एक वैश्वानर शांत झाला...!

विवेक मराठी    25-Feb-2026
Total Views |
सुहास वैद्य
9922915254
राजकुमार तथा काका खिवंसरा यांच्यासारखे या युगातील सत्पुरुष वैश्वानर रूपाने अस्तित्वात असलेल्या नारायणाची सेवा करण्यात आपली इतिकर्तव्यता मानत होते. काकांनी फक्त रुग्णालयात अन्नदान केले नाही तर शहरातील वृद्धाश्रम, मोंढ्यातील (होलसेल मार्केट) हमाल, रोजंदारीवर काम करणारे कामगार, कुठल्यातरी मुलांच्या वसतीगृहात अशा रीतीने काकांनी आपला अन्नयज्ञ सुरू केला. जिथे तो सुरू केला तिथे तो आजतागायत सुरू आहे.
rajkumar
 
 
डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे कार्यवाह डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांच्याकडे एक व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितले की, काकांनी (खिवंसरा) पाठवले आहे. हे तुम्ही ठेवून घ्या असा निरोप आहे असे म्हणून एक पिशवी पुढे केली. डॉ. तुपकरी यांनी काय आहे आहे? हे विचारण्याच्या आत काकांचा फोन आला आणि ते थरथरत्या आवाजात म्हणाले की, काही पैसे पाठवले आहेत. एका गरीब मुलीच्या फीचे पैसे मी देईन, असे म्हणालो होतो. माझे उद्याचे काही खरे नाही पण तिला शब्द दिला आहे म्हणून तिच्या फीचे अडीच लाख रुपये पाठवले आहेत. तिच्यापर्यंत पोहोचवा. मृत्युशय्येवर असतानाही दिलेला शब्द लक्षात ठेवून तो पार पडण्याचा आग्रह धरणारे काका आज आपल्यात नाहीत. छत्रपती संभाजीनगर मधील हजारो लोक आज ठरवून उपवास करतील, असे वाटले. कारण त्यांच्या पोटात दोन घास पडावे म्हणून आपले उर्वरित आयुष्य खर्च करणारे व्यक्तित्व; राजकुमारजी तथा काका खिवंसरा काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
 
 
केव्हातरी तीस वर्षांपूर्वी त्यांची पत्नी डॉ. हेडगेवार रुग्णालयात भरती होती. त्यांच्यासाठी काकांनी घरून जेवणाचा डबा आणला. त्यावेळी शेजारच्या खाटेवर असलेल्या बाईला विचारले, तुमच्या जेवणाचे काय? तिने उत्तर दिले, माह्यासाटी कोण डबा आन्नार. मीच इथं हाय अन घरी भाकर बनवनारं कोन नाय. काकांनी त्या बाईसाठी सुद्धा घरून डबा आणायला सुरुवात केली. एका डब्यावरून दोन डबे आणि बघता बघता गेल्या तीस वर्षांत काकांच्या अन्नदानाचा आकडा अगदी नक्की नाही तरीही तो आठ लाखांच्या आसपास जातो. रुग्णांना दिले जाणारे जेवण घरच्यासारखे नाही तर घरचेच. काही रुग्णांना जर विशेष पथ्य असेल तर त्यासाठी काकू वेगळा डबा आणि तोही मुबलक तयार करून पाठवून देणार.
 
 
आपण समाजाचे काही देणे लागतो ही मूळ भावना जपत काकांनी आपला व्यवसाय केला. व्यवसाय स्थिर झाला, विस्तारला. बदलत्या काळात त्यांची दोन्ही मुले कमावती झाली व व्यवसाय सक्षमपणे सांभाळू लागली, तशी काकांनी स्वतःच्या व्यवसायातून निवृत्ती घेतली. सुरुवातीचा काही काळ छत्रपती संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्तकेंद्राच्या कामात जोडून घेतले. रक्तदान शिबिरे आयोजित करणे हा त्यांचा आवडता विषय होता. रक्तकेंद्रात रक्त मागायला येणार्‍या रुग्णाच्या नातेवाईकाला रक्ताशिवाय परत जावे लागणे हे त्यांच्यासाठी क्लेशदायक असे. रक्तदान शिबीर आयोजित केल्यावर त्यांनी स्वतःचा नियम करून ठेवला होता. जोपर्यंत त्यांनी आयोजित केलेल्या शिबिरात किमान पंचवीस रक्तदाते रक्तदान करत नाहीत तोपर्यंत तेथील चहा आपण प्यायचा नाही.
 
