“संघ कसा जगायचा, हे दादा रत्नपारखी यांनी शिकवले” - शरदराव ढोले

विवेक मराठी    24-Feb-2026
Total Views |
rss
 
नाशिक येथील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक व पूर्व नाशिक विभाग कार्यवाह तसेच नाशिकमधील अनेक संस्थांचे पदाधिकारी राहिलेले स्वर्गीय प्रा. रमेश धोंडोपंत तथा दादासाहेब रत्नपारखी यांच्यावरील ‘मार्तंड जो तापहीन’ या स्मृतीग्रंथाचे नाशिक येथे नुकतेच प्रकाशन झाले. या प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण समन्वय संयोजक शरदराव ढोले उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांची विशेष उपस्थिती होती. या स्मृतीग्रंथाचे संपादन गोविंद यार्दी, दिलीप क्षीरसागर, राजेश रत्नपारखी व कौमुदी परांजपे यांनी केले आहे.
श्री शरदराव ढोले यांच्या उद्बोधक भाषणाचे शब्दांकन दिलीप क्षीरसागर (नाशिक) यांनी केले आहे, साप्ताहिक विवेकच्या वाचकांसाठी ते देत आहोत.
 
स्व. दादा रत्नपारखी हे समजून उमजून काम करणारे संघ कार्यकर्ते होते. त्यांना मार्तंड म्हटलेले असले तरी ते शांतिब्रह्म होते. समर्पण, साधेपणा, प्रसिद्धीपराङमुख यात ते मार्तंड होते. त्यांनी पुढच्या पिढीला काय दिले? तर संघ कसा जगायचा हे त्यांनी शिकवले. संघाचं काम त्यांनी श्रद्धेने केले. श्रद्धा म्हणजे काय? तर सतत धारयेत - सतत प्रवाही राहिलेले. दादांचे संघकाम त्याप्रमाणे श्रद्धेने होते. त्यांच्यात ऋजुता होती, मिस्कीलपणा होता. आपण पूजेनंतर सोवळे सोडतो तितक्या सहजपणे अनेक संस्थांच्या खुर्च्या त्यांनी सोडल्या. मी स्वतः 35 वर्षांचा असताना नाशिक विभाग प्रचारक होतो. तेव्हा दादा 65 वर्षांचे होते.
शब्देवीण संवाद
 
 
Word currupts असे म्हणतात. कारण त्यातून तसेच भाव प्रकट होत नाहीत. कै. दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवनातील एका प्रसंगावरून हे आपल्याला लक्षात येते. दत्तोपंत एकदा नेहमीप्रमाणे प्रवासात कुठल्यातरी नवीन घरी जेवायला गेले होते. तेव्हा त्यांनी जेवण झाल्यावर सहज म्हटले की, वहिनी, भाजी उत्तम झाली आहे. त्यावेळेस त्या वहिनी खुश न होता रागावल्या आणि म्हणाल्या, तुम्ही पण त्यातलेच की! आमचे हे कुठल्याही पदार्थात मीठ कमी झाले, काही चुकलं की ते म्हणतात, उत्तम झाले आहे बरं का! त्यामुळे Word currupts....असे म्हणतात. मनातील भाव शब्दांमध्ये तसे प्रकट होतातच असे नाही. त्यामुळे ’शब्देवीण संवाद’ करण्याची जी शक्ती असते ती दादांकडे होती.
 
 
नाशिकमधील शंकराचार्य न्यासाचे ते शासननियुक्त अध्यक्ष होते आणि ते अध्यक्ष असताना त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना त्या न्यासामध्ये सक्रिय केले. आत्मविलोपी वृत्ती हे दादांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे.
 
