Weaving
विणकाम कलेत स्त्री पुरूष भेद मला आवडत नाही, मात्र पुरूष क्रोशाचे विणकाम करतो याचंच फार जणांना आश्चर्य वाटतं. शिवाय त्यात विविध प्रयोग करणं हेही परत वेगळं वाटतं. शपसळपशशीळपस वीरुळपस हा माझा आवडीचा विषय. त्याचा अत्यंत नेमका उपयोग आता क्रोशाचे काम करताना मला होतो. शाळेत इलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झालो त्याचा उपयोग रंगसंगती ठरवताना फार होतो. विणकामात काहीतरी विलक्षण आनंद आहे ही भावना माझ्या अगदी 12-13 वर्षांतल्या पहिल्या पहिल्या अनुभवापासून आहे. याच माझ्या कलाप्रवासाची ही गोष्ट.
सहावी-सातवीत होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत हैदराबादला आत्याकडे गेलो होतो. बाबांची ही मोठी बहीण त्यांना आईसमान होती (शारदाबाई उत्तमराव पारगांवकर). तिचा मोठा मुलगा बाबांहून दोन वर्षांनी मोठा. दुसरा बाबांच्या बरोबरीचा. दिवाळीत आत्याने परभणीला येणे आणि उन्हाळ्यात आम्ही तिकडे जाणे हा आमच्या बालपणीचा दरवर्षीचा रिवाजच होता.
मोठ्या आत्तेभावाच्या मुली आमच्या बरोबरीच्या असल्याने नात्यापेक्षा मैत्री जास्त. सहावी-सातवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो असताना आत्तेभावाच्या मधल्या मुलीच्या-नंदिनीच्या एका हातात तारेसारखी समोर यु आकडा असलेली बाकदार सुई आणि दुसर्या हातात छानसा जाडसर लोकरीचा धागा बघितला. तिचा हात सरसर चालत होता आणि छानशी वेणी तयार होत होती. जादू बघावी तसे मी ते दृश्य विस्फारल्या डोळ्यांनी बघत होतो. माझ्या डोळ्यातले भाव नंदिनीने वाचले, माझा स्वभाव तर ती जाणतच होती,’तुला येतं?’ माझी मान नकारार्थी हलली असावी, ’अरे सोप्पं आहे. डाव्या हाताच्या बोटांनी हा दोरा पकड, उजव्या हाताने ही सुई चालव. जमेल बघ...’ तिने ते सगळं माझ्या हातात दिले. थोडंसं मला प्रत्यक्ष हाताला हात धरून शिकवलं आणि सायकल शिकवताना आपल्याला एकटं सोडून हळूच निघून जावं तशी बाजूला सरकली.
पण तिचं माझ्याकडे नीटच लक्ष असावं. कारण थोड्याच वेळात ती माझ्यापाशी परत आली,’असा बोटांना ताण देऊ नकोस, दोरा जरा ताणायचा जरा मोकळा सोडायचा, सुई घट्ट पकडू नकोस..’ अशा काही सूचना दिल्या आणि परत निघून गेली.
मी जवळपास तासभर चिवटपणे क्रोशाची सुई आणि दोर्याशी झटत राहिलो. बर्यापैकी वीण उमटली होती. दुपारी माझ्या वहिनी पॅथॉलॉजी लॅबमधून परत येऊन माझ्यामागे उभ्या राहिलेल्या मला कळाल्याच नाहीत. ’अगं नन्ना (नंदिनीचे घरातले नाव) याला चांगलं जमतंय की..’ म्हणाल्या. तसं मला मूठभर मांस चढलं. खूप आनंद झाला. त्यांनी छानशी गुळगुळीत कागदांवरची क्रोशाची रंगीत पुस्तकं मला दाखवली. मग तर मला अजूनच आनंद झाला.
संध्याकाळी गच्चीवर जाऊन मी ती पुस्तकं चाळली. परत रात्री विणकाम करत बसलो. माझा नादिष्टपणा सगळ्यांनाच माहीत असल्याने कुणाला तसं वेगळं काही वाटलं नाही. लहान म्हणून उलट कौतुकच वाट्याला आलं.
ती उन्हाळ्याची सुट्टी क्रोशामय झाली. परभणीला आलो तर जिकडेतिकडे लग्न समारंभाचा माहौल... माहौल म्हणजे रूखवताची कामं घरोघरी चाललेली. गल्लीतच आईच्या मामेबहिणीचं विणामाई पाठक हिचे घर होते. तिच्या घरचं मला विलक्षण आकर्षण म्हणजे तिची तान्ही गोंडस खेळकर मुलगी. मला तिच्याशी खेळायला आवडायचं. अश्विनी तिचं नाव. (अजूनही मोबाईलमध्ये तिचा नंबर ममडी या तिच्या लहानपणीच्या नावानेच सेव्ह आहे). दुसरी मोठी अनघा तर छान बडबड करायची खेळायची म्हणून आवडायची. मावशीकडे मी हैदराबादहून आल्यावर गेलो तर तिथे कुणाच्या तरी लग्नासाठीच्या रूखवताचे काम जोरात चालले होते. त्यात क्रोशाचेही होते. ते काय आहे ते मी नीट समजून घेतले. मी हैदराबादला क्रोशा शिकलो याचे मावशीला आणि आईच्या मावशीला म्हणजे माझ्या आज्जीला कौतुक वाटले.
