@आरती देवगांवकर
जगाला ग्रासणार्या अति-भौतिकवाद, एकाकीपणा, मानसिक ताणतणाव आणि नात्यांच्या विघटनाच्या गंभीर आजारावर ‘समर्थ कुटुंब संस्था’ हे एक संजीवनी औषध आहे, याची केदारला पूर्ण खात्री पटली होती. भारताची ही कौटुंबिक जीवनशैली आणि विचारप्रणाली केवळ भारतापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण जगाला नव्याने मार्ग दाखवणारी ठरेल, हा दृढ विश्वास घेऊन तो आपल्या पुढच्या वैश्विक प्रवासासाठी सज्ज होत होता. ‘आनंद’ बंगल्यातील दिवा मंद पण ठाम प्रकाशाने तेवत होता. तो दिवा जणू बाहेरच्या जगभरातील अंधाराला सांगत होता की, जोपर्यंत घराघरांमध्ये संवादाचा, संस्कारांचा आणि नात्यांचा हा प्रकाश जिवंत आहे, तोपर्यंत मानवी संस्कृती कधीही पराभूत होऊ शकत नाही.
डिसेंबरच्या गुलाबी थंडीत बोस्टनचे रस्ते तांबड्या-पिवळ्या पानांनी सजले होते. खिडकीबाहेरचे हे निसर्गाचे सौंदर्य मनाला भुरळ पाडणारे होते; पण ‘आनंद’ अशी लहानशी पाटी मिरवणार्या एका आलिशान घरामध्ये मात्र एक प्रकारची अस्वस्थता दाटली होती. स्वतःची आयटी कन्सल्टन्सी चालवणारा केदार आज नेहमीपेक्षा जास्त थकलेला वाटत होता. एका बाजूला जगभरात वेगवेगळ्या देशांतील क्लायंट्सच्या अतिशय गुंतागुंतीच्या प्रोजेक्ट्सच्या ‘डेडलाईन्स’ पाळण्याचे दडपण, आणि दुसर्या बाजूला भारतातील पुण्यातील आपल्या राहत्या घरातून, ‘आनंद’ बंगल्यातून आई-बाबांचे येत असलेले फोन. गेल्या तीन-चार वर्षांत त्याला भारतात जाणे तर जमलेच नव्हते; पण भरपूर वेळ काढून आईवडलांशी फोनवरही बोलणेही शक्य झाले नव्हते. बँकेला सूचना दिल्याने दर महिन्याला भारतात वडलांच्या खात्यावर एक गलेलठ्ठ रक्कम मात्र न चुकता जमा होत होती. प्रत्येक वेळी फोनवरील,‘इकडे कधी येताय?’ या बाबांच्या प्रश्नाला टाळताना त्याची दमछाक होई. त्याच्याकडे याचे उत्तरच नव्हते.
केदार आणि त्याची पत्नी तनया गेली दहा वर्षे अमेरिकेत स्थायिक झाले होते. नोकरीच्या निमित्ताने आलेल्या केदारने स्वतःचा व्यवसाय सुरू करूनही आता काही काळ लोटला होता. तनयाही त्याच्या सोबतच काम करत होती. तिथली प्रचंड वेगवान जीवनशैली, अहोरात्र चालणारी शर्यत आणि स्पर्धेत टिकून राहण्याच्या गरजेबरोबरच व्यावसायिक यशाची न संपणारी भूक, या सगळ्यात त्यांची अशक्य धावपळ होत होती. कौटुंबिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांच्याकडे कशाचीही कमतरता नव्हती. बोस्टनच्या उच्चभ्रू भागात स्वतःचे प्रशस्त घर, दोन आलिशान गाड्या, सुसज्ज गॅजेट्स आणि उत्तम बँक बॅलन्स; पण तरीही, या भौतिक समृद्धीच्या अथांग सागरात राहूनही त्यांच्या घरातील नात्यांचा ओलावा आटत चालला होता. हे कुठेतरी जाणवत होतं; पण नेमका मार्ग कळत नव्हता, नव्हे काय होतंय हे समजून घेण्याएवढा वेळच दिला जात नव्हता.