 
दादा कायम कार्यवाह
 
दादांचे पहिले दायित्व म्हणजे ते एका शाखेचे कार्यवाह होते तसेच ते पुढे नाशिक शहर, नाशिक जिल्हा व तत्कालीन नाशिक विभाग (धुळे, जळगाव सह) कार्यवाह होते. काही जणांकडे कार्यवाह ही जबाबदारी कायम चालत येते. तसे त्यांचे होते. विशेष म्हणजे आणीबाणीमध्ये नाशिक कारागृहातील दीड वर्ष बाराशे स्वयंसेवकांची शिबिर सदृश्य अंतर्गत अधिकारी व्यवस्था स्वयंसेवकांनी बसवली होती. त्यातदेखील दादा रत्नपारखी दीड वर्ष कार्यक्रम घेण्यासाठी कार्यवाहच होते व स्व. प्रल्हादजी अभ्यंकर हे सर्वाधिकारी होते.कार्यवाहपद हे संघातले अवघड पद आहे. त्यात लष्कराच्या भाकर्‍या भाजायच्या म्हणून शिव्या खाव्या लागतात आणि घरच्या तर शिव्या खाव्याच लागतात.
 
 
दादांचे घर संघाचे
 
आजकाल संघाला सर्वत्र अनुकूलता आहे. कुठलीही वास्तू-इमारत ही संघाच्या कामाला पाहिजे असेल तर तेथील संस्थाचालक आपणहून ते द्यायला तयार होतात. परंतु ज्यावेळी अशी अवस्था नव्हती संघाला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, जेव्हा सार्वजनिक वास्तू मिळण्याचे अवघडच होते आणि संघाचे कार्यालय देखील लहान होते, तेव्हा दादांचे रविवार कारंजावरील प्रशस्त घर हेच जणू काही संघाचे कार्यालय होते. हे घर केवळ निर्जीव घर नव्हे तर घरात असलेल्या सर्व माणसांसहित हे घर समर्पित घर होते. पुढे दादांनी हे त्यांचे टोलेजंग घर जुने झाल्यानंतर पुनर्विकासासाठी जी इमारत बांधली त्यातील त्यांच्या वाटेला आलेली सदनिका त्यांनी जनकल्याण समितीच्या मनोहर रुग्णसेवा प्रकल्प या रुग्णोपयोगी साहित्य वितरण केंद्रासाठी दिली. त्याच्या वर्धापन दिनाला तत्कालीन विभाग कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी दादांना असे म्हटले होते की, तुम्ही ही वास्तू दिलेली आहे. तुम्ही वर्धापन दिनाला यावे असे आम्हाला वाटते. पण त्यावेळेस दादा त्या कार्यक्रमास आले आणि त्यांनी सांगितलं की, इथून पुढे रत्नपारखी कुटुंबियांची या सदनिकेवरची मालकी संपलेली आहे. आम्ही ती जनकल्याण समितीला दिलेली आहे. तुम्ही आम्हाला कोणालाही बोलावले नाही तरी चालेल. विनासंकोच तुम्ही आपले कार्यक्रम करत जा. अशी समर्पित आणि आत्मविलोपी वृत्ती फार दुर्मीळ असते.
 
संघासाठी वापरून जे उरेल ते माझे
 
दादांनी विविध व्यक्तिगत अथवा सार्वजनिक कामांसाठी शेकडो लोकांना लक्षावधी रुपये दिले असतील, असे निश्चितपणे म्हणता येईल. माझ्या प्रचारकी जीवनातील धाराशिव येथील प्रसंग आहे. धाराशिवला शिबिरात अधिकार्‍यांसाठी लागणारे स्टीलची भांडी, ताट, वाटी, पेला असे एका ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांकडून आणायची होती. ती मोजकीच भांडी त्यांच्याकडून आणली. ज्या कार्यकर्त्यांनी आणली त्यांना त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बजावून सांगितले की, हे सर्व यादी करून घेऊन जायचे आणि सर्व वस्तू न हरवता तशाच परत आणायच्या. अर्थातच शिबिर संपल्यावर काही वस्तू कमी झाल्याच. त्यामुळे त्या ज्येष्ठ स्वयंसेवकांचा कटाक्ष लक्षात घेऊन स्वयंसेवकांनी त्यांच्याकडे जाण्याचे टाळले. स्वतः मी जिल्हा प्रचारक म्हणून त्या वस्तू घेऊन त्या ज्येष्ठ स्वयंसेवकांकडे गेलो व वस्तू कमी भरलेल्या आहेत, काही हरवलेल्या आहेत असे प्रांजळपणे सांगितले. त्यावर त्या ज्येष्ठ स्वयंसेवकाने सांगितले की, अहो माझ्या घरातील सर्व वस्तू या संघाच्या आहेत. संघासाठी वापरून जे उरेल ते माझे आहे. फक्त आपल्या स्वयंसेवकांची सवय बिघडू नये म्हणून मी आग्रहाने त्यांना असे करायला सांगितले. असे शेकडो संघसमर्पित कार्यकर्ते नाशिकमधील दादांसारखे व त्या धाराशिवच्या कार्यकर्त्यांसारखे संघात आहेत, हे संघाचे वैभव आहे. म्हणून दादा रत्नपारखी म्हणजे समर्पण हे समीकरण आपल्याला सांगता येते.
 
