शतक - इतिहासाची शंभर पावले!

विवेक मराठी    27-Feb-2026
Total Views |
@डॉ. नितीन ह. देशपांडे
9850826990
 
rss 
संघशताब्दीचे औचित्य साधून निर्माण केलेला ‘शतक : संघ के 100 वर्ष’ हा चित्रपट देशातील फारशा न चर्चिलेल्या विषयांनाही स्पर्श करतो. या स्मृती जिवंत आहेत आणि एका प्रक्रियेद्वारे हळुवार समोर येतात. त्या कालखंडाची अचूकता तर टिपली गेलेलीच आहे. चित्रपटाचा गाभा अतिशय प्रभावी आणि परिणामकारक पद्धतीने मांडलेला आहे. करमणूक हा मूलाधार नसलेली ही कलाकृती या अफाट तसेच अनेकपदरी विषयाला तटस्थपणे हात घालते आणि तिचा सोलीव विषय तितक्याच साक्षीभावाने मांडते. कोठेही टीकाटिप्पणी नाही, कोठेही आकांत नाही, कोठेही तक्रार नाही - फक्त आणि फक्त कथन, ज्याचे मूल्यमापन चित्रपटगृहातील प्रेक्षकांवर सोपविलेले आहे.
देशाच्या सीमारेखा नकाशावर गोंदवलेल्या असतात, पण तिथे राष्ट्र सापडत नाही. राष्ट्र शोधण्यासाठी तेथील मानव्य आणि त्याची मानसिक जडणघडण शोधणे अपरिहार्य असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - नावातच उद्दिष्ट असलेला हा संघ या शोधकार्यात मदतीचा हात पुढे करतो. ‘शतक‘ चित्रपटाच्या अखेरी अर्धविराम जाहीर करणारा हा प्रवास अजून किमान शंभर वर्षे तरी चालणार आहे, पूर्णविरामापर्यंत पोहोचण्यासाठी अशी तत्पर आणि आश्वासक ग्वाही देतो. राष्ट्रबांधणीचे रसायन असले की, शब्दांची जबाबदारी वाढते आणि करमणूक अभिप्रेत नसलेला हा चित्रपट माहिती ते ज्ञान अशी मांडणी करतो मग बघण्याचे भिंग बदलावे लागते.
 
 
आजवर भूतकाळाचे ज्ञात-अज्ञात (विशेषतः अज्ञाताचे) पापुद्रे उलगडून दाखविणारे फाईल्स चित्रपट आपण उत्सुकतेने पाहात आलेलो आहोत. त्यांत दडवून ठेवलेले अनेक कप्पे डाव्या-उजव्या मार्गांनी आपल्या नजरेस पडले. बव्हंशी त्यांनी काळ्या बाजूंचे दर्शन घडविले. शतक हा मात्र सकारात्मक विचारधारेचा, तडजोड न करण्याच्या प्रवृत्तीचा आरसा आहे. असं निवेदन अभावानेच आढळते. विवादाने अधूनमधून घेरलेल्या पण राष्ट्रतेजाची पताका हाती घेतलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वादातीत वाटचालीचा अतिशय प्रभावी चित्राविष्कार म्हणून शतक या कलाकृतीची नोंद घ्यावी लागेल.
 
rss 
 
एखादी बिगरराजकीय संघटना निर्माण होण्यास पोषक वातावरण स्वातंत्र्यपूर्वकाळाने पुरविले. बलशाली हिंदुराष्ट्राच्या निर्मितीच्या स्वप्नाने झपाटलेल्या डॉ. हेडगेवार यांना नक्कीच कल्पना असेल की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षे ओलांडून देशाच्या भावी जडणघडणीला जबाबदार अशी संघटना बनेल. शतक ही चित्रकृती संघाची वाटचाल नेत्रसुखदपणे मांडतेच पण सोबतीला कधीही विचारधारेशी विसंगत न वागणारी माणसे कशी असतात, यांचे आदर्श समर्पकपणे मांडते. वाटचालीत प्रलोभने आलीत तरी, माझे स्वयंसेवक एखाद्या मोहिमेत, चळवळीत व्यक्तिगत पातळीवर नक्कीच भाग घेऊ शकतात पण माझे संघटन निवडलेल्या सुस्पष्ट दिशेशी फारकत घेऊ शकत नाही, इतके ठाम विचार या संघटनेचे सरसंघचालक मांडतात तेव्हा भारावून जायला झाले.
 
