भारतीय संदर्भात स्त्रीचिंतनाचा दृष्टीकोन संपूर्ण, परिपूर्ण आहे. जो दृष्टीकोन केवळ एका लिंगाच्या व्यक्तींच्या हितापुरता, स्त्रीगटापुरता मर्यादित नाही तर जीवनाचे भरणपोषण, कौटुंबिक नातेसंबंध, सृष्टीचे संरक्षण यामध्ये सामंजस्य आणि कर्तव्य पालन यांना केंद्रस्थानी ठेवणारा हा विचार आहे.
पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिवस 1975 साली साजरा झाला, त्याला आता 50 वर्षे पूर्ण झाली. गेल्या पन्नास वर्षांमध्ये भारतात व जगात स्त्रीविचार विविध अंगाने पुढे गेला आहे. स्त्रीसशक्तिकरण म्हणजे स्त्रियांचा सामाजिक सहभाग, राजकीय सहभाग व राष्ट्राच्या जीडीपीमध्ये आर्थिक सहभाग आणि महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातला सहभाग अशा सर्व पातळ्यांवर स्त्रियांच्या क्षमता, भूमिका व अधिकार या बद्दलची जाणीव विस्तारते आहे. शिक्षण, नोकरी या कारणांनी मोठ्या प्रमाणात स्त्रियांचे स्थलांतरण होत आहे. त्यामुळे व माध्यम क्रांतीमुळे गेल्या दीडदोनशे वर्षांपूर्वी पश्चिमात्य देशांमध्ये विकसित झालेला स्त्रीवाद व स्त्रीहक्क चळवळ आता जगभर पसरली आहे.
प्रारंभ
1848 मध्ये सेनेका फॉल्स इथे महिलांची पहिली परिषद झाली ज्यात महिलांच्या अधिकारांची सनद किंवा 12 ठराव पारित केले गेले. त्यातला बहुचर्चित मताधिकाराचा ठराव मात्र एकमताने पारित होऊ शकला नाही, बाकी अकरा ठराव एकमताने पारित झाले. तेव्हापासून महिलांचा मताधिकार आणि राजकीय सहभागासाठी संघर्ष सुरू होता. परिणामतः 1918 व 1920 मध्ये युरोप, अमेरिकेतल्या महिलांना मताचा अधिकार मिळाला पण भारताचे वेगळेपण भारताच्या मूळ विचारांमध्ये असल्यामुळे भारताची राज्यघटना बनवताना त्यामध्ये पंधरा महिलांचा सहभाग होता, ज्यांनी समाजाचे नेतृत्व केलं. तेव्हा स्त्री व पुरुष अशी कप्पेबंद विभागणी न होता, त्यांच्या सहभागामुळे महिलांचे अनुभव, महिलांच्या आकांक्षा व मागण्या यांना आपल्या संविधानामध्ये योग्य अशी जागा मिळाली आणि संविधान लागू होताच महिलांना मताधिकार ही मिळाला. पाश्चिमात्य स्त्रीवादी विचार हा त्यांच्या धार्मिक अवधारणा, त्यातून तयार झालेली चर्चसत्ता, राजसत्ता व स्त्रियांचे दुय्यमत्वाचे अनुभव यातून विकसित झालेला विचार व चळवळ आहे. पुढे ती साम्यवादी विचारांची चळवळ झाली. जगातल्या भिन्न संस्कृती, अनुभव व अवधारणा असलेल्या स्त्रियांसाठी ती समान असू शकत नाही याची जाणीव हळूहळू जगाला होऊ लागली.
स्वदेशी स्त्रीविचार
जगभरात महिलांचे काही मुद्दे समान आहेत, उदाहरणार्थ दुय्यमत्व, पुरुष प्राधान्य, शारीरिक हिंसा, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, सामाजिक सहभाग नाकारणे, घरातल्या कामांच्या ओझ्यामुळे विकासाच्या संधी न मिळणे या काही जगातल्या समान समस्या आहेत. पण अनेक समस्या या संस्कृतीजन्य, परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे त्या सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा त्या त्या संस्कृतीच्या माध्यमातूनच व्हायला हवा याची जगभर चर्चा सुरू झाली आणि पश्चिमात्य स्त्रीवादाला पर्याय काय? याची चाचपणी जगभरातल्या महिला नेत्यांनी सुरू केली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक वरचा होता. पाठोपाठ असे स्वदेशी विचार घेऊन विविध प्रकारचे स्त्री विचार व स्त्रीवाद पुढे येऊ लागले.
