@डॉ. नंदकुमार मुकुंद कामत
शास्त्रज्ञ
9423889629
गोव्यातील सुवर्णखनन, संपादन, शुद्धीकरण व धातुकर्म ही फक्त आर्थिक क्रिया नव्हती; तर ती एक सखोल सभ्यतागत परंपरा होती - ज्यात विज्ञान, धर्म, तंत्रविद्या, समाजरचना आणि भूगोल यांचा सुंदर संगम झाला होता. गोवा विद्यापीठातील सेकंडरी गोल्ड म्हणजे दुय्यम सुवर्णावरील पंधरा वर्षांच्या संशोधनावर आधारित हे संशोधनपर लेख आहे. या संशोधनाद्वारे गोव्यातील पूर्ण विस्मरणात गेलेल्या प्राचीन सुवर्ण संपादन संस्कृतीचे दर्शन झाले. या वारशाचे वैज्ञानिक पुनर्मूल्यांकन झाल्यास गोव्याचा सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहास एका नवीन प्रकाशात उजळून निघेल.

मराठीतील प्राचीन गोव्यातील सुवर्णसंपादनाचा संक्षिप्त इतिहास या विषयावरील हा पहिलाच लेख असून तो आमच्या गोवा विद्यापीठातील सेकंडरी गोल्ड म्हणजे दुय्यम सुवर्णावरील पंधरा वर्षांच्या संशोधनावर आधारित आहे. आमचे निष्कर्ष वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. प्रस्तुत लेखकाने हे संशोधन चालूच ठेवले असून या निमित्ताने आम्हाला प्राचीन गोमंतकातील सोन्याच्या उगमाचा, नैसर्गिक स्थानिक स्रोतांचा व वापराचा शोध घेणे शक्य झाले. आम्ही प्रयोगशाळेत शेकडो नैसर्गिक नमुने- खनिजे, माती, वाळू, गाळ, राख वगैरे तपासले. अद्ययावत उपकरणे वापरून सोन्याचे प्रमाण तपासले व त्यातून गोव्यातील पूर्ण विस्मरणात गेलेल्या प्राचीन सुवर्ण संपादन संस्कृतीचे दर्शन झाले.
मानवी सभ्यतेच्या इतिहासाचा प्रवाह हा प्राचीन काळातील धातूंच्या उपयोगाच्या कथेच्या अतूट धाग्यांनी विणला गेलेला आहे. औद्योगिक क्रांतीनंतर आधुनिक धातुकर्माने अभूतपूर्व प्रगती साधली असली तरी आधुनिक धातुविज्ञानातील अनेक संकल्पना या औद्योगिक क्रांतीपूर्व काळातील प्राचीन प्रथांमधूनच उद्भवलेल्या आहेत हे लक्षात घेणे अत्यंत रोचक आहे.
भूतकाळात धातूंचे उत्खनन व उपयोग ही प्रक्रिया साधारणपणे टप्प्याटप्प्याने घडत होती. प्रथम मूळ स्वरूपातील धातूंचा उपयोग, त्यानंतर सहज वितळवता येणार्या धातूंचे खनिजांमधून निष्कर्षण, आणि नंतर कठीण वितळणार्या धातूंचे उत्खनन व परिष्करण. भारतातील खनिज व धातूंची वारसा परंपरा दहा हजार वर्षांहून अधिक कालखंड व्यापते आणि आजच्या प्रजासत्ताक भारताच्या सीमांपलीकडेही ती पसरलेली आहे. इ.स. 1500 पर्यंत जगातील महासत्ता म्हणून चीन आणि भारत हेच अग्रगण्य होते. मानवजातीवर त्यांची सभ्यताजन्य छाप ही त्यांच्या खनिजे व धातू यांवरील प्रभुत्वावर उभी होती.
प्राचीन भारतातील सुवर्णज्ञान हे विविध टप्प्यांत प्रकट झाले. सुवर्णखननाच्या प्रमुख कालखंडांमध्ये प्राचीन काळ (इ.स.पू. 3900 ते इ.स. 500/600), इ.स. 1500 ते 1870 आणि इ.स. 1870 ते 2002 हे तीन कालखंड ओळखले जातात. यांपैकी सुवर्णखननाची बहुतेक क्रियाकलापे प्राचीन कालखंडात घडली किंवा त्याच काळात आरंभ झाली. सुवर्ण या धातूचे अस्तित्व वेद, महाकाव्ये, पुराणे, उपनिषदे, बौद्ध आणि जैन साहित्य तसेच संस्कृत व इतर प्राचीन ग्रंथांमध्ये आढळते. नवपाषाण युगापासून ताम्रयुगीन स्थळे, लोहयुगीन स्तर, महापाषाणीय समाधी आणि प्रागैतिहासिक स्थळांवरील सुवर्णालंकारांची पुरातत्त्वीय साक्ष याची पुष्टी करते.