अपेक्षित तिथे उपस्थित
 
स्वयंसेवकाचे दुसरे वैशिष्ट्य असते ते म्हणजे अपेक्षित तिथे उपस्थित! संघाची बैठक असो, कार्यक्रम असो, व्यवस्था असो, जिथे स्वयंसेवक अपेक्षित तेथे तो उपस्थित राहिला पाहिजे हा त्याच्या जीवनात त्यांनी कटाक्ष ठेवलेला असतो. दादांनी हा कटाक्ष त्यांच्या दहा-बाराव्या वयात जो प्रारंभ केला तो वयाच्या 85 वर्षांपर्यंत पार पाडला. शेवटी पडल्यामुळे पायाला इजा झाली तेव्हा त्यांना अपेक्षित तिथे उपस्थित हे आपल्या आयुष्यातले हे समीकरण थांबवावे लागले.
 
 
संघाच्या बैठकीत कार्यवाह म्हणून बैठक घेताना ज्या कार्यकर्त्याकडून आपल्याला या विषयावर प्रतिकूल मतप्रदर्शन अपेक्षित आहे, बैठकीपूर्वी अशा कार्यकर्त्याची भेट घेऊन दादा त्या सर्व मुद्द्यांचे निराकरण करीत. बैठक प्रारंभ झाल्यानंतर अनेकांच्या अपेक्षा असत की, हा विषय मांडल्यानंतर संबंधित कार्यकर्ता आता त्याला प्रखर विरोध करेल. पण लक्षात असे यायचे की, दादांचं बैठकीपूर्वीच व्यवस्थित बोलणे त्या कार्यकर्त्यांशी झालेले असल्यामुळे त्याचे समाधान झालेले आहे आणि तो त्या निर्णय प्रक्रियेत सहजपणे स्वतःच्या इच्छेने सहभागी झालेला आहे. हे दादांचे कार्यवाह म्हणून कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.
 
संघातील पारदर्शकता
 
मी नाशिक विभाग प्रचारक असतांना तत्कालीन धुळे जिल्ह्याचे कार्यवाह यांना माझ्या (ढोले) कार्यपद्धतीविषयी काही प्रतिकूल मतप्रदर्शन करायचे होते. त्यांनी दोन-अडीच पानी सविस्तर पत्र तत्कालीन प्रांत प्रचारक मा. मुकुंदराव पणशीकर यांना देण्यासाठी लिहिले आणि गंमत म्हणजे संघातली पारदर्शकता एवढी असते की, त्या जिल्हा कार्यवाहांनी हे पत्र पणशीकर यांच्याकडे देण्यासाठी खुद्द माझ्याच (ढोले) हातात दिले आणि सांगितले की, या पत्रात मी असे असे लिहिलेले आहे. मी म्हटले की, मी देतो आणि पणशीकरांना हे पत्र मीच सुपूर्त केले. ही संघातली पारदर्शकता संघाच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे.
 
