@सुरेन्द्र पाटील
9423234927
गुबाळला गेलो की, राजाकडे चक्कर ठरलेली. त्यामुळे त्याच्या आईशी-अक्काशी आपोआप नातं जडलं. मायेनं भरलेली टिच्च विहीरच जणू गुबाळची अक्का! राजाला लय बोलका समजायचो मी, मात्र अक्का त्याहून चार काकणं पुढची. हसतमुखानं बोलायची. आम्ही दोस्तलोक गुबाळला गेलो की, अक्काला आधी नमस्कार करायचो...अक्का आमच्या तोंडावरुन हात फिरवणार, कानशिलाजवळ ते मोडणार, गळा लावून घेणार. ममता-अगत्यानं अक्का अशी काठोकाठ भरलेली.
बाळचा राजा आमच्या गावच्या सूर्यकांत शिंदे यांचा भाच्चा. लामजन्याला मामाकडंच शाळेसाठी म्हणून राहिलेला. माझ्या चुलत्याचा अन् राजाचा स्वभाव जुळायचा, त्यांचं दुकान सांभाळायला राजा नेहमीच तयार असायचा...राजा शाळंतबिळंत हुषार-चाणाक्ष नव्हता. म्हणून तर काही काळ गेल्यावर राजा स्वत:च्या गावी गुबाळला शेतकी शाळेत गेला; पण तोपर्यंत आमच्याशी नाळ जोडली होती त्याची...मग आमच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमात त्याची हजेरी असायची, असते.. खरं सांगायचं तर, बोलक्या राजाचं मैत्र सार्या लामजना गावाशी. अनेकांना राम राम म्हणणारा राजा सर्वांच्या जिभेवर असायचा!!
अंगद सगरला देवताळ्याला शिक्षकाची नोकरी लागल्यावर राजानं आपली दोन्ही लेकरं त्याच्याकडं शिकायला ठेवली. आणि राजा आमच्या आणखी जवळ आला...अशोक, लक्ष्मण, अंगद, उद्धव हे आम्ही सर्व दोस्त नोकरीत; राजा गावात किराणा दुकान लावून, संसार वढीत बसलेला!
राजाचं गुबाळ हे गाव. ते माझी मधली बहीण दिलेल्या सास्तूरजवळ आहे. त्याचीही माझ्या भावजीशी चांगली सलगी. गुबाळचे लोक सास्तूरला बाजार करायला जायचे. राजा भावजीच्या व्हिडिओ थिएटरमध्ये सिनेमा बघायला गेला की, तिकडचा निरोप घेऊन यायचा,’तुजे भावजी मला सिनेमाचे पैसे घेतनीत!... आन च्या पाजिवल्याबगर सोडतबी न्हाईत,’ असं कौतुकानं सांगायचा.
गुबाळला गेलो की, राजाकडे चक्कर ठरलेली. त्यामुळे त्याच्या आईशी-अक्काशी आपोआप नातं जडलं. मायेनं भरलेली टिच्च विहीरच जणू गुबाळची अक्का! राजाला लय बोलका समजायचो मी, मात्र अक्का त्याहून चार काकणं पुढची. हसतमुखानं बोलायची,
’येत जावा ये माय गुबाळला.. तुमी आलो की घर भरल्यावनी वाटतंय.’
आम्ही दोस्तलोक गुबाळला गेलो की, अक्काला आधी नमस्कार करायचो...अक्का आमच्या तोंडावरुन हात फिरवणार, कानशिलाजवळ ते मोडणार, गळा लावून घेणार. ममता-अगत्यानं अक्का अशी काठोकाठ भरलेली. ठसठशीत कुंकू लावणार्या अक्काला नऊवारी लईच शोभायची. लामजनहून आलेल्याचा ती दणदणीत पाहुणचार करणार.. जाणार्यानं चार घास खायला नको म्हणलं, तर चहा पिल्याशिवाय तिच्या तावडीतून सुटका नसायची.. अक्काचा ठरलेला प्रश्न माझ्या मायीविषयी असायचा-
’सुमा पाटलीन कशाय य आता?’
