महात्मा फुले आणि स्त्रीसुधारणा चळवळ

विवेक मराठी    27-Feb-2026
Total Views |
@प्रा. डॉ. गणेश राऊत
8459772018
स्त्रियांच्या शिक्षणाची आबाळच चाललेली पाहून स्त्रियांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संघर्ष आणि सकारात्मक कृती महात्मा जोतिराव फुले यांनी केली. 1848ला बुधवार पेठेतील भिडे वाड्यात महात्मा फुले यांनी भारतीय मुलींसाठी, भारतीयांनी चालविलेली, पहिली भारतीय शाळा सुरू केली. जोतिराव आणि सावित्रीबाई यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात स्त्रियांसाठी नवी सृष्टी निर्माण केली. त्याचसोबत स्त्रीसुधारणेबाबत अनेक धाडसी निर्णय घेतले.

fule
 
एकोणिसाव्या शतकातील शैक्षणिक विचार ’ज्ञान ही एक शक्ती आहे’, ’शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे,’ याचा पगडा असणारा होता. म. फुले यांनी सत्यशोधक चळवळीत लेखन व शिक्षणप्रसाराला महत्त्वाचे स्थान दिले. तत्कालीन समाजातील शिक्षणाची संधी स्त्रियांना नाकारण्यात आलेली होती. अशांना शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. जोतीरावांनी विद्येचा आग्रह धरण्यात काहीच आश्चर्य नव्हते कारण इंग्रजांचे राज्य कायद्यावर आधारित व लेखी करारांस जास्त महत्त्व देणारे असल्यामुळे अज्ञानी-निरक्षर लोकांची सुशिक्षित लोकांकडून, पुढारलेल्यांकडून फसवणूक होऊन द्यायची नसेल तर शिक्षणास पर्याय नव्हता. त्यामुळे फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. मानसिक व आर्थिक गुलामगिरीतून मनुष्याची मुक्तता करण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही. याच कारणासाठी महात्मा फुले यांनी शिक्षण वरिष्ठ वर्गातून आपोआप खालच्या वर्गापर्यंत पाझरत जाईल या ’पाझरण किंवा झिरपणी’ सिद्धांताला विरोध केला.
 
 
स्त्री वर्गाला शिक्षणाची परंपरा नाही, त्यांना असे वाटे की, शिकणे हे आपले काम नव्हे. गरिबीमुळे मुले कुमारवयातच कामाला जातात. बालविवाहांमुळे मुलींचे शिक्षण संपते. खेड्यांत शाळा कमीच, असल्याच तर त्या एकशिक्षकी, शिक्षकाचा मूळ रस शिक्षणापेक्षा अन्य कामात, यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाची आबाळच चालली होती. सुशिक्षित पुरुषांस तात्काळ नोकर्‍या मिळत असल्यामुळे जो तो शिक्षणामागे. ’सामाजिक बांधीलकी’ हा शब्द लोकजीवनाच्या कृतीत यायचा होता. त्यामुळे सरकारने वरील अडचणी लक्षात घेऊन सामान्यांच्या आणि विशेषत: स्त्रियांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असा आग्रह महात्मा फुलेंनी धरला.
शिकून सर्व स्त्री-पुरुषांना नोकर्‍या मिळणार नाहीत याची पूर्ण जाणीव फुले यांना असल्यामुळे त्यांनी व्यवहारज्ञान व व्यावसायिक कौशल्य यांचा पाठपुरावा केला. ज्ञानाला सत्वसंपन्नेतेची जोड असण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादिली. आत्यंतिक सुशिक्षित असणारे लोक व्यसनाधीन झालेले बघून फुले यांनी शिक्षणातून विद्यार्थी सुशील व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतात- शूद्र मुलीमुला शाळेत घालावें। सुशील करावे सर्व कामी॥ सर्वच जातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिंनींना शिक्षणाची संधी दिल्यास देशात गोंधळ माजेल, अशी भीती व आक्षेप घेण्यात आला होता, तेव्हा फुले यांनी लष्करात सर्वांना प्रवेश दिल्याने गोंधळ होत नाही तर शिक्षण त्याला अपवाद कशाला? असा प्रश्न करतात.
 

