवर तैनात सैनिकांसाठी पाठवणं, स्वयंसेवी उपक्रमांमध्ये सहभागी होणं अशा गोष्टीही इथे सामान्य मानल्या जातात. या सगळ्या अनुभवांतून राष्ट्रीय भावना ही केवळ पुस्तकांतूनच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जोपासली जाते, हे
लक्षात येतं.
इथे राहताना वारंवार एक गोष्ट जाणवते - इस्रायल हे केवळ एक राष्ट्र नाही, तर अनेक अर्थांनी एका मोठ्या कुटुंबासारखं कार्यरत असलेलं समाजजीवन आहे. याच सामाजिक एकात्मतेचं एक रूप 7 ऑक्टोबर 2023 नंतर पाहायला मिळालं. हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर गाझा आणि वेस्ट बँकमधून इस्रायलमध्ये कामाला येणार्या हजारो अरब कामगारांचा कामाचा परवाना इस्रायल सरकारने एकाएकी बंद केला. त्यावेळी शेती तंत्रज्ञानात अव्वल असणार्या इस्रायली शेतांत अनेक ठिकाणी पिकं तयार होती. अरब कामगारांना बंदी लागू झाल्याने तयार पिकं काढण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नव्हतं. अशा वेळी संपूर्ण इस्रायलमधून हजारो इस्रायली नागरिक शेतांमध्ये स्वयंसेवा करण्यासाठी हजर झाले. विद्यार्थी, संशोधक, आयटी कंपन्यांमधील कर्मचारी, निवृत्त नागरिक, अगदी शालेय विद्यार्थ्यांचे गटही या मोहिमेत सहभागी झाले. कोणत्या भागात स्वयंसेवकांची आवश्यकता आहे, याची माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिली जात होती. त्यामुळे तंत्रज्ञान आणि सामाजिक सहभाग यांचा प्रभावी संगम अनुभवायला मिळाला. त्यावेळी एका संस्थेमार्फत आम्ही सुद्धा वांग्याच्या शेतात स्वयंसेवा केली होती.
युद्धकाळात स्वयंसेवेची ही परंपरा इथे विशेष उठून दिसते. 7 ऑक्टोबरनंतर सीमावर्ती भागातील हजारो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं.
त्यांच्यासाठी अन्न, कपडे, औषधं, खेळणी आणि इतर आवश्यक वस्तू गोळा करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, स्थानिक प्रशासन आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर पुढे आले. रुग्णालयांमध्ये रक्तदानासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा, स्थलांतरित कुटुंबांसाठी तात्पुरत्या निवार्यांची व्यवस्था आणि सैनिकांसाठी आवश्यक वस्तूंचं संकलन अशा अनेक उपक्रमांमध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होताना दिसले.
याशिवाय, इस्रायली सरकारने हमासशी करार करून हमासने अपहरण केलेल्या ओलीसांना सोडवून आणावं यासाठीही अपहृत ओलीसांशी ओळख असो वा नसो संपूर्ण इस्रायलभर अडीच वर्षं दर शनिवारी इस्रायली नागरिक आंदोलन करत असत. अखेरीस, इस्रायल - हमास युद्धबंदीनंतर हमासच्या ताब्यातून या इस्रायली ओलीसांची सुटका झाली. या ओलीसांच्या पुनर्वसनासाठी सरकारी निधीव्यतिरिक्त काही ओलीसांना आणखी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचं ओलीसांच्या कुटुंबाने सार्वजनिकरित्या जाहीर केल्यावर अल्पावधीत अनेक ओलीसांसाठी इस्रायली नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भरपूर आर्थिक मदत जमा केल्याच्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. युद्धाच्या काळात राष्ट्रीय एकात्मता नेमकी कशी कृतीत उतरते, याचं हे एक प्रभावी उदाहरण म्हणता येईल.
