कर्कयोद्ध्यांची पंढरी..

विवेक मराठी    07-Nov-2026   
Total Views |

vivek 
नागपूरपासून तीस-पस्तीस किलोमीटर अंतरावर कळमेश्वर तालुक्यात असलेलं विठ्ठल-रखुमाईचं मंदिर हे सुमारे तीनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेलं देवस्थान. पंढरपुरात जशी चंद्रभागा नदी आहे, तशीच एक चंद्रभागा नदी इथेही आहे. ‘तिच्या पात्रात असलेल्या विहिरीतून मला बाहेर काढा’, असा दृष्टान्त इथल्या कोलबास्वामींना झाला आणि त्यांनी त्या मूर्ती बाहेर काढून त्यांची प्रतिष्ठापना या मंदिरात केली. जागृत देवस्थान मानलं जाणारं हे देवस्थान आता ‘विदर्भाची पंढरी’ म्हणून ओळखलं जातं. असंच एक जागृत चिकित्सा आणि उपचारस्थान ठरणारं वैद्यकीय केंद्र विदर्भात उभं राहतं आहे. नागपूरपासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जामठा गावात, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नावानं. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला खेटूनच उभ्या राहत असलेल्या या केंद्राचं स्वप्न पडलं देवेंद्र फडणवीस आणि शैलेश जोगळेकर या दोघा मित्रांना. नागपूरच्याच नव्हे तर मध्य भारताच्या वैद्यक विश्वात हेे वैद्यकीय केंद्र ओळखलं जातं ते ‘कर्कयोद्ध्यांची पंढरी’ म्हणून, त्या केंद्राची ही उभरती यशकथा...
भारतीय मजदूर संघाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत स्व. दत्तोपंत ठेंगडी यांची दोन वाक्यं माझ्या स्मरणात कायमची बसली आहेत. पुण्याच्या दीनदयाळ रुग्णालयाच्या उद्घाटनास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं, ‘मी या रुग्णालयाला शुभेच्छा देणार नाही.‘ आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले होते,‘रुग्णालयाला शुभेच्छा देणं म्हणजे समाजात रुग्णांची संख्या सतत वाढती राहण्याची इच्छा प्रदर्शित करणं आणि त्यांच्या वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी रुग्णालयं मोठ्या संख्येनं निघत राहण्याला शुभेच्छा देणं. ते मी करणार नाही, कारण रुग्णालयांची संख्या वाढत राहणं ही समाजाची निरोगी स्थिती नाही.‘ त्यांचं दुसरं वाक्य होतं, ‘माणसाची उंची तो कोणत्या स्थानावर आहे यावरून मोजली जाऊ नये, त्यानं केलेलं काम पुढच्या किती पिढ्यांना प्रभावित करत राहणार आहे, यावरून ती मोजली जावी.‘ त्यांनी उदाहरण दिलं होतं प्रासादाच्या शिखरावर बसणार्‍या कावळ्याचं आणि गरुडाचं. ते म्हणाले होते, ‘कावळा प्रासादाच्या शिखरावर जाऊन बसला तरी तो गरुडभरारी घेऊ शकत नाही.‘ माणसाचंही तसंच आहे. माणसाचं मोठेपण हे त्यानं भूषवलेल्या पदांपेक्षा त्यानं केलेल्या कामाची महती पुढे किती काळ टिकून राहते, त्याच्या कामाचा प्रभाव भविष्यावर किती पडतो हे मोजण्यावर अवलंबून असायला हवं..
 
देवेंद्र फडणवीस आणि शैलेश जोगळेकर या दोघा मित्रांचं मोठेपण दत्तोपंतांनी उच्चारलेली ही दोन वाक्यं सार्थ करण्यातच दडलेलं आहे. देवेंद्र हे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री, 2014पासून मधला अडीच वर्षांचा कालावधी सोडला तर सलग बारा वर्षं ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत. महाराष्ट्राच्या विकासाच्या अनेक योजना त्यांच्या कारकिर्दीत मार्गी लागल्या आहेत, लागताहेत. पण त्यांचं मोठेपण निव्वळ त्यात दडलेलं नाही. त्यांचं मोठेपण महाराष्ट्रालाच नव्हे तर सार्‍या देशाला चिरपरिचित राहणार आहे ते नागपूरजवळच्या जामठाजवळ उभारल्या जात असलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे.
देवेंद्र आणि शैलेश हे दोघंही शालेय जीवनापासूनचे मित्र. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दोघांच्या मैत्रीचा समान दुवा. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात दोघांनी संघाचं आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं. पुढे देवेंद्र सक्रिय राजकारणात उतरले आणि शैलेश व्यवसायापेक्षाही अधिक भोसला मिलिटरी स्कूलच्या कामात. पण आपापल्या कुटुंबातील एका समान दुर्दैवी घटनेनं या दोघांना अधिक जवळ आणलं आणि एका मोठ्या सामाजिक कार्याला प्रवृत्त केलं..
 