women 
 
बिनतोड, तर्कशुद्ध विचारसरणीद्वारे त्यांनी आपला मुद्दा मांडला आहे. समाजातील सर्व जातींमधून जोपर्यंत शिक्षक निर्माण होणार नाहीत तोपर्यंत त्या जातीचा उत्कर्ष होणार नाही, अशी त्या काळातील वास्तवाला धरून त्यांची भूमिका आहे. समाजात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. यामुळेच हंटर आयोगापुढे साक्ष देताना त्यांनी 12 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींस प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याची सूचना केली. चांगले शिक्षक खेड्यात जायला तयार होण्यासाठी त्यांस अधिक वेतन व स्थानिक पातळीवरील कामे देण्याची गरज आहे, असे सांगून शिक्षकांचा पगार विद्यार्थ्यांशी निकालाशी जोडण्यास त्यांनी विरोध केला.
 
 
1819 साली भारतात कलकत्ता येथे हिंदू मुलींकरीता अमेरिकन मिशनने शाळा सुरू केली. या शाळेत शिक्षक ज्या प्रमाणात मुली आणेल त्या प्रमाणात त्याला वेतन मिळत असे. याच मिशनने 1840 मध्येे पुण्यात मुलींची शाळा काढली. स्कॉटिश ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या शाळेत 10 मुली शिकत असत. पुढे या शाळा बंद पडल्या. या शाळेत फक्त ख्रिश्चन मुली होत्या.
 
1848 च्या ऑगस्ट महिन्यात बुधवार पेठेतील भिडे वाड्यात महात्मा फुले यांची पहिली भारतीयांनी चालविलेली, भारतीय मुलींसाठीची, पहिली भारतीय शाळा सुरू झाली. या अनुभवानंतर फुले यांनी अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात 3 जुलै 1851 रोजी मुलींची दुसरी शाळा काढली. तीन मुलींनी सुरू झालेल्या शाळेंची संख्या पुढे 48 झाली. 17 सप्टेंबर 1851 रोजी फुले यांनी रास्ता पेठेतील मुलींची तिसरी शाळा, 15 मार्च 1852 ला वेताळ पेठेत मुलींची चौथी शाळा काढली. याच कार्याबद्दल महात्मा फुले यांचा सरकारतर्फे सत्कार करण्यात आला. जोतीराव आणि सावित्रीबाई यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात ‘केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली’. सावित्रीबाईंच्या मते ‘शूद्रांना सांगण्याजोगे आहे, एकच मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व घटते’.
 
 
सत्यशोधक चळवळ
 
सत्यशोधक चळवळ ही सत्यशोधक समाजाचे अपत्य होय. महात्मा फुले यांनी स्वतःचे आयुष्यच या कामासाठी अर्पण केलेले होते. शतकानुशतके ज्यांना विकासाची वा प्रगतीची संधी नाकारण्यात आलेली होती अशा स्त्री-पुरुषांना संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य फुले यांनी केले यातच त्यांचे द्रष्टेपण दडले आहे. शूद्रातिशूद्रांसाठी शाळा सुरू करणे, शिक्षणाची संधी देणे, ग्रंथालये सुरू करणे, अर्भकालय सुरू करणे, स्त्रियांना आधार देणे, स्त्री शिक्षणास चालना देऊन शिक्षिका तयार करणे या विधायक व सर्वांना उपयोगी पडणार्‍या कार्याद्वारे महात्मा फुले यांनी चळवळीचा पाया रचला. या चळवळीची फलश्रुती म्हणजे जोतीरावांचे ’महात्मा’ होणे आणि समाजातील मोठ्या वर्गाला विकासाची संधी प्राप्त होणे यात झाली.
 