विविध प्रदेशांमध्ये सुवर्णपरीक्षण आणि रेती, गाळातून सुवर्ण कण वेचणारे पारंपरिक तज्ज्ञ समुदाय अस्तित्वात होते. उदाहरणार्थ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सोनझारिया, झारिया, झोरा, सोनझारा; छोटा नागपूरमध्ये धोरा, झोरा, झारा, टोरा, डोकरा; आसाममध्ये सोनवाल; कर्नाटकात जलगार; जम्मू आणि काश्मीरमध्ये लडाखमधील बाल्टी; हिमाचल प्रदेशात दाओला; ओडिशात सुनाझारिया; उत्तर भारतात न्यार्या; गोव्यात धवड आणि केरळमध्ये पणीयार असे समूह ओळखले गेले आहेत. ‘प्राचीन खाणी’ म्हणून ओळखल्या जाणार्या खनिज उत्खनन स्थळांचा उल्लेख या पारंपरिक ज्ञानाच्या पुराव्यास पूरक आहे. सुवर्णाशी संबंधित अनेक स्थलनामांमधूनही ही साक्ष प्रकट होते. भारतीय भाषांमधील ‘सोना’, ‘स्वर्ण’, ‘पोनू’, ‘होंणा’ अशा शब्दांवरूनच नद्या जसे स्वर्णमुखी (आंध्रप्रदेश), सोनाजोरी (छत्तीसगड), सोना, सुवर्णरेखा (बिहार/झारखंड), स्वर्णा (कर्नाटक), सोन (मध्यप्रदेश), पोनैयार (तामिळनाडू), सोनावडी (उत्तरप्रदेश) तसेच टेकड्या उदाहरणार्थ बंगारगट्टी, होंणगुड्डा (कर्नाटक), सोना पहाडी, सोनदेही डोंगरी (छत्तीसगड), सोना पहार (मेघालय), सोनारिया (राजस्थान), सुनादेईपहाड (ओडिशा) यांचा निर्देश आढळतो.
‘अर्थशास्त्रा’त सुवर्णाचे कमळाच्या रंगाचे, मऊ, तेजस्वी आणि कोणताही आवाज निर्माण न करणारे असे वर्णन दिले आहे. हडप्पा संस्कृतीत मोहेंजोदडो येथे सापडलेल्या सुवर्ण वस्तू हे त्याचे पुरावे आहेत. भारतात सुवर्ण विविध भौगोलिक परिस्थितीत आढळते. ते लोड सुवर्णरूपात, स्तरित सल्फाइड खनिजांमध्ये, अग्लोमेरेट्समध्ये, क्वार्टझाइट्समध्ये, नदीपात्रांतील अवसादांमध्ये, लेटराइट किंवा जांभ्या दगड मातीच्या आवरणात, थरात आढळते. भारतात जस्त, लोहखनिज, मँगनीज, सुवर्ण, बॉक्साइट, चांदी, शिसे, कथिल, तांबे आणि क्रोमाइट यांसह समृद्ध खनिजसाठे आहेत. सध्या सुवर्णाचे उत्पादन कर्नाटकातील हुट्टी, ऊटी आणि हिराबुद्धनी या तीन खाणीतून तसेच राजस्थानातील खेत्री आणि झारखंडातील मोसाबनी-सिंहभूम येथील मूलधातू सल्फाइड खनिजांमधून उपउत्पादन म्हणून केले जाते. प्राचीन काळात प्रथम ओढे व नद्यांतील रेती वा गाळातील आणि किनार्यांवरील प्लेसर सुवर्णसाठ्यांचा उपसा केला गेला. नंतरच्या काळात खडकातील किंवा वालुकामय पाषाणातील साठ्यांचाही उत्खननासाठी उपयोग केला जाऊ लागला.
अनेक नद्यांमधील सुवर्णयुक्त वाळूमधून सुवर्णपरीक्षण आजही पारंपरिक पद्धतीने चालते. ग्रीक आणि रोमन इतिहासकारांनीही भारतीय नद्यांमधील सुवर्णाविषयी माहिती दिली आहे. हेरोडोटसने भारतातील नद्यांमधून सुवर्ण मिळते असे नमूद केले आहे. प्लिनीने गंगानदीत सुवर्ण सापडते असे लिहिले आहे. स्ट्राबोने सुवर्णधूळ नद्यांद्वारे भारतात वाहून आणली जाते असे म्हटले आहे. महाभारतात (वनपर्व 90.26) गंगानदीच्या वाळूमध्ये सुवर्ण असल्याचा उल्लेख सापडतो.