 
rajkumar 
 
काही वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरातील वाळूज औद्योगिक वसाहतीत त्यांनी आयोजित केलेल्या शिबिरात चोवीस रक्तदाते झाले आणि जोराचा पाऊस सुरू झाला. सोसाट्याचा वारा आणि पाऊस लवकर थांबण्याची चिन्हे दिसेनात म्हणून कंपनी मालक म्हणाले की, आता कोणी येण्याची शक्यता नाही. आपण शिबीर आवरते घेवू. संयोजक म्हणाले, चला काका, छान पाऊस पडतोय आपण चहा घेवू. काकांनी नम्र नकार दिला आणि ते म्हणाले, माझा नियम आहे जोपर्यंत 25वा रक्तदाता येणार नाही, मी चहा घेऊ शकत नाही. संयोजक खूप आग्रह करत होते- बघा, किती जोराचा पाऊस पडतोय. आता कोणी येण्याची शक्यता नाही. पण काका आपल्या शब्दावर ठाम होते. ते म्हणाले, हे जर ईश्वरी कार्य असेल तर माझा नियम मोडला जाणार नाही. तो वरतून सर्व पाहतो आहे.
 
 
काका असं म्हणाल्यामुळे बाकीच्यांचीही अडचण झाली. या सगळ्या गडबडीत पावसात चिंब भिजलेला एक जण तेथे आला आणि म्हणाला, आताच चहाच्या टपरीवर इथल्या रक्तदान शिबिराची बातमी वाचली आणि लगेच निघालो. रस्त्यात पाऊस लागला पण रक्तदान करायचे ठरवलेच होते म्हणून तसाच भिजत आलो. योग्य काळजी घेत त्याचे रक्तदान पार पडले आणि तेव्हा कुठे काकांनी चहाचा कप हातात घेतला.
 
 
जे ठरवले आहे ते शेंडी तुटो वा पारंबी... पार पडायचेच हा त्यांचा कामाचा धडाका होता. त्यांना बैठका, त्यातील चर्चा, विचार विनिमय कधी मानवलेच नाही. कुठल्याशा बैठकीत बसलेल्या काकांवर एक जबाबदारी टाकली. ते लगेच आत्ता करतो म्हणून उठून चालायला लागले. बैठक चालवणारे म्हणाले, काका थांबा अजून बैठक संपलेली नाही. काकांनी लगेच उत्तर दिले, मला माझे काम समजले आहे. बाकीच्यांचे ते पाहून घेतील. मी त्यांचे काम ऐकत वेळ कशाला वाया घालवू.
 
 
अशाच एका रक्तदान शिबिरात त्यांना फोन आला की, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना देवाज्ञा झाली आहे. ताबडतोब मुंबईला पोहोचावे. त्यांनी शांतपणे उत्तर दिले की, मी कितीही तातडीने मुंबईला पोहोचलो तरी ते काही जिवंत होणार नाही. पण हे शिबीर अर्धवट टाकून आलो तर येणार्‍या रक्तदात्यांमुळे ज्यांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे ती मिळणार नाही. त्यामुळे शिबीर संपल्यावरच मी इथून निघेन.
 