 
सेवाकार्य ही संघाची प्रमुख ओळख बनून राहिली आहे आणि त्याचे प्रसंगोपात संदर्भ या चित्रकृतीत आलेले आहेत. वैचारिक प्रतिकूलता मान्य करूनही ही संघटना वर्धिष्णू वाटेने इथवर कशी पोहोचली, बंदी-आणीबाणी आणि वेळोवेळीचे संघर्ष, गैरसमज हे संघाचे भागधेय राहिले आहे, पण त्यांच्या देशाप्रतीच्या प्रेमभावाला कोणीही अमान्य करू शकत नाही.
 
 
चित्रपटाचा गाभा अतिशय प्रभावी आणि परिणामकारक पद्धतीने मांडलेला आहे. करमणूक हा मूलाधार नसलेली ही कलाकृती या अफाट तसेच अनेकपदरी विषयाला तटस्थपणे हात घालते आणि तिचा सोलीव विषय तितक्याच साक्षीभावाने मांडते. कोठेही टीकाटिप्पणी नाही, कोठेही आकांत नाही, कोठेही तक्रार नाही - फक्त आणि फक्त कथन, ज्याचे मूल्यमापन चित्रपटगृहातील प्रेक्षकांवर सोपविलेले आहे.
 
rss 
स्वातंत्र्यसंग्रामातील सगळे बिनीचे राजकीय चेहेरे इथे दिसतात, क्वचित अटलजी आणि अडवाणीजीही दिसतात (कदाचित पुढील भागात त्यांचे संदर्भ अधिक गहिरे मांडले जातील). लक्ष्मीबाई केळकरांच्या रूपाने राष्ट्र सेविका समितीचा (संघाच्या धर्तीवरील महिला संघटनेचा) उल्लेख आजच्या महिला सक्षमीकरणाची सुरुवात अधोरेखित करतो. संघाबद्दल अनेक प्रवाद अधूनमधून पृष्ठभागावर येत असतात, पण त्याचा कोणीही प्रतिवाद करताना दिसत नाहीत- प्रत्यक्षात अथवा चित्रपटातही.
 
संघाची पार्श्वभूमी, मूल्ये आणि भारतीयांवर असलेला शिस्त, समर्पण आणि सेवावृत्ती यांचा संयत प्रभाव उलगडून दाखविणारी ही चित्रकृती, नव्या पिढीला हिंदुंच्या जीवनतत्त्वांचा परिचय करून देईल. चित्रपटाची तांत्रिक अंगे दोषरहित आहेत. मांडणी गंभीर आणि मुद्द्याला धरून आहे. चित्रपटाचा कालावधी कमी वाटला. तसेच सुरुवातीला माहितीपटासारखी असलेली मांडणी थोडा रसभंग करणारी वाटली. अर्थात आसपास संघाची शाखा बघत रस्त्याने जाणार्‍या नवतरुणांना त्यामध्ये सहभागी व्हावेसे वाटावे, एवढीतरी माहिती हा चित्रपट देतो.
 
 
आपले ध्रुवीकरण आणि डावी-उजवी विचारसरणी बाजूला ठेवून प्रत्येकाने शतक बघावा. एका चळवळीचे विश्व उलगडून दाखविणारा आणि सुरुवातीला समाजजागृती आणि सध्या समाजप्रबोधन करणारी चळवळ या चित्रकृतीच्या माध्यमातून समोर येते. कोठलेही नाट्य वा अभिनिवेश न आणता सूक्ष्म बारकावे टिपणारे, मांडणारे प्रयत्न खचित कौतुकास्पद आहेत. संघाची वाटचाल या मातीतील वाटते, प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होते आणि चित्रपटातील संदेश पोहोचविण्याच्या कसोटीवर उतरते. व्यक्तिगत त्यागातून देशहित साधण्याची परंपरा या देशातील असंख्य क्रांतिकारांनी जपलेली आहे. डॉ. हेडगेवार आणि त्यांचे उत्तराधिकारी या परंपरेचे पाईक आहेत. दीर्घकालीन बदलांसाठी प्रयत्नांमधील सातत्य कारणीभूत असते, हेच हा चित्रपट सिद्ध करतो. संवादांना तत्वज्ञानाची किनार आहे आणि नैतिकता, चारित्र्य हेच राष्ट्रबांधणीसाठी आवश्यक घटक असतात हे पटते.
 