’बरी हाय. जरा गुडघे दुखतेत. बाकी बरीय.’
’वयोमानानुसार ते आता येतंयच बग...जप तिला, जुनं खोड हाय! लय मोठ्या हाताची लामजन्याची पाटलीन हाय ती! ’
लामजन्याचं नाव काढलं की अक्काच्या डोळ्यांत वेगळीच चमक यायची. ’माजं माहेर तेवढं टिकून हाय, म्हणून तर मनाला आधार हाय,’ असं म्हणत ती लामजन्याच्या आयाबायाच्या सुख-दुःखाची चौकशी करायची.
अक्का कधी कुणावर संतापलीय, असं कधी दिसलंच नाही.. तिच्या घरात पाऊल ठेवलं की, हसतमुखानं,‘या, पाये धिवा,’ म्हणत आम्हाला कुठं ठेवू अन् कुठं नको असं तिला होई. डोईवरचा पदर नीट करत घरात ओरडे,
’लामजन्यावून पोरवं आल्यात!.. मायव, कशी काय वाट चुकली की!.. कायतरी गोडधोड करा य. माज्या माहेरची आख्खी फलटण आल्याय!’, मग अक्का स्वयपाकघराकडं बघत एकामागोमाग एक हुकूम सोडायची.
भूकंपात डोक्यावर माळवदातली छावणी निसटली आणि ढेळजेत झोपलेला कर्ता तरुण रावसाबचा त्यात बळी गेला. रावसाबनं गणपतीचं उशीरापर्यंत चाललेलं विसर्जन केलं नि थकून ढेळजेत झोपला. नंतर उठलाच नाही म्हणे. अक्काचं घरच कोसळून पडलं असणार...भूकंपानं आम्हीही रस्त्यावर होतो, पण घरात कुणी दगावलं नव्हतं. गुबाळच्या रावसाबची बातमी समजल्यापासून जीव तुटत होता. दिवस वाईट आले होते...खालून बारीक मोठे धक्के सुरूच होते. तिसर्या दिवशी आम्ही दोस्त लोक मोटरसायकली घेऊन राजाकडे निघालो.
रावसाब हातात कुदळ-फावडं घेऊन रानात निघाला की शिवार गजबजून जायचं. ’दादा, तू दुकानात बस, शेतीचं मी बघतो,’ असं हसून सांगणारा रावसाब घराचा खरा खांब तर होता... मला तो भोळा रांगडा रावसाब आठवत होता.
गुबाळमध्ये पोचलो. गुबाळचं पडक्या ढिगार्यात रुपांतर झालेलं. भूकंपाची दहशत पसरलेली. लोकं पडक्या घराच्या ढिगाभोवती फिरत होती. शासनाने तंबूमध्ये लोकांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था केलेली... मदत घेऊन आलेल्या वाहनांची गावात दाटी झालेली. भूकंपानंतर चोवीस तासांनी पाऊस चालू झाला होता. टिव्ही रेडिओवर भूकंपाशिवाय काही नव्हतं.
गुबाळच्या उदास माळावर शासनाने तात्पुरते तंबू उभारलेले. ते काम अजूनही चालू होतं. आभाळ भरुन काळं-जांभळं झालेलं. कोणत्याही क्षणी मोठा पाऊस येणार असं वाटत होतं. भूकंपानं गावच्या पूर्वीच्या खाणाखुणा पुसून टाकलेल्या.
