डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राजकीय - हिंदू जागरणाचा अग्रणी

विवेक मराठी    03-Nov-2026
Total Views |
@ प्रमोद वसंत बापट
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे साडेतीन हात देहाचे नाव नव्हते. तो एक नवाक्षरी मंत्र आहे. ह्या नवाक्षरी मंत्रोच्चाराने राष्ट्रभक्तीचा जागर होतो. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे एका असीम ध्येयपथावर चालण्याची प्रेरणा देणारे वैचारिक निशाण आहे. ते जागृत राजकीय हिंदुत्वाचे समूर्त साकार उदाहरण आहे. अखिल हिंदुजनांच्या मनात ते विचारदीप उजळीत राहतील. जुलै 2026मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मजयंतीच्या 125व्या वर्षाची सांगता झाली. त्यानिमित्त घेतलेला हा वेध
 
vivek
 
वेदवाङ्मयात अष्टदिशांचा उल्लेख आहे, त्यांची स्तवने आहेत. ज्ञानरत भारताच्या नकाशात ह्या अष्टदिशांना साधकांनी आपल्या तप:साधनेने भूमीचा गौरव वाढविलेला दिसतो. पण वेदांमध्ये पूर्वेचा गौरव करणारी उषासूक्त रचली गेली. सूर्यसूक्त गायली गेली. तो गौरव उजेडाचा होता. पूर्व दिशा ही प्रत्यक्ष प्रकाशदात्री. आकाशमंडपातून अविनाशी उजेड घेऊन येणारी.
 
आधुनिक भारताच्या इतिहासात पूर्व भारतातील असे अनेक प्रसंग ह्याची साक्ष देतात. सतराव्या शतकापर्यंत वायव्येच्या खैबर खिंडीतून भारतावर अगणित आक्रमणे झाली. पण पुढच्या काळात आक्रमक शत्रू बदलला. त्याची युद्धसाधने बदलली तसा मार्गही बदलला. सागरी मार्गाने आलेल्या युरोपीय आक्रमकांनी सुदूर पूर्वेतील वंगप्रांतातून आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. 2 जानेवारी 1757 ह्या दिवशी प्लासीच्या रणांगणावर झालेल्या पराभवाने एक नवे दुष्टचक्र भारताच्या भाग्यात आले. केवळ सत्तेचं आसन नव्हे तर पायाखालच्या भूमीविषयीची आस्था, ममत्व ह्यांनाही सुरुंग लावणार्‍या नव्या दु:शासनपर्वाचा तो प्रारंभ होता.
 
 
पूर्वेच्या वंगभूमीत तो वणवा लागला. भडकला. सारं सारं जाळू लागला. नित्याचे जीवनव्यवहारच नाहीत तर इतिहासाशी, परंपरेशी अवघ्या भूतकाळाशी असलेले अनुबंधच तो भस्म करू लागला. जगण्यातील सर्व श्रद्धाविषयांना संदेहाची चूड लावू लागला.
 
आपल्या अस्तित्वाचेच भान सुटून जावे, अस्मिता विस्मृतीत जावी आणि मन हीनत्वाने गंजून जावे अशी दुर्दशा आली.
 
 
जिथे हे अनर्थाचे काहूर उठले त्याच भूमीत त्याच्या प्रतिकाराचेही अंकुर पालवत होते. प्राचीनतम काळापासून आमचे पूर्वसुरी मी कोण आहे? आम्ही कोण आहोत? ह्याचा ध्यास घेऊन साधना करीत होते. कोऽहम्...कोऽहम्चा निदिध्यास हाच त्यांचा साधनापथ होता. पुनःश्च त्याच ध्यासपंथावर काही पावले चालू लागली.
 
 
दक्षिणेश्वरी एक साधक धुनी लावून बसला होता. जणू भारताच्या भाग्याचे नवे नकाशेच तो रचित होता. त्या रामकृष्ण परमहंस नावाच्या योग्याकडे आकृष्ट झालेला नरेंद्रनाथ नावाचा तरुण कोऽहम् ह्या प्रश्नाचे उत्तर जगाला उच्चरवाने सांगणार होता. स्वामी विवेकानंदवाणीतून दुमदुमणारे ते उत्तर होते आम्ही हिंदू आहोत!
 
 
ती केवळ आध्यात्मिक ओळख नव्हती. ती आमची अस्मिता होती. आमच्या परंपरेचे त्यात प्रतिबिंब होते. आमच्याकडे चालत आलेल्या गौरवशाली वारशाचे त्यात स्मरण होते. आमच्या कर्तव्याची त्यात जाग होती, जाण होती.
 
