रामायणातील सप्तर्षी

विवेक मराठी    07-Nov-2026   
Total Views |

shree ram
 
‘हनुमान अंश’ या अतिशय गाजत असलेल्या चित्रपटातले एक गीत आज आबालवृद्धांच्या ओठांवर आहे. ‘जिद पे आ गयी पार्वती...समझाने पहुँचे सप्तर्षी...’ हे ते गीत. लोकसंगीताचा बाज असलेले गाणे अतिशय कर्णमधुर असे हे गीत आपल्याला देवी पार्वतीने शंभू महादेवाच्या प्राप्तीसाठी केलेल्या कठोर तपाचरणाची कथा सांगते. तिची समजूत घालण्यासाठी साक्षात सप्तर्षी येतात...अशी ती कथा. या गीतामुळे सप्तर्षींचा उल्लेख येतो, हे सप्तर्षी म्हणजे वेदकाळातील तपस्वी..वेदमंत्रांचे रचनाकार..ज्ञानी पुरुष. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये सप्तर्षींची नावे वेगवेगळी येतात. या लेखात रामायणात आलेल्या सप्तर्षींचा परिचय दीपाली पाटवदकर यांनी करून दिला आहे.
 
 
ऋषी शब्दाचा अर्थ सामान्यतः द्रष्टा असा केला जातो. जे पाहू शकतात, ज्यांना दूरदृष्टी आहे आणि जे आपल्या अंतर्दृष्टीने सत्याचे दर्शन घेतात, ते ऋषी. मात्र, ऋषी या शब्दाचा अर्थ केवळ द्रष्टा नाही. ऋषी म्हणजे तपस्वी, वेदमंत्रांचे रचनाकार, प्रकाशाचा किरण, ज्ञानी पुरुष, प्रतिभावान कवी आणि आत्मज्ञानी व्यक्ती असाही होतो.
 
ज्ञानाचे स्रोत असलेल्या सात ऋषींना सप्तर्षी म्हणून ओळखले गेले. सप्तर्षींच्या संकल्पनेची सुरुवात ऋग्वेदातील कुळांशी संबंधित मंडलांपासून झाली असावी, असे वाटते. ऋग्वेदाच्या दुसर्‍या ते आठव्या मंडलांतील सूक्तांचे श्रेय प्रामुख्याने पुढील ऋषिकुळांना दिले जाते.
 
1. गृत्समद
 
2. विश्वामित्र
 
3. वामदेव
 
4. अत्री
 
5. भारद्वाज
 
6. वसिष्ठ
 
7. कण्व
 
 
प्राचीन ग्रंथांमध्ये सप्तर्षींच्या नावांच्या वेगवेगळ्या याद्या आढळतात. जैमिनीय ब्राह्मण ग्रंथात सप्तर्षींच्या यादीत पुढील ऋषी आहेत - अगस्त्य, अत्री, भारद्वाज, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि विश्वामित्र. बृहदारण्यक उपनिषदातही सप्तर्षींची यादी दिली आहे. मात्र, त्यात जमदग्नी आणि इतर ऋषींसोबत कश्यप ऋषींचा समावेश आहे. गोपथ ब्राह्मणात - वसिष्ठ, विश्वामित्र, जमदग्नी, गौतम, भारद्वाज, गुंगू, अगस्त्य आणि कश्यप या ऋषींची नावे आहेत.
 
 
पुराणांमध्येही सप्तर्षींच्या वेगवेगळ्या याद्या आढळतात. काही ऋषींना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले आहे. यांपैकी काही ऋषी गोत्रांचे मूळ पुरुष मानले जातात.
 
 
आपल्या कालगणनेत एका मनूच्या कालखंडाला मन्वंतर म्हटले आहे. चौदा मन्वंतरांचा मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस, म्हणजेच एक कल्प, होतो. प्रत्येक मन्वंतराचा एक अधिपति मनू, आणि प्रत्येक मन्वंतरात वेगवेगळे सप्तर्षी असतात.
 