अशातच नीलच्या शाळेतील सायकॉलॉजिस्टची आलेली मेल ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरली होती. मुलगा नील आता सात वर्षांचा झाला होता. त्यांनी लिहिले होते, हल्ली नील वर्गात अचानक प्रचंड आक्रमक होत होता. घरीही तो कोणाशीही नीट बोलत नसे, तासन्तास मोबाईल, आयपॅड आणि व्हिडिओ गेम्सच्या स्क्रीनमध्ये गुंग असायचा. त्याच्यात सहानुभूती, वेदना समजून घेणे सोडाच; पण नात्यांचे साधे भानही उरलेले दिसत नव्हते. शेअरिंग ही कल्पना तर त्याला ठाऊकच नव्हती. अमेरिकेसारख्या प्रगत, अति-व्यक्तिवादी आणि उपभोगवादी समाजात लहानाचा मोठा होणारा नील हळूहळू एका विलक्षण आणि भयावह एकाकीपणात शिरत चालला होता. तिथे तंत्रज्ञानाचा विस्तार अफाट होता, भौतिक सुखसोयी विपुल होत्या; पण माणसाला आतून शांत करेल, असा मानवी संवादाचा आणि जिव्हाळ्याचा दुष्काळ होता. आई-बाबा सोडता नीलला बाकी माणसांचा फारसा सहवास लाभत नव्हता, आणि आईवडीलही त्यांच्या त्यांच्या कामात गुरफटलेले. त्यांचे क्लायंट्स जगभरात पसरले असल्याने त्यांच्या कामाच्या वेळाही अनिश्चित. मोकळा वेळ असा फारसा मिळत नव्हताच. जो काही मिळे त्यातही सो कॉल्ड ‘मी टाइम’, व्यक्ती स्वातंत्र्याचे अवाजवी खूळ हे होतेच. मुलाच्या परवानगीशिवाय त्याच्या खोलीत जाणं, डिस्टर्ब करणं, हा मागासलेपणा समजला जात असल्याने संवादच खुंटल्यासारखा झाला होता.
‘केदार, आपण खरंच कुठे चुकतोय का रे?’, रात्रीच्या जेवणानंतर डायनिंग टेबल साफ करताना तनयाने अत्यंत गंभीर आवाजात विचारले. त्यात असलेली काळजीची किनार केदारला जाणवली. नील आपल्याशीही धड बोलत नाही. दिवसभर फोन किंवा गेमिंग कन्सोल. त्याला ‘कुटुंब’ म्हणजे काय, हेच समजेनासे झाले आहे. त्याला स्वतःव्यतिरिक्त कोणाचेच अस्तित्व जाणवत नाही. शेजारी कोण राहते, कोणाला काय त्रास होतोय, याच्याशी त्याला काहीही देणेघेणे उरलेले नाही.
सा. विवेकच्या दीपावली विशेषांकातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
केदारने एक दीर्घ सुस्कारा सोडला. लॅपटॉपची स्क्रीन बंद करत तो म्हणाला,‘तनया, हा फक्त आपल्या नीलचा किंवा आपला एकट्याचा प्रश्न नाहीये. आज जगभरातल्या तथाकथित विकसित आणि समृद्ध देशांमध्ये हेच घडते आहे. तंत्रज्ञानाने माणसाला ग्लोबल बनवले, जग एका क्लिकवर आणले; पण माणसाचे मन मात्र अधिक संकुचित, स्वकेंद्री आणि एकाकी केले. डिप्रेशन, एंग्झायटी, कमकुवत होत चाललेली लग्नसंस्था, लहान मुलांमधील वाढती मानसोपचार तज्ज्ञांची गरज... या गोष्टी भीती वाटावी अशा वेगाने वाढत आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये या सर्व सामाजिक आणि मानसिक संकटांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत; पण भौतिकतेच्या चौकटीत त्यांना त्याचे उत्तर सापडत नाहीये.’
‘उत्तर आपल्या परंपरेत आणि संस्कृतीत आहे केदार’, तनया खिडकीबाहेर पाहत हळुवारपणे पण ठाम आवाजात म्हणाली...‘मी बराच विचार केला यावर. आपल्या भारतीय परंपरेतील ‘कुटुंब’ या संकल्पनेत ते उत्तर दडलेले आहे. आपण भारतात जाऊया काही दिवसांसाठी? ‘आनंद’ बंगल्यात राहूया आईबाबांसोबत. नीललाही जरा आपल्या मुळांची ओळख होऊ दे.’ कामाचा डोंगर उभा असतानाही नीलसाठी केदार तयार झाला.