शिवाय, युद्ध असूनही, अगदी क्षेपणास्त्रं येत असली तरीही इस्रायलमधील दैनंदिन जीवन कधीही पूर्णपणे थांबत नाही. युद्ध सुरू असतानाही बाजारपेठा सुरू असतात, सार्वजनिक वाहतूक चालू असते. युद्धकाळात सुद्धा जीवनावश्यक गोष्टींची पुरवठा साखळी कायम सुरू राहत असल्याने युद्ध सुरू आहे म्हणून किराणा मालाची दुकानं उघडणार नाहीत, किराणा सामान, भाजी फळं यांचा तुटवडा सुरु होईल याची खरोखरच चिंता नसते. त्यामुळे लोकं, दुकानदार काळाबाजार, साठेबाजी करताना आम्हाला कधीही दिसले नाहीत. मात्र, हमास या दहशतवादी संघटनेला पाठिंबा म्हणून येमेनच्या हुती या दहशतवादी संघटनेचा लाल समुद्रातील सागरी व्यापारात उच्छाद सुरू असल्याने इस्रायलमधील भारतीय किराणा मालाच्या आयातीला बर्यापैकी फटका बसला. त्यामुळे गेली काही वर्षं इस्रायलमध्ये भारतीय किराणा माल वेळेवर पोहचत नाहीये किंवा लांबच्या मार्गाने आणावा लागतो. सागरी व्यापाराची ही साखळी बिघडल्याने पर्यायाने भारतीय किराणा मालाची टंचाई, त्याच्या किमतीत वाढ झालेली जाणवते.
गेल्या तीन वर्षांच्या युद्ध परिस्थितीतही विवाह समारंभ, नवजात मुलांसाठी कौटुंबिक स्नेहसमारंभ, यहुदी सण ते सांगीतिक मैफिली, नाटकं, चित्रपट, विविध कलाविष्कार कार्यक्रम कधीही थांबलेले नाहीत. 2023च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आलेल्या पेसाख या यहुदी सणाची एक गोष्ट मला आठवते. इस्रायली लोकं या सणाला नटूनथटून आप्तेष्टांकडे सेडर या विशेष जेवणाला जेवायला गेलेले असताना जेवणाच्या टेबलवर गाझामध्ये अपहृत इस्रायली ओलिसांकरता एक रिकामं ताट आठवण म्हणून ठेवून सण साजरा करत असत. गेल्या तीन युद्धजन्य वर्षांत सुट्ट्यांच्या काळात इस्रायली विमानतळं, परदेशी जाण्याची विमानदेखील गजबजलेली दिसून येतात. अशा प्रकारे सामाजिक भानाबरोबरच इस्रायली लोकांची युद्धकाळात जीवनाचा, आयुष्याचा मनमुराद आनंद घेण्याची ऊर्मीही तेवढीच दिसून येते.
इस्रायली नागरी समाजाची ही तयारी आपत्कालीन वैद्यकीय सेवांपर्यंतही विस्तारलेली आहे. इस्रायलमधील मगेन डेविड अडोम (Magen David Adom) ही राष्ट्रीय आपत्कालीन वैद्यकीय सेवा संस्था याचं उत्तम उदाहरण आहे. रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन वैद्यकीय मदत, रक्तपेढीचं व्यवस्थापन आणि नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धजन्य परिस्थितीत जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देणं, अशी अनेक महत्त्वाची कामं ही संस्था करते. विशेष म्हणजे, या व्यवस्थेमध्ये प्रशिक्षित स्वयंसेवकांचाच मोठा सहभाग असतो. दरवर्षी विद्यार्थी, नोकरदार, निवृत्त नागरिक अशा विविध स्तरांतील शेकडो लोक आवश्यक प्रशिक्षण घेऊन या संस्थेशी स्वयंसेवक म्हणून आधीच जोडलेले असतात. मोठ्या अपघातांपासून ते क्षेपणास्त्र हल्ल्यांपर्यंत विविध आपत्कालीन प्रसंगी हे स्वयंसेवक व्यावसायिक वैद्यकीय पथकांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. त्याचबरोबर इस्रायलमधील अनेक कार्यालये, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वर्षातून किमान एकदा सर्व कर्मचार्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण आयोजित केलं जातं. या प्रशिक्षणामध्ये प्रथमोपचार, कुठे आग लागल्यास करायची प्राथमिक उपाययोजना, अग्निशामक यंत्राचा वापर, हृदयक्रिया बंद पडल्यास सीपीआर (CPR) देण्याची पद्धत, डिफिब्रिलेटर (AED) वापरण्याचं प्रशिक्षण आणि इतर मूलभूत आपत्कालीन प्रतिसाद कौशल्य शिकवलं जातं. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी केवळ सरकारी यंत्रणांवर न राहता, सामान्य नागरिकही त्यासाठी सक्षम असावेत, अशी व्यापक सामाजिक संस्कृती इस्रायलमध्ये विकसित केलेली आहे.