गोव्यातील सुवर्णकला आणि सुवर्णशिल्पकला ही सिंधु संस्कृतीइतकी प्राचीन असण्याची शक्यता आहे. मोहेंजोदडो आणि हडप्पा येथून सापडलेल्या हार, बांगड्या, कर्णभूषणे आणि अलंकार यांची रचना गोव्यातील सुवर्णकारांच्या पारंपरिक डिझाइनशी आश्चर्यकारक समानता दाखवते. यावरून गोव्यातील सुवर्णरसायनशास्त्र आणि धातुकर्म यांचा उगमही सिंधु संस्कृतीपर्यंत शोधता येतो. पश्चिम धारवाड क्रॅटॉनच्या (थऊउ) वायव्य भागात वसलेला गोवा हा आशियातील एक प्रमुख धातुसंपन्न प्रांत आहे. तुटक-तुटक संशोधनाने या प्रदेशात तसेच कोकणपट्ट्यात सुवर्णाचे अस्तित्व दर्शवले आहे. बोन्डला वन्यजीव अभयारण्यात आढळणार्या लोखंडयुक्त पट्ट्यांशी सुवर्णाचे अस्तित्व जोडले गेले आहे. खाण आणि खनिजबाहय भागांतील विविध नमुन्यांचे विश्लेषण करून सुवर्णाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आहे. डिचोली तालुक्यातील प्राचीन कुंदनपूर-आजचे कुडणे येथील प्राचीन सुवर्णशुद्धीकरणाचा इतिहास अत्यंत रोचक आहे.
दक्षिण भारतातील सुवर्णखननाचे विविध टप्पे पुरातत्त्व विशारद ऑलचिन यांनी विशद केले असून, त्यांनी सुवर्णखननाचा प्रारंभ नवाश्मयुगातच झाल्याचे नमूद केले आहे. या काळात सुवर्णधातू असलेल्या स्तरांचे शोध लागले होते. धातुसंशोधक दुबे यांच्या मते, या काळात खाणकाम प्रामुख्याने पृष्ठभागावरच मर्यादित होते - खुल्या खाणी आणि नदीपात्रांतील सुवर्णधूळ उत्खननावर भर होता, कारण त्या काळातील साधने खोलवर उत्खनन करण्यास सक्षम नव्हती. जड पाषाणी, दगडी साधनांचा वापर करून हे उत्खनन केले जात असे. सुवर्णसंपत्तीमुळे लोक हळूहळू या भागात वस्ती करू लागले. मौर्य साम्राज्याने सुवर्णखनन व धातुकर्म यांना मोठी चालना दिली. ‘कुंदन’ म्हणजे अत्यंत शुद्ध सुवर्ण. आजही ़‘कुंदन दागिने’ म्हणून भारतात प्रसिद्ध असलेले अलंकार त्याच परंपरेचे द्योतक आहेत. त्यामुळेच गुप्त-बदामी चालुक्य काळातील, ‘कुडणे’ या गावाला प्राचीन काळी ‘कुंदनपूर’ - म्हणजे सुवर्णशुद्धीकरणाचे गाव - असे नाव पडले असावे असे आमचे प्रतिपादन आहे.
आयआयटी कानपूरचे धातुवैज्ञानिक दुबे यांनी ‘भारताचे सुवर्णखनन व शुद्धीकरणातील योगदान: ख्रिस्तपूर्व काळातील काही निरीक्षणे’ या लेखात प्राचीन सुवर्णखननाचे विस्तृत पुरावे दिले आहेत. गोव्यातील खाणपट्ट्यातील गुहावास्तुकला ही विनाकारण आणि केवळ निवारा वा साधनेसाठी निर्माण झालेली नव्हती. प्राचीन सांबळूर म्हणजे आजचे हरवळे येथे खोदलेल्या गुहा व कुंडीवाटक (कुंदनपूर) आजची कुडणे येथे असलेली जैन वणीक संघ व सुवर्णशोधकांची वसाहत, धुपाचोतेमो टेकडीवरील कदंबकालीन बांधकामे, हे याचे पुरावे आहेत. ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात दोन पद्धतींचे वर्णन आहे. पहिल्या पद्धतीत अपवित्र सुवर्णाला द्रवरूपात शिशासह तापवून शुद्ध सुवर्ण मिळवले जात होते- ही ‘कपलेशन’ नामक प्रक्रिया आहे. दुसर्या पद्धतीत चांदी व तांबे असलेल्या सुवर्णाच्या पातळ पत्रकांना मीठ व मातीसह तापवले जात होते. दोन्ही पद्धती प्राचीन भारतीयांना सुवर्णाच्या रासायनिक गुणधर्मांची अचूक जाणीव असल्याचे दर्शवतात.