 
आणि ती आमची राजकीय ओळखही होती. 1892मध्ये गुरुदास चटर्जींनी बांगला साहित्यिक चंद्रनाथ बसू यांचा ग्रंथ प्रकाशित केला. त्याचे नाव होते ’हिंदुत्व: हिंदूर प्रक्रिता इतिहास’. त्या लेखनाला 1891मध्ये झालेल्या जनगणनेची पार्श्वभूमी होती. त्याचे निष्कर्ष हिंदूंपेक्षा मुसलमानांची संख्या वाढल्याचे भेसूर चित्र दाखवित होते. त्यापूर्वी झालेल्या 1872च्या जनगणनेतील संख्येत 48% वाढ झाल्याने राजकीय हिंदुत्वाचा तो पहिला उद्गार होता.
  
राजकीय हिंदुत्व जागरणाच्या यात्रेत पुढे अनेक महापुरुष जागल्याची भूमिका घेऊन कार्यरत झाले होते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, योगी अरविंद, गुरुदेव रविंद्रनाथ ठाकूर अशी किती नावे आठवावीत?
 
 
डोळ्यांसमोर मोठी दीपमाळच झगमगू लागेल. तिथल्या प्रत्येक दिव्याने तेव्हा तेव्हा आसमंत उजळून टाकला आहे. ऊर्जा दिली, त्यातून इतिहास घडला, आत्मबोधाचं पुरश्चरण सुरू झालं.
 
 
त्यातील एका दिव्याची कहाणी आज आठवायची आहे. कारण त्याचा उजेड वाढताना दिसतो आहे. त्या एका दीपावरून आज अनेक ज्योती तेवू लागल्या आहेत.
 
कोणता दिवा आहे तो..? ती ज्योती तेवू लागली तो प्रसंग.. जणू तोच एका राष्ट्रनायकाचा जन्मक्षण होता.
गोष्ट तशी खूप वर्षांआधीची.. जुनी पण जुनाट नव्हे.
 
दि. 2 जुलै, 1909. कोलकोत्यातील भवानीपूर इलाख्यातील तिमजली प्रतिष्ठित भवन. बाहेर मार्गावरून जाणाराही याच्या दारावरून स्वाभाविक आदराने थोडा दबकून जात-येत होता.
 
हवेलीतील एका दालनात कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आशुतोषबाबू मुखर्जी सुस्नात होऊन पद्मासनात बसलेले. समोर कालीमातेची रौद्रगंभीर भव्य प्रतिमा. समोर उभ्या असलेल्या समईतील जळत्या ज्योती मंद वाटाव्यात असे कालिमातेचे धगधगते नेत्र आणि समोर डोळे मिटून बसलेले न्यायमूर्ती मोशाय. थोड्याच वेळात सहजीच पाय न वाजवता त्यांची गृहलक्ष्मी योगमायादेवी तिथे येते आणि पाठोपाठ दारापर्यंत दौडत आलेला पण दालनात शिरताच सगळा धसमुसळेपणा बाहेर ठेऊन आठेक वर्षांचा मुलगा श्यामाप्रसाद उसन्या गाभीर्याने येतो. मायलेक न्यायमूर्तीमोशायांच्या दो बाजूंना बसतात. दुर्गा सप्तशतीच्या पाठाच्या त्रिमुखी लयदार उच्चारणाने त्या दालनाला गाभार्‍याची महत्ता येते. भूमीवर मस्तक टेकवून मोशायबाबू उठतच असतात तोच सेवक बाहेर वकीलबाबू आल्याची वर्दी देत येतो. मोशायबाबू पुन्हा कालिमातेला डोळे मिटून नमस्कार करतात आणि बाहेर दिवाणखान्यात येण्यासाठी उठतात.
 
वकीलबाबू आज पाचेक मिनिटे लवकरच आले आहेत त्यासाठी ...मोशायबाबू थोडे गतीने निघतात.
 
तसा हा नित्यक्रमाचाच भाग होता. वकीलबाबू, विश्वेश्वर मित्र आणि अन्य एखादा मित्र सकाळच्या चहाला मोशायबाबूंच्या टेबलावर असत. चहाच्या निमित्ताने आगेमागे कोणत्या तरी प्रासंगिक घटनेवर चर्चा होत असे. वाढते स्वदेशी आंदोलन, रोबीदांचा (रवींद्रनाथ ठाकूर) नुकताच प्रकाशित झालेला लेख-कविता, विद्यापीठातील कार्यक्रम अशा कोणत्यातरी विषयावर गप्पा रंगत असत. आणि मोशायबाबूंनी उत्तेजित स्वरात केलेलं विश्लेषण या तीन मित्रांच्या मुखातून विद्यापीठ, वाचनालय, वृत्तपत्र कचेरीत पडसाद उमटवीत राही.
 
आज वकीलबाबू एकटेच आल्याची वर्दी ऐकून मोशायबाबू काहीशा अधीरतेनेच दिवाणखान्यात परतले. त्यांच्या एकट्यानेच येण्याला एक विशेष अर्थ असे. काही गंभीर बोलायचे असल्यास वकीलबाबू एकटेच येत असत. आज तसं काय असेल बरं? मोशायबाबू सचिंत होत त्यांनी,‘सर्व काही ठीक आहे का?’ याची हातानेच विचारणा केली.
 