*****
ती दुर्दैवी घटना होती दोघांच्याही कुटुंबातील जिवलग व्यक्तींच्या कॅन्सरनं झालेल्या मृत्यूची, आणि त्यांना प्रवृत्त करणारं ते काम होतं वैद्यक विश्वातील अत्याधुनिक सेवांनी युक्त तरीही सामान्य माणसाला परवडतील अशा उपचारसुविधा देणारं कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिव गोळवलकर तथा श्रीगुरुजी यांनाही कर्करोगानंच मृत्यू आला आणि संघाचे विदर्भातील वरिष्ठ स्वयंसेवक अर्जुनदास कुकरेजा यांनाही कॅन्सरनंच गाठलं. देवेंद्रजींच्या वडलांनादेखील घशाच्या कॅन्सरनं गाठलं. कॅन्सर झाला आहे, त्यावर नेमक्या उपचारांची गरज आहे, हे लक्षात आल्यानंतर मुंबई-चेन्नईमध्ये पुरेसे उपचार सुरू असतानाच मृत्युनं त्यांना कवटाळलं. शैलेशच्या जीवनातही असाच प्रकार घडला. शैलेश जोगळेकरचे वडील हे नागपुरातील प्रख्यात इलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर. बी.कॉम. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ शैलेशनं वडलांच्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरूवात केली. यथावकाश लग्नही झालं, पण 1995च्या सुमारास शैलेशच्या पत्नीला, वैशालीला कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं. देवेंद्र वडलांसाठी आणि शैलेश पत्नीसाठी जीव एकवटून प्रयत्न करत असतानाही दोघांच्या वाट्याला अपयश आलं. गंगाधरपंत तर गेलेच, पण तब्बल सहा वर्षे उपचारांची शर्थ केल्यानंतरही शैलेशची पत्नी गेली. आर्थिक संसाधनं हाताशी असतानाही आपण आपल्या आत्मजांना वाचवू शकलो नाही याची बोच दोघांनाही लागून राहिली आणि असं अपयश इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी आपणच पुढाकार घेऊन काहीतरी केलं पाहिजे असं दोघांच्याही मनात येत राहिलं..
 

vivek 
 
शैलेश पूर्वी नागपुरातल्या उच्चभ्रू वस्तीत रहायचे, परंतु आपल्या मानसिकतेला आणि जडणघडणीला ती वस्ती अनुरूप नाही हे त्यांनी वेळीच जाणलं आणि शहरापासून काहीशी दूर अशी पाच एकर जमीन घेऊन तिथे छोटंसं घर बांधून राहण्यास सुरूवात केली. आज ते तिथे राहतातही आणि शेतीही करतात. वडलांच्या व्यवसायात लक्ष घालत असतानाही शैलेशजींच्या मनात हे नक्की होतं की आपण काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे. त्यांनी वडलांकडून वारसा हक्कानं मिळालेला सुस्थितीतला व्यवसाय बंद केला आणि पहिलं पाऊल टाकलं ते नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलची शाखा नागपुरात सुरू करण्याच्या दिशेनं..
 
 
नागपूरचे डॉ. मुंजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तडफदार नेते, हिंदू महासभेचे अध्यक्ष आणि सैनिकी शिक्षणाचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जात. सैनिकी शिक्षणाचं महत्त्व ओळखून आणि भारतीय लष्कराचं भारतीयीकरण व्हावं या उद्देशानं, त्यांनी 1935 साली नाशिक येथे हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून त्यांनी 1937 साली भोसला मिलिटरी स्कूलची स्थापनाही नाशिकमध्ये केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत डॉ. मुंजे यांचा मोठा सहभाग होता. डॉ. मुंजे यांच्या 125व्या जन्मदिनाचा मुहूर्त गाठून शैलेश जोगळेकर यांनी नागपूरमध्येही भोसला मिलिटरी स्कूलची शाखा सुरू करण्याची तयारी सुरू केली आणि 1996 साली ती प्रत्यक्षात स्थापनही झाली. गेली तीस वर्षं शैलेश त्या संस्थेशी संबंधित आहेत, इतकंच नव्हे तर सैनिकी प्रशिक्षणाचे सध्याचे बदलते संदर्भ लक्षात घेऊन भारतात पहिली खाजगी डिफेन्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची इच्छा त्यांनी आपल्या निकटमित्राकडे व्यक्तही केली आहे..
 

vivek 
 पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा

vivek 
शैलेश यांच्या मनात खोलवर रुजलेलं सामाजिक कामाचं स्वरूप असं एवढ्यापुरतं सीमित नव्हतं. ते आणि त्यांचे जीवश्चकंठश्च मित्र देवेंद्र फडणवीस हे एकनिष्ठ संघ स्वयंसेवक. त्यांच्यासमोर सेवाकार्यातला आदर्श होता तो संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्यासोबत सावलीसारखे राहिलेल्या डॉ. आबाजी थत्ते यांचा. वैद्यक पदवीधर झाल्या झाल्या आबा संघ प्रचारक म्हणून बाहेर पडले आणि तब्बल तेहतीस वर्षं गुरुजींचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिलं.
 
गुरूजींइतकाच प्रवास त्यांनीही केला. गुरुजींच्या निधनानंतर त्यांच्यावर खूप जणांनी लेखन केलं. आबाजींनीही लिहावं यासाठी भरपूर आग्रह झाला. त्यांनी विनम्र शब्दात नकार देत म्हटलं,‘श्रीरामजींसोबत हनुमानजी बरीच वर्षे राहिले, पण श्रीरामजींचं चरित्र लिहिण्याची वेळ आली तेव्हा ते महर्षि वाल्मिकींनी लिहिलं, हनुमानजींनी नव्हे. माझं काम हनुमानजींसारखं सावली बनून सोबत राहून सेवा करण्याचं होतं, ते मी केलं.’
 
