विश्वाचं मूळ आनंद आहे आणि तो आनंद आपल्या आत आहे हा दिलासा किती मोलाचा आहे ना! भले त्याच्यापर्यंत पोचायचा मार्ग आपल्याला आत्ता माहिती नसेल किंवा त्या मार्गावर आपली वाटचाल अगदी कूर्मगतीनं होत असेल पण जे शाश्वत आहे, सत्य आहे आणि जे ज्ञेय आहे, समजून घ्यावं असं आहे ते आनंदरुप आहे हे फार छान आहे! हेच आनंदनिधान ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीत जाणवते. ज्ञानदेवांच्या उन्नत प्रतिभेला समाज केवळ ज्ञानी करायचा नव्हता तर त्याला शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवायचा होता.
ज्ञानेश्वरी वाचताना मनाला जो अपार आनंद होतो तो आनंद वाटून घ्यायचा हा प्रयत्न. कारण ज्ञानेश्वरी हे खरोखरच आनंदाचं निधान आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ गीतेचा अनुवाद नाही.ज्ञानदेवांच्या उन्नत प्रतिभेला समाज केवळ ज्ञानी करायचा नव्हता तर त्याला शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवायचा होता. तुम्हाला यातून खूप आनंद मिळणार आहे म्हणून तुम्ही हे ऐका असं श्रोत्यांना ते सांगतात आणि अगदी गहन तत्वज्ञान छोटे छोटे घास करुन भरवतात. सुरुवातीलाच श्रोत्यांना म्हणतात,
अहो अळुमाळ अवधान देयावें।
येतुलेनि आनंदाचे राशीवरी बैसावें।
बाप श्रवणेंद्रिया दैवें। घातली माळ॥ 9-534
या श्लोकापूर्वी संजयाच्या अवस्थेचं वर्णन आहे. संजय हे पहातोय की, हे गुह्य ज्ञान मिळवण्याची, या आनंदनिधानाला हस्तगत करण्याची सोपी युक्ती श्रीकृष्णाने सांगितली - मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु. माझ्या ठायी मन ठेव, माझी भक्ती कर आणि मला नमस्कार कर म्हणजे तू मीच होशील! हे ऐकताना संजयाच्या अंगावर रोमांच उभे राहिलेत! आपल्या
अंतःकरणातील रहस्य कृष्णानं पार्थाहाती ठेवलंय आणि मीही याचा साक्षी आहे या भाग्याच्या कल्पनेनं संजयाचे अष्टसात्विक भाव जागे झालेत. रोमांच्याच्या तळाशी घर्मबिंदू जमलेत आणि त्यामुळं तो शरीरावर मोत्यांची जाळी परिधान केल्यासारखा दिसतो आहे. तो त्याचं कामच विसरलाय. आता संजयाच्या अष्टसात्विक भावांची भूमी आणि त्यात श्रीकृष्ण वचनांची बीजं मग श्रोत्यांच्या मनात अर्थाची भरघोस पिकं डोलतीलच! त्यामुळं तुम्ही थोडंसं अवधान द्याल तर त्या पिकातून येणार्या ज्ञानरुपी आनंदाच्या राशीवर तुम्ही बसाल. हे तुम्ही करावं म्हणून तुमच्या श्रवणांनी तुम्हाला माळ घातली आहे! विनंती केली आहे आणि ज्ञानोबा आपल्याला राशीवर नुसतं बसवत नाहीत खुशाल लोळा म्हणतात!
जयाचेनि उजाळें। उघडती बुद्धीचे डोळे।
जीवु दोंदावरी लोळे। आनंदाचिया॥ 13-173 ॥
ज्ञानेश्वरी हे काव्य म्हणायचं की तत्वज्ञान हा नेहमीच वादाचा विषय असतो. पण ज्ञानेश्वरीतले उच्च कोटीचे काव्यगुण कुणीच नाकारत नाही. काव्य हा कवीचा अनुभव असतो असंही म्हटलं जातं. ज्या प्रकारची ऐश्वर्यसंपन्न आणि नकारात्मकतेचा लवलेशही नसणारी भाषा ते वापरतात त्याच्याशी वस्तुतः त्यांचे अनुभव किती विसंगत आहेत! इथं ही ओवी वाचताना वाटलं की त्या सिद्धबेटावरच्या लहानशा झोपडीत, त्या अभावाचंच राज्य असणार्या कुटीत, मातेच्या मांडीशिवाय लेकरांना निजवण्याजोगे काहीच मऊ अंथरुण नसेल त्यामुळेच आईच्या मांडीवर लोळण्याचं अपार सुख त्यांनी भोगलं असेल. आत्मज्ञान म्हणजे असं ज्ञान ज्याच्या प्राप्तीमुळं बुद्धीचे डोळे उघडतात आणि जीव त्या शुद्ध आनंदाच्या राशीवर लोळू लागतो! हे ज्ञान मिळतं गुरुकृपेमुळं.