 
काका म्हणजे मनस्वी व्यक्तित्व. जे करणार ते उच्च कोटीचच. रोजच्या अन्नदानातील शिरा सुद्धा साजूक तुपातला आणि तुम्ही हाताने खाल्ला तर पुढचे दोन तास बोटांचा साजूक तुपाचा वास जाणार नाही ही शंभरावर एक टक्का खात्री. काकांनी फक्त रुग्णालयात अन्नदान केले नाही तर शहरातील वृद्धाश्रम, इथल्या मोंढ्यातील (होलसेल मार्केट) हमाल, रोजंदारीवर काम करणारे कामगार, कुठल्यातरी मुलांच्या वसतीगृहात अशा रीतीने काकांनी आपला अन्नयज्ञ सुरू केला. जिथे तो सुरू केला तिथे तो आजतागायत सुरू आहे. त्यांच्या अन्नदान सेवेला कोरोनाची महामारी सुद्धा खंडित करू शकली नाही. उलट याच काळात माझी जास्त आवश्यकता आहे म्हणून ते सत्तरीच्या वयात अधिक सक्रीय राहिले. या काळात कोरोना रुग्णांना अजून सकस काही देता येते का? म्हणून ते काम करत राहिले.
 
 
rajkumar
 
मधुमेह, वाढता रक्तदाब याची पर्वा न करता अत्यंत हसतमुख राहत ते अन्नदानसेवा करत होते. त्यासाठी त्यांनी त्यांचा एक संपूर्ण बंगला वापरात आणला. त्यांच्या अन्नछत्रात जाण्याचा योग आला तेव्हा ते मला म्हणाले की, हा बंगला घेतला तेव्हा त्याचे नाव मी प्रसाद ठेवले होते. आज ते नाव सार्थ झाल्यासारखे वाटते. कधीही काकांकडे जावे आणि आपली समस्या सांगावी, तेव्हा त्यांचे पुढचे वाक्य असायचे; ठीक, आता ही तुझी नाही माझी अडचण आहे, काळजी नको सगळं नीट होईल आणि ते काम करून टाकायचे. त्यांच्या घरी गेल्यावर काहीनाकाही खाऊ खाल्याशिवाय घराबाहेर पाउल टाकणे अशक्यच.
 
 
एकदा जाता जाता त्यांनी माझ्या खिशात काही पैसे कोंबले आणि मला काही कळायच्या आत ते म्हणाले, या समोरच्या वॉर्डात असा एक फारच गरीब पेशंट आहे की त्याच्याकडे पैसे नाहीत. तू पैसे भरून टाक आणि त्याला ते कोणी दिले हे सांगू नकोस. फक्त भरले एवढेच सांग. असे सांगून ते निघून गेले. मी त्या रुग्णाची माहिती घेवून पैसे भरण्यासाठी खिशात हात घातला तर ते साडे आठ हजार रुपये होते. त्यातील आठ हजार रुपये भरून काकांना फोन केला की, पाचशे रुपये माझ्याकडे शिल्लक राहिले तर त्यांनी मलाच वेड्यात काढले व म्हणाले, अरे काय सुहास, त्यालाच गाडी भाड्याला देवून टाकायचे ना! आता राहू दे. नंतर जवळ जवळ सहा महिने ते पैसे माझ्याकडे राहिले. एकदा त्यांना ते द्यायला गेलो तर हे कसले पैसे? असे त्यांनीच मला विचारले. सर्व सांगितल्यावर त्यांनी ते पैसे घेतले, पण बाकी पैशाचा हिशोब कधीच मागितला नाही.
 
