रेषा रंग परंपरेने जपलेली - महाराष्ट्राची लोकचित्रसंस्कृती

विवेक मराठी    03-Nov-2026
Total Views |
@ओंकार रवींद्र जोशी
8108541010
 
 Pictorial Culture
महाराष्ट्राच्या मातीने आपल्या आठवणी जपण्याची आणखी एक अतिशय सुंदर पद्धत शोधून ठेवली आणि जपलीही आहे-ती म्हणजे चित्रांच्या माध्यमातून कथा सांगण्याची. ही कला कधी कागदावर उतरते, कधी माती आणि शेणाने सारवलेल्या भिंतीवर उमटते, कधी देवळाच्या भिंतीवर रंगते, कधी अंगणात तांदळाच्या पिठाने काढली जाते, तर कधी एखाद्या सणाच्या दिवशी काही क्षणांसाठी घराच्या उंबरठ्यावर जन्म घेते आणि विधी संपताच पुसली जाते.
हाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो प्रचंड सह्याद्री, भले थोरले गड-किल्ले, काळ्या कातळात कोरलेल्या लेणी आणि मंदिरं. ह्याच लाल-काळ्या मातीच्या पोटात जन्माला आलेल्या समृद्ध संस्कृतीने अनेक कलाप्रकारांत स्वतःला प्रकट केलं. लावणी, पोवाडा, भारूड, कीर्तन अशा अनेक कला ह्या मातीत आजही बहरत आहेत.

पण ह्याचसोबत महाराष्ट्राच्या मातीने आपल्या आठवणी जपण्याची आणखी एक अतिशय सुंदर पद्धत शोधून ठेवली आणि जपलीही आहे-ती म्हणजे चित्रांच्या माध्यमातून कथा सांगण्याची. ही कला कधी कागदावर उतरते, कधी माती आणि शेणाने सारवलेल्या भिंतीवर उमटते, कधी देवळाच्या भिंतीवर रंगते, कधी अंगणात तांदळाच्या पिठाने काढली जाते, तर कधी एखाद्या सणाच्या दिवशी काही क्षणांसाठी घराच्या उंबरठ्यावर जन्म घेते आणि विधी संपताच पुसली जाते.
म्हणूनच महाराष्ट्राची लोकचित्रकला ही केवळ रंग, रेषा आणि आकार यांची गोष्ट नाही. ती जगण्याची दृश्यभाषा आहे.

कुठे कोकणातली चित्रकथी दृक्-श्राव्य माध्यमातून चित्रकथा सांगते, तर कुठे वनवासी पाड्यातली वारली जीवनाचा उत्सव साजरा करते. तळकोकणातली कावी देवळातील भिंतींना माध्यम करून भक्तांशी संवाद साधते. तर मोठाल्या वाड्यांत मराठा भित्तिचित्रांतून राजसत्ता, धर्म, पुराणकथा आणि तत्कालीन जीवनाचं विश्व उभं राहतं. पण अगदी झोपडीपासून ते राजप्रासादापर्यंत, जर कुठल्या चित्रांनी आपलं स्थान मिळवलं असेल, तर ती आहेत विधिचित्रं-मंडलं, चैत्रांगण, नागपंचमी, रथसप्तमी अशा वार्षिक सणांना काढली जाणारी विशेष चित्रं, ते रोज दाराजवळ काढल्या जाणार्‍या गोपद्म आणि लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळ्या.

यातील प्रत्येक परंपरेची भाषा वेगळी आहे; पण त्यांच्या मुळाशी एक समान गोष्ट आहे रेषेतून स्मृती जपण्याची माणसाची इच्छा.
चला तर मग, ह्या चित्रभाषेच्या प्रवासाला सुरुवात करूया.