 
पुढे मुकुंदराव पणशीकर यांनी तत्कालीन विभाग कार्यवाह असलेल्या दादा रत्नपारखी यांच्याकडे हे पत्र सुपूर्त केले आणि या विषयावर तुम्हीच चर्चा करावी असे सांगितले. मग दादांसह धुळ्याला भेट झाली. माझ्या उपस्थितीतच संबंधित जिल्हा कार्यवाहांशी दादांनी सविस्तर बोलणे केले. निर्णय अर्थातच विभाग प्रचारकांच्या म्हणजे माझ्या बाजूने लागला आणि विशेष म्हणजे त्या जिल्हा कार्यवाहांचे देखील समाधान झाले. हे दादांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य होते. यासाठीच मुकुंदराव पणशीकरांनी दादा रत्नपारखींना विषय पूर्ण करण्यासाठी पाठवले. कारण हे जे नैतिक बळ आहे ते दादांचे वैशिष्ट्य होते आणि समोरच्या कार्यकर्त्याला न दुखवता हळुवारपणे समजून घेणं हे त्यांचेदेखील मोठेपण होते.
नैतिक सामर्थ्य
संघाच्या हिवाळी शिबिरात एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील बालस्वयंसेवकाला आणण्यासाठी शाखेच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. त्यांनी दादांना सांगितले की, तुम्ही त्या गृहस्थांशी बोलावे. दादा म्हणाले, मी बोलतो. दादा त्या व्यापारी गृहस्थांकडे गेले. इकडच्या-तिकडच्या सर्व गप्पा झाल्या. शाखेचे कार्यकर्ते अस्वस्थ व्हायला लागले. कारण दादा काही विषय काढत नव्हते. दादांनी अर्धा-पाऊण तास सर्व सविस्तर चर्चा केली. गप्पा मारल्या. त्या स्वयंसेवकाला पाठवण्याचा विषय सोडून सर्व गप्पा झाल्या आणि शेवटी निघताना ते म्हणाले की, तुम्ही या मुलाला शिबिरात पाठवणार आहात ना? आणि काय आश्चर्य? त्या गृहस्थांनी सांगितलं, हो, जरूर घेऊन जा! जे शाखेच्या स्वयंसेवकांना नकार देत होते दादांनी तो कुठलाही विषय न काढता, त्याचे कुठलेही स्पष्टीकरण न देता वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पा मारून त्यांच्याशी संवाद साधला आणि निघताना त्यांची परवानगी काढली हेदेखील दादांच्या व्यक्तिमत्त्व व नैतिक बळाचेच सामर्थ्य होते.
 
संस्था पदाधिकारी
 
दादांनी संघाचे तीन दशकाहून अधिक काळ कार्यवाह म्हणून दायित्वाचे निर्वहन केले. तसेच नाशिकमधील विविध संस्थांच्या (भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, भगूर शिक्षण प्रसारक मंडळ, लोकमान्य शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था, आयुर्वेद सेवा संघ, शंकराचार्य न्यास) उभारणी, संवर्धन आणि विकासात देखील मोठे योगदान दिलेले आहे.
 
 
नाशिकच्या भोसला संस्थेत त्या काळात पदाधिकार्‍यांमध्ये एक मोठे वादळ उभे राहिले. ते नाशिकच्या कार्यकर्त्यांना ज्ञात आहे. त्यात दादांना देखील मानसिक त्रास झाला. परंतु त्याचा कोणताही परिणाम त्यांच्या वागण्यात अथवा संघकामात त्यांनी होऊ दिला नाही. तसेच वादळ जळगाव जनता बँकेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात अत्यंत प्रभावी अशा संघ कार्यकर्त्याच्या व्यक्तिमत्त्वाभोवती उभे राहिले. दादांनी विभाग कार्यवाह या जबाबदारीने जळगाव जिल्ह्यात बैठक घेऊन संबंधित पदाधिकार्‍यांशी भरपूर सविस्तर चर्चा केली. सर्व कार्यपद्धतीचे विश्लेषण केले आणि त्या पदाधिकार्‍यांचे मन वळवले. हे दादा करू शकले. कारण कार्यकर्त्याला सलगी देणे हा त्यामागचा मंत्र होता. दादांची अशी सलगी देण्याची वृत्ती होती. त्यामुळे दादांनी समजावून सांगितलेले त्या कार्यकर्त्याला देखील पटले.
 