गोव्यातील धातुकर्म वारसा विसाव्या शतकापासून सुरू झाला ही धारणा चुकीची आहे. वाळवंटी नदीच्या खोर्यातून वाहणार्या डिचोली व कुडणे नद्यांनी लाखो वर्षांपासून सुवर्णयुक्त व लोहसंपन्न खडकांची झीज केली आहे आणि मान्सून काळात ही घर्षण प्रक्रिया अधिक तीव्र होते. प्राचीन काळातील सुवर्णशोधकांनी साध्या निरीक्षणांवरून व नमुने गोळा करून सुवर्णाचे अस्तित्व ओळखले होते आणि योग्य ठिकाणी त्यांनी सुवर्ण संपादनासाठी कायमस्वरूपी वसाहती निर्माण केल्या होत्या. त्यामुळेच डिचोली तालुक्यातील लामगांव व हरवळे येथील गुहा खोदल्या गेल्या. हरवळे-कुडणे नदीच्या खोर्यात वसलेले सांबळूर (आधुनिक हरवळे) व कुंडीवाटक/कुंदनपूर (आधुनिक कुडणे) ही दोन प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्रे होती. सांबळूरच्या खडकात कोरलेल्या गुहा, रुद्रेश्वराचे प्राचीन मंदिर, कुंदनपूरातील कुशाणकालीन भग्न प्राचीन सूर्यदेवालय, कदंबकालीन जैन आदिनाथ मंदिर, शिवमंदिर, कुडणेश्वर मंदिर आणि बेताळ व गजलक्ष्मी यांच्या उपासनेसाठीची इतर मंदिरे हे त्या काळातील सुवर्णशोधक व तांत्रिक साधक यांच्या उपस्थितीचे साक्षीदार आहेत. हरवळे-कुडणे नद्यांतील सुवर्णयुक्त वाळूमधून चाळून मिळवलेले द्वितीयक सुवर्णकण कुडणे येथील प्राचीन सुवर्णशुद्धीकरण केंद्रांपर्यंत पोहोचवले जात असत.
इंडो-पोर्तुगीज इतिहासकार डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांनी कुडणे गावात पावसाळ्यात जमिनीतून सुवर्णनाणी सापडल्याचा उल्लेख केला आहे, मात्र त्यांचा पुढील ठावठिकाणा आज अज्ञात आहे. सांबळूर आणि कुंडीवाटक येथील प्राचीन धातुवैज्ञानिकांनी निर्माण केलेला हा सुवर्णसंपादनाचा वारसा अत्यंत विलक्षण आहे. वैज्ञानिक साहित्यसमीक्षा आणि क्षेत्रीय तसेच प्रयोगशाळीय अभ्यासांवर आधारित अशा एका सिद्धांताची मांडणी आम्हाला करता येते की गोव्याच्या उत्तरेकडील 2500 ते 3000 दशलक्ष वर्षे जुन्या धातुसंपन्न बँडेड आयर्न फॉर्मेशन (इखऋ) पट्ट्यातील हरवळे-कुडणे प्रदेशात प्राचीन काळी सुवर्णाधारित धातुकर्म परंपरा विकसित झालेली होती. या पट्ट्यात द्वितीयक सुवर्णाच्या शुद्ध कणांबरोबरच, जैविक सूक्ष्मकण, गंधकभक्षक जीवाणू आणि प्राचीन हरीतनील जिवाणूंच्या क्रियेने निर्माण झालेल्या जीवजन्य सुवर्ण स्वरूपांचे अस्तित्व आढळते. तसेच काळसर सुवर्णसल्फाइड्स (जे लोखंडी सल्फाइड्ससारखे दिसतात पण पायराइटपेक्षा भिन्न असतात) आणि सुवर्णजडित वालुकामय क्वार्टझाइटचे (अऋट) प्रचंड प्रमाणात अस्तित्व या प्रदेशाच्या संपत्तीचे निदर्शक आहे. 1945-46 पासून निर्यातक्षम इखऋ-इकट धातूमध्ये ह्या वालुकामय स्फटिकमय घटकाला ‘चर्ट’ म्हणून तुच्छ लेखले गेले त्यात सुवर्णकण असल्याचे लपवून ठेवले गेले. याच खडकांमधून जगातील सर्वात प्राचीन खनिज झिकॉनच्या स्फटिकरूप पुनर्प्राप्तीने आम्हाला या साठ्यांच्या प्राचीनतेबद्दल नवी माहिती दिली आहे. इ.स. सहाव्या शतकात हरवळेचे प्राचीन नाव ‘सांबळूर’ (शिवग्राम) आणि कुडणेचे नाव ‘कुंडीवाटक’ किंवा ‘कुंदनपूर’ असे होते. हे दोन्ही गाव नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असल्यामुळे इंडोलॉजिस्टांच्या विशेष अभ्यासाचा विषय राहिले आहेत.
जर्मन इंडोलॉजिस्ट प्रा. ग्रिटली व्हॉन मिटरवाल्नर यांनी या गावांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास केला आहे. हरवळेच्या या गुहासंकुलावर आणि कुडणेमधील ‘धुपाचो तेमो’ टेकडीवरील बांधकामांवर त्यांनी केलेले संशोधन हे वैज्ञानिक पुरातत्त्वशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे. दिलीप के. चक्रवर्ती आणि नयनज्योत लाहिरी यांच्या तुलनेने वैज्ञानिक इतिहास आणि पुरातत्त्व संशोधन गोव्यात अद्याप अपुरे आहे. त्यांनी प्राचीन भारतातील धातूंच्या वापरावर मोठ्या प्रमाणात लेखन केले असले तरी गोवा त्यांच्या अभ्यासातून सुटला आहे. एफ.आर. ऑलचिन यांच्या णिेप ींहश अपींर्र्ळिींळीूं रपव चशींहेवी ेष ॠेश्रव चळपळपस ळप अपलळशपीं खपवळर (1962), आयआयटी कानपूरचे दुबे यांचे वाहत्या प्रवाहातील वाळू, गाळातील प्राचीन सुवर्णखननावरील लेख आणि उपेंद्र ठाकूर यांचा र्डेीीलशी ेष ॠेश्रव षेी एरीश्रू ॠेश्रव उेळपी ळप खपवळर (1980) या नंतर प्रादेशिक इतिहासात सुवर्णखननावरील संशोधन अत्यंत कमी आहे. धारवाड क्रॅटॉनचा पूर्व व पश्चिम भाग (एऊउ आणि थऊउ) हे जगातील सुप्रसिद्ध धातुसंपन्न प्रांत आहेत. येथे भूविज्ञान, संरचनाशास्त्र, भूभौतिकी, भू-रसायनशास्त्र आणि आर्थिक खननावर अधिक भर दिला गेला आहे, पण प्राचीन खनन आणि धातुकर्म तंत्रावर फारसे लक्ष दिले गेले नाही.