युद्धकाळात इस्रायलच्या होम फ्रंट कमांडची (Home Front Command) भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सीमांवर सैन्य लढत असताना देशाच्या अंतर्गत भागातील नागरिकांचं संरक्षण, आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सूचना देणं, सुरक्षित निवार्यांची व्यवस्था, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणं आणि नागरिकांना सतत मार्गदर्शन करणं, ही या संस्थेची प्रमुख कामं आहेत. प्रत्येकाच्या मोबाईलवर विशेष अॅप, दूरचित्रवाणी, रेडिओ आणि इतर माध्यमांतून नागरिकांना महत्त्वाच्या सूचना तत्काळ मिळतात. सायरन वाजल्यावर कोणत्या भागात किती वेळात सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं, याची माहिती नागरिकांना आधीपासूनच माहीत असते. त्यामुळे अशा प्रसंगी गोंधळ आणि भितीपेक्षा शिस्त अधिक दिसून येते. युद्धामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असलं, तरी ते पूर्णपणे थांबू नये, यासाठीची ही संपूर्ण व्यवस्था आहे. इस्रायली लोकांमध्येही सुरक्षेची जाणीव कायम असते आणि बाहेर जागोजागी सुरक्षेची हमी देणारी सार्वजनिक शेल्टर्स असतात. अपरिचित ठिकाणी असताना गुगल नकाशावर सगळ्यांत जवळच्या शेल्टरचं ठिकाण, पत्ताही दिलेला असतो. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी सायरन वाजला तर लोक काही मिनिटांसाठी शेल्टरमध्ये जातात आणि परिस्थिती सुरक्षित झाल्यावर पुन्हा आपलं काम सुरू करतात. संकटाला विसरून जायचं नाही, पण संकटामुळे आयुष्य थांबवूनही ठेवायचं नाही, ही मानसिकता इथे प्रकर्षाने जाणवते.
इस्रायलच्या संरक्षण व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वाचा आधार म्हणजे राखीव लष्करी सेवा (Reserve Duty). अनिवार्य लष्करी सेवा पूर्ण केलेले अनेक नागरिक पुढील अनेक वर्षे राखीव दलाचा भाग असतात. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की त्यांना काही तासांत सैन्यात हजर राहण्याचे आदेश मिळू शकतात. त्यामुळे युद्ध सुरु झालं की इस्राएलचं सैन्यदल अचानक भराभर वाढत जातं. 7 ऑक्टोबर 2023नंतर अनेकदा लाखो राखीव सैनिकांना तातडीने बोलावण्यात आलं. त्यामुळे अनेक कुटुंबांतील वडील, मुलं, मुली किंवा पती काही दिवसांतच सीमारेषेवर पोहोचले. ही परिस्थिती भावनिकदृष्ट्या कठीण असली, तरी ती स्वीकारण्याची मानसिक तयारी समाजात असल्याचं जाणवतं.
याचा परिणाम उद्योग, व्यवसाय आणि विद्यापीठांवरही झाला. अनेक नोकरी-व्यवसायांतील कर्मचार्यांना राखीव सैन्यात बोलावल्यामुळे काही क्षेत्रांत काही काळ मनुष्यबळाची कमतरता, अडचण निर्माण झाली. विद्यापीठांमध्ये सुद्धा संशोधक, पीएच.डी. विद्यार्थी आणि प्राध्यापक सैन्यसेवेसाठी गेल्यामुळे काही संशोधन प्रकल्पांचा वेग मंदावला. काही परिषदांमध्ये सहभाग पुढे ढकलावा लागला, तर काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे घेण्यात आल्या. मात्र या काळात विद्यापीठांनी आणि संशोधन संस्थांनी परिस्थितीनुसार लवचीक भूमिका घेत विद्यार्थ्यांना मुदतवाढ, विशेष सवलती आणि आवश्यक ते सहकार्य दिलं..