 
आबाजींचा हाच सेवाभाव देवेंद्रजींना आणि शैलेशजींना रुचला असावा, त्यामुळे त्यांनी संघाचे विदर्भ प्रांताचे तत्कालीन कार्यवाह विलासजी फडणवीस आणि क्षेत्र प्रचारक सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आबाजी थत्ते सेवा और अनुसंधान संस्था नावाच्या धर्मादाय विश्वस्त संस्थेची स्थापना केली आणि आबाजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत रंजल्या-गांजल्यांच्या सेवेसाठी अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असं कॅन्सर रुग्णालय स्थापन करण्याचा संकल्प सोडला तो 2001मध्ये. पण त्या प्रयत्नांची प्रत्यक्ष सुरूवात झाली ती नागपूरच्या मध्यवर्ती भागात धरमपेठ भागात 25 खाटांचं रुग्णालय उभं करून.
 
******
कॅन्सर हॉस्पिटलचा संकल्प खूप मोठा होता, त्याला हात घालण्याआधी स्वतःची आणि धर्मादाय रुग्णालयाच्या मॉडेलची परीक्षा होणं आवश्यक होतं. त्यानुसार 2012मध्ये हे हॉस्पिटल सुरू झालं. डॉ. आनंद पाठक हे देवेंद्र आणि शैलेश या दोघांचेही 2002सालापासूनचे निकट स्नेही. ते नागपुरातील नामवंत कर्करोग तज्ज्ञ होतेच. स्वतःची खाजगी प्रॅक्टिस सुरू ठेवत ठेवत ते देवेंद्र आणि शैलेश यांच्या उपक्रमात सहभागी झाले, त्यांच्याबरोबर आणखी काही सहकारी या प्रकल्पात जोडले गेले आणि त्या हॉस्पिटलला मिळालेला प्रतिसाद ध्यानात घेऊन कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागेचा शोध सुरू झाला. कॅन्सरवर उपचार करणारी रुग्णालयं देशभरात अनेक ठिकाणी आहेत, परंतु त्यातल्या अनेक रुग्णालयात रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जातात, सर्वसामान्यांना ती रुग्णसेवा परवडत नाही, सार्वजनिक हॉस्पिटल असल्यानं तिथलं व्यवस्थापन नीट नसतं हे देवेंद्र आणि शैलेश दोघंही जाणून होते. त्यामुळेच आपल्या मनातील कॅन्सर हॉस्पिटल पाच-दहा वर्षांचा विचार करून तात्पुरत्या लाभासाठी न उभारता, पुढील शंभर वर्षं सेवा देऊ शकेल अशा स्थायी-सेवाभावी संस्थेच्या रूपात ते उभारलं पाहिजे हे ते जाणून होते..
कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागेचा शोध सुरू झाला आणि नागपूरच्या आऊटर रिंग रोडवर जामठा विभागात साडेचौदा एकर जागा उपलब्ध होईल असं दिसू लागलं. ती जागा तेव्हा शहरापासून अति दूर होती. जवळपास वस्तीही नव्हती आणि येण्याजाण्यासाठी पक्की सडकही उपलब्ध नव्हती. पण मुंबई-नागपूरला जोडणारा भविष्यातला समृद्धी महामार्ग शेजारून जायचा होता, नागपूर शहरातील मेट्रो जवळून जायची होती. नागपूर सुधार प्रन्यासच्या ताब्यात ती जागा होती, ती उपलब्ध झाली, भूमिपूजनाच्या आदल्या दिवशी बांधकाम परवानगी मिळाली, पण एवढ्या जागेवर भविष्यातील योजना पूर्ण होऊ शकणार नव्हत्या, हळूहळू शेजारच्या जागा जसजशा उपलब्ध होऊ लागल्या, तसतशा त्याही खरेदी करत गेल्यानं आज जवळपास 90-95 एकर जागा डॉ. आबाजी थत्ते सेवा और अनुसंधान संस्था न्यासाच्या ताब्यात आहे, आणि पुढची किमान 100 वर्षांची विकासाची गरज त्यातून भागेल अशी शक्यता आहे..
 
 
जागा ताब्यात आल्यानंतर साडेतीनशे खाटांचं रुग्णालय उभं करण्यासाठी निधी जमविण्याची धडपड सुरू झाली. सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी सीएसआर अंतर्गत निधी द्यावा यासाठी साकडं घातलं गेलं आणि 2013च्या मध्यास ओएनजीसीकडून पहिली मोठी देणगी प्राप्त झाली. ती मिळताच रुग्णालयाचं भूमिपूजन करायचं ठरलं आणि रा. स्व. संघाचे भूतपूर्व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे हस्ते 2015मध्ये भूमिपूजन पार पडलं. रुग्णालय कसं असावं, रुग्णांची कमीतकमी गैरसोय होईल अशा सुविधा सर्व मजल्यांवर कशा द्याव्या, रुग्णांना वेगवेगळ्या तपासण्या आणि परीक्षा यासाठी वरखाली विभाग शोधत फिरावं लागणार नाही अशी रचना कशी असावी याचा अतिशय मूलभूत विचार प्रत्येक मजल्याचं नियोजन करताना केला गेला. 2017मध्ये रुग्णालयाचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला.
 