महापाषाणयुगीन समाजाने दक्षिण भारतात लोहयुगाची सुरुवात केली असली तरी गोव्यातील सुवर्ण आणि लोहखननाचा मौर्यपूर्व काळापर्यंत मागोवा घेता येतो. पोर्तुगीजपूर्व इतिहासात धातुकर्म वारशाचा उल्लेख विरळाच आहे. सांस्कृतिक इतिहासकार अनंत रामकृष्ण शेणवी धूमे यांनी ‘र्उीर्श्रीीींरश्र कळीीेीूं ेष ॠेर’ या ग्रंथात ‘धावड’ समुदायाने लोखंड वितळविल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी काचफुंकणी व बांगडी निर्माण व्यवसायाचाही उल्लेख केला आहे. इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ यांच्या लक्षात न आलेली बाब म्हणजे मानवनिर्मित गुहांच्या खोदकामामागील खरी कारणमीमांसा. बौद्ध, ब्राह्मणी किंवा तांत्रिक प्रभाव म्हणून त्यांचे वर्गीकरण केले गेले असले तरी अशा दुर्गम, वनाच्छादित, धोकादायक आणि विरळ वस्तीच्या भागात त्यांनी अशा गुहा का खोदल्या, हा मूलभूत प्रश्न अनुत्तरित आहे. आम्हाला आढळले की भारतातील इतर भागांप्रमाणेच येथेही धातूंची गरज हेच त्यांचे खरे प्रेरणास्थान होते. कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’त खनिजे, खनन आणि विशेषतः सुवर्ण यांना महत्त्व दिले आहे. अशोकाच्या शिलालेखांचा शोध प्राचीन सुवर्णखाणींच्या जवळ का लागला हे यावरून स्पष्ट होते. आधुनिक पुरातत्त्वीय उत्खनन व दिनांकन तंत्रांच्या आधारे हरवळे आणि कुडणेची खरी प्राचीनता निश्चित करण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे. मात्र स्थानिक भूआकृती, जलशास्त्र, स्थलाकृती, भूविज्ञान, भू-रसायनशास्त्र आणि पुरातत्त्वीय पुरावे लक्षात घेता या प्रदेशातील खडकात कोरलेल्या गुहांची निर्मिती का झाली हे समजणे कठीण नाही. हरवळे, सुर्ला, लामगांव, नारवे इत्यादी ठिकाणी गुहांची साखळी याच कारणामुळे अस्तित्वात आली.
हरवळे गुहासंकुल तांत्रिक साधकांशी संबंधित मानले जाते, जे रसायनशास्त्रात निपुण होते. हे गुहासंकुल हरवळे नदी व धबधब्यापासून सुमारे 400 मीटर अंतरावर असल्यामुळे तेथे लोखंड व सुवर्णयुक्त खडक दोन्हींची झीज होत होती हे स्पष्ट होते. धबधब्याच्या उगम भागात आम्हाला द्वितीयक सुवर्णाचे प्रमाण जास्त आढळले होते. धबधब्याखालील गाळामध्ये द्वितीयक सुवर्णकण प्रचंड प्रमाणात असण्याची शक्यता आहे. शैव पंथीय तांत्रिक साधक येथे शिवोपासना व रसायनविषयक विधींसोबत सुवर्णपरीक्षणही करत असावेत ह्यात शंका नाही. जेव्हा एखाद्या प्रदेशात भूगर्भीय प्रक्रियांनी निर्माण केलेला धबधबा, सुवर्णयुक्त खडकांची झीज करणारी नदी आणि शैलनिवार्यासाठी योग्य खडकांचा परिसर या तिन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा खाण व धातुकर्म छावणी उभारण्यासाठी आदर्श परिस्थिती तयार होते आणि अशा प्रकारे सांबळूरची स्थापना झाली. ‘सुवर्णभूमी’ - सुवर्णाची भूमी - हेच प्राचीन भारताचे नाव होते आणि या सुवर्णसंपत्तीनेच अलेक्झांडर, शक, पार्थियन, युएची, अरब, तुर्क, अफगाण, ताजिक, मंगोल यांसारख्या परकीय आक्रमकांना आकर्षित केले. हाच सुवर्णलोभ ख्रिस्तोफर कोलंबस आणि वास्को-द-गामा यांच्या समुद्रमार्गे मोहिमांमागील प्रमुख प्रेरणा ठरला. सम्राट समुद्रगुप्त व इतर अनेक राजांनी विश्वातील सर्वोत्कृष्ट सुवर्ण नाणी तयार केली. गोव्यातील कदंब राजवंशानेही स्थानिक खाणीतून मिळणार्या सुवर्णावर आधारित नाणी पाडली. मध्ययुगीन ‘सुवर्णलंका’ ही संकल्पना गोव्यातील बेटांशीच संबंधित होती. शिलाहार राजाने गोव्याचा विजय मिळवून ‘लंकेश्वर’ ही उपाधी धारण केली.
