@अनघा लवळेकर
9822502992
'...आणि घर संघाचे झाले’ या शीर्षकाची अनुभव लेखनमाला या लेखापासून सुरू करत आहोत. या लेखातून ही संकल्पना वाचकांना अधिक स्पष्ट होईल असा विश्वास वाटतो. घरातील पुरुष करत असलेल्या संघकार्याचा मनःपूर्वक स्वीकार जेव्हा घरातल्या गृहिणीकडून होतो तेव्हा ते घर आपसूकच कायमचे संघाचे होते. संघविचार अशा घरांमध्ये खोलवर रुजतो आणि घरातल्या गृहिणीसहित सर्वांनाच वेगवेगळ्या वाटांनी का होईना, संघकार्याची प्रेरणा देत राहतो. समाजाप्रती कृतज्ञ राहण्याची मानसिकता रुजवतो.
अशा भगिनींचे अनुभव या लेखमालेतून आपल्या भेटीला येणार आहेत. ते वाचून आणखीही काहींना स्वानुभव लेखनाची प्रेरणा झाली तर त्याचे स्वागत आहे.
आणीबाणीतील दिवस.. मी जेमतेम 9-10 वर्षांची परकरी पोर होते. अचानक एका दिवशी उजाडल्यावर समजलं की, बाबा (डॉ. अशोक कुकडे) ह्यांना पोलिसांनी पकडून नेलंय. पोलीस म्हणजे गुन्हेगार-अपराधी ह्यांना पकडणारे, चुकीची कामे करणार्यांना धाक दाखवणारे अशीच कल्पना मनात होती. मग आपल्या बाबांना - आणि तेही असले काही चुकीचे करणारे नसताना, उलट लोकांना बरे होण्यासाठी औषधे देणारे असताना, का बरं पकडलं असेल? अशा प्रश्नांनी मनात गर्दी केली होती. अनेक रुग्णांना जीवदान देणारे, लोकांच्या दुव्याचे धनी असणारे आपले बाबा अचानक ‘तुरुंगात’ कसे जाऊ शकतात हे मला कळतच नव्हते. तेव्हा ‘संघ’ हा शब्द खरेतर पहिल्यांदा थोडा अजून समजला.
तोपर्यंत ’संघाचे लोक’ म्हणजे ’रोज सकाळी खाकी रंगाच्या घोळदार हाफ पँट्स घालून, हातात काठी घेऊन आमच्या घरासमोरच्या मैदानावर जमणारे, कुठलीशी संस्कृत प्रार्थना म्हणणारे, कधी कधी काठ्या घेऊन मारामारीची प्रॅक्टिस करणारे लोक, असंच वाटायचं. तेव्हा आपले बाबा संघाचे आहेत म्हणजे काय हे कळतही नव्हते. एकदा आगाऊपणे त्या मैदानात जाऊन, ‘तुम्ही मुलींना का घेत नाही खेळायला?’ असं पाय आपटून विचारून त्या कॉलेजमधल्या दादाचा (’शिक्षक’ शब्द नंतर कळला) हतबुद्ध चेहरा पाहिल्याचेही आठवते.
तेव्हा ’संघ’ म्हणजे ’सरकारला ज्यांची भीती वाटते असे लोक’ असा माझा ग्रह झाला. संघाचं रूप खरं कळायला लागले आणीबाणी संपल्यावरच! तोपर्यंत सामाजिक बदल म्हणजे काहीतरी महत्वाचं असतं आणि ते करू इच्छिणारे काही लोक संघासारख्या रचनेत काम करत असतात एवढे कळायला लागले होते. त्यानंतर आता पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आहे. (थोडक्यात वय वाढलं आहे..) संघाचं कुटुंब केवढे विशाल आहे आणि त्यातल्या प्रत्येक घरात संघ किती खोलवर रुजला आहे, ते कळू लागलं आहे.
एका परिचिताने सांगितलेल्या आणीबाणीच्या त्या काळात घडलेल्या काही आठवणी ह्या विशालतेला अजूनच गहिरा अर्थ देतात. अटकेचे वॉरंट निघालेले एक भूमिगत प्रचारक मराठवाड्यातील एका घरात गेले. नुकताच त्या घरातील गृहस्थांना पोलिसांनी चौकशीसाठी बराच त्रास दिला होता. त्यांच्या भावाला अटक करून नेले होते. त्यामुळे ते खूप उद्विग्न होते. त्या मनस्थितीत त्यांनी सांगितले, ‘मी आता फार सहन करू शकत नाही, तुमचा ठावठिकाण मी पोलिसांना सांगणार.‘ प्रचारक शांतपणे म्हणाले,’तुमच्या घराने आम्हाला आजवर इतके दिले आहे की, तुम्ही कराल ते मान्य.. मी इथेच थांबतो.’ यजमान देवडीपर्यंत गेले असतील तोच इतका वेळ गप्प बसलेली त्यांची पत्नी कडाडली, ‘पाऊल मागे घ्या. जर तुम्ही दरवाजा ओलांडलात तर भाऊजी सुटतील पण नाते संपेल. तुमचे आणि माझेही... तुम्ही काय करायला निघाला आहात त्याचा विचार करा.. मागे फिरा..’ त्यांचा बाहेर पडणारा पाय आत परतला. संघाशी असलेले स्वयंसेवकाच्या घराचे नाते किती खोलवर रुजलेले असते ते अशा कसोटीच्या क्षणी उजळून आलेले दिसते.
अजून एक अशीच समजलेली कहाणी! एका दूरच्या तालुका गावातील कुटुंबातलं चित्र!! काही कारणाने जुन्या-नव्या पिढीत ताणतणाव निर्माण झालेला. इतका की मुलानं वडिलांना धमकी दिली होती की, ’मला मनासारख्या मार्गाने जाऊ दिलं नाही तर आत्महत्या करीन!’ वडिलांनीही रागाच्या भरात म्हटलं, ‘माहीत आहे मोठा शूरवीर आहेस ते! जा तुला काय करायचं ते कर...’ मुलगा तणतणत निघाला. वाटेत त्याला एक मित्र भेटला., त्यानं प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं आणि म्हणाला, ’चल, आपण माझ्या काकांकडे जाऊ!’ आपल्याला वाटेल की, ते काका कोणीतरी मोठे शिक्षक असतील, गावातले प्रतिष्ठित नागरिक असतील, किंवा समुपदेशक असतील. पण ते यातले कुणीच नव्हते, ते त्या गावचेही नव्हते. ते होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रचारक! त्या मुलाचा प्रश्न, त्याच्या कुटुंबाचा प्रश्न जणू काही आपल्याच कुटुंबातील आहे, असं समजून त्यांनी त्यात उडी घेतली आणि त्यांची मनःशांती परत आणली आणि ते वादळ पेल्यातच विझले.
गेल्या तीस-पस्तीस वर्षांत महाविद्यालयीन काळापासून आजवर कितीतरी सामाजिक निमित्तानी देशातील विविध प्रांतात काही ना काही संपर्क-येणेजाणे झाले. त्या प्रत्येक वेळी संघाचा एकेक पैलू उलगडत गेला. 1986 साली गुरखा आंदोलन अभ्यासण्यासाठीचा कलकत्यात गेलो होतो तेव्हा बंगाल प्रांताचे प्रांतसंघचालक डॉ. सुजीत धर आमच्याशी गप्पा मारण्यासाठी आम्ही उतरलो होतो, त्या धर्मशाळेत आले होते. आम्ही इतक्या दुरून असा काही अभ्यास करायला आल्याचं कौतुक त्यांनी व्यक्त केले. आणि मग म्हणाले, आता इथून पुढे तुमची सगळी जबाबदारी आमची.. काळजी करू नका. तुमचा हेतू पूर्ण सफल होईल.. काहीही अडचण झाली तर मी सांगतो त्यांना भेटा. मी तुमचा ‘दादाजी’च आहे असे समजा!’ आणि खरोखरच दार्जिलिंग परिसरातील संघाचे प्रचारक वीरेंद्र विष्ट हे पूर्ण वेळ आमच्यासोबत त्या प्रवासात राहिले. काही वर्षांपूर्वी केलेल्या ‘ईशान्य भारत प्रवासात’ मूळचे केरळचे असलेले लालकुमारजी ज्या तळमळीने ’अरुणाचल’मधला भू:स्खलनाचा आणि धर्मांतराचा प्रश्न सुटावा म्हणून धडपडताहेत ते पाहिलं तेव्हा ’संघ’ नावाच्या संस्कारभूमीचं पोषण किती प्रभावी आहे ते पुन्हा कितीतरीव्यांदा लक्षात आलं. ‘संघ काही करत नाही पण तरी सगळं घडत जाते’ ह्या म्हणण्यातला ‘between the lines’ चा अर्थ जास्त कळायला लागला आहे, असं वाटतं.
संघाचे कुटुंब म्हणजे समाजाशी नाळ जोडलेले कुटुंब. त्यात एकट्या-दुकट्याची भागीदारी नाही. आपला भाऊ, आपला नवरा, आपले वडील हे संघाच्या बैठकीला जातात म्हणजे नेमकं काय करतात असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडत असणार, विशेषतः ज्यांच्या माहेरी संघाची फार पार्श्वभूमी नाही अशांना तर जास्तच स्वाभाविकपणे ते पडतात. नोकरी-व्यवसायासाठी राबणं हे त्यांनी पाहिलेले असते, आणि जनरीत म्हणून जगण्याची गुणवत्ता काहीशी उंचावावी म्हणून ते स्वीकारलेलेही असते.
पण ज्या कामातून छदामाचीही कमाई नाही (उलट बर्याचदा स्वत:च्या खिशातूनच पैसे घालवण्याची शक्यता जास्त) अशा लष्कराच्या भाकरी स्वेच्छेने आणि धडपडून भाजण्यामागचं अजब तर्कशास्त्र समजणं अवघड असतं. या बाबतीत मला बाबांनी सांगितलेला एक खूप जुना किस्सा आठवतो. एका संघ कार्यकर्त्याला रात्री कुठेतरी एका बैठकीला जायचं असतं. नेमकी तेव्हाच त्याच्या आईला जरा कणकण वाटत असते. औषध वगैरे देऊन तो बैठकीला जायला निघणार एवढ्यात आई तणतणत म्हणते, ‘निघालास का भारतमातेच्या किंकाळ्या ऐकायला? इथे मी-सख्खी आई किंकाळ्या फोडतीये, जवळ बस म्हणून! त्या नाही ऐकू येत तुला?’ यातला गमतीचा भाग सोडून दिला तरीसुद्धा कुटुबियांचं हे वाटणं त्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर खूप स्वाभाविकच असतं. याचं मूळ कारण म्हणजे त्या प्रकारच्या कामाची जाण किंवा पुरेशी माहिती नसणं आणि दुसरं म्हणजे खरोखरच ’कामाच्या धुंदीत’ काही वेळा कुटुंबियांच्या या मानसिक गरजांची पुरेशी दखल कार्यकर्त्यांकडून न घेतली जाणं हे असू शकत..., पहिल्या कारणावरच्या उपायाची सुरुवातही ज्याला संघ जास्त समजला आहे त्याच व्यक्तीनं करायला हवी नाही का? काही दशकांपूर्वीपर्यंत जेव्हा बहुतेक स्त्रिया मुख्यतः गृहिणीच होत्या किंवा स्वतःच्या मत-विचारांना सहजासहजी मुरड घालत होत्या, ( हे चांगलं का वाईट हा भाग अलाहिदा)... तोपर्यंत ‘नवरा किंवा वडील जे करताहेत त्याला त्यांचा पाठिंबा आहेच आणि त्यासाठी लागेल तो अधिकचा ’संसारताप’ पत्करायला त्या तयार आहेत’ अशीच धारणा अनेकांची होती. त्यातून ज्यांनी संघाचे स्वरूप, उद्दिष्टे समजून घेऊन संघ कार्यकर्त्यांच्या जीवनशैलीचा / व्यस्ततेचा / कुटुंबामध्ये प्रत्यक्ष वेळ कमी देण्याचा स्वीकार केला त्यांना जुळवून घेण्यात फार अडचण आली नसावी. पण विविध कारणांनी ज्यांना हे समजून घेणं अवघड होतं त्यांना मात्र मनातून कदाचित या सर्व उठाठेवीबद्दल/एकूणच संघाबद्दल काहीशी प्रतिक्रियात्मक/ नकारात्मक भावना निर्माण होत असेल तर त्यात नवल नाही. सद्गुणांचा आणि सत्कार्याचाही overdose झाला तर त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो आणि कुटुंबाप्रती असलेल्या कर्तव्याची आणि स्नेह जपण्याची गरज आहे हे लक्षात आले तर घरचेही अत्यंत समजुतीने कार्यकर्त्याला पुढच्या जबाबदार्या घेण्यात मनापासून सहकार्य करतात हे दिसते.
ह्याचे कारण मुळात ‘कुटुंब’ ह्या रचनेवर आणि त्याच्या सामाजिक योगदानावर असलेला संघविचारांचा दृढ विश्वास असं मला वाटतं. ’हक्क’ अन्याय-शोषण अशा भूमिकेत न जाता होणार्या ‘राष्ट्रउभारणीसाठी कुटुंब’ हा दृष्टीकोन जपून झालेल्या प्रगल्भ हाताळणीमुळे कुटुंबातील संघर्ष आणि संघकामाची हानी दोन्ही टाळता येते, असे अनेक प्रसंगांतून दिसते.
त्यासाठी संघाच्या जाणत्या कार्यकर्त्यांनी अशा हजारो कुटुंबांमध्ये नाती टिकवण्यावर-वाढवण्यावर-त्यात सद्विचारांचेे सिंचन होण्यावर आवर्जून काम केले आहे. कै. दामुआण्णा दाते ह्यांनी तर फार योजनापूर्वक अशा ’संवाद-विकसनावर’ जोर दिला होता. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका परिवार संमेलनाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली होती. सर्व कुटुंबियांचा परिचय करून झाल्यावर ते म्हणाले, संघ परिवारातल्या सगळ्यांच्या मनातली एक रुखरुख मला जाणवली ती तुम्हाला सांगतो. या सगळ्या म्हणताहेत की, तुम्ही कुठेही जा, कितीही काम करा, फक्त आम्हाला नीट समजावून सांगा, वेळेवर निरोप द्या आणि स्वतःच्या खाण्यापिण्याची आबाळ करू नका... जेव्हा मनातून तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांना मान द्याल, त्यांना गृहीत न धरता सगळं नीट पोचवाल, पाहा बरं, तुमच्या कामाची परिणामकारकता शंभर पटींनी वाढेल आणि ज्यांच्या मनात ही रुखरुख आहे, त्यांनी पण हे नक्की लक्षात ठेवा की, ते या कामात आहेत म्हणून कुठल्याही व्यसनांना बळी पडत नाहीत इतकाच नाही तर दुसर्याच्या घरातही चांगलंच घडावं म्हणून धडपड करत आहेत. मग तुम्हीच ठरवा की, यातून किती आनंद तुमच्यापर्यंतही पोचेल?’ अशा संवादामुळेच संघ परिवारातील महिला ‘आमचा भाऊ/नवरा/मुलगा संघात जातो‘ हे अभिमानाने आणि आनंदाने स्वीकारू लागल्या आहेत इतकंच नाही तर ते व्यक्तही करत आहेत. जर त्यातील कुणी चुकत असेल तर त्याचा कान पकडायलाही घरातील मातृशक्ती मागेपुढे पाहात नाही. हा घरातला ’अंकुश’ किंवा आजच्या भाषेत सीसी टीव्ही कॅमेरा’ किती महत्त्वाचा आहे, नाही का?
खरंच संघातील कार्यकर्ते हे अनेकानेक कुटुंबांशी - सर्व सामाजिक भिंती ओलांडून कसे जोडले जातात ते कळण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव आणि अगदी स्वच्छ, पूर्वग्रहविरहित नजर हवी. इतक्या प्रचंड संख्येनं दर वर्षी विस्तारक/प्रचारक संघकामासाठी बाहेर पडतात, स्वयंसेवकांची शेकडो-लाखोंच्या संख्येने शिबिरे होतात, कुठलातरी प्रचारक कधी हॉटेलमध्ये भाड्याने खोली घेऊन उतरला असेल का हो? तो कार्यकर्ता ज्या गावात जाईल तिथल्या कुठल्यातरी घरात त्याला ’भाऊजी/काका/दादा’ म्हणून आस्थेनं सामावून घेतलं जाईल. स्वतःच्या ताटातल्या भाकरीचा चतकोर तुकडा बाजूला काढला जाईल आणि तोही तितक्याच सहजपणे, जे आहे त्याचा आनंदानं स्वीकार करेल. त्या कुटुंबातील मातृशक्ती संघाचं नित्य भरण-पोषण करत राहिली आहे. लाखो गृहस्थाश्रमी व्यक्तीच्या आधारावर संघ कुटुंब विशाल बनलं आहे. संघाचे कुठलेही शिबिर कुठेही असो, घरोघरच्या माऊलींकडून आलेल्या हजारो पोळ्या शिबिरार्थींच्या पानात पडतात, जणू प्रत्येक आई आपल्याच मुलासाठीचा घास बाजूला काढून तिकडे पाठवत असते.
संघाच्या कुटुंबांमध्ये सुखाचे क्षण असोत की दुःखाचे, ताणाचे त्यात सहभागी होण्यासाठी कुणाला निमंत्रण छापावी लागत नाहीत की मदतीसाठी वाट बघावी लागत नाही, एका अनामिक अशा आस्थेच्या संपर्क जाळ्यातून पाहातापाहाता अनेकजण त्यात सहजपणे भागीदार होतात. कोरोनाच्या काळात संघपरिवारातील स्त्रियांनी अनेक बाधित रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःही प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले. रुग्णांना दहा-दहा दिवस डबा देण्यापासून त्यांच्या कुटुंबियांना समुपदेशन करण्यापर्यंत अनेक जबाबदार्या पेलल्या.
’संघाचं कुटुंब’ असं विशाल आणि वर्धिष्णू आहे म्हणूनच ‘कुटुंबातला संघ’ ही तितका मुरत जाताना दिसतो, अगदी स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत काही मूल्यसंस्कार पोचतात. सामाजिक जाणीवेचे संक्रमण होते. कामानिमित्त अनेक ठिकाणी फिरताना अगदी तालुका ते महानगरांपर्यंत जेव्हा अशा अनेक कुटुंबांमध्ये राहाण्याचा/जेवण्याचा योग येतो तेव्हा आपल्या घरातल्या एकट्या-दुकट्या माणसाची नव्हे तर पूर्ण कुटुंबाचीच राष्ट्रहिताशी बांधिलकी आहे, हा विचार सहज झिरपत गेलेला जाणवतो. ज्याच्या त्याच्या वृत्ती-प्रकृतीनुसार तो आचरणात येतो. संघविचारांच्या कुटुंबातल्या सदस्यांना भावकी/गावकीच्या पलीकडचं समाजदर्शन फार आपसूक होतं असंही मला वाटते. ’आपले-परके’पणाचे अडसर चटकन गळून पडतात. आज संघ परिवारातील अनेक उपक्रमांमध्ये स्वयंसेवकांच्या कुटुंबातील महिला केवळ मदत नव्हे तर नेतृत्व आणि संपूर्ण व्यवस्थापन सांभाळत आहेत. पंच परिवर्तन ही शताब्दी वर्षातील घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी घरोघर जाणार्या शेकडोजणी संघविचार आणि आचार समाजाच्या सर्व स्तरांत पोचवत आहेत. त्यामुळेच कुटुंबातल्या व्यक्तीच्या अहंकारालाही नकळत एक सीमा येते असंही जाणवतं, कारण अनेकांना सामावून घेण्याची एक सवय नकळत पडलेली असते.
काही वेळा संघाचे काम म्हणजे फक्त विशिष्ट समाजाच्या / उपासनापंथाच्या लोकांचं एकत्र येणं आणि त्यात इतरांना ’प्रवेशबंदी’ आहे असाही (गैर)समज प्रचलित आहे. माहेरी आणि सासरी दोन्हीकडच्या संघवर्तुळांमध्ये मी अनुभवलं आहे की, संघाची ’हिंदुत्वाची’ व्याख्या फार विशाल आहे. एकाच उपासनामार्गाचा अट्टाहास त्यात नाही. ’राष्ट्र’ म्हणजे हजारो वर्षांपासूनच्या प्रवाही अशा जीवनशैलीशी, सांस्कृतिक जाणीवांशी आणि पूर्वस्मरणांशी जोडलेला लोकसमूह - अशीच ती व्याख्या आहे. व्यवहारामध्येही जे-जे लोक अशी व्यापक व्याख्या मानतात आणि या अशा राष्ट्रहितासाठी अनुकूल असतात त्या सर्वांना खरंतर संघाच्या रचनेत ’आपलं’ मानलेलेच आहे. आग्रही असणं म्हणजे आक्रमक असणं नव्हे, हे सुद्धा विचाराअंती कळत जात आहे. संघाची बांधीलकी म्हणजे सहवर्तनाची जपणूक, नैतिकतेची जपणूक हे सुद्धा स्पष्टपणे कळलं आहे. (सामाजिक दृष्टीचा स्पर्श असणार्या अन्य संघटनांमध्येही हे असेल पण मी फक्त स्वतःच्या दीर्घ अनुभवाआधारे मांडत आहे.) कुटुंबांतले अनैतिक व्यवहार, अकारण संघर्ष, निर्बल व्यक्तीचे शोषण, रुढी-परंपरांमुळे होणारी शारीरिक किंवा मानसिक हिंसा, व्यसनाधीनतेमुळे येणारी उध्वस्तता या सार्यांचे प्रमाण संघविचार खर्या अर्थानं मुरलेल्या कुटुंबात जवळजवळ शून्यावर आहे असं मला वाटतं. (पण याचा वस्तुनिष्ठ अभ्यास करायला नक्की आवडेल.)
संघाचं कुटुंब जसं विशाल बनत आहे तसाच मूळचे सत्व कायम ठेवून कुटुंबातला संघही कालानुरूप बदलतो आहे. त्यामुळे वरवरची परीक्षणे न करता खोलात जाऊन हा अनुभव घेणे आणि संघ कार्यकर्त्यांचे आणि कुटुंबसंस्थेचे नाते समजून घेणे हे खूप वेगळं दर्शन घडवून जातं हे नक्की म्हणता येईल.
(माहेर मासिकाच्या संघशताब्दी विशेषांकातील ‘संघाचे कुटुंब आणि कुटुंबातील संघ‘ ह्या लेखाचे संस्कारित पुनर्लेखन.)