इस्रायलची ओळख जगभरात स्टार्टअप नेशन म्हणून आहे. त्यामुळे युद्धाचा परिणाम या क्षेत्रावर होणं अपरिहार्य होतं. अनेक स्टार्टअप कंपन्यांमधील कर्मचारी राखीव सैन्यात गेले; तरी उर्वरित सहकार्यांनी त्यांची जबाबदारी सांभाळत काम सुरू ठेवलं. परदेशी ग्राहकांशी ऑनलाइन बैठका, दूरस्थ पद्धतीने उत्पादन विकास आणि संशोधन यांचा वेग शक्य तितका कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही कंपन्यांनी तर युद्धकाळातच वैद्यकीय उपकरणं, आपत्कालीन संपर्क व्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि संरक्षण तंत्रज्ञानाशी संबंधित नव्या उपाययोजना विकसित करण्यावर भर दिला. संकटाच्या काळातही संशोधन आणि नवोपक्रम यांची परंपरा खंडित होऊ न देण्याची वृत्ती इथल्या उद्योगविश्वात प्रकर्षाने जाणवते. विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनाला इस्राएलमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. देशाच्या अर्थसंकल्पातील सर्वाधिक वाटा संशोधनासाठी राखून ठेवलेला इस्राएल हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. इस्रायलला विज्ञान, शेती, तंत्रज्ञानातील संशोधनाबद्दल वाटणार्या महत्त्वामुळे युद्धकाळात या क्षेत्रासाठी असलेलं सरकारी आणि खाजगी अनुदान कमी न करता उलट त्यात वाढच केली गेली. संशोधनातील या संधींमुळे मोठ्या संख्येने भारतीय संशोधकसुद्धा आजही इस्रायल संशोधनासाठी पसंत करतात.
युद्धाचा परिणाम अर्थातच इस्रायली अर्थव्यवस्थेवरही झाला. सुरुवातीच्या काळात पर्यटन उद्योग जवळजवळ ठप्प झाला. अनेक हॉटेल्समध्ये पर्यटकांऐवजी सीमावर्ती भागातून स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची व्यवस्था करण्यात आली. बांधकाम आणि शेती क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता जाणवली. त्यासाठी इस्रायलने भारत, श्रीलंका, नेपाळ अशा देशांशी करार करून या देशांतील हजारो लोकांना इस्राएलमध्ये कामाचा परवाना देण्याची तरतूद केली. त्यानुसार आज हजारो भारतीय नागरिक इस्रायलमध्ये विविध क्षेत्रांत काम करत आहेत.
युद्धकाळात संरक्षणावरील वाढलेला खर्च, पर्यटन क्षेत्राला बसलेला फटका आणि उद्योगांसमोरील आव्हानं यामुळे इस्रायललाही आर्थिक ताणाला सामोरं जावं लागलं. तरीही उच्च तंत्रज्ञान, संरक्षण उद्योग, औषधनिर्मिती, सायबर सुरक्षा आणि कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रांनी अर्थव्यवस्थेला आधार दिला. विशेष म्हणजे, अनेक तज्ज्ञांच्या अपेक्षेच्या उलट, इस्रायली चलन शेकेलनेही या काळात स्थैर्य दाखवत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत उलट मजबुतीच मिळवली आहे. युद्ध सुरू असतानाही विशेषतः संरक्षणविषयक सामग्रीच्या विक्रीच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूकदारांचा इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवरील आणि दीर्घकालीन क्षमतेवरील विश्वास मोठ्या प्रमाणात कायम असल्याचं या घडामोडींवरून जाणवतं. युद्धकाळातच संरक्षणविषयक इस्रायली क्षेपणास्त्रं आणि तंत्रज्ञान निर्यात क्षेत्रांत जगातील अनेक देशांनी इस्रायलबरोबर करार केले. फेब्रुवारी 2026मध्ये भारताचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही युद्धकाळात इस्रायलला दिलेल्या भेटीदरम्यान भारत-इस्रायल संरक्षण, तंत्रज्ञान संबंधीचे अनेक करार झाले. त्यामुळे युद्धाच्या सावटाखालीही उत्पादन, निर्यात, संशोधन आणि उद्योग यांची गती शक्य तितकी टिकवून ठेवण्याचा इस्रायलचा प्रयत्न प्रकर्षाने जाणवतो.
या अनुभवांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की इस्रायलमध्ये युद्धाचा सामना केवळ सैन्य करत नाही; तर त्यामागे प्रशासन, उद्योग, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठं, आणि सामान्य नागरिक यांचा एक मोठा सामाजिक पाया उभा आहे. त्यामुळे युद्ध ही केवळ सीमारेषेवरील लढाई राहत नाही, तर संपूर्ण समाजाच्या शिस्त, सहकार्य, जबाबदारी आणि जिद्दीचीही परीक्षा ठरते. कदाचित म्हणूनच इथे युद्धछायेतलं जनजीवन हे सतत भीतीखाली जगणारं नसून, संकट स्वीकारून त्यावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न करणार्या समाजाचं प्रतिबिंब असल्याचं प्रकर्षाने जाणवतं. आम्हाला सुद्धा आमच्या गरजेच्या वेळी स्थानिक इस्रायली लोकांनी, इस्रायली संस्थांनी त्यांच्या या विशाल कुटुंबात वेळोवेळी सहभागी करून घेतलं आहे.
युद्धाची सर्वात मोठी किंमत केवळ भौतिक नुकसानामध्ये मोजता येत नाही; त्याचा परिणाम माणसांच्या मनावरही खोलवर होत असतो. सततचे सायरन, क्षेपणास्त्र हल्ल्यांची भीती, सीमारेषेवर लढणारे कुटुंबातील सदस्य, ओलीस बनवले गेलेले नागरिक आणि अनिश्चित भविष्य या सर्व गोष्टींचा मानसिक परिणाम होणं स्वाभाविक आहे. इस्रायलमध्ये राहताना मानसिक आरोग्याला दिलं जाणारं महत्त्व विशेष जाणवतं. युद्धकाळात शाळा, विद्यापीठं, सामाजिक संस्था आणि आरोग्य व्यवस्था यांच्यामार्फत समुपदेशन आणि मानसिक आधार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केला जातो. आम्हालाही युद्धामुळे परिणाम झालेल्या मानसिक परिस्थितीसाठी समुपदेशन पाहिजे असल्यास उपलब्ध असतं; ज्या सोयीबद्दल इमेल करून आम्हाला सूचित केलं जातं. इथल्या समाजात एकूणच मानसिक तणावाबद्दल उघडपणे बोलण्याची प्रवृत्ती दिसून येते. भीती वाटणं, असुरक्षित वाटणं किंवा युद्धामुळे मानसिक थकवा जाणवणं ही कमजोरी नसून नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया आहे, अशी इथे सामाजिक जाणीव आहे. त्यामुळे गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घेणं ही लाजिरवाणी गोष्ट मानली जात नाही. उलट, कठीण परिस्थितीत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची मानसिक काळजी घेणं ही एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाते.
युद्धाचा सर्वाधिक संवेदनशील परिणाम लहान मुलांच्या आयुष्यावर होतो. इस्रायलमधील अनेक मुलांसाठी शेल्टर, सायरन आणि आपत्कालीन सूचना या दुर्दैवाने बालपणाचा एक भाग बनलेल्या आहेत. शाळांमध्ये केवळ अभ्यासच नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत कसं वागायचं याचंही प्रशिक्षण दिलं जातं. सायरन वाजल्यावर सुरक्षित ठिकाणी जाणं, जवळचं शेल्टर कुठे आहे हे माहीत असणं, अशा गोष्टी त्यांना लहानपणापासून शिकवल्या जातात. ज्या वयात इतर देशांतील मुलं केवळ खेळ, शाळा आणि मित्रमैत्रिणींमध्ये रमलेली असतात, त्या वयात इथली काही मुलं सुरक्षेच्या वास्तवाशी परिचित होतात. मात्र त्याच वेळी या मुलांमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्याची, संकटातून सावरण्याची आणि पुन्हा सामान्य जीवनाकडे परतण्याची विलक्षण क्षमता दिसून येते.