 
 
संस्थेच्या वतीने चालणारी क्षुधा सन्मान योजना असो, ग्रामीण भागातून येऊन शहरात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा जेवणाचा प्रश्न असो, उच्च शिक्षणासाठी धडपडणारा कोणी असो, काकांना ते समजायचा अवकाश की, काका सर्वांच्या आधी तिथे पोहोचणार हे ठरलेले. स्वतःच्या पैशांच्या बाबतीत तसे बेहिशोबी असणारे काका इतरांच्या पैशाच्या आणि वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होते. एक रक्तदान शिबीर आयोजित करताना मनुष्यबळासह किती खर्च येतो व त्यामुळे शिबीर संयोजकांनी किमान पंचवीस रक्तदाते का आणले पाहिजेत, हे ते व्यवस्थित समजावून सांगायचे. कोणाला पाच वाजताची वेळ दिली असेल तर ते पाचच्या ठोक्याला हजर म्हणजे हजर असायचे किंवा कोणी त्यांना चारची वेळ दिली आणि तो पाच मिनिटे उशिरा पोहोचला तर त्याला काका भेटत नसत किंवा पुढची दहा मिनिटे त्याला काकांचे बोल ऐकून घ्यावे लागत. कारण त्यांना पैशापेक्षा स्वतःच्या आणि समोरच्या माणसाच्या वेळेची किंमत होती. पैसा गेला तर परत मिळवता येतो पण वेळ नाही, हे त्यांच्या पक्के तत्त्वज्ञान होते. म्हणूनच त्यांची अंत्ययात्रासुद्धा बरोबर ठरलेल्या वेळेत निघाली, एक सेकंद मागेपुढे झाला नाही.
 
 
वृद्धापकाळ, वाढते आजार त्यातून झालेली हृदय शस्त्रक्रिया याचा त्यांच्या सक्रीयतेवर कोणताच परिणाम झाला नाही. सतत हसतमुख राहून त्यांनी समाजसेवा केली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ते त्यांनी अगदी नाराजीने, नाईलाजाने स्वीकारले. व्यासपीठ, भाषण, हारतुरे फोटो यापासून ते लांब राहिले. एका समारंभात ते आणि मी बरोबरीने व्यासपीठावर होतो. त्यांना बोलायला सांगितले तर ते एकच वाक्य म्हणाले, मला काम करता येतं. माझ्यावतीने बोलण्यासाठी मी याला आणले आहे आणि ते लगेच जागेवर जाऊन बसले.
 
 
अनेकांचा पोशिंदा असलेला हा अवलिया जाताना सुद्धा इतक्या साधेपणाने गेला की, प्रत्यक्ष साधेपणालाही आपली नजर खाली करावी लागली असेल. माझ्या पश्चात कोणतेही विधी, अंत्यसंस्कार करू नये. माझ्या मृतदेहावर हार, फुले, नवीन कपडे असे कोणतेही सोपस्कार घरच्यांनी, नातेवाईकांनी, परिचित, मित्रपरिवाराने करायचे नाही; आणि महत्त्वाचे म्हणजे मी सुरू केलेली अन्नदान चळवळ माझ्या वारसांनी अशीच पुढे सुरू ठेवावी, असे मृत्युपत्र लिहून त्यांनी काळाला क्षणभर अचंबित केलेच, पण समाजातील येणार्‍या अनेक पिढ्यांच्या योगक्षेमाची काळजी मिटवून टाकली.
 
 
श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने आपले अस्तित्व कुठे कुठे असते असे विशद करताना खालील श्लोक सांगितला आहे.
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्॥
 
 
(भावार्थ: मी सर्व प्राणिमात्रांत वैश्वानर म्हणजे जठराग्नी रूपात असतो आणि चार प्रकारचे अन्न पचवण्याचे काम करतो.)
काका खिवंसरा यांच्यासारखे या युगातील सत्पुरुष वैश्वानर रूपाने अस्तित्वात असलेल्या नारायणाची सेवा करण्यात आपली इतिकर्तव्यता मानत होते. आज ते स्वतः कृष्णरूप होऊन गेले आहेत. कीर्तीरूपाने चिरंजीव होणारे अनेक जण आहेत, पण रसनेच्या, चवीच्या आणि क्षुधाशांतीच्या रूपाने चिरंजीव होणारे काका खिवंसरा एकमेवाद्वितीय आहेत. त्यांना माझा साष्टांग दंडवत.