 
वकीलबाबूंनी समोर पडलेलं ताजं वृत्तपत्र मोशायबाबूंच्या हातात देत गंभीर स्वरात विचारलं, ‘आजची बातमी पाहिलीत?’
मोशायबाबूंच्या मनांत विचार तरळला, नेमकं हे कसं घडतं? आज सकाळी स्नानापूर्वीचा चहा पिताना पत्नीने त्यांना वृत्तपत्राला शिवू दिले नव्हते. श्यामप्रसादविषयी काळजीने काहीबाही सांगत राहिली. अभ्यासाची तक्रार नव्हती पण विप्लवींविषयी विचारणा करतो याची तिला काळजी वाटत होती. हे असं मोशायबाबूंकडून ज्या दिवशी वृत्तपत्रावर नजर टाकण्याचे राहून जातं त्या दिवशी काहीतरी विशेष वार्ता आलेली असते. आणि बहुतेक वेळा वकीलबाबू ती अशी विजयी मुद्रेने निदर्शनास आणून देतात.
 
 
आजही तसंच झालं.
मोशायबाबूंनी काहीसं खजील होत लगबगीने वृत्तपत्र ओढून घेतलं. डोळे त्या प्रमुख बातमीवरून झरझर फिरत होते आणि कानांवर शब्द पडत होते. वकीलबाबू न राहवून बातमीचा गोषवारा सांगत राहिले. वृत्तपत्रात पहिल्याच पानावर काळ्या मोठ्या चौकटीत बातमी छापली होती. ’लंडनमध्ये सर कर्झन वायलीची गोळी घालून हत्या, खुनी मदनलाल धिंग्रा नावाचा भारतीय विद्यार्थी तरूण!’ वकीलबाबू दबक्या आवाजात हेच सांगत होते.
 
 
मोशायबाबूंच्या डोळ्यांसमोरून जणू एक चित्रपटच पुढे सरकत होता. गेली चार-पाच वर्षं देशाचं बदलतं वातावरण, वंगभंगाच्या वेदनेने पेटून उठलेलं केवळ बांगला नाही तर समस्त भारतीय मन, लोकमान्यांचे सिंहशक्ती जागविणारे शब्द, त्यामुळेच खरेतर काहीसे धास्तावूनच लोकमान्यांवर चालविलेला खटला आणि त्यांची रंगूनला केलेली अमानुष हद्दपारी.. सारं सारं पुन्हा प्रत्यक्ष घडत असावं असे मोशायबाबू स्तब्ध राहून जणू बघत होते. बाजूच्या खुर्चीत प्रश्नार्थक मुद्रेने बसलेल्या वकीलबाबूना इतकेच म्हणाले,‘हे होणारच. आणखी होईल. अनिर्बंध सत्तायंत्राच्या आधारे या जाग्या झालेल्या सिंहमनांना बांधून ठेवणं आता असंभव आहे. आता या अग्निनारायणाच्या ज्वाळा लंडनपर्यंत पोहोचल्या आहेत. दास्याच्या शृंखला आता वितळल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या विप्लवी तरूणांचा जाच मात्र आता वाढेल याची काळजी वाटते.’ वकीलबाबू यातून संकेत समजल्यासारखे घाईने उठले आणि,‘खरं आहे. आपल्या विप्लवी पोरांना भेटून घेतो’, घाईघाईने इतकेच म्हणत बाहेर पडले.
 

vivek 
  
आज चहा न घेताच बाहेर पडलेल्या वकीलबाबूंकडे श्यामाप्रसाद पाहतच राहिला. मोठी माणसं मसलतीत असताना पोरासोरांनी तिथे जाणं निषिद्ध असल्याने अपार औत्सुक्य वाटूनही त्याला दाराआडच थांबावे लागले होते. आई चहापानाची व्यवस्था पहायला स्वैपाकघरात गेल्याने तो लपून चोरून काही ऐकू शकत होता. काहीतरी गंभीर मामला होता एवढं तो उमजला. विप्लवी..आपले विप्लवी तरूण हे शब्द, त्यांतून जाणवलेली आत्मीयता, काळजी हेही त्याला जाणवले होते. आता बाबांकडून ते सारे त्याला समजून घ्यायचे होते. त्यासाठीच तो पुढे सरकला. बाबांसमोर उभा राहिला. मोशायबाबूंनी प्रश्नार्थक भुवया वर चढवल्यावर त्याने थेटच विचारले, ‘विप्लवी म्हणजे कोण? व्यायामशाळेत, कालिमंदिरातही मी हलक्या आवाजात हा शब्द ऐकलाय. कोण आहेत हे विप्लवी? मला भेटवाल?’ त्याच्या मनातल्या सार्‍या औत्सुक्याने, कुतूहलाने त्याला बोलण्याचं बळही दिलं होतं आणि वेगही. आशुबाबूही चमकून बघत राहिले. वृत्तपत्र समोर ठेवत ते त्याला तोडत म्हणाले,‘आत्ता ते तुझ्यासाठी नाही!’ श्यामाप्रसाद खिन्न झाला. त्याचा सारा उत्साहच पांगळा झाला. तिथून निघतानिघता टेबलावरील वृत्तपत्रातील काळी चौकट आणि विप्लवी हा संभाषणातील शब्द यांची सांगड घालत होता. पुन्हा आशुबाबूंची हाक आली म्हणून त्यांच्याकडे पाहू लागला. आशुबाबू त्याच्या दोन्ही खांद्यांवर आंगठ्याने दाब देत म्हणाले, ‘सध्या शिक्षण हेच तुझं काम. पुढे हे आहेच. ते अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सध्या केवळ शिक्षण! ये तू!’
 