सुवर्णाच्या ऑक्सिडेशन-प्रतिरोधक गुणधर्मामुळे त्याचे धातुकर्म सोपे असते. प्राथमिक सुवर्णाचे उत्खनन करावे लागते, तर द्वितीयक सुवर्ण हे नदीच्या वाळू, गाळ, माती आणि इतर खनिजांपासून सहज वेगळे करता येते. सुवर्णधातुकर्माचे ज्ञान सिंधु-हडप्पा संस्कृतीपर्यंत मागे जाते. बौद्ध काळात, जो मौर्य काळानंतर आला, रसायनशास्त्रात पारंगत बौद्ध भिक्षू भारताच्या पश्चिम किनार्यावर आले आणि सोपारा सारख्या बंदरांवर वस्ती करू लागले. तेथून दक्षिणेकडे प्रवास करून ते गोव्यापर्यंत पोहोचले. त्यांनी स्थानिक खनिजांचा अभ्यास केला होता आणि दीपकविषय (डिचोली) ते चंदनमंडळ (सांगे-केपे) पर्यंत पसरलेला लोखंडयुक्त पट्टा शोधून काढला होता. लामगाव, डिचोली, रिवण आणि सांगे येथे आढळणार्या गुहांमधून हे स्पष्ट होते की हे रसायनशास्त्र पारंगत भिक्षू लोखंड आणि सुवर्णधातुकर्मात गुंतलेले होते. येथे सोने लाल मुरुम मातीमध्ये, ओढे, नदीच्या गाळात, लोखंडयुक्त पट्ट्याच्या सिलिका-समृद्ध भागात आणि मॅग्नेटाइट युक्त खनिजात आढळते. त्या काळी प्राचीन गोव्याची सीमा विस्तृत होती आणि त्याला ‘सुनापरांत’ किंवा ‘सुवर्ण अपरांत’ असे म्हटले जाई (पाली शब्द ‘सुन्न’ म्हणजे सुवर्ण). प्राचीन स्थळनामेही याचे संकेत देतात - ‘हिरण्यवन’ (आधुनिक रिवण) म्हणजेच सुवर्णवन आणि ‘जांभव-हळ्ळी’ (जांभव = सुवर्ण, म्हणजे सुवर्णाचे गाव, आधुनिक जांबावली).
आजही पारोडा किंवा कुशावती नदीच्या गाळामध्ये शुद्ध सुवर्णाचे सूक्ष्म कण आढळतात. रिवण गुहेतील वास्तुशिल्प, कोळशाचे अवशेष, चुनखडी आणि लोखंडी खिळे या ठिकाणी धातुकर्म चालत असल्याचा पुरावा देतात. लामगांव गुहांसमोर प्राचीन खडकात कोरलेला चर सुवर्णयुक्त गाळ, रेती व धातुकण धुण्यासाठी वापरला जात असे. या चरातील गाळात आजही सूक्ष्म सुवर्णकण आढळतात. लामगावजवळच शिरगाव (श्रीग्राम) आहे, ज्याचा अर्थ ‘समृद्धीचे गाव’ असा होतो. ‘श्री’ हे धनदेवता लक्ष्मीचे नाव आहे आणि ती समृद्धी सुवर्णखननातून आली होती. संपूर्ण गाव द्वितीयक सुवर्णाच्या साठ्यावर वसलेले आहे, ज्याचे प्रमाण दक्षिण आफ्रिकेइतके आहे. शिरगावमधील जुन्या टाकावू लोहखनिज ढिगार्यांमध्ये द्वितीयक सुवर्णाचे उच्च प्रमाण आहे, तसेच हरीतनील सायनोजिवाणू व गंधकयुक्त-लोखंड खाणार्या जीवाणूंच्या क्रियेमुळे निर्माण झालेल्या सुवर्णाच्या जीवजन्य स्वरूपाचाही समावेश आहे. हे सोन्याचे सूक्ष्मजीवजन्य स्वरूप 2010 मध्ये मला तिसवाडीतील सावर्डे रचनेतील 65 मीटर खोलीवरील टिलॉइड साठ्यांमध्ये सापडलेल्या स्वरूपाशी मिळते-जुळते आहेत.