दोन दिवसांनी सकाळीच मावशीच्या घरासमोरून जाताना अश्विनीला खेळवायला म्हणून घरात डोकावलो. मावशी आणि माझी आज्जी कुठेतरी जाण्याच्या तयारीत दिसल्या. मला पाहताच त्यांना हायसं वाटलं. आज्जी मावशीला म्हणाली, ’वीणे, हा आशाचा बाळ्या (माझं लहानपणीचे घरातलं नाव) बघेल ममडीकडे. आपण झटकन जाऊन येऊ बाजारात.’ छोटी ममडी दुपट्यावर शांत झोपली होती. मी होकार दिला. काल परवा जे क्रोशाचे काम चालू होते ते मागून घेतलं. मावशी व आज्जी निघून गेल्या. मी विणकामात गुंगून गेलो. थोड्याच वेळात एकदम भानावर येऊन ममडीच्या दुपट्याकडे बघितले. ती कधीचीच उठून दरवाज्यातून येणार्या उन्हाच्या कवडशाशी खेळत होती. मी विणत होतो त्या लाल पिवळ्या हिरव्या लोकरीचे रंगही उन्हात चमकत होते. मावशी व आज्जी लगेच परतल्याही. लेकरू छान हसत खेळतंय आणि माझ्या हातातलं विणकामही बरंच वाढलेलं बघून दोघींनाही आनंद झाला. माझं कौतुक वाटलं.
विणकामात काहीतरी विलक्षण आनंद आहे ही भावना माझ्या त्या अगदी 12-13 वर्षांतल्या पहिल्या पहिल्या अनुभवापासून आहे.
माझा हात जरासा सरावलेला बघून आईनं हळूच घरच्या रेडीओच्या छोट्या टेबलावर टाकायला टेबलक्लॉथ विणायला मला प्रोत्साहन दिलं.
लाल काळ्या चौकोनांना जोडत (ग्रॅनीज स्क्वेअर) मी ते एकट्याने स्वतंत्रपणे पूर्ण केलेलं क्रोशाचे पहिले विणकाम. आजही ते आईने जपून ठेवलंय.
क्रोशाचे विणकाम आवडायला लागले, त्याचे काही प्रयोग केले पण अगदी नियमित असे काही करत बसलो नव्हतो. दहावीनंतर शिक्षणासाठी म्हणून संभाजीनगरला आलो. पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण, व्यवसाय, लग्नं, मुलं यात अडकत गेलो तसतसा विणकामापासून दुरावलो. मुलीला एकदा समजावताना शिकवताना खूप वर्षांनी सुई हातात धरली. पण फारसं काही केलं नाही.
व्हिन्सेंट पास्किनेल्ली हा आमचा फ्रेंच मित्र. त्याला हातमाग, हातानं विणलेल्या वस्तू यांचे मोठे आकर्षण नि आवड. तो दरवर्षी 5 महिने भारतात येऊन राहतो. त्याच्या फ्लॅटमध्ये त्याला एक ज्यूटचे मॅट हवे होते. त्याचा भारतातला पर्यटनातला भागीदार आमचा तरूण मित्र आकाश ढुमणे यानं माझ्यापाशी विचारपूस केली. मला काय वाटले कुणास ठाऊक मी म्हणालो,’अरे विकत कशाला..! मी विणून देतो. आपण जाड सुतळीसारखा दोरा कुठे मिळतो ते बघू’ आकाशचा विश्वासच बसेना. ’सर तुम्ही क्रोशा करता? तुम्हाला येतं?’ त्याचा प्रश्न चूक नव्हता. जवळपास 14 वर्षं तो मला ओळखतो. पण मला क्रोशा करताना बघितलं नव्हतं किंवा चर्चा केली नव्हती.
दोन तीन दिवस बाकी व्यापातून वेळ काढत रात्री जागत मी ते 2 फूट व्यासाचं ज्यूट मॅट तयार केलं. खूप दिवसांनी विणकाम करत असल्याने सफाई तेवढी आली नाही, शिवाय हाताला कळही लागत होती.
मग मात्र नादच लागला. ’देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ असे विणकामाचे सिलसिले सुरू झाले. डिसेंट कंपनीचे छानसे सुती जाड धागे किंवा लोकर घेऊन मी विणकाम करायला लागलो. ग्रॅनीज स्क्वेअर किंवा त्याचेच पुढे वर्तुळ बनवत वाढवत नेणे किंवा अष्टकोन षट्कोन वाढवत नेणे, दोन तीन रंगांच्या लोकरी वापरणे, मुक्तपणे खांब-खिडक्या-महिरपींचा वापर करत वर्तुळांचे स्तर वाढवत जाणं मला फार आवडतं.
यु ट्युबवर प्रचंड प्रमाणात क्रोशा विणकामाचे व्हिडीओे उपलब्ध आहेत. यु ट्युबला गुरू मानून एकलव्याप्रमाणे मी अशात क्रोशाचे विणकाम शिकलो आहे, शिकतो आहे. ठरावीक साचेबद्ध विणकाम टाके मोजून जराशा सफाईने छान जमू शकते. पण त्यात काही मजा वाटत नाही. उलट मॅजिक सर्कलचा पाया घालून मुक्तपणे एकावर एक वर्तुळाचे थर चढवत जाणे मला आव्हानात्मक वाटते. त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान वेगळेच आहे.