भारताच्या संदर्भात मात्र आपली औपनिवेशक मानसिकता आणि अन्य विचारप्रणालींचा प्रभाव असलेल्या भारतीय लोकांनी प्रथम पाश्चिमात्य स्त्रीवादाचाच स्वीकार, प्रचार, प्रसार भारतात केला. विद्यापीठ शिक्षण, पुस्तके, साहित्य, सिनेमा, कला या माध्यमातून पाश्चिमात्य स्त्रीवादी विचार भारतभर पसरू लागला. सर्वसामान्य भारतीय महिलांना मात्र तो विचार तितकासा रुचत नव्हता, पेलत नव्हता, कारण शिक्षण, तशा प्रकारची मानसिक तयारी, आर्थिक तयारी, आत्मविश्वास हा त्यांच्याजवळ नव्हता. म्हणून भारताच्या संदर्भात इथला मातीतला स्वदेशी स्त्रीविचार पुढे यायला खूप काळ गेला.
19व्या शतकात भारतात समाजसुधारकांनी स्त्रीप्रश्नांवर काम करायला सुरुवात केली. त्या वेळच्या पुढारलेल्या स्त्रीनेतृत्वाने महिला प्रश्नांची ही चळवळ पुढे नेली मग तो मताधिकार असो, संमतीवय असो, बालविवाहाचा प्रश्न असो, जरठकुमारी विवाह असो. मुख्य शिक्षणाचा प्रश्न हाती घेतला गेला. एक-दीड हजार वर्षांत शिक्षण व आर्थिक सहभाग याबाबत महिलांना डावलले गेले होते, समाजात अनेक कुप्रथा होत्या, त्यावर काम सुरू झाले.
भारतीय स्त्रीशक्तीची मांडणी
1988 मध्ये भारतीय स्त्रीशक्ती ही भारतीय दृष्टीकोनातून महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी स्त्री, कुटुंब व देश यांचा विचार करणारी संघटना उभी राहिली. भारतीय दृष्टीकोनातून महिलांच्या संदर्भातले अन्यायाचे, अभावाचे, अत्याचाराचे प्रश्न हातात घेतले गेले. 2025 मध्ये भारतीय दृष्टीकोनातून स्त्रीविचाराची सैद्धांतिक मांडणी करणारा ग्रंथ ‘शक्ती: विमेन, जेंडर अँड सोसायटी इन इंडिया’ हा सिद्ध झाला. या ग्रंथात स्त्रियांचे प्रश्न, चळवळी, विचार, सरकारी धोरण यांचा जागतिक आढावा घेतला गेला आहे. पण स्त्रियांकडे पाहण्याची भारताची मूळ दृष्टी काय होती, त्याच्यामध्ये झालेली अवनती व पुन्हा गेल्या शंभर-दोनशे वर्षांत स्त्रियांच्या प्रश्नांवर झालेले काम व त्यांनी घेतलेली भरारी याचा लेखाजोखा घेण्यात आला आहे. या बरोबरच ‘भारतीय स्त्रीदर्शन’ ही पुस्तिका हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे.
स्त्री विशिष्ट गुण- फेमिनाईन क्वालिटी व पुरुष विशिष्ट गुण - मस्क्युलाईन क्वालिटी या दोन्हीचे महत्त्व मानले गेलेले आहे. अर्धनारीश्वराची कल्पना हे अधोरेखित करते की, दोन्ही प्रकारच्या गुणांची आवश्यकता व्यक्तिविकासात महत्त्वाची आहे.