 
फक्त एवढेच वाटते. या संघटनेच्या कार्याची पायाभरणी एवढ्याच घटकाशी हा चित्रपट प्रामाणिक आहे, त्यापलीकडे जाऊन समाजावर संघाचा पडलेला प्रभाव अधिक सर्वंकषरीत्या मांडायला हवा होता. विशेषतः फाळणीचा अथवा आणीबाणीचा कालखंड अधिक सम्यकपणे समोर यायला हवा होता. डॉ. हेडगेवारांचे सूत्र जितके सविस्तर आलेले आहे, तितकेच गोळवलकर गुरुजींचेही कार्य ठळकपणे मांडायला हवे होते. विषयच इतका विस्तृत आहे की, पुढील भाग अपरिहार्य आहे आणि तो बाळासाहेब देवरसांच्या कालखंडानंतरच्या पटाला न्याय देणारा अभिप्रेत आहे. विशेषतः 2014 नंतरचे भारताचे बदललेलं आणि जगानं स्वीकारलेलं रूप त्यांत असावं. आणि हो, 2047 पर्यंतच्या विकसित भारताचे प्रतिबिंब (किमान नीलप्रत) त्यांत बघायला आवडेल.
परंपरांचा सार्थ अभिमान, मातृभूमीचे ऋण फेडण्याची असोशी, आणि भारतीयत्वाची प्रबळ भावना हाच चित्रपटाचा मतितार्थ आहे. संघस्वयंसेवकाला संस्कृती, शिस्त, मृदुता, सचोटी, निष्ठा आणि सेवेचे बाळकडू त्याच्या प्रमुखांकडून वारसा हक्काने मिळते. त्या आदर्शांची जडणघडण या चित्रपटाने साभिमान सादर केली. समाजातील बदलांसाठी सांस्कृतिक वारसा जपण्याची शिकवण संघाकडून मिळते. या कथनातील सच्चेपण भावून जाते कारण सर्व वयोगटांना कोणताही आव न आणता सांगायचे ते सांगून जातो हा चित्रपट.
 
 
पटकथेची बांधणी अत्यंत काळजीपूर्वक, कोठेही बोट दाखविण्यास जागा नसल्याने अशी सखोल निर्मिती बघायलाही भाग्य लागते. मला आवडलेला भाग म्हणजे उत्तराधिकारी निवडण्याचा, घोषित करण्याचा प्रसंग. किती सहजपणे नेतृत्वबदल झालेला बघून वेगळे वाटले. धन, सत्ता, घराणेशाही यांचा विचारही ज्यांच्या मनाला शिवला नाही अशी ही व्यक्तिमत्वे निर्विवाद नतमस्तक होण्यासारखी आहेत.
 
 
हा चित्रानुभव देशातील फारशा न चर्चिलेल्या विषयांनाही स्पर्श करतो. या स्मृती जिवंत आहेत आणि एका प्रक्रियेद्वारे हळुवार समोर येतात. त्या कालखंडाची अचूकता तर टिपली गेलेलीच आहे पण व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा मागे टाकून ध्येयाला सामोरे जाणारी पिढी इथे निर्माण होताना दिसते. हा चित्रपट एका प्रवासाला अभिवादन करतो आणि तरुण तसेच अपरिचित प्रेक्षकवर्गाला आवाहन करतो. भारतवर्षाबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे संघटन कसे उत्क्रांत होत गेले याचे पूर्ण जबाबदारीने आणि भान ठेवून हा चित्रपट निर्माण करण्यात आलेला आहे. घटना आणि भावना यांचा समन्वय राखला गेलाय. तपशीलवार संशोधनाची पटकथेला मिळालेली जोड चळवळीच्या प्रत्येक टप्प्याला सजीव करते. धीमी, मोजून-मापून टाकलेली पावले या कथेचे बलस्थान आहे ज्यातून शाश्वत समर्पण अपरिहार्यपणे कसे निर्माण होत जाते याचे पटण्यासारखे दर्शन इथे घडते.
 
 
व्यक्तिगत आयुष्यात शंभरी गाठणे नक्कीच कौतुकास्पद असते, संघटनेसाठी तो एक टप्पा असतो- क्षणभर थबकून सिंहावलोकन करण्याचा आणि भावी निश्चयांच्या पूर्तीसाठी पावले टाकण्याचा. अशावेळी आपण त्यांच्या परम् वैभवम् नेतुमेतत् स्वराष्ट्रं या प्रार्थनेच्या सुरात सूर मिसळायला हवा, नाही का?