 
सध्या सातवे मन्वंतर सुरू असून, त्याचा अधिपती वैवस्वत मनू आहे. हा तमिळनाडूमधील राजा होता. त्या सत्यव्रत राजाला आणि त्याच्या सोबत सात ऋषींना मत्स्य अवतरातील विष्णूने प्रलयातून वाचवले होते. ते ऋषी होते - भृगू, कश्यप, अगस्त्य, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज.
 
 
या लेखात आपण रामायणात आलेले सप्तर्षी पाहू. या ऋषींची रामाशी भेट होते, आणि त्यांच्या संवादातून कथा पुढे सरकते. रामायणात यापैकी काही जणांची कथा पण विस्ताराने आली आहे. त्यात एक विशेष कथा येते सप्तजन आश्रमाची -
सप्तजन आश्रम
वालीशी पुन्हा एकदा युद्ध करायला सुग्रीव, राम आणि लक्ष्मणाबरोबर निघला. त्यावेळी ते सर्वजण सप्तजन आश्रमाच्या जवळ थांबले. त्या आश्रमाचे माहात्म्य सुग्रीव सांगतो - येथे फार पूर्वी सात ऋषींनी महान तप केले होते. त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र झाले आहे. आपण त्या स्थानाला नमस्कार करून पुढे जाऊ. त्यावर राम, लक्ष्मण आणि सुग्रीव सप्तजन आश्रमाच्या दिशेला तोंड करून नमस्कार करतात आणि पुढे जातात.
 
 
रामायणावरील जुन्या टीका सांगतात - सुग्रीव जेव्हा पहिल्यांदा वालीशी युद्ध करायला गेला तेव्हा रामाला त्या दोघांमध्ये फरक करता आला नाही. आणि सुग्रीवाला जीव वाचवण्यासाठी पळून यावे लागले. मग दुसर्‍यांदा युद्धाला जाताना सुग्रीवाच्या गळ्यात ओळख पटण्यासाठी लक्ष्मणाने पुष्पमाला घातली. शिवाय या वेळी जाताना त्यांनी सप्तजन आश्रमाला नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. ह्या मुळेच त्यांना दुसर्‍या प्रयत्नात यश मिळाले! म्हणून, कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात करताना देवाला, ऋषींना किंवा तीर्थस्थळाला वंदन करून करावी, असे ते म्हणतात.
 
महर्षी वसिष्ठ
महर्षी वसिष्ठ हे भारतीय ऋषिपरंपरेतील एक तेजस्वी आणि आदरणीय नाव. त्यांचा जन्म मित्र आणि वरुण यांच्या तेजातून एका कुंभात झाला, अशी परंपरागत कथा आहे. अगस्त्य ऋषी त्यांचे जुळे बंधू मानले जातात. वसिष्ठ हे ऋग्वेदातील मंत्रद्रष्टे ऋषी होते. इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरू म्हणूनही त्यांना विशेष स्थान होते. ऋग्वेदातील त्यांच्या मंत्रांमध्ये विविध देवतांची स्तुती तसेच विश्वव्यवस्थेचा विचार आढळतो.
 
 
वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधतीचा उल्लेख आदर्श पतिव्रता म्हणून अनेकदा केला जातो. वाल्मिकींनी सीतेची तुलना कैकवेळा अरुंधतीशी केली आहे.
 
वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील मतभेदांचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. रामायणातही या संघर्षाची जुनी स्मृती सांगितली आहे. या संघर्षाच्या कथांमधून वसिष्ठ यांचा शांत स्वभाव, सहनशीलता, संयम, अहंकाराचा अभाव आणि आध्यात्मिक तेज दिसून येते.
रामायणात महर्षी वसिष्ठ यांची भूमिका अनेक अंगांनी महत्त्वाची आहे. ते राजा दशरथाचे गुरु, राजपुरोहित, सल्लागार आणि तत्त्वज्ञ होते. राजा दशरथाच्या धार्मिक विधींचे मार्गदर्शन वसिष्ठ करत असत. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चारही राजपुत्रांचे संस्कार आणि शिक्षण त्यांच्याकडे झाले. धर्म, कर्तव्य, सत्य आणि राज्यकारभाराची शिकवण त्यांनी राजपुत्रांना दिली.
 