एकात्मभाव
भारतीय तत्त्वज्ञानाचे काही मूलभूत सिद्धांत आहेत त्यातला पहिला सिद्धांत आहे एकात्म भाव. या सृष्टीमध्ये जे जे काही आहे ते एकमेकांशी जोडलेले परस्परसंबंधित, परस्परावलंबित व परस्परपूरक आहेत. म्हणून व्यक्ती केवळ व्यक्ती नाही तर कुटुंबाचा एक भाग आहे व स्त्रीही त्याच कुटुंबाचा भाग आहे. त्यांना वेगळं करून स्त्री, पुरुष, मूल, वृद्ध असे तुकडे करून पाहाणं योग्य होणार नाही. आपण एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे व्यक्तीचे सुख आणि समष्टीचे सुख किंवा कुटुंबाचे सुख, समाजाचे सुख हे वेगवेगळे नाहीत किंवा एकमेकांच्या विरोधी पण नाही. एकमेकांच्या हितासाठी आपली कर्तव्य पार पाडणे हे व्यक्तीचे स्वाभाविक काम आहे.
मनुष्य म्हणजे केवळ शरीर नाही, शरीर-मन-बुद्धी ही नाही तर त्यात असलेले चैतन्य तत्त्व, आत्मा आहे आणि हा आत्मा कधी पुरुष शरीर धारण करतो तर कधी स्त्री शरीर धारण करतो. म्हणून आत्म्याला लिंग नाही. स्त्री व पुरुष दोघांच्या जीवनाचे प्रयोजन आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती आहे आणि परिवार, समाज, राष्ट्र, सृष्टी यांच्याप्रति आपली कर्तव्ये आनंदाने व श्रद्धापूर्वक पार पाडणे हे आपले काम आहे.
बीजोद्भवी समदले
स्त्री-पुरुष निर्मितीची भारतीय कल्पना फार महत्त्वाची व मूलभूत ठरते. बृहदारण्यक उपनिषदात ही कल्पना बीजोद्भवी समदले अशी मांडण्यात आली आहे. जेव्हा चैतन्य तत्त्वाला विकसित व्हावे असे वाटले तेव्हा त्यातून स्त्री व पुरुष दोघांची निर्मिती झाली. त्यामुळे हे ईशत्व दोघांमध्ये वास करते. स्त्री-पुरुषांची निर्मिती ही एका बीजातून दोन दले अंकुरित व्हावीत तशी झाली आहे. ही दले समान अंकुरतात, विस्तारतात, मोठी होतात. त्यातले कोणते दल पहिले कोणते नंतर हा विभेदक भावच त्यामध्ये नाही व शुद्ध समानता देणारा हा विचार आहे. त्यामुळे अन्य धार्मिक अवधारणांप्रमाणे स्त्री ही पुरुषाच्या नंतर, पुरुषाच्या बरगडीपासून किंवा पुरुषाच्या मनोरंजनासाठी जन्माला आली अशी भेदभावात्मक व दुय्यम दर्जा देणारी मांडणी इथे नाही. स्त्रीमध्ये आत्मा असतो की नाही या चर्चेला वाव नाही.
मातृत्वाबद्दलची कल्पना
भारतीय समाजाने तत्त्वज्ञानाने स्त्रियांच्या सृजनशक्तीचा व मातृत्वाचा सन्मान केला. स्त्रीला लाभलेली मातृत्वाची क्षमता हे वरदान म्हणून पाहिले गेले. सुदृढ समाजाच्या रचनेसाठी विवाह आणि कुटुंब संस्था विकसित झाल्या. या संस्थांमध्ये मातृत्व हे सन्मान्य मानले गेले. ईवने ईडन गार्डनमध्ये वंचित फळ खाल्ले. त्या प्रथम पापाची शिक्षा म्हणून तिला मातृत्वाच्या वेदना सहन कराव्या लागतील असा शाप दिला, असा नकारात्मक दृष्टीकोन भारतामध्ये नाही.