 
फुले यांच्या कार्याबद्दल राजर्षी शाहू यांना अतीव आदर होता. त्यामुळे महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी यांच्यानंतर या चळवळीला आश्रय देण्याचे कार्य महाराजांनी केले. राजर्षी शाहू पूर्व कालखंडात ही चळवळ कृतिशील चळवळ होती. महाराजांचे विश्वासू भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात सत्यशोधक चळवळीला चालना देण्यात आली. अण्णासाहेब लठठे आणि समविचारी मित्र या कार्यात आघाडीवर होते. आपला विचार सर्वदूर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहाचविण्यासाठी तत्कालीन कालखंडात लोककलांना पर्याय नव्हता. लोककलांच्या माध्यमातून पूर्वी संपर्क साधला जाई. त्यामुळे महात्मा फुले यांच्या कार्यकर्त्यांनी मेळे वा जलसे भरवायला सुरुवात केली. सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत कार्याची महती सांगायला सुरुवात झाली.
 
 
ज्ञानोदय वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत महात्मा फुले यांनी आपण मुलींची शाळा का सुरू केली? हे स्पष्ट केले. त्यात ते म्हणतात - ’प्रथम मनात आले की, आईच्या योगाने मुलांची जी सुधारणूक होते ती फारच चांगली आहे, म्हणूनच मुलींचीच शाळा प्रथम घालावी।’ यावरून महात्मा फुले यांची मनोभूमिका आपणास समजू शकते. पहिले स्त्रीवादी पुस्तक ताराबाई शिंदे यांनी ’स्त्री पुरुष तुलना’ लिहिले. 1882 च्या या ग्रंथाने सर्वत्र खळबळ उडवून दिली तेव्हा ’सत्सार’ नियतकालिकातून जोतीरावांनी ताराबाईंना पाठिंबा दिला. महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन तान्हुबाई बिर्जे या भारतातील पहिल्या महिला संपादक झाल्या. तर सावित्रीबाई रोडे ’रामोशी समाचार’मधून दुःखांना वाचू फोडू लागल्या.
 
 
महात्मा फुले यांच्या शाळेतील विद्यार्थिनींची परीक्षा झाली तेव्हा प्रचंड जनसमुदाय तेथे जमा झाला असता प्रथम आलेल्या मुलीने इंग्रजीत भाषण करून ’आम्हाला खाऊ, खेळणी, कपड्यांचे बक्षीस नको, मला शालेय ग्रंथालय पाहिजे’ अशी मागणी केली. जोतीराव व सावित्रीबाईंनी या मागणीस्तव भारतातील पहिले शालेय ग्रंथालय सुरू केले. मुलींसाठी 1854 मध्ये पहिली रात्रशाळा सुरू करण्यात आली.
 
 
स्त्री-पुरुष समतेचा संदेश
 
वयाच्या 28 व्या वर्षी जोतीरावांनी ’तृतीय रत्न’ हे आधुनिक पद्धतीचे मराठी नाटक लिहिले. ’शिकायला चला’ हेच सारतत्त्व असणार्‍या या नाटकाचे नायक-नायिका म्हणजे शेतकरी पतीपत्नी शेवटी जोडीने रात्रशाळेला जातात असे अर्थपूर्ण दृश्य त्यात आहे.
 
 
महात्मा फुले यांच्या प्रेरणेने आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुढाकाराने केशवपन विरोधात नाभिकांनी संप केला. त्याची दखल लंडनमधील वृत्तपत्रांनी घेतली. 25 मार्च 1893 रोजी मुंबईतील जेकब मिलमधील व्यवस्थापक पुरुषांना धडा शिकविण्यासाठी 400 स्त्रिया एकत्र आल्या. लक्ष्मीबाई नायडू यांच्या अध्यक्षतेखाली 1925 साली विदर्भात सत्यशोधक महिला परिषदेच्या सभेला 5000 महिला उपस्थित होत्या.
 
 
महात्मा फुले विवाहाला करार (कबुलायत) मानत असत. अनिष्ट रूढी, अपमानास्पद विधी, हुंडा यांना नकार देऊन स्त्री-पुरुष समानतेवर आधारित सत्यशोधक विवाहपद्धती महात्मा फुले यांनी सुरू केली. आप्तमित्रांच्या साक्षीने हे विवाह होऊ लागले. या पद्धतीचा पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 रोजी सीताराम जबाजी आल्हाट व मंजूबाई ग्यानोबा निंबाणकर यांचा झाला.
 