 
एकदा विश्वामित्र ऋषींनी यज्ञरक्षणासाठी राम हवा आहे, असे राजा दशरथाकडे मागितले. केवळ सोळा वर्षाच्या रामाला आपल्यापासून दूर आणि संकटात पाठवण्याच्या विचाराने राजा दशरथ अस्वस्थ झाला. त्या वेळी वसिष्ठांनी राजाला सत्यवचनाच्या धर्माची आठवण करून दिली. विश्वामित्रांसारख्या महान ऋषींच्या मार्गदर्शनाखाली रामाला पाठवणे योग्य आहे, असेही त्यांनी दशरथाला समजावले.
 
 
रामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना कैकेयीने दशरथाकडे दोन वार मागितले. एका वराने भारताला राज्य आणि दुसर्‍या वराने रामाला वनवास मागितला. सीता आणि लक्ष्मणही त्याच्यासोबत निघाले. त्या वेळी कैकेयीने राम लक्ष्मणाबरोबरच सीतेलाही वल्कले दिली. नेहमी शांत असणारे वसिष्ठ यावेळी संतापले! कैकेयीच्या कृतीचा निषेध करत ते म्हणाले,‘राम वनात गेला तरी सीतेचा अयोध्येच्या राज्यावर अधिकार आहे! राम परत येईपर्यंत ती राज्य करू शकते! तसेच राणी! तू केवळ रामाला वनात पाठवण्याचे मागितले आहे, सीतेला वल्कले देण्याची काय गरज आहे?’ त्यांचे शब्द ऐकून शोकाकुल दशरथाला धीर आला आणि त्याने सीतेला चौदा वर्ष पुरतील इतके वस्त्र आणि दागिने देण्याची व्यवस्था केली.
 
 
राम वनवासात गेल्यानंतर राजा दशरथाचा मृत्यू झाला. त्या वेळी वसिष्ठांनी भरताला तातडीने अयोध्येत परत बोलावले. मात्र, अयोध्येत परतल्यावर भरताने राज्य स्वीकारण्यास नकार दिला. त्याने रामालाच अयोध्येचा राजा मानले आणि रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याच्या वतीने राज्यकारभार केला. भरताच्या या निर्णयाचा वसिष्ठांनी सन्मान केला. भरताने रामाचा सेवक म्हणून राज्यकारभार सांभाळला आणि वसिष्ठांनी त्याला साथ दिली, त्यातून सगळ्यांचीच रामाप्रति असलेली निष्ठा दिसून येते.
पुढे राम वनवास संपवून अयोध्येत परतला, तेव्हा महर्षी वसिष्ठांनी रामाला राज्याभिषेक व भरताला युवराज्याभिषेक केला.
रामायणात महर्षी वसिष्ठ हे राजकीय स्थैर्याचा महत्त्वाचा आधार म्हणून समोर येतात. धर्म, परंपरा आणि राज्यशासन या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी इक्ष्वाकू घराण्याला मार्गदर्शन केले.
 
महर्षी विश्वामित्र
 
महर्षी विश्वामित्र हे भारतीय ऋषिपरंपरेतील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. विश्वामित्र हे एक पराक्रमी क्षत्रिय राजा होते. एकदा ते महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात गेले असता, त्यांना वसिष्ठांकडे असलेली नंदिनी ही कामधेनू हवी होती. वसिष्ठांनी ती देण्यास नकार दिल्यावर दोघांमध्ये संघर्ष झाला. मात्र, या प्रसंगात विश्वामित्रांना वसिष्ठांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची जाणीव झाली. केवळ राजसत्ता आणि शस्त्रबळ यांपेक्षा ऋषींचे तपोबल श्रेष्ठ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी राज्यत्याग केला आणि तपश्चर्या करून ऋषिपद मिळवण्याचा निश्चय केला.
 
 
विश्वामित्रांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यात विघ्न आणण्यासाठी इंद्राने मेनकेला पाठवल्याची कथाही प्रसिद्ध आहे. या प्रसंगी विश्वामित्र विचलित झाले पण नंतर त्यांनी पुन्हा तप सुरू केले. त्यांच्या जीवनात असे अनेक चढ-उतार आले. प्रत्येक वेळी अपयशातून सावरून त्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले.
 