तिला उद्देशून म्हटलंय ..जय जय वो शुद्धे। उदारे प्रसिद्धे।
अनवरत आनंदे। वर्षतिये॥ 12-1 ॥
गुरुकृपादृष्टी शुद्ध आहे, स्वयंसिद्ध आहे. अतिशय उदार म्हणून विख्यात आहे. अशा गुरुकृपेचा जयजयकार करत आहेत. ती कृपा आपल्यावर अविरत आनंदाचा वर्षाव करत असते. या कृपेला ज्ञानेश्वरांनी माउली स्वरुपात पाहिलंय त्यामुळं पुढच्या सगळ्या ओव्या या म्हणजे जणू मायलेकरांच्या सर्वोच्च आनंदक्षणांच्या साक्षी असलेल्या ओव्या आहेत. नेहमी विचार येतो की ज्ञानेश्वरांना एवढी कटुता सोसावी लागूनही असा कोणता आनंद त्यांना सापडला असेल की जो ज्ञानेश्वरीभर असा स्निग्धपणे झिरपत राहिला आहे? ज्ञानेश्वरांच्या माउलीनं सिद्धबेटावर एकटीच्या हिमतीवर चार लेकरांचा संसार चालवला त्याला तिच्या साधनेतून मिळालेल्या आत्मबळाचा आनंदाचा आधार होता. म्हणूनच त्या सिद्धबेटावरच्या शुद्ध निरालंब आनंदाचा अनुभव त्यांच्या मनात रुजला असणार.पित्यानं गीता तत्वार्थ सांगितला. अद्वैतवाद, वेद, उपनिषदे सारं ज्ञान दिलं तर मातेनं दैन्यालाही दिव्यत्वाचा स्पर्श दिला. साध्या तृणारात तिनं स्वर्गसुखाची आरास उभी केली असेल. निर्मळ मनानं, निर्लोभ संसारात निर्भय, निरपेक्ष, निःस्वार्थी प्रेम दाखवलं असेल. ‘आत्मसुखाची बाळलेणी लेववणारी, अनाहताची अंगाई गाणारी, समाधीबोधात निजवणारी, आत्मज्योतीने ओवाळणारी, सतराव्या जीवनकलेचे स्तन्य देणारी अशी गुरुकृपारूपी माउली’ हे वर्णन वाचताना ज्ञानदेवांची आईच पुन्हा पुन्हा मनःचक्षूंसमोर येते!
कां चैतन्यांचिये पोवळी-।
माजीं आनंदाचां राउळीं। गुरुलिंगा ढाळी।
ध्यानामृत॥ 13-386॥
गुरुभक्तीच्या अनेक रीती सांगितल्यात त्यातली ही एक. आपल्या आतील चैतन्याच्या पोकळीत आनंदाचं देऊळ असतं आणि त्याच्या गाभार्यात असलेल्या श्रीगुरुरूपी शिवलिंगाला आपण ध्यानाच्या अमृताचा अभिषेक करतो! आत मनगाभार्यातही आनंदाचं राऊळ आहे आणि बाहेर तर काय सगळं आवारच आनंदानं भरलेलं आहे! आणि जे अशा आनंदाचे धनी होतात ते अन्य लोकांनाही हा आनंद वाटतात तो कसा तर
परी राया रंका पाड धरूं।
नेणती सानेयां थोरां कडसणी करूं।
एकसरें आनंदाचें आवारु। होत जगा॥ 9-202 ॥
जे महापुरुष माझ्याठायी एकरुप झाले व जे सतत योगयुक्त राहून माझी उपासना करतात त्यांच्या नामसंकीर्तनामुळं पापाचं अस्तित्वच नाहीसं केलं. ते राजा रंक लहान थोर असा भेद न करता सार्यांनाच आनंदमार्गावर घेऊन जातात. सारं विश्व आनंदाचं आवार करुन टाकतात. अर्जुनाचा आनंद तर त्रिगुणित झाला आहे. तो म्हणतोय-
तुझें नामचि आम्हां आवडे।
वरि भेटी होय आणि जवळिक जोडे।
पाठीं गोठी सांगसी सुरवाडें। आनंदाचेनी॥ 10-200 ॥
विभूतीयोगात ‘नुसतं मला मी सगळ्यात आहे असं सांगू नको, मला तुझ्या सर्व विभूती सांग’ असं श्रीकृष्णाला विनवताना अर्जुन हे म्हणतोय. तुझं नुसतं नावसुद्धा आम्हाला आवडतं. त्यात साक्षात तू समोर सगुण साकार आहेस, शिवाय तुझे सर्वकाळ सान्निध्य मला लाभत आहे आणि त्यात तूच तुझ्या निर्गुण रुपांविषयी गुरु म्हणून आनंदानं मला सांगणार आहेस हा आनंद किती घेऊ असं अर्जुनाला होतंय. या अमृताची गोडी पुन्हापुन्हा चाखूनही समाधान होत नाहीये. त्यामुळं तू कशाकशात आहेस ती सगळी नावं मला ऐकव असा आग्रह तो धरतो. पुढे विश्वरूप दर्शनाच्या प्रसंगी तर अर्जुन डोळ्यानं श्रीकृष्णाची अनंत रूपं पहातो .