समाजाच्या योग्य विकासासाठी व नियमनासाठी विवाहाची चौकट आग्रहपूर्वक मांडली गेली आणि मुलांच्या विकासात स्त्री-पुरुषांच्या सहभागाची व्यावहारिक रचना उभी केली गेली. आज जगभर स्त्रीस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य हे एकारलेले, एकांगी व रॅडिकल म्हणजे अतिवादी विचारांकडे झुकत असताना जगाची आकडेवारी सांगते की, काही देशांमध्ये 70-80 टक्के मुले विवाह बंधनाशिवाय जन्म घेतात. मुलांना त्यांचा पिता कोण हे माहीत नाही, मुलांच्या पालनपोषणात त्यांचा सहभाग नाही व स्त्री-विशिष्ट आणि पुरुष-विशिष्ट गुणांचा अनुभव ही मुलं घेत नाहीत. हे सामाजिक सुदृढतेचे लक्षण नाही.
दांपत्य कल्पना
भारतीय संस्कृतीमध्ये विवाह आणि कुटुंब रचनेमध्ये महत्त्वाची भूमिका ही दांपत्याची मानली गेलेली आहे, केवळ पुरुष किंवा केवळ स्त्री नाही. स्त्री विशिष्ट गुण- फेमिनाईन क्वालिटी व पुरुष विशिष्ट गुण - मस्क्युलाईन क्वालिटी या दोन्हीचे महत्त्व मानले गेलेले आहे. अर्धनारीश्वराची कल्पना हे अधोरेखित करते की, दोन्ही प्रकारच्या गुणांची आवश्यकता व्यक्तिविकासात महत्त्वाची आहे.
व्यवहारात ही कल्पना रुजवण्यासाठी यज्ञकर्मात सुद्धा पत्नीशिवाय दिलेली आहुती अपूर्ण मानली जात होती आणि यज्ञामध्ये पती-पत्नी दोघांना दांपत्य म्हणून यज्ञाचे भागीदार मानले जात होते. घरातल्या सर्व प्रापंचिक जबाबदार्या किंवा मुलांचे संगोपन यात दोघांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे जी एकल मातृत्वाच्या पार्श्वभूमीवर आजही तितकीच महत्त्वपूर्ण आहे.
आध्यात्मिक अवधारणा व देहभाव
पाश्चिमात्य स्त्रीवादी विचार स्त्रीदेहाला शोषणाचे केंद्र मानतो. भारताच्या संदर्भात आध्यात्मिक स्वतंत्रता इथे महिलांनाही आहे. भारतीय संत महिला देहाला आत्म्याच्या प्रकटीकरणाचे माध्यम मानतात. भारतीय दर्शनात, परंपरेत आणि व्यवहारात स्त्री देहामध्ये असलेल्या ब्रह्मचैतन्य किंवा आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल कधी शंका नव्हती. म्हणून बाराव्या तेराव्या शतकातल्या स्त्री संतांनी देहाला साधनेमधला अडसर किंवा अडथळा मानले नाही, साधनेचा मार्ग मानले. या दृष्टीकोनात स्त्रीचे शरीर हे केवळ भोग्य किंवा एक ऑब्जेक्ट-वस्तुरूप नाही, परंतु साधना करण्याचे माध्यम आहे, या सगळ्या गोष्टी स्त्रीला आत्मगौरव देतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणखी एक विशेष म्हणजे आपल्या आध्यात्मिक परंपरांमध्ये देवसाधना करण्यासाठी स्त्रीला कुटुंब सोडून संन्यासी होणे बंधनकारक नाही, गृहस्थ जीवनात राहून, आपले कर्तव्य पार पाडून किंवा पाडता पाडता ती मोक्ष मिळवण्याची शक्यताही आहे, तिची ती पात्रताही आहे आणि तो तिला अधिकारही आहे.
स्त्री आणि कुटुंब
पश्चिमी नारी विमर्श कुटुंबजीवन आणि कुटुंबातल्या स्त्रीवरच्या जबाबदार्या किंवा स्त्री करत असलेली कामे यांना शोषणाचे केंद्र मानते. भारतीय दर्शन परंपरेत स्त्री केवळ दयेचे किंवा उपभोगाचे किंवा शोषणाचे पात्र नाही, परंतु तिच्याकडे सर्जनाची शक्ती, प्रेमाची मूर्ती आणि आंतरिक ऊर्जा व चैतन्याची अभिव्यक्ती या रूपात पाहिले जाते. स्त्रियांच्या समकालीन काळात बदलेल्या भूमिका व तिला विकासाच्या न्याय्य संधी देण्यासाठी कौटुंबिक भूमिकांमध्ये बदल होणे, सहकार्य, पुरुषांचा सहभाग व संस्थात्मक सहयोग हे अपरिहार्य आहेत. पण म्हणून तिच्या कौटुंबिक भूमिकेला ‘अनपेड केअरवर्क’ संबोधणे व बालसंगोपन व ज्येष्ठांची देखभाल व्यावसायिक करणे किती योग्य आहे, याचा विचार करायला हवा.