 
ताराबाई शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःचे स्वतंत्र विचार ’स्त्री-पुरूष तुलना’ या पुस्तकात मांडले. ताराबाईंचे वडील बापूजी हरि शिंदे, महात्मा फुले यांचे अनुयायी होत. ताराबाईंना मराठी, इंग्रजी, संस्कृत येई. पुरुषवर्चस्व संपविल्यास समाजाची निकोप वाढ होईल असेही मत त्यांनी मांडले. एकतर्फी पतिव्रताची कल्पना, बालविधवांवरील सक्ती, अंधश्रध्दा यांचा त्यांनी लेखनाद्वाारे निषेध केला.
 
सत्यशोधक समाज
 
शिक्षणपद्धती आणि लेखन या दोन्ही क्षेत्रात महत्त्वाचे काम चालू असतानाच जोतीराव फुले यांना असे वाटत होते की, उच्चवर्णियांच्या मानसिक गुलामगिरीतून सर्वसामान्य माणसाला मुक्त करण्याची आवश्यकता आहे. परमेश्वर आणि मानव यांच्यात मध्यस्थ नको. शिक्षण कोणाचीही राखीव मिरासदारी नाही. अशा तत्कालीन कालखंडात जहाल विचारांनी त्यांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणायला सुरुवात केलेली होती. ते कर्ते सुधारक असल्याने त्यांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर जाणवू लागला होता. त्यांचा परिचय थोडक्यात पाहू या.
 
 
संघर्ष केल्याशिवाय कनिष्ठ वर्गातील कोणालाच कोणतेच हक्क मिळणार नाही यांची त्यांना पूर्ण जाणीव होती. उच्च वर्गाकडून सवलती, अधिकार, हक्क, सत्ता हवी असेल तर रचनात्मक संघर्ष करण्यास पर्याय नाही या भूमिकेवरून त्यांनी संस्थात्मक प्रयत्न करविण्याचे ठरविले. फुले यांनी आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी बैठक बोलावली. संपूर्ण महाराष्ट्रातून 60 प्रतिनिधी या सभेला आले. या सर्वांसमोर फुले यांनी स्वतःचा विचार मांडला. विचार-विमर्श होऊन त्याच दिवशी ’सत्यशोधक समाज’ या संस्थेची अत्यंत तळमळीने भाषण करून संस्थेच्या स्थापण्याची पार्श्वभूमी कार्यकर्त्यांसमोर स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलेली ही पहिलीच चळवळ होय. सर्वानुमते जोतीराव फुले यांची अध्यक्ष व कोषाध्यक्ष तर नारायणराव गोविंदराव कडलक यांची कार्यवाह म्हणून निवड झाली.
 
 
समाजाची कार्यपद्धती व ध्येयधोरण
 
सत्यशोधक समाजाचे ध्येय धोरण म्हणजे लोकांना गुलामगिरीतून मुक्त करणे.
प्रतिज्ञा - प्रत्येक सभासदाला पुढील प्रतिज्ञा घेणे आवश्यक असे : ’सर्व मानव प्राणी एकाच देवाची लेकरे आहेत, सबब ती माझी भावंडे आहेत, अशा बुद्धीने मी त्यांच्याशी वागेन. परमेश्वराची पूजा, भक्ती अगर ध्यानधारणा करतेवेळी अगर धार्मिक विधीचे वेळी मी मध्यस्थाची गरज ठेवणार नाही; दुसर्‍यांनाही तसेच वागण्याबद्दल मी उपदेश करीन. मी माझ्या मुलामुलींना सुशिक्षित करीन. मी नेहमीच राजनिष्ठेने वागेन, परमेश्वरास व सत्यरूपी परमेश्वरास साथ ठेवून मी ही प्रतिज्ञा करीत आहे. ह्या प्रतिज्ञेप्रमाणे वागण्यास मला सामर्थ्य येईल अशा प्रकारे आयुष्यक्रम गुदरण्यास योग्य प्रकारे मदत तो मला करो’.
 