 
आज उभं असलेलं एनसीआयचं बांधकाम सुमारे साडेसात लाख चौरस फुटांचं आहे. 470 रुग्ण एकाचवेळी उपचार घेऊ शकतील अशी आजची स्थिती आहे, भविष्यात ती संख्या वाढून साडेसातशेपर्यंत जाऊ शकेल अशी रचना एनसीआयनं उभारून ठेवली आहे. ते प्रत्यक्षात येईल तेव्हा एनसीआय हे देशातील धर्मादाय क्षेत्रातील सगळ्यात मोठं रुग्णालय ठरेल. एनसीआयच्या इमारतीचा आकार पंख पसरलेल्या पक्ष्यासारखा आहे. त्यामागची भूमिका इथे दखल होणार्‍या रुग्णानं उपचारानं ठीक होऊन पूर्ववत निरोगी बनत मुक्त गगनभरारी घ्यावी हे सूचित करणारी आहे.
 
 
देशातील अन्य खासगी कर्करोग रुग्णालयांच्या तुलनेत इथे निम्मं उपचार शुल्कच आकारलं जातं असं मोठ्या अभिमानानं शैलेश सांगत होते. गेल्या सहा वर्षात महाराष्ट्रच नव्हे तर झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण, हैदराबाद अशा लांबलांबच्या ठिकाणांहून येण्याचं रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे एनसीआय हे नागपूरचंच नव्हे तर अवघ्या मध्य भारताचं आधार रुग्ण-केंद्र बनलं आहे. इमारतीचं बांधकाम करताना काळजी घेतली आहे ती रुग्णाच्या प्रत्येक कक्षाला स्वच्छ सूर्यप्रकाश यावा अशी. रुग्णाला आपला बेड आपला आपण खाली-वर-तिरका करता यावा यासाठीची अत्याधुनिक व्यवस्था प्रत्येक खोलीत आहे. साधारणपणे कुठल्याही रुग्णालयात रुग्णाच्या बेडभोवती मॉनिटर, वायर्स यांचं जाळं दिसतंच, इथे ते सर्व कन्सिल्ड आहे. रुग्णालयाचा फीलच येऊ नये ही काळजी त्यामागे आहे. प्रत्येक खोलीत/कक्षात एका नातेवाइकाची राहायची सोय आहे, त्याचं जेवण निःशुल्क आहे, पण त्याशिवाय त्याला दिवसभरात कितीही वेळा त्याच्याच मजल्यावर सशुल्क चहा-कॉफी मिळावी याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. रुग्णाच्या नातेवाइकांसाठी सुमारे 300 खोल्यांचं बांधकाम परिसरातच सुरू आहे, स्वस्ति निवास असं त्या निवासव्यवस्थेचं नाव आहे..
 

vivek 
 
प्राथमिक चाचण्यांमध्ये रुग्णांना अनेकदा रक्तचाचणी केंद्रात (पॅथॉलॉजी) जावं लागतं, ते करण्यासाठी वर-खाली करावं लागू नये म्हणून प्रत्येक मजल्यावर महत्त्वाच्या डिपार्टमेंटशेजारी रक्तचाचणी केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हे रुग्णालय धर्मादाय पद्धतीनं चालणारं असल्यानं तिथे रुग्णसेवा न परवडणार्‍या रुग्णापासून ते थेट मेडिकल टुरिझमच्या नावाखाली भारतात येऊन उत्तम वैद्यकीय चिकित्सा व उपचार करवून घेणार्‍या विदेशी रुग्णापर्यंत प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गरजेनुसार सुविधा देणारी दालनं आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे, कक्षांचे आकार कमीजास्त असले तरी रुग्णाला दिली जाणारी औषधं, रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर्स, रुग्णांना दिलं जाणारं अन्न यात कोणतीही तडजोड नाही. सर्वांना समान दर्जाची वागणूक.
 
 
शिवाय इथे आणखी एका गोष्टीवर विशेष भर देण्याचा प्रयत्न होतो आहे. तो आहे रुग्णोपचारासाठी भारतात येणारे विदेशी रुग्ण पुण्या-मुंबईच्या वा दिल्ली-चेन्नईच्या भयावह गर्दीच्या आणि प्रदूषित वातावरणापेक्षा नागपुरात यावेत यावर. उपचारांसाठी भारतात येणार्‍या परदेशी रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. 2025मध्ये त्यातून 83,204 कोटींची उलाढाल झाली, ती वाढून 2030मध्ये 1.54 लाख कोटींची होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पर्यटन मंत्रालयानेच दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि भारत या देशांमध्ये केल्या जाणार्‍या उपचारांमधील खर्चाची तफावत 58 ते 90 टक्के इतकी आहे. कमी खर्चात दर्जेदार उपचार मिळत असल्याने जागतिक नकाशावर भारताचे जे स्थान बळकट बनत चालले आहे, त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न एनसीआय घेणार आहे..
 