***
पुण्यातील सदाशिव पेठेतील ‘आनंद’ बंगला म्हणजे माधवराव आणि सुमतीबाईंचा जगातील सर्वांत सुरक्षित, समृद्ध आणि उबदार कोपरा. माधवराव निवृत्त अर्थशास्त्राचे प्राध्यापक, सुजाण विचारवंत आणि सामाजिक कार्यात सतत सक्रिय असणारे व्यक्तिमत्त्व; तर सुमतीबाई म्हणजे मायेचा, वात्सल्याचा आणि गृहिणीपणाच्या सुजाण व्यवस्थापनाचा अक्षय स्रोत.
लाडका लेक आणि नातू येणार हे कळल्यावर दोघांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्याच वेळी केदारने जे काही सांगितले होते, त्याचा विचारही त्यांच्या मनात सुरू झालाच होता. आपल्याला वाटणारी काळजी येणार्या लेक-सुनेला कळणार नाही, याची दक्षताही त्यांनाच घ्यायची होती. आधाराला येणार्या पाखराला झाडाने आपली व्याकुळता दाखवून कसे चालेल?
दोन आठवड्यांनंतर लांबचा प्रवास करून जेव्हा केदार, तनया आणि नील पुण्यात पोहोचले, तेव्हा सुरुवातीचे काही दिवस नीलसाठी अत्यंत त्रासदायक आणि गुदमरवणारे गेले. बोस्टनसारखं हाय-स्पीड वायफाय तिथे नव्हतं, की तिथल्यासारखी प्रत्येक माणसाला स्वतंत्र, बंद खोलीही नव्हती. माधवरावांनी पहिल्या दिवसापासूनच घरात एक नियम लागू केला होता - संध्याकाळी सहा ते सात या वेळेत घरातील टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप आणि सर्व डिजिटल गॅजेट्स पूर्णपणे बंद राहतील.
पहिल्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता घरातील वायफाय बंद झाल्यावर नील चवताळलाच,‘धिस इज रिडिक्युलस! व्हॉट शुड आय डू नाऊ? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम?’,तो इंग्रजीतून मोठ्याने डाफरला आणि स्वतःच्या खोलीचे दार जोरात आपटून बंद करायला लागला. माधवरावांनी त्याला अडवले नाही किंवा ते त्याच्यावर चिडलेही नाहीत. ते शांतपणे त्याच्या खोलीजवळ गेले आणि म्हणाले,‘नील, तुझ्या ओरडण्याने वाय-फाय चालू होणार नाहीये. बाहेर चल, मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे.’
‘मला काहीही बघायचे नाहीये...’नील पुन्हा ओरडून म्हणाला.
‘फक्त पाच मिनिटं ये... नाही आवडलं, तर तू परत येऊन दारं-खिडक्या लावून बसू शकतोस’, माधवराव शांत आवाजात म्हणाले.
नील वैतागूनच त्यांच्यामागे बागेत आला. माधवरावांनी बागेतील वडाच्या झाडाजवळ असलेली पाण्याची नळी उचलून त्याच्या हातात दिली. ‘मी नळ चालू करतो. याची धार धर जरा त्या मुळांवर, आणि श्वास घे’, माधवरावांनी बोलता बोलता नळ सुरू केला.
उकाड्याने हैराण झालेल्या नीलने रागानेच तो पाईप हातात घेतला होता. मात्र कोरड्या मातीवर पाण्याचा फवारा पडताच मातीचा खमंग, ओला वास वातावरणात पसरला. अमेरिकेतल्या घराबाहेरही छान बाग होती; पण तिथे झाडे कशी उगवतात, लॉन कसे छाटले जाते, हे त्याने कधीच अनुभवले नव्हते. हे काम कोण करते हेसुद्धा त्याला ठाऊक नव्हते. कायम आपल्या खोलीत बंद! त्यामुळे नीलने असा वास कधी घेतलाच नव्हता. तो क्षणभर थांबला.
माधवरावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाले, ‘अमेरिकेत वायफाय स्पीड खूप असेल रे; पण हा मातीचा वास तिथल्या कॉम्प्युटरमध्ये मिळतो का?’नीलने काही उत्तर दिले नाही; पण त्याच्या हातातल्या पाइपची धार आता हळूहळू झाडाच्या मुळांवर स्थिर झाली होती. तो अचंब्याने झाडाच्या दोन-चार पारंब्या आणि जमिनीवर पसरलेल्या मुळांकडे पाहत होता. माधवराव म्हणाले,‘हे झाड बघतोयस? हे जे वरून खाली आलेलं दिसतंय ना त्याला पारंब्या म्हणतात. ही झाडाची मुळंच आहेत. या पारंब्या बघ कशा परत जमिनीकडे आल्या आहेत आणि त्यांनी पुन्हा जमिनीला घट्ट पकडून ठेवलं आहे. कितीही मोठं वादळ आलं, पाऊस आला, तरी हे झाड कधीही उन्मळून पडत नाही. का माहितीये? कारण याची मुळं जमिनीत खूप खोलवर रुजली आहेत आणि या पारंब्या त्याला सगळीकडून पक्का आधार देतात. आपलं घर आणि आपलं कुटुंब हे या वडाच्या झाडासारखं असतं, नील. त्यातली कुणीही व्यक्ती जगभरात कुठेही जाऊ दे; पण तिची मुळं जर कुटुंबात खोल रुजलेली असतील, तर जगातलं कोणतंही संकट तिला खचवू शकत नाही.’
माधवरावांचे सगळेच बोलणे कळण्याचे त्याचे वय नव्हते आणि समजही. तरी हे साधे पण आशयघन शब्द नीलच्या बालमनावर कुठेतरी कोरल्यासारखे झाले. पुढच्या काही दिवसांत माधवरावांनी त्याला रोज सकाळी बागेत झाडांना पाणी घालायला शिकवले, मातीचा सुगंध घ्यायला शिकवला. सुमतीबाईंनी त्याला स्वयंपाकघरात पोळ्यांच्या कणकेचे गोळे करायला, चकोल्यांसाठी पोळीवर कातणे चालवायला शिकवले आणि दिवाळीचा फराळ करताना छोट्या-छोट्या कामांत मदतीला घेतले. सायंकाळी तिन्हीसांजेला घरातील देवापुढे एकत्र बसून शुभंकरोती आणि रामरक्षा म्हणण्याची सवय लावली. सुरुवातीला अत्यंत अनिच्छेने आणि वैतागून हे सगळं करणारा नील हळूहळू त्या घरातील वातावरणातील जिव्हाळ्यात, सुगंधात आणि मोकळेपणात नकळत रमू लागला. दिवाळीत दारी लावलेला आकाशकंदील, तेवणार्या पणत्यांच्या ओळी आणि रंगीबेरंगी रांगोळीने तो हरखला. आजूबाजूला पसरलेला उत्साह, लगबग, खूप सारी माणसे, हे विश्वच त्याच्यासाठी नवे होते.
दिवाळीत एका रविवारी माधवरावांच्या घरी एक कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. केदारचे काका-काकू, त्यांची मुले-नातवंडे, माधवरावांचे जुने स्नेही आणि काही शेजारीपाजारी एकत्र जमले होते. दिवाणखान्यात गप्पांची मैफल रंगली होती. अनेक जण असल्याने विषयही वेगवेगळे निघत गेले. कोणी जागतिक अर्थव्यवस्थेवर बोलत होते, कोणी भारताच्या बदलत्या चित्रावर, तर कोणी संस्कृती आणि सामाजिक जबाबदारीवर. अमेरिकेत अनेक वर्षे व्यतित केलेल्या केदारला या दृश्याने पुन्हा एकदा अंतर्मुख केले. तो काकांशी आणि बाबांशी गप्पा मारत असताना म्हणाला,‘बाबा, आम्ही अमेरिकेत अतिशय उच्च दर्जाची लाईफस्टाईल जगतोय. तंत्रज्ञान, स्वच्छता, शिस्त सगळं काही आहे; पण तिथे ‘वैयक्तिक स्वातंत्र्य’ आणि ‘माय लाईफ, माय चॉईस’ या संकल्पनेच्या अतिरेकामुळे माणसे एकमेकांपासून इतकी दुरावली आहेत की, घराघरांत अतिशय वेगाने कौटुंबिक विघटन होतेय. नात्यांमधील बांधिलकी संपत चालली आहे. त्यामुळे डिप्रेशन, मानसोपचार तज्ज्ञांच्या पायर्या चढणं आणि पराकोटीचा एकटेपणा तिथे साथीच्या रोगासारखा पसरतो आहे.