 
नंतर त्यांनी त्रिशंकू राजाला सदेह स्वर्गात पाठवण्याचा प्रयत्न केला, स्वतंत्र प्रतिसृष्टी निर्माण केली - हे सर्व प्रसंग त्यांच्या सामर्थ्याची साक्ष देतात. अखेर त्यांच्या दीर्घ तपश्चर्येला यश आले आणि त्यांना ब्रह्मर्षी ही उपाधी प्राप्त झाली.
 
 
रामायणात महर्षी विश्वामित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी रामाच्या जीवनाला निर्णायक वळण दिले. राक्षसांकडून यज्ञात होणारे विघ्न थांबवण्यासाठी ते राजा दशरथाकडे आले आणि त्यांनी रामाला आपल्यासोबत पाठवण्याची विनंती केली. राजा दशरथ सुरुवातीला संकोचला पण वसिष्ठांनी उपदेश केल्याप्रमाणे त्याने रामाला विश्वामित्रांसोबत पाठवले. लक्ष्मणही रामासोबत गेला.
 
 
विश्वामित्रांनी या दोन्ही राजकुमारांना विविध शक्ती आणि दिव्य अस्त्रांचे ज्ञान दिले. त्राटिका वध, सुबाहू वध, मारीचाचा पराभव, सिद्धाश्रमातील यज्ञाचे रक्षण, मिथिलेला प्रवास, रामाकडून शिवधनुष्याचा भंग, आणि राम-सीता विवाह या अत्यंत महत्त्वाच्या घटनांमध्ये विश्वामित्रांची मध्यवर्ती भूमिका आहे.
 
 
नगर, नागरिक, वन, वनवासी आणि यज्ञाचे राक्षसांपासून संरक्षण करणे आणि समाजात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणे, हे विश्वामित्रांचे मुख्य उद्दिष्ट होते. समाजाला त्रास देणारी व्यक्ती स्त्री असली तरी, क्षत्रियाचे कर्तव्य समाजाचे रक्षण करणे असल्याने, त्याने तिला दंड दिला पाहिजे हे त्यांनी रामाला शिकवले.
 
विश्वामित्रांच्या मुखी या प्रवासात एक प्रसिद्ध श्लोक आहे -
कौसल्या सुप्रजा राम पूर्वा सन्ध्या प्रवर्तते ।
उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमाह्निकम् ॥
 
रामाला सकाळी उठवताना ते म्हणतात - कौसल्येच्या सुपुत्रा उठायची वेळ झाली आहे. आता उठ आणि तुझी कर्तव्ये करण्यासाठी सज्ज हो!
 
 
त्राटिकेचा वध ही रामाच्या कार्याची सुरुवात आहे. आणि म्हणून असे मानले जाते की हा श्लोक केवळ सकाळी उठ असा नसून - विष्णूचा अवतार असलेल्या रामा उठ! स्वत:चे रूप जाण! तुझे कर्तव्य ओळख! आणि हे जग राक्षसमुक्त अर्थात नरभक्षकांच्या पासून मुक्त करायची वेळ झाली आहे. तुझ्या अवतारकार्याला सुरुवात कर! अशी आहे.
 
 
महर्षी अगस्त्य
 
महर्षी अगस्त्य हे भारतीय ऋषिपरंपरेतील प्राचीन, तेजस्वी आणि आदरणीय ऋषी होते. मित्र आणि वरुण यांच्या तेजातून कुंभात जन्मलेल्या वसिष्ठांचे ते जुळे बंधू. अगस्त्य ऋषींनी आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडे प्रवास केला आणि तेथे आश्रम स्थापन करून ज्ञानाचा प्रसार केला. अगस्त्य ऋषींनी लोकांना जोडण्याचे मोठे कार्य केले आहे. दक्षिण भारत त्यांना गुरू आणि संस्कृतीचे प्रवर्तक मानतो. त्यांनी जशी ऋग्वेदातील सूक्त लिहिली, तसेच तमिळ भाषेचे व्याकरण लिहिले अशी मान्यता आहे.
 