 
श्यामाप्रसाद खांद्यावर जणू दायित्व मिळाल्यासारखा अधिक दृढपणे चालत होता. पुन्हा त्याला कालिमातेसमोर बसावेसे वाटले. दुर्गा सप्तशतीतील खलनिर्दालनाचे श्लोक त्याच्या मंद स्वरात देवघरात गुंजत राहिले.
 
सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोस्तु ते ॥
 
 
बंद पापण्याआडून तो कालिमातेचे रक्तनेत्र मनात आठवत होता. साठवत होता. शब्दबद्ध न झालेली एक प्रतिज्ञाच मनात रूजत होती. त्यासाठीच आज शिक्षण... उद्या प्रत्यक्ष कृती! मिटल्या डोळ्यांनी कालिचे रूद्ररूप पाहता पाहता देवीचं दुसरं एक रूप त्याच्या मनात आकारत होतं. शाळेतही पाहिलेलं....त्या चित्राखाली भारतमाता असे शब्द लिहिले होते. बाबांनी शिक्षण घे असं आत्ताच सांगितलं. आता कालिमाता शाळेत भारतमाता बनून आपल्याला बळ देईल या विश्वासाने श्यामाप्रसादने डोळे उघडले आणि तो,‘विप्लवी! विप्लवी !’ असेच पुटपुटत माडीवर पळत गेला.
 
 
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी!
 
आधुनिक भारतातील हिंदुत्वाच्या राजकीय विजययात्रेचा शंखघोष करणारे अग्रणी वीर. कालिमातेसमोर विप्लवी व्रताचा संकल्प घेणार्‍या श्यामाबाबूंचा जन्म दि. 6 जुलै 1901 ह्या दिवशी झाला.
 
बंगालातील गौड संस्थानाचे राजे बल्लाळ सेन ह्यांच्या प्रयत्नातून कनौजहून बंगालमध्ये आलेला विद्यावान मुखर्जी परिवार. 1857 मध्ये कलकत्ता विद्यापीठाची स्थापना झाली. त्या विद्यापीठाचा मुखर्जी परिवाराशी विशेष अनुबंध असावा. कारण त्या पहिल्याच वर्षी गंगाप्रसाद मुखर्जी नावाचा तरुण अक्षरशः मार्गावरच्या, दुकानातल्या दिव्यांच्या उजेडात अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळवून नि:शुल्क महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागला. विद्यापीठाच्या पहिल्या मालिकेत स्नातक होऊन पुढे वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉ. गंगाप्रसाद मुखर्जी म्हणून लोकविख्यात झाला. त्यांचा ज्येष्ठ पुत्र आशुतोष पुढे कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवू लागला. आणि पुढे त्यांचाही पुत्र...श्यामाप्रसाद!
 
 
 
आशुतोषबाबूंची ’बंगालचा वाघ’
अशीही ओळख होती.

vivek 
 
आशुतोषबाबू कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. तसेच सार्वजनिक जीवनातील त्यांच्या अत्यंत प्रभावी उपस्थितीमुळे त्यांची ’बंगालचा वाघ’ अशीही ओळख होती.
 
भाषा, इतिहास अशा विषयात विशेष रुची असलेले विद्यार्थी श्यामाप्रसाद तोच वारसा पुढे नेत होते. बालवयात महनीय व्यक्तीजीवने ते समरसून ऐकत अशी आठवण त्यांचे शाळेतील शिक्षक हर्षनाथ बॅनर्जींनी नोंदवली आहे. ती ऐकता ऐकता त्यांच्या रूपात एका कणखर पीळदार जीवनाची जडणघडण होत होती. महाविद्यालयीन शिक्षणात स्नातकपूर्व परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून श्यामाप्रसाद बांगला भाषेतील यशासाठी बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांच्या नावाच्या पदकाचेही मानकरी झाले.
 