शिरगाव भागातील वृक्षांमध्ये सुवर्ण शोषले गेले असून त्याचे अंश स्थानिक लाकडांच्या राखेमध्ये आढळतात. श्रीग्रामच्या प्राचीन धातुवैज्ञानिकांनी लाकडाच्या ज्वलनाने राख तयार केली, आणि त्या राखेतून शुद्ध सुवर्णकण मिळवले. देवी लईराईच्या यात्रेचा, धोंडांचा मार्ग सुवर्णयुक्त खनिजे असलेल्या गावांतून जातो हा योगायोग नाही. जळत्या निखार्यावरुन चालण्याचा अग्नीचालना विधी हा कदाचित प्राचीन धातुकर्माच्या प्रक्रियेचा सांस्कृतिक अवशेष असावा. श्रीग्रामजवळच सोनशी गाव आहे, जे सुवर्णयुक्त लोखंडखाणींमुळे प्रसिद्ध आहे. इथे आम्हाला टनामागे 13 ग्राम सोन्याचे प्रमाण मिळाले आहे. महादयी नदीच्या थोड्याशा वरच्या भागात सोनाळ नावाचे गाव आहे, जिथे नदीच्या वाळूमधून चाळून, धुवून सुवर्ण संपादन केले जात असे. उत्तरेला ‘सोनसागर’ नावाचा डोंगर आहे - म्हणजेच सुवर्णाचा डोंगर. स्थानिक भूगर्भीय नकाशा या डोंगरात ज्वालामुखी रसनिर्मित सुवर्णसाठे असल्याचे दर्शवतो. दक्षिणेकडे भारतातील पाचव्या क्रमांकाचा मोठा धबधबा दूधसागर आहे, जो प्रीकेंब्रीयन ग्रॅनाइटची झीज करतो. दूधसागरजवळील गावाला म्हणूनच ‘सोनावली’ असे नाव पडले. इथेही वाळूत आम्हाला सुवर्ण कण सापडले. कुळे नदी आणि कुळे रेल्वे स्थानकाजवळील नदीच्या वाळूमध्ये खूप सुवर्णकण आढळतात.
प्राचीन सुवर्णशोधकांनी या प्रदेशातील सुवर्णाच्या अपवादात्मक लक्षणांची ओळख करून घेतली होती आणि ते सहजपणे सुवर्णकण ओळखू शकत होते. दुर्दैवाने इस्लामिक आक्रमणांनंतर हे ज्ञान लपवले गेले आणि जे लोक हे कौशल्य जाणत होते त्यांना ठार मारले गेले किंवा ते स्थलांतरित झाले असावेत. आज गोव्याची ही सुवर्णखनन परंपरा केवळ स्थलनामांमध्ये आणि विकृत दंतकथांमध्ये उरली आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्था लोहखनिजांवरुन वाद घालत आहेत पण उत्खनन, साठवणूक आणि निर्यातीत सामावणार्या 70 अलौह धातूंची रासायनिक रचना जाहीर करत नाहीत. गोव्याच्या कदंब राजांच्या सुवर्णनाण्यांकडे पाहिल्यास दक्षिण भारतातील 50हून अधिक राजवंशांनी येथे सत्ता का गाजवली हे स्पष्ट होते - त्यांना केवळ मासे, हुमण आणि भात यात रस नव्हता. गोव्यातील अकराही नद्या, त्यांच्या 41 उपनद्या आणि सुमारे 600 लहान प्रवाह हे सर्व लाखो वर्षांपासून पश्चिम धारवाड क्रॅटॉनच्या सुवर्णयुक्त प्रीकेंब्रीयन खडकांवरून वाहत आहेत. परिणामी सततच्या अपक्षयामुळे निर्माण झालेली नदीची वाळू, विशेषतः प्रवाह मंदावणार्या भागांमध्ये साचलेली वाळू, द्वितीयक सुवर्णकण किंवा सिलिकासह संयोगित ‘ऑरिफेरस क्वार्टझ’च्या स्वरूपात सुवर्ण धारण करते. गोव्याच्या खाण आणि भूविज्ञान संचालनालयाला प्राचीन धातुकर्म परंपरेबद्दल आणि नदीच्या वाळूमधून सुवर्णपरीक्षण - ‘ऑल्यूव्हियल सुवर्णसंपादन’ या प्रक्रियेच्या महत्त्वाबद्दल जवळजवळ काहीच माहिती नाही.