 Pictorial Culture 
 
वारली
मातीवर रंगवलेली निसर्गाची गोष्ट
 
माणसाला समजायला लागल्यापासून स्वतःला व्यक्त करण्यासाठी त्याने सर्वप्रथम चित्रभाषेचा वापर केला. आदिमानवाने चितारलेल्या गुहाचित्रांमध्ये आजच्या अनेक लोकचित्रपरंपरांची पाळंमुळं दिसतात. सह्याद्रीच्या गर्द जंगलात असलेल्या वनवासी पाड्यांतील जीवनाचं दर्शन घडवणारी वारली चित्रकला पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू आणि सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरील परिसरात राहणार्‍या वारली समाजाने विकसित केली.
वारली लोकांचं जीवन भूमी, जंगल, शेती, पाऊस, प्राणी आणि ऋतू यांच्याशी घट्ट जोडलेलं असल्यामुळे त्यांच्या चित्रांमध्येही हेच जग सतत दिसत राहतं.
वारली चित्रातील रेषा, त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन हे त्यांच्या जगाकडे सहजसोप्या पद्धतीने पाहण्याचा भाग आहेत. मातीने सारवलेली भिंत, त्यावर तांदळाच्या पिठापासून तयार केलेला पांढरा रंग आणि बांबूच्या काडीचा कुंचला-एवढ्याशा साधनांमधून संपूर्ण जीवन उभं राहतं. पारंपरिक प्रक्रियेत भिंतीला गेरूचा लेप देऊन शेण-मातीने सारवलं जातं आणि तांदळाच्या पिठाचा पांढरा रंग वापरला जातो. पण वारलीचं महत्त्व केवळ त्या साधेपणात नाही.
वारली चित्रं ही ह्या समाजाच्या विधींशी जोडलेली कला आहे. विवाहाच्या वेळी चित्र काढणारी स्त्री ‘धवरेली’ म्हणून ओळखली जाते. चित्र काढण्यापूर्वी स्नान, पूजा, उपवास अशा शुद्धीकरणाच्या प्रक्रियाही पाळल्या जातात. विवाहाबरोबरच जन्म, पाचवी, नागपंचमी, दसरा आणि दिवाळी यांसारख्या प्रसंगांशीही चित्रांची सांगड आहे.
 
वारली चित्रातील सर्वात मोहक प्रतिमांपैकी एक म्हणजे तारपा नृत्य. एकमेकांच्या हातात हात धरून गोलाकार फिरणारी माणसं. पहिल्या दृष्टीक्षेपात ते नृत्य वाटतं. पण त्या गोलाला गहिरा अर्थ आहे. तो गोल म्हणजे ऋतुचक्र. तो गोल म्हणजे जन्म-मृत्यूचा क्रम. तो गोल म्हणजे कालचक्र.
 
म्हणून वारली चित्रात माणूस निसर्गापासून वेगळा दिसतच नाही. झाडं, प्राणी, पाऊस, शेती, नृत्य, देवता आणि माणूस सगळे एकाच विश्वाचा भाग आहेत. हीच वारली कलेची मोठी तत्त्वदृष्टी आहे.
 
चित्रकथी
चित्रातून उलगडणारी गोष्ट
 
वारली चित्रकलेचं बोटं धरून आता आपण जाऊ त्या भूमीत, जिथे महाराष्ट्राला लाभला आहे मऊशार वाळूचा सुंदर समुद्रकिनारा. याच परशुरामभूमीत, कोकणाच्या गर्द वनराईत आणि समुद्राच्या लाटांच्या लयींत एक अद्भुत चित्रकला जन्माला आली.
रामायण आणि महाभारत एव्हाना समाजातील वनवासी बांधवांपर्यंत पोहोचलं होतं. त्यांनी आपल्या जीवनदृष्टीतून या कथांना नव्याने आकार दिला. ग्रंथातील कथा ठाकर वनवासी समाजाने झाडांच्या पानांवर उतरवल्या; पण शब्दांच्या नव्हे, तर चित्रांच्या रूपाने. आणि अशा प्रकारे चालत्या-बोलत्या चित्रकथीचा जन्म झाला.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावात चित्रकथीची परंपरा बहरली. ही कला केवळ चित्रांपुरती मर्यादित राहिली नाही. तिने गायन, वादन, कथाकथन आणि प्रभावी सादरीकरण अशा अनेक कलाप्रकारांना आपल्यात सामावून घेतलं. त्यामुळे ती चित्रं अक्षरशः जिवंत झाली.