 
उच्च शिक्षणात इंग्रजी भाषेचे वर्चस्व निर्माण करण्याच्या त्या आरंभकाळात आशुतोषबाबूंच्या आग्रही प्रयत्नातून स्नातकोत्तर अभ्यासक्रमात बांगला भाषेचा अंतर्भाव करण्यात आला होता. बी. ए. च्या परीक्षेतील धवल यशामुळे इंग्रजी भाषेचा पर्याय सहज उपलब्ध असताना श्यामाप्रसाद मात्र बांगला भाषा विषय घेऊन एम. ए. करीत होते. त्याच वर्षात विधी (कायदा) विषयाच्या सायंकालीन वर्गात प्रवेश घेऊन त्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये पाठोपाठच्या वर्षात प्रथम क्रमांक मिळवित शिक्षण पूर्ण केले.
 
एम. ए.च्या परीक्षेसाठी त्यांनी गिरीशचंद्र घोष ह्या बांगला भाषेतील प्रतिभावान नाटककाराच्या नाट्यकृतींचे विशेष अध्ययन करून प्रबंध लिहिला. गिरीशचंद्र घोष रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते आणि त्यांनी रामायण - महाभारतातील कथा आणि शंकराचार्य, चैतन्य महाप्रभू, छत्रपती शिवाजी महाराज अशा राष्ट्रनायकांच्या जीवनावर प्रेरणादायी नाटके लिहिली होती. त्यात भूमिका करून त्याचे सर्वत्र प्रयोग केले होते. बंगाली समाजमनात राष्ट्रीय भावना जागविण्याचे ऐतिहासिक कार्य त्या नाट्यकृतींनी केले होते. श्यामाप्रसादजींच्या विषयनिवडीतून त्यांच्या भविष्यातील वाटांचे उत्तम सूचन होताना दिसते.
 
विद्यार्थीजीवन हे आगामी विप्लवी जीवनाचा साधनाकाळ आहे अशा श्रद्धेने श्यामाप्रसादजींनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. ह्या सर्व काळात त्यांनी बांगला शब्दशारदेची आराधना केली होती. त्या शब्दांचा आधार घेतच त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाचा शुभारंभ केला.
 
आपल्या धाकट्या भावाला बरोबर घेत त्यांनी आपल्या घरातूनच ’बंगबाणी’ हे मासिक सुरू केले. गुरुदेव रविंद्रनाथ, शरदबाबू अशा श्रेष्ठ प्रतिभावंतांच्या रचना ह्या मासिकातून प्रतिमास प्रकाशित होत असत. सहा वर्षे चाललेला हा मासिकाचा उपक्रम मुखर्जी बंधूंनी थांबवला कारण श्यामाबाबूंच्या जीवनातील नवं लोकनेतृत्व पर्व सुरू होत होतं.
 
 
लोकजागरणासाठी पत्रकारिता हे महत्वाचं साधन मानणार्‍या श्यामाप्रसादजींनी पुढे ’हिंदुस्थान’ हे बांगला आणि ’नॅशनॅलिस्ट’ हे इंग्रजी दैनिक चालविले होते.
 
 
श्यामाबाबूंनी शिक्षण पूर्ण होताच कलकत्ता उच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून काम सुरू केलं होतं. त्यांना बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी ब्रिटनमध्ये जायचं होतं, पण आशुतोषबाबू त्यासाठी काही अनुकूल नव्हते. दुर्दैवाने निवृत्तीनंतर काहीच काळाने आशुतोषबाबूंचे निधन झाले. त्यानंतर श्यामाबाबू दोन वर्षे लंडनमध्ये राहून बॅरिस्टर होऊन भारतात परतले. विदेशातील कालखंडात एक भारतीय मित्र मात्र त्यांना नित्य भेटत असे. त्याचं नाव होतं डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जे पुढे भारताचे राष्ट्रपती झाले. आशुतोषबाबूच त्यांना कलकत्त्यात घेऊन आले होते. विद्यापीठात मानसशास्त्रीय आणि नैतिक शास्त्राच्या पंचम जॉर्ज अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून आशुतोषबाबू भारतातील सर्वोत्तम व्यक्तीच्या शोधात होते. तो शोध डॉ. राधाकृष्णन ह्यांच्या भेटीने परिपूर्ण झाला. त्यामुळे कलकत्त्यातच डॉ. राधाकृष्णन आणि श्यामाप्रसादजींची मैत्री झाली होती. हिंदुत्व, धर्म, तत्त्वज्ञान हे त्या दोघांच्या मैत्रीचे संगमबिंदू होते.
 
 
श्यामाप्रसादजींचे कलकत्ता विद्यापीठातील कार्य हे जनमन आणि प्रशासन ह्या दोन्ही क्षेत्रातील त्यांच्या कर्तृत्वाचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. विद्यापीठ अधिसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कामाची आचार्य प्रफुल्लचंद्र राय ह्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. श्यामाप्रसादजींच्याच आग्रहामुळे प्रकृती ठीक नसतानाही आचार्य लंडनमध्ये झालेल्या विद्यापीठांच्या संमेलनात सहभागी झाले होते. श्यामाप्रसादजींनी गुरुदेव रविंद्रनाथांना अनेकदा विद्यापीठात पाचारण केले. विख्यात चित्रकार अवनीन्द्रनाथ ठाकुरांना कलाविभागात वागेश्वरी प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं. आपल्या पित्याने, आशुतोषबाबूंनी भूषविलेले कुलगुरूपदही पुढे त्यांना प्रदान करण्यात आले. एकाच विद्यापीठाचे असे कुलगुरूपद भूषविणारी ही पितापुत्रांची असामान्य जोडी म्हणायला हवी.
 