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इथे कुणीही डॉक्टर/तज्ज्ञ बाहेरून बोलावला जात नाही. सर्व डॉक्टर्स इन्स्टिट्यूटच्याच पूर्ण वेळ सेवेत आहेत. एनसीआयचं आणखी एक वेगळेपण म्हणजे इथे काम करणारे डॉक्टर्स आणि व्यवस्थापन सदस्य स्वतःचा उल्लेख कर्कयोद्धा असा करत असतात. तर इथे काम करणारे सर्व कर्मचारी स्वतःला कर्कसेवक म्हणवून घेतात. रुग्णालयात दखल होणार्‍या प्रत्येक रुग्णाला एका कर्कसेवकाशी पहिल्या दिवशीच जोडून दिले जाते. अ‍ॅडमिट झाल्यापासून ते उपचार पूर्ण करून डिस्चार्ज घेऊन परत जाईपर्यंत प्रत्येक रुग्णाशी एकेक कर्कसेवक जोडलेला राहतो. रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाइकांना आवश्यकतेनुसार त्या त्या विभागात, वा त्या त्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याची जबाबदारी डिस्चार्ज मिळेपर्यंत हा कर्कसेवक पार पाडत असतो.
 
 
एनसीआयमधील सर्व कर्मचारी स्वतःला कर्कसेवक म्हणवून घेतातच, परंतु डॉ. आबाजी थत्ते सेवा और अनुसंधान संस्थेचे सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी स्वतःला कर्कयोद्धा म्हणवून घेतात, तसं बिरुद आपल्या छातीवर मिरवतात. एनसीआयच्या या रुग्णालयात पाऊल टाकल्यापासूनच या युद्धरततेची जाणीव आपल्याला पदोपदी होत असते. स्वागत कक्षाच्या छतावर ‘मै हूं कर्क योद्धा‘, ‘ख रा र लरपलशी ुरीीळशी ‘, ‘अहं कर्क योद्धा अस्मी‘ असं सर्व भाषांमध्ये लिहिलेलं आढळतं..
 
 
इथल्या दहा मजली इमारतीचे तीन मजले जमिनीखाली आहेत, तिथे कर्करुग्णांना द्याव्या लागणार्‍या रेडिएशन, केमोथेरपी आदी सुविधा आहेत. इतर रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनसाठी जिथे चार ते पाच हजार रुपये आकारले जातात, तिथे एनसीआय अवघे बाराशे रुपये आकारते. हे शक्य होते ते रुग्णालयाला आर्थिक मदत मिळत असते त्यामुळे आणि इथे नफ्यासाठी काम करायचे नाही हा दृष्टीकोन असल्यामुळे. भविष्यात प्रोटॉन बीन थेरपी, कार्बन आयर्न थेरपी यासारख्या उपचारपद्धतीही आणण्याचे नियोजन व्यवस्थापनाने सुरू केले आहे. यातील कार्बन थेरपी तर आशियातील कोणत्याही रुग्णालयात या घटकेस वापरली जात नाही, उभ्या जगभरात केवळ 15 ठिकाणीच ते वापरले जाते. जगाच्या पाठीवरची कर्करोग उपचारांसाठीची सर्वाधिक अत्याधुनिक उपचार सेवा तर आहेच, पण पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल असा जनरल वॉर्ड, प्रशस्त-आल्हाददायक आणि स्वच्छ वॉर्ड प्रत्येक विभागात उपलब्ध करून देण्यात आला आहे. एनसीआयच्या स्वागत दालनात प्रवेश करताना आपण रुग्णालयात प्रवेश करतो आहोत याचा फील कुठेही येत नाही. याउलट आपण एखाद्या कॉर्पोरेट उद्योगाच्या मुख्यालयात येतो आहोत की काय असा प्रश्न आपल्याच मनात उत्पन्न होतो.
 
******
एनसीआयचं वेगळेपण आणखीही खूप बाबतीत आहे. बाल कर्करोग रुग्णांवर संपूर्ण मोफत उपचारांची सोय येथे आहे. यात वय वर्षे बारापर्यंतचे रुग्ण अंतर्भूत आहेत. या मुलांचा कर्करोग बरा झाला, तर यांना पुढचं 50-55 वर्षांचं निरोगी आयुष्य लाभू शकतं, त्यामुळे अशा मुलांवर उपचार करून पुढची पिढी सुरक्षित ठेवण्यासाठीची मोठी धडपड एनसीआय करताना दिसते आहे. 2023 साली एनसीआय पूर्णतः सुरू झालं आणि गेल्या तीन साडेतीन वर्षात अडीच हजारांहून अधिक मुलांवर उपचार होऊन ती कर्करोगमुक्त होऊन घरी गेली आहेत. उपचारांना यश मिळण्याचं मुलांविषयीचं यशाचं प्रमाण 93 टक्के आहे ही एनसीआयची मोठीच उपलब्धी आहे. हे सांगताना शैलेशच्या चेहर्‍यावर दिसणारं समाधान खूप काही सूचित करणारं होतं.
 