पुढे याच परंपरेतून कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, छाया-चित्रकथी असे विविध कलाप्रकार विकसित झाले. पण सुरुवातीच्या काळात जे घडलं, ते मात्र विलक्षण होतं.

स्वराज्याचे थोरले धनी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग उभारण्यासाठी कोकणात आले आणि या ठाकर वनवासी कलाकारांच्या कलेला राजाश्रय लाभला. शिवाजी महाराजांनी प्रथमच या कलाकारांना कागद उपलब्ध करून दिला. झाडांच्या पानांवर अवतरलेल्या कथा आता कागदावर रंगू लागल्या आणि चित्रकथीच्या पोथ्या तयार होऊ लागल्या. पुढे याच समाजातील अनेकांनी स्वराज्यासाठी गुप्तहेर म्हणून कार्य केलं आणि स्वराज्ययज्ञात आपलं मोलाचं योगदान दिलं.

 
खरं तर जातिभेदाच्या झळा या कलाकारांनाही बसल्या. त्यांना घरात किंवा देवळात प्रवेश नसे; पण घराबाहेर, राऊळाबाहेर, सत्यनारायण पूजेसारख्या प्रसंगी चित्रकथीचे खेळ रंगू लागले. सनातन धर्मावर परचक्राचं सावट असतानाही अशा कलाकारांमुळे ही सांस्कृतिक परंपरा अधिक बळकट होत गेली.


 Pictorial Culture
 
 
पुढे स्वराज्याचं काम करताना हे कलाकार विविध प्रदेशांत जाऊ लागले. चित्रकथी वनराई ओलांडून पैठणच्या गोदातीरी आली, तर काही कलाकार मंडळी ही शैली कर्नाटकात घेऊन गेले. चित्रांमध्ये त्या त्या प्रदेशातील गोष्टींचा प्रभाव पडला आणि पिंगुळीसोबतच पैठण चित्रकथी व कर्नाटकाची चित्रकथी अशा आणखी दोन उपशैली तयार झाल्या.

चित्रांना भौगोलिक प्रदेशानुसार पेहराव आणि दागिने आले. निसर्ग दाखवण्यासाठी त्या त्या प्रदेशात दिसणार्‍या गोष्टींमधून प्रेरणा घेतली गेली. कोकणातल्या जंगलातून चित्रकथी बाहेर पडली आणि खर्‍या अर्थाने समृद्ध झाली.

आजही पिंगुळी गावात पद्मश्री परशुराम गंगावणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही कला जोपासली आहे. आता ह्या कलेचा वापर समाजप्रबोधनासाठीही होऊ लागला आहे. शिक्षणाचं महत्त्व, स्त्रीभ्रूण संरक्षण असे महत्त्वाचे विषयही सरकारच्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या कलेद्वारे पोहोचवले जात आहेत. आज ह्या कलेच्या स्वरूपाकडे पाहिलं तर लक्षात येतं की चित्रकथीने वनवासी चित्रकलेपासून लोकचित्रकलेपर्यंतचा असा विलक्षण प्रवास केला आहे.
 
 
कावी कला
लाल रंगात कोरलेली कोकणाची लोकस्मृती
 
चित्रकथी जशी कोकणातल्या गर्द वनराईत बहरू लागली, तशी आणखी एक कला कोकणातल्या मंदिरांची शोभा वाढवत होती. लालसर गेरूवर पांढर्‍याशुभ्र चुन्याच्या रेषा उमटू लागल्या आणि पुराणातले प्रसंग एका नव्या रूपात भिंतींवर चितारले जाऊ लागले. अशा प्रकारे कोकणाच्या किनारपट्टीवर कावी कला आकार घेऊ लागली.
तळकोकणातील मंदिरं ह्या सुंदर कलेने अलंकृत झाली. मंदिरात साकार होणार्‍या भारतीय चित्रकलांमधील ही एक वैशिष्ट्यपूर्ण द्विरंगी चित्रपरंपरा आहे. फक्त दोन रंग लालसर गेरू आणि चुन्याचा पांढरा. चुन्याचा थर, त्यावर गेरूचा लाल रंग आणि त्या थरावर कोरून काढलेली नक्षी आतला चुन्याचा रंग प्रगट करते. आणि चित्रं आकार घेऊ लागतं.
 