 
1929 मध्ये श्यामाप्रसादजींच्या प्रत्यक्ष राजकीय जीवनाची सुरुवात झाली. पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झालेल्या श्यामाप्रसादजींना काँग्रेसची धोरणे आणि कार्यशैली अजिबात मानवली नाही आणि त्यांनी वर्षभरातच पदाबरोबरच पक्षाचे त्यागपत्र दिले. पण लगोलग झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन ते 1937पर्यंत सलग सात वर्षे बंगाल विधानपरिषदेचे आणि पुढील दहा वर्षे बंगाल विधानसभेचे सदस्य म्हणून कार्यरत होते.
 
 
हा सारा कालखंड भारताच्या अखंडत्वाच्या संघर्षाचा, हिंदूंच्या राजकीय अस्तित्वरक्षणाचा होता. आणि श्यामाप्रसाद मुखर्जी ही त्या कालपटावर हिंदुहितरक्षक म्हणून नोंदवलेली अक्षय मुद्रा आहे.
 
 
आशुतोषबाबूंच्या कार्यलयात एके काळी कार्यरत असलेल्या शिकाऊ उमेदवारातील एक अब्दुल काशेम फझलुल हक आता कृषक मुस्लिम समाजाचा संघर्षशील नेता म्हणून नावलौकिकास आला होता. तो मुस्लिम लीगचा ठाम विरोधक होता. 1937च्या निवडणुकीत 250 सदस्य असलेल्या बंगाल विधानसभेत 123 मुस्लिम सदस्य होते. काँग्रेसने आपल्या 60 सदस्यांच्या जोरावर आघाडीचे केलेले प्रयत्न विफल होऊन मुस्लिम एकतेचा नारा देत फझलुल हकचे मंत्रीमंडळ सत्तेवर आले. लीगी सदस्यांनी सक्तीने सर्व निर्णयात मुस्लिम मुजोरीचे धोरण अंमलात आणणे सुरू केले. सर्वत्र 50% जागा मुस्लिमांसाठी राखीव म्हणून घोषित करायला लावल्या. श्यामाप्रसादजींनी निर्भीडपणे प्रखर विरोध करीत हिंदुहितासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचाच परिणाम म्हणून 1940मध्ये स्वा. सावरकरांनी त्यांना हिंदू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी विराजमान केले. लीगी आत्यंतिकतेला झेलता झेलता अखेर फझलुल हकचा संयम तुटला आणि त्याचा कृषक प्रजा पक्ष, श्यामाप्रसादजींची हिंदू महासभा, नेताजी सुभाषबाबूंचा फॉरवर्ड ब्लॉक आणि काही अनुसूचित समाजाच्या संघटना ह्यांचे शासन सत्तेवर आले. त्यामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थमंत्री होते.
 
 
1940मध्ये स्वा. सावरकरांनी श्यामाप्रसादजींना
हिंदू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी विराजमान केले.
 
vivek
1941च्या जनगणनेनुसार बंगालमध्ये 54% मुस्लिम होते. अल्पसंख्य झालेला हिंदू समाज अमानुष हिंसा आणि अत्याचाराने होरपळत होता. काँग्रेस पक्ष हिंदू-होरपळीकडे पूर्ण दुर्लक्ष करीत होता आणि असा संपूर्ण बंगाल पाकिस्तानला जोडून घेण्यासाठी जिना आणि सुर्‍हावर्दी आतंक माजवित होते. त्या सर्वांची वाट डॉ. मुखर्जींनी एखाद्या पहाडासारखी अडवून धरली होती. हिंदू महासभेच्या 1943 आणि 44 च्या अनुक्रमे अमृतसर आणि बिलासपूरच्या राष्ट्रीय अधिवेशनातून श्यामाप्रसादजी, फाळणीने देशातील सांप्रदायिक तेढ कमी होणार नाही, उलट ती वाढेल आणि तिची धग भारताला वर्षानुवर्षे सोसावी लागेल असा इशारा देत होते.
 