समुद्राचे पाणी प्राशन करून त्यात लपलेल्या दानवांचा नाश करायला देवांना मदत केल्याची कथा आहे. या कथांमधून संकटांचा सामना करण्याचे त्यांचे सामर्थ्य आणि लोककल्याणासाठी कार्य करण्याची त्यांची वृत्ती व्यक्त होते.
 
 
अगस्त्य ऋषींच्या जीवनात त्यांच्या पत्नी लोपामुद्रा यांचे स्थान महत्त्वाचे होते. लोपामुद्रा स्वतः एक विदुषी आणि वेदमंत्रांची रचयित्री होत्या. ऋग्वेदातील काही सूक्त त्यांनी रचली आहेत.
 
 
त्यांची भेट घेण्यासाठी राम, लक्ष्मण आणि सीता जात असताना रामाने त्यांची कथा आणि माहात्म्य लक्ष्मण आणि सीतेला सांगितले, ते असे -
एकदा मेरुशी स्पर्धा करण्यासाठी विंध्य पर्वत अभिमानाने सतत उंच वाढू लागला होता. त्याच्या उंचीमुळे सूर्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. त्यावेळी अगस्त्य ऋषींनी दक्षिणेकडे जाताना विंध्य पर्वताला वाकण्यास सांगितले. ऋषी परत येईपर्यंत त्याने असेच नम्र अवस्थेतच राहावे, अशी सूचना पण केली. अगस्त्य ऋषी जे दक्षिणेला गेले ते पुन्हा परत आलेच नाहीत, त्यामुळे तो पर्वत आडवा पडून राहिला आणि सूर्याला अजूनही विंध्य पर्वत ओलंडता येत आहे!
 
 
राम, लक्ष्मण आणि सीता त्यांच्या आश्रमात आले, तेव्हा अगस्त्य ऋषींनी तिघांचे प्रेमाने स्वागत केले. त्यांचा अतिथिसत्कार केला, मार्गदर्शन केले आणि आशीर्वाद दिले. त्यांनी रामाला दिव्य अस्त्रे प्रदान केली. या भेटीला रामाच्या वनवासातील विशेष महत्त्व आहे.
 
 
पुढे रावणाशी युद्ध सुरू असता, अगस्त्य ऋषी रामाला भेटायला आले. रामाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी त्याला आदित्यहृदयस्तोत्राचा उपदेश केला. सूर्यदेवाची स्तुती करणारे हे स्तोत्र रामाला आत्मविश्वास, मनोधैर्य आणि नवी ऊर्जा देणारे ठरले. त्याचे पठण केल्यानंतर राम युद्धासाठी सज्ज झाला आणि आत्मविश्वासाने रावणाशी लढायला निघाला. रावणाला मारण्यासाठी देखील रामाने अगस्त्यांनी दिलेली अस्त्रे वापरली.
 
 
रामाला मार्गदर्शन करणे, शस्त्रास्त्र पुरवणे आणि त्याचे मनोधैर्य वाढवण्याचे मोठे काम अगस्त्य ऋषींनी केले.
 
 
महर्षी अत्री
 
महर्षी अत्री हे सप्तर्षींमधील तेजस्वी ऋषी होते. ते ध्यानयोग, तपश्चर्या आणि सत्यनिष्ठेसाठी प्रसिद्ध होते. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक म्हणून त्यांना मानले जाते. त्यांची पत्नी अनसूया आणि पुत्र दत्तात्रेय यांच्यामुळे अत्री ऋषींच्या आध्यात्मिक परंपरेला भारतीय संस्कृतीत विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
 
 
अत्री ऋषी हे ऋग्वेदातील मंत्रद्रष्टे ऋषी होते. त्यांच्या सूक्तांमध्ये सूर्यदेवाचे स्तवन, उषा देवीची स्तुती तसेच मित्र आणि वरुण या देवतांची प्रार्थना आढळते. या मंत्रांमधून निसर्गातील शक्तींबद्दल कृतज्ञता आणि मानवकल्याणाची भावना व्यक्त होते.
 
 
राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना त्यांच्या प्रवासात महर्षी अत्रींच्या आश्रमाला भेटायला गेले. अत्री ऋषींनी तिघांचे प्रेमाने स्वागत केले. त्यांनी रामाला धर्माचे पालन, कर्तव्यनिष्ठा आणि क्षत्रिय म्हणून असलेल्या जबाबदार्‍यांविषयी मार्गदर्शन केले.
महर्षी अत्रींची पत्नी अनसूया एक पतिव्रता, तपस्विनी आणि करुणामयी स्त्री म्हणून प्रसिद्ध होती. या भेटीत अनसूया आणि सीता संवादातून - सीतेचा जन्म, बालपण, रामाशी विवाह ही कथा आली आहे. तसेच वैवाहिक जीवनातील निष्ठा, संयम, कर्तव्य आणि परस्परांप्रती असलेल्या समर्पणाचे महत्त्व आले आहे. अनसूयेने सीतेला दिव्य वस्त्रे, अलंकार आणि सुगंधी द्रव्ये भेट दिली!
अत्री ऋषी अनसूयेच्या तपश्चर्येचे आणि सामर्थ्याचे कौतुक करतात. एका दीर्घ दुष्काळामुळे परिसरातील नद्या आटल्या होत्या, अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती आणि लोकांचे जीवन अत्यंत कठीण झाले होते. अशा संकटाच्या काळात अनसूयेने दीर्घकाळ तपश्चर्या केली. दहा दिवसातून एकदा झोपत असे. आणि दिवस रात्र श्रमत असे. तिच्या सामर्थ्यामुळे नदीचा प्रवाह पुन्हा सुरू झाला आणि फळे व धान्य निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.
 
 
अनसूयेने नदीचा प्रवाह पुन्हा सुरू केला, या वर्णनातून जलस्रोतांचे महत्त्व, निसर्गाचे सूक्ष्म ज्ञान आणि समाजाच्या गरजांसाठी केलेले अथक प्रयत्न यांचे दर्शन घडते. भूभागाची जाण, ऋतुचक्रांचे भान आणि जलव्यवस्थापनाचे ज्ञान यांच्या साहाय्याने दुष्काळावर मात केल्याचे कळते.
 
महर्षी गौतम
 
महर्षी गौतम हे प्राचीन भारतातील एक आदरणीय ऋषी. भारतीय धर्मशास्त्रपरंपरेत त्यांचे विशेष स्थान आहे. त्यांनी लिहिलेला गौतम धर्मसूत्र हा धर्मसूत्रपरंपरेतील एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. त्यात धर्म, आचार-विचार, सामाजिक कर्तव्ये आणि जीवनातील नियमांच्या विषयी मार्गदर्शन केले आहे. ऋग्वेदात देखील गौतम कुळातील ऋषींनी देवतांची स्तुती करणारे अनेक सूक्त रचले आहेत.
 
 
महर्षी गौतमांची पत्नी अहिल्या, आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती. रामायणात तिच्या जीवनातील एका प्रसंगाचे चित्रण येते - अहिल्येच्या सौंदर्यावर मोहित होऊन इंद्राने तिच्याकडे समागमाची याचना केली. अहिल्येला देखील मोह झाला आणि तिने अनुमती दिली. गौतम ऋषींना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी इंद्राला शाप दिला आणि अहिल्येला तपश्चर्येद्वारे इंद्रियजय मिळवण्यास सांगितले. त्यावर गौतम ऋषी आश्रम सोडून निघून गेले.
 
 
पुढे विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मण यांना घेऊन मिथिलेकडे जात असताना गौतम ऋषींच्या आश्रमात आले. त्या वेळी अहिल्येची तपश्चर्या संपली होती. तपाने तेजस्वी झालेल्या अहिल्येला राम आणि लक्ष्मण यांनी वंदन केले. त्याच वेळी गौतम ऋषीही तेथे परत आले आणि त्यांनी अहिल्येचा स्वीकार केला. त्यावर ते दोघे पुन्हा आनंदाने एकत्र नांदू लागले.
 