कीं आनंदाची वनें सासिन्नलीं।
जैसी सौंदर्या राणीव जोडली।
तैसीं मनोहरें देखिलीं।
हरीचीं वक्त्रें तेणें॥ 11-198 ॥
विश्वरूप दर्शनाचं वर्णन तर परमानंदाची पखरणच आहे. श्रीहरीची असंख्य मुखे म्हणजे आनंदाचे वने तरारलीत, आनंदाचे मळे फुललेत, सौंदर्याला राजेशाही दिमाख प्राप्त झालाय अशी ती मनोहर मुखं त्यानं पाहिली. आणि असं करताना काय अवस्था झाली की
आंतु आनंदा चेइरें जाहलें।
बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें।
आपाद पां गुंतलें। पुलकांचलें॥ 11-246 ॥
आतल्या आनंदाला भरतं आलंय, ब्रह्मानंद मनातून दुथडी भरभरुन इतका वहातोय की इतका अपार आत्मानंद त्याच्या नश्वर शरीराला पेलवेनासा झालाय! त्याच्या गात्रांचं बळच हरवलंय.आपादमस्तक त्याच्या अंगावर रोमांचांनी नुसती दाटी केलीय! अर्जुन पुलकित झाला आहे. आतल्या आनंदाच्या लाटांनी तो थरथरु लागलाय.
परी येतुलियाही वेगळा। जो केवळ आनंदैककळा।
तया अंतरात्मयाही निश्चळा। शियारी आली ॥ 11-369 ॥
पण अर्जुनानं हट्ट करुन त्याची आनंद रुपांपाठोपाठ आलेली सारी भेसूर रूपंही पाहिली तेव्हा मात्र त्याला कुठून आपल्याला ही बुद्धी झाली असं झालं. तो म्हणू लागला की माझं शरीर, मन, बुद्धी यांना तर भयानं ग्रासलंच पण माझ्या आत जो आनंदाचा कळा फुलत होता त्याला, म्हणजे माझ्या अंतरात्म्यालाही आता भयानं ग्रासलं आहे! आणि मग ‘आता पुरे, आता मला तूच यातून सावर’ असंही तो म्हणतोय. आणि मग पुन्हा ते त्याचं सौम्यश्यामल प्रसन्न रुप पहाताना अर्जुन पुन्हापुन्हा त्या रूपाचं वर्णन करतो..
जैसा परिमळ जाहला मरगजा।
कां आनंदासि निघालिया भुजा।
ज्याचे जानुवरी मकरध्वजा।
जोडली बरव॥ 11-601 ॥
तो कसा दिसतो तर नीलोत्पल श्यामसुंदर असा तो पाचूच्या रत्नाला सुगंध येऊ लागला किंवा साक्षात आनंदालाच जर बाहू अवयव फुटले तर तो कसा दिसेल, तसा त्याच्या मांडीवर खेळल्यामुळं साक्षात मदनाची शोभा वाढली, असा तो रमणीय आहे. आता तो कसं सारं आनंदमय करेल पहा.
आतां आनंदमय आघवें। विश्व कीजेल देवें।
तें रायें परिसावें। संजयो म्हणे॥ 13-1153 ॥
ज्ञानदेवही म्हणतात चला आपणही आनंदानं अंगण भरु!