कोकणपट्ट्यात सुरू झालेली ही कला पाहतापाहता गोवा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टीच्या प्रदेशात विस्तारली. गोव्यात अनेक मंदिरं ह्या चित्रकलेने अलंकृत आहेत. इतकंच काय, तर ह्या कलेतील मनुष्याकृती वगळून गोव्यातील काही चर्चमध्येही कावी कलेतील फुलं आणि वेलींच्या नक्षी भिंतींवर चितारल्या गेल्या.
पण आपलं दुर्दैव असं की महाराष्ट्रात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कावी कलेचं काम असलेली मंदिरं उरली आहेत. अलीकडेच कावी कला असलेल्या कोकणातील झोळंबे येथील माऊली मंदिरातील चित्रं 2023 सालच्या मंदिर जीर्णोद्धारात नष्ट झाली. ही चित्रं जवळजवळ 500 वर्षं जुनी होती.
 
 
पण गोवा आणि कर्नाटक राज्यांत मात्र कावी अजूनही मंदिरांच्या भिंतींवर पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी
जीर्णोद्धार केलेलं सप्तकोटेश्वर मंदिर आज गोवा सरकारच्या प्रयत्नांमुळे नव्या रूपात पाहायला मिळतं आहे. मंदिराला सजवण्यासाठी पारंपरिक कावी कलेचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे. कर्नाटकातही काही मंदिरांमध्ये कावी अजून आपलं अस्तित्व टिकवून आहे.
 
 
ह्या कलाकृतींकडे पाहिलं की वाटतं, कला निर्माण करण्यासाठी नेहमीच अनेक रंगांची गरज नसते. मातीचा एक रंग, चुन्याची एक रेषा आणि त्यामागे जपलेली एक लोकपरंपरा एवढंही पुरेसं असतं. मग पाहणार्‍याला त्यातलं भावदर्शन होतं आणि चित्र सिद्ध होतं.
मराठा भित्ती चित्रं शैली
रंगांत जपलेलं स्वराज्याचं सांस्कृतिक विश्व
 
चित्रकथीचे रंग आणि कावीचं कौशल्य समजून घेतल्यावर आपण आता रांगड्या वीर मराठ्यांना पडलेल्या सुंदर चित्रस्वप्नांचा प्रवास करणार आहोत.
मराठ्यांची आणि महाराष्ट्राची राजसी कला म्हणजे मराठा भित्तिचित्रशैली. राजदरबारापासून देवघरापर्यंत, मंदिरांपासून वाड्यांच्या दिवाणखान्यापर्यंत, महाराष्ट्राच्या भिंतींनी आपल्या वैभवी काळाची स्मृती ह्या चित्रांद्वारे जपून ठेवली आहे. याच चित्रकलेला आपण मराठा भित्तिचित्रकला म्हणतो.
मराठा भित्तिचित्रकलेचा विकास अलीकडचा म्हणजे मुख्यतः सतराव्या आणि अठराव्या शतकांत मराठा सत्तेच्या विस्तारासोबत झालेल्या सांस्कृतिक वातावरणात पाहायला मिळतो. पेशवाईच्या काळात पुणे, सातारा, वाई, नाशिक, जुन्नर, पंढरपूर आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत वाडे, मंदिरे आणि देवळांच्या वास्तूंमध्ये चित्रकलेला आश्रय मिळाला. राजघराणी, सरदार, जहागीरदार आणि श्रीमंत कुटुंबांच्या वाड्यांमध्ये भिंती सजवण्याची परंपरा रुजली.
या कलेवर एकाच परंपरेचा प्रभाव नव्हता. भारतीय धार्मिक चित्रपरंपरा, स्थानिक लोककला, राजस्थान आणि दख्खनमधील चित्रशैली, मुघल आणि पुढे युरोपीय चित्रणपद्धती यांचा काही प्रमाणात प्रभाव मराठा भित्तिचित्रांवर पडलेला दिसतो. पण या सगळ्या प्रभावांना महाराष्ट्राच्या स्थानिक कल्पनाशक्तीने आपला रंग दिला. त्यामुळे तयार झालेली शैली ना पूर्णपणे दरबारी राहिली, ना पूर्णपणे लोककला. ती महाराष्ट्राच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनाशी जोडलेली एक स्वतंत्र चित्रभाषा बनली.
 