लॅन्सेट या नियतकालिकाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधन अभ्यासात असे दिसून आले आहे की सार्कचे सदस्य असलेल्या आठ देशात 0 ते 14 या वयोगटात कर्करोगाचे सुमारे 37 हजार 716 नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी सुमारे 25 हजार 939 रुग्ण हे एकट्या भारतात दिसून आले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी खूप जास्त नसली तरी ती चिंताजनक आहे हे निश्चित. या मुलांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचे (ल्युकेमियाचे) प्रमाण सर्वाधिक असून त्यापाठोपाठ क्रमांक आहे तो मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या कर्करोगाचा. एनसीआयने याच कारणाने मुलांवरील उपचारांना प्राधान्य द्यायचे ठरवले असून ते मोफत करता यावेत यासाठी पुरेशी निधीची तरतूदही करण्याची सज्जता ठेवली आहे..
 
 
पूजा जाधव ही यवतमाळ जिल्ह्यातील नीलेश जाधव नावाच्या एका कास्तकाराची मुलगी. जाधव कुटुंब शेतीवरच गुजराण करतं. एक मुलगा आणि दोन मुली, पतिपत्नी आणि नीलेशची आई असं सहा जणांचं कुटुंब. पूजा पाचवीत शिकते. एक दिवस तिच्या हातावर एक गाठ दिसायला लागली. प्राथमिक तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी नागपूरला नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूटला जायला सांगितलं. जाधव पती-पत्नीचं धाबंच दणाणलं. उपचारासाठी इतके पैसे आणायचे कुठून हा प्रश्न त्यांना पडला, पण एनसीआयमध्ये गेल्यावर चित्र स्पष्ट झालं. अजिबात खर्च करावा न लागता पूजावर उपचार झाले, पूजा खडखडीत बरी होऊन यवतमाळला परत गेली. पूजासारख्या अशा कहाण्या अनेक. डॉक्टर आनंद पाठक हे एनसीआयचे मेडिकल डायरेक्टर. पूजासारख्या अनेक कहाण्या सांगताना ते म्हणाले, देशात प्रथमच अशा स्वरूपाची निःशुल्क सेवा आम्ही उपलब्ध करून देत आहोत, कारण मुलांचा कॅन्सर बरा होण्याचं प्रमाण तुलनेनं अधिक आहे..
 
 
एनसीआयच्या तळमजल्यावरील विस्तीर्ण अशा स्वागत कक्षात सुमारे पन्नास साठ सोफे मांडून ठेवलेले आहेत. त्या सोफ्यांवर बसलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पहिले तेव्हा प्रश्न मनात उभा राहिला तो सोफ्यांसारख्या महागड्या आसनांच्या आवश्यकतेचा. कारण एनसीआयच्या सर्वच मजल्यांवर, सर्वच ठिकाणच्या आसनकक्षात असे सोफे रांगेनं मांडून ठेवलेले दिसले. सामान्य सार्वजनिक रुग्णालयात दिसतात तशा प्रकारची स्टीलची बाकं, स्टीलच्या खुर्च्या कुठेही दिसल्या नाहीत. हे असं का, कशासाठी यावरचं शैलेशचं उत्तर त्याचा आणि त्याच्या सहकार्‍यांचा कर्करुग्णांकडे पाहण्याचा माणुसकीपूर्ण दृष्टीकोन स्पष्ट करणारं होतं. कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्याचं कुटुंब आधीच मानसिकदृष्ट्या खचलेलं असतं. त्यानं रुग्णालयात आल्यानंतर तिथल्या उदास वातावरणानं आणखी खचू नये यासाठी त्याला जेवढा शारीरिक-मानसिक दिलासा मिळेल, तेवढा देण्याच्या उद्देशानं आरामदायी आसनव्यवस्था आणि कमीतकमी घिरट्या घालाव्या लागतील अशी विविध तपासणी केंद्रे उभारून एनसीआयनं रुग्णालय रुग्णस्नेही बनवलं आहे.
 
*****
2023 सालच्या 27 एप्रिलला, गुरुवारच्या शुभ दिवशी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा लोकार्पण सोहळा नागपूरमध्ये सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे हस्ते पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले ते शब्दशः खरं आहे. स्वप्न पाहणं आणि ते पूर्णत्वास नेणं यात खूप मोठं अंतर असतं. पण संकल्प पक्का असेल तर अपुर्‍या मनुष्यबळावरही तो ठरवल्याप्रमाणे पूर्ण होतोच. पण त्या संकल्पामागे समूहशक्ती उभी राहिली तर तो अधिक लवकर पूर्ण होतो. इन्स्टिट्यूट तयार होण्याच्या पहिल्या दिवसापासून संघ स्वयंसेवक या नात्यानं देवेंद्र आणि त्याचे सहकारी संघभावनेनं एकत्रितपणे कार्य करत आहेत. त्यांनी उभं केलेलं हे कार्य अभिमानास्पद आहे. रा. स्व. संघ या प्रकल्पाच्या पाठीशी सदैव उभा आहे आणि राहील. या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूूटला डॉ. आबाजी थत्ते यांचं नाव देण्यात आलं आहे. आबाजींच्या सेवाभावी वृत्तीचं संपूर्ण प्रतिबिंब या प्रकल्पावर उमटलं आहे. कॅन्सर हा असा रोग आहे जो आधी शरीराला नव्हे, तर माणसाच्या हिंमतीला नष्ट करतो. त्यामुळे कॅन्सरपीडित रुग्णांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांना आपलेपणा आणि हिंमत देण्याची आवश्यकता असते. देवेंद्र, त्याचे सहकारी आणि त्यांच्या जोडीला राज्य सरकार आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही आघाड्यांवर महत्त्वाची भूमिका बजावत आहे, परंतु त्यांच्या जोडीला समाजानेही उभे राहण्याची गरज आहे. ज्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचार घेण्याची गरज असेल, परंतु त्यांची आर्थिक क्षमता नसेल, त्यांना निःशुल्क किंवा कमी खर्चात उपचार घेण्यासाठी जो निधी लागेल, त्याची पूर्तता याच समाजाच्या सहकार्यातून पूर्ण होईल.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटविषयीच्या ज्या भावना उद्घाटनाच्या भाषणात बोलून दाखवल्या, अगदी तशाच भावना खरं तर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला दिलेल्या भेटीनंतर व्यक्त केल्या होत्या. ज्या भावनेतून देवेंद्र फडणवीस आणि शैलेश जोगळेकर यांनी एकत्र येऊन कॅन्सर हॉस्पिटलचे स्वप्न पाहिले होते, त्या आणि तशाच भावनेतून 1941 साली सर दोराबजी टाटा यांनी पत्नी लेडी मेहेरबाई टाटा यांच्या निधनानंतर टाटा कॅन्सर हॉस्पिटल उभे केले होते. 1931 ते 1941 असा दहा वर्षांचा त्यांचा कॅन्सरविरोधी लढा टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या स्थापनेस कारणीभूत ठरला होता. भावना आणि जिद्दीचा संगम दोन्ही रुग्णालयांच्या स्थापनेत दिसून आला होता.
 