नदीच्या वाळूच्या उत्खननासाठी स्थळांची निवड करण्यापूर्वी वाळूच्या संमिश्र नमुन्यांचा सविस्तर खनिजशास्त्रीय व भू-रासायनिक अभ्यास करणे सरकारने अनिवार्य ठरवलेले नाही. या प्रक्रियेसाठी फक्त एक आठवड्याचा प्रयोगशाळेतील अभ्यास पुरेसा असताना सरकारने असा निर्णय घेतला नाही, ज्यामुळे सुवर्णसंपत्ती गमावली जाते. धारबांदोडे, सांगे, केपे, आमोणे (मांडवी), कोलवाळ (कोलवाळ नदी), केरी व उगवे (तेरेखोल नदी) यांसारख्या ठिकाणी नदीच्या वाळूमध्ये सुवर्णकण आणि सुवर्णधारक खनिजे आढळल्याचे ज्ञात आहे. कोलवाळ नदीच्या वाळूमध्ये आम्हाला अत्यंत उच्च प्रमाणात शुद्ध सुवर्णकण आढळले आहेत. ही वाळू बांधकाम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. 1600 वर्षांपूर्वीच रसायनशास्त्र आणि धातुकर्माचे ज्ञान असलेल्या बौद्ध भिक्षूंनी कोलवाळ नदीच्या वाळूमधील दुय्यम सुवर्णाचे महत्त्व ओळखले होते. आयआयटी कानपूरमधील पदार्थ विज्ञान विभागातील प्राध्यापक आर. के. दुबे यांनी ‘अश्रर्र्श्रीींळरश्र झश्ररलशी ॠेश्रव चळपळपस ळप खपवळर ींर्हीेीसह असशी: अ कळीीेींळलरश्र झशीीशिलींर्ळींश’ या लेखात सांगितले आहे की, अंगुत्तर निकाय (3.10.10) मधील पणसुधावक सुत्त मध्ये सुवर्णधूळ मिळवण्याची प्रक्रिया रूपकात्मकरीत्या वर्णन केली आहे. मनातील दूषित विचार दूर करून धर्माशी संबंधित विचारच ठेवावेत, या नैतिक शिकवणीसाठी ही प्रक्रिया वापरली आहे. या सुत्तानुसार ऑल्यूव्हियल सुवर्णसाठ्यातील गँग्यू पदार्थ हा विविध आकारांच्या कणांचे मिश्रण असते- मोठे, मध्यम आणि सूक्ष्म. या तिन्हींचे टप्प्याटप्प्याने विलगीकरण केले जात असे. सूक्ष्म गँग्यू पदार्थ काळ्या रंगाचा असल्याचेही नमूद केले गेले आहे, आणि तो मॅग्नेटाइट असण्याची शक्यता आहे.
सुवर्णयुक्त वाळूचे उत्खनन आणि सुवर्णाची पुनर्प्राप्ती दोन्हीही एकाच व्यक्तीने केल्याचे पुरावे आहेत. अशा व्यक्तीसाठी संस्कृत शब्द आहे - पणसुधावक, म्हणजेच ‘वाळू धुऊन स्वच्छ करणारा’. बौद्धांनी गोवा आणि कोकणाला ‘सुवर्ण अपरांत’ असे नाव दिले आणि नदीकिनारी छावण्या उभारून सुवर्णसंपत्तीचा उपसा केला. अशाच एका छावणीचा उल्लेख कोलवाळ गावातील ‘मुशीर’ या वाड्याशी संबंधित आहे. इ.स. 1647 मधील पोर्तुगीज दस्तावेज ढराले वरी ठशपवरी वश डरश्रलशींश श इरीवशू मध्ये कोलवाळ येथील बौद्ध देवालयाचा उल्लेख आहे. 1930 मध्ये जेसुइट इतिहासकार फादर हेन्री हेरास यांना स्थानिक माहितीच्या आधारे या भागाचे सर्वेक्षण करताना इ.स. 400 च्या सुमाराची बुद्धमूर्ती सापडली. या मूर्तीवरून येथे मोठी बौद्ध वसाहत होती आणि ती सुवर्णखननावर अवलंबून होती असे दिसून येते.
कोलवाळच्या वाळूमध्ये मॅग्नेटाइटचे वर्चस्व असल्याने अंगुत्तर निकाय मधील वर्णनाशी ते जुळते. हलक्या भागांपासून सुवर्णकण वेगळे करण्याची प्रक्रिया मुशीर येथे वापरल्या जाणार्या पद्धतीशी पूर्णपणे सुसंगत आहे. सेंद्रिय घटक व तरंगणारा हलका गाळ दूर केल्यानंतर कोलवाळची वाळू अधिक सुवर्णयुक्त होते. बौद्ध पणसुधावक शृंखलाबद्ध धुण्याच्या प्रक्रियेतून हा हलका वाळूचा भाग दूर करून घनता जास्त असलेले सुवर्णकण वेगळे करत. आजही जगातील अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या गुरुत्वीय पारंपरिक पद्धतींचा वापर केला जातो, आणि त्याचे शैक्षणिक दृश्यादृश्य साहित्य असंख्य संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे गोव्यातील सुवर्णखनन, संपादन, शुद्धीकरण व धातुकर्म ही फक्त आर्थिक क्रिया नव्हती; तर ती एक सखोल सभ्यतागत परंपरा होती - ज्यात विज्ञान, धर्म, तंत्रविद्या, समाजरचना आणि भूगोल यांचा सुंदर संगम झाला होता. या वारशाचे वैज्ञानिक पुनर्मूल्यांकन झाल्यास गोव्याचा सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहास एका नवीन प्रकाशात उजळून निघेल.
पज्ञरार्रीींपळसेर.रल.ळप