लग्नानंतर पती-पत्नीने मिळून गृहव्यवस्था चालवणे, आर्थिक नियोजन करणे आणि परस्परसहकार्याने जीवन उभारणे अपेक्षित आहे. मुलांना जन्म देणे, त्यांच्यावर योग्य संस्कार करणे, त्यांना शिक्षण देणे आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून घडवणे हे दोघांचे संयुक्त कर्तव्य आहे. गृहस्थाश्रमातील आणखी एक संस्कार म्हणजे पंचमहायज्ञांचे पालन करणे हा आहे.
व आणि मीनाक्षीचे लग्न झाले! नव्या नवलाईचे काही दिवस गेल्यानंतर एक दिवस, ध्रुवाची आजी अनसूया त्यांना म्हणाली, आता तुमचा गृहस्थाश्रम सुरू झाला आहे! आता तुमच्या जबाबदर्या वाढल्या आहेत!
ध्रुव म्हणाला, हो ना! आता मला भाजी आणायला जावे लागते. रद्दी नेऊन टाकावी लागते. मीना पोळी-भाजी करते. मी कुकर लावून वरण फोडणीला टाकतो. शिवाय कपडे वाळत टाकणे, इस्त्री कितीतरी कामे असतात गं आजी! मला आधी याची कल्पना नव्हती! काय विचारू नकोस किती जबाबदार्या वाढल्या आहेत ते!
अनसूया म्हणाली, घरातल्या जबाबदार्या तर झाल्याच, पण तुमच्या सामाजिक जबाबदार्या पण वाढल्या आहेत! मी त्याबद्दल बोलत आहे रे!
***
पत्नीला सहधर्मचारिणी म्हटले गेले आहे. कारण आता पती आणि पत्नी असे दोघांना मिळून धार्मिक आचरण करायचे आहे. त्यामध्ये काही व्रते आहेत, काही कर्तव्ये आहेत, काही अपेक्षा आहेत - पत्नीने पतिव्रता धर्माचे पालन करणे आणि पतीने एकपत्नीव्रताचे आचरण करणे, व्रतासारखे पाळणे. ही निष्ठा केवळ वैयक्तिक सदाचारासाठी नसून कुटुंबसंस्थेच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे.
पती-पत्नीने मिळून गृहव्यवस्था चालवणे, आर्थिक नियोजन करणे आणि परस्परसहकार्याने जीवन उभारणे अपेक्षित आहे. मुलांना जन्म देणे, त्यांच्यावर योग्य संस्कार करणे, त्यांना शिक्षण देणे आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून घडवणे हे दोघांचे संयुक्त कर्तव्य आहे. आतापर्यंत जसे विद्यारंभ, उपनयन, शिक्षण आणि विवाह इत्यादी संस्कार त्यांच्या स्वतःच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर केले, तसेच आता नवदाम्पत्याने आपल्या मुलांवर हे सर्व संस्कार करणे अपेक्षित आहे. मुलांना चांगले वळण लावणे, योग्य शिक्षण देणे आणि योग्य जीवनसाथी निवडून त्यांचा विवाह लावून देणे - ही पालकांची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते.
याचबरोबर दोन्ही घरांतील माता-पित्यांची व ज्येष्ठांची काळजी घेणे हेही नवदांपत्याचे कर्तव्य आहे. विवाहामुळे दोन कुटुंबे एकत्र येतात; त्यामुळे वडीलधार्यांचा सन्मान आणि सेवा ही दोघांची संयुक्त जबाबदारी ठरते. तसेच गृहस्थाश्रमातील पंचमहायज्ञांचे पालन करणे आवश्यक आहे. हिंदू धर्मात पंच-ऋणांची संकल्पना खोलवर रुजली आहे. प्रत्येक व्यक्तीवर सृष्टीचे, मागील पिढ्यांचे ऋण आहे अशी ही मान्यता. हे ऋण आहेत - शिक्षक, देवता, निसर्ग, कुटुंब, समाज आणि प्राणी यांच्याप्रती. हे ऋण कसे फेडायचे? तर पाच यज्ञ करून. यांना पंचमहायज्ञ म्हटले आहे. हे ऋण अर्थातच फिटणारे नसते, पण जोपर्यंत गृहस्थाश्रम चालू आहे, तोपर्यंत हे देणे देत राहिले पाहिजे असा संकेत आहे.
सामान्य हिंदू कुटुंबात, विद्यार्थ्याला किंवा यात्रेकरुला अन्नदान करणे - ही एक धार्मिक क्रिया मानली जाते. ही कृती जरी लहान वाटली, तरी जेव्हा प्रत्येक कुटुंब हे करू लागते तेव्हा त्या समाजात करुणेचा एक प्रवाह निर्माण होतो. पंचमहायज्ञ हा केवळ धार्मिक विधी नसून समाज आणि निसर्गाविषयी कृतज्ञता शिकवणारा विधी आहे.
1. ब्रह्मयज्ञ - ज्ञानसेवा
ब्रह्मयज्ञ म्हणजे ज्ञानाची उपासना. दररोज काहीतरी नवीन शिकणे, अथवा आधी जे शिकले आहे त्याचे मनन, चिंतन करणे. आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालणे ही त्यामागची मूलभूत भावना आहे. जे आपल्याला अवगत आहे ते इतरांना शिकवणे हीही ब्रह्मयज्ञाचीच कृती आहे - कारण ज्ञान वाटल्याने वाढते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. प्रत्यक्ष शिकवणे शक्य नसेल तर शैक्षणिक संस्था, गुरुकुल, वाचनालये किंवा गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हेही ब्रह्मयज्ञाचेच आधुनिक रूप आहे.
2. देवयज्ञ - निसर्गसेवा
देवयज्ञ म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता आणि संवर्धन. रोजची देवपूजा ही त्याची एक बाजू असली तरी त्यामागील व्यापक अर्थ निसर्गरक्षण आहे. परिसर स्वच्छ ठेवणे, नदी-ओढ्यांची स्वच्छता राखणे, वृक्षारोपण करणे, झाडांना पाणी-खत देणे ही देवयज्ञाचीच आचरणे आहेत. आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात वायूप्रदूषण आणि जलप्रदूषण टाळणे ही मोठी जबाबदारी आहे. वाळलेली पाने न जाळणे, प्लास्टिक नदीत न टाकणे, निर्माल्य योग्य पद्धतीने विसर्जित करणे आणि कचर्याची शास्त्रीय विल्हेवाट लावणे - या सर्व कृती देवयज्ञाच्या आधुनिक अभिव्यक्ती आहेत.
3. पितृयज्ञ - पूर्वज आणि कुटुंबसेवा
पितृयज्ञ म्हणजे आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आणि कुटुंबव्यवस्थेची जपणूक करणे. माता-पित्यांची, सासू-सासर्यांची सेवा व त्यांचा मान ठेवणे ही त्याची पहिली पायरी आहे. समाजातील ज्येष्ठांचा आदर राखणे हेही त्यातच येते. तसेच पुढील पिढीवर योग्य संस्कार करणे. मुलांना चांगले शिक्षण देणे, त्यांना कुसंगतीपासून दूर ठेवणे आणि त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजवणे ही समाजनिर्मितीची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपली मुले आपल्यापेक्षा अधिक सक्षम, सुशिक्षित आणि सज्जन बनावीत यासाठी प्रयत्न करणे हेच पितृऋण फेडण्याचे खरे साधन आहे.
4. मनुष्ययज्ञ - मानवतेची सेवा
मनुष्ययज्ञ म्हणजे समाजातील इतर मानवांप्रती सहकार्य आणि करुणा. वाढदिवस, स्मृतिदिन यांसारख्या प्रसंगी अन्नदान करणे किंवा जिथे अन्नछत्रे चालत असतील तिथे धान्य देणे हा त्याचा सोपा मार्ग आहे. गरजूंना अंथरूण-पांघरूण, कपडे, चप्पल यांचे दान करणे, जलदान करणे, सार्वजनिक पाणपोई उभारणे किंवा विहिरी-तलाव स्वच्छतेसाठी हातभार लावणे हीही मानवसेवेची रूपे आहेत. आजच्या शहरी जीवनात स्वयंसेवी संस्थांशी जोडून सामाजिक उपक्रमात सहभागी होणे हे मनुष्ययज्ञाचे प्रभावी आधुनिक रूप आहे.
5. भूतयज्ञ - सर्व सजीवांची सेवा
भूतयज्ञ म्हणजे सर्व सजीवांबद्दल संवेदनशीलता. पशुपक्ष्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे ही त्याची सुरुवात आहे. उदाहरणार्थ, प्लास्टिकच्या पिशवीत अन्न टाकल्यास जनावरे ते पिशवीसकट खातात आणि आजारी पडतात; त्यामुळे अशा चुकीच्या सवयी टाळणे आवश्यक आहे. पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे, घरटी बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, जखमी किंवा आजारी प्राण्यांसाठी पशू-मित्र, सर्प-मित्र यांच्याशी संपर्क ठेवणे - या कृती भूतयज्ञाच्या जिवंत उदाहरण आहेत.
पंचमहायज्ञ ही केवळ प्राचीन संकल्पना नाही, तर संतुलित आणि जबाबदार जीवनपद्धती आहे. ज्ञानसंवर्धन, पर्यावरणसंरक्षण, कुटुंबव्यवस्था, सामाजिक सहकार्य आणि सर्व सजीवांविषयी करुणा - या पाच स्तंभांवर टिकणारे समाजजीवन आजही तितकेच आवश्यक आहे. आणि ही जबाबदारी गृहस्थाश्रमातील विवाहित दांपत्यावर टाकली आहे.
***
विवाहसंस्कारात लाजाहोम इत्यादी विधी ज्या अग्नीत केले जातात, त्या अग्नीला गृह्याग्नी, स्मार्ताग्नी किंवा वैवाहिकाग्नी असेही म्हणतात. विवाहानंतर वर-वधू घरी येताना हा अग्नी घरी आणून विधीपूर्वक प्रतिष्ठित करत. या जोडप्याने या अग्नीत दररोज सकाळी व संध्याकाळी आहुती देऊन तो कधीही विझू न द्यावा. घरातील सर्व होम, मुलांचे संस्कार या अग्नीच्या साक्षीने करावेत असा नेम होता. पंचमहायज्ञ आणि पाकयज्ञ ही स्मार्त कर्मे विवाहाग्नीत केली जात. श्रौत कर्मे मात्र त्रेताग्नीत केली जातात. त्यासाठी - दक्षिणाग्नी, गार्हपत्य आणि आहवनीय या अग्निची स्थापना केली जात असे. या तीन अग्निंची स्थापना, प्रतिष्ठा आणि जतन याला त्रेताग्निसंग्रहसंस्कार म्हणतात. आजच्या काळात विवाहाग्नीची परंपरा आणि त्रेताग्निसंग्रह हे संस्कार बहुतांशी लुप्त झाले आहेत.