या चित्रांमध्ये सर्वाधिक आढळणारे विषय म्हणजे रामायण, महाभारत, कृष्णलीला, शिवपुराणातील प्रसंग, देवी-देवतांची रूपं, आणि धार्मिक आख्यायिका. पण भिंतीवर फक्त देवच नव्हते. काही ठिकाणी घोड्यावर स्वार झालेले सैनिक दिसतात. कुठे हत्तींच्या मिरवणुका दिसतात. कुठे पालख्या, रथ, बाजारपेठा, नृत्य करणार्‍या स्त्रिया, वादक, शिकारीची दृश्यं आणि राजदरबार रंगवलेला दिसतो. म्हणजेच भित्तिचित्रं ही त्या काळाच्या समाजजीवनाची नोंदही होती.

 
यामुळे मराठा भित्तिचित्रांकडे केवळ धार्मिक चित्रं म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. ती त्या काळातील वस्त्रं, दागिने, शस्त्रं, वाहनं, वास्तू, संगीतवाद्यं आणि सामाजिक जीवन समजून घेण्यासाठी महत्त्वाची साधनं आहेत.
 
 
मराठा भित्तिचित्रांमध्ये स्त्री-पुरुषांच्या वेशभूषेचाही सुंदर अभ्यास करता येतो. स्त्रियांच्या नऊवारी साड्या, पदराची विशिष्ट नेसणी, नथ, ठुशी, हार, बांगड्या आणि केसांची रचना दिसते; तर पुरुषांच्या पगड्या, फेटे, अंगरखे, धोतरं आणि दागिन्यांमधून तत्कालीन पोशाखाची झलक मिळते. राजघराण्यातील व्यक्तींची वस्त्रं आणि सामान्य माणसांची वस्त्रं यांतील फरकही काही चित्रांमध्ये स्पष्ट जाणवतो.
या भित्तिचित्रांची एक महत्त्वाची जागा म्हणजे महाराष्ट्रातील वाडे. वाड्यातल्या दिवाणखाना, देवघर, खासगी दालनं, प्रवेशद्वार आणि अंगणाभोवतीच्या भिंतींवर काढलेली चित्रं
वाई, मेणवली, नाशिक परिसर, सातारा आणि पुणे परिसरातील जुन्या वाड्यांमध्ये तसेच काही मंदिरांमध्ये मराठा-पेशवाईकालीन चित्रपरंपरेचे अवशेष पाहायला मिळतात. मेणवलीतील नाना फडणवीस वाडा हा या वास्तू-सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा संदर्भ आहे. अशा वाड्यांमध्ये वास्तू, लाकडी कोरीवकाम आणि भित्तिचित्रं यांचा एकत्रित अनुभव येतो.
 