या सगळ्या अनुभवांकडे पाहताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. इस्रायलमध्ये युद्ध हे नक्कीच वास्तव आहे; पण त्याहून मोठं वास्तव म्हणजे त्या युद्धाशी जुळवून घेत सामान्य आयुष्य जगण्याची समाजाची तयारी. संकटाला दैनंदिन जीवनावर पूर्णपणे वर्चस्व गाजवू न देता, त्याला स्वीकारून पुढे चालत राहणं हीच कदाचित या समाजाची सर्वात मोठी ताकद आहे. म्हणूनच युद्धाच्या बातम्यांमधून दिसणार्या इस्रायलच्या पलीकडे, एका खंबीर समाजाचं दर्शन इथे राहिल्यावर घडतं.
अगदी नुकतंच, दुबई-तेल अविव फ्लायदुबई विमानातील दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगातही इस्रायली नागरिकांचा खंबीर, प्रसंगी आक्रमक भासणारा स्वभाव आणि संकटसमयी दाखवलेलं विलक्षण प्रसंगावधान प्रकर्षानं समोर आलं. मृत्यू समोर उभा ठाकलेला असताना भारतीय वैमानिकाचं अतुलनीय धैर्य, इस्रायली प्रवाशांची समयसूचकता आणि विमानातील इतरांची तत्परता यांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. गंभीर जखमी असूनही कॉकपिटपर्यंत पोहोचण्याचं धाडस करणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार; ‘एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन’ या कार्यक्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा ऐन संकटात उपयोग करणारे इस्रायली प्रवासी; अत्याधुनिक वैद्यकीय साधनं नसतानाही जखमी वैमानिकावर उपचार करणारे दंतवैद्य; दहशतवादी सहवैमानिकाला काबूत ठेवणारे प्रवासी; आणि योगायोगानं विमानात उपस्थित असलेले दोन राखीव वैमानिक-प्रत्येकानं आपापल्या परीने संकटाचा मुकाबला केला. आकाशात मृत्यूशी सुरू असलेल्या या संघर्षात धैर्य, प्रसंगावधान आणि सामूहिक कृती यांचा विलक्षण संगम घडला. या सर्वांच्या शौर्याचं इस्रायलभर कौतुक होत असलं, तरी गंभीर जखमी अवस्थेतही कर्तव्यापासून न डगमगणार्या आपल्या भारतीय वैमानिकाच्या धैर्याबद्दल संपूर्ण इस्रायलभर विशेष आदर व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे इस्रायलींना भारतीयांबद्दल आधीपासूनच असलेला आदर आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या इस्रायली मित्रपरिवारामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सुद्धा आता आणखी वाढलेला दिसून येत आहे. अशाप्रकारे राजकीय, व्यापारी, मैत्री अशा अनेक बाबींत इस्राएल - भारत संबंध दृढ होत आहेत.
असं असलं तरीही, इस्रायलमधील समाज हा एकसंध आणि सर्व बाबतीत एकमत असलेला समाज आहे, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. जगातील कोणत्याही लोकशाही देशाप्रमाणेच इथेही सरकारच्या निर्णयांवर चर्चा, टीका आणि मतभेद होत असतात. युद्धकाळातही नागरिक सरकारच्या धोरणांबद्दल प्रश्न उपस्थित करतात. ओलीस नागरिकांच्या सुटकेसाठी सरकारने अधिक प्रयत्न करावेत, युद्ध हाताळण्याची पद्धत बदलावी किंवा भविष्यासाठी वेगळे राजकीय निर्णय घ्यावेत, अशा विविध भूमिका समाजाने सातत्याने जाहीररित्या मांडल्या आहेत. ‘इस्राएल लोकशाही संस्थे’च्या अहवालानुसार एकूण इस्रायली लोकसंख्येच्या सुमारे 21% इस्रायली नागरिक निदर्शनं, आंदोलनं यांच्या माध्यमातून विविध मतं आणि मागण्या यांसाठी सक्रिय आहेत.