विचारत विचारत राजाचं तंबूवजा घर शोधून काढलं. तंबूच्या छोट्या दारातून सगळे आत गेलो. डोळे लाल झालेली अक्का झरे आटून गेलेल्या कोरड्या आडासारखी वाटली. राजा आणि त्याचा भाऊही आटून गेल्यावनी झालेले. मोटाड स्वभावाचा रावसाब आमचं खूप अगत्य करायचा. शेतीचा डोलारा त्यानेच खांद्यावर घेतलेला.. राजा तसा शेतात पाऊल ठेवायचा नाही. त्याच्या जाण्यानं अक्काच नव्हे जणू अख्खं घरच भंगल्यालं.. आम्हाला बघताच अक्काचे डोळे वाहू लागले. उदास झालेली अक्का बोटं मोडत बोलली,
’त्या कडू भूकंपानं माज्या रावसाबला गिळलं रं, पोरवानो.. मुडदा बसिवला त्येचा..’
आम्हाला अक्काला समजवता येत नव्हतं. तिच्या वेदनेला पोकळ शब्दांनी टाके कसे घालणार?.. तरीही आम्ही बोलत होतो. त्या तंबूत तिचं, तिच्या सुनांचं अंग चोरुन राहणंही बघवत नव्हतं.. आभाळच फाटलेलं, अन् जमीन अशी बेईमान झालेली.
’ए आक्का, खंबीर हो. कितीबी रडलं तर रावसाब वापस येणार न्हाई. आक्का, पोरवाला तूच धीर द्यावं लागतंय.’ आमच्यातलं कुणीतरी बोललं..पण अक्का आणि तिच्या कुटुंबाचे हुंदके थांबेनात.. राजाला,‘सगळ्याची काळजी घे,’ म्हणून नाईलाजाने आम्ही तिथून गावाकडे निघालो. रस्त्यात पावसानं गाठलं. वारा पाऊस एक होऊन कोसळत होता. एखादा धक्का खालून आला की जीव गळ्याला येई.
काळाचा गाडा पुढे सरकला...अक्का कंबर कसून उठली. रावसाबचं दु:ख तिनं गटगट गिळून टाकलं. रावसाबच्या जाण्यानं ढासळलेला संसार तिनं स्वतःच्या दुःखाला गाडून पुन्हा उभा केला. अश्रू पुसत ती पोरांना सांगायची,’गेल्याला गेला, हातपाय गाळून बसायचं न्हाई. पर म्हागं राहिलेल्यापाई आपल्याला लढाया फायजे.’
पोरं मार्गी लावून नातवांची लग्न लावली तिनं. अक्का भजनात जाऊन राम कृष्ण हरीचा गजर करू लागली.. तिथंच मन रिझवून आनंदाचा झरा शोधायचा तिचा प्रयत्न होता.
’राजा, गुबाळात आलोय. चौकात थांबलोय.. लामजन्याकडं निघालोय.’
’आरं, मंग नीट घरी ये की. आक्काला भेटतनीस का?.. गावात यिऊन फोनवर बोलतूस का?.. शाणा झालास काय की!’
’करोना पसरलाय की बाबा. उगाच घरी नको. तूच ये. थांबलोय मी.’
कोरोनाच्या लाटेत गुबाळवरुन पुढे बहिणीच्या गावी सास्तूरला जाताना राजाबरोबर फोनवरुन संवाद झाला...घरी गेलं तर अक्का जेवण घातल्याशिवाय सोडणार नव्हती. म्हणून एका कोपर्यावर थांबलो. तिथूनच राजाला भेटायला बाहेर बोलावलं. राजाचं गाव ओलांडून माझ्या मधल्या बहिणीकडे - सास्तूरला जायचा रस्ता पक्का रस्ता झाला होता... पुनर्वसनात गुबाळचाही कायापालट झालेला.. गावानं शहरी कात चढवल्यासारखं झालेलं.. अनेक रंगीत डिजिटल फ्लॅक्स गावच्या टपर्यावर, झाडावर दिसत होते. राजाचं किराणा दुकानही चौकातच होतं. लॉकडाऊनमुळं गावात स्मशान शांतता पसरलेली.. दुरुन हातात मोबाईल घेऊन येताना राजा येताना दिसला.