तैसा वाग्विलास विस्तारु। गीतार्थे विश्वभरु।
आनंदाचे आवरुं। मांडू जगा॥
गीतेनं खरा सांगितला तो आत्मयोग. गीता ऐकल्यानं काय साध्य झालं याचं उत्तर ‘युद्ध जिंकलं’ हे नाही! अर्जुनाला आत्मज्ञान झालं का, त्याला शाश्वत आनंदाचा मार्ग सापडला का? त्याच्या प्रश्नाच्या निमित्तानं कृष्णानं त्याच्या प्रिय सख्याला आनंदाचं दर्शन घडवलं. शाश्वत सुखाच्या प्राप्तीचा मार्ग सांगितला. शोकमोहाच्या पलिकडचा आनंदाचा प्रदेश त्याला खुला केला. आणि मग,
तेथे निजानंदा बहुवसा।
माजी अर्जुन तो सहसा।
हरपला चंद्रु जैसा। चांदणेनि॥
लुकलुकणार्या चांदण्यांच्या तेजाला असा भर यावा की प्रत्यक्ष चंद्रही त्यात हरवून जावा, तसा कृष्णाचं बोलणं ऐकून तो महापराक्रमी अर्जुन त्याच्या मनात उमटलेल्या निरामय आनंदकल्लोळात हरवून गेला.
जें विश्वाचें मूळ। जें योगद्रुमाचें फळ।
जें आनंदाचें केवळ। चैतन्य गा॥ 6-322॥
विश्वाचं मूळ आनंद आहे आणि तो आनंद आपल्या आत आहे हा दिलासा किती मोलाचा आहे ना! भले त्याच्यापर्यंत पोचायचा मार्ग आपल्याला आत्ता माहिती नसेल किंवा त्या मार्गावर आपली वाटचाल अगदी कूर्मगतीनं होत असेल पण जे शाश्वत आहे, सत्य आहे आणि जे ज्ञेय आहे, समजून घ्यावं असं आहे ते आनंदरुप आहे हे फार छान आहे! आपण हा जो खटाटोप करतोय- संसाराचा असो, जगाचा असो वा व्यक्तिगत उन्नतीचा, सारं काही आनंदाकरता आहे. जे शोधायचंय ते आनंदातून जन्माला आलेलं आहे या जाणिवेनं त्याच्याविषयीची, तिकडे पोचण्याची, त्याला जाणण्याची ओढ वाढते. म्हणूनच हा प्रवासही फार आनंद देणारा आहे. या प्रवासात ज्याचा शोध घ्यायचा ते वस्तुतः आपलंच आत्मस्वरुप आहे. त्यानं स्वतःच सांगितलंय की,
जाणे अजु मी अजरु।
अक्षयो मी अक्षरु।
अपूर्वु मी अपारु।
आनंदु मी॥ 18-1193 ॥
मी अजन्मा आहे. मला जन्मही नाही व जरा म्हणजे वृद्धत्वही नाही. मला अंत नाही, मला झीज नाही, माझ्या स्वरुपाची तुलना नाही आणि माझ्या पल्याड काही नाही. मी म्हणजे केवळ आनंद आहे! निखळ निर्मळ निरालंब आनंद! हा आनंद मिळवण्याचा सुलभ मार्ग त्यांनीच आपल्याला दाखवलाय. ही सातशे श्लोकांची गीता म्हणजे साक्षात भगवतीच जाणा कारण ही मोहरूपी महिषासुराला मुक्ती देऊन आनंदित झाली आहे. त्यामुळं हिच्या सान्निध्यात जो येईल तो आनंदसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होईल!
कीं गीता हे सप्तशती।
मंत्रप्रतिपाद्य भगवती।
मोहमहिषा मुक्ति।
आनंदली असे॥ 18-1666 ॥
म्हणौनि मनें कायें वाचा।
जो सेवक होईल इयेचा।
तो स्वानंदसाम्राज्याचा।
चक्रवर्ती करी॥
असा दैवी आनंद काय तो आपण कदाचित कल्पनेनेही जाणू शकू की नाही माहीत नाही. जसं अमृत कसं लागत असेल याची आपण कल्पना करु शकत नाही, पण ज्ञानेश्वरीच्या या आनंदविहारात आपण वावरत असलो की असं वाटतं खरं की त्या आनंदाची चव अशीच असेल!