माधवरावांनी चहाचा कप हातात घेत अत्यंत शांतपणे बोलायला सुरुवात केली,‘केदार, आज संपूर्ण जग एका अतिशय मोठ्या सांस्कृतिक आणि सामाजिक संक्रमणातून जात आहे. पश्चिमेने जगाला औद्योगिक क्रांती दिली, तंत्रज्ञान दिलं, भौतिक प्रगतीची शिखरं दाखवली; पण मानवी मन शांत कसं ठेवावं, नात्यांमधील ओलावा कसा टिकवावा आणि माणसाला माणूस म्हणून कसं जगवावं, याचं उत्तर पश्चिमेकडे नाही, ते पूर्वेकडे आहे. आज संपूर्ण जगाला कुटुंब म्हणजे काय ते समजावण्याची निकडीची गरज आहे. कुटुंब म्हणजे काही केवळ एकाच छताखाली राहणार्या तीन-चार माणसांची कायदेशीर संस्था नाही. ते सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांचं पहिलं आणि सर्वांत महत्त्वाचं व्यासपीठ आहे.’
माधवरावांचे शब्द केदारच्या आणि तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजत होते. माधवराव पुढे म्हणाले,‘आज वैश्विक स्तरावर दोन मोठ्या समस्या माणसाला गिळंकृत करायला निघाल्या आहेत, एक म्हणजे निसर्गाचा आणि पर्यावरणाचा र्हास, आणि दुसरी म्हणजे कुटुंबसंस्थेचा र्हास. कुटुंब तुटलं की समाजाचा पाया खचतो, समाज खचला, की राष्ट्राची नैतिक ताकद संपते. आपण जेव्हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ - संपूर्ण जग हेच एक कुटुंब आहे - अशी घोषणा देतो, तेव्हा त्याची खरी सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून होते, व्हायला हवी. घरात जर आदर, संवाद, त्याग, सहकार्य आणि सामंजस्य असेल, तर तीच वृत्ती घेऊन माणूस समाजात, देशात आणि विश्वात वावरतो. कुटुंब हे माणसाचं पहिलं संस्कार केंद्र आहे.’
तेवढ्यात नीलने धावत येऊन आजोबांच्या गळ्याला मिठी मारली. मागे त्याची चुलत-आते भावंडेही आलीच.
‘आजोबा! आजोबा! आम्ही आत्ता बागेत खेळत होतो तेव्हा वडाच्या झाडावर मला तुम्ही परवा दाखवलेला भारतदार.. कोणता, तो लाल पंखांचा पक्षी?’
‘भारद्वाज?’
‘हां, तोच. भारत.. द्वाज दिसला. मी या सगळ्यांना दाखवला तो. त्याची गोष्ट सांगाल ना रात्री?’
सगळ्यांच्या चेहर्यावर हसू उमटले. ज्या नीलच्या हातातून फोन आणि आयपॅड सुटत नव्हता, जो कोणाशी बोलायला तयार नव्हता, तो नील आता आजोबांच्या मांडीवर बसून गोष्टी ऐकण्यात, आजीच्या हातचे लाडू खाण्यात आणि इतर मुलांसोबत बागेत पकडापकडी खेळण्यात पूर्णपणे रंगून गेला होता. त्याच्या चेहर्यावरची आक्रमकता गायब झाली होती, आणि त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच आपुलकी आणि शांतता दिसत होती.
त्या रात्री गच्चीत तार्यांनी भरलेल्या आकाशाखाली तनया आणि केदार उभे होते. जरा गार वारे वाहत होते; पण त्यांच्या मनात एक उबदार समाधान होते.
‘केदार’, तनया म्हणाली,‘आपण अमेरिकेत नीलला उत्तम शाळा, महागडी गॅजेट्स, चांगला ब्रँडेड पोषाख, हे सर्व देत होतो; पण जे सर्वांत महत्त्वाचं होतं - आपली मुळं, आपले संस्कार, परंपरेची ओळख आणि कुटुंबाचा उबदार स्पर्श - तेच त्याच्यापासून हिरावून घेतलं जात होतं. बाबा म्हणतात ते किती शंभर टक्के खरे आहे ना? ग्लोबल सिटीझन (वैश्विक नागरिक) होण्याआधी माणसाला स्वत:च्या मुळांची, स्वतःच्या संस्कृतीची आणि कौटुंबिक मूल्यांची पक्की ओळख असावी लागते.’