मंदिरांच्या भिंतींवर मात्र धार्मिक कथांना अधिक महत्त्व मिळालं. एखाद्या भिंतीवर कृष्णाचा जन्म, दुसर्‍या भिंतीवर गोवर्धनधारण, पुढे रासलीला; तर एखाद्या पट्ट्यात रामायणातील प्रसंग अशा चित्रमालिका दिसू लागल्या. त्यामुळे संपूर्ण भिंत एखाद्या चित्रकथेसारखी दिसते.
काळ पुढे सरकला. नवीन बांधकामपद्धती आल्या. जुन्या वाड्यांची दुरुस्ती झाली. भिंतींवर रंगाचे नवे थर चढले. काही ठिकाणी चित्रं चुन्याखाली गेली, तर काही ठिकाणी ओलावा, दुर्लक्ष आणि मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट झाली. आधुनिक काळात घराच्या भिंतीवर चित्र काढण्याऐवजी छापील सजावट आणि आधुनिक रंगकाम आलं आणि हळूहळू भिंतीवरच्या कथा शांत झाल्या.
पण महाराष्ट्राच्या जुन्या वाड्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये आजही ह्या काळाची आठवण करून देणारी एखादी रंगाची रेषा दिसते, कुठे एखाद्या देवतेचा अर्धवट चेहरा दिसतो, कुठे घोड्यावर बसलेला एखादा योद्धा दिसतो तर कुठे फुलांच्या नक्षीतून त्या काळाच्या खुणा अजूनही अनुभवता येतात.
त्या अर्धवट उरलेल्या चित्रांमध्ये एक पूर्ण काळ दडलेला आहे.
आणि मग लक्षात येतं की इतिहास फक्त युद्धांचा नसतो. इतिहास हा माणसांच्या जगण्याचाही असतो. कोणते कपडे घातले, कोणती वाद्यं वाजवली, कोणत्या देवांची पूजा केली, कसे सण साजरे केले, राजदरबार कसा दिसत होता, स्त्रिया कशा नटत होत्या, घोडे आणि हत्ती कसे सजवले जात होते-या सगळ्या गोष्टींच्या स्मृती वाड्याच्या भिंतींनी ह्या भित्तिचित्रकलेत अजूनही जपून ठेवल्या आहेत.
महाराष्ट्रातील विधी चित्रं
पिढ्यान्पिढ्या जपलेल्या मंगलरेषांची परंपरा
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माणसाची पहिली भाषा ही चित्रभाषा आहे. तो नेहमीच चित्रातून व्यक्त झाला आहे. पण गुहाचित्रांनंतर भारतीयांसाठी जर कुठली पुरातन चित्रपरंपरा आजतागायत टिकून असेल, तर ती म्हणजे विधिचित्रं. अगदी वैदिक काळापासून पुढे सिंधू-सरस्वतीच्या काळात ते आजतागायत आपण भारतीय लोकं विधिचित्रं काढत आहोत. ती काढली जातात, तात्पुरती स्थिर होतात आणि मग नष्ट केली जातात.

