मोह न याला ख्यातीचा...

विवेक मराठी    25-Feb-2026
Total Views |
@ मिलिंद प्रभाकर सबनीस
9422881783
Mohanrao 
‘वन्दे मातरम्’ विषयाचे पूर्ण वर्षभर कार्यक्रम करून हा विषय राष्ट्रीय पातळीवर पोहोचवून स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहाणारे ’वन्दे मातरम्’ जागराचे प्रणेते मोहनराव अळवणी. पुण्याच्या संघसमर्पित व्यक्तींच्या नामावळीतील मोहनराव अळवणी यांचे 8 फेब्रुवारी 2026रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले.
संघसमर्पित व्यक्तींच्या नामावळीत पुण्याच्या मोहनराव अळवणींचे नाव चांगलेच सुपरिचित आहे. ’ज्ञानदा प्रतिष्ठान’ या शैक्षणिक संस्थेची तसेच ’विद्या भारती’ या संस्थेला आपल्या कार्याने नावलौकिक मिळवून देणारे मोहनराव अळवणी यांचे 8 फेब्रुवारी 2026रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले .
 
 
आज ’वन्दे मातरम्’चे 150वे वर्ष. ’वन्दे मातरम्’चा जागर संपूर्ण देशभर गाजत आहे, परंतु 26 वर्षांपूर्वी या विषयाची व्याप्ती आणि महत्त्व लक्षात घेऊन पुण्यात ’वन्दे मातरम्’ विषयाचे पूर्ण वर्षभर कार्यक्रम करून हा विषय राष्ट्रीय पातळीवर पोहोचवून स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहाणारे ’वन्दे मातरम्’ जागराचे प्रणेते मोहनराव अळवणी यांचे ’वन्दे मातरम्’च्या 150 व्या वर्षात निधन व्हावे, हा दुर्दैवी योगायोग आहे.
 
 
प्रसिद्ध लेखक व प्रकाशक अमरेंद्र गाडगीळ यांनी 1974च्या सुमारास ’वन्दे मातरम्’ वर पहिले मराठी पुस्तक लिहिले. त्यांच्याच महत्त्वाच्या सहभागाने 1976मध्ये बनारस येथे ’वन्दे मातरम्’चे शताब्दी वर्ष साजरे झाले. आणीबाणीच्या धकाधकीच्या काळात ’वन्दे मातरम्’चा गौरव व प्रसार अपेक्षित प्रमाणात देशभर पोहोचला नाही. 1999मध्ये ’वन्दे मातरम्’चे 125वे वर्ष सुरू होते. मोहनराव अळवणी कार्यवाह म्हणून ज्या ’ज्ञानदा प्रतिष्ठान’ संस्थेचे काम पाहात होते त्याच संस्थेत मी कलाशिक्षक म्हणून कार्यरत होतो. ’वन्दे मातरम्’ विषयीचे संशोधनात्मक पुस्तक ह्या 125 वर्षानिमित्त प्रकाशित करावे असे मोहनरावांना सुचवल्यानंतर त्यांनी याची जबाबदारी तर घेतलीच, पण त्याच सुमारास पुणे दौर्‍यावर असणार्‍या आदरणीय मोरोपंत पिंगळे यांच्यासमोर मोहनरावांनी हा विषय मांडला. मोरोपंतांनी शांतपणे तो विषय ऐकून घेतला आणि मोहनरावांना म्हणाले की, वन्दे मातरम्ला 125 वर्षं होत आहेत, हा खूप मोठा आणि संवेदनशील विषय आहे. एखादा छोटा मर्यादित कार्यक्रम करून या विषयाला न्याय मिळणार नाही. तुम्ही जरा थांबा. मी अधिक चांगले वक्ते, प्रमुख पाहुणे येत्या काही दिवसांत मिळवून देतो. हा विषय फक्त पुण्यापुरता न राहता राष्ट्रव्यापी झाला पाहिजे.
 
 
अनेक मोठ्या विषयांना सुरुवात करून द्यायची, त्या विषयासाठी योग्य कार्यकर्ते जोडून द्यायचे आणि त्यातून सहजपणे बाहेर पडायचं, तेही कुठलं श्रेय न घेता; हे मोरोपंतांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य. आपल्या दूरदृष्टीने त्यांनी या विषयाशी मोहनरावांना जोडलं त्यामुळे ते संपूर्ण वर्ष मोरोपंतांच्या मार्गदर्शनाने ’वन्दे मातरम्’ विषयी विविध उपक्रम आयोजित करीत मोहनरावांनी यशस्वी केले. एखादा विषय हातात घेतला की, सर्वस्व पणाला लावून तो विषय तडीला नेण्याची जिद्द आणि चिकाटी मोहनरावांकडे होती. मोरोपंतांच्याच आमंत्रणावरून या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील पहिल्या कार्यक्रमाला लाल-बाल-पाल यांचे नातू व भाई महावीरजी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकासाठी समितीतर्फे मोहनराव अळवणी बोलायला उभे राहिले. या वर्षातील संकल्पित कार्यक्रमांची ओझरती माहिती त्यांनी दिली आणि त्यांच्या बोलण्याच्या शेवटी त्यांनी अचानक उस्फूर्तपणे घोषणा केली की, या वर्षाच्या सांगतेच्या कार्यक्रमात दहा सहस्र विद्यार्थी सामूहिकरीत्या संपूर्ण ’ वन्दे मातरम्’ गातील. वास्तविक मोहनरावांचं प्रत्येक गोष्टीचं नियोजन विचारपूर्वक सर्वांना विश्वासात घेऊन केलेलं असायचं. या विषयावर आमची कोणतीच चर्चा झालेली नसल्यामुळे मी, सचिन जोशी, शिरीष पटवर्धन हे समिती सदस्य आणि मोहनरावांना ओळखणारी मंडळी अक्षरशः अचंबित झालो. कारण एवढ्या मोठया विद्यार्थीसंख्येच्या कार्यक्रमाची कल्पनाही आमच्या दृष्टीनं अशक्यप्राय होती .
 