कोरोनानं परेशान होतं वातावरण. रेडिओ, टीव्ही, मोबाईल सगळीकडे तीच चर्चा...सॅनिटायझरने हात धुवा. मास्क घाला. सर्दी झाली तर तपासणी करा, वगैरे ऐकून डोकं फिरलेले. गावातले व्यवहार बंद होते. आज एवढे माणसं गेले हे आकडे तर होतेच.. नाकातोंडाला मास्क लावून जीव मुठीत घेऊन होती गावंच्या गावं.. रस्ते मोकळा श्वास घेत होते.
राजा मास्क घालून आला. अक्का, पोरंबाळं सर्व ठीक आहेत का विचारलं... काळजी घे, म्हणून सांगत होतोच तर धडधडत पोलीसाची मोटरसायकल आली.. त्यानं आम्हाला तिथून हाकललं. राजाही घराकडे गेला. राजाला परस्पर भेटून गावी गेल्यावर रात्री राजाचा फोन आलाच. आक्का व्हिडिओ कॉलवर होती,
’घरी काबरं येयला न्हाईस? दोस्ताला भेटलास, त्येच्या मायला भेटुनी का रं!..’ तेव्हा मीच काय सारं जग सोशल डिस्टन्स पाळत होतं. अफवांचे पेव फुटलेले. फिरणं अवघड झालेलं. म्हणून मी घरी जायचं टाळलेलं. मी अक्काला समजवून सांगितलं.
’आसं हाय व्हय! त्या करोनानं माणसा माणसात फटी पाडलं माय. राम क्रिश्न हारी!.. जपून राव्हा वाघानो..’
सोशल डिस्टन्स अक्कानं कधी पाळलाच नाही. राजानं सहज फोन केला की, अक्काही मध्येच आमच्याशी संवाद साधायची... राम कृष्ण हरि या वाक्यानं सुरुवात करून,‘बरे तर हाव की,’ म्हणायची.. माझ्या मायीच्या तब्येतीची चौकशी करायची. आम्हा सर्वांची ती सारखं आठवण काढायची.
करोनाची दुसरी लाटही ओसरुन गेली.. दोन वर्षापूर्वी ब्याऐंशी वर्षाची आक्का बाथरुममध्ये पाय घसरुन पडली.. फंगल इन्फेक्शन झालं.. ’ती तुमा सगळ्याला घोकू लाल्याय, यिऊन तिला भेटून जावा,’ असा राजाचा फोन आलेला. तिला बघायला गुबाळला जायचं ठरवलंही होतं.. पण अक्कानं घाई केली. अक्का जाण्याला बाथरुममध्ये पडल्याचं एकच निमित्त पुरलं. अखेर अक्का गेली.
तिच्या अंत्ययात्रेत गेलो.. गर्दीनं गुबाळ भरलेलं. अक्काला गोतावळा दांडगा होता.. राजानं फार चांगले घर बांधलेय. ते बघताना तंबूतली रावसाबसाठी व्याकुळ अक्का आठवली... अक्काला भिंतीला टेकून बसवलं होतं. रडारड चालू होती. वारकरी अभंग आळवत होते. ताटात आरती जळत होती. उदबत्त्याचा धूर पसरलेला. गळ्यातल्या हाराच्या राशीवर मी अजून एक हार चढवून परत फिरलो. एका झाडाखाली सगळी दोस्त थांबलो. मोबाईलच्या स्टेटसवर अक्काचे फोटो दिसले. गुबाळमध्ये बॅनरवरही तिला श्रद्धांजली वाहिलेली दिसली.
’माज्या माहेरची फलटण आल्याय... कायतरी गोडधोड करा य!’ अक्काचे मायेचे शब्द डोक्यात घुमायला लागले... लोकांनी घातलेल्या हारांमधे अक्काचा अर्धा चेहरा दडून गेलेला.
गुबाळमधे आमच्या तोंडावरुन हात फिरवणारं, गळा लावून घेणारं सावलीचं झाड कोसळलं होतं...
’राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.’ आवाज येत होता; पण अक्काच्या तोंडून नव्हे, वारकर्यांच्या तोंडून.