 
खरा नेता
 
स्मृतिग्रंथातील एका लेखात ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक असे म्हणतात की, खरा नेता कोण असतो? तर तो आपल्यासारखाच नेता निर्माण करतो, तो खरा नेता असतो! मला असं वाटते की, दादा या प्रकारातील नेतृत्व होते. अनेक संस्थांची उभारणी, विकास आणि संवर्धन हे दादांनी केलेले आहे. त्या संस्थांच्या बैठकांमध्ये निर्णय करताना दादांनी संस्थेचे पदाधिकारी म्हणून संघाने असे सांगितले आहे असे कधीही म्हटले नाही. प्राप्त परिस्थितीत संस्थेच्या घटनात्मक चौकटीत जो निर्णय करणे आवश्यक आहे तो निर्णय करावा, असे त्यांचे म्हणणे असायचे. त्यामुळे संघात व संस्थांमध्ये दोघांनाही दादा आपले वाटत असत.
 
 
विविध संस्थांच्या जबाबदार्‍या सोडल्यानंतर दादांनी कधीही आपणहून त्या संस्थांची चौकशी केली नाही. कोणी सल्ला विचारण्यास आल्यानंतर त्यांना जरूर सल्ला दिला आणि हा सल्ला मी देत असलो तरी निर्णय मात्र तुम्हाला योग्य वाटेल तो करा असा दादांचा डेमोक्रॅटिक स्वभाव होता. हे देखील दादांचे वैशिष्ट्य होते.
 
 
कुटुंबाचे समर्पण
 
संघाचे तत्त्वज्ञान बाहेर सांगणे कदाचित सोपे असू शकते परंतु हेच तत्त्वज्ञान घरात समजावून देणे व त्याप्रमाणे व्यवहार करणे हे सोपे नसते. हे अत्यंत अवघड असते, परंतु हे दादांना त्यांच्या घरात, कुटुंबात सहजगत्या जमलेले होते. याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. दादांच्या पत्नी कै. लीलावहिनी यांनी दादांना बरोबरीने संघकार्यात घर सांभाळून घरात आलेल्या संघप्रचारक, जिल्हा-विभागातून आलेले कार्यकर्ते यांचे आदरातिथ्य, पाहुणचार, न्याहारी-भोजन-चहा-मुक्काम-निवास हे सर्व सांभाळलेले आपल्याला दिसते. अगदी ज्येष्ठ प्रचारक कै. आप्पा नांदेडकर यांचा खाष्ट स्वभाव अनेकांना माहिती होता. अशा आप्पांचे सुद्धा तंत्र लीलावहिनींनी सांभाळले होते.
 
 
दादांनी दोन पिढ्यांचा संघ बघून तिसर्‍या पिढीच्या हातात जसाच्या तसा दिला, हे दादांचे सर्वांत मोठे कार्यकर्ता म्हणून वैशिष्ट्य म्हणता येईल. दादांसारखे संघकाम जसेच्या तसे करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.
 
स्मृतिग्रंथ महत्त्व
 
असे ग्रंथ करणे का आवश्यक आहे? महाराष्ट्र प्रांत संघचालक असताना कै. बाबा भिडे यांना काही कार्यकर्त्यांनी असे म्हटले की, तुमच्याकडे संघकार्याचा विपुल अनुभव आहे तर तुम्ही या विषयावरचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहावे. त्यावर बाबांनी असे म्हटले होते की, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली व समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. हे एवढे महान ग्रंथदेखील कोणी वाचत नाही. बाबाचा ग्रंथ कोण वाचणार?
 
 
परंतु पुढे ही परिस्थिती बदलली साप्ताहिक विवेकच्या आग्रहास्तव ज्येष्ठ संघप्रचारक कै. दामूअण्णा दाते यांच्या संघकार्यातील वैशिष्ट्यपूर्ण आठवणींचे स्मरणशिल्पे हे पुस्तक साप्ताहिक विवेकने प्रकाशित केले. तत्कालीन सरसंघचालक कै. सुदर्शनजी यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात असे म्हटले की, संघाचे काम हे प्रसिद्धिराङमुख आहे हे बरोबर आहे परंतु प्रसिद्धिपराङमुखता देखील काय असते? हे कळण्यासाठी सुद्धा अशा कार्यकर्त्यांची आत्मकथने-स्मृतिग्रंथ आवश्यक आहेत. त्यामुळे दादांच्या स्मृतिग्रंथाचे मोल खूप महत्त्वाचे आहे.
 
शब्दांकन : दिलीप क्षीरसागर (नाशिक)
पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