 
समाजाचे सभासदत्व सर्व जातीतील लोकांना खुले होते. सुरुवातीला दर आठवड्याला समाजाच्या बैठका होत असत. या बैठकांत जातीभेद, मूर्तीपूजा यांना विरोध तर परमेश्वराचे जनकत्व व मनुष्याचे बंधुत्व यांवर भर देत. दारुबंदी, सक्तीचे शिक्षण, स्वदेशी वस्तू वापरण्यास उत्तेजन, पुरोहितशाहीला विरोध, अल्पखर्ची लग्ने, ज्योतिष-भूत-समंध यांच्यापासून लोकांस भीतीमुक्त करणे यांवर चर्चा व विचार विनिमय चाले. एकेश्वरवादाचा प्रसार सांघिक सभांमधून चाले.
 
 
या कालखंडाचे एक निरीक्षण कीरांनी पुढील शब्दात वर्णिले आहे, ’राममोहन रॉय यांनी ब्रह्मतत्त्व घेतले; प्रार्थना समाजाने प्रार्थना व जोतीरावांनी सत्य घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली.’ यानंतर दोन वर्षांनी दयानंद सरस्वती यांनी आर्यतत्त्वाचा पुरस्कार करून आपल्या कार्यास प्रारंभ केला. सुरुवातीच्या तिघांनी सुद्धा मूर्तीपूजा त्याज्य ठरविली. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे दुष्परिणाम किंवा चटके त्यांना लवकर बसले. त्यांच्या मित्राच्या लग्नात तथाकथित उच्चवर्णियांनी त्यांचा अपमान केला. हे असे का? हा प्रश्न त्यांना पडला आणि वैयक्तिक अपमानावर सामाजिक उत्तर त्यांनी शोधण्याचे ठरविले. सार्‍या समस्यांचे मूळ अज्ञानात आहे हे लक्षात येऊन ज्यांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आलेला होता त्यांच्यासाठी शाळा, विशेषतः शूद्रातिशूद्रांसाठी शाळा त्यांनी सुरू केली. या कामासाठी घरातूनच विरोध झाला. पण समाजाच्या भल्यासाठी राहते घर सोडले पण काम सोडले नाही. मुलींच्या शाळांची संख्या वाढवायला सुरुवात केली. भारतातील पहिली स्त्रीशिक्षिका सावित्रीबाई फुले यांना तयार केले व दोघांनी कार्य पुढे नेले.
 
 
स्वतःच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ’तृतीय रत्न’ नाटकाचे लेखन त्यांनी केले. नवरा-बायको एकत्र जेवायला बसतात व दोघे मिळून रात्रशाळेला जायचा निर्णय घेतात हे त्या काळात बंडखोर वाटणारे विचार नाटकातून मांडले. रात्रशाळेची स्थापना करून कष्टकरी वर्गाच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. याच दरम्यान त्याच्यावर मारेकरी घालण्यात आले पण तेच त्यांचे संरक्षक बनले. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करून मुलामुलींचे जीव वाचविले व विधवा पुनर्विवाहास मदत केली. कर्ते सुधारक असल्यामुळे अस्पृश्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी घरचा हौद खुला केला. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा ’पोवाडा’, ’ब्राह्मणांचे कसब’, ’गुलामगिरी’ ही अक्षर कामगिरी त्यांनी मराठी साहित्यात बजावली. सत्यशोधक समाजाची स्थापना करून येथील सामाजिक क्रांतीचे चक्र जोरदार फिरविले.
 
 
पुण्यात दयानंद सरस्वतींची मिरवणूक यशस्वीपणे पार पाडली. पुणे नगरपालिकेचे सदस्यत्व स्वीकारल्यावर पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. दारुची दुकाने उघडण्यास परवानगी देऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले. धाडसी टिळक-आगरकरांचा सत्कार केला. ’शेतकर्‍याचा आसूड’, ’सत्सार क्र.1, क्र.2’, ’इशारा’, ’सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी’ या साहित्याची निर्मिती त्यांनी केली. या कार्याबद्दल त्यांना भारतात तोपर्यंत कोणालाच उत्स्फूर्तपणे न मिळालेली ’महात्मा’ पदवी ही देण्यात आली. ’सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकाचे लेखन केले मात्र ते मृत्यूनंतर प्रकाशित झाले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले इहलोक सोडून गेले.