लिंगभाव समानता-जेंडर इक्वलिटी
भारतीय परिप्रेक्ष्यात स्त्री आणि पुरुष यांचे संबंध धर्म किंवा कर्तव्य या समान जबाबदारीने बांधलेले असतात. त्यामध्ये कुटुंबाच्या चौकटीत कर्तव्य, न्याय, सन्मान, समावेशिता आणि मानवता अशा विविध मूल्यछटांचा समावेश असतो. कर्तव्य ही दोघांच्या एकमेकांच्या प्रति व कुटुंबाप्रति, समाजाप्रति असलेल्या जबाबदारीतून समोर येतात. त्यातून एक सामूहिक असं सौहार्द्र व संवादी वातावरण तयार व्हावं ही अपेक्षा असते. स्त्री-पुरुष नातं आणि संबंध हे या कर्तव्यांच्या चौकटीमध्ये पाहिले जातात, केवळ अधिकारांच्या व व्यक्तिवादी चौकटीत नाही. हे व्यावहारिक पातळीवर झाले. सैद्धांतिक किंवा तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती लिंगभाव समानता किंवा स्त्री-पुरुषांच्या मधली समानता ही दोघांमध्ये एकच आत्मा असतो, त्याच्यामध्ये कोणताही लिंगभाव भेद नसतो या आधारावरती तयार झालेली आहे. त्यामुळे वैदिक काळात स्त्रियांना समान अधिकार, धार्मिक अधिकार, शिक्षण-मालमत्ता-विवाह यासंबंधीचे अधिकार आणि त्यांच्या निवडीचा अधिकार होता अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो.
भारतीय स्त्रियांना केवळ आध्यात्मिक किंवा बौद्धिक परिप्रेक्ष्यामध्ये पाहिलेलं नाही तर त्या क्षमतावान व विचारवंत होत्या आणि समाज, कुटुंब आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये योगदान देणार्या होत्या. व्यावहारिक, सैद्धांतिक ते आध्यात्मिक सर्व मुद्द्यांवर स्त्री आणि पुरुष हे समान गणले जात होते. त्यांच्या कुटुंबातल्या आणि समाजातल्या भूमिका या वेगळ्या होत्या. त्यांच्या भूमिकांमधला, त्यांच्या शरीररचनेमधला फरक हा त्यांच्या स्तरामध्ये किंवा त्यांच्या सन्मानामध्ये फरक करणारा नसावा, ही अपेक्षा कायमच भारतीय संस्कृतीने केली आणि तसा व्यवहार, तशी वागणूक स्त्रियांना दिलेली आपल्याला दिसते. याचा दोघांच्याही व्यक्तिमत्त्वविकासासाठी आणि समाजाच्या सामूहिक विकासासाठी उपयोग झालेला आहे. स्त्रीत्व आणि पुरुषत्व या दोन्ही तत्त्वांच्या एकत्र येण्यातून एक स्थायी समतोल कुटुंबात आणि समाजात निर्माण झाला, ही फेमिनेजमची भारतीय अवधारणा आहे. आजच्या आधुनिक संदर्भात सुद्धा जेंडर इक्वलिटी किंवा स्त्री-पुरुष समानता म्हणजे या प्राचीन पारंपरिक अवधारणेचा, तत्त्वांचा स्त्रीला व्यावहारिक अधिकार, न्याय, दर्जा, सन्मान देणे हा याचा आताचा अर्थ आपण म्हणू शकतो.