 
भारतात कर्करोगावरील उपचारासाठी आधुनिक आणि चांगल्या सोयी उपलब्ध नसल्याने त्याची गरज ज्या तीव्रतेने दोराबजींना जाणवली होती, आणि मुंबईत कॅन्सर हॉस्पिटल उभे राहिले होते, अगदी तशीच गरज देशाच्या सुदूर कानाकोपर्‍यातून, विशेषतः नागपूरातून मुंबईस यावे लागणार्‍या रुग्णांच्या नातेवाइकांना जाणवत होती. देवेंद्र आणि शैलेश हे त्या शेकडो नातेवाइकांचे प्रतिनिधी होते. कुणी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे माणसाच्या हातात नसतंच. कुणी एखादा एखाद्या क्षणी तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतो तर त्याच क्षणी कुणी एखादा जन्मदारिद्र्य पदरी घेऊन जन्माला येतो. कुणाच्या पदरी संस्कारांची शिदोरी येते, तर कुणाच्या भाळी कुसंस्काराचं लेणं लिहिलं जातं. देवेंद्र आणि शैलेश दोघंही भाग्यवान, त्यांना वारसाही लाभला आणि संस्कारांची शिदोरीही. आणि त्यामुळेच कर्करोग झालेल्या रुग्णाच्या वेदना संपवण्याचा आणि त्याचं जीवन नव्यानं फुलवण्याचा ध्यास धरून दोघांनी एनसीआयची उभारणी नागपुरात केली आहे.
 
 
शैलेश यांची आणखी एक खासियत आहे. ‘मल्टीटास्किंग‘ हे त्यांच्या रक्तातच भिनलेलं आहे. त्यांच्या खांद्यावर टाकलेली किंवा त्यांनी एकदा स्वीकारलेली कुठलीही जबाबदारी ते सर्वशक्तिनिशी पार पाडतातच हा त्यांचा गुणविशेष आहे. भोसला मिलिटरी स्कूल नाशिकबरोबरच नागपुरातही असावं असं मनात आल्यानंतर ते त्या उपक्रमाला भिडले आणि गेली तीस वर्षे नागपुरातील भोसला मिलिटरी स्कूलमागे ते भक्कमपणे उभे आहेत. तो प्रकल्प मार्गी लागत असतानाच घरच्या परिस्थितीला आणि मित्राच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांनी एनसीआयचं स्वप्न पाहिलं आणि तेही मार्गी लावलं. एनसीआयच्या विस्ताराची चिंता आता त्यांना नाही, कारण अत्यंत जबाबदार, संवेदनशील आणि सेवाभावी अशा सहकार्‍यांच्या हातात सूत्रं सोपवून शैलेश आता पुढच्या स्वप्नवत भासणार्‍या देशातील पहिल्यावहिल्या संरक्षण विद्यापीठाच्या निर्मितीमागे गुंतले आहेत. भोसला मिलिटरी स्कूलच्याच नेतृत्वाखाली हे खाजगी विद्यापीठ उभे रहावे यासाठीची बरीच जुळवाजुळव झाली आहे. नागपूरजवळ जमीनही निश्चित झाली आहे..
 
*****
 
कर्करोगाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते आहे. ती किती आणि कशी वाढते आहे याचे काही आकडे डोळे विस्फारून टाकणारे ठरत आहेत. कर्करोग हे जगभरात मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे, दरवर्षी 10 दशलक्षाहून अधिक मृत्यू एकट्या कर्करोगाने होतात. 2020 साली कर्करोगाची अंदाजे 19.3 दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवली गेली तर 2025 अखेरपर्यंत त्यात 12.8 टक्के वाढ झाली असण्याची शक्यता सांगितली जात आहे. कर्करोगामुळे होणारा जागतिक खर्च दरवर्षी 1.16 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. भारतात तंबाखू सेवन, जागरूकतेतील उणीव, आरोग्यसेवेची अनुपलब्धता ही जशी कारणे सांगितली जातात, तशीच निरोगी जीवनशैली आणि लसीकरण यामुळे कर्करोगाची 30 ते 50 टक्के प्रकरणे टाळता येतात असेही डॉक्टरांचे सांगणे आहे..
 