महाराष्ट्राच्या अगदी घराघरात ही चित्रं काढली जातात. सणवार असो, कुठला उत्सव असो किंवा कुठली व्रतवैकल्यं असोत, विधिचित्रांशिवाय हे सगळं अपूर्ण वाटतं. अंगणात सडा घातला की मातीच्या वासासोबत रांगोळीच्या रेषा फेर धरतात आणि ओल्या मातीवर शृंगाराचा साज चढतो.
‘विधिचित्र’ म्हणजे एखाद्या धार्मिक, कौटुंबिक किंवा सामाजिक विधीच्या निमित्ताने तात्पुरती भूमीवर, भिंतीवर किंवा पूजास्थानी काढली जाणारी चित्रं. त्यामुळे विधिचित्रांचं खरं सौंदर्य त्यांच्या क्षणभंगुरतेत आहे. त्याचबरोबर विश्वाच्या तीन अवस्था उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं भान माणसाला करून देणारी ही चित्रं आहेत.
महाराष्ट्रातील ग्रामीण आणि वनवासी समाजजीवनात अशा चित्रपरंपरांचे अनेक पदर दिसतात. घराच्या अंगणात काढलेली रांगोळी, देवघरासमोर रेखाटलेली शुभचिन्हं, विवाहप्रसंगी काढल्या जाणार्‍या आकृत्या, सण-उत्सवांच्या वेळी केलं जाणारं भूमी-अलंकरण-या सगळ्यांच्या मुळाशी एकच भावना आहे; पवित्र अवकाशाची निर्मिती.
विधिचित्रात वापरली जाणारी चिन्हं साधी असली तरी त्यांचा अर्थ फार मोठा असतो. कमळ म्हणजे निर्मिती आणि पवित्रता, स्वस्तिक म्हणजे मंगलत्व, सूर्य-चंद्र म्हणजे विश्वचक्र, धान्य किंवा वनस्पती म्हणजे समृद्धी, तर भूमितीय रचना म्हणजे विश्वाच्या संतुलनाची प्रतीकं.
विशेष म्हणजे या चित्रांसाठी लागणारी साधनंही अगदी सहज उपलब्ध असतात. तांदळाचं पीठ, गेरू, हळद, कुंकू, नैसर्गिक माती किंवा घरच्या घरी तयार केलेले रंग-यांच्याच साहाय्याने ही चित्रं साकारली जातात. त्यामुळे विधिचित्र ही महागड्या साधनांवर किंवा औपचारिक कलाशिक्षणावर अवलंबून नसलेली कला आहे.
ज्या हातांनी घर-संसार चालवला, त्याच हातांनी घराच्या उंबरठ्यावर संस्कृतीही रेखाटली. आणि ही चित्रं एखाद्या वारशाप्रमाणे एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे अगदी आपसूक सोपवली जाऊ लागली.
ह्याच प्रकारातील काही विधिचित्रं आपण पाहणार आहोत.
चैत्र महिन्यात अंगणात किंवा घरातील देवघराच्या जागेत काढल्या जाणार्‍या विशिष्ट रांगोळीला चैत्रांगण म्हणतात. महाराष्ट्रातील काही भागांत ही परंपरा विशेषतः स्त्रियांशी जोडलेली आहे. चैत्र महिन्याच्या सुरुवातीला घरात मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी, देवीची पूजा करण्यासाठी आणि सौभाग्य-समृद्धीच्या कामनेसाठी हे चित्र काढलं जातं.
 
चैत्र हा वसंताचा महिना. निसर्गात नवी पालवी फुटते, झाडांना फुलं येतात, वातावरणात नवचैतन्य निर्माण होतं. त्यामुळे चैत्रांगणाच्या संकल्पनेतही नवीन सुरुवात, प्रजननक्षमता, समृद्धी, मंगलत्व आणि निसर्गाशी असलेलं नातं हे भाव दिसून येतात.

 
वसंत ऋतू हा भारतीय जनमानसात ऋतुराज मानला गेला आहे. आपल्या नव्या वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून होते. मग गौरी तृतीयेला घरी चैत्रगौर बसते. लाडकी लेक माहेरपणाला आल्यासारखं तिचं कौतुक होतं आणि अशा वेळी आपला हर्षोल्हास व आनंद दर्शवण्यासाठी सगळी शुभचिन्हं एकत्र करून चैत्रांगणाची रांगोळी काढली जाते.

 
याच महिन्यात रामनवमी, हनुमान जयंती असे महत्त्वाचे सणही असतात. त्यामुळे रामनामालाही चैत्रांगणात विशेष स्थान आहे. गरुड, नाग, कमळ, नांगर, मोर, दिवा, गौरी, गदा, धनुष्यबाण, आंबा, स्वस्तिक अशी कितीतरी शुभचिन्हं या रांगोळीचा भाग होतात. आणि जणू काही वसंतालाच चित्रबद्ध केलं आहे की काय, असं वाटतं. आपली संस्कृती वसंताच्या ह्या बहरालाही सुंदर चित्ररूप देते, हे चैत्रांगण पाहिल्यावर जाणवतं.
 
 
जसा समृद्धीचं पूजन करण्यासाठी चैत्र महत्त्वाचा, तसंच ज्या कामामुळे ही समृद्धी येते, ती शेतीची कामं ज्या काळात होतात त्यासाठी श्रावण महत्त्वाचा. ह्या निमित्ताने आपण श्रावणात काढली जाणारी विधिचित्रं पाहणार आहोत.
श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान प्रदेशात नागांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांना शेतकर्‍याचा मित्रही म्हटलं जातं. ह्या सणाच्या निमित्ताने लाकडी पाटावर नऊ नागांची चित्रं काढली जातात. हे नऊ नाग आपल्या पुराणांत वर्णन केलेले नाग आहेत-अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया.
कधी कधी ह्या नऊ नागांसोबत नाग-नागिणीचं जोडपंही काढलं जातं. त्यांना नैवेद्य अर्पण करून त्यांची पूजा केली जाते.
पण श्रावण महिना म्हटलं की सगळ्यांकडे आवर्जून दिसतात ते म्हणजे जिवतीचे कागद.
 