‘अगदी बरोबर तनया,’ केदार भावुक होऊन उत्तरला...‘आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी आणि परंपरेने जगाला दिलेली ही सर्वांत मोठी देणगी आहे. कुटुंब ही मानवी जीवनाची सर्वांत मजबूत ढाल आहे. आपण अमेरिकेत परत जाऊ; पण आता आपल्या जगण्याची दिशा बदलेल. आपण तिथे केवळ पैसे कमावण्यासाठी किंवा भौतिक सुखाचा उपभोग घेण्यासाठी राहणार नाही. आपण तिथेही या घरासारखं वागण्याचा प्रयत्न करू. आपल्यासारख्या अनेक भारतीय आणि परदेशी मित्रांना एकत्र आणू. तिथल्या वातावरणात आपण भारतीय कुटुंबव्यवस्थेचा आणि मूल्यांचा दीपस्तंभ उभा करू. जगाला दाखवून देऊ, की प्रगती आणि कौटुंबिक मूल्ये एकत्र राहू शकतात.’
खाली दिवाणखान्यात मंद प्रकाश होता. सुमतीबाईंनी आणलेला गरम दुधाचा ग्लास हातात घेताना केदारने खिडकीतून आत पाहिले, दिवाणखान्यात माधवराव आणि नील जमिनीवर एकत्र बसून भारताचा आणि जगाचा नकाशा पाहत होते. आजोबा नीलला भारतातील विविध नद्या, पर्वत, संस्कृती आणि जगभरातील मानवी परंपरेची माहिती देत होते. नील डोळे मोठे करून आजोबांचे प्रत्येक वाक्य ऐकत होता.
जगाला ग्रासणार्या अति-भौतिकवाद, एकाकीपणा, मानसिक ताणतणाव आणि नात्यांच्या विघटनाच्या गंभीर आजारावर ‘समर्थ कुटुंब संस्था’ हे एक संजीवनी औषध आहे, याची केदारला पूर्ण खात्री पटली होती. भारताची ही कौटुंबिक जीवनशैली आणि विचारप्रणाली केवळ भारतापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण जगाला नव्याने मार्ग दाखवणारी ठरेल, हा दृढ विश्वास घेऊन तो आपल्या पुढच्या वैश्विक प्रवासासाठी सज्ज होत होता.
‘आनंद’ बंगल्यातील दिवा मंद पण ठाम प्रकाशाने तेवत होता. तो दिवा जणू बाहेरच्या जगभरातील अंधाराला सांगत होता की, जोपर्यंत घराघरांमध्ये संवादाचा, संस्कारांचा आणि नात्यांचा हा प्रकाश जिवंत आहे, तोपर्यंत मानवी संस्कृती कधीही पराभूत होऊ शकत नाही.
‘बाबा,’ केदारने खोलीत येत विचारले,‘आम्ही बोस्टनला परतल्यावर तिथल्या आपल्या मित्रपरिवारासाठी कुटुंब प्रबोधनाचे छोटे वर्ग किंवा उपक्रम सुरू केले, तर कसं वाटेल?’
माधवरावांनी नीलच्या डोक्यावरून हात फिरवत केदारकडे पाहिले आणि त्यांच्या चेहर्यावर एक तृप्त हास्य उमटले.
‘केदार, हीच तर काळाची गरज आहे. स्वानुभवातून केलेलं काम तर लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवता येतं. तू जर तिथल्या भारतीय आणि परदेशी मित्रांना एकत्र आणून आपल्या कौटुंबिक मूल्यांची ही ऊब दिलीस, तर तिथेही हजारो ‘आनंद’ उभे राहतील.’
‘हो बाबा’, केदार ठामपणे म्हणाला,‘आम्ही पश्चिमेच्या तंत्रज्ञानाला नक्कीच आपलंसं करू; पण आपल्या या कौटुंबिक मुळांना आणि संस्कारांना मात्र कधीही दुरावू देणार नाही. पौर्वात्य संस्कृतीतील कुटुंबाचे हे महत्त्व तिथे सांगण्याचा, पटवण्याचा नक्की प्रयत्न करू. नात्याच्या रेशीमबंधाने घट्ट विणलेल्या कुटुंबाच्या शक्तीची कल्पना देऊ. आमच्या परीने जेवढे होईल तेवढे नक्की करू.’
बाहेर आकाशात चंद्र उगवत होता. शीतल चांदणे ‘आनंद’च्या संपूर्ण आवारात पसरले होते. घर तेच होते, माणसे तीच होती; पण त्या घरातील नात्यांचे धागे आता कायमचे घट्ट विणले गेले होते. कौटुंबिक जिव्हाळ्याची ही नवी पहाट घेऊन केदार, तनया आणि नील आता एका नव्या, समृद्ध प्रवासासाठी सज्ज झाले होते.