सोलर ग्रुपची ‘सत्य’कथा

विवेक मराठी    24-Feb-2026
Total Views |
संदीप धर्माधिकारी
9423104285
सोलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक सत्यनारायणजी नुवाल यांचे परिपूर्ण वर्णन एक स्वत:ला घडविणारी एक स्वयंपूर्ण व्यक्ती असे करता येईल. कारण त्यांनी अतिशय सामान्य अशी सुरुवात करून आपला एक अभूतपूर्व उद्योजकीय प्रवास घडवला आहे. त्यांचा हा जीवनप्रवास सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायक असाच आहे. भारत सरकारने पद्मश्री देण्याची घोषणा करून त्यांचा यथोचित गौरव केला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.. 
satyanarayan  nuwal25 जुलै, 1952 रोजी राजस्थानमधील भिलवाडा येथे एका सर्वसाधारण परिवारात त्यांचा जन्म झाला. वडील नंदलालजी नुवाल आणि त्यांचे आध्यात्मिक गुरू पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यात आध्यात्मिक भावाची जागृती झाली व जीवनाकडे बघण्याची त्यांची एक दृष्टी तयार झाली. 1966 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मथुरा येथील वेदमाता गायत्री आश्रमात आपले एक वर्ष समर्पित केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढे शिक्षण सुरू ठेवणे अवघड होते. अशातच वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि जबाबदारी आणखी वाढली.
 
असं म्हणतात की, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तुम्ही नशीबवान आहात कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामधे क्षमता असते. या दृष्टीने बघितलं तर सत्यनारायण नुवाल अत्यंत नशीबवान आहेत, कारण त्यांनी अथक परिश्रमाने यश खेचून आणले आहे.
 
 
उत्पन्नाच्या स्थिर स्रोताच्या शोधात हा तरुण महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह येथे आला. संघर्षाचे हे दिवस फार कठीण होते. स्वतः नुवाल यांनी फोर्बस्ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी कामाच्या शोधात असताना अनेकदा त्यांच्याकडे पैसे नसत व अनेक रात्री त्यांनी रेल्वे स्टेशनच्या फलाटावरील बाकावर झोपून काढल्या होत्या. त्यांनी अनेक छोटे-छोटे व्यवसाय करून बघितले. फाऊंटन पेनमधील शाईच्या निर्मितीपासून वाहतूक व्यवसायापर्यंत त्यांनी आपले नशीब आजमविण्याचा प्रयत्न केला, पण यश हुलकावणी देत होते. तरीही आत्मविश्वासाने त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले.
 
 
माणसाने न थकता आपले प्रयत्न सुरू ठेवले की, यशाच्या वाटा आपोआप गवसतात. वाहतूक व्यवसायात तोटा झाल्याने ते स्फोटकांचा पुरवठा व्यवसायाकडे वळले. योगायोगाने चंद्रपूर येथील अब्दुल सत्तार भाई यांनी त्यांचे गोडाऊन दरमहा एक हजार रुपये प्रमाणे त्यांना भाड्याने दिले. अशाप्रकारे तुटपुंज्या भांडवलावर 1979 साली त्यांनी स्फोटकांच्या व्यापारात प्रवेश केला व ती सोलर ग्रुपची नांदी ठरली.
 
 
हळूहळू कोळसा खाणीतून त्यांना स्फोटकांच्या ऑर्डर्स मिळू लागल्या व व्यवसायात जम बसू लागला. 1994 पर्यंत ते कन्साइनमेंट एजेंट बनले होते.
 
 
1990च्या दशकापर्यंत विस्फोटकांचे मोठे व्यापारी म्हणून त्यांची ओळख स्थापित झाली होती. हेच दशक त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरले. 1995 मध्ये 60 लाखाचे बँकेकडून कर्ज घेऊन स्वत:ची कंपनी सुरू केली. लायसन्स मिळाल्यानंतर कंपनीची जोमाने वाढ झाली. 2006 साली कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली, त्यावेळी कंपनीचा टर्नओव्हर 78 करोड रुपये होता.
 
 
सोलर ग्रुपची यशोगाथा 1995 मध्ये सुरू झाली जेव्हा नुवाल यांनी स्वतः स्फोटके निर्मिती व्यवसायात प्रवेश केला. पुढील अडीच दशकात सोलर ग्रुप देशातील औद्योगिक स्फोटकांचा सर्वांत मोठा उत्पादक आणि निर्यातदार बनला.
 
 
देशाच्या महत्त्वाच्या दारुगोळ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 2010 मध्ये सोलर ग्रुपने संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात पाऊल टाकले. विविध प्रकारच्या एक्स्प्लोसिव्हचे उत्पादन करण्यासाठी जगातील सर्वांत मोठा कारखाना नागपुरात स्थापन करण्यात आला.
 
 
अत्यंत साधी राहणी व मनमिळावू वृत्ती असलेल्या सत्यनारायण नुवाल यांच्या अथक परिश्रम व दूरदर्शी नेतृत्वामुळे समूह आज जगात चौथा सर्वांत मोठा औद्योगिक स्फोटके उत्पादक बनला आहे. सोलर ग्रुपचे सध्या चार खंडांमध्ये व भारतात अनेक ठिकाणी उत्पादन कारखाने आहेत. त्यांच्याकडे 10,000पेक्षा जास्त कर्मचारी असून जवळपास 65 देशांना ते निर्यात करतात.
 
 
देशाची संरक्षण क्षेत्रातील गरज भागविण्यासाठी सोलर ग्रुपने जागतिक दर्जाची संरक्षण उत्पादन सुविधा तयार केली आहे, ज्यामध्ये प्रणोदक, वॉरहेड स्फोटके, रॉकेटस, क्षेपणास्त्रे, फ्यूज, आधुनिक ग्रेनेड, लँड माईन्स्, शस्त्रयुक्त ड्रोन, तसेच चाचणी सुविधा, संशोधन आणि विकास सुविधा समाविष्ट आहेत. दारुगोळा व स्फोटकांसाठी ’लाइफटाइम असेसमेंट इंजिनिअरिंगसाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात आले आहे, जे देशातील अशाप्रकारचे पहिलेच केंद्र आहे.
 
 
1995 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवले आहेत. 2014 मध्ये बिझनेस टुडेने सत्यनारायण नुवाल यांना भारतातील 100 सर्वोत्तम सीईओंपैकी एक म्हणून निवडले होते.
 
 
आज सोलर ग्रुपचे मार्केट कॅपिटल 1.30 लाख करोड असून सत्यनारायण नुवाल यांचे नेट वर्थ 600 करोड पेक्षा जास्त आहे. त्यांची मुलेसुद्धा त्यांच्यासोबत कार्यरत आहेत. अत्यंत व्यग्र असूनही ते सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यासाठी वेळ व आर्थिक मदत देतात. ते रामदेवबाबा इंजिनिअरिंग कॉलेज, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, गायत्री परिवाराचे व्यवस्थापकीय विश्वस्त असून अनेक संस्थांसोबत संबंधित आहेत. फक्त 10वी पास असलेल्या नुवाल यांनी शिक्षणाचा व व्यावसायिक यशाचा काहीही संबंध नाही हे दाखवून दिले आहे. केवळ जिद्द आणि आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी मिळविलेले यश कल्पनातीत आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देण्याची घोषणा करून त्यांचा यथोचित गौरव केला आहे.