 
बदलती जीवनशैली कर्करोगाला कारणीभूत ठरताना दिसत आहे. या कर्करोगाला नियंत्रित ठेवण्यासाठी जशी नियमित तपासणीची गरज आहे, तशीच हा कर्करोग समूळ नष्ट करण्यासाठी प्रचंड आत्मबळाची आणि पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागण्याची ताकदही रुग्णांकडे असण्याची गरज आहे. याशिवाय याच्याच जोडीला सुयोग्य उपचार करणार्‍या सक्षम यंत्रणेचीही गरज आहे. नागपूरचीच नव्हे तर उभ्या मध्य भारताची ही गरज भागवण्याचे काम एनसीआयने हाती घेतले आहे. एनसीआयच्या दोन उपक्रमांविषयी लिहिणे आवश्यक आहे. त्यातलं पहिला उपक्रम आहे आयुष्मती नावाचा तर दुसरा उपक्रम आहे डीएमजी (डिसीज मॅनेजमेंट ग्रुप) नावाचा. ही सारी योजना रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक यांच्या कल्पकतेतून जन्मास आली आहे..
 
 
आयुष्मती हा उपक्रम म्हणजे एक प्रकारे वैद्यकीय सहलच. मेडिकल टुरिझमच्या नावाखाली परराज्यातले नाहीतर परदेशातले रुग्ण भारतात स्वस्त वैद्यकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी येतात, आयुष्मती योजना आहे शरीराची तपासणी करण्यासाठी. चाळीशी ओलंडलेल्या नागपूर शहरातील महिला या उपक्रमानिमित्ताने दिवसभरासाठी एनसीआयमध्ये येतात, त्यांच्या जाण्यायेण्याची निःशुल्क व्यवस्था रुग्णालयातर्फे केली जाते. मॅमोग्राफीसह अनेक तपासण्या केल्या जातात. स्त्रीरोगतज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. आयुष्मतीला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा योजलेल्या एका विशेष कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली बेंद्रे स्वतः उपस्थित होती. सोनाली स्वतः कर्कयोद्धा आहे. एनसीआय पाहून झाल्यावर बोलताना ती म्हणाली,‘हे काम पाहून मला बसलेला सुखद धक्का शब्दात वर्णन करता न येण्यासारखा आहे. मी देशातीलच नव्हे, तर जगातील अनेक कॅन्सर इन्स्टिट्यूूट पाहिल्या आहेत, पण नागपूरसारख्या शहरात अशी जागतिक दर्जाची इन्स्टिट्यूट उभी करून तुम्ही मंडळींनी कर्करोगविरोधी लढ्याला जो आयाम दिला आहे, तो कौतुकास्पद आहे. कॅन्सरचं निदान लवकर झालं तर आयुष्य वाचू शकतं हे आता सिद्ध झालं आहे, आणि मी त्यातून बाहेर पडल्यानंतर तर हे वाक्य माझं जीवनध्येय बनवलं आहे. आयुष्मती हा त्या दिशेने सुरू झालेला प्रयत्न आहे याचा मला आनंद आहे.‘ डीएमजी (डिसीज मॅनेजमेंट ग्रुप) हा एनसीआयचा आणखी एक उपक्रम. शरीराच्या विविध भागांना होणार्‍या कर्करोगाचा अभ्यास करून एनसीआयने सात डीएमजी तयार केले आहेत. रुग्णांना कुठेही भटकावे लागू नये, जे काही उपचार आवश्यक आहेत ते त्यांना एकाच छताखाली मिळावेत यासाठीचे हे उपक्रम.
 
 
स्वतःसाठी स्वप्न तर सगळेच पाहतात, पण सामान्य जनांसाठी एखादं विशाल स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करणारे ध्येयवादी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतात. कर्कसेवक हा जसा कर्करुग्ण आणि रुग्णालय यांच्यातील दुवा, तसाच कर्कयोद्धा हा कर्करोगविरोधी लढ्यात लोकसेवेसाठी उतरलेला आणि आपल्या उपस्थितीनेच कर्करोगरूपी कौरवांना धडकी भरवण्यास उद्युक्त झालेला एनसीआयचा स्टाफ. देवेंद्र फडणवीस, शैलेश जोगळेकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, न्यासाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनिल मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर ही सारी मंडळी कर्कयोद्धा बनून कर्कक्षेत्रावर उतरलेली आणि कर्करोगाला धडकी भरवण्यासाठी पांचजन्य फुंकणारी. एनसीआयचं ध्येयवाक्यच, ‘कर्करोगाच्या भयापासून मुक्तता‘ (ऋीशशवेा ऋीेा ऋशरी जष उरपलशी) हे आहे. एनसीआयच्या आणि तिथे काम करणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ, सेवक, प्रशासक या सर्वांच्याच असीम ध्येयनिष्ठेला सलाम !!

सुधीर जोगळेकर

  सुधीर जोगळेकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत..