@ व्यंकटेश कल्याणकर
7798703952
ऑनलाईन गेम्स नियंत्रण ठेवणे हे आपल्याच हातात आहे. ही केवळ गेम्समधून व्यापार करण्याची पद्धत नाही, तर थेट राष्ट्रविरोधी शक्तींनी एकत्र येऊन सुरू केलेले सौम्य युद्ध आहे की काय? अशी शंका निर्माण होण्यास बळ मिळत आहे. याचा शोध शासनाने घेणे आवश्यक आहे. तो शासन घेईलही. तूर्तास स्वत:चे कुटुंब, स्वत:ची मुले आणि राष्ट्राची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपण अधिक सजग राहणे आवश्यक आहे.
जर्सला आनंद देत मनोरंजन करणारे ऑनलाईन गेम्स तयार करून स्वत:चा व्यवसाय (अॅप) वाढवणं गैर नाही. पण भारतातील किशोरवयीन मुला-मुलींचे आयुष्य वाईट अर्थाने प्रभावित करून अखेर त्यांना कल्पनाविश्वात रममाण करत, त्यांच्या प्राणाशी खेळलं जाणं हे क्रूरपणाचं लक्षण आहे. भारतात या गेम्सचा ट्रेंड, व्यापार आणि लोकप्रियता वाढत जाणं धोक्याची घंटा आहे. याचा शासन, पालक, शिक्षण संस्था तसेच स्वत: किशोरवयीन मुलांनीही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. हे वेळीच रोखलं नाही, तर राष्ट्राची संपत्ती समजली जाणारी एक संपूर्ण पिढी नष्ट होण्याचा धोका संभवतो. हे केवळ ऑनलाईन गेमचेच जाळे आहे की यामागे राष्ट्रविरोधी शक्तींचा हात आहे, हे तपासण्याची वेळ आली आहे. गाझियाबादमध्ये झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या विषयाची पुन्हा नव्याने चर्चा करणे आवश्यक आहे.
काय आहे गाझियाबादमधील घटना?
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील शालीमार गार्डन परिसरातील भारत सिटी सोसायटीच्या परिसरात रात्री सव्वा दोन वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला तीन लहान मुलींचे मृतदेह आढळून आले. या तीन मुली भारत सिटी सोसायटीत राहणार्या चेतनकुमार यांच्या कन्या होत्या. त्यांची नावे निशिका (16), प्राची (14), पाखी (12) असून यातील दोन सख्ख्या बहिणी होत्या तर या दोघींची तिसरी सावत्र बहीण होती. या तिघीही कोरोनानंतर आपल्या शाळेत गेल्या नव्हत्या. कारण त्या तिघीही ‘कोरियन लव्ह’ नावाच्या ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्या होत्या. त्यांचे आईवडीलही त्रस्त होते. त्या दिवशी मंगळवारी सायंकाळी वडील त्यांना रागावले. तेव्हा त्या तिघींनीही स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. त्याच रात्री सव्वा दोन वाजता त्या तिघींनी नवव्या मजल्यावरून खाली उडी मारून आपला जीव दिला. त्यांचे मृतदेह सोसायटीच्या परिसरात आढळले. त्यांच्या खोलीत काही विचित्र चित्रे आणि एक शेवटचे पत्र लिहिलेले आढळले.
तीन मुलींनी नवव्या मजल्यावरून उडी का मारली?
या घटनेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, त्या तिन्ही मुलींना ‘कोरियन लव्ह’ नावाच्या गेमचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्यांना कोरिया आणि कोरियन तरुणांविषयी आकर्षण निर्माण झाले होते. त्या स्वत:ला भारतीय नव्हे तर कोरियन समजत होत्या. त्यांनी लिहिलेल्या शेवटच्या चिठ्ठीमध्ये त्यांनी कोरिया हेच आमचे जीवन असून ते सोडू शकत नसल्याचे म्हटले होते. गेममधील टास्कच्या आहारी जाऊन त्यांनी नवव्या मजल्यावरून उडी मारली की वडील रागावल्याने आणि गेमपासून दूर राहण्यास सांगितल्याच्या रागातून आत्महत्या केली हे स्पष्ट झाले नसले तरीही, हा गेमच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला यात शंका नाही.
काय आहे कोरियन लव्ह गेम?
कोरियन लव्ह हा ऑनलाईन टास्क बेस्ड इंटर अॅक्टिव्ह गेम आहे. या गेमचं ब्रीदच आहे ‘वुइ आर नॉट इंडियन्स वुई आर कोरियन्स’. हा केवळ गेम नसतो तर गेम, सोशल मीडिया आणि सिरीज यांचे मिश्रण असतं. म्हणजे यात व्हर्च्युअल बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड असते; चॅट, कॉल, मेसेज केले जातात. टास्क/चॉइस दिला जातो आणि अखेर गेम खेळणार्या व्यक्तीला भावनिकरित्या गुंतवून ठेवले जाते. त्यातून त्याला एका अर्थाने नियंत्रित केले जाते. उदाहरणार्थ, ”तुला माझी आठवण येते का?”, “माझ्यासाठी हे करशील का?, “माझ्यासाठी हे कर ना प्लीज!” गेमिंग इंडस्ट्रीमध्ये या प्रकाराला ओटोमी गेम्स (डेटिंगसारखे गेम), परस्परसंवादी गोष्टीरूप गेम, चॅट सिम्युलेशन गेम, रोमान्स नॅरेटिव्ह अॅप वगैरे म्हटले जाते.
अशा गेम्सची निर्मिती आणि अर्थकारण काय?
ऑनलाईन टास्क बेस्ड इंटर अॅक्टिव्ह गेम साधारणपणे दक्षिण कोरिया, जपान आणि चीनमधून अशा प्रकारचे गेम्स अधिक प्रमाणात तयार होत असल्याचे दिसून येते. स्टोरीटॅको, जिनिअस स्टुडिओ जपान, डे7 किंवा बफ स्टुडिओ, नवेर वेबटून इत्यादी कंपन्यांकडून हे गेम्स तयार केले जातात. संपूर्णत: युजरच्या माहितीच्या आधारावर हे गेम्स आधारलेले असतात. त्याला डेटा-ड्रिव्हन एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हटले जाते. हे गेम्स तयार करण्यासाठी गेम डेव्हलपर्स, पटकथा लेखक, मानसशास्त्रज्ञ, डेटा सायंटिस्ट यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. गेम्समध्ये भावनिक पॅटर्न, खर्च करण्याचा स्वभाव, काल्पनिक नातेसंबंधाचा प्राधान्यक्रम इत्यादीचा विचार केला जातो. युजर्सकडून अधिकाधिक प्रतिसाद मिळू शकेल, अशी रचना आणि कार्यपद्धती तयार केली जाते. या गेमचे अर्थकारण प्रामुख्याने पेड सर्व्हिसेसवर आधारित असते. म्हणजे प्रिमियम चॅट अनलॉक, स्पेशल डेट सीन, रोमँटिंग एडिंग, व्हॉईस मेसेज अनलॉक अशा नावाखाली 80 रुपयांपासून ते 5000 रुपये आकारले जातात. यामध्ये पेड युजर्सची संख्या जरी छोटी असली तरीही त्यांच्याकडून मिळणारे उत्पन्न हे नियमित असते. शिवाय भारतातील किशोरवयीन मुला-मुलींना टार्गेट करून त्यांना नष्ट करण्याकरिता राष्ट्रविरोधी शक्ती अशा गेम्सच्या निर्मितीत योगदान देत आहेत का, हे तपासणे गरजेचे आहे.
पालकांची भूमिका
गाझियाबादच्या घटनेत बहुतेकांच्या मनात हाच विचार आला असेल की ‘पालक काय करत होते? त्यांनी लक्ष देणे आवश्यक होते?’ असा विचार येणे स्वाभाविक आहे. पालकांनी लक्ष देणे आवश्यकच आहे. मात्र किशोरवयीन मुलांना त्यांच्या आवडीनिवडी ठरविण्याचे स्वातंत्र्य त्यांना अपेक्षित असते. ती अपेक्षाही नैसर्गिकही आहे. मात्र हे स्वातंत्र्य अबाधित, अमर्याद आणि त्यांचा प्राण घेणारे असू नये, याची जाणीव पालकांनी करून देणे आवश्यक आहे. आता तर अशी वेळ आलेली आहे की, ही गोष्ट शाळेत-महाविद्यालयातही शिकविणे आवश्यक आहे.
पालकांनी काय करावे
* मुलांना घरात त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाहीत असे वाटू देऊ नका.
* मुलांची उत्सुकता जिवंत राहील यासाठी कौटुंबिक सोहळे, सहल करीत रहा, त्यांना गोष्टी सांगत रहा.
* मुलांना छोट्या-छोट्या गोष्टींची जबाबदारी देऊन त्यांना घरात स्थान मिळत आहे, अशी भावना जागृत करा. उदा. दररोज भाजी आणणे, किराणा आणणे, काही बिल्स भरणे वगैरे
* मुलांच्या आयुष्यात वरील गोष्टी नसतील तर त्या गोष्टी ते गेम्समधून शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांना नियंत्रित करण्यापेक्षा त्यांच्याशी भावबंध वाढवा.
पालकांनो, धोका ओळखा
* मुले फोन लपवत असतील, रात्री अपरात्रीपर्यंत फोन वापरत असतील, अचानकपणे मुलांचा मूड बदलत असेल किंवा ते कुटुंबापासून दूर राहत असतील तर हा धोक्याचा इशारा समजा. अशावेळी त्यांच्याशी संवाद वाढवा.
* मुले काल्पनिक कॅरेक्टरबद्दल अधिक गप्पा मारत असतील, त्यांचे खरे मित्र-मैत्रिणी कमी झालेले असतील किंवा त्यांच्याशी संवाद कमी झाला असेल, मुलांची अभ्यासातील प्रगती अचानकपणे खालावली असेल तर मुलांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे समजा.
* सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपली मुले कोणत्याही अनोळखी अॅप्सला गुगल प्ले किंवा अॅप स्टोअरमधून पैसे ट्रान्सफर तर करत नाहीत ना, याची खात्री करा.
समारोप
माहिती, मनोरंजन आणि संवादाची साधने आता आपली मर्यादा ओलांडून आपल्या घरात शिरले आहेत. त्यांवर नियंत्रण ठेवणे हे आपल्याच हातात आहे. ही केवळ गेम्समधून व्यापार करण्याची पद्धत नाही, तर थेट राष्ट्रविरोधी शक्तींनी एकत्र येऊन सुरू केलेले सौम्य युद्ध आहे की काय? अशी शंका निर्माण होण्यास बळ मिळत आहे. याचा शोध शासनाने घेणे आवश्यक आहे. तो शासन घेईलही. तूर्तास स्वत:चे कुटुंब, स्वत:ची मुले आणि राष्ट्राची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपण अधिक सजग राहणे आवश्यक आहे.
प्रकल्प संशोधक
माध्यम व प्रकाशन केंद्र, यशदा, पुणे