 
गौतम आणि अहिल्या यांच्या कथेतून चूक, प्रायश्चित्त, क्षमा आणि पुनःस्वीकार दिसतो. तसेच चूक घडल्यानंतर प्रायश्चित्ताद्वारे आत्मपरिवर्तनाची संधी दिलेली दिसते.
 
महर्षी भारद्वाज
 
महर्षी भारद्वाज एक विद्वान ऋषी. वेद, यज्ञविद्या, आयुर्वेद आणि धनुर्वेद यांसारख्या विविध ज्ञानशाखांमध्ये त्यांचे योगदान मानले जाते. ऋग्वेदात भारद्वाज ऋषी आणि त्यांच्या कुळातील ऋषींनी रचलेली अनेक सूक्ते आढळतात. त्यांत अग्नी, इंद्र आणि सोम या देवतांची स्तुती केली आहे.
 
 
रामायणात, भारद्वाज ऋषींचा आश्रम प्रयागराजजवळ होता. वनवासाच्या सुरुवातीला राम, सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या आश्रमाला भेट दिली. भारद्वाजांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले. आणि त्यांना चित्रकूटच्या रम्य परिसरात वास्तव्य करण्यास सांगितले. पुढे तिथे जाण्याचा रस्ता सांगितला आणि सीतेला म्हणाले, ‘यमुना नदी ओलांडल्यावर, एक मोठा वटवृक्ष दिसेल. त्याचे नाव श्याम असे आहे. तू त्या वटवृक्षाची पूजा करून पुढे जा!’
 
 
सीतेने त्यांनी सांगितल्याप्रमाणे वटाची पूजा केली आणि रामासाठी दीर्घायुष्याची प्रार्थना केली!
 
 
वनवासातून परत येताना सुद्धा राम - लक्ष्मण - सीता भारद्वाज ऋषींच्या आश्रमात राहिले आणि मग तिथून पुढे अयोध्येला गेले.
 
महर्षि शरभंग
 
महर्षी शरभंग हे रामायणातील एक महान तपस्वी ऋषी होते. त्यांचा आश्रम दंडकारण्यात होता. कठोर तपश्चर्या आणि आध्यात्मिक साधनेमुळे त्यांना मोठा मान होता.
 
राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना शरभंग ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी इंद्र त्यांना स्वर्गात नेण्यासाठी आला होता. पण, रामाचे दर्शन घेतल्याशिवाय स्वर्गात जाणार नाही, असे शरभंग ऋषीनी सांगितले.
 
 
राम आश्रमात आल्यावर शरभंग ऋषींनी त्यांचे स्वागत केले. दंडकारण्यात राक्षसांकडून तेथील लोकांचा छळ होत असल्याचे रामाला सांगितले. क्षत्रिय धर्माचे पालन करून वनातील लोकांचे रक्षण करण्याची विनंती त्यांनी रामाला केली.
 
 
रामाचे दर्शन झाल्यानंतर शरभंग ऋषींनी देहत्याग केला.
 
शरभंग ऋषी रामाच्या वनातील वास्तव्याला दिशा आणि अर्थ देणारे ठरले.
 
आकाशातील सप्तर्षी
 
 
भारतीय खगोलशास्त्रात सप्तर्षी मंडळ म्हणून सात तार्‍यांचा समूह ओळखला जातो. त्याला पाश्चात्त्य खगोलशास्त्रात इळस ऊळिशिी असे म्हणतात. या सात तार्‍यांना क्रतू, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वसिष्ठ आणि मरीची या सप्तर्षींची नावे दिली आहेत. वसिष्ठ तार्‍याजवळ एक लहानसा अरुंधतीचा तारा पण ओळखला जातो.
 
हे सप्तर्षी मंडळ ध्रुवतार्‍याभोवती फिरते. या सात तार्‍यांना पाहून उत्तर दिशा कळते. आणि प्रवाशांना मार्ग सापडतो. तर धरणीवर असलेल्या सात ऋषींनी रामाला त्याच्या प्रवासात दिशा दिली. विविध काळातील सप्तर्षी आजही आपल्याला त्यांच्या वाङमयातून मार्गदर्शन करत आहेत.

दीपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

9822455650

 deepali.patwadkar@gmail.com