भारतीय परंपरेत मुलं-बाळं यांनाही समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणूनच अष्टलक्ष्मींपैकी एक लक्ष्मी संतानलक्ष्मी आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाचे दिवस, सृजनाचा काळ आणि त्याचबरोबर रोगराई पसरण्याचा काळदेखील. अशा वेळी संरक्षक शक्ती मुलांच्या जवळ असणं महत्त्वाचं. ह्याच विचाराला चित्ररूप जिवतीच्या कागदाच्या रूपात दिलं गेलं.
मग ह्या कागदावर जिवती मातेसोबत अन्य रक्षण करणारी रूपकं, जसं नृसिंह आणि कालियामर्दनातील श्रीकृष्ण, हे ही आली. पण नुसतं संरक्षण असून उपयोग नाही; मुलांना योग्य प्रतिभा प्राप्त व्हावी आणि त्या प्रतिभेला गुरुबळ मिळावं, ह्यासाठी बुध आणि गुरु हेही जिवतीच्या कागदावर आले.

श्रावण सरता सरता अवघ्या मातृशक्तींना नमन करण्यासाठी पिठोरी अमावस्येचा दिवस येतो. या दिवशी 64 योगिनींची पूजा केली जाते. अर्थातच, 64 योगिनींच्या चित्राचा कागदही या दिवशी पूजला जातो.
पुढे गणपती, नवरात्र या सणांनाही ही शुभचिन्हं दारावर, अंगणात आणि भिंतीवर काढली जातात. विजयादशमीला आजही अनेक घरात पाटीवर अंक सरस्वती काढून तिची पूजा केली जाते, दिवाळीच्या वेळेस तर ही सुंदर चित्रं रांगोळीच्या माध्यमातून आकार घेतात. दिवाळी सरली की रथसप्तमीच्या दिवशी कुठे सूर्याचा एक पायाचा सुंदर रथ काढला जातो आणि त्याचीही मनोभावे पूजा केली जाते.
विधिचित्रं म्हणजे आपल्या संस्कृतीचं एक सुंदर भावदर्शन आहे आणि त्याचबरोबर उत्पत्ती, स्थिती आणि लय दर्शवणारा अनुपम चित्रसोहळाही आहे.

महाराष्ट्राच्या वीरभूमीत ही चित्रकला बहरली आणि जनमानसाच्या रोजच्या जगण्याचा भाग झाली. एक अशी दृश्यभाषा, जी रेषांनी स्वतःला प्रगट करते आणि सामाजिक भावदर्शन घडवते.

जंगलातली वारली चित्रकला आज जागतिक रंगमंचावर स्थिरावली आहे. तर कोकणातली चित्रकथी समाजप्रबोधन करते आहे.

 मंदिरांच्या भिंतीवरील कावी मात्र पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहे, तर वाड्यांमधली राजसी मराठा भित्तिचित्रशैली संवर्धनाच्या.
ह्या सगळ्यात विधिचित्रं मात्र अजूनही समाजाचं बोट धरून संस्कृतीचं संवर्धन करत आहेत. महाराष्ट्राच्या लाल-काळ्या मातीत उमललेल्या ह्या चित्रकला टिकवून पुढच्या पिढीच्या हातात सोपवायच्या आहेत. कारण संस्कृतीचं संरक्षण कलेमार्फतही करता येतं. आणि ह्याचं सामाजिक भान आपल्या पिढीला ठेवणं गरजेचं आहे.
लेखक इंडोलॉजिस्ट तसेच
भारतीय लोकचित्रकला आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.