पूरक समानता
समाजात स्त्री-पुरुष किंवा सर्वच जेंडरच्या व्यक्तींची विशिष्ट भूमिका, सहभाग आहे, त्यांचा योग्य तो सन्मान करून सर्वांची प्रतिष्ठा राखणे हे आजच्या काळातलं आव्हान आहे. भारतीय संदर्भात समानतेची कल्पना ही पूरक समानतेची किंवा कॉम्प्लिमेंटरी इक्वलिटीची आहे. त्याच्यामध्ये तुलना, इर्षा, स्पर्धा अशा नकारात्मक भावनांना जागा नाही. कारण मुळात प्रत्येक व्यक्तीमध्ये स्त्री विशिष्ट आणि पुरुष विशिष्ट असे गुण असतात याची मान्यता आपल्या समाजात सर्वकाळ राहिली आहे आणि ते दोन्हीही गुण निकोप वाढीसाठी आवश्यक आहेत, त्यातूनच समाजाचं योगक्षेम, कुटुंबाची स्थिरता, पुढच्या पिढ्यांचे निर्माण आणि व्यक्ती म्हणून परिपूर्ण विकास होतो, हा आपला विश्वास आहे. कोणीही व्यक्ती स्वतंत्रपणे संपूर्ण असू शकत नाही, परंतु परस्परावलंबित्व आणि परस्परसंबंध यातून परस्परपूरक आणि परस्परपोषक असे संबंध तयार होतात हा ही आपला विश्वास आहे. हे संबंध एकमेकांना आधारभूत आहेत. स्त्री-पुरुषांचे एकत्र येणं हे केवळ शारीरिक नाही तर सामाजिक, आध्यात्मिक आणि एकमेकांना पूरक अशा ऊर्जा तत्त्वांचे एकत्र येणं असं आपला समाज मानतो, म्हणून समानतेची आपली कल्पना जगात आज मान्य झालेल्या समानतेच्या कल्पनेपेक्षा वेगळी ठरते, अधिक सघन ठरते आणि आवश्यकही ठरते.
भारताची परस्परावलंबित्वाची कल्पना ही नकारात्मक नाही. एक व्यक्ती दुसर्यावर अवलंबून असणं म्हणजे एक ताकदवान आणि दुसरी दुर्बल अशी ती मांडणी नाही. दोन्हीही व्यक्ती किंवा घटक एकमेकांवर अवलंबून असतात अशी ती मान्यता आहे. भारतीय संदर्भातली विकासाची संकल्पना ही एकरेषीय नाही, अखंड मंडलाकार विकास ही आपली संकल्पना आहे.
भारतात स्त्रीकडे शक्तिरूपा म्हणून पाहिले जाते, स्त्रीला समर्थ करणारे कोमल रूप आणि प्रखर रूप दोन्हीही पाहिले जाते. अशा स्त्रीला कमजोर मानणे आणि बाहेरून सशक्त करण्याचे प्रयत्न करणे हे विरोधाभासी दिसते. भारतीय संदर्भात स्त्रीचिंतनाचा दृष्टीकोन संपूर्ण, परिपूर्ण आहे. जो दृष्टीकोन केवळ एका लिंगाच्या व्यक्तींच्या हितापुरता, स्त्रीगटापुरता मर्यादित नाही तर जीवनाचे भरणपोषण, कौटुंबिक नातेसंबंध, सृष्टीचे संरक्षण यामध्ये सामंजस्य आणि कर्तव्य पालन याना केंद्रस्थानी ठेवणारा हा विचार आहे.
nayanas63@gmail.com
लेखिका भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या
राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
References:
1. Shakti: Women, Gender and Society in India, 2025, Aryan Books International, New Delhi. ISBN: 978-81-7305-714-4
2. Bharatiya Stree Darshan, 2025, Publisher: Bharatiya Stree Shakti, Mumbai. ISBN :978-81-957555-7-8
3. Bharaitya Drishti Me Nari Chintan,2025, Gyan Ganga Prakashan, Jaipur. ISBN : 978-93-48894-07-6
4. Woman: Yesterday, Today, Tomorrow, Nivedita Bhide, 2024, Suruchi Prakashan, New Delhi. ISBN: 978-93-91154-87-5