शिवाय, इथल्या अनिवार्य लष्करी सेवेसंदर्भात इस्रायली समाजात मतभेद आहेत. काही अतिधार्मिक यहुदी समुदाय अनिवार्य लष्करी सेवेला विरोध करतात आणि धार्मिक शिक्षणाला अधिक महत्त्व देतात. दुसरीकडे, अनेक नागरिकांच्या मते देशाच्या सुरक्षेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने सामायिक करणे आवश्यक आहे. या प्रश्नावर इस्रायली समाजात चर्चा, आंदोलनं आणि राजकीय मतभेद सातत्याने दिसून येतात. त्यामुळे इस्रायलची गोष्ट एकात्मतेच्या आत असलेल्या विविध मतप्रवाहांचीही आहे.
इथल्या मित्रमंडळींशी संवाद साधताना भविष्याबद्दल दोन वेगवेगळ्या भावना अनेकदा जाणवतात. काही नागरिक अत्यंत आशावादी असतात. इस्रायलने यापूर्वीही अनेक कठीण काळ पाहिले आहेत आणि यातूनही बाहेर पडेल, असा त्यांचा विश्वास असतो. तर काही जण पुढच्या पिढीबद्दल चिंता व्यक्त करतात. आपल्या मुलांना पुन्हा पुन्हा अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागेल का? हा प्रश्न-चिंता काहींच्या मनात दिसून येते. आज गाझाबरोबर युद्धबंदी झाल्यानंतरही संघर्षाची मूळ कारणं संपलेली नाहीत, याची जाणीव अनेकांना आहे.
त्यामुळे अशा सगळ्या विरोधाभासांसह इस्रायलमधील जनजीवन समजून घेणं उचित ठरेल. एका बाजूला युद्ध, सुरक्षा आव्हानं आणि भविष्याची चिंता आहे; तर दुसर्या बाजूला शिक्षण, संशोधन, कुटुंबव्यवस्था, सामाजिक सहकार्य आणि सामान्य आयुष्य जगण्याची तीव्र इच्छा आहे. एका बाजूला संकटकाळात एकत्र उभा राहणारा समाज आहे आणि कमी अंशी का होईना पण दुसर्या बाजूला सरकारवरील टीका आणि आंदोलनाचा आवाजही आहे.
इस्रायलमध्ये राहिल्यानंतर सर्वात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे, युद्धछायेतलं जीवन म्हणजे केवळ सायरन, क्षेपणास्त्रं आणि लष्करी कारवायांचं चित्र नाही. त्या मागे रोज सकाळी कामावर जाणारे नागरिक, प्रयोगशाळेत संशोधन करणारे संशोधक, शेतकर्यांना मदत करणारे स्वयंसेवक, मुलांचं बालपण शक्य तितकं सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करणारे पालक, सीमारेषेवर गेलेल्या सैनिकांची वाट पाहणारी कुटुंबं आणि भविष्याबद्दल आशा टिकवून ठेवणारा समाज आहे.
म्हणूनच इस्रायलकडे केवळ युद्धभूमी म्हणून पाहिलं तर या देशाच्या सामाजिक वास्तवाचा मोठा भाग आपल्या नजरेआड राहतो. युद्धाच्या सावटाखालीही जीवन पुढे नेत राहण्याची मानवी क्षमता, संकटाच्या काळात एकमेकांसाठी उभं राहण्याची सामाजिक भावना आणि मतभेदांसह लोकशाही जिवंत ठेवण्याची वृत्ती या सगळ्यांमधून युद्धछायेतल्या इस्रायलचं खरं चित्र समोर येतं. क्षेत्रफळाने अत्यंत लहान असलेल्या या देशात युद्धाचं सावट नक्कीच आहे; पण त्याचबरोबर आशा, जिद्द, सहकार्य आणि सामान्य आयुष्य जगण्याची उर्मीही आहे. कदाचित याच विरोधाभासांमध्ये युद्धछायेतलं जनजीवन या अनुभवाचा खरा अर्थ दडलेला आहे.