 
1947मध्ये देशाच्या फाळणीच्या मागणीला जोर चढला असता डॉ. मुखर्जींनी मागणी केली की देशाआधी बंगालची फाळणी झाली पाहिजे. बंगालचा हिंदुबहुल भूभाग भारतातच राहिला पाहिजे. ह्या मागणीचा वाढलेला रेटा पाहून गांधीजी, पटेल आणि नेहरूही तिचे समर्थन करू लागले. मग तोच न्याय पंजाबलाही लावला गेला. अखेर 3 जून 1947च्या माउंटबॅटन योजनेत ह्याचा स्वीकार करण्यात आला. आणि श्यामाप्रसादजींच्या ह्या शर्थीच्या प्रयत्नामुळेच आजचा पश्चिम बंगाल, पूर्ण आसाम आणि त्रिपुरा पाकिस्तानचा घास बनले नाहीत. आजच्या भारताचा भूभाग म्हणून राहिले.
 
 
1947नंतर स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळातही डॉ. मुखर्जींचा समावेश होता. ते स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री झाले.
 
 
चित्तरंजन लोकोमोटिव्ह कारखाना, हिंदुस्थान एरॉनॉटिक्स, सिंद्रीचा खत कारखाना असे मोठे उद्योग आणि त्यांना जोड देणारे पारंपरिक व्यवसाय गतिमान करण्यासाठी हस्तशिल्प बोर्ड, हस्तकला बोर्ड, खादी आणि ग्रामोद्योग बोर्ड, रेशीम बोर्ड ह्यांची उभारणी हे त्यांचेच कर्तृत्व आहे. मात्र धार्मिक अत्याचाराने गांजून जाऊन पूर्व पाकिस्तानातून येणार्‍या हिंदू निर्वासितांसंबंधित प्रश्नावर त्यांचे मतभेद झाले. तसेच त्या अत्याचाराविरुद्ध जाब विचारायचा सोडून पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अलींबरोबर शांतता करार करण्याच्या नेहरुंच्या धोरणाचा निषेध म्हणून त्यांनी त्यागपत्र दिले.
 
 
देश स्वतंत्र झाला होता पण अजून हिंदूंचे नष्टचर्य संपले नव्हते. हिंदू एक राजकीय शक्ती म्हणून संघटित नव्हती. डॉ. मुखर्जींनी तेच आपले ध्येय मानले. 1951च्या आरंभी पीपल्स पार्टी नावाचा नवा पक्ष स्थापन केला. पण पुढे विविध गाठीभेटी करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्री गुरुजींची भेट घेतली. त्या भेटीतून नव्या पक्षनिर्मितीच्या संकल्पाला बळ मिळाले, दिशा मिळाली. आणि दि. 21 ऑक्टोबर 1951 ह्या दिवशी दिल्लीमध्ये ’भारतीय जनसंघ’ हा नवा राष्ट्रीय विचारांचा पक्ष जन्माला आला. अर्थातच डॉ. मुखर्जी पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले.
 
 
vivek
 
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनसंघाचे तीन सदस्य संसदेत निवडून गेले. अधिवेशनकाळात डॉ. मुखर्जींनी छोटे छोटे पक्ष आणि अपक्ष सदस्यांना एकत्र करून त्यांची आघाडी स्थापन केली. हा असा पहिलाच प्रयोग होता. त्यामुळे आघाडी निर्मितीचा प्रयोगाचा प्रारंभ असा डॉ. मुखर्जींपासून झाला हे नमूद करायलाच हवे. स्वाभाविकच डॉ. मुखर्जी पहिल्या संसदेचे विरोधी पक्षनेते म्हणून देशासमोर आले.
 
 
श्यामाप्रसादजींसाठी देशाचे नेतृत्व हे केवळ पद नव्हते. त्याची साक्ष सार्‍या देशाने द्यावी अशी घटना आणि त्यासंबंधी डॉ. मुखर्जींचे नेतृत्व देशाने पाहिले.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा सिद्ध करून देशाला घटना प्रदान केली. घटनेत आवश्यक तेव्हा बदल करण्याची तरतूद होतीच पण ती पहिल्या निवडणुकीआधीच करण्याचा डाव नेहरुंनी खेळला. पूर्व बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जनमत असताना नेहरू - लियाकत शांतता करार करण्यात आला. त्याच्या विरुद्ध मुखर्जींनी तोफ डागली होती. शासनाला विरोध करण्याच्या ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणणारी घटना दुरुस्ती नेहरू शासनाने आणली होती. डॉ. मुखर्जींनी संसदेत आणि पुढे संसदीय समितीतही प्रखर विरोध केला. पण तरीही घटनादुरुस्ती झालीच. डॉ. मुखर्जींच्या ह्या एकाकी झुंजीमुळे अभिव्यक्तीवरील बंधनाला मात्र काहीसा आळा बसला.
 
 
राष्ट्रीय हितासाठी जागृत मुखर्जींचे लक्ष काश्मीरकडे लागले होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशातील शेकडो संस्थानांच्या विलिनीकरणाचा मोठा प्रश्न होता. सरदार पटेलांनी तो उत्तम हाताळला होता. पण काश्मीरच्या विलिनीकरणाची समस्या झाली. तो प्रश्न स्वतः पं. नेहरू हाताळीत होते.
 
 
जुलै 1952मध्ये अध्ययन करण्यासाठी डॉ. मुखर्जींनी जम्मूकाश्मीरचा प्रवास केला. त्यांनी जम्मू प्रजा परिषदेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या संपूर्ण विलिनीकरणाच्या मागणीला समर्थन दिले, तिला देशव्यापी आधार उभा करण्याची योजना केली. आपल्या प्रवासानंतर पंतप्रधान नेहरुंना दोन पत्रे लिहिली. एकाला मोघम उत्तर मिळालं. त्यामुळे आंदोलनाला पर्याय उरला नाही.
जनसंघाच्या आंदोलनाची दिशा ठरली आणि घोषणाही...
 
एक देश में दो विधान, दो निशाण, दो प्रधान, नही चलेंगे नही चलेंगे!
 
दि. 8 मे 1953 ह्या दिवशी श्यामाप्रसादजी दिल्लीहून काश्मीरकडे रेल्वेने निघाले. वाटेत सर्वत्र जोरदार स्वागत होत होतं. वस्तुत: त्यांना गुरूदासपूर येथेच अटक होणे अपेक्षित होते. पण तसे न होता त्यांना थेट जम्मूच्या हद्दीत सोडण्यात आले. दुर्दैवाने हे कसे आणि कोणाच्या सांगण्यावरून झाले हे सुद्धा अनाकलनीय आहे, आजवर गुलदस्त्यात आहे.
 
 
श्रीनगरला पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली. कारावासात न ठेवता त्यांना दूर एका लहान जागेत ठेवण्यात आले, जिथे पुरेशा व्यवस्थाही नव्हत्या. ते नित्य दैनंदिनी लिहित असत, पण त्यांची दैनंदिनी काढून घेण्यात आली. त्यांना पुरेसे औषधोपचार मिळत नव्हते. दि. 22 जूनला त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ताप वाढत होता. रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका न आणता टॅक्सीतून नेले गेले. इतक्या प्रतिकूलतेतही त्यांच्या आजाराला उतार पडत होता. डॉक्टरांनीही आता काही धोका नसल्याचे सांगितले. अशा वेळी अचानक रात्री एक इंजेक्शन देण्यात आले आणि ते देताच श्यामाप्रसादजी म्हणत होते,‘आग आग होते आहे...’ आणि पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
 
एक देह शांत झाला. एक प्रेरणा चिरप्रेरणा झाली.
प्राणज्योती विझून गेली. प्रेरणाज्योती अक्षय्य झाली.
पणतीच्या प्रकाशाने आकाश उजळले.
सस्यश्यामल भूमीवर कमळ उमलले.
 
त्यातूनच निर्माण झालेल्या ऊर्जेने जम्मू-काश्मीरला 370व्या कलमाच्या विळख्यातून मुक्त केले.
 
 
पण तेवढ्याने मुखर्जी मुक्त होणार नाहीत.
 
आजही पूर्व, पश्चिम सीमेपल्याडच्या हिंदूंचा वनवास संपला नाही. वणवा विझला नाही. सांस्कृतिक भारताच्या भूभागावरील हिंदूंना आपल्या मायभूमीत सन्मानाने परतता आलेले नाही. नव्या नागरिकता कायद्याने त्यांना तो सन्मान मिळणार आहे.
 
 
तो अखेरच्या हिंदूला मिळेपर्यंत मुखर्जी मुक्त होणार नाहीत.
 
डॉ. मुखर्जी महाबोधी सोसायटीचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. भगवान बुद्धांच्या मार्गाने जाणारे जगातील अन्यदेशीय बांधव भारताशी जोडले जाण्याचे कामही अजून शेष आहे. डॉ. मुखर्जी कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष होते. भारतविद्येच्या पुनरुज्जीवनासाठी जन्मलेली ती संस्था आणि मुंबईतील तिचीच भगिनी संस्था ह्यांचेही स्वजागरणाचे कार्य बहुमितीने वाढायला हवे.
त्याच्या पूर्ततेवाचून मुखर्जी मुक्त होणार नाहीत.
 
आणि मुक्त होऊनही डॉ. मुखर्जी अखिल हिंदुजनांच्या मनात विचारदीप उजळीत राहतील. कारण डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे साडेतीन हात देहाचे नाव नव्हते. तो एक नवाक्षरी मंत्र आहे. नवरात्रीमध्ये शक्तीचा जागर होतो. तसाच ह्या नवाक्षरी मंत्रोच्चाराने राष्ट्रभक्तीचा जागर होतो.
 
 
ते केवळ आंदोलन नव्हते. आंदोलने सीमित ध्येय गाठण्याची साधने असतात. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे एका असीम ध्येयपथावर चालण्याची प्रेरणा देणारे वैचारिक निशाण आहे.
 
ते जागृत राजकीय हिंदुत्वाचे समूर्त साकार उदाहरण आहे.
 
 
त्यांच्या स्मृतीना विनम्र वंदन!