 
कार्यक्रम संपल्यानंतरच्या चर्चेत मोहनरावांना त्याविषयी विचारलं मोहनराव म्हणाले की, का किंवा कसं ते माहीत नाही पण अंतःप्रेरणेने ही कल्पना अनाहूतपणे अचानक माझ्याकडून मांडली गेली. मोहनरावांसारख्या दूरदृष्टी असणार्‍या धोरणी व्यक्तीकडून अशी घोषणा केली गेली, त्यामागे काही ईश्वरी संकेत असावा, असं आता वाटतं; कारण पुढच्या वर्षीचा हा समूहगायनाचा कार्यक्रम अनेक अडथळे येऊनही संस्मरणीय असा झाला.
 
 
सांगतेचा हा कार्यक्रम नोव्हेंबरमध्ये होणार होता त्यासाठी जूनमध्ये जवळजवळ 150 हून अधिक शाळांच्या मुख्याध्यापकांना मोहनराव आणि मी भेटलो. अनेक मुख्याध्यापकांचे अनुभव फारसे चांगले नव्हते पण मोहनराव निराश व्हायचे नाही. पासष्टी ओलांडलेले मोहनराव अत्यंत उत्साहाने या कार्यक्रमाच्या तयारीला लागले होते. अशा कॅप्टनमुळेच आमचा सर्वांचा उत्साह वाढत होता. यासाठी संगीत शिक्षकाची व संगीत कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करणे, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या बैठका, या सर्व 11,000 मुलांची नेण्या -आणण्याची बसची व्यवस्था, या मुलांना खाऊवाटप, मुलांची सुरक्षितता, ऐनवेळची वैद्यकीय व्यवस्था अशा सर्व गोष्टीत स्वतः मोहनराव पुढाकार घेऊन लक्ष घालत होते. डिसेंबर 2000 मध्ये झालेला हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला. यामागे सर्वाधिक कष्ट आणि विचार मोहनरावांचाच होता. या कार्यक्रमानंतर या वर्षाची सांगता झाली.
 
 
या संपूर्ण वर्षाच्या कार्यक्रमाची जबाबदारी मोहनरावांनी आपल्या ज्ञानदा प्रतिष्ठानवर घेतली होती. ज्ञानदा ही शैक्षणिक संस्था असल्यामुळे या वर्षाच्या सांगतेनंतर ’वन्दे मातरम् समिती’ विसर्जित झाली व ज्ञानदाचा सहभाग संपला. पण त्यानंतरही ’वन्दे मातरम्’च्या प्रसारासाठी 2000 मध्ये स्थापन केलेल्या ’जन्मदा प्रतिष्ठान’ या संस्थेच्या मागे ते खंबीर उभे राहिले. 2011 मध्ये बंकिमचंद्रांच्या 175 व्या जयंती वर्षाच्या वेळी मी करत असलेल्या ’समग्र वन्दे मातरम्’ या कोशनिर्मितीच्या मागेही ते उभे राहिले.
वयाच्या पंच्चाहत्तरीपूर्वीच ज्ञानदा प्रतिष्ठानचं कार्यवाहपद त्यांनी सोडलं. दरम्यानच्या काळात विद्या भारती या संस्थेचेही ते राज्यपातळीवरील उपाध्यक्ष होते. संस्कृती ज्ञान परीक्षा महाराष्ट्रभर रुजवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. भारतीय संस्कृती आणि परंपरा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. इंजिनियरींगसारख्या विषयातून संघकार्य म्हणून ते शैक्षणिक कार्यात आले. कृ. गो. तथा राजाभाऊ लवळेकर, पु. ग. वैद्य यासारख्या शिक्षणतज्ज्ञ मंडळीच मार्गदर्शन घेतले. उत्तम वाचन असल्यामुळे त्यांची आकलन शक्ती, सांस्कृतिक आणि राजकीय विषयातील समज आश्चर्यचकीत करणारी होती. विचारांच्या बाबतीत काहीसे आग्रही असले तरी त्यांच्या समर्पणशील वृत्तीमुळे त्यांनी आपल्या कार्याला अनेक सहृदयी देणगीदार सहज जोडले. अलीकडच्या काळात वानप्रस्थाश्रमाप्रमाणे जीवन जगण्याचा निश्चय त्यांनी केला होता. एवढे काम करूनही निर्लेप भावनेने अत्यंत समाधानाने नव्या कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपवत ते त्यातून बाहेर पडले होते.
 
 
आज वन्दे मातरम् चे 150 वे जयंती वर्ष चालू आहे. गेल्या वर्षभरात वन्दे मातरम्चे विविध ठिकाणी झालेले कार्यक्रम, माझ्या ’समग्र वन्दे मातरम्’चा हिंदी अनुवाद व मराठीची दुसरी आवृत्ती यामुळे ते या विषयाबद्दल अत्यंत आनंदी व समाधानी होते. समर्पित वृत्तीच्या मोहनरावांना आदरपूर्वक श्रद्धांजली.
 
लेखक ’वन्दे मातरम्